Friday 10 January 2020

निरोप (इतिहासात डोकावताना)

इतिहासात डोकावताना ह्या लेखमालेतील ही शेवटची पोस्ट. पोस्ट म्हणण्यापेक्षा निरोपाचे चार शब्द. गेल्या काही भागात आपण शालेय मुलं भूतकाळ ह्या संकल्पनेकडे कसं बघतात, इतिहास हा विषय त्यांना आवडतो का, समजतो का, त्यातून त्यांच्या काय समजुती तयार होत जातात हे बघितलं. इतिहास शिकणं ही प्रक्रियाच मुळी अत्यंत गुंतागुंतीची असते. शालेय वयात तर मुलांना ती अधिकच गुंतागुंतीची वाटू शकते. त्या वयात, म्हणजे साधारण १२ ते १५ ह्या वयात 'वेळ' ही संकल्पना त्यांच्या डोक्यात विशेष व्यापक झालेली नसते. वेळ आणि काळ ह्याविषयीचे त्यांचे संदर्भ फारच मर्यादित असतात. मग अशा वेळेस त्यांना इतिहास शिकवताना निरनिराळे प्रयोग करत शिकवायला लागतं जेणे करून त्यांना काळ आणि काळाचं प्रवाहीपण ही संकल्पना समजेल आणि मग इतिहास शिकण्यामधील मजा लक्षात यायला लागेल. ह्या सगळ्या प्रयोगांमुळे शाळेत इतिहास शिकणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने भविष्यात इतिहासकार किंवा पुरातत्वशास्त्रज्ञ बनावं असा अट्टहास अजिबातच नाहीये. परंतु विद्यार्थ्यांची तार्किक आणि वस्तुनिष्ठ विचार करण्याची क्षमता वाढण्याच्या अनेक शक्यता आपल्याला इतिहास हा विषय शिकताना आणि शिकवताना तयार करता येऊ शकतात. हाच विचार डोक्यात ठेवून आम्ही गेले वर्षभर पुण्याच्या सकल ललित कलाघर ह्या संस्थेमध्ये शालेय मुलांच्या कार्यशाळा घेतो. सगळ्याच कार्यशाळा ह्या काही फक्त इतिहास ह्या विषयावर बेतलेल्या नसतात. एकूणच सगळेच विषय कसे एकमेकात गुंतलेले आहेत आणि त्या सगळ्यांचा हात घट्ट पकडल्याशिवाय आपल्याला कोणत्याच एका विषयाचं नीट आकलन होऊ शकत नाही हे मुलांना सांगण्याचा प्रयत्न आम्ही प्रत्येक कार्यशाळेत करतो. नृत्य, संगीत, चित्र, भाषा, इतिहास, पुरातत्त्वशास्त्र हे सगळंच एकमेकात मिसळललेलं आहे. आणि ते समजून घेण्यासाठी लागणारी संवेदनशीलता मुलांमध्ये हळूहळू तयार व्हावी हा एवढाच ह्या कार्यशाळांचा हेतू असतो.
तर आमचे कालाघारातले प्रयोग चालूच राहतील परंतु ही मालिका मात्र आज इथे संपतीये. नवी उमेदने इथं माझे प्रयोग मांडायची संधी दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. नवी उमेद मधील या पोस्ट वाचून बऱ्याच नवीन लोकांशी संवाद झाला. काहींनी ते करत असलेल्या प्रयोगांबद्दल माहिती कळवली. मी आशा करते की, मालिका आज संपली असली तरी विचारांची ही देवाणघेवाण सुरूच राहील. आज मालिकेचा निरोप घेताना बघूया मुलांबरोबर घालवलेले काही क्षण !! llसमाप्तll

व्हिडीओ लिंक : https://www.facebook.com/watch/?v=2498826910339511
- डॉ. अनघा भट

No comments:

Post a Comment