Friday 4 August 2017

हिंगोलीकरांचा चिमणघास



दुष्काळी हिंगोली जिल्ह्यात मुलामुलींच्या शिक्षणाची गाडी चालूच राहावी यासाठीचा एक उपक्रम मागच्या तीन वर्षांपासून सुरू आहे. हिंगोलीतले औषधविक्रेता आणि नाट्यकलावंत सुनील पाटील-खिल्‍लारी यांनी सुरू केलेल्या ‘चिमणघास’ उपक्रमात तीन वर्षात सुमारे 12 लाखापर्यंत रक्‍कम गोळा करून शैक्षणिक साहित्य, वस्तू व रोख स्वरूपात 219 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली.
कसं सुचलं हे? सुनील सांगतात, “हिंगोली जिल्ह्यात डिसेंबर 2014 मध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्या पाहून मी अस्वस्थ झालो. शेतकर्‍यांसाठी काही करावं म्हणून मित्रांसोबत 100 गावांमध्ये आठवडी बाजार, मंदीरं, गर्दीच्या ठिकाणी जाऊन शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका, असं आवाहन केलं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र त्याचवेळी अनेक मुलगे-मुली शहरातलं शिक्षण परवडत नसल्याने गावाकडे परतत असल्याचं दिसलं. हिंगोली शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांतून ग्रामीण विद्यार्थ्यांची गळती होण्याचं कारण दुष्काळ हे स्पष्ट झालं. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी असल्याचंही लक्षात आल्यानंतर जमेल ती मदत करण्याचं ठरवलं. 
‘चिमणघास’ सुरू कसा झाला? सर्वप्रथम हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतनमधून 25 गरजू विद्यार्थी निवडले. डिसेंबर ते एप्रिल असा पाच महिन्यांचा त्यांचा जेवणाचा खर्च उचलला. यासाठी लोकांकडून 500 ते 1000 रूपयांची मदत मिळाली. ऑक्टोबर 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत निरनिराळ्या महाविद्यालयांतील 210 विद्यार्थ्यांना दर महिन्याला प्रत्येकी 1 हजार रूपयांची मदत सलग 7 महिने केली. ऑक्टोबर 2016 ते एप्रिल 2017 या दरम्यान 48 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 हजार 500 रूपये मदत केली. या काळात नोटाबंदीमुळे काही अडचणी आल्या. मात्र गरजूंना मदत देता आली.
एका विद्यार्थ्याला धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. त्याच्याकडे स्पोर्टस शूज नव्हते. ‘चिमणघास’चे 1 हजार रूपये मिळाल्यावर त्याने बुटांची खरेदी केली आणि तो विद्यापीठस्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊन विजयी झाला. हा चिमणघास गरजू शेतकर्‍यांसाठीही आहे. गेल्या साली सातेफळ, ता वसमत इथल्यात बालाजी अंभोरे या शेतकर्‍याच्या घराला आग लागून लेक मुक्‍ताई हिच्या लग्‍नाच्या खरेदीसह घरातलं सगळंच जळून खाक झालं. अंभोरे कुटुंबीय उघड्यावर आले. सुनील पाटील यांनी 50 हजार रूपयांची मदत केली. त्यामुळे मुक्‍ताईचं लग्‍नही पार पडू शकलं.
‘चिमणघास’ला हरीश खिल्‍लारी, प्रा.गिरीष डाफणे, संतोष बाहेती, विजय मुधोळ, राजेश बालदी, कुमार भालेराव, गजानन राटनालू, प्रा.गोविंद सुडे, निनाजी कांडेलकर यांच्यासह अनेकांची मदत मिळत आहे. जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्यात, गावागावांत गरजूंच्या मदतीसाठी दात्यांनी पुढे यावं, असं सुनील पाटील सांगतात. ते म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी लातूरला बसच्या पाससाठी पैसे नसल्याने एका मुलीने आत्महत्या केली होती. असे प्रकार घडू नयेत यासाठी गरजूंना आपआपल्या परीने मदत केली पाहिजे. ज्या गरजूंना आम्ही मदत करत आहोत, तेच विद्यार्थी हा वसा जपून भविष्यात इतर गरजवंतांना मदत करतील आणि समाजसेवेची ही ज्योत अशीच सुरू राहील.”  

 - -बाळासाहेब काळे

No comments:

Post a Comment