Saturday 25 January 2020

इंस्टाग्रामवरची लोकप्रियता , खाकी वर्दीचा मान

पल्लवी जाधव. जालना जिल्ह्यात पोलीस उपनिरीक्षक. इन्स्टाग्रामवर अल्पावधीतच दीड लाख फॉलोअर्स. हा आपला वैयक्तिक नव्हे तर खाकी वर्दीचा मान असल्याचं त्या सांगतात. ''लोकांच्या समस्या सोडवताना आनंद मिळतो. उर्मी मिळते, ती खरी कामाची पावती.'' पल्लवी सांगतात. सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पल्लवी आपल्या कार्यशैलीमुळे लोकप्रिय आहेत. पल्लवी औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातल्या रेलगावमधल्या. शेतकरी कुटुंबातल्या. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१४ च्या तुकडीतल्या. अनुसूचित जाती प्रवर्गात राज्यात दुसऱ्या क्रमांकानं त्या उत्तीर्ण झाल्या. कुटुंबातली कामं करून, शेतीत राबून त्यांनी परीक्षेचा अभ्यास केला आहे. सुरुवातीला २०१६ मध्ये महिला तक्रार निवारण केंद्राची जबाबदारी स्वीकारली. गेल्या ५-६ महिन्यांपासून दामिनी पथकाची जबाबदारी. नुकत्याच घर सोडून निघून गेल्या 2 चिमुकल्यांना त्यांनी गस्तीवर असतांना पालकांपर्यंत पोहचवले. मुलींसाठी कराटे प्रशिक्षण,स्वसंरक्षण,बालकांच्या हक्काबाबत जनजागृती,अशा अनेक मुद्यांवर त्या काम करत आहेत.मुलामुलींचं समुपदेशन, लहानग्यांना गुड टच बॅड टच याबद्दल माहिती देणं, त्यांच्या मनातली भीती दूर करणं यामुळे लोकांमध्ये त्यांच्याविषयी आदर आणि विश्वास दुणावत आहे. त्याचसोबत रोडरोमिओंना अद्दल घडवण्यातल्या धडाडीमुळे त्या युवा पिढीसाठी रोल मॉडेल ठरत आहेत. जालन्याचे पोलीस अधीक्षक एस चैतन्य,पोलीस उपअधीक्षक समाधान पवार,उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाचा पल्लवी उल्लेख करतात.
- अनंत साळी , जालना
व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=746415485880662

No comments:

Post a Comment