Thursday 18 January 2018

मुलं शिकली; वाचू लागली

मुंबई स्पेशल
मुंबईच्या चेंबूर उपनगरात 'सह्याद्री नगर' नावाची एक वसाहत आहे. चेंबूर-सीएसटी फ्रीवे च्या नजीकच्या टेकडीवर राहणाऱ्या अनेक स्त्रियांनी इथल्या शैक्षणिक परिवर्तनात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यामुळे त्यांचे हे कार्य, आठवणींमध्ये लुप्त होण्याआधी सर्वांसमोर आणणे गरजेचं ठरतं.
छाया पंचभाई या त्यातल्याच एक. त्यांचं घर 'सह्याद्री नगर' च्या टेकडीच्या एकदम वरती आहे. आणि टेकडीवर पसरलेल्या अनेक घरांना कापत जाणारा एक अरुंद रस्ता आपल्याला तिथं घेऊन जातो. इथली बहुतांश वस्ती ही मजूरवर्गाची. एरवी ज्यांना सवय नाही ते अगदी धापा टाकतच त्यांच्या घरी पोहोचतात. त्यांच्या ह्या घरातच पहिली बालवाडी सुरु झाली. बालवाडीतून त्यांनी स्वतःला ह्या कार्यात झोकून दिल्यामुळे वस्तीतले सगळे त्यांना 'ताई' म्हणू लागले.
छायाताई सांगतात की, “९० च्या दशकाच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये ह्या भागात शिक्षणासंबंधित काहीच जागरूकता नव्हती. घरांपासून शाळा अगदी लांब, त्यामुळं बरीच मुलं शाळेत जात नसत किंवा गेली तरी काही वर्षांनी शाळा सोडून देत. शिवाय 'शिकून काय करायचंय, नंतर असंही नोकरीच करायची आहे’ असा विचार सगळी लोकं करत होती.” अशा पार्श्वभूमीवर 'प्रथम' ने तिथल्या स्त्रियांना लक्ष्य केलं. त्यांना साक्षरतेचं महत्व पटवून दिलं, आणि हेच त्यांना पुढं इतरांना पटवून द्यायला सांगितलं. हळू-हळू ह्या भागातली मुलं आणि प्रौढ, दोघंही शिकू लागली, लिहू-वाचू लागली. त्यांच्या बालवाडीत देखील मुलं येऊन शिकू लागली. "माझ्या बालवाडीमुळे बऱ्याच मुलांच्या मूळ संकल्पना पक्क्या झाल्या", असं त्या आनंदाने सांगतात. बालवाडी नंतर त्यांनी घरी वाचनालय सुरु केलं आणि त्यामुळे तिथल्या मुलांमध्ये वाचनाची आवड देखील निर्माण झाली. अशाप्रकारे अगदी लहानमुलांपासून सर्वच मुलांमध्ये लिहिण्या-वाचण्याची प्रवृत्ती निर्माण झाली. आज त्यांच्या बालवाडीत शिकून गेलेल्या आणि नंतर वाचनालयात वाचून गेलेल्या बऱ्याच मुलांना चांगल्या नोकऱ्या लागल्या आहेत. ही सारी मुलं ह्याबद्दल त्यांना धन्यवाद देतात.
९० च्या दशकाच्या सुरुवातीला 'शाळेत पाठवायचं की नाही' हा इथला चर्चेचा विषय होता. आता मात्र शाळेत गेलं पाहिजे हे सर्वांनी मान्य केलं आहे. आता चर्चेचा विषय, 'महानगरपालिकेच्या शाळेत जायचं की खाजगी शाळेत' हा आहे. हेच महत्वाचं आणि मोलाचं परिवर्तन आहे.
छायाताईंकडे अमोल नावाचा एक मुलगा यायचा. त्याचं अभ्यासात फारसं लक्ष नसायचं. इतरांप्रमाणे त्याचं अभ्यासात मन रमावं म्हणून त्या त्याला सांगायच्या की जर अभ्यास केलास तर तुला मोठेपणी विमानात बसायला मिळेल. थोडा मोठा झाल्यावर अमोलने त्यांना बोलून दाखवलं की तुम्ही हे खोटं बोलत आहात. परंतु त्याच्या नकळत त्याला अभ्यासाची गोडी लागल्यामुळे अमोलने पुढे खूप प्रगती केली आणि त्याला नोकरीसाठी परदेशात जायची संधी मिळाली. त्याचा प्रवास विमानाने होणार होता. साहजिकच, त्याला छायाताईंची आठवण झाली. तो त्यांना भेटायला आला. "तुम्ही लहानपणी सांगितलं होतं, तसं मला विमानात बसायला मिळालं. धन्यवाद", असं त्याने बोलून दाखवलं. ही कहाणी संपवताना छायाताईंना अश्रू आवरणं अवघड झालं होतं.
तुम्ही शिकवलेली मुलं आता कुठे राहतात, असं त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी वसती बाहेर बांधलेल्या बिल्डिंगचा उल्लेख केला. "त्यांचं आयुष्य चांगलं झालं ह्यात मला आनंद आहे", असं त्या म्हणाल्या. परंतु इतकी आयुष्य चांगल्या मार्गाला लावणाऱ्या ह्या शिक्षिका अजून देखील त्याच छोट्या झोपडीत राहतात. शिक्षकांचा हा त्याग बहुतेकदा दुर्लक्षित केला जातो.
- आशय गुणे

No comments:

Post a Comment