Thursday 9 January 2020

इंदिरा गांधींच्या आठवणी.

 ३१ ऑक्टोबर हा इंदिरा गांधी यांचा मृत्यूदिन. त्या निमित्ताने कुटुंबातल्या इंदिरा गांधींच्या आठवणी.
१. इंदिरा आणि सोनिया यांची पहिली भेट.
राजीवच्या भरपूर धक्केधपाटे खाल्लेल्या, जुन्यापान्या वॉक्सवॅगनमधून ते लंडनला आले. भारतीय दूतावासातल्या स्वागत समारंभाला हजेरी लावणं आणि नंतर अनोळखी वातावरणात राजीवच्या आईला भेटणं ह्या कल्पनेनंच तिला खूप घाबरायला झालं. मी तिथं जाऊन काय करणार? तिच्या डोक्यात प्रश्नांचे भोवरे गरगरू लागले. त्यातले काही प्रश्न गंभीर होते तर काही क्षुल्लक होते. मी इंदिरा गांधींना काय हाक मारू? मी घातलेले कपडे बरे आहेत का? मी त्यांच्याशी काय बोलू? त्यांनी माझ्याकडे तुच्छतेनं पाहिलं तर? त्या जर माझ्याशी तो-यानं वागल्या तर?
‘’अग बाई, काहीतरी वेड्यासारखं बोलू नकोस,’’ राजीव तिला सतत सांगत राहिला.
राजीवच्या संगतीत व्यतीत केलेला काळ अचानकपणे तिला स्वप्नवत् वाटू लागला. जणू ते स्वप्न थोड्याच काळात भंगणार होतं. त्याच्या आईला भेटण्याची आपली मनोमन तयारी झालेलीच नाही असं तिला वाटू लागलं. त्याशिवाय असं भेटायला जाणं म्हणजे त्या नात्यात आणखी खोल गुंतण्यासारखं नाही का होत? जिथं आपले स्वतःचे आईवडीलच ह्या नात्याच्या एवढे विरूद्ध आहेत, तर ती त्याच्या आईला कशी काय भेटणार?
‘’अग, पण, असं काय करतेस सोनिया? त्यांना माहिती आहे ते. तुझ्या बाबांनी दिली आहे ना परवानगी.. ...शेवटल्या क्षणी कशी तू माघार घेतेस ? सोनिया, अग आपणच दोघांनी मिळून ठरवलंय ना सारं? अग, लोक आपली वाट पाहाताहेत.’’
‘’मला माफ कर. मी नाही येणार. मला नाही जमत रे...’’
सोनिया घाबरली होती आणि तिला शांत करण्याचे राजीवचे सगळे प्रयत्न थिटे पडत होते. शेवटी त्याला आईला फोन करून सांगावं लागलं आणि ती भेट रद्द करण्यासाठी काहीतरी कारण शोधून काढावं लागलं.
सोनियाचा गेलेला आत्मविश्वास परत येईपर्यंत त्यांनी ती भेट काही दिवसांसाठी पुढे ढकलली. अर्थात् तेव्हासुद्धा प्रसंग सोनियासाठी कठीणच असणार होता. परंतु जे करणं योग्य आहे ते करायचं आणि चांगलंच करायचं असा तिनं मनाचा निर्धार केला. ह्या वेळी भारतीय राजदूताच्या निवासाच्या पाय-या चढताना तिचे पाय थरथर कापत होते.
इंदिराजींनी त्यांच्या खोलीत दोघांचं स्वागत केलं. समोर उभ्या असलेल्या, सुंदर रेशमी साडीतल्या स्त्रीसमोर सोनिया आली तेव्हा तिच्या गडद, बदामाकृती डोळ्यांत सोनियाला राजीवचे डोळे दिसले. इंदिराजींनी केसांचा अंबाडा घातला होता. त्या अवघ्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या होत्या तरीही पांढ-या केसांची एक जाडसर बट त्यांच्या भाळावर दिसत होती. काळजीपूर्वक विंचरून बसवलेली ती पांढरी बट त्यांच्या व्यक्तिमत्वाचा जणू भागच होती. त्यामुळे त्यांना अधिकच राजबिंडेपणा लाभत होता. त्यांचं हास्य लाघवी होतं, वागणं नाजूक होतं, त्यांचं नाक तर अगदी धरधरीत लांब होतं.
सोनिया नंतर म्हणाली की, चारचौंघीसारख्या, साध्यासुध्या स्त्रीसमोर मी आले आहे अशीच तेव्हा माझी भावना झाली. अगदी आपुलकीनं स्वागत केलं त्यांनी आमचं. मला तिथं घरच्यासारखं वाटावं म्हणून शक्य असेल तेवढं सारं केलं त्यांनी. इंग्रजीपेक्षा मी फ्रेंचमध्ये अधिक चांगलं बोलू शकेन म्हणून त्या माझ्याशी फ्रेंचमध्येच बोलल्या. त्यांना माझ्याबद्दल- माझ्या अभ्यासाबद्दल जाणून घ्यायचं होतं.’’ सोनिया किती बावरली होती ह्याबद्दल राजीवनं आईला सांगितलं असावं कारण इंदिराजी तिला म्हणाल्या, ’’अग, मीसुद्धा एके काळी तरूण होते, खूप लाजाळू होते, प्रेमात पडले होते. त्यामुळे मी तुझ्या भावना समजू शकते.’’
मनावरचा ताण गेल्यामुळे सोनियाला मोकळंमोकळं वाटलं. तिला त्या पहिल्या भेटीचा आनंद घेता आला. भेट संपली तेव्हा वातावरण अगदी छान, मोकळं झालं होतं. दोघांना नंतर त्यांच्या वर्गात शिकणा-या मित्रांच्या पार्टीला जायचं होतं. म्हणून मग सोनियानं विचारलं की मी इथल्याच खोलीत, पार्टीसाठी आणलेला इव्हिनिंग ड्रेस बदलू का? ड्रेस बदलून ती खोलीबाहेर पडली मात्र, तिचा पाय सटकला आणि तिच्याच चपलेची टाच ड्रेसमध्ये अडकून ड्रेसची हेम उसवली. सोनियानं नंतर ती आठवण सांगितली की, राजीवच्या आईनं अगदी शांतपणे (हा त्यांचा स्वभाव मला नंतरच्या काळात खूप जवळून बघायला मिळणार होता.) सुई-दोरा बाहेर काढला आणि अगदी सहजपणे त्या ती उसवलेली हेम शिवू लागल्या. अशा वेळी माझ्या आईनंही तेच नसतं का केलं? माझ्या मनातल्या उरल्यासुरल्या शंका निदान त्या क्षणापुरत्या तरी निमाल्या.’’
खरं तर त्या दोघी एकमेकींपेक्षा किती वेगळ्या होत्या! राजीववरचं प्रेम ही एकमेव गोष्ट त्या दोघींत समान होती. इंदिराजी राजीवजवळ बोलल्या नसल्या तरी एक परदेशी सून आपल्या घरी येणार ह्या कल्पनेनं त्याही थोड्याशा बिचकल्या होत्या. तथापि, सोनियाला प्रत्यक्ष भेटल्यावर त्यांच्या सर्व शंका फिटल्या. त्यांनी आपली अमेरिकन मैत्रीण डोरोथी नॉर्मनला लिहिलेल्या पत्रात लिहिलं की, ‘’ ही मुलगी सुंदर आहेच, पण त्याचबरोबर ती सुदृढ, निरोगी आणि स्वभावाने सरळसाधीही वाटते आहे.’’
२. राजीव-सोनिया यांच्या विवाहानंतरचा प्रसंग
सोनियावर कुटुंबीयांना निरोप देण्याची वेळ आली तेव्हा सोनिया त्यांच्यासोबत विमानतळावर गेली. आईला मिठी मारली मात्र, एकदम बांध फुटल्यासारखा झाला. तिच्या आईच्या दृष्टीनं तो खरोखरच कायमचा निरोप होता कारण ते सर्वजण आपल्या घरी जात होते, फक्त सोनिया मात्र ह्या विचित्र देशात राहाणार होती... त्यांच्याशिवाय.....एकटीच राहाणार होती. त्या क्षणी सत्य जेवढं निष्ठूर वाटलं तेवढं त्यापूर्वी कधीही वाटलं नव्हतं. सर्वांसमोर भावनांचं प्रदर्शन करण्याची सवय दोघींनाही नव्हती त्यामुळं तर तो प्रसंग अधिकच ह्रदयद्रावक होत होता.
‘’ मला पुष्कळ पत्रं लिही ग, बाळ, फोन करीत जा वारंवार.’’
‘’ होय मम्मा, नक्की. मी वचन देते..’’
नव्या घरी परत जाताना गाडीत सोनियाने चेहरा पुसुन कोरडा केला तेव्हा (इटलीतल्या) ल्युसियाना येथल्या आनंदी बालपणाच्या आठवणी तिच्या मनात चमकून उठल्या. ती आईवडिलांसोबत गाईचं दूध काढायला जात असे ते तिला आठवलं. वाढदिवस साजरे करण्यासाठी मित्रमैत्रिणी आणि चुलत-मावस-आते-मामेभावंडं पुष्कळ पुष्कळ भेटी घेऊन येत तेही तिला आठवलं. ते जीवन आता किती दूर गेलं होतं. लग्नाच्या ताणामुळे आणि दगदगीमुळे तिला खूप थकल्यासारखं वाटत होतं. त्यातच एक प्रकारचं नैराश्यही तिच्या मनात भरून आलं होतं. तिला शक्य तितक्या लौकर राजीवला भेटायचं होतं. केवळ तो... तोच तिला धीर देऊ शकत होता.
पण राजीव तर घरी नव्हता. तो फ्लाइंग क्लबवर विमानोड्डाणाच्या वर्गाला गेला होता. सोनिया खोलीत गेली तेव्हा त्या भिंती अंगावर चालून आल्यासारख्या वाटल्या तिला . ....आता राजीव घरी येईपर्यंत तिला अगदी एकटीलाच राहायचं होतं. पण खोलीचं दार उघडताक्षणी पलंगावर ठेवलेला एक लिफाफा तिच्या नजरेस पडला. त्यात इंदिराजींनी लिहिलेली एक चिठ्ठी होती.
त्यात लिहिलं होतं,’’ सोनिया, तू आम्हा सगळ्यांना खूप खूप आवडतेस.’’ ते वाचून तिचा चेहरा एकदम उजळला. त्या लहानशा कृतीमुळे तिला मनोमन भरून आलं. अचानक जादू व्हावी तशी तिची दुःखी मनस्थिती एकदम पालटून गेली. मग ती हसली आणि तिनं खोलीबाहेर पाऊल टाकलं.
काही काळानं तिला इंदिराजींच्या आवडीनिवडी कळू लागल्या. त्यांना फुलं खूप आवडत म्हणून टेबलावर कायम सुंदर पुष्परचना असेल ह्याकडे ती जातीनं लक्ष देऊ लागली. दोघींनाही लीलीचा सुगंध खूप आवडत असे, तो सुगंध एखाद्या मलमासारखा सा-या घराच्या कानाकोप-यात पसरे. त्यांचं घर उत्तम अभिरूचीनं सजवलेलं असलं तरी त्यात काटकसरी साधेपणाही होता. साधे पडदे आणि तसेच साधे गालिचे वगळता तिथं आदिवासी कलाकुसर, भारतीय चित्रकारांनी रेखाटलेली चित्रं, काही पुरातन कलावस्तू आणि ब्रिटिशकालीन फर्निचर अशा वस्तू होत्या. आपल्या सासूच्या व्यक्तिमत्वाची गुरूकिल्ली साधेपणात आणि पैशांच्या बचतीत आहे हे सोनियाला दिसून आलं. इंदिराजींना काहीही फेकून द्यायला आवडत नसे. प्लॅस्टिकच्या पिशव्यासुद्धा पुन्हा वापरता याव्यात म्हणून त्या व्यवस्थित घडी घालून ठेवत. इंदिराजींना हव्या तशा त्यांच्या सूटकेसेस भरायला सोनिया शिकली. सूटकेसमधील इंचही जागा न फुकट घालवता, अगदी छोटासा कोपराही उपयोगात आणायला त्यांना आवडत असे. इंदिराजींना घरात एखादी वस्तू हवी असं वाटलं तर ती वस्तू आणण्याची जबाबदारी सोनिया स्वतःच्या शिरावर घेत असे.
(सोनिया गांधी- ललित चरित्र या पुस्तकातून साभार/ मूळ स्पॅनिश लेखक- जावियर मोरा / इंग्रजी अनुवाद- ज्युल हर्न
मराठी अनुवाद- सविता दामले / प्रकाशक- राजहंस प्रकाशन, पुणे)

No comments:

Post a Comment