Showing posts with label Raigad. Show all posts
Showing posts with label Raigad. Show all posts

Friday, 2 February 2018

जन्मकथा: कातकरी बोलीभाषेतील पाठ्यपुस्तकाची!

लातूरच्या गजानन जाधव यांचं स्वप्नं होतं, शिक्षक व्हायचं. आणि ते झालेही. २००६ साल. पहिलीच नियुक्ती झाली जि.प. शाळा पालेखुर्द, तालुका रोहा, जिल्हा रायगड इथं. या गावातील बहुतांश वस्ती कातकरी आदिवासी जमातीची. आत्तापर्यंत केवळ पुस्तकातच वाचलेल्या या आदिवासींसोबत काम करण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली. शाळेत सर रूजू झाले खरं, पण त्यांच्या लक्षात आलं की बहुतांश विद्यार्थी शाळेला दांडी मारण्यातच धन्यता मानतात. आजूबाजूला प्रचंड दारिद्र्य बघून ते अस्वस्थ व्हायचे, पण म्हणूनच या मुलांना शिक्षणाची गोडी लावणं आवश्यक आहे, हे त्यांना जाणवायचं.जाधव सर सांगतात, “सुरुवातीची 2-3 वर्ष यांची जीवनशैली समजून घेण्यात आणि मुलांशी मैत्री करण्यात निघून गेली. त्यांच्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायचो. मात्र माझी मराठी आणि या मुलांची कातकरी बोलीभाषा यात प्रचंड तफावत होती. आपण ज्याला चिमणी म्हणतो, त्याला ते ‘चिडू’ म्हणतात, फुलपाखराला ‘भिंगरुट’ म्हणतात तर पावसाला ‘पाणी’ म्हणतात. मी हळूहळू त्यांची भाषा शिकण्याचा प्रयत्न करू लागलो. कधी चित्र दाखवून तर कधी जंगलातले पक्षी- प्राणी दाखवून त्यांना कातकरी भाषेत काय म्हणतात हे जाणून घेत होतो.”
                                                                                             
सरांच्या या प्रयोगामुळे कातकरी विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती वाढली. अभ्यासातील रसही वाढला. 2013-2014 च्या शैक्षणिक वर्षात सरांनी मराठी आणि कातकरी बोलीभाषेतील शब्दांचा एक संग्रह तयार केला. सुमारे 100-150 शब्दांचा तो संग्रह कातकरी भाषा अजिबातच न येणाऱ्या शिक्षकांसाठी मार्गदर्शक ठरणारा होता, शिवाय मुलांनाही त्यातून मराठी शब्द शिकायला मिळत होते. ‘जीवन शिक्षण’ या विद्या प्राधिकरणातर्फे प्रकाशित केल्या जाणाऱ्या मासिकात 2014 च्या जून महिन्यात याविषयी सरांचा लेख प्रसिद्ध झाला आणि त्याला उदंड प्रतिसाद मिळाला.
हा प्रतिसाद त्यांना सुखावून जाणारा होताच, पण यापेक्षा जास्त प्रयत्न करायला हवेत हे सरांना जाणवत होते. कारण रायगडमधील एकट्या रोहा तालुक्यातील 141 शाळांमधून अडीच हजारांच्यावर कातकरी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिवाय महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांतही या कातकरी आदिवासींची संख्या लक्षणीय आहे. म्हणूनच 2015-2016 मध्ये त्यांनी पहिलीचं मराठी बालभारती पुस्तक संपूर्णपणे कातकरी बोलीभाषेत तयार केलं.
सरांनी हे पुस्तक पीडीएफ फॉरमॅटमधे तयार केलेलं असून ते व्हॉटसअप, इमेल आणि पेनड्राईव्हच्या माध्यमातून अनेक शिक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे. गेली दोन वर्षे जाधव सर 'शिक्षणाची वारी' या अभिनव उपक्रमांत सहभागी होत असून आजपर्यंत सुमारे 15 हजार शिक्षकांनी त्यांच्या स्टॉलला भेट देऊन पुस्तक पेनड्राईव्हमधून किंवा स्मार्टफोनमध्ये नेलंय.
जाधव सर जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांसोबत कातकरी बोलीभाषेतच बोलण्याचा प्रयत्न करीत होते. शाळेत अभ्यास शिकवतानाही ते कातकरी शब्दांच्या आधारे आधी कविता/धडा समजावून सांगत. सरांचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांना आवडला नसता, तरच नवल! दूर कुठल्यातरी गावावरुन आलेले सर, आपल्या भाषेत बोलतात इतकंच नव्हे तर अवघड वाटणाऱ्या अभ्यासातील गोष्टीही आपल्याच भाषेत सोप्या करुन सांगतात, हे विद्यार्थ्यांना फारच भावलं. आत्तापर्यंतचे सर आपल्याला शिकवायचे, पण हे जाधव सर तर स्वत:च आपल्याकडून शिकतात, ही भावना विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांनाही सुखावणारी होती.
 - स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

Wednesday, 3 January 2018

घोषणेतलं ‘आनंददायी शिक्षण’ इथे भेटतं...

“काय गं, खिचडी खाल्लीस का? हात स्वच्छ धुतलेस का? आस्थेने, आपुलकीने आपल्या शाळेतल्या विद्यार्थींनींची विचारपूस करणार्‍या मुख्याध्यापिका सुजाता पाटील आणि तेवढयाच आनंदाने प्रतिसाद देणारी विद्यार्थिंनी पाहताच मन हेलावलं. 
अलिबागच्या कुरुळ गावातल्या सु.ए.सो शाळेत ‘नवी उमेद’ने नोव्हेंबर महिन्यात बालहक्क सप्ताहात फेसबुक लाइव्ह केलं होतं, तेव्हा माझं तिथे जाणं झालं. मला ही शाळाभेट छान अनुभव देऊन गेली. शाळा म्हटलं की मुलांचा गोंगाट, शिक्षकांच्या ओरडण्याचे आवाज, छोट्या इयत्तेतल्या मुलांचं रडणं असं माझ्या मनात होतं. इथे आल्यावर मात्र भ्रम दूर झाला. शाळेत सगळेजण अगदी शांतपणे आपापली कामं करत होते. शिक्षकांशी बोलताना जाणवलं, की ते शिक्षक कमी आणि मुलांचे पालक जास्त आहेत. मुलं शिक्षकांभोवती इतक्या जिव्हाळ्याने वावरत होती, जणू आपल्या आईभोवतीच आहेत. एकंदरीत, शाळा एका घरात राहाणार्‍या एकत्र कुटुंबासारखी भासत होती. सुजातामॅडम प्रत्येक मुलाची कहाणी सांगत असताना जणू त्या मुलाची आई आता मीच.... इतकं मायेने सांगत होत्या.
१९९२ ला अलिबाग कुरुळ गावी सृजन प्राथमिक विद्यालय आणि सु.ए.सो. माध्यमिक शाळा ॲड प्रमोद आणि सुजाता पाटील या पतीपत्नींनी एका चाळीत सुरू केली. अनेक अडचणींवर मात करत तिला मोठं, सुसज्ज केलं. प्राथमिक शाळा स्वयंअर्थसहाय्यित आहे. या शाळेची पटसंख्या १२५. शिक्षकसंख्या ८. आणि अमराठी भाषक मुलं सुमारे ६० टक्के. माध्यमिक शाळा अनुदानित. पटसंख्या १५४. शिक्षक ९. अमराठी भाषक विद्यार्थी सुमारे ५० टक्के. दोन्ही शाळांत, प्रत्येक वर्गात मुलांची संख्या २० ते २५ एवढीच. इथल्या वर्गात लक्ष वेधून घेतात भिंतीवर खाली लावलेले फळे. तसं का? तर मुलांच्या उंचीप्रमाणे त्यांना फळे वापरता यावेत, म्हणून. प्रत्येक मुलासाठी स्वतंत्र फळा, ज्यावर स्वत:ला वाटेल ते मुलं लिहू, रेखाटू शकतो. विचार करा, सिमेंटची भिंतही नसलेल्या पक्क्या घरांपासून वंचित असलेल्या मुलांना इथे स्वत:चं विश्व मुक्तपणे रेखाटायची संधी मिळते. मुलांनी आपापल्या फळ्यावर रेखाटलेली चित्रं मोठ्या आवडीने आम्हाला दाखवली. घोषणेतलं ‘आनंददायी शिक्षण’ आम्हाला इथे दिसलं.
मोठ्या इयत्तेतील मुलांकरिता सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, computer lab व वाचनालय. शाळेत स्थानिकांहून स्थलांतरित, मराठी मातृभाषा नसलेली मुलं अधिक आहेत. परप्रांतीय मुलांना तुम्ही कसं सामावून घेता? आम्ही विचारलं. सुजाता पाटील म्हणाल्या, आम्ही त्यांना मराठी शिकवून मेन स्ट्रीम मध्ये सामावून घेतो. आर्थिक हातभार लावण्याकरिता पालकांच्या कामात मदत करणार्‍या मुलांना ही शाळा शिक्षण देते. एकीकडे राज्यात पटसंख्या कमी असल्याने १,३०० शाळा एकाच वेळी बंद करण्याचा निर्णय सरकार घेतयं आणि दुसरीकडे स्थलांतरित मुलांना मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचे अचाट प्रयत्न सुजाता पाटील आणि त्यांचे शिक्षक करत आहेत. विद्यार्थी आणि फक्त विद्यार्थीच केंद्रस्थानी ठेवून ही शाळा चालवली जाते, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. त्यात सरकारी अनुदान तुटपुंजं. प्राथमिक वर्गांना अनुदान मिळतच नाही. अशा अनेक अडचणी. वेळप्रसंगी पदरमोड करून पैसे उभे करावे लागतात. तरीही एक सामाजिक जबाबदारी म्हणून पाटील पतीपत्नी ही शाळा चालवतात.
ही शाळा पाहिल्यावर माझं शोधकार्य संपल्यासारखं झालं. माझ्या मनातली आदर्श शाळा मला सापडली. मला तिथल्या आनंदी विद्यार्थ्यांचा चक्क हेवा वाटला.

- लता परब.

Friday, 1 September 2017

‘माई’चा शिक्षणाचा मार्ग झाला खुला!


रायगड जिल्ह्यातील रोहा. इथल्या संतोषनगरमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे. याच भागात 2016 च्या डिसेंबर महिन्यात वाघमारे कुटुंब राहायला आलं. आई- वडिल, तीन मुली आणि एक मुलगा असं कुटुंब. आदिवासी कातकरी समाजातील हे कुटुंब संतोषनगरच्या परिसरात छोटीशी झोपडी टाकून राहू लागलं. आणि लवकरच रूळलं. कारण इथं कातकरी समाजाची भरपूर वस्ती आहे.
किसन वाघमारे आणि त्यांच्या पत्नी शेतावर मजुरीला जाऊ लागल्या. नवं कुटुंब गावात आलं आहे. पण त्यातील मुलं शाळेत येत नाहीत, हे शाळेचे शिक्षक गजानन जाधव सरांनी हेरलं. त्यांनी मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी मॅडमसह झोपडीवर जाऊन वाघमारे पती-पत्नींची भेट घेतली.
वाघमारे कुटुंबाने शिक्षकांचे स्वागत केलं. आठ वर्षांचे माई आणि करण शाळेत का येत नाहीत, या प्रश्नाला गरिबीमुळे आमच्या घरातील कोणीच कधीच शाळेत गेलेले नाही, इतकंच उत्तर पालकांनी दिलं

मुलांनी शाळेत आलंच पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. मुला-मुलींना मोफत शिक्षण आहे. पाठ्यपुस्तकेही मोफत मिळतात आणि माध्यान्ह भोजन योजनाही आहे. शिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळते, हे शिक्षकांनी सांगितलं. शिक्षकांचं बोलणं ऐकून पालकांनी माई आणि करणला डिसेंबरमध्येच शाळेत दाखल केलं.
पण पहिल्या दहा दिवसातच माईने शाळेला दांडी मारली. जाधव सरांनी ‘आजारी असेल’ असा विचार करून दुर्लक्ष केलं. पण 2017 साल उगविलं तरी माई काही शाळेत येईना. तेव्हा अस्वस्थ झालेल्या जाधव सरांनी पुन्हा कुलकर्णी मॅडमसोबत वाघमारेंची झोपडी गाठली.
लहानगी माई मळलेला गणवेष घालून बहिणींना खेळवत बसली होती. “का गं, माई शाळेत का येत नाहीस?” असे सरांनी विचारताच, “येऊशी वाटते, पन आवशी न्हाय बोलते.” असं उत्तर त्या चिमुरडीने दिलं. “माईला शाळेत का पाठवत नाही?” विचारल्यावर तिची आई म्हणाली, “बाई, तुमच्या सांगन्यावरून साळंला पाठिवलं एक डाव. पर आता मलाबी कामासाठी भाईर जावं लागतंय. माईबी साळंला आली तर ल्हान्ग्या दोगींना कोन सांबाळणार? मला कामाला जावंच लागतंया बगा. न्हायतर खायाचं काय? पोरीच्या जातीला काय करायचंय सिकशान? पोराला पाठीवतीय की साळंला!!”
हे ऐकून कुलकर्णी मॅडमनी मुलग्यांसोबत मुलींचं शिक्षण गरजेचं आहे, हे समजावून सांगितलं. मुलगी ही मुलग्यापेक्षा कुठेच कमी नसते. शिक्षण घेतलं तर नोकरीही मिळेल. शिवाय पाचवीपर्यंतचा माईचा वह्या, पेन-पेन्सिलीचा, कपड्यांचा खर्च, हा सगळा वरखर्च मी स्वत: उचलेन, असं वचन कुलकर्णी मॅडमनी दिलं.
दुसरीकडे लहानग्या बहिणींचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी जाधव सरांनी घेतली. संतोषनगरच्या शाळेत अंगणवाडी नाही, मात्र तरीही माईच्या दोघा बहिणींना सांभाळण्याची ग्वाही सरांनी दिली.
आता माई आणि करण दररोज शाळेला येतात. त्यांच्या लहानग्या बहिणी तिच्या वर्गाजवळच एका सतरंजीवर दिवसभर खेळतात. तिथंच त्यांना माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारचं जेवण आणि मधल्या वेळेला बिस्किटं मिळतात. आता माईच्या चेहऱ्यावरचं अकाली मोठेपण दूर होऊन ती हळूहळू तिच्या वयाच्या मुलांमधे मिसळून खेळू लागली आहे. 


लेखन: छाया वर्तक.

Sunday, 27 August 2017

गोष्ट फुलपाखरु आणि बेडूकमामाची!!


जिल्हा रायगड. तालुका कर्जत. बीड बुद्रुक गावातल्या जिल्हा परिषद शाळेतल्या प्राथमिक शिक्षिका सविता आष्टेकर. मुलांना थोडं मोकळं अवकाश दिलं, त्यांच्या शोधक वृत्तीला चालना दिली की काय घडतं याविषयी त्यांचं मनोगत -
“जिल्हा परिषद शाळेतील चौथीचा वर्ग! ‘परिसर अभ्यास-1’ या पाठ्यपुस्तकातील पहिलाच पाठ, ‘प्राण्यांचा जीवनक्रम’. या पाठातील ‘बिबळ्या- कडवा फुलपाखरांच्या जीवनावस्था’ प्रत्यक्षात दाखविता येतील का? हा प्रश्न सहजच माझ्या मनात चमकून गेला. आमच्यासाठी सोपे होते ते – कारण ग्रामीण भागात, डोंगरांच्या कुशीत वसलेलं आमचं बीड बुद्रुक गाव. रायगड जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यातलं हे छोटंसं, पण निसर्गाचं वरदान लाभलेलं, जैवविविधतेनं नटलेलं संपन्न गाव. त्यात दिवस पावसाळ्याचे. डोंगररांगांची हिरवी दुलई, खळाळणाऱ्या झऱ्यांची मंजुळ अंगाई आणि आकाशाची गर्द निळाई अशा जादुई वातावरणात अवघड ते काय असणार?

बेडकाची पाण्यातली डिंबं

छोटीशी शेपटी असणारा बेडूकमासा

छोटीशी शेपटी असलेला बालबेडूक

पूर्ण वाढ झालेला बेडूकमामा

सर्वप्रथम मी मुलांनाच विचारलं, “शाळेजवळच्या परिसरात ‘रुई’ ची झाडं कुठं-कुठं आहेत?” विद्यार्थ्यांनी पटापट हात वर करून उत्तरं दिली. मग आम्ही शाळेबाहेर रूईच्या शोधात निघालो. मुलांसोबत जवळच असलेल्या रूईच्या झुडुपांची पाहणी केली. एका झाडावर पानांच्या मागील बाजूला छोटे-छोटे पिवळसर ठिपके दिसत होते. ती होती, फुलपाखराची अंडी! मग रूईचं एक मोठं पान तोडून काळजीपूर्वकरीत्या शाळेत घेऊन आलो. एका स्वच्छ, पारदर्शक बरणीत झाकणाला जरा मोठी छिद्रे पाडून ते पान त्या बरणीत ठेवलं. काही दिवसांतच ती अंडी फुटली आणि ती फुटलेली अंडी स्वत:च्या पायांनी बरणीत फिरू लागली.
कोंबडीच्या पिल्लासारखे अंडे फुटून पिल्लू बाहेर येत नाही, तर अंड्यालाच चक्क पाय फुटले आहेत, ही मुलांसाठी फार आश्चर्याची गोष्ट होती. मग त्या अंड्याचंच हळूहळू अळीत रूपांतर झालं. या अळीच्या अंगावर सुंदर हिरवे- काळे पट्टे होते. मी मुलांना सांगितले, “आता ती अळी मोठी होणार आहे, तिला पुरेसं खायला मिळायला हवं.” त्यामुळं मुलं उत्साहाने रोज त्या बरणीत न चुकता हिरवी पाने टाकू लागली. अळी आता पानेच्या पाने फस्त करत होती. मुलं उत्साहाने त्या बरणीभोवती जमून अळीची प्रगती पाहत होती, इतकंच नव्हे तर त्या अळीची मोहरीच्या दाण्यासारखी असलेली हिरवट विष्ठाही साफ करत होती. अळी वाढविताना एक सजग भान मुलांच्या वागण्यात डोकावित होते. अळीमध्ये होत जाणाऱ्या बदलांचं निरीक्षण मुलं दररोज करत होती.

पानावरील फुलपाखराची अंडी

कोषातून बाहेर पडू पाहणारे फुलपाखरू

अंगावर पिवळे-काळे ठिपके असलेलं सुरवंटं

अंगावर पिवळे-काळे रंग मिरवणारे फुलपाखरू


एक दिवस त्या अळीने रूईच्या पानाच्या देठात आपले पाय खुपसले आणि तोंडातून चिकट स्राव काढून स्वत:ला टांगून घेतलं. दिवसभरात अळीने स्वत: भोवती सुंदर जाळीदार कोष विणला. अळीचं सुरवंटात होणारं हे रूपांतर मुलांची उत्सुकता वाढवीत होते. आता पुढे काय होणार, हाच विषय मुलांच्या चर्चेत असायचा.
आणि फक्त दहा दिवसांत मुलांची प्रतिक्षा संपली. कारण तो कोष फोडून एक काळ्या-पिवळ्या ठिपक्यांचे चमकदार फुलपाखरू बाहेर आलं. तो क्षण आम्ही कॅमेऱ्यात टिपला आणि बरणीचं झाकण उघडलं. ते देखणं फुलपाखरू क्षणार्धात बाहेर झेपावलं आणि मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
मुलं मुळात आजूबाजूच्या जगाकडे शोधक वृत्तीने पाहातच असतात. त्यांना थोडं खतपाणी दिलं की त्यांच्यातला संशोधक जागा होतो, याची प्रचिती मला लवकरच आली. कारण आमच्या शाळेतल्या मुलांनी असाच डिंबापासून बेडूकही तयार होताना पाहिला..
लेखन - सविता आष्टेकर.

Friday, 7 April 2017

आपलं मुलं विशेषचं असतं

पनवेलच्या अर्चनाताई माझ्या फेसबुकमैत्रीण. पुढे प्रत्यक्ष भेटीत त्यांच्या पालकत्वाचा हृद्द्य प्रवास मला कळला. पालकांसाठी आपलं मुलं विशेषचं असतं. पण जेव्हा एक नाही, दोन्ही मुलं खरोखरच ‘विशेष – special’ असतील, तर? कर्णबधीर रश्मी आणि तिच्यानंतर अडीच वर्षांनी जन्मलेला ऑटिस्टीक जतिन – या भावंडांचं पालकत्व करणारे त्यांचे आई-बाप अर्चना आणि सुरेश पाटील हेही विशेषच. 
लग्नानंतर वर्षभरात रश्मी जन्मली. सर्व आनंदात होते. अर्चनाताईंना तर मुलगीचं हवी होती. रश्मी ५-६ महिन्यांची असताना ती आवाजाला प्रतिसाद देत नाही, हे कळलं. कल्याणच्या तज्ञ डॉक्टरने सबुरीने घ्यायला सांगितलं. पुढे अलियावर जंग संस्थेत तपासण्या करून रश्मीला Hearing Aid दिलं, तेव्हा ती पावणे दोन वर्षांची होती. एक धक्का पचवून तिचं संगोपन सुरू केलं. जतिनच्या वेळेस मनात शंकाचं काहूर होतं. ऑटिझम हा शब्दही ऎकला नव्हता. दुसर्‍या मोठ्या धक्क्यातून सावरण्यापेक्षा ऑटिस्टिक जतीनला सांभाळायचं कसं, हा प्रश्न होता. तेव्हापासून पालक आणि मुलं एकमेकांसाठी, असं झालं.
Pathologist अर्चनाताईंना लॅब सुरु करायची होती. परवान्यासाठी अर्ज करण्याच्या चार दिवस आधी जतिनच्या ऑटिझमबद्दल कळलं. त्याच्या संगोपनाला प्राधान्य देणं अटळ होतं. काम आणि मुलं दोन्ही सांभाळण्यासाठी सुरेशनेही आपल्या वकिलीचं कार्यालय घरीच थाटलं. नातेवाईकांना या मुलांची लाज वाटायची. मुलांमध्ये व्यंग आहे म्हणून सासर-माहेरच्यांनी अर्चना-सुरेशना कायमचं दूर लोटलं. आज सर्वदूर रश्मी-जतिनचं कौतुक होत असताना नातेवाईक एखादा फोन करण्याची तसदीदेखील घेत नाहीत. 

अर्चना-सुरेश यांनी एकच ध्यास घेतला - ज्या समाजाने नाकारलं, तिथेच मुलांना स्थान मिळवून देणं. रश्मीचं शिक्षण आग्रीपाड्याच्या Central school for the Deaf इथे सुरु झालं. अर्चनाताईंनी रश्मीसोबत Parent’s Guidance कोर्स केला. घरीच थेरपी देण्यासाठी कोर्सचा उपयोग झाला. रश्मी-जतिनसह अर्चनाताईंचा पनवेल-भायखळा असा दोन-अडीच तासांचा प्रवास व्हायचा. मुलांचे हाल, शाळेतले वाईट अनुभव... सगळ्यावर मात करत रश्मी बारावी झाली. आता पुढचं शिकते आहे. सहाव्या वर्षांपासून भरतनाट्यम् शिकली. सर्व परीक्षा प्राविण्यासह उत्तीर्ण झालेली विशीतली रश्मी आज भरतनाट्यम् शिक्षिका आहे. फोटोग्राफी, पेटिंग, स्केटिंग, पर्यटन या स्वतःच्या आवडी जपत क्राफ्ट जुलरीचा व्यवसाय उत्तमपणे संभाळत आहे
जतिनसुद्धा बारावीनंतर पुण्याला Indian Institute of Science Education and Research इथे BS-MS करतो आहे. गणित हा त्याचा आवडीचा विषय. विशेष म्हणजे किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजनेच्या 2015-16 Persons with Disability (PWD) विभागात जतिन देशात पहिला आणि IIT JEE(Advanced) (PWD) मध्ये सोळावा आला. जतिनला वैज्ञानिक व्हायचं आहे. 
मुलांना आवडीचं शिक्षण घेऊ देणं, आपल्या इच्छा मुलांवर न लादणं, त्यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा सन्मान करणं याला पाटील दांपत्याने महत्त्व दिलं. अर्चनाताई सांगतात, “निराशेचे क्षण तर आयुष्यात असतातच. पण दोन्ही मुलांनी आम्हाला ‘रश्मी-जतिनचे आई-बाबा’ ही ओळख मिळवून दिली. यात सारं भरून पावलं.” त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडणारा अभिमान, डोळ्यांत दाटलेलं मुलांचं प्रेम, कौतुक खूप काही सांगून जातं. 
आपल्या मुलांना समाजाने नाकारणं आणि आज कौतुकाने स्वीकारणं या दोहोतला प्रवास केवढा अवघड होता. पण प्रयत्न, जिद्द आणि चौघांनी एकमेकांना दिलेली साथ यामुळे प्रत्येक प्रसंग त्यांनी निभावून नेला. रश्मी-जतिनमध्ये काही कमी आहे, असं अर्चना-सुरेश यांनी मुलांना कधीच जाणवू दिलं नाही. मुलांना जसंच्या तसं स्वीकारलं. ‘Never give up’ ही वृत्ती त्यांच्या जगण्याची प्रेरणा ठरली. आपल्याच वाट्याला हे का... असा प्रश्नदेखील त्यांनी कधी स्वतःला विचारला नाही. आव्हानं हा आयुष्याचा भाग आहे असं मानणाऱ्या अर्चना-सुरेशचा प्रवास पालकत्वाचा खरोखर आदर्शवत आहे.
अर्चना आणि सुरेश पाटील
- मेघना धर्मेश, मुंबई