Tuesday 7 January 2020

स्वतःचा बालविवाह रोखणारी मनिषा...

जिल्हा जालना. इथल्या भोकरदन तालुक्यातलं चांदेटेपली गाव. या गावातल्या मनीषा गोविंद घोरपडेची ही गोष्ट. मनीषा सध्या राजूर इथं विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयात बारावीत शिकते. घरी आई कमलबाई आणि धाकटा भाऊ आहे. तर मोठे दोन भाऊ औरंगाबादला असतात.
घरची परिस्थिती सामान्य. शेती नाही. त्यामुळे सर्वचजण इतरांच्या शेतात मजुरी करतात. मनीषाही आईला घरी मदत करून शाळा शिकते. एकूणच आजूबाजूच्या बाकी मुलींसारखंच तिचं आयुष्य सुरू होतं. मनीषा गावी जिल्हा परिषदेच्या शाळेत आठवीत शिकत होती तेव्हाची ही गोष्ट. मनीषाच्या घरातल्यांनी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला. आपल्याला पाहायला पाहुणे येत आहेत, हे मनीषाला समजलं. हे सारं मनीषासाठी अनाकलनीय होतं. अजून आपलं शिक्षण पूर्ण झालं नाही आणि आपलं लग्न कसं होऊ शकतं. या विचाराने ती गोंधळून गेली. प्रत्यक्ष पाहुणे येण्यापूर्वीच तिने ‘मी आत्ताच लग्न करणार नाही’ असं स्पष्ट शब्दांत सांगत तिने बालविवाहाला नकार दिला. आणि हाच निर्णय तिच्या सकारात्मक भविष्याची नांदी ठरला.
ग्रामीण भागातील बहुतांश कुटुंब शेती आणि मिळेल ते मजुरीचे काम करून उदरनिर्वाह भागवतात. मनीषाही अशाच कुटुंबातली. चांदेटेपली गावातून ऊसतोडणीसाठी अनेक कुटुंब सहा महिन्यांसाठी कारखान्याकडे स्थलांतरित हेतात. अशावेळी मुली ‘ओझं’ म्हणून सांभाळाव्या लागतात, अशी मानसिकता गावांतून दिसून येते. चांदेटेपली गावातल्या मनीषाने बालविवाहाला केलेला विरोध हा अचानक घडून आलेला बदल नव्हता. ‘तुला नाही म्हणायची प्रेरणा कुठून मिळाली’ असं मनीषाला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, “गावात दोन अंगणवाड्या सुरू आहेत. जिल्हा परिषद शाळेला बाजूलाच असलेल्या या अंगणवाडीत स्वातीताई घोरपडे आणि वंदनाताई घोरपडे सेविका म्हणून काम करतात. मी आठवीत होते तेव्हा अंगणवाडीत किशोरवयीन मुलींच्या बैठका व्हायच्या. या बैठकीत मुलांना समस्या मांडण्यासाठी संवाद पेटी असायची. शिवाय अंगणवाडी ताईंकडून स्वच्छतेच्या बाबतीत मार्गदर्शन मिळायचं. बालविवाह कसा चुकीचा आहे, याबाबत सखोल माहिती दिली जायची. शिवाय असा विवाह कायद्याने गुन्हा कसा ठरतो. बालविवाहाचे मुलींवर आणि जन्मणाऱ्या बाळावर कसे परिणाम होऊ शकतात हे सारं सांगितलं जात होतं. यातून किशोरवयीन मुलींना हे सारे प्रश्न कळले होते. त्यातून आम्हाला प्रेरणा मिळत गेली.”
जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये स्थलांतराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. त्यात भोकरदन आणि परतूर या तालुक्यात प्रमाण तुलनेने अधिकचं. यामुळे या परिसरात बालकांच्या पोषण आहारापासून ते त्यांच्या स्थलांतर रोखण्यापर्यंत आणि कुपोषण निर्मूलनापासून बालकामगार, बालविवाह हे सारं थांबावं यासाठी मागीर चार वर्षांपासून काम केलं जात आहे. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी या ठिकाणी प्रबोधन वर्ग घेतात. चांदेटेपली हे यापैकीच एक गाव. संस्थेकडून या ठिकाणी किशोरी मुलींसह पालक, विद्यार्थ्यांचं प्रबोधन होतं. ज्यात बालविवाहाचा विषय प्रामुख्याने हाताळला जातो. बालविवाहातून भविष्यात उद्भवणाऱ्या समस्या चित्रफितीतून दाखवल्या जातात. यामुळे जनजागृतीला गती मिळाली.
बालविवाह कायद्याने गुन्हा, परंतु गाव-वस्ती-तांड्यावर कायद्याची माहिती असली तरी याकडे होणारे दुर्लक्ष आणि महत्त्वाचे म्हणजे मुलीचे लग्न लावून कधी एकदा जबाबदारीतून मुक्त होऊ अशी पालकांची मानसिकता असते. म्हणूनच बालविवाह होण्याचा धोका असतो.
आठवीतील मनीषाच्या लग्नासाठी कुटुंबाने जेव्हा प्रयत्न सुरू केले होते, याचदरम्यान तिला स्थळं येऊ लागली. घरातील लोक आपल्या लग्नाचा निर्णय घेत असताना मनीषाला हे सारं नको होतं. कारण अंगणवाडीत बालविवाहाच्या परिणामांची तिला पुरेपूर माहिती मिळाली होती. म्हणूनच या विषयावर तिने आई-भावांसोबत चर्चा केली. मला अजून शिकायचं आहे. मी लग्न करणार नाही असं सागितलं. शिवाय ही गोष्ट तिने अंगणवाडी ताईंनाही लक्षात आणून दिली. इतक्यावरच थांबली नाही तर बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे, याचे परिणाम आपल्या सर्वांवर होऊ शकतात. असं घरी सांगितलं. अखेर कुटुंबाला तिचं म्हणणं पटलं. अन् मनीषाचा विवाह करायचा नाही तिला शिकू द्यायचं असा निर्णय घरच्यांनी घेतला. त्यामुळेच मनीषा आता महाविद्यालयीन शिक्षण घेऊ शकते आहे.

- सुशील देशमुख, रूचा सातूर
#नवीउमेद #नकोलगीनघाई

No comments:

Post a Comment