Sunday 27 August 2017

चिमुकल्या हातांनी जेंव्हा देव झळाळतो..!



औरंगाबाद शहरातल्या सेवन हिल चौकातून सूतगिरणी चौकाकडे निघालं की डाव्या बाजूला अनेक झोपड्या आहेत. इथंच वेगवेगळ्या मुर्त्या बनवल्या जातात. बांबूच्या आधार देऊन, वर बेगड टाकून बनवलेल्या तकलादू झोपड्या. पण याच झोपड्यांमध्ये चिमुकल्या हातांचा एक चित्रकलाकार आकार घेतो आहे. मूर्तीवर रंगाचा सफाईदारपणे हात फिरवणारा हा चिमुरडा आहे जितेंद्र बसनाराम सोलंकी. मूळ राजस्थानातला, पण याच्या जन्मापूर्वीच कधीतरी याचे वडील रोजगाराच्या शोधत महाराष्ट्रात आलेले.
जितेंद्र मूळ बंजारा समाजातला, घरातली भाषा गोरमाटी. त्यामुळे इथं मराठी भाषेत शिकवणाऱ्या पालिकेच्या शाळेशी त्याचं काही जमलं नाही. दुसरीपर्यंत ढकलगाडी झाली नि त्याने शाळेला जय सेवालाल केलं. काही दिवस भंगार वेचून कुटुंबाला मदत केली. हा व्यवसाय त्याला फारसा रुचला नाही. मग मूर्त्यांच्या झोपड्यांमधला कलरचा ब्रश हातात आला. आता चांगलं वळण लागलंय त्याच्या हाताला. दिवसाकाठी १० ते १२ छोट्या आणि पाच ते सहा मोठ्या मुर्त्या तो रंगवतो. सुरुवातीला पांढरा कलर मारून त्यावर बेसिक कलर मारायचा नि मग मूर्तीला लेकरसारखं गोंजारत नक्षीदार रंग द्यायचा. जितेंद्र या मूर्त्यांना इतक्या तन्मयतेने रंगवतो की चूक व्हायला त्याच्याकडे वावच नाही. वय वर्ष फक्त बारा. पण आताच इतक्या सफाईदारपणे मुर्त्या रंगवतो की जर याला तांत्रिक शिक्षण मिळालं तर चित्रकलेच्या क्षेत्रात नाव काढील. पण, आज तरी चित्रकला याचा छंद नसून आहे ते फक्त उवजीविकेच साधन. यातून वर्षाकाठी रंगकामाचे 30 हजार रुपये मिळतात. गेले सात महिने तो हे काम करतो आहे. या काळात किती मुर्त्या रंगवल्या असतील त्याने हेही त्याला आठवत नाही. "पुढे जाऊन काय व्हायचंय तुला" विचारल्यावर तो म्हणतो, “बस अच्छा पेंटर बन जाऊं" इतकी माफक अपेक्षा तो व्यक्त करतो. या मुलाच्या नशिबात पुढे काय मांडून ठेवलंय हे देवालाच माहीत पण सध्या तरी देवाला झळकावणं या चिमुकल्या हातात आहे. 

- दत्ता कानवटे.

No comments:

Post a Comment