Tuesday 2 October 2018

पाच पिढ्यांनंतर जन्मली मुलगी, माळी कुटुंबाची दिवाळी

गावातून घराकडे येणाऱ्या रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या अंथरलेल्या. सुरूवातीला ‘वेलकम सोनपरी’ अशी रांगोळी. गुलाब, शेवंती अशा विविधरंगी फुलांनी रस्त्याचा ८०० फुटापर्यंतचा भाग व्यापलेला. बॅन्ड पथकाची तयारी आणि फटाक्यांच्या माळा सज्ज ठेवलेल्या. फुलांनी सजविलेल्या जीपमधून छोट्याशा बाळाला घेऊन महिला खाली उतरताच फटाक्यांची आतिषबाजी आणि बॅन्ड सुरू होतो. हा एखाद्या चित्रपटातला प्रसंग नाही तर तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ या गावात रंगलेला मुलीच्या जन्माचा सोहळा आहे.
गावचे पोलिस पाटील असलेल्या लक्ष्मण राजेंद्र माळी यांच्या कुटुंबात सुमारे ५ पिढ्यांनंतर (22 सप्टेंबर रोजी) नुकतीच मुलगी जन्माला आली. तिच्या स्वागतासाठी अवघं कुटुंब आतुर झालं होतं. बुधवारी ही चिमुकली तिच्या आईसह घरी येणार होती. म्हणून संपूर्ण गावात आरास करण्यात आली होती. फुलांनी रस्ते सजले होते. रांगोळ्यांनी, तोरणांनी घरादारांना शोभा आली होती. मुलीच्या स्वागताचा हा सोहळा अवघ्या पंचक्रोशीत कौतुकाचा विषय ठरला आहे. चिमुकलीचं स्वागत झालं तेव्हा गावकऱ्यांना हेवा वाटत होता. तर, माळी यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर अानंदाचे भाव तरळत होते.
फटाके फोडून, बॅन्ड वाजवून मुलीचं स्वागत करण्यात आलं. माळी यांच्या सूनबाई अंजू यांच्यासह चिमुकल्या सोनपरीचं आरती ओवाळून स्वागत करण्यात आलं. त्यानंतर गावकऱ्यांना मिठाई वाटून त्यांचं तोंड गोड करण्यात आलं. या अनोख्या सोहळ्याबद्दल लक्ष्मण माळी म्हणाले, “कुटुंबात पाच पिढ्यांनंतर मुलगी झाली आहे. हा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. मुलगी झाली त्याच क्षणी तिच्या स्वागताचा सोहळा थाटात करण्याचा आम्ही निर्णय घेतला होता. प्रत्येकाने मुलीच्या जन्माचं मनापासून स्वागत करावं, मुलगीच खरा दोन्ही कुटुंबांचा आधार असते.”

- चंद्रसेन देशमुख.

No comments:

Post a Comment