Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग एक)

मी स्वतः तीन मुलांचा बाप आहे.आज माझी तिन्ही मुलं तारुण्यात आहेत.मोठा मुलगा आता लवकरच वयाची सव्वीशी पूर्ण करेल तर त्याचे लहान जुळे भाऊ तेविशीत पदार्पण करतील. नवी उमेदनी मला या विषयावर लिहायला सांगितल्यावर मी जाणीवपूर्वक मुलांशी चर्चा केली.त्यांना मी थेट विचारलं की,रात्री अपरात्री एखाद्या निर्जन स्थळी एखादी तरुणी,महिला तुम्हाला दिसली तर तिचा गैरफायदा घेण्याची इच्छा तुमच्या मनात जागृत होईल का ? उत्तर 'हो' असेल तर का ? आणि उत्तर 'नाही' असेल तर का ?
प्रथम तर मुलं काहीशी गोंधळली.आपले वडील अशा प्रकारचा काही प्रश्न आपल्याला विचारतील याची कल्पनाच त्यांना नव्हती.परंतु मग एकेकाने भूमिका स्पष्ट केली.त्याचा सर्वसाधारण सारांश असा ; आमच्या काही परिचितांच्या घरात महिलांना जे दुय्यम स्थान किंवा त्यांना घालून,पाडून बोलणं आम्ही पाहिलंय तसं आपल्या घरात आम्हाला कधीही पहायला मिळालं नाही.मुलामुलींची मैत्री,गप्पा,थट्टा-मस्करी,सिनेमा-नाटकाला जाणं,फिरणं आदी बाबतीत आमची तुमच्याकडून कधीही अडवणूक झाली नाही.स्त्री-पुरुष नातेसंबंधांबाबत आपण घरात नेहमीच खुलेपणाने बोलत आलो.'पिंक' सारखे सिनेमे आपण आवर्जून एकत्र पाहतो,त्यावर नंतर चर्चा करतो.अशा सगळ्या बाबींमुळे आमच्या मनात काही वाईट विचार येणं शक्यच नाही वगैरे वगैरे..
यालाच बहुदा लोक 'संस्कार' वगैरे भारदस्त शब्द वापरत असतात.पण मला सांगायचंय ते हे की जर हे संस्कार असतील तर ते दिखाऊ पद्धतीने शिकवून मुलांवर बिंबवता येत नाहीत.ते तुमच्या आचरणातून,विचारांतून अकृत्रिमरित्या त्यांच्यात झिरपायला हवेत.त्यासाठी आधी तुमच्या मनात स्त्री-पुरुष समानता असायला हवी.आपल्या घरातील महिला ,मग ती आपली आई असो,बहीण किंवा पत्नी यांच्याशी आपण कसे वागतो,कसे बोलतो हे मुलं पहात असतात.त्यातून नकळत त्यांच्यावर काही संस्कार होत असतात.माझ्या वडिलांचे समाजातील,घरातील कर्तेपण संभाळण्यासाठी माझी आई घरात अक्षरशः तीळ तीळ झिजली.परंतु तरीही माझ्या वडिलांना कधी मी आईशी स्नेहाने,जिव्हाळ्याने बोलताना पाहिले नाही.त्यामुळे मला जसजशी समज येत गेली तसा मी वडिलांशी काहीसा फटकून आणि आईशी मात्र अगदी जोडून राहिलो.माझी लहान बहीणही पुढच्या आयुष्यात माझी आई झाली.त्या दोघींशी असलेलं माझं नातं,त्यातला स्नेह हे सर्व माझ्या मुलांनी काही काळ का होईना पाहिलं.मतभेद,वादविवाद कोणत्या पती-पत्नीत झालेले नसतात ? माझे आणि माझ्या बायकोचेही अनेकदा झाले.परंतु मुलांसमोर त्याचे प्रदर्शन टाळून आपसात मिटवण्यात आम्ही नेहमीच यशस्वी ठरलो.तिला आवश्यक असलेली स्पेस देणं,स्वातंत्र्य देणं आणि ते कोणत्याही उपकाराच्या भावनेतून नव्हे तर तो तिचा अधिकार आहे म्हणून,ही सर्व प्रोसेस मुलांनी पाहिली.त्यातूनही काही त्यांच्यात झिरपलं असणारच.आज मुलांच्या मैत्रिणी आमच्या घरी येतात.मस्त राहतात.त्यांना परत जायला उशीर होणार असेल तर मुलं फोन करून त्या मैत्रिणींच्या पालकांना सांगतात की काका/काकू,ती आमच्या घरी आहे.मी आणून सोडेन.काही काळजी करू नका.आणि मला समाधान या बाबीचे वाटते की त्या मुलींचे पालक माझ्या मुलांच्या सांगण्यावर आश्वस्त होतात.हा विश्वास मुलांनी कमावलाय.आपल्या मैत्रिणीविषयीची जबाबदारीची जाणीव त्यांना पूर्णपणे आहे.
शिक्षण,संगत या बाबी या सगळ्यात अतिशय महत्वपूर्ण आहेतच.परंतु पालक म्हणून आपले स्वतःचे आचरण आणि विचार यासंदर्भात खूपच महत्वाचे असतात असं माझं ठाम मत आहे.
-रवींद्र पोखरकर,ठाणे 

No comments:

Post a Comment