Friday 5 October 2018

.... त्यांच्या मॉर्निंग वॉकची किमया

काळी सातची वेळ. एक व्यक्ती मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडते आणि शहरातील सर्व नव्या, जुन्या शासकीय कार्यालयांना भेटी देते. ही व्यक्ती म्हणजे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण. गेली दोन महिने ते नियमितपणे मॉर्निंग वॉकचा हा नियम कटाक्षाने पाळत आहेत. या फेरीत ते विविध कार्यालयातील समस्या जाणून घेतात. प्रशासकीय पातळीवर त्या सोडवण्याचा प्रयत्न करून ते मार्गीही लावण्याची कामगिरीही त्यांनी केली आहे. 
ते म्हणतात, “नियमित मॉर्निंग वॉकने आरोग्य चांगले राहते. व्यायाम होतो, त्याचबरोबर शहराचा फेरफटका मारताना चांगल्या वाईट गोष्टींची माहिती होते. प्रत्येक नागरिकाला भेट देणे शक्य नसते. त्यामुळे या मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने नागरिकांशी संवाद साधता येतो. विकासात्मक कामाचा आढावा घेता येतो”. 
सुनील चव्हाण यांनी ऑगस्ट २०१८ मध्ये रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. याआधी ते ठाणे महानगरपालिकेत होते. त्यांना सामाजिक कार्याची आवड आहे. त्याचबरोबर शेतीत त्यांना अधिक रस वाटतो. रत्नागिरी जिल्ह्याचा कार्यभार स्वीकारताच त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवली. झीरो पेंडीग फाईल हे तत्त्व डोळ्यासमोर ठेवून रात्री उशिरापर्यंत कामाचा निपटारा करतात. त्यांचा कामाची शैली आणि पद्धत पाहून इतर अधिकाऱ्यांच्या कामातही वेग दिसू लागला आहे. मतदार जनजागृती अभियानासाठी पहिल्यांदाच जिल्हाधिकारी प्रत्येक तालुक्यात जाऊन तरुणांशी संवाद साधत आहेत. १८ वर्ष पूर्ण असलेला एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये म्हणून दिवस रात्र त्यांची धडपड सुरू आहे. चव्हाण यांच्या मॉर्निंग वॉकची धास्ती अनेक अधिका-यांनी घेतली आहे. अर्थातच त्यामुळे त्यांच्या कामाचा उरक वाढला आहे. सकाळी १० ते रात्री १० पर्यंत सुनील चव्हाण प्रशासकीय काम करतात. त्यांचा या कार्याचं सध्या रत्नागिरीत कौतुक होते आहे.
- जान्हवी पाटील.

No comments:

Post a Comment