Friday 10 January 2020

अशी झाली शेळीच्या दुधाची पहिली डेअरी सुरू

''शेळीच्या दुधाचे गुण मी स्वतः अनुभवले आहेत'' जिल्हाधिकारी दीपा मुधोळ सांगत होत्या. सभापती शिवाजी गायकवाड माहिती देत होते,''उस्मानाबादी शेळ्या १८ वेगवेगळ्या प्रकारचा चारा खातात.'' उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातल्या बसवंतवाडीत कार्यक्रम सुरू होता. शेळीचं दूध संकलन आणि विक्री केंद्राचा राज्यातला पहिला प्रकल्प, श्री दूध डेअरी. या प्रकल्पाचं उदघाटन गेल्या आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. हा प्रकल्प सुरू केला आहे सुरेखा भोसले, कोमल शिंदे, सुषमा बोबडे, ललिता शिंदे, भाग्यश्री गिरी, भाग्यश्री शिंदे, शोभा शिंदे, ऐश्वर्या बोबडे, अश्विनी मुळुक आणि रेशमा बोबडे या बसवंतवाडीतल्या प्रेरणा बचतगटाच्या महिलांनी.
तुळजापूरमधल्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतले विद्यार्थी प्रेमकुमार दनाने यांनी त्याला आकार दिला. प्रेमकुमार मूळचे कोल्हापूरचे. राजस्थान ग्रामीण आजीविका विकास परिषदेतून शिकलेले. ''राजस्थानात एका शैक्षणिक दौऱ्यादरम्यान शेळीच्या दूध डेअरीचा प्रयोग पाहायला मिळाला होता.''प्रेमकुमार सांगतात. ''टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या स्पेशल वेल्फेअर फॉर वुमन एम्पॉवरमेंट उपक्रमांतर्गत बसवंतवाडीत काम सुरू केलं.'' उस्मानाबादी शेळीची देशभरात ओळख. बसवंतवाडीत ५३० शेळ्या आणि ४७ बोकडे.
''सर्वसामान्य कुटुंब शेळीपालन करतात आणि तिच्या विक्रीतून उदरनिर्वाह करतात, असं सर्वेक्षणात आढळलं. शेळीच्या दुधाचं महत्त्व, प्रकल्पाचे फायदे त्यांना समजावले. त्यासाठी आठ बैठका घेतल्या. यात एसएसपी अर्थात स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेची मदत झाली. उमेदच्या बचतगटांना सोबत घेऊन अयमेरा शेळी दूध उत्पादक महिला संघ तुळजापुरात स्थापना केला. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून यासाठी काम केलं. आगामी काळात अनेक गावात हा प्रयोग यशस्वी करायचा आहे.''प्रेमकुमार सांगत होते.
'' सर्व महिलांना एकत्र आणणं, नवीन प्रयोगाबद्धल चर्चा करून फायदे सांगणं, गावातील शेळयाची माहिती संकलित करणं , कुटुंबाला तयार करणं , मार्गदर्शन करणं आव्हानात्मक होतं. यासाठी अनेकदा चर्चा करावी लागली. '' बचतगटाच्या अध्यक्ष सुरेखा भोसले सांगत होत्या. या कामात टाटा सामाजिक विज्ञान संस्थेचे विद्यार्थी आणि एसएसपी समूहाचे नसीम शेख आणि गोदावरी डांगे यांचं मार्गदर्शन महत्त्वाचं ठरलं, असा उल्लेख सुरेखाताई आवर्जून करतात.
या १० दिवसात २५ लिटर दूध संकलित करण्याचं महिलांनी ठरवलं आहे. महिलांच्या एकजुटीचे आणि धाडसाचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमात आमदार संवाद मंच अध्यक्ष डॉ. सतीश महामुनी,टाटा महाविद्यालयाचे प्रा. गुणवंत बिराजदार, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नामदेव आघाव आणि मान्यवर उपस्थित होते.


- अनिल आगलावे, उस्मानाबाद
#नवीउमेद #उस्मानाबाद #तुळजापूर #बसवंतवाडी

No comments:

Post a Comment