Friday 10 January 2020

हिंदीतून मराठीत निबंध लिहिण्याची चेष्टा (आखुडबुद्धी बहुशिंगी)

आपल्या अलग प्रकारच्या व्यंगासाठी प्रसिद्ध असलेले साहित्यिक अमुक्तमुक अर्थात कवी लमुक्ढमुक यांचा जन्म एका देहात मध्ये झाला. त्यांच्या गावात इस्कूल नसल्याने शिक्षेसाठी तहसीलच्या गावी जाण्याव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणताच चारा नव्हता. घास लादून यातायात करणाऱ्या गाढवांच्या कारवासोबत ते यात्रा करत. त्यांच्या पाठीवर असलेले भारी दप्तर पाहून यात्री लोकांच्यात असमंजस स्थिती होत असे. पण जाड्याचे दिवस असो वा कडी धूप असो, नाव नसल्याने ते पोहून नदी पार करून शाळेला जात. त्यांचे क्षेत्र सूख्याने प्रभावित झालेले असतानाही ते पाणी सोबत घेऊन नदीपार जात. विद्येप्रती असलेली त्यांची रुची पाहून शिक्षकांनी त्यांची प्रशंसा केली आणि त्यांना शाळेच्या बोझमधून हलके करत अनेक किताब दिले. ते वाचल्यावर त्यांना कविताशी लगाव झाला. उजाळा, पंक्ती आणि काव्यचञ्चला या पत्रिकांत त्यांच्या काही कविता प्रकाशित झाल्या. शिक्षा संपल्यावर त्यांनी काही काळ छोटेमोठे व्यवसाय केले. पेशाने कवी असले तरी आपण उत्तम हलवा करू शकतो याचा त्यांना गर्व होता. एकेकाळी कुरेदपूरच्या राजवाड्यात त्यांनी महाराज म्हणून काम केले असल्याने ते पाककलेशी परिचित होते. पण पाककलेवर त्यांचं कविताप्रेम भारी पडलं. आणि त्यातून त्यांनी हास्यकविता करण्यास सुरुवात केली.
त्यांच्या रचनांची विशिष्टता ही होती की वाचताना पाठकांना प्रचंड हसू येत असे, किंतु जेव्हा ते आपल्या परीचित अंदाजात श्रोत्यांना सुनावत तेव्हा मात्र त्या हास्यकविता असल्याचा संदेहही पैदा व्हायचा नाही. यातूनच एका संमेलनात त्यांच्या हास्यकवी असण्यावर दर्शकांनी आपत्ती जाहीर केली होती. आपल्या कलमाची जादू कुणाला कळत नसल्याच्या आशंकेनं त्यांना घेरलं. पण हकीगत ही होती की त्यांनाही ही गोष्ट कळली नव्हती. त्यांच्या कवितांत काही न कळणारं एक चरित्र असे, जे त्यांनी स्वतःच्या आधार वर रचलं होतं. भोपालच्या संमेलनात श्रोत्यांनी आपल्याकडं पीठ फिरवल्याचा त्यांना मोठा धक्का बसला. त्याच दुःखात त्यांनी आत्मघात करून आपली जीवनयात्रा संपवली.
मृत्यूच्या पश्चातही त्यांच्या रचनांनी कुणाला आठवण झाली नाही. २०१९च्या सुरुवातीस, या वर्षात कुणाच साहीत्यकाराची शताब्दी नसल्याचे जेव्हा अकादमीतल्या विद्वानांच्या लक्षात आले तेव्हा कुणीतरी त्यांना खोजून काढले. मग गेले वर्षभर त्यांची गतशताब्दीतील सर्वश्रेष्ठ व्यंगकार अशी पहचान करून दिली जात आहे. संयोगाने कालच त्यांची वर्षगाठ आहे.
- ज्युनिअर ब्रह्मे
 

#नवीउमेद

No comments:

Post a Comment