Tuesday 4 February 2020

माने सरांच्या शाळेतला प्रत्येक विद्यार्थी आनंदी का आहे




माने सर मूळचे अंबाजोगाईचे. गेली १४ वर्ष ते शिक्षक आहेत. त्यातली ११ वर्ष आदिवासी, नक्षलग्रस्त गोंदिया जिल्ह्यातली.अनेक आदिवासी गोंडी विद्यार्थ्यांना त्यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं. सध्या परभणी जिल्ह्यातल्या सेलू तालुक्यातल्या पारडी इथल्या जिल्हा परिषद शाळेत. त्यांचं स्वतःचं शिक्षण अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत झालं. लहानपणी मनातले गुरुजी न लाभल्याची खंत ते दूर करत आहेत.  त्यासाठी, अमृतकण, मित्र माझा आरसा,,वाचनाचा आनंद सोहळा,बालसभा,वर्ग दैनंदिन अहवाल, परीक्षण,प्रश्न आमचे उत्तर तुमचे, मला बोलू द्या, लेखक आपल्या भेटीला, आम्ही असे घडलो,जागर शिक्षणाचा, उत्कृष्ट वाचक पुरस्कार, शाळा रत्न पुरस्कार, निवड एकलव्याची, बालकुमार मेळावे, पुस्तक भिशी, एक क्षण स्वच्छतेचा,माझा वर्ग माझी रांगोळी,प्रश्नपेटी,माझा वाढदिवस,थीम फलक,चालता बोलता,चला मुलाखत घेऊया, शिवार भ्रमंती,सीड बँक,कानगोष्ट,पुस्तक पासबुक,माझी सखी रोजनिशी,एक सप्ताह एक विद्यार्थी भेट,मान्यवरांशी चलभाषेवरून संवाद,ग्रामसभेत सहभाग असे अनेक कल्पक उपक्रम.
या उपक्रमांमुळे विद्यार्थी वाचनाबरोबरच लेखनाकडे वळतात. पेन मित्रमुळे राज्यातले जिल्हाधिकारी, साहित्यिक,समाजसेवक असे १५० जण विद्यार्थ्यांचे मित्र झाले आहेत. २०० पत्रं विद्यार्थ्यांकडे जमली आहेत. बाहेरच्या जगाशी विद्यार्थी जोडले गेले आहेत.
ज्ञानपोईच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. मुलांना कोणाशीही निर्भीडपणे संवाद साधता यावा यासाठी बालसभा.
अभ्यासातली सर्वांची गती सारखी नसते. अभ्यासात आपला मित्र मागे असेल तर त्याला सोबत घेतलं पाहिजे, आपण जिंकलं पाहिजे न सोबत आपला मित्रही, ही भावना निर्माण व्हावी यासाठी जिंकू जिंकू. दर महिन्याला एक लेखक ते शाळेत बोलावतात.शाळेला गावकऱ्यांचा हातभार लागावा यासाठी वर्षातून तीन वेळा जागर शिक्षणाचा.
आबा महाजन यांच्या पुस्तकाचं बंजारा भाषेत पारडीच्या मुलांनी अनुवादित केलेलं 'आनंदेरो झाड' हे पुस्तक नोव्हेंबरमध्ये मुंबईत ग्रंथालीच्या दिनकर गांगल यांच्या हस्ते प्रकाशित झालं.
''विद्यार्थ्यांनी मला श्रीमंत केलं आहे विद्यार्थी यशस्वी झाला की शिक्षकाच्या श्रमाचं चीज होतं.'' असं माने सर म्हणतात.



''प्राथमिक शिक्षण म्हणजे भविष्याचं बीज. शिक्षण मुलांच्या जीवनात आनंद फुलवणारं असलं पाहिजे आणि त्याचं माध्यम म्हणजे शिक्षक.'' युवराज माने सर सांगत होते.

No comments:

Post a Comment