Saturday 25 January 2020

गोष्ट जत्रेची, जत्रा घोड्यांची

देशातील क्रमांक दोनचा आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा असलेल्या सारंगखेड्याच्या अश्व (घोड्यांची) यात्रेची ऐटीत सुरुवात झाली आहे. एकमुखी दत्ताचे मंदिर, जातिवंत अश्वांचे नेत्रदीपक विश्व आणि तापी नदीच्या किनारी पर्यटनाचा आंनद अशी त्रिवेणी मेजवानी येथे येणाऱ्या प्रत्येकाला अनुभवता येते. याच सारंगखेड्याचा यात्रेची रपेट आपण येणाऱ्या आठवड्यात करणार आहोत.
अश्वांचे आकर्षण भारतीय समाजाला खूप आधीपासून आहे. एकेकाळी ग्रामीण भागात अनेकांकडे स्वतःचे घोडे राहत. मात्र काळ बदलला... शौक बदलले... पण घोडयांप्रती असलेलं आकर्षण मात्र समाजात तसंच आहे. त्यामुळेच नंदुरबार जिल्ह्यातील तापी नदीच्या किनारी भरणाऱ्या सारंगखेड्याच्या घोडे बाजाराला दरवर्षी लाखो अश्व शौकीन हजेरी लावतात. गेल्या वर्षी तब्बल १३ लाखाहून अधिक लोकांनी या यात्रेला भेट दिली होती.
शौक बडी चीज है... असं नेहमीच म्हटलं जातं. कुणाला गाड्यांचा तर कुणाला सुसाट धावणाऱ्या बाईकचा... पण रुबाबदार, ऐटबाज आणि आरस्पानी रुपडं लाभलेल्या घोड्यावर स्वार होऊन जग जिंकायला निघण्याचा शौक त्यापेक्षा काही निराळाच, वेगळीच झिंग आणणारा... आणि हा शौक पूर्ण करण्याची संधी देतो सारंगखेड्याचा घोडे बाजार... अतरंगी आणि जातिवंत घोड्यांचं हे आगळंवेगळं विश्व... घोड्यांचा शौक असणाऱ्यांपासून सर्वसामान्यांना आकर्षित करणारी अश्व पंढरी म्हणजे 'सारंगखेडा'.
छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते इंग्रज घोडदळासाठी जिथून घोडे खरेदी करत तोच हा सारंगखेड्याचा ऐतिहासिक घोडे बाजार. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेल्या या घोडे बाजाराला चारशे वर्षांची परंपरा आहे. सारंग हे घोड्याचं समानार्थी नाव असल्यामुळे त्यावरूनच गावाचं नाव सारंगखेडा पडल्याचं गावातली जुनी जाणती मंडळी सांगतात. दरवर्षी कोटीच्या कोटी उड्डाणं घेणारा हा घोडेबाजार श्री दत्त जयंतीला सुरू होतो.
तापीच्या किनारी वसलेलं आणि महानुभाव पंथाचं श्रद्धास्थान असलेलं सारंगखेडामधलं एकमुखी श्री दत्ताचं मंदिर. या एकमुखी दत्ताच्या या मंदिरामुळेच राज्यात सारंगखेड्याची वेगळी ओळख आहे.
२० दिवस चालणा-या या उत्सवासाठी लाखो भाविक देश विदेशातून इथं येतात. घोडेबाजार हे इथलं मुख्य आकर्षण. त्याचबरोबर शेती आणि संसारोपयोगी वस्तूंसाठी हा बाजार नावाजलेला. कधी काळी इथं मोठा बैल बाजारही भरत असे. कालौघात तो नामशेष झाला. इथं पार पडणारे सांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक उपक्रम सारंगखेड्याला येणाऱ्या प्रत्येकाच्या लक्षात राहतील असेच आहेत.
- कावेरी परदेशी, धुळे

No comments:

Post a Comment