Sunday 27 August 2017

गोष्ट फुलपाखरु आणि बेडूकमामाची!!


जिल्हा रायगड. तालुका कर्जत. बीड बुद्रुक गावातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या प्राथमिक शिक्षिका सविता आष्टेकर. मुलांना थोडं मोकळं अवकाश दिलं, त्यांच्या शोधक वृत्तीला चालना दिली की काय घडतं याविषयी त्यांचं मनोगत -
“जिल्हा परिषद शाळेतील चौथीचा वर्ग! ‘परिसर अभ्यास-1’ या पाठ्यपुस्तकातील पहिलाच पाठ, ‘प्राण्यांचा जीवनक्रम’. या पाठातील ‘बिबळ्या- कडवा फुलपाखरांच्या जीवनावस्था’ प्रत्यक्षात दाखविता येतील का? हा प्रश्न सहजच माझ्या मनात चमकून गेला. आमच्यासाठी सोपे होते ते – कारण ग्रामीण भागात, डोंगरांच्या कुशीत वसलेलं आमचं बीड बुद्रुक गाव. रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातलं हे छोटंसं, पण निसर्गाचं वरदान लाभलेलं, जैवविविधतेनं नटलेलं संपन्न गाव. त्यात दिवस पावसाळ्याचे. डोंगररांगांची हिरवी दुलई, खळाळणाऱ्या झऱ्यांची मंजुळ अंगाई आणि आकाशाची गर्द निळाई अशा जादुई वातावरणात अवघड ते काय असणार?

बेडकाची पाण्यातली डिंबं

छोटीशी शेपटी असणारा बेडूकमासा

छोटीशी शेपटी असलेला बालबेडूक

पूर्ण वाढ झालेला बेडूकमामा

सर्वप्रथम मी मुलांनाच विचारलं, “शाळेजवळच्या परिसरात ‘रुई’ ची झाडं कुठं-कुठं आहेत?” विद्यार्थ्यांनी पटापट हात वर करून उत्तरं दिली. मग आम्ही शाळेबाहेर रूईच्या शोधात निघालो. मुलांसोबत जवळच असलेल्या रूईच्या झुडुपांची पाहणी केली. एका झाडावर पानांच्या मागील बाजूला छोटे-छोटे पिवळसर ठिपके दिसत होते. ती होती, फुलपाखराची अंडी! मग रूईचं एक मोठं पान तोडून काळजीपूर्वकरीत्या शाळेत घेऊन आलो. एका स्वच्छ, पारदर्शक बरणीत झाकणाला जरा मोठी छिद्रे पाडून ते पान त्या बरणीत ठेवलं. काही दिवसांतच ती अंडी फुटली आणि ती फुटलेली अंडी स्वत:च्या पायांनी बरणीत फिरू लागली.
कोंबडीच्या पिल्लासारखे अंडे फुटून पिल्लू बाहेर येत नाही, तर अंड्यालाच चक्क पाय फुटले आहेत, ही मुलांसाठी फार आश्चर्याची गोष्ट होती. मग त्या अंड्याचंच हळूहळू अळीत रूपांतर झालं. या अळीच्या अंगावर सुंदर हिरवे- काळे पट्टे होते. मी मुलांना सांगितले, “आता ती अळी मोठी होणार आहे, तिला पुरेसं खायला मिळायला हवं.” त्यामुळं मुलं उत्साहाने रोज त्या बरणीत न चुकता हिरवी पाने टाकू लागली. अळी आता पानेच्या पाने फस्त करत होती. मुलं उत्साहाने त्या बरणीभोवती जमून अळीची प्रगती पाहत होती, इतकंच नव्हे तर त्या अळीची मोहरीच्या दाण्यासारखी असलेली हिरवट विष्ठाही साफ करत होती. अळी वाढविताना एक सजग भान मुलांच्या वागण्यात डोकावित होते. अळीमध्ये होत जाणाऱ्या बदलांचं निरीक्षण मुलं दररोज करत होती.

पानावरील फुलपाखराची अंडी

कोषातून बाहेर पडू पाहणारे फुलपाखरू

अंगावर पिवळे-काळे ठिपके असलेलं सुरवंटं

अंगावर पिवळे-काळे रंग मिरवणारे फुलपाखरू


एक दिवस त्या अळीने रूईच्या पानाच्या देठात आपले पाय खुपसले आणि तोंडातून चिकट स्राव काढून स्वत:ला टांगून घेतलं. दिवसभरात अळीने स्वत: भोवती सुंदर जाळीदार कोष विणला. अळीचं सुरवंटात होणारं हे रूपांतर मुलांची उत्सुकता वाढवीत होते. आता पुढे काय होणार, हाच विषय मुलांच्या चर्चेत असायचा.
आणि फक्त दहा दिवसांत मुलांची प्रतिक्षा संपली. कारण तो कोष फोडून एक काळ्या-पिवळ्या ठिपक्यांचे चमकदार फुलपाखरू बाहेर आलं. तो क्षण आम्ही कॅमेऱ्यात टिपला आणि बरणीचं झाकण उघडलं. ते देखणं फुलपाखरू क्षणार्धात बाहेर झेपावलं आणि मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मुलं मुळात आजूबाजूच्या जगाकडे शोधक वृत्तीने पाहातच असतात. त्यांना थोडं खतपाणी दिलं की त्यांच्यातला संशोधक जागा होतो, याची प्रचिती मला लवकरच आली. कारण आमच्या शाळेतल्या मुलांनी असाच डिंबापासून बेडूकही तयार होताना पाहिला..
लेखन - सविता आष्टेकर.

No comments:

Post a Comment