Saturday 25 January 2020

दक्षिण भारतातल्या सरकारी शाळेतला वॉटर बेलचा उपक्रम तुमच्या शाळेत सुरू झाला का? सराटे वडगावच्या शाळेत झाला

बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील सराटे वडगाव. इथली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. सातवीपर्यंत वर्ग असणाऱ्या या शाळेत ५० विद्यार्थी आहेत. 
या शाळेतले एक शिक्षक बाळासाहेब बनसोडे. त्यांना पाच वर्षांची मुलगी. ती आजारी पडली. पाणी कमी प्यायल्यामुळे ती आजारी पडल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. दिवसभरात वय, वजन या अनुसार साधारण दीड ते तीन लिटर पाणी पिणं कसंआवश्यक आहे, शरीराला पाणी कमी मिळालं तर होणारे त्रास डॉक्टरांनी सरांना समजावले. त्याच वेळी बनसोडे सरांच्या वाचनात दक्षिण भारतातल्या सरकारी शाळेतला वॉटर बेलचा उपक्रम आला. पुरेसं पाणी पिण्याचं, शाळकरी मुलांमध्ये नियमित पाणी पिण्याची सवय रुजवण्याचं महत्त्व त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी मुख्याध्यापक सिद्धेश्वर शेंडगे आणि सहकारी शिक्षकांपुढे संकल्पना मांडली. सर्वच शिक्षकांना ती पटली.
बालदिनापासून शाळेत वॉटर बेलचा उपक्रम सुरू झाला. त्याचवेळी आमदार बाळासाहेब आजबे गावात आले होते. त्यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा प्रारंभ झाला. त्यांनी शाळेचं आणि उपक्रमाचं कौतुक केलं.
''शाळा भरल्यानंतर मधल्या सुट्टीपर्यंत दोनदा आणि मधल्या सुट्टीनंतर शाळा सुटेपर्यंत दोनदा ही घंटा होते. त्यावेळी मुलं आपल्या सोबतची बाटली उघडून पाणी पितात.'' बनसोडे सर सांगतात. ''तहान लागली तर इतर वेळीही मुलं पाणी पिऊ शकतात . पण ही घंटा वाजली जाईल तेव्हा त्यांनी आवर्जून पाणी प्यावं हा उद्देश. एरवीची शाळेची घंटा आणि पाणी पिण्यासाठी वाजवली जाणारी घंटा यातील फरक लक्षात यावा यासाठी शाळेच्या मध्यभागी मैदानात जाऊन ही घंटा वाजवली जाते.''
मैदानात घंटा वाजली की गुरुजी शिकवणं थांबवतात. मुलं दप्तरातून पाण्याची बाटली काढतात आणि पाणी पितात.
पाणी पिण्याचं प्रमाण वाढल्यापासून मुलांमधली मरगळ दूर झाल्याचं शिक्षक सांगतात. 
- राजेश राऊत , बीड

No comments:

Post a Comment