Saturday 25 January 2020

चला, मुलगे घडवूया (भाग नऊ)

आम्हाला आर्या आणि रुद्र अशी दोन मुलं. दोघेही वेगळ्या स्वभावाची. त्यांना वाढवताना मुलगा की मुलगी आहे हा विचार डोक्यात नसतोच. घरातील लहानसहान कामं आम्ही त्यांना वाटून दिली आहेत. आज जर एकानं दोघांचं वेळापत्रकानुसार दप्तर भरलं तर उद्या ही वेळ दुसºयांची. तेच युनिफॉर्मच्या बाबतीत आणि जेवणाची तयारी करण्याबाबत. त्या दोघांनी त्या दोघांच पहायचं. आई किंवा घरातील इतरांना आपलं सामान कुठे ठेवलं विचारायचं नाही. यात त्यांनी काही गोंधळ घातला तरंच आम्ही पाहतो. त्या दोघांमध्येही काम करण्याची चढाओढ असते म्हणजे, आर्याला काकडी सोलंण, एखादं फळ कस चिरायचं शिकवलं तर ते रुद्रलाही करायचं असतं. त्यालाही गॅस कसा पेटवायचा, कोरा चहा कसा गरम करायचा, भाजीचा गॅस कमी जास्त कसा करायचा हे शिकवत आहोत. आजूबाजुला एवढ्या घटना घडतात . त्यावेळी प्रत्येकामध्ये मी माझी दोन्ही मुले पाहत असते. ही वेळ आपल्यावरही येऊ शकते हा विचार जेव्हा मनात येतो तेव्हा आपल्या मुलांना त्याचा प्रतिकार करता आला पाहिजे, याचा विचार मी करते. आर्या तिच्या प्रोजेक्टचं सामान किंवा किराणा मालात राहिलेली एखादी वस्तू आणायला जाते तेव्हा सोबत किती पैसे दिले आहेत, किती परत येतील याचा अंदाज दिलेला असतो. बाहेर पडल्यावर कोणी अनोळखी बोलायला आला, काही खाऊ द्याायचा प्रयत्न केला तर काय करायचं हे त्यांना सांगत असते. कधी दोघे सोबत बाहेर जातात तेव्हा त्यांची गंमत पाहण्यासारखी असते. निरीक्षण करत ही मंडळी घरात येतात. काय पाहिलं, कोण काय करत होतं याचा सगळा तपशील त्यांना मला द्याायचा असतो.एकदा आर्याला रुद्रच्या मित्राने चिडवलं. त्यावरून त्याचं मित्राशी भांडण झालं. त्याला म्हटलं चिडवलं तर चिडवूदे, तिचं ती पाहील. त्यावर माझ्या बहिणीला कोणी चिडवलेलं आवडणार नाही म्हणून उत्तर होतं. ''ते तुझ्या बहिणीला चिडवतात, तसंच इतर मुलींनाही चिडवत असतील. तीही इतर कोणाची तरी बहीण असेल ना. '' त्यावर रुद्र विचार करू लागला. अशा घटनांमधून त्यांच्या जाणिवा विकसित करण्याचा प्रयत्न करत असतो. टीव्हीवर दिसणाऱ्या प्रसंगांबाबत ते प्रश्न विचारतात. त्याला त्यांच्या भाषेत उत्तर देणं आव्हान असतं. ते पेलण्याचा आमचा प्रयत्न असतो.
-प्राची उन्मेष 

No comments:

Post a Comment