Friday 10 January 2020

शिष्यवृत्ती परिक्षा आवश्यक आहेत का? (बातम्या तुमच्या आमच्या मुलांच्या)

सातेक वर्षांपूर्वीची गोष्ट. मुलगा चौथीत असताना त्याला शिष्यवृत्ती परिक्षेला बसवलं होतं. मुलगा आणि मी दोघांनी भरपूर अभ्यास केला . मुलगा आणि मी निकाल कधी लागतोय याची वाट पाहू लागलो. निकाल लागला अगदी थोडया फरकाने मुलाची शिष्यवृत्ती हुकली. पास होऊनही मुलगा अतिशय दु:खी झाला.मुलाचं अतिशय दुःखी होणं मला खूपच चटका देऊन गेलं. मग जाणवलं, 'असंही घडू शकतं,' याची कल्पना आपण मुलाला द्यायला हवी होती.
शिष्यवृत्ती मिळवणं हे काही आयुष्यतलं अंतिम ध्येय नव्हे. मेहनत, जिज्ञासू, अभ्यासू वृत्तीची जोपासना हे महत्त्वाचं. याच हेतूने शिष्यवृत्ती मिळो न मिळो, या परीक्षेत पास होवो न होवो पण बहुतांश विद्यार्थी या परीक्षांना बसायचे. त्यासाठी शिक्षक, पालकही आग्रही असायचे.
अलीकडे मात्र हे चित्र बदललं आहे.
गेल्या पाच वर्षांत यात नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल ४४ टक्क्ंयानी घटली आहे. २०१४मध्ये दोन्ही इयत्ता मिळून १५ लाख ६० हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती; तर २०१९मध्ये ही संख्या आठ लाख ६० हजारावर पोहोचली आहे.
संख्या लक्षणीयरित्या घटण्यामागे काय बरं कारणं असावीत. मुलं स्वतःहून तयार नाहीत की पालकांनी परिक्षेला न बसवण्याचा निर्णय घेतला असावा? मुलांनी आपली पत राखावी, भरघोस गुण मिळवावेत यासाठी आत्ताचे पालक त्यांना वेठीला धरत नाहीत, हा बदल कौतुकास्पदच आहे. पण मुलं अपयशाला घाबरत आहेत का? यावरही विचार झाला पाहिजे.
राज्य परीक्षा परिषदेनं याची गंभीर दखल घेतली आहे. यंदा प्रथमच परीक्षेच्या नोंदणीसाठी मुदत वाढवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना जर परिक्षेची भीती वाटत असेल तर त्यांच्यासाठी विशेष प्रशिक्षण वर्ग आयोजित करावे, अशा सूचनाही परिषदेने दिल्या आहेत. तसंच यंदा बालभारतीने पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी पुस्तकांची छपाई केली असून ती सवलतीच्या दरात विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
या निमित्तानं शिष्यवृती परिक्षा आता खरंच महत्त्वाच्या आहेत का की विद्यार्थी, पालक, शिक्षकांवरचा हा अतिरिक्त भारच आहे? यासाठी विनाकारण वेळ, निधी खर्च होतो का? याबाबत विचार करण्याची गरज आहे.

- लता परब
 

No comments:

Post a Comment