Showing posts with label Hingoli. Show all posts
Showing posts with label Hingoli. Show all posts

Sunday, 3 June 2018

१९ व्या वर्षीच स्वतःची आयटी कंपनी, वार्षिक उलाढाल ३० लाख रुपये


 हिंगोली जिल्ह्यातलं औंढा नागनाथ. तिथला अतुल कापसे. कुटुंबाची तीन एकर कोरडवाहू शेती. परिस्थिती बेताचीच. अतुलचा मोठा भाऊ कष्टानं शिक्षक झाला. शिक्षणाचं महत्त्व त्यानं अतुलवर बिंबवलं. अतुलचं शालेय शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेतलं. कॉम्प्युटरची खूप आवड . मात्र 12 वी पर्यंत कॉम्पुटर फारसा हाताळायलाही मिळाला नव्हता. औरंगाबादला देवगिरी महाविद्यालयात बी.एस्सी. आय. टी. ला प्रवेश घेतल्यानंतर ओळख झाली वेदांत जहागिरदार, आकाश पाथरकर, सोनीक जाधव आणि सागर महेर या मित्रांशी. माहिती तंत्रज्ञानाविषयी असलेल्या समान आवडीतूनच स्वप्न जन्माला आलं. मित्रांच्या लॅपटॉपवरून भरपूर शिकता आलं. कॉलेजमध्ये वेबसाईट करण्याचं शिकता शिकता कळत गेलं की औरंगाबादमध्ये व्यवसायिकांचं प्रमाण तर बरंच आहे पण त्यांच्या वेबसाईट बनवणारे पुण्या-मुंबईचे. त्यांना स्थानिक पातळीवर वेबसाईट तयार करून देण्याचा विचार घोळू लागला.
त्याच सुमाराला खालसा फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेची वेबसाईट करण्याचं काम मिळालं. या पहिल्या कामातून मिळालेल्या पैशाच्या आधारे दुसऱ्या वर्षाला असतानाच या पाच मित्रांनी मिळून सुरू केली कोडींग व्हिजन्स इन्फोटेक ही आय.टी. कंपनी. भांडवल फक्त पाच लॅपटॉप आणि अफाट मेहनत करण्याची तयारी, जिद्द आणि चिकाटी. कॉलेज सुटल्यानंतर एका खोलीत कामाला सुरुवात व्हायची.
अवघ्या चार वर्षात कंपनीनं ३७० वेबसाईट, १२० कंपन्यांचं सॉफ्टवेअर्स आणि २० अँड्राईड अॅप्स तयार केले. सध्या कंपनीची वार्षिक उलाढाल आहे ३० लाख रुपये. राज्यातली विविध सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती ,शाळा आणि परदेशी कंपन्यांसाठीही काम चालतं . परदेशी कंपन्या प्रामुख्यानं स्पेन, दुबई, कॅनडा, पेरू, सेंट फ्रांसीस्को इथल्या. आता औरंगाबादसह पुण्यातही कंपनीचं सुसज्ज कार्यालय आहे. या ठिकाणी १६ जणांना रोजगार दिला आहे, सोबतच सिंपलीसीटी क्रिएशन टेक्नॉलॉजी प्रा.लि. या कंपनीशीही करार. इथं ४० जण काम करतात. जीएसटी लागू होताच या मित्रांनी सीएंसोबत चर्चा करून जीएसटी बिलिंगचे सॉफ्टवेअर तयार केलं. त्याला कंपन्यांसह व्यावसायिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
अतुल आणि मित्रांनी २०१५ साली औरंगाबादला स्वतःची प्रशिक्षण संस्थाही सुरू केली. यातून आतापर्यंत शेकडो विद्यार्थी शिकून बाहेर पडले आहेत. अतुल आणि मित्रांना महाविद्यालयं , विद्यापीठांमधून तज्ज्ञ म्हणून बोलावलं जातं. अतुल आणि मित्रांनी सध्या एम. एस्सी दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली आहे. कंपनीचा अधिकाधिक विस्तार करून जास्तीत जास्त तरुणांना रोजगार मिळवून द्यायचा आहे. 

-गजानन थळपते, हिंगोली

Wednesday, 9 May 2018

म्हैसपालनातून दिवसाची कमाई 15 ते 18 हजार,बेलवाडीच्या मांडगे कुटुंबाची यशोगाथा

हिंगोली शहरापासून चार किलोमीटरवरचं बेलवाडी गाव. साधारण ५० कुटुंबांचं ६०० लोकसंख्येचं. अर्ध्या हिंगोली शहराची दुधाची गरज भागवणारं. मांडगे कुटुंबाच्या यशोगाथेमुळे गावातल्या प्रत्येक शेतकरी कुटुंबानं म्हैसपालन सुरू केलं आहे. मांडगे कुटुंबाचं खर्च वजा जाता दिवसाचं उत्पन्न आज आहे १५ ते १८ हजार. ३० वर्षांपूर्वी मात्र परिस्थितीे वेगळी होती. कुटुंबातील सर्वात ज्येष्ठ किशनराव आता 90 वर्षांचे आहेत. एकेकाळी केवळ तीस रुपये महिन्यावर एकाच मालकाकडे तीस वर्ष सालगडी म्हणून त्यांनी काम केलं. पाच मुलं, तीन एकर शेती आणि तीन म्हशी. तुटपुंजे उत्पन्न, नापिकी याला कंटाळून किशनरावांच्या मुलानं आत्महत्या केली. 

अरिष्ट कोसळलेल्या मांडगे कुटुंबानं विचारविनिमय केला. म्हशीच्या दुधाची विक्री सुरू करून शेतीपूरक व्यवसायच मुख्य व्यवसाय बनवला. बघताबघता जम बसला. आज त्यांच्याकडे आहे शंभर एकर जमीन. मुऱ्हा आणि जाफराबादी जातीच्या शंभर म्हशी.
म्हशीसाठी वीस बाय शंभर फुटाचे तीन टीनशेड केले आहेत. या शेडमध्ये कॉक्रीट बेड, हवेसाठी पंखे, म्युझीक सिस्टिम, शॉवर्स, फॉगर्स बसवले आहेत. चाऱ्यासाठी आणि पाण्यासाठी सिमेंटच्या गव्हाणी बांधल्या आहेत. टीनशेडमधील म्हशींचं मलमूत्र एका हौदात सोडण्यात येते. यासाठी २५ बाय १०० रूंदीचा हौद बांधण्यात आला आहे. दुपारी बारा ते पाच या काळात म्हशी मनसोक्त या हौदात डुंबतात. बाहेर पडताना धुवून स्वच्छ करण्यासाठी फवारे लावले आहेत. याच हौदातील पाणी चाऱ्यासाठी वापरलं जातं. दररोज निघणारे दोन ट्रॅक्टर शेण, खत म्हणून वापरलं जातं. यामुळे जमीन सुपीक व कसदार बनली आहे. गेल्या अनेक वर्षात या शेतात रासायनिक खतं, कीटकनाशक फवारणीची गरज पडली नाही. शंभर टक्के सेंद्रिय शेती करण्यात येते. म्हशींना दररोज तीन पोतं सरकी, तीन पोती ढेप, यासह हरभरा, मका, लाल ज्वारीचं पीठ, हिरवा चारा, कडबा कुट्टी असं सुमारे दोन ट्रक खाद्य दिलं जातं.
शेतीपैकी पन्नास एकर जमीन हिरव्या चाऱ्यासाठी राखून ठेवली आहे. शेतात लसूण घास, बरसीम, गजराज गवत, ऊस लावण्यात येतो. सोबत टाळकी, मका, ज्वारीही घेतली जाते.
दररोजचं 500-600 लिटर दूध हिंगोली शहरात 60 ते 70 रुपये लिटर दरानं विकलं जातं. यासाठी एक पिकअप व्हॅन, पाच मोटरसायकली आणि सायकली वापरल्या जातात. गेल्या अनेक वर्षांपासून मांडगेंचे ग्राहक कायम आहेत.
घरातले पाच जण आणि तीन सालगडी यासाठी काम करतात. सध्या रामेश्वर मांडगे कुटुंबप्रमुख म्हणून सर्व काम पाहतात. ३४ जणांच्या या कुटुंबाच्या तिसऱ्या पिढीनं आता श्रीखंड, खवा, आइस्क्रीम असे दूधप्रक्रिया उद्योग सुरू केले आहेत. 
-गजानन थळपते.

Thursday, 15 March 2018

सलूनमधून समाजसेवा

शरद सुरुशे. हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरीत, बस स्थानकाजवळ सलून चालवतो. शिक्षण फारसं नाही. पण वंशपरंपरागत व्यवसाय हाताशी आहे हीच काय ती जमेची बाजू. दोन भावांना सोबत घेऊन सध्या शरदचा हा छोटासा व्यवसाय सुरु आहे. त्यातून मिळणाऱ्या तुटपुंज्या अर्थप्राप्तीतूनही त्याला आपण समाजोपयोगी काही करावं असं वाटू लागलं.
१२ जानेवारी २०१६ रोजी त्याला कन्यारत्न प्राप्त झालं. आणि त्याला समाजकार्याचा मार्ग सापडला. १२ जानेवारी हा राजमाता जिजाऊंचा जन्म दिवस. मुलीच्या जन्माचं स्वागत त्याने मोठया आनंदात केलंच. पण, इतरांनाही मुलीच्या जन्माचं स्वागत करायला शिकवलं.शरदच्या मुलीचं नाव 'सान्वी'. तिच्या जन्माप्रित्यर्थ त्याने अनेक उप्रकम सुरु केले. कुणालाही मुलगी झाल्यास, त्या मुलीच्या वडिलांची दाढी-कटिंग तो तीन महिने मोफत करतो. मुलीच्या आईवडिलांचा सत्कार करतो. त्या मुलीचं जावळही मोफत काढतो. शासनाच्या सुकन्या योजनेत स्वतःचे १०१ रुपये टाकून खाते उघडून देतो. सान्वीच्या वाढदिवसाला गरीब, गरजू मुलांना शालेय साहित्य आणि गणवेश वाटप करतो. शरदने चक्क, ‘शिवरत्न जिवाजी महाले सान्वी आधार योजना’च सुरू केली आहे. धान्य गोळा करून गरीब, गरजूंना वाटप, उन्हाळ्याच्या दिवसात स्वखर्चाने चार महिने पाणपोयी चालवणं वगैरे.
शरदच्या या समाजकार्याची दखल आता अनेक संस्थानी घेतली असून त्याला विविध पुरस्कारही मिळाले आहेत. छोटंसं सलून चालविणाऱ्या शरद सुरुशेचं काम आणि त्यामागचा विचार पाहून लोक भारावतात. ‘मेरी बेटी मेरी पहचान’, ‘बेटी बचाओ...बेटी पढाओ’ या घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी, कोणत्याही शासकीय मदतीची वाट न पाहणाऱ्या शरद सुरूशे याचं काम चकित करणारं, प्रेरणा देणारं.

 - गजानन थळपते.

Monday, 15 January 2018

विद्यार्थांना प्रगत करणारा अवलिया शिक्षक

अक्षर ओळख होण्याच्या वयात इथले विद्यार्थी १० व १२ वीची कोणत्याही विषयाची पुस्तकं धडाधड वाचतात, पाठय पुस्तकातील सगळ्या कविता मुखोद्गत आहेत, कोणताही अवघड शब्द लीलया आणि सुंदर हस्ताक्षरात फळ्यावर लिहितात, उन्हाळ्याच्या सुट्टीतही शाळा सुरु असते, ग्रामीण भागात शाळा असूनही या डिजिटल शाळेतील सर्वच विद्याथी १०० टक्के प्रगत आहेत. हे चित्र आहे, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील तरोडा जिल्हा परिषद शाळेचं.
८० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेलं हे तरोडा गाव.  लोकसंख्या ७५०. डोंगराळ भाग. कोरडवाहू शेती हा इथला मुख्य व्यवसाय. त्यातही शेतीची कामं संपली की बहुतेक गावकरी ऊसतोडणीसाठी गाव सोडतात. आणि गावात राहतात ती म्हातारी माणसं आणि लहान शाळकरी मुलं. इयत्ता पहिली ते चौथी वर्ग असलेल्या या शाळेत ४५ पटसंख्या आहे ४५ आणि शिक्षक दोन. त्यापैकी एक आहेत देविदास गुंजकर. या गुंजकर सरांनीच शाळेतील शैक्षणिक वातावरणच बदलून टाकलं. गुंजकर या शाळेत आले ते २०१५ साली. पहिली आणि दुसरीचा वर्ग त्यांना मिळाला आणि सुरु झालं आनंददायी शिक्षण.
या वर्गातील मुलं अ, आ, इ, ई अशी मुळाक्षरं गिरवत नाहीत तर विविध शैक्षणिक साहित्याच्या मदतीने थेट वाचायलाच शिकतात. शंख, शिंपले, विविध फळांच्या बिया, टाकाऊ बॉटल्स, रंगीबेरंगी दगड-गोटे, तक्ते, चित्रपट्ट्या, गणितीय उपकरणं आदींपासून गुंजकर यांनीच हे साहित्य तयार केलं आहे. इथले शिक्षक खुर्चीवर बसून शिकवीत नाहीत तर विद्यार्थ्यांच्यात खाली जमिनीवर बसून शिकवितात.
देविदास गुंजकर सांगतात, "तुम्ही विद्यार्थ्यांना जलद शिकविलं तर ते हळू शिकतील आणि हळू शिकविले तर ते जलद शिकतील." ते पुढे सांगतात, " कोणताही विद्यार्थी अप्रगत नसतो. त्याला शिकविण्याची गरज नसते तर त्याच्यात असलेली क्षमता विकसित करणं हे चांगल्या शिक्षकांचं काम आहे. शिक्षक हा मुलांना शिकवीत नाही तर त्यांच्या सोबत राहून त्यांच्याकडून चांगलं काढून घेतो."
या शाळेची आणि गुंजकर यांची कीर्ती दूरवर पोहोचलेली आहे. ही शाळा आणि सरांचं शिकवणं पाहण्यासाठी हिंगोली, वाशीम, नांदेड, परभणी, यवतमाळ, बीड या जिल्ह्यातील सुमारे ५००० हजार शिक्षकांनी शाळेला भेट दिली आहेत. प्रादेशिक शिक्षण सचिव पुरुषोत्तम भापकर, प्रधान सचिव नंदकुमार, शिक्षणाधिकारी शिवाजी पवार यांनीही भेटी दिल्या आहेत. एखादा शिक्षक समर्पित भावनेने कसं उत्तम काम करू शकतो याचं देविदास गुंजकर उदाहरण ठरोत.


- गजानन थळपते.

Monday, 25 December 2017

"शेळ्याच मही बँक..."


सकाळचे आठ वाजून गेलेत, कोवळी उन्हं झाडीपट्टीतला गारवा छान शेकून काढतायेत... किशाभाऊ आपल्या शेळ्या रानभर सोडून, उन्हाच्या तिरपिला पाठ लावून बसलेत. किशाभाऊ कराळे, हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील 'करवाडी' या आदिवासी वस्तीवरला एक गरीब मनुष्य. 'अंध' आदिवासी असलेल्या या माणसाच्या आयुष्यात चार पत्र्यांच्या घराशिवाय काहीच प्रॉपर्टी नाही. ना शेतीबाडी, ना पैसाअडका, ना नोकरी ना कामधंदा. आहेत त्या फक्त शेळ्या..!
आई वडील मजुरी करायचे त्यांच्या जीवावर किशाभाऊ कसेबसे सातवीपर्यंत शिकले. पण खाणारी तोंडं मोठी झाली की त्यांना पोसणे कठीण होऊन जातं. परिणामी किशाभाऊंना शाळेची पुस्तक फरताळात टाकून रोजमजुरी करावी लागली. आज त्यांचं वय पन्नाशीकडं झुकलं आहे. साधारण तेराव्या वर्षांपासून त्यांनी मजुरीला सुरुवात केली असावी. किमान 38 वर्षे ते रोज काबाडकष्ट करतात. ना सुट्ट्या, ना पीएफ, ना आरोग्य सुविधा, ना वेतन आयोग त्यांच्या नशिबी फक्त कर्मयोग. रोजमजुरीपासून शेळ्यांपर्यंतच्या प्रवासाची किशाभाऊंची कहाणी संघर्षाने भरलेली आहे. ते सांगत होते, "मी लहानपणी मजुरी करायचो तेंव्हा दिवस बरे होते. मजुरी मिळायची, दाणे मिळायचे, गावं आबादी आबाद होतं. आता काळ बदलला. ज्यांची शेतं आहेत त्यांचीच उपासमार सुरू आहे. मग, आम्हा मजुरांची काय गत? शेतमजुरीत परवडेना तेंव्हा मीही गेलो पुण्यामुंबईला मस कामं केली पण लोकं नुसती राबवून घ्यायची. पदरात काहीच उरायचं नाही. अखेरीला माघारी येऊन ह्या शेळ्या चालू केल्या बघा..."


एकाच्या दोन, दोनच्या चार करत आज किशाभाऊंचा शेळ्यांचा संसार चाळीस वर पोचला आहे. वर्षाकाठी दहा एक शेळ्या त्यांना विक्रीला मिळतात. पाच पन्नास हजार हाती पडतात. घरदार भागतं त्यांचं त्यात. आजही कधीमधी मजुरीनं जातात. त्यावर तेल मीठ भागवतात. गावच्या जंगलात शेळ्या चारून दिवस ढकलणाऱ्या किशाभाऊंच्या मनात स्वतःच्या मुलांना शिकवता आलं नाही, याचं शल्य आहेच. आज तरी शेळ्या नावाच्या बँकेने या माणसाच्या आयुष्यात जगण्याचं चैतन्य निर्माण केलंय.
 - दत्ता कानवटे.

Monday, 4 December 2017

खादीचे चाहते असलेले झाडवाले बाबा



ते स्वतः चरख्यावर सूत कातून त्याचेच कपडे वापरतात. स्नानासाठी स्वतः तयार केलेला साबण वापरतात. स्वतःचे कपडे धुतात. दंतमंजनही घरीच तयार करतात. स्वतःच्या लग्नातही त्यांनी खादीचेच कपडे घातले. शिवाय वधूलाही खादीचीच साडी घेतली. लग्नात हुंडा घेतला नाही. वयाच्या ६७ व्या वर्षीही त्यांना चष्मा लागलेला नाही. गेल्या ४० वर्षांपासून त्यांनी कोणत्याही प्रकारचे औषध घेतलेलं नाही. हे हिंगोलीतले दादाराव शिंदे. सेवानिवृत्त शिक्षक. १९५० सालचा जन्म. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी खादीचा अंगीकार करून निर्व्यसनीश, स्वावलंबी जीवन जगण्याचा निर्धार केला. 



जयप्रकाश नारायण यांच्या विचाराने प्रेरित होऊन दादाराव शांतीसेनेत सहभागी झाले. वसमत येथील जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी गंगाप्रसाद अग्रवाल यांच्या प्रेरणेने त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. त्यांचं मूळ गाव बाभळी ता.कळमनुरी. इथल्या व्यसन सोडून देणाऱ्या व्यक्तीस ते एक हजार रुपये बक्षीस देतात. आतापर्यंत त्यांनी १२ जणांना असं बक्षीस दिलं आहे. शिवाम्बू चिकित्सा पद्धतीचे ते प्रखर समर्थक आणि प्रचारक. मानवी मुत्राचे अभ्यासक. या बाबत १९९९ साली, मुंबईतल्या राज्य विज्ञान प्रदर्शनात विविध प्रयोग सादर केले होते. २००० साली कोल्हापूरला झालेल्या इंटरनॅशनल वर्कशॉप ऑफ नॅचरोपॅथी अँड शिवाम्बू या जागतिक परिषदेत ते निमंत्रित होते.
नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने त्यांची ‘स्वदेशी तज्ञ’ म्हणून सल्लागार समितीवर नियुक्ती केली आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या हिंगोली जिल्हा कार्याध्यक्षपदी त्यांनी काम केलं आहे.
सध्या पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनासाठी दादाराव कार्यरत आहेत. हिंगोली शहरात स्थानिक रहिवाशांसह त्यांनी वृक्षारोपणाचं काम हाती घेतलं आहे. या कार्यात त्यांनी आतापर्यंत एक हजाराच्या वर झाडांची लागवड केली आहे. झाडांचं संगोपन व संवर्धन चांगल्या रीतीने होण्यासाठी त्या झाडांना संरक्षक जाळ्या लावण्यासाठीही ते पुढाकार घेतात. या कामामुळे त्यांची ‘झाडवाले बाबा’ अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे. त्यांच्या कुटुंबातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला ते एक झाड लावतात. अतिशय साधी राहणी असलेले निरोगी, आनंदी दादाराव शिंदेे. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व.

- गजानन थळपते.

Sunday, 19 November 2017

जिगरबाज शिवाजी

हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील खरवड गावातला शिवाजी आवटे. वय वर्ष ५०. एका हाताने अपंग असूनही बांधकाम करणाऱ्या मिस्त्रीच्या हाताखाली ते काम करतात. शिवाजीला वयाच्या तेराव्या वर्षी अपंगत्व आले. उच्च वीज वाहिनीच्या तारांना स्पर्श झाल्यामुळे त्याचा डावा हात खांद्यापासून तोडावा लागला.
मात्र या अपंगत्वाचा बाऊ न करता अगदी सुदृढ माणसाला लाजवेल असं काम ते करतात. शिक्षण केवळ पाचवी. शिवाजी अत्यल्प भूधारक कोरडवाहू शेतकरी. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नसल्यामुळे उदरनिर्वाहासाठी त्याने मिस्त्रीच्या हाताखाली काम करायला सुरुवात केली.
सिमेंट कालवलेला माल उचलून कोणाच्याही मदतीशिवाय ते बांधकामापर्यंत नेऊन टाकतात. एकाच हाताने भिंतीला प्लास्टर करणं, विटा वाहून नेणं, उंच बांधकामासाठी लागणारे बांबूचे पालकही बांधणं, एवढंच काय, गाजळीची बांधीही करतात. बांधकामामध्ये स्लॅब आणि पिलरसाठी बांधी करणं हे अतिशय कौशल्याचं काम समजलं जातं. काम करताना इतर मजुरांच्या चुका होतात, पण शिवाजी ते अतिशय सफाईदारपणे करतात.
मुख्य मिस्त्री रमेश वाढवे कुठेही बांधकाम निघालं की आधी शिवाजीला बोलावून घेतात. ते सांगत होते, “गेल्या अनेक वर्षांपासून शिवाजी माझ्या हाताखाली काम करतो. त्याला काम करताना पाहून तो अपंग आहे असं जाणवतच नाही. इतर मजुरांच्या तोडीस तोड काम. अपंग असल्याचं कोणत्याही प्रकारचं भांडवलसुद्धा करत नाही.”
एका हाताने शिवाजी खांद्यावर कावड घेऊन पाणी भरतात. एकाच वेळी तीन तीन घागरी उचलतात. दोन घागरी कावडीला आणि एक हातात. फिरण्याची आवड असलेले शिवाजी ५० ते १०० किलोमीटरचा प्रवास चक्क सायकलवरून करतात. हंगामाच्या दिवसात शेतीची नांगरणी, वखरणी, कोळपणी, पेरणी ही सारी कामंही ते करतात. या कामात त्यांना पत्नीही मदत करते.
शिवाजी गावातील इतर युवकांचं प्रेरणास्थान आहे. त्याला हिरीरीने आणि मोठ्या उत्साहाने काम करताना पाहून अनेकजण कामाला लागले आहेत. अपघाताने आलेलं अपंगत्व हसतमुखाने स्वीकारून सतत काम करत राहाणं. जिगरबाज शिवाजीचं हे उदाहरण हाताला काम नाही म्हणून बेकार हिंडणाऱ्या व लोकांपुढे लाचारीने हात पसरणाऱ्या लोंकाच्या डोळ्यात झणझणीत अंजन आहे.


- गजानन थळपते.

Thursday, 9 November 2017

डोंगरातली सयाआज्जी


दूर डोंगरात वसलेलं कळमनुरी तालुक्यातलं करवाडी हे आदिवासी गाव. जेमतेम २०० लोकवस्ती. अजूनही गावात जायला रस्ता नाही, सहा किलोमीटरची पायपीट करावी तेंव्हा डांबरी रस्ता नजरेला पडतो.
अशा दुर्गम गावातली 65 वर्षीय सयाबाई खोकले घरासमोरच्या दगडावर बसून सांगत होती, "या गावातल्या रस्त्यावर फिरणारं प्रत्येक पोरगं माझ्या हातावर जन्माला आलेलं आहे बाबा." याचं कारण सयाबाई या गावातील दाई आहेत. गावातले अंध समाजाचे आदिवासी लोक तिला सुईण म्हणतात. आणि सारा गाव तिला प्रेमाने सयाआज्जी म्हणून हाक मारतो. सयाआज्जी या गावासाठी देवदूत आहे. कारण या गावात कुण्या गरभारणीचं पोट दुखू लागलं तर या गावातले लोक अम्ब्युलन्स, जीप किंवा कारवाल्याला फोन करत नाहीत तर ते सयाआज्जीच्या घराची वाट चालू लागतात.
कारण गावाला रस्ता नाही. त्यामुळं तिथं कुठलंच वाहन पोहचू शकत नाही. प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे नांदापुरला. ते सहा किलोमीटरवर. म्हणजे तेवढं चालणं आलं. कळा सुरु झाल्यावर गरोदर बाईला तेवढं चालवत नेणंही कठीण. त्यामुळेच घरी बाळंतपण केलं जातं. सयाआज्जी आजही सफाईदारपणे बाळंतपणं करते.
“तुमच्या हातावर कुणी बाळंतीण दगावली का?” सयाआज्जी सांगते, "नाही बाप्पा, एकसुद्धा नाही, अर उलट त्या पलीकडच्या गावात डॉक्टरची पोरगी बाळंत झाली तेंव्हा त्या डॉक्टरनंबी माझ्याच हातावर बाळंतपण केलं, त्योच डाक्टर दुसऱ्या बाईचे बाळांतपणाला पाच पाच हजार घ्यायचा अन माझ्या हातावर शंभर टेकवले बाबा."
सयाआज्जीने तिच्या हयातीत दोनशे ते अडीचशे बाळंतपणं केली आहेत. सयाआजी गरिबीत दिवस काढते. रोजगारावर काम करते. पण, बाळंतपणाचे पैसे घेत नाही. गावातले लोक तिला लुगडं चोळी नेसवतात. ती समाधानाने सांगते, "मी पैसे नाही घेत बाबा. पर मला साऱ्या हयातीत, एकदाही लुगडं इकत घ्याया नाही लागलं, ह्याच्यातच समदं आलं."
सरकार, विविध सामाजिक संस्था बाळंतपणं दवाखान्यात सुरक्षितपणे व्हावीत, यासाठी प्रयत्नशील आहेत. या लक्ष्याकडे वाटचाल सुरूच आहे. मात्र सयाआजीसारख्या पारंपारिक सुईणी, दाया यांचं ज्ञान आणि अनुभव कोणी नाकारत नाही. गडचिरोलीत डाॅ अभय-राणी बंग यांनी अशा दायांनाच प्रशिक्षण देऊन बालमृत्यू रोखण्याच्या कामात सहभागी करून घेतलं. खरंच, अशा अनेक सयाआजी आरोग्यसेविका बनू शकतील, हे निश्चित. 


- दत्ता कानवटे.

Friday, 4 August 2017

हिंगोलीकरांचा चिमणघास



दुष्काळी हिंगोली जिल्ह्यात मुलामुलींच्या शिक्षणाची गाडी चालूच राहावी यासाठीचा एक उपक्रम मागच्या तीन वर्षांपासून सुरू आहे. हिंगोलीतले औषधविक्रेता आणि नाट्यकलावंत सुनील पाटील-खिल्‍लारी यांनी सुरू केलेल्या ‘चिमणघास’ उपक्रमात तीन वर्षात सुमारे 12 लाखापर्यंत रक्‍कम गोळा करून शैक्षणिक साहित्य, वस्तू व रोख स्वरूपात 219 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली.
कसं सुचलं हे? सुनील सांगतात, “हिंगोली जिल्ह्यात डिसेंबर 2014 मध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्या पाहून मी अस्वस्थ झालो. शेतकर्‍यांसाठी काही करावं म्हणून मित्रांसोबत 100 गावांमध्ये आठवडी बाजार, मंदीरं, गर्दीच्या ठिकाणी जाऊन शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका, असं आवाहन केलं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र त्याचवेळी अनेक मुलगे-मुली शहरातलं शिक्षण परवडत नसल्याने गावाकडे परतत असल्याचं दिसलं. हिंगोली शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांतून ग्रामीण विद्यार्थ्यांची गळती होण्याचं कारण दुष्काळ हे स्पष्ट झालं. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी असल्याचंही लक्षात आल्यानंतर जमेल ती मदत करण्याचं ठरवलं. 
‘चिमणघास’ सुरू कसा झाला? सर्वप्रथम हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतनमधून 25 गरजू विद्यार्थी निवडले. डिसेंबर ते एप्रिल असा पाच महिन्यांचा त्यांचा जेवणाचा खर्च उचलला. यासाठी लोकांकडून 500 ते 1000 रूपयांची मदत मिळाली. ऑक्टोबर 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत निरनिराळ्या महाविद्यालयांतील 210 विद्यार्थ्यांना दर महिन्याला प्रत्येकी 1 हजार रूपयांची मदत सलग 7 महिने केली. ऑक्टोबर 2016 ते एप्रिल 2017 या दरम्यान 48 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 हजार 500 रूपये मदत केली. या काळात नोटाबंदीमुळे काही अडचणी आल्या. मात्र गरजूंना मदत देता आली.
एका विद्यार्थ्याला धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. त्याच्याकडे स्पोर्टस शूज नव्हते. ‘चिमणघास’चे 1 हजार रूपये मिळाल्यावर त्याने बुटांची खरेदी केली आणि तो विद्यापीठस्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊन विजयी झाला. हा चिमणघास गरजू शेतकर्‍यांसाठीही आहे. गेल्या साली सातेफळ, ता वसमत इथल्यात बालाजी अंभोरे या शेतकर्‍याच्या घराला आग लागून लेक मुक्‍ताई हिच्या लग्‍नाच्या खरेदीसह घरातलं सगळंच जळून खाक झालं. अंभोरे कुटुंबीय उघड्यावर आले. सुनील पाटील यांनी 50 हजार रूपयांची मदत केली. त्यामुळे मुक्‍ताईचं लग्‍नही पार पडू शकलं.
‘चिमणघास’ला हरीश खिल्‍लारी, प्रा.गिरीष डाफणे, संतोष बाहेती, विजय मुधोळ, राजेश बालदी, कुमार भालेराव, गजानन राटनालू, प्रा.गोविंद सुडे, निनाजी कांडेलकर यांच्यासह अनेकांची मदत मिळत आहे. जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्यात, गावागावांत गरजूंच्या मदतीसाठी दात्यांनी पुढे यावं, असं सुनील पाटील सांगतात. ते म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी लातूरला बसच्या पाससाठी पैसे नसल्याने एका मुलीने आत्महत्या केली होती. असे प्रकार घडू नयेत यासाठी गरजूंना आपआपल्या परीने मदत केली पाहिजे. ज्या गरजूंना आम्ही मदत करत आहोत, तेच विद्यार्थी हा वसा जपून भविष्यात इतर गरजवंतांना मदत करतील आणि समाजसेवेची ही ज्योत अशीच सुरू राहील.”  

 - -बाळासाहेब काळे