Showing posts with label Parenting. Show all posts
Showing posts with label Parenting. Show all posts

Tuesday, 24 October 2017

ज्युनियर ब्रह्मे - भाग पाचवा

प्रवास पालकत्वाचा: मी घराचा कर्ता पुरुष आहे अशी माझी एक प्रामाणिक समजूत आहे. ही समजूत व्हायचं कारण इतकंच की कर्त्या माणसाला कायम कामाच्या ओझ्याखाली ठेवलं जातं. कर्त्या पुरुषाचं दुसरं लक्षण म्हणजे त्याची कधी कदर होत नाही, त्याला कुणी किंमत देत नाही. पण असो. ते माझ्या पाचवीलाच पुजलं गेलंय. खुद्द आमच्या लग्नात माझी नवरामुलगा म्हणून कुणी किंमत केली नव्हती, आता बोला! मेव्हण्यांनं लग्नाची बातमी पेपरला देताना "मोठी जाहिरात कशाला हो? इथं काय लगीन आहे का कुणाचं?"असं म्हणून छोटीशी बातमी दिली होती. फक्त ती बातमी दशक्रिया विधी आणि देहावसानच्या पानावर नको असा मी हट्ट केल्यानं मग छोट्या जाहिरातीच्या "हरवले/ सापडले" कॉलममध्ये आमच्या लग्नाची बातमी कोंबून बसवली होती. (त्यातही नवऱ्यामुलाचं गुणवर्णन करताना हसतमुख हा शब्द न आठवल्यानं हास्यास्पद असा शब्द वापरला होता.)

असो, पोरं हाच वारसा पुढं चालवत आहेत. आधीच मोठा माओ मला स्वतःचा लहान भाऊ समजतो. आणि धाकट्या मुलाचा, मिष्काचा (वय वर्ष साडेतीन) तर माझ्यावर तीळमात्रही विश्वास नाही. मी अंघोळ घालू का? असं विचारलं तर नाक उडवून 'नाई! तुला नाई येत्त.' असं उत्तर मिळतं. चित्रं काढताना मुलात मुल होऊन 'ही कार आहे का?' असं विचारलं तर 'हात्त! तो हात्ती हाये. त्याची शेपूत नाई दिशली का? वेला कुथला!' असं प्रत्युत्तर येतं. मी ऑफिसला जाताना 'डबा' घेऊन जातो तर माओ स्कूलला 'टिफिन' नेतो. म्हणजेच बाबा कुठल्या तरी डब्बा शाळेत जातो आणि दादा मात्र 'मोट्या श्कुलमदी' जातो असा निष्कर्ष या पोरानं काढलाय. जेवताना पाय हलवू नये असं माओला सांगताना ऐकल्यावर मिष्कानं यापुढं जाऊन पुढचे नियम तयार केले, जसे- ज्येवताना हात हालवायचे नाईत, ज्येवताना डोकं हालवायच्य नाई, ज्येवताना तोंड हालवायच्य नाई. त्याच्या नियमाप्रमाणं वागायचं तर जेवण करणंच बंद करावं लागेल. 'बाबा माज्या नियम पालत नाई तर मीपन बाबाच्या नियम पालनार नाई.' असं आर्ग्युमेंट या पोरानं केलं. पुढंमागं वकील होऊन नाव काढणार.
मी कोणतीही गोष्ट नीट करू शकत नाही यावर दोन्ही पोरट्यांचा ठाम विश्वास आहे. माळ्यावरून गेल्या वर्षीचं मखर काढायचं असलं, गाडी धुवायची असली, गव्हाचं पोतं रिकामं करायचं असलं किंवा डब्यातून तेल काढायचं असलं तर दोघं टीव्ही सोडून मला बघायला धावतात. एखादी गंमत बघायला मिळणार असे उत्सुकतेचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत असतात. परवा दोघांच्या टक लावून बघण्याचा त्रास इतका झाला की माळ्यावरून परात खाली आणताना ठाणकन खाली पडली. दोघं पोरं पैसे वसूल झाल्यासारखे चेहरे करून पुन्हा खेळायला निघून गेली. परात खाली पडली तेव्हा मी संतापानं जे वाक्य उच्चारलं त्यावरून बायकोनं नंतर झाडपट्टी केली ती वेगळीच. 'कुठून शिकता हो असले शब्द?' असं ती म्हणाली तेव्हा ती मला आपला मुलगाच समजते याची खात्री पटली.
एकूणात, आमचा प्रवास पाल्य ते पाल्य असाच होत राहिलाय.
(मेधाताईंच्या सांगण्यावरून मी हे पालकत्वाची कहाणी लिहिली. तेव्हा हा सगळा पाल्य ते पालक प्रवास डोळ्यांसमोर आला. जरी हा कुणी आदर्श म्हणून घ्यावा असा नसला, तरी अगदीच घेऊ नये, असाही नाही.)
(चित्र:गजू तायडे)

Tuesday, 17 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा:
- भाग ४
माझा ज्येष्ठ पुत्र माओ, इयत्ता तिसरी अ एके दिवशी शाळेतून चिंताक्रांत चेहऱ्यानं घरी आला.
"काय रे, ठीकाय ना सगळं?" मी जरा धाडस करून विचारलं. लहानपणी माझ्या तक्रारी ऐकण्यासाठी बाबांना शाळेत बोलावयाचे तेव्हा असाच चेहरा असायचा माझा.
"उद्या स्कूलमध्ये पीटीएम आहे." माओ वदला.
माझ्या काळजात एकदम सोळाशेबावीस रंगीबेरंगी फुलपाखरं उडाली. पॅरेन्ट टीचर मिटिंग हा माझा शाळेतला आवडता कार्यक्रम.
"अरे मग यात असं तोंड वाकडं करण्याजोगं काय झालं?" मी उत्साहानं म्हणालो.
"बसा इथं. स्कूलमध्ये यायचं तर, आधी चार चांगल्या गोष्टी तुमच्या कानी घालाव्यात म्हणतो." माओ पोक्तपणे म्हणाला. मी एखादा बापुडवाणा बाप बसतो तसा त्याच्यासमोर बसलो.
"पहिलं म्हणजे एखादी टीचर आवडली की तिच्याशी फार वेळ बोलत बसू नका."
"हो." मी आज्ञाधारकपणे मान डोलवून म्हणालो.
"आणि माझ्याच क्लासटीचरशी बोला. मागच्या वेळी भलत्याच टीचरबरोबर गप्पा हाणत बसला होतात."
आता ती टीचर इतकी बोलकी होती, यात माझा काय दोष? पण मी हे उघड बोललो नाही. काही बोललो तर हा पोरटा सरळ 'नका येऊ' म्हणाला असता.
"सगळ्या टीचरांचे फोन नंबर नका मागू."
मागच्या मिटींगला मी आपलं असावा म्हणून, दोन-तीन टीचरना फोन नंबर मागितला होता. पुढंमागं माओ त्यांच्या वर्गात आला, तर असावा म्हणून. बाकी काही नाही. पण याचाही लोक चुकीचा अर्थ काढतात?
"आणि हो, प्रेमा मिस आता स्कूलमध्ये नाहीयेत." हे मला माहीत होतं. प्रेमा मिस कुठं जॉईन झाल्यात हे मी मुद्दाम माओला सांगितलं नव्हतं. हसताना उजव्या गालावर खळी पडणारी प्रेमा मिस म्हणजे शाळेतली सर्वात लोकप्रिय टीचर होती. आमच्या वेळी जाड चष्मेवाल्या, खत्रूड चेहऱ्याच्या ढवळीकर, कारखिले असल्या आडनावाच्या बाया होत्या. सिनेमाला भेटल्या तर तिथंही अस्मद्चं सप्तमीचं द्विवचन विचारणाऱ्या.
"स्कूलमध्ये उगाच इकडंतिकडं फिरू नका."
मागच्यावेळी मी रस्ता चुकून कोऑर्डिनेटर बाईंच्या केबिनमध्ये घुसलो होतो. त्यावरून ही सूचना होती.
"हो, कळतंय. मागच्यावेळी स्टाफरूम शोधत होतो."
"तिथं काय काम होतं तुमचं? टीचर तर क्लासरूममध्ये असतात ना?"
हा पोरगा पुढंमागं पोलिस होणार. अगदी संशयिताची कसून तपासणी करावी तसं माझी झडती घेत होता.
"आणि" माओचा डोस अजून संपला नव्हता, "फक्त माझी अभ्यासातली प्रगतीच विचारा टीचरना."
"हो हो." काही न कळलं तरी मी आपलं होकार दिला.
"येताना जरा..." मला एकदम वाटलं की हा टीचरसाठी फुलंबिलं आणा म्हणतोय की काय? माझ्या डोळ्यांसमोर ब्लूबेरीजच्या कॉर्नरवरचा फूलवाला उभा राहिला. पण नाही. "येताना जरा, व्यवस्थित फॉर्मल कपडे घालून या. ते शॉर्टस्लीव्ह टीशर्ट आणि रगेड जीन्स नकोत."
"त्यात काय वाईट आहे रे? आपण फिरायला जातो तेव्हा तूही असलेच कपडे घालतोस ना?"
"हो, पण स्कूलमध्ये काहीतरी इभ्रत आहे म्हटलं आमची."
आमची? हा पोरगा दिल्लीची गादी सांभाळणाऱ्या बादशहासारखा स्वतःला आम्ही-तुम्ही करत होता. कालपर्यंत एकं आलीय की दोनं हे नीट सांगता यायचं नाही कारट्याला. आणि आता हा मला शिकवत होता.
"काय रे? तैनाती फौजेसारख्या एवढ्या अटी घालण्यापेक्षा तू सरळ आईलाच का बोलवत नाहीस पीटीएमला?"
"त्याचं कायै बाबा, आई आली की ती सरळ माझे पेपरमधले मार्क बघ, कुठं मी खोड्या करतोय का याची चौकशी कर असलीच बोअरिंग कामं करते. उगाच टीचरलाही कानकोंडं होतं आणि मलाही. त्याच्याऐवजी तुम्ही आलात तर अभ्यासातली प्रगती वगैरेचा प्रश्नच निघणार नाही."
"राहू देत मग!" माझ्यातलाही स्वाभिमानी बाप जागा झाला, "बापाबद्दलची इतकी वाईट कल्पना असेल तुझी मी नाहीच येत पीटीएमला."
ज्युनियर ब्रह्मे

Tuesday, 10 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा:
भाग तिसरा
माझे काका एक नंबरचे चक्रम आहेत असं बऱ्याच लोकांचं मत होतं. हे जनमत काकांचं लग्न होईपर्यंत शाबूत होतं. काकांनी लग्न करून बंगाली बायको घरात आणली तेव्हापासून त्यांना दोन नंबरचे चक्रम असं लोकांनी म्हणायला सुरुवात केली.
काका तसे माझ्याशी प्रेमानं वागायचे. मला कधी माराबिरायचे नाहीत. स्वतःलाच पाढे पाठ नसल्यानं मला विचारायचा काही प्रश्न नव्हता. सहारा वाळवंटात नेऊन सोडलं तरी मी परत येईन याची खात्री असल्यानं ते आपण हरवू अशी शक्यता असल्याखेरीज मला कुठं घेऊन जायचे नाहीत. मी अंघोळ केली किंवा नाही केली तरी त्यांना त्याची फिकीर नसायची. आजी मला बदडायची त्यातल्या निम्म्यांदा खुद्द काकाच माळ्यावर काही खुडबुड करत असायचे. थोडक्यात, बाकी कुणासारखे ते नव्हते. पण तरीही...
तरीही काका कायम विरोधीपक्षात असल्यासारखे आपण म्हणू त्याला विरोध करत. म्हणजे असं-
"काका काका..."
"काय रे ज्युनियर? शाळेला नाही गेलास?"
"आज शाळेला सुट्टी नाही का? रविवार आहे आज."
"म्हणून काय झालं गधड्या? आम्ही रविवारीही शाळेला जायचो. इतके कष्ट केलेत म्हणून आज असे उभे आहोत!" बंडी आणि पायजम्यावर उभं राहण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागतात हे मला तेव्हा कळलं.
"काका..." मी पुन्हा मूळ विषयावर.
"हं?" काका गुरकावतात.
"आपण गणपती बघायला जाऊयात?"
"कशाला? काय असतं रे त्यात बघण्यासारखं?"
"गणपती! आम्हाला शाळेत गणपतीवर निबंध लिहून आणायला सांगितलाय."
"हे असले फालतू उद्योग असतात म्हणून मी मध्येच शाळा सोडली. तूपण नको जाऊ उद्यापासनं."
"हो काका. आणि गणपती बघायलाही नाही जात."
"का नाही जाणार? कसा जात नाहीस ते बघतोच! तू काय तुझा काकापण जाईल!" काका आता इरेला पेटले असावेत. त्यांचे डोळे लकाकू लागतात.
"पण काका-"
"चल म्हणतो ना?" काका माझा हात धरून खस्सकन ओढतात. अचानक ओढल्याने मी त्यांच्या टणक पोटाला आदळून क्षणभरासाठी माझं नाक चपटं होतं.
"काका, जेवण करून जाऊया ना." माझा दुबळा विरोध.
"अरे, आज तुझ्या काकूनं जेवायला माझेर झोल केलाय. गेल्यावेळी खाल्ला तेव्हा दोन दिवस डोकं गरगरत होतं. चल, आज आपण बाहेरच काही खाऊ."
"परवा तुम्ही बाहेरचं काही खायचं नाही म्हणाला होतात ना?"
"गाढवा! घरात असे पदार्थ बनत असतील तर स्वसंरक्षणार्थ माणसाला बाहेरच खावं लागतं. कळलं? आणि तिथं काही अरबट-चरबट खातो म्हणालास तर मुस्काट फोडीन. समजलं?"
"हो काका."
"हो म्हणून मान काय हलवतोस लेका? परवा ती दाबेली कुठं खाल्लेली आपण?"
"हौदाजवळच्या चौकात. तिथं जायचं?"
"तिथं कशाला? परवाच काकू आणि मी बागेतल्या गणपतीला जाताना एका ठिकाणी खाल्ली. तुझ्या काकूला अजिबात आवडली नाही."
"मग?"
"अरे मग काय? म्हणजे ती नक्कीच चांगली असणार. चल तिथंच जाऊ."
अशा प्रकारे काकांबरोबर मी नाईलाजाने गणपती बघून फुगे, पिपाणी वाजवत तुडुंब पोटानं घरी परतायचो. काकांच्या अशा तऱ्हेवाईक वागण्यानं मी तेव्हाच ठरवलं होतं की आपली मुलं होतील तेव्हा त्यांना हवं तिथं- हवं तेव्हा न्यायचं. पण आता काय झालंय ते पुढच्या भागात...

ज्युनियर ब्रह्मे 

Tuesday, 3 October 2017

ज्युनियर ब्रह्मे

प्रवास पालकत्वाचा: भाग दुसरा
मी त्यांचा एकुलता एक नातू असूनही आजोबा माझ्याशी कधी प्रेमानं बोललेले आठवत नाहीत. नातवाशी बोलायचं झालं तर कायम कपाळावर आठ्या असल्या पाहिजेत असा काही त्यांचा नेम असावा. बोलण्यातल्या या नेमापेक्षा फेकून मारण्यातला त्यांचा नेम भलताच भेदक (आणि अचूक) होता. मधली काही वर्षं शब्दाविण संवादिजे, म्हणजे हातातला ग्लास, तांब्या, छत्री, काठी, छडी, झाडू इत्यादींच्या माध्यमातूनच ते माझ्याशी बोलायचे. क्वचित बोलले तरी, (एकेकाळी सहा महिने शाळामास्तरकी केली असल्यानं) मला एकोणतीसचा पाढा विचारायचे. तेवढाच एक विचारायचं कारण इतकंच की खुद्द त्यांनाही बाकी पाढे पाठ नसायचे. शेजारच्या मुजावरांनी बावीस अठ्ठे किती असं म्हटल्यावर आजोबा इतके गडबडले होते की त्यांना साडेतीन मिनिटं ठसका लागला होता. मुजावरांनी उत्तर सांगेपर्यंत आजोबा खोटंखोटं खोकतच राहिले होते. एकोणतीसचा पाढा आजही पाठ असण्याचं श्रेय केवळ आजोबांना जातं.
ज्यांचे आजोबा खवीस असतात अशा लोकांच्या आज्या मुलखाच्या प्रेमळ असतात. माझी आजी या नियमाला सणसणीत अपवाद होती. जातायेता धोपटून काढण्यासाठी नातवाचा जन्म झालाय अशी तिची समजूत होती. मी माळ्यावरच्या खोलीत काहीतरी खाऊ चोरायला जातो असं त्या माउलीला कुणी सांगितलं होतं कोण जाणे. कसलीही खुडबुड ऐकू आली की आजी कान टवकारत जागेवरूनच "ज्युनियर, ऐकत्येय हं मी. थांब आता आले की पाठीत लाटणंच घालत्ये तुझ्या." असा दम भरायची. दिवसभरात कधीही तिच्या तावडीत सापडलो की सगळ्या धमक्या एकदम खऱ्या करायची. तिला आजोबांसारखी काठी, छडी, लाटणं वगैरे शस्त्राची कधी गरज पडली नाही. 'तुला बदडून माझे हात घट्ट झाल्येत.' असं म्हणत पाठीत रट्टे देई. बायको कधीकधी 'असे कसे गेंड्याच्या कातडीचे आहात हो तुम्ही.' असं म्हणते तेव्हा यामागचे आजीचे कष्ट मला आठवतात. माझ्या ढालीआड उंदरांच्या अनेक पिढ्या आमच्या माळ्यावर सुखेनैव नांदल्या असतील.
आई फारशी त्रास द्यायची नाही. मुळात तिच्या लेखी मी म्हणजे इतर कामांसोबत करायचं एक फुटकळ काम असं काही असणार. मी अंघोळ करताना आई बाजूलाच दगडी चौथऱ्यावर भांडी घासत असायची. त्यामुळं "अरेरे, काय ही मान काळी झालीय? कावळ्याची मान बरी की रे तुझ्यापेक्षा!", "टाच घासलीस तर काय पायात किडे पडून मरशील का हरामखोरा?", "गाढवा, पाठीला काटे फुटलेत का? जरा पाणी लागू दे पाठीला." अशा तिच्या प्रेमळ सूचना चालू असायच्या. मी जेवत असताना ती परसदारी विहीरीशी कपडे धूत असायची. तिथूनही न बघता "जुन्या, गिळ की लेका घास! की रवंथ करत बसणारैस बैलासारखा?" नाहीतर "पानात भाजी शिल्लक दिसली तर खिशात भरून देईन हं." अशा धमक्या चालू असायच्या. आईला भाजी कशी दिसली असेल असा विचार मनात येण्यापेक्षा ती खरोखरच माझ्या खिशात भाजी भरेल या भीतीनं मी डोळे मिटून कशीबशी भाजी संपवायचो. आईला दिव्यदृष्टी असते असं कुण्या लेखकानं म्हटलंय. त्या लेखकाची आईही माझ्या आईसारखीच असावी.
मी शाळेचे कपडे घालत असायचो तेव्हा ती बाबांची तयारी करून त्यांचा डबा भरून देत असायची. तेव्हापण "जुन्या, साळींदरासारखे केस उभे दिसले तर मी येऊन भांग पाडेन!" अशी दटावणी यायची. आईच्या भीतीनं केस आपोआप डोक्यालगत चप्पट बसत. आजही अंगावर शहारा येतो तेव्हा माझे केस उभे न राहता अंगाला चिकटून असतात. लहानपणी आई कधीकधी रविवारी मला अंघोळ घालायची. त्याऐवजी ती मला सरळ बदडूनच का काढत नाही असा प्रश्न तेव्हा पडायचा.
हे असे पालक असताना मला तेव्हा वाटायचं आपण यांच्या तावडीतून सुटायचं असेल तर पटकन मोठं व्हायला पाहिजे. पण नाही, आज माओ आणि माओची आई मला त्यांच्यापेक्षा लहान समजून वागवतात ते पाहिलं की आधीचं लहानपणच बरं होतं असं वाटू लागतं.
ज्युनियर ब्रह्मे

Tuesday, 19 September 2017

मला वंशाचा दिवा न म्हणता वंशाची उदबत्ती समजतात

प्रवास पालकत्वाचा:
‘प्रवास पालकत्वाचा’ या विषयावर लिहा.' असं जेव्हा नवी उमेदमधून सांगणं आलं तेव्हा मी दचकलो. पालक म्हणजे कुठली भाजी आहे का त्यावर विनोद करायला? पण जसाजसा मी यावर गंभीरपणे विचार करत गेलो तसं माझा पालकत्वाचा प्रवास अपेक्षित नसून माझ्या पालकांचा प्रवास अपेक्षित आहे हे लक्षात आलं. आणि मग ही आजोबा- बाबा- मी आणि माओ अशा आमच्या चार पिढ्यांची कहाणी उलगडत गेली.
भाग पहिला
माझे बाबा आणि मी, यांच्यात फक्त दिसण्यातच साम्य आहे. वटवृक्षाच्या छायेत इतर कुठली झाडं जगत नाहीत म्हणे, तसंच बाबांच्या छत्रछायेत मी नेहमीच खुरटत आलोय. तसं, आमच्या ब्रह्मे घराण्याचे कोणतेही दैवी गुण माझ्यात उतरलेले नाहीत हे बाबांनी लहानपणीच ओळखलं होतं. 'माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा अपेक्षाभंग' असं ते मला नेहमी म्हणायचे. माझ्यात ब्रह्मेंचे गुण इतके कमी दिसतात की बाबा मला वंशाचा दिवा न म्हणता वंशाची उदबत्ती समजतात.
माझं सगळं लहानपण तसं बऱ्यापैकी दुःखाकष्टात गेलं. फार पूर्वीच्या काळी कष्ट म्हणजे म्युनिसीपालटीच्या दिव्याखाली उपाशी राहून अभ्यास करणं वगैरे बाळबोध संकल्पना होत्या. हल्लीच्या पिढीत नेट कनेक्शन स्लो असणं, टॅब हँग होणं अशा काही परमदुःखाच्या व्याख्या आहेत. माझ्या बाबतीत असं काही नव्हतं. मला पाहताच बाबा दुःखी व्हायचे.
मी कुठंतरी हरवून जावा अशी त्यांची सुप्त इच्छा असावी. मी हरवावा यासाठी त्यांनी गल्लीतल्या छत्रीवाल्या रामासमोरच्या मारूतीला नवस बोललेला असं मी ऐकून आहे. 'उत्तम पुरुष केवळ दैवावर हवाला न ठेवता प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात.' या उक्तीला अनुसरून बाबा फक्त नवसावर अवलंबून न राहता आपल्या बाजूनं प्रयत्न करत असायचे. कधी मला सारसबागेत घेऊन गेले की आठवणीनं तिथं विसरून यायचे. एकदा माझ्या बदल्यात पिंजऱ्यातलं माकड घरी घेऊन गेले होते. मी त्यांच्यापाठोपाठ घरी पोचलो तेव्हा हातभर जीभ बाहेर काढून 'अरेच्चा! तू असा कसा परत आलास बुवा?' असं आश्चर्यानं म्हणाले होते. पोरं हमखास हरवणारे सिनेमातले कुंभ के मेले पाहून 'एकदा आपणही तिथं जाऊया' असा बाबांनी माझ्याकडं हट्ट केलेला आठवतोय.
शेजारच्या चंदूचे बाबा त्याला झाडावर चढायला शिकवायचे. बाबा मला ट्रान्सफॉर्मरच्या खांबावर चढायला उत्तेजन द्यायचे. निमाच्या बाबांनी तिच्यासाठी मुंबईहून छोटा कॅमेरा आणला होता तर बाबा माझ्यासाठी पिग्मी आदिवासींचे विषारी भाले कुठं मिळतात याची चौकशी करत होते.
माझ्या मित्रांचे आईवडील त्यांना सुट्टीला सांगली, नागपूर, मुंबई, नाशिक, इंदोर अशा गावी नेत; तर बाबा मला सुट्टीत टकमक टोक, हिरकणीचा कडा, ड्यूक्स नोज असल्या साहसी सुळक्यांवर नेत. तिथं गेल्यावरही उगाच 'जरा बघ रे तिथं वाकून.' असं मला सुचवत असायचे.
मी हरवलो आहे, वीसवीस वर्षं झाली तरी मी अजिबात सापडत नाहीय, आसेतूहिमाचल माझा शोध अखंड चालू आहे, पोलिस-खाजगी गुप्तहेर वगैरेंनी माझ्या शोधात हात टेकल्यानं आता इंटरपोल आणि मिलीटरी कमांडोंकडं ही शोधमोहीम दिली आहे, ते देशातलं घरनघर विंचरून काढतायत, माझ्या काळजीपोटी आईनं घरातली सगळी अंथरूण-पांघरुणं धरलीत, मला परत आणून देण्याच्या बक्षीसाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे अशा मुंगेरीलाल दिवास्वप्नात बाबा तासनतास रमून जात.
जेव्हा ते स्वप्नातून जागे व्हायचे तेव्हा मी त्यांच्या पायाशीच काही खुडबूड करत बसलेलो दिसलो की ते खट्टू होत. आणि नव्या जोमानं मला दूरच्या ठिकाणी घेऊन जात. पण दरवेळी मी मांजरासारखा त्यांच्याआधी घरी परत यायचो. माझं सगळं लहानपण घरची वाट धुंडाळण्यात गेलं.
माझा पालकत्वाचा प्रवास असा पालकांचं घर शोधत सुरु झाला.
 ज्युनियर ब्रह्मे

Tuesday, 5 September 2017

पालकत्व शिकवता येत नाही, ती मुलांसोबत शिकण्याची कला आहे

प्रवास पालकत्वाचा :
"Having a child is like getting a tattoo ... on your face. You better be committed."
—"Eat Pray Love" by Elizabeth Gilbert
पालक होऊ पाहाणाऱ्या आणि पालक असणाऱ्या प्रत्येकाने हे वाक्य डावीकडून उजवीकडे निदान तीन वेळा वाचावं. तुम्ही कितव्यांदा पालक बनणार, तुमच्या घरात कोण असतं, तुमचं चिंगरं मुलगा की मुलगी, तुमच्या दोन मुलांत किती वर्षांचा फरक आहे, तुमचा तसंच मुलांचा स्वभाव या आणि अश्य़ा किती तरी गोष्टींवर या टॅटूचा रंग, आकार, चित्र अवलंबून असतो. पालकत्व शिकवता येत नाही, ती मुलांसोबत वाढत वाढत शिकण्याची कला आहे. तरीही समाजशास्त्रज्ञांनी पालकत्वाच्या होयबा पालक (जेली फिश पॅरेन्ट्स), आदर्श पालक (टायगर पॅरेन्ट्स), मालक पालक (डॉल्फीन पॅरेन्ट्स) आणि कोरडे पालक (ऑस्ट्रीच पॅरेन्ट्स) अश्या काही टेम्प्लेट तयार केल्या आहेत. स्वतःकडे डॊळसपणे बघितलं किंवा काही छोट्या परीक्षा दिल्या की तुम्हाला तुमची टेम्प्लेट सहज समजते.
तेरा वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा पहिल्यांदा पालक झालो तेव्हा मुलाला असंच वागवायचं किंवा आपली पालकत्वाची अमूक एक टेम्प्लेट आहे असं कुठं डोक्यात नव्हतं. आमच्या पालकांची आम्हाला वाढवायची पद्धत आणि आम्हाला आदर्श वाटणारी काही आई-बाबा मंडळी यांचं बेस्ट ऑफ बोथ वर्ल्डस असं काही तरी आपण वागू असं कुठं तरी सबकॉन्शसली वाटायचं. नऊ वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा दुसऱ्यांदा पालक झालो, तेव्हा आमचे पालकत्वाचे ठोकताळे बऱ्यापैकी तयार होते, त्याचा हा सारांश.
माझा थोरला तेव्हा सहा-सात वर्षाचा असेल. रोज रात्री एक गोष्ट सांगायची असा आमचा अरेबियन नाईट्सचा प्रयोग सुरु होता. त्यात कधी तरी ’श्यामची आई’ उगवली आणि तिसऱ्याच दिवशी श्य़ाम हा एक नंबरचा बावळट मुलगा असणार असं माझ्या मुलानं जाहीर करुन टाकलं. कडेलोट म्हणजे ’सिनेमा बघणं वाईट असतं रे बाळा’ असं वाक्य कुठल्याश्य़ा गोष्टीत आलं आणि महीन्यातून सरासरी एक सिनेमा बघणाऱ्या वाईट्ट लोकांनी श्य़ाम आणि त्याच्या आईला कुठल्याश्य़ा कपाटात कायमचं कैद करुन टाकलं. मुलांमध्ये व्हॅल्यु सिस्टीम (चारित्र्य हा फारच मोठा शब्द!) निर्माण करायची तर श्यामच्या आईच्या हातचा तयार काढा उपयोगाचा नाही हे तेव्हाच लक्षात आलं. चांगलं-वाईट, चूक-बरोबर, खरं-खोटं यांच्या संकल्पना मुलांच्या मनात पालक काय बोलतात, कसं वागतात यावरुन तयार होतात. घरात त्यामुळे चौघांसाठीही नियम तेच असतात. जे मुलांसाठी वाईट, ते आम्ही करत नाही आणि ज्या गोष्टी आम्हाला मान्य असतात त्या साठी आम्ही मुलांना आडवत नाही. यात घरी परत येण्याच्या वेळेपासून खाण्याच्या सवयीपर्यंत, लोकांशी वागण्याच्या पद्धतीपासून रीतीभातीपर्यंत सगळ्या गोष्टी येतात.
स्क्रीन टाईम हा आजच्या पालकांचा काळजीचा विषय. टीव्ही, टॅब, स्मार्टफोन यांचा चक्रव्युह भोवंडून टाकणारा आहे. व्यसनाच्या पातळीवर गेलेलं मोबाईल गेमचं, सोशल मिडीयाचं वेड आणि त्यातून निर्माण होणाऱ्या नवनवीन समस्या घरोघरी दिसतात. दुर्दैवाचा भाग म्हणजे या समस्या आहेत याचं भानही कित्येक पालकांना नाही. आमच्याकडे मुलांचा टॅब फक्त उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्यासुट्टीत बाहेर निघतो. त्यावर लॉग-ईन आमच्या ईमेल आयडीने असल्यानं आम्हाला मुलं काय डाऊनलोड करतात हे लगेच कळतं. थोरल्याकडे क्लासला जाण्यापुरता फोन असतो आणि सगळ्यांच्या फोनचे स्क्रीन लॉक एकाच किल्लीने उघडतात. आमच्या सोसायटीत खेळायला भरपूर जागा आणि मुलं आहेत. त्यामुळं आमच्याकडे खरेखुरे सबवे सर्फर दिसतात आणि सोबतच फुटबॉल आणि क्रिकेटचा घमासान. मुळात आम्हाला सिनेमे पाहायला आवडतात त्यामुळे सुट्टीच्या दिवशी आम्ही घरी किंवा बाहेर एखादा सिनेमा नक्कीच बघतो. पण आठवडाभर आमचा टीव्ही रोज जेमतेम तासभर चालतो.
आम्ही लहानपणी केलेल्या काही गोष्टी मुलांमध्ये उतरलेल्या बघतो तेव्हा जनुकांच्या चिवटपणाचं कौतुक वाटतं. धाकट्यानं नुक्तंच अवांतर वाचन सुरु केलय पण थोरला भरपूर वाचतो. त्यांना लायब्ररी तर आहेच शिवाय आम्ही त्यांना पुस्तकांच्या दुकानात तासंतास सोडून देतो ते निराळंच. प्रत्येकाची आदर्श पालकत्वाची व्याख्या निराळी असते. आम्हाला जमलेल्या आणि न जमलेल्या गोष्टीं आम्ही मुलांसमोर ठेवतो. त्यातलं त्यांना जे आवडतं, जे जमतं ते त्यांनी निवडावं. आमच्या प्रतलापल्याडच्या त्यांच्या आवडींना आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो. ते कधी जमतं तर कधी साफच फसतं. पण यात संवादाची एक नवीन शक्यता नक्कीच दडलेली असते.
आम्ही दोघंही छोट्या शहरांत वाढलो, मोठे झालो, आमच्या संवेदना महानगरीय नाहीत. शहरातली नाती, दैनंदिन ताण, अंतरं, व्यवहार, सोई न् प्रश्न या आणि इतर अनेक गोष्टी आमच्या पालकत्वाच्या व्याखेत डोकावत राहिल्या. पालक म्हणून काही गोष्टी ठरवून केल्या गेल्या तर काही चुकतमाकत शिकत गेलो. काही गोष्टी ठरवूनही जमल्या नाहीत तर काही पार चुकल्याच. या चर्चा कधी मोकळेपणानं होतात तर कधी वैतागून. हे स्वतःला असं वारंवार चाचपून पाहाणं मात्र गरजेचं. शेवटी हा प्रश्न चेहऱ्यावर गोंदवलेल्या टॅटूचा आहे!
 संवेद गळेगावकर

Tuesday, 29 August 2017

प्रिय अगस्ती



प्रिय अगस्ती,
तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या सदिच्छा.
महाराज, अरे तू जन्मलास, एकेका वर्षानं मोठा होत गेलास. आणि आता तू पूर्ण अठरा वर्षांचा झालायस! किती दिवसांत तुला पत्र लिहिणं झालं नाही. आज मुद्दाम लिहितो आहे. पालकत्व म्हणजे नेमकं काय असतं, हे नीटसं समजलेलं नसताना छोट्या मोठ्या प्रसंगातून, घटनांतून तू आम्हाला काही नवं शिकवत राहिलास. पालक म्हणून घडवत राहिलास.
आपली साथसोबत अठरा वर्षांची कधी झाली, हे कळलंच नाही. तुझं आमच्या आयुष्यात येणं ही गोष्टच केवढी सुंदर होती आणि हे. तुझं आनाव अगस्ती. अवकाशातल्या एका ताऱ्याचं नाव. खगोल भौतिकशास्त्र तुझ्या आवडीचं, हा योगायोग! दंडकारण्यातला पहिला शेतकरी अगस्ती. आपण शेतकरी, कष्टकरी समाजातून आलेलो. त्या परंपरेशी नातं सांगणारं नाव! गणित, विज्ञानाचा तू विद्यार्थी आहेस. चिकित्सक आहेस. सतत प्रश्न विचारत आलास. आम्ही जमतील तशी तुझ्या प्रश्नांची उत्तरं देत आलोय. कोणतीही वस्तू घेताना तू किती बाजूंनी विचार करत असतोस. या बाबतीत आपले मतभेद होत. पुढं मात्र मी बॅकफूटवर गेलो. कारण मला हे समजलं होतं,की तुझ्या मनातल्या शंका मिटेपर्यंत तू काहीच मनापासून स्वीकारत नाहीस.
लहानपणी हातात पुस्तक घेतलं की ते संपवताना आम्ही झोपी गेलो, तरी तू एकटा जागायचास. हे सारं तू दुसरी-तिसरीत असताना. तुझ्या वाचनयोगाने घरातली आपली लायब्ररी समृद्ध होत गेली. पुस्तकांनीच तुला स्टिव्ह जॉब्ज, थोर गणिती रामानुजन आणि यांसारख्यांच्या प्रेमात पाडलं. अगदी वाचायला यायला लागल्यापासून तू वृत्तपत्रं वाचत आला आहेस.
‘अमूकच कर’ असा आग्रह आम्ही तुला कधीच केला नाही. अगदी लहान असल्यापासून तुझं स्वतंत्र व्यक्तिमत्त्व मान्य करत आम्ही पुढं गेलो. विज्ञान तुझ्या खास आवडीचं. विज्ञान प्रदर्शनात तू भाग घ्यावास, असं आम्हाला मनापासून वाटे. “कोणीतरी तयार करून दिलेलं मॉडेल मी बाहुला बनून मांडणार नाही. मला काहीतरी भारी सुचलं तर मांडीन”, असं बाणेदार उत्तर देऊन तू मला पूर्णपणे निरुत्तर केलं होतंस! तू इंटरमिजीयटसाठी चित्र काढत होतास. बहुतेक मुलं हॉलबाहेर आली होती. मी तुला शोधत आलो. तेव्हा हॉलमधल्या तुझ्या बाकाभोवती मुलांनी गर्दी केली होती. तू दंग होऊन चित्र काढत होतास. वाव...असं म्हणत मुलं तुला दाद देत होती. चौथी, सातवीत शिष्यवृत्त्या मिळवल्यास. मी रानवेडा माणूस. माझ्याबरोबर तू जंगलात भटकायला येऊ लागलास. तूदेखील जंगलाच्या प्रेमात पडलास. माझ्या हातातला कॅमेरा नकळत तू तुझ्या हातात घेतलास. रानातले भन्नाट फोटो घेऊ लागलास. निसर्गात हिंडताना पर्यावरणाविषयी अधिक संवेदनशील बनलास. कोणतीही नवीन गोष्ट शिकताना, समजून घेताना ती अगदी मनापासून, खोलात जाऊन कशी समजून घ्यावी याचा वस्तूपाठ तू अनेकदा दाखवून दिलास. शिक्षक म्हणून वर्गात शिकवत असताना अडचणी आल्यावर तुला फोन लावला की, तू लगेच रस्ता दाखवायचास.

मला आठवतं, भारतानं सोडलेलं मंगळयान मंगळ ग्रहावर उतरलं होतं. सातवीतल्या मुलांनी दुसऱ्या दिवशी ‘यान मंगळावर कसं गेलं?’ असं विचारलं. मला कसं सांगावं, हेच समजेना. तेव्हा ‘बेंचेस बाजूला सरकवून वर्गात फरशीवर अशी आकृती काढून दाखवा, म्हणजे मुलांना समजेल,’ असं तू सुचवलंस आणि केवळ मुलंच नाहीतर आम्ही शिक्षकदेखील ते नीटपणे समजलो. माझ्या पालकत्वाच्या प्रवासादरम्यान माझ्यातला शिक्षकदेखील समृद्ध होत गेला. कसं वागलेलं मुलांना आवडतं? कसं नाही? याचा उलगडा तुझ्यामुळे नेमकेपणाने होत गेला. अनेक पुस्तकं वाचून समजलं नसतं, हे तुझ्यासारख्या मुलानं आम्हाला शिकवलं.
एखादी गोष्ट समजली नाही की त्याचा तुला त्रास होतो. पण सगळ्याच गोष्टी सगळ्यांना नाही समजत. कधी कधी वेळही लागतो नव्या गोष्टी, अपरिचित संकल्पना समजायला. सगळंच समजलं पाहिजे, यातूनही तुला बाहेर पडायला हवं. तू बुद्धिमान आहेस. पण गुणांपेक्षा ज्ञानाला जास्त महत्त्व देशील. पैशाच्या मागे तू धावू नकोस. कारण पैशांच्या मागे धावणारे लोकं सुखी, समाधानी नसल्याचे आम्ही रोज बघतोय. तुझ्याकडं असलेलं ज्ञान, माहिती, कौशल्य भोवतीच्या समाजाच्या उन्नयनासाठी वापरशील तर तुझा आम्हाला जास्त अभिमान वाटेल. अर्थातच हादेखील आग्रह नाहीये. तू तुझा स्वतंत्र आहेस. आयुष्यात आरोग्य फार महत्त्वाचे आहे. पैशांच्या मागे लागलेल्या अनेक लोकांच्या तब्बेतीचा पाढा सुरु झाल्याचं दिसतं. तेव्हा काळजी घे. तब्बेतीला जप. आनंदी राहा! सध्याच्या जगातले ताण-तणाव बघताना असं सतत जाणवतं की, आनंदी राहायला छंद जोपासायला हवेत. माणसांशी नातं जोडावं. गॅझेट्सना जे लोकं सुरक्षित अंतरावर ठेवतील, ते लोकं सुखी असतील! अशी एकूण स्थिती आहे.
ऊन-पावसासारखं सुख-दु:खं असतं. या गोष्टी कोणालाच चुकल्या नाहीत. यश-अपयशही पचवता आलं पाहिजे. आयुष्य कठोर परीक्षा घेतं. धीरानं त्याला सामोरं जाता आलं पाहिजे. तुझ्या पिढीची मुलं एखादी गोष्ट नकारात्मक घडली, की फार लवकर निराश आणि नाउमेद होऊन जाता रे. अशा वेळी तुमच्या पिढीची खरेच काळजी वाटते. तू खूप संवेदनशील, जास्त हळवा आहेस. माणूस म्हणूनही उंच आहेस. हे खूप छान आहे. निर्णयक्षमता आणि आत्मविश्वास या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कितीही काहीही मनाविरुद्ध घडलं तरी खचून जायचं नाही. कोसळून पडायचं नाही. नवा दिवस नव्या संधी घेऊन उगवतो. जी गोष्ट केल्यानं तुला आनंद मिळतो, अशा आवडीच्या क्षेत्रात तू तुझं करिअर करावंस. बाकी तुझी मर्जी. आता तू कायद्यानं सज्ञान झाला आहे. तू या देशाचा जबाबदार नागरिक बनला आहेस.
स्तूती, कौतुक तुला आवडत नाही. तू नेहमी जमिनीवरच असतोस. इतकं असं लिहिणं तुला कदाचित रुचणारही नाही. तरीही लिहिलं आहे. तू समजून घेशील. कारण आपलं नातं इतकं औपचारिक नाहीचये. बापलेकापेक्षाही आपण चांगले दोस्त आहोत. पुन्हा एकदा तुला आभाळभरून सदिच्छा! तुझ्या लाडक्या स्टीव्ह जॉबच्या भाषेत सांगायचं तर stay hungry stay foolish!
तुझा,
आबा.
भाऊसाहेब चासकर.

Tuesday, 22 August 2017

एका दत्तक घेतलेल्या मुलीची आई..

प्रवास पालकत्वाचा -
आई असण कळलं त्या वयापासुन आई होण्याच स्वप्न. आई तेही एका मुलीची आई, आणि तेही एका दत्तक घेतलेल्या मुलीची आई... हे स्वप्न वाढवित मोठे झाले. मोठे होत राहीले तसतसे स्वप्नही वाढत राहिलं. स्वप्नाचा मार्ग दुर्धर आहे हे कळत होतं. तसं होतही गेलं, रितीभातीच्या अडचणी आल्यात, सामाजिक मापदंडाचे नैतिक नितीनियम आलेत. उभयतांमधील वैचारिक संघर्ष आला. जवळच्या माणसांची रोकटोक आली...
भिती दिली, असहकार दाखवला, मग मुलगीच का? घेतली तीही सावळी..? अश्या एक ना अनेक कारणाचा प्रश्नांची ढग फुटी झाली. तरी मजल दर मजल गाठत या सरयांना एक बहारदार उत्तरं दिलं ‘श्रावणी’.
श्रावणातला जन्म म्हणून श्रावणी. ती हे नाव घेऊनच आली त्यामुळे मग तेच कायम राखलं. घरी आणल्याचा दिवस वाढदिवस करं, असेही सुचविण्यात आले. पण मला तिच्या निर्मीणाचा सन्मान करायचा होता, स्विकार करायचा होता संपुर्ण.
१८ ऑगस्ट २००५ चा जन्म. गेल्या अठराला श्रावणी १२ वर्षाची झाली. बारा वर्ष, एक तप. एका तपाची साधाना, एका तपाची श्रावणी.
पहिल्यांदा कुशीत घेतले. तेंव्हाचे तिचे डोळे आठवतात. निरव, कुठलीच वस्ती नसलेले. प्रेषीतासारखे. माझ्यात शोध घेत असल्याची तेवढी एक उघड झाप. पाय आक्रसुन पोटाशी घेतलेले. शरिराची छोटीशी गाठोडी करुन मिटून घेत… आव्हानच वाटलं तेंव्हा या कळीला फुलवायच म्हणजे…?
अगदी म्हणतात तसा ओल्या मातीचा गोळा तो…त्याला आकार द्यायचा, या तळहातावर घडवायच, कुशीत वाढवायच, बोट धरुन शिकवायच सारं…
सुरवातीला जरा एकएकटीच राहायची. खुप शांत, सर्वसामान्य मुलांसारखी दंगामस्ती नाहीच… एकदम शिस्तीत. खाणे, झोपने, उठने... पण मग एक सात आठ महिन्यानी मी दिसायला लागले तिच्या डोळ्यात, तिच्या स्पर्शात… मायेचा पान्हा भरुन पावला. आता तिच्या तान्हुल्या जगात आम्ही तिचे होऊन वावरत होतो. तिची काळजी घेत होतो. तिला जपत होतो.
माझे हात राकट म्हणून मालीशची जवाबदारी देवेनला. देवेनचे हात फार मऊसुत… त्यानंतर तिची उन उन आंघोळ, मग तिची छानशी तयारी, मग तिच्या सोबत खेळणे, दोघांनी मिळून भरवने, मग तिची झोप… ती झोपली की घर शांत. त्यामाघारी घरची सगळी काम आटोपून संध्याकाळी तिला बेबी बॅगमधे टाकून भुर्रर्रर्र…फार स्वप्नवत होते ते दिवस…
त्या दिवसात नवराष्ट्र सोडले होते मी यासाठी.
तरी बाल संगोपणाची फारसी माहिती नव्हती, जवळ कुणी सांगणार नव्हतं त्यामुळे तिला काही झालं ते पटकन कळायच नाही त्यावेळेस जरा हालच झाले माझ्याकडून श्रावणीचे. पण मग सांभाळून घेतले. शिकले.
देवेन त्याच्या या ना त्या कारणामुळे दुरच असायचा. त्यामुळे जस्तीत जास्त आम्ही दोघीच असायचो. एकमेकींसोबत; एकमेकींसाठी. तिला भातुकलीची फार आवड. ती तिच्या भातुकलीत ती, मी, आणि तिची बाहुली असा खेळ मांडत असे…एकदा देवेन बोललाही हिच्या संसारात मी कुठे दिसत नाही…
देवेन गेल्यावर सगळीकडून जरा पोरक्या, परक्या झालोत आम्ही. तेंव्हा दोघी सुन्न… तिला इथे तिथे गुंतवून मी सैरभैर. शुन्य. पण मग सावरलं तिने हसत-खेळत मनवलं जिंदगीला. आणि मलाही.
ती देवेनला बबुडी म्हणायची. बोलायला लागल्यावर तिचा पहिला शब्द बाबाच! तिचा बाबा मी तिला देऊ शकणार नाही याचं शल्य राहील.
मी श्रावणीला तिच्या वास्तवापासुन कधीच दुर ठेवलं नाही. तिला शब्द अर्थ कळायला लागल्यापासुन मी तिला ती माझ्यासाठी विशेष असल्याच सांगत आलेय. ती सर्वसामान्य मुलांसारखी पोटातून नाही तर मनातुन जन्माला आलेली आहे असे समजावत आले. बिंबवत राहीले, तश्या गोष्टी सांगीतल्या. कथा कथुल्या बनवल्या. प्राणी, पाखरं, पान यांचे संदर्भ दिले. सृष्टीतला प्राण समजावून सांगीतला... तिने ते समजून घेतले. स्वसन्मानाने आपले असणे स्विकारले सोबत माझेही… तिचा तो स्विकार सृष्टीने आमच्यातील अद्वैत स्विकारण्यासारखा…
मित्रांनो, श्रावणी सुनीता देवेंन्द्र वानखेडे खुप गुणी मुलगी आहे. तिला प्रत्येक गोष्टीची आवड आहे. ती सगळ करुन पाहाते. अभिनयाच अंग आहे तिला. आवाज चांगला आहे. उच्चारही. खुप स्वप्न आहेत तिची. ती law of attraction ला मानते. तिच्यासाठी, माझ्यासाठी खुप काही काही करेल म्हणते. आणि प्रत्येक वेळेस यासारयात एक महत्त्वाच सांगून जाते,
आई, मोठी झाल्यावर ना मी ही एक मुलगी दत्तक घेईल…तुझ्यासारखी!
  सुनिता झाडे

Tuesday, 15 August 2017

प्रत्येकालाच आदर्श पालक व्हायचं असतं



समाजाभिमुख वकिलीची कल्पना प्रत्यक्षात आणणारे अॅड असीम आणि त्यांच्या पत्नी अॅड रमा सरोदे यांची स्वतःच्या बाळासोबत एक दत्तक मुलं असावं अशी इच्छा होती. पण, घरच्यांच एकमत झालं नाही. आज त्यांचा मुलगा रिशान १२ वर्षाचा आहे. रिशान शब्दाचा अर्थ आहे - गुड हयुमन बिईंग. पालकत्वाच्या प्रवासाविषयी असीम भरभरून बोलले.
“परिपूर्ण पालकत्व असं काही नसतं. प्रत्येकालाच आदर्श पालक व्हायचं असतं. पण प्रत्यक्ष जीवनाची लढाई, पैसे कमावण्याचे ताण हा विचार क्षणभंगुर ठरवितात. आपण खरोखर जसे आहोत, तसं राहाणं अणि आपल्या मुलासोबत स्वतःला विकसित करत जाणं ही एक प्रक्रीया आहे.
रिशान माझ्यासोबत माझ्या विविध जाहीर सभांना, वेश्या, अपंग, एचआयव्हीबाधी, कारागृहातले कैदी अशा समाजघटकांच्या कार्यक्रमांना, भारतात आणि ऑस्ट्रेलिया- दुबईतल्या न्यायालयांमध्ये येत असतो. अशा ठिकाणी येण्याचा एक वेगळा प्रभाव त्याच्यावर पडतोच. त्याची विचार करण्याची प्रक्रिया, एखादया विषयावर भूमिका घेण्याची ताकद मला आत्ताही जाणवते. मला कामामुळे ब-याचदा समाजकंटकांकडून धमक्या येतात, जिवालासुध्दा भीती असते. यामुळे रिशानला नक्कीच असुरक्षित वाटतं. अशा वेळी मी त्याला केसेसबद्दल माहिती देतो. चांगलं काम केलं, तरी लोक त्रास देतात हे समजावून सांगतो.
रिशानच्या मनात माझ्या आणि त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या खूप आठवणी असाव्यात असं मला वाटतं. यात खरं तर रमाने आई म्हणून बाजी मारली आहे. रिशानच्या काही आठवणी मला आजही महत्वाच्या वाटतात.
एकदा त्याने मला विचारलं, की टु झीरो व्टेन्टी, थ्री झीरो-थर्टी, फोर झीरो फोर्टी, फाईव्ह झीरो फिफ्टी - तर मग वन-झीरो वन्टी असं आपण का नाही म्हणत? अत्यंत लॉजिकल विचार करणारा हा मुलगा असल्याची त्याने दाखविलेली चुणुक मला सुखावून गेली होती. माझ्यातल्या काही वाईट गोष्टीही त्याच्यात आहेत. उदा - गणिताचा त्याला असलेला कंटाळा. मी त्याला गणिताचं महत्व सांगायला जातो तेव्हा तो सांगतो, “बाबा, अरे जवळपास 85 % मुलांना गणित आवडत नाही. मी काही एकटाच नाही.” यावर काय बोलणार? मी त्याच्या वयात इतका स्मार्ट नव्हतो. कदाचित प्रत्येकच आई-बापाला आपल्या मुला/मुलीबद्दल असंच काहीतरी वाटत असेल
.
रमाचे आणि माझे अनेकदा वादविवाद होतात. एकदा रिशानने मला बाजूला नेउन समजावणीच्या सुरात म्हटलं “बाबा, तू जे आईला सांगतोस ते बरोबर असतं. पण ते तू न ओरडता सांगत जा ना!” नंतर मला कळलं की तो असंच रमाशीही बोलला. हा मुलगा तर माझाच बाप आहे, असं मला वाटलं.
रिशानसाठी पुरेसा वेळ देणं योजलं तरी शक्य होत नाही. तरी वेळ काढून मी त्याला बातम्या आवर्जून वाचून दाखवतो. कधी टीव्हीवरील बातम्या बघताना चर्चा करतो. रिशान मुळात चौकस आहे. त्याची स्वतःची अशी मतं असतात. एखादी समस्या असते, तेव्हा तो नक्कीच आम्हा दोघांशी बोलतो.
आपल्या मुलाने खूप पुस्तकं वाचावी असं बहुतेक पालकांना वाटतं. रिशानच्या वाचण्याचा फॉर्म वेगळा आहे. तो व्हिज्युअल वाचनाने म्हणजे गुगल सर्च, यु- टयुबवरील माहीतीपट याने स्वतःला अपडेट ठेवतो. त्याची या वयात सगळयांशी मिळून-मिसळून राहण्याची वृत्ती, जनसंपर्क याचं आम्हाला कौतुक आहे. आमच्याकडे येणा-या परदेशातील मुला-मुलींशीसुध्दा रिशान सहज संवाद साधतो.
७ वर्षांच्या रिशानने नागपूर आकाशवाणीने घेतलेल्या मुलाखतीत, अगदी आत्मविश्वासाने वाघांना वाचवा, प्राण्यांना-झाडांना जगू द्या हे पोटतिडकीने सांगितलं होतं. त्याला लिखाणाची, कवितांची,फुटबाँल, स्विमिंग, कुकींग याची आवड आहे. त्याने मोठेपणी वकील बनावं की शेफ की आणखी काही, याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याने एक संवेदनशील आणि काळजी घेणारी व्यक्ती असणं महत्वाचं आहे.
काहीही कारण नसतांना आनंदी राहाण्याचं बालवय रिशानने पार केलं आहे. कारण हल्ली तो अनेकदा ‘बोअर’ होतो. आधी तो खेळणी खेळण्यात मग्न असायचा, वहया-पुस्तकांच्या इमारती करायचा. पण आता तो नेहमी टिव्ही बघतो किंवा मोबाईलवर यु-टयुब बघतो. मला हे आवडत नाही असं त्याला सांगायचं आहे. त्याच्यातील सर्व ताकदीने त्याला जे पाहिजे ते मागतो. अनेकदा इमोशनल करून मागतो. पण मग आम्हालाही त्याला काहीतरी चांगलें सांगायचं आहे. ते तो ऐकेल कां? त्याच्या सर्व क्षमता त्याने वापराव्यात, वाचन वाढवावं, सगळं जग पुस्तकातूसुध्दा बघावं असं त्याला पटवुन दयायचं आहे.
आम्हा बाप-लेकाचे खटके उडतात आणि तो रागात मला काही बोलतो. तर मीही अजाणतेपणे माझ्या वडिलांना असंच बोलून गेलो होतो आणि माझ्या बाबांना त्याचं वाईट वाटले असेल, हे मला आता उमजतंय.
एकदा मी आणि रमा आपापल्या कामांसाठी घराबाहेर होतो. रिशानची आजी (डॉ.मंगल)आजारी होती. आम्ही घरी आलो आणि आश्चर्यचकीत झालो. आजीला त्रास होउ नये म्हणून रिशानने अक्षरशः पोळया आणि बाकी स्वयंपाक स्वतः केला होता. बेडवर झोपलेल्या आजीला वस्तू कुठे आहेत, कशानंतर काय करायचं, असं विचारत त्याने स्वयंपाक केला होता. त्याची ही संवेदनशीलता आणि समजदारी नक्कीच महत्वाची आहे. आजीवर त्याचा जीव आहे. आजी आजारी असली की, तिला गरम पाण्यात पाय शेकायला सांगणार, हातपाय चेपून देणार असा त्याचा सेवाभाव. वाटतं की रिशान असाच चांगला माणूस रहावा. समाजातल्या ताकदवान प्रवाहात तो भलतीकडेच वहावत जाउ नये.
आम्ही येरवडा आणि इतर कारागृहांमध्ये मोफत कायदासहाय्यता, कैदयांची सुटका झाल्यावर त्यांना काम मिळवून देण्यासाठी मदत करायचो. नव-याचा खून केल्याबद्दल अटक झालेल्या एका बाईला जामिनावर सोडवल्यावर तिनेही काम मागितलं. आपण कुणाला नेहमीसाठी गुन्हेगार समजू नये, प्रत्येकावर विश्वास ठेवावा इत्यादी सांगणं सोपं असतं. कारण तिला आमच्या घरी काम द्यायचं नाही यावर माझी आई, रमाची आई व इतर ठाम होते. लहानग्या रिशानला घरी तिच्यासोबत कसे ठेवायचं, हा मुद्दा होता. पण आम्ही तिला रिशानला सांभाळायचं काम दिलं. ती 2 वर्षे आमच्यासोबत होती. माझा मदतनीस संजय जाधव आमच्या घरातलाच सदस्य. हा रिशानचा संजयकाका. त्याला मी थोडं जरी ओरडून बोललो तरी रिशान माझ्याशी अबोला धरायचा. संजयकाकाला सॉरी म्हण, असं सांगायचा. मला वाटतं, रिशानचा स्वभाव संजयसारखा सेवाभावी व्हावा. रिशानवर परिणाम करणारी अशी अनेक माणसं आहेत. अशा अनेक छान लोकांसोबत तो मोठा झाला आहे.
पुस्तकं वाचून पालकत्व निभावता येत नाही. उलट पुस्तकी पालकत्वामुळे नैसर्गिक वागणं गायब होउ शकतं. जीवनानुभवातून आपलं मूल माणूस म्हणून घडवणं आणि त्याला पाठींबा देणं हे इतर गोष्टींपेक्षा महत्वाचं.

प्रवास पालकत्वाचा: मानवी हक्क विश्लेषक अॅड.असीम सरोदे
  मेघना धर्मेश

#Parenting #नवीउमेद

Tuesday, 8 August 2017

मुलांवर आपल्या भाषेचं, धर्माचे बंधन नको

प्रवास पालकत्वाचा: मुमताज शेख
“मुलांवर आपल्या भाषेचं, धर्माचे बंधन नको हे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं”, १८ वर्षाच्या मुस्कानची आणि १० वर्षांच्या कबीरची आई आणि गेली १७ वर्षे कोरो नावाच्या सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या मुमताज शेख सांगत होत्या. मुमताजचं स्वतःचं आयुष्य संघर्षमय राहिलं आहे. या संघर्षाच्या काळात कोरो या संस्थेचे सुजाता खांडेकर, महेंद्र रोकडे आणि पती राहुल गवारे प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत राहिल्याचं मुमताज सांगतात. पारंपरिक वळणाच्या गरीब मुसलमान कुटुंबात जन्म, भावाच्या जन्मानंतर वडील सोडून गेल्याने एकट्या आईसोबत राहताना हालअपेष्टांमध्ये पडलेली भर, शाळा नववीतच सुटलेली, पहिलं लग्न लवकर होऊन साडेसोळाव्या वर्षीच मुस्कानचा जन्म. लग्न झाल्याझाल्या सुरू झालेला छळ, दरम्यान वस्तीत काम करणाऱ्या कोरो संस्थेशी झालेली ओळख, आत्मभान...असा प्रवास. मुसलमान स्त्रीला स्वतःहून तलाक मागता येत नाही. मुमताजने प्रयत्नांती मिळवलेल्या घटस्फोटानंतर आईनेही आसरा नाकारला. मुस्कान होती अवघी ६ वर्षांची. प्रत्येक क्षणी आईच्या पाठीशी उभं राहणार्‍या मुस्कानसाठी हा मोठाच धक्का होता. ''मला जे बालपण मिळालं नाही, ते माझ्या मुलीला मिळावं यासाठी माझी सगळी धडपड सुरू होती. तिचीच अशी अवस्था होण्याने मी खचून गेले.'' मुमताज सांगतात. मुमताजला पुन्हा माणसात आणलं, राहुल गवारे यांनी. मुस्कानचे आणि राहुलचे बंध मुस्कान अडीच वर्षांची असल्यापासूनचे.'' हे बंध इतके दृढ आहेत की आजही मुस्कान तिची प्रत्येक गोष्ट माझ्यापेक्षा राहुलकडे जास्त शेअर करते.'' मुमताज सांगतात. पहिल्या वाईट अनुभवामुळे पुन्हा लग्न करण्याबाबत मुमताज साशंक होत्या. त्यावेळी मुस्काननेच आईला बळ देत ''राहुल के साथ शादी कर ले, अपने साथ रहेगा'', असं सांगत पुढाकार घेतला. मुमताजप्रमाणे राहुलही कोरोमध्येच घडले असून कष्ट करतच मोठे झाले आहेत. त्यामुळे धर्म वेगळा असला तरी दोघांमध्ये अनेक सामायिक गोष्टी होत्या.
लग्नाबाबत राहुलच्या घरातून नाराजी होती. पण कबीरच्या जन्मानंतर परिस्थिती पालटली. कबीरचं नामकरण बौद्ध पद्धतीने झालं. कबीरला राहुल यांच्या घरातून मराठी बोलण्याचा आग्रह व्हायचा. तो मराठी येत असूनही मुद्दामच त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायचा. पण या गोष्टी आम्ही ज्याच्यात्याच्यावर सोपवल्या आहेत. त्यात मध्ये पडत नाही, मुमताज सांगतात.
''मुस्कानने स्वतःहून तिचं नाव बदलेपर्यंत आठवीपर्यंत शाळेत तिचं पूर्वीचेच नाव होतं. त्यामुळे शाळेत तिघांची वेगवेगळी नावं असल्याबद्दल गोंधळ उडायचा. धर्माबद्दल प्रश्न विचारले जायचे. त्यावेळी आम्ही सांगायचो की आम्हाला कोणत्याच धर्माचा उल्लेख करायचा नाही. तुम्हीही त्याचा आग्रह धरू नका. कबीरच्या वेळीही प्रश्न उपस्थित व्हायचे पण तेव्हा कबीरनेच एकदा उत्तर दिलं होतं की मेरी मम्मी कहती है की हम इन्सान है. मुमताज सांगतात. ''दोन्ही मुलांना सगळे सण आवडतात. कठीण काळात मी आणि मुस्कान भाड्याने एका घरात राहत होतो. घरमालक आणि आजूबाजूची वस्तीही मुस्लिम होती. तेव्हा सात-आठ वर्षांच्या मुस्कानने घरी गणपती बसवण्याचा आग्रह धरला. मला खूप धाकधूक वाटत होती. कारण माझ्या लहानपणी मी रांगोळी जरी काढायला घेतली तरी नजरा बदलायच्या. पण मुस्कानने गणपती बसवला. आमच्या गैरहजेरीत मुस्कानने सांगितल्याप्रमाणे शेजार्‍यांनीही देवापुढे दिवा अखंड तेवत ठेवला.''
मुस्कान आणि कबीर दोघेही खूप समजूतदार आहेत. कबीर स्पायडरमॅनचा चाहता आहे पण तो कधी त्यासाठी हट्ट करत नाही. टीव्हीच्या बाबतीत सोडलं तर मुलं बाकी सगळ्या गोष्टीत ऐकतात. कबीरला कार्टून्स बघायला आवडतात. तेव्हा प्रश्न विचारून त्याला योग्यायोग्यतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुमताज सांगतात. अर्धवट माहिती मिळाल्यामुळे नुकसान होतं त्यामुळे पालकांनी मुलांच्या टीव्ही, इंटरनेट वापराबाबत सजग राहाणं, मुमताज यांना आवश्यक वाटते.
पालक म्हणून मुलांची बरीचशी जबाबदारी राहुलने पेलली आहे. मुस्कानही कबीरला सांभाळते, त्याचा अभ्यास घेते. याखेरीज आपल्या मामी आणि प्रणाली या मदतनीस मुलीचाही त्या आवर्जून उल्लेख करतात. मुमताज,राहुल करत असलेलं मुस्कान,कबीर यांचं पालकत्व असं अनोखं आहे.
वंचित घटकातल्या मुलामुलींना अगदी घरापासून बाहेरच्या जगापर्यंत अनेक अडचणींना, आव्हानांना सामोरे जावं लागतं. त्यांना विश्वास, आपुलकी देणार्‍या, कायम सोबत करणार्‍या सपोर्ट सिस्टिमची गरज असते, जी कोरोच्या रूपाने आपल्याला मिळाली. इतरांनाही ती मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुमताज सांगतात.
- शब्दांकन: सोनाली काकडे

Tuesday, 1 August 2017

पालकत्व जास्तीत जास्त आनंददायी कसं होईल


मी आणि माझा नवरा तुषार, दोघंही गडचिरोलीत आदिवासी क्षेत्रात, डॉ. अभय आणि डॉ राणी बंग यांच्या सर्च संस्थेत १९९३ पासून कार्यरत आहोत. आपल्या मुलांना कसं वाढवायचं याबाबतीत आम्हाला काहीच स्पष्टता नव्हती. आमच्या मुली तन्वी आणि गुंजन यांच्यासोबत जगतानाच पालकत्वाचा उलगडा होत गेला. संस्थेची मूल्य, गांधी विचारसरणीची दिशा यामुळे रोज प्रार्थना, नियमित श्रमदान, खेळण्यासाठी सुविधा, मुलांसाठी समृद्ध वाचनालय असं मुलांसाठी संस्कारात्मक खाद्य आजूबाजूला उपलब्ध होतं. तुषारची अतिशय सकारात्मक दृष्टी आणि साथ होतीच.
मुलींनी डॉक्टर किंवा आमच्यासारखंच सामाजिक कार्यकर्ता व्हावं का, यावर चर्चा व्हायची. मोठ्या मुलीने इंजिनिअरिंग निवडलं. मुंबईला VIT ला Biomedical Engineering ला प्रवेश घेतला. कुवतीच्या पलीकडे जाऊन आम्ही तिच्या इच्छेचा मान राखला. पण तिच्यासाठी ते शिक्षण कठीण गेलं. गडचिरोलीसारख्या गावातून मुंबईत जाऊन शिकताना, जुळवून घेताना ती स्वत:ला हरवून बसली. सहा महिन्यानंतर घरी परतली तेव्हा विचलित मनस्थिती आणि तब्येत ढासळलेली. मला हे सोडायचं आहे, म्हणून ढसा ढसा रडली. आम्ही हादरलो. लोक काय म्हणतील, झालेला खर्च आणि आता पुढे काय करायचं? मग आम्ही दोघांनीही ठरवलं, की तिने शिक्षण enjoy करायला हवं. पर्यायांचा विचार करताना BSC Nutrition करायचं तिने ठरवलं. नातेवाईक, मित्र यांच्याकडून बोलणी खाऊनही आम्ही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो.
लक्षात आलं की आपलं मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. विरोध न करता समतोल सांभाळून शांतपणे त्यांचं ऐकणं, संवाद साधणं, अजिबात रिॲक्ट न होता समजावणं, पुढील दिशा दाखविणं मी शिकले. यात तुषारच माझा गुरु होता. ज्या मुंबईत ती काही वर्षांपूर्वी adjust झाली नव्हती, तिथेच ती आता BSc अंतिम वर्षात शिकत आहे.
एकदा मुलींसोबत सायकल रिक्षा केली. मी रिक्षावाल्यासोबत भाव करू लागले. माझी 9 वर्षाची मुलगी म्हणाली, आई, त्या काकांचं, त्यांच्या मुलांचं त्या रिक्क्षामुळे पोट भरतेय. तू कशाला घासाघीस करतेस? त्या क्षणी माझीच मला लाज वाटली. आपली पोर किती संवेदनशील आहे याचा प्रत्ययही आला.
माझी 80 वर्षाची आई माझ्याकडे असायची. (अलिकडेच ती गेली.) म्हातारं माणूस - सतत सूचना, चौकशा. मी वैतागून जायचे. कधी कधी त्याचा स्फोट व्हायचा. एकदा माझी धाकटी मुलगी गुंजी शांतपणे म्हणाली, “आई, तू नानीवर का ओरडतेस? पुढे तू म्हातारी झाल्यावर मी अशीच ओरडले, तर तुला आवडेल का?” मी विचारात पडले. पालक म्हणून कोणी कोणाला शिकवलं? कळत नकळत असं मुलं आपल्याला शिकवत असतात. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग मी मुलींकडूनच शिकले.
मी कामानिमीत्त दौ-यावर असण्याच्या काळात मुलींना भावनिक असुरक्षितता जाणवायची. वहीत “आई, लवकल ये” लिहिणं. माझ्या ओढण्या, साड्या घेऊन झोपणं. का? तर आई तुझा सुगंध आम्हांला येतो, तू आमच्याजवळच आहेस, असं वाटतं. त्या काळात तुषार रोज मुलींना कुशीत घेऊन झोपायचा. छान सांभाळायचा.
सुटीच्या दिवशी मात्र मुलींसाठी पूर्ण वेळ द्यायचा, हे ठरलेलं. जंगलात ट्रेकला जाणं, तिथे काड्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक करणं, प्रवासात गाणी म्हणणं, कविता रचणं वगैरे. साधी घरची गाडी दुरुस्त करायलाही तुषार मुलींना घेऊन बसायचा, गाडीच्या पार्टची ओळख करून द्यायचा. मुलींसोबत बसून तासंतास गप्पा मारायचा. आज कदाचित त्यामुळे मुलींनाही माझ्यापेक्षा आपल्या बाबाच्या कुशीत जास्त सुरक्षित वाटतं. रोज झोपण्याच्या आधी त्यांना काहीतरी वाचून झोपायची सवय लागली ती अजूनही आहेच.
त्यांच्या दहावी-बारावीचा ताण आम्हालाही होताच. मी या काळात दोन वर्ष बिनपगारी रजा घेऊन मुलींसोबत नागपूरला शिफ्ट झाले. पूर्ण वेळ त्यांच्यासोबत राहता आल्याचा मला, मुलींना बराच फायदा झाला. आम्हा दोन पिढ्यांतलं अंतर कमी करणं साधता आलं. पालकत्व जास्तीत जास्त आनंददायी कसं होईल तेच आम्ही बघत आलो आणि बघू. हा प्रवास अविरत सुरूच आहे.
 प्रवास पालकत्वाचा – सुनंदा खोरगडे


Sunday, 30 July 2017

मुलांना कसं वाढवायचं, कसं शिकवायचं


मुलांना कसं वाढवायचं, कसं शिकवायचं वगैरे प्रश्नच गैरलागू होते. मुळात मी आई होण्याचा चान्सच घेणार नाही, असं माझ्यासकट मला ओळखणाऱ्याना वाटत होतं. पण, एकदा नाही, दोनदा आई झाले. दोन्ही वेळेला आम्हा दोघांसाठी हा अनुभव प्रचंड आनंदाचा, बरंच काही शिकवणारा होता.
आनंदाची सुरुवात प्रेग्नंट असल्यापासून झाली. पहिल्या वेळी मला वैद्यकीय कारणांमुळे नोकरी सोडून पूर्ण वेळ घरी बसावं लागलं. हा मोठा बदल होता आयुष्यातला. डेस्कवर नाइट शिफ्ट करून, सतत नवनवीन माणसांना भेटणारं काम सोडून घरी बसणं काहीसं कंटाळवाणं होतं. पण, बाळाशी बोलण्याचा छंद जडला... जो आजही कायम आहे. आम्ही तिघी खूप बोलतो. या दोघींना तर कधीकधी - गप्पं बसा गं बायांनो, असं सांगावं लागतं. आम्हा दोघांनाही चांगले सिनेमे, पुस्तकं, गाणी यांची आवड. त्यामुळे घरी असण्याचा काळ मस्त सत्कारणी लागला. खूप सिनेमे पाहिले, पुस्तकं वाचली, गाणी ऐकली... धमाल केली.
किमया आमच्या जगात, आमच्या घरात आल्यानंतर गोष्टी बदलल्या. तिच्या खाण्यापिण्यापासून तिने काय, कसं शिकावं याचा अभ्यास सुरू झाला. अभ्यास पुस्तकं, संस्कारवर्ग पद्धतीचा नव्हता. हे बाळ मोठं झाल्यानंतर आपल्याला सगळ्याच गोष्टींमध्ये कंपनी देणार आहे, मग तिने कसं असायला हवं, हे नकळतपणे ठरत होतं. सुदैवाने, आमची दोघांची मतं याबाबतीतही बर्‍याच अंशी जुळतात. दोन्ही मुलींना लहानपणापासून आम्ही खूप गाणी ऐकवली, चित्रांची पुस्तकं दिली, रंगही अगदी लहान असल्यापासून त्यांच्या खेळण्याचा भाग आहेत. दोघींना अनेक ब्लॅक ऍण्ड व्हाईट जमान्यातील गाणीही माहीत आहेत.
किमया लहान असल्यापासून घरी आम्ही दोघीच असायचो. तिचा बाबा रात्री बराच उशीरा यायचा. तिच्यामध्ये, कसा कोण जाणे, पण अगदी लहान वयातच समजुतदारपणा आला. छोट्याशा किमयाला चटईवर खेळण्यांच्या मध्ये ठेवून मी तिला दिसत राहीन अशा पद्धतीने सगळी कामं करायचे. आणि ही छान खेळत रहायची.
पण, आमची किमू किती शहाणी आहे, हे मला ज्या प्रसंगातून कळलं तो माझ्यासाठी सुखद धक्का होता. किमया अडीच वर्षांची असताना मी दुसर्‍यांदा प्रेग्नंट राहिले. ही पहिली मुलगी. लाडाकोडाची. आम्ही दोघी एका लग्नाला गेलो होतो. तिथून परतताना किमया प्रचंड दमली होती. तिला उचलून घेण्यावाचून पर्याय नव्हता. हे नवर्‍याला कळल्यावर त्याला जरा काळजी वाटली. त्याने एका रात्री तिला छान जवळ घेऊन समजावलं, आईच्या पोटात आता छोटं बाळ आहे. काही काळानंतर ते बाळ तुझ्यासोबत असेल. पण, आईला आता त्रास द्यायचा नाही, तिची काळजी घ्यायची, तिला उचलून घ्यायला नको सांगू. मी घेईन तुला उचलून वगैरे...
आता हे लिहितानाही डोळ्यांत पाणी येतं... या अडीच वर्षांच्या मुलीने पुन्हा मला कधी उचलून घ्यायला सांगितलं नाही. तिला खरंच ते सगळं कळलं होतं. कधीकधी तिच्या बालपणावर अन्याय करतोय का, या जाणीवेने मलाच वाईट वाटत रहायचं. पण, ही रोज आपण बाळाला पण गाणी ऐकवू म्हणून तिच्यासोबत मलाही सतत वेगवेगळी गाणी म्हणायला लावायची.
काही महिन्यांनी आमचं दुसरं पात्र आलं. हे एक वेगळंच रसायन आहे. जन्माला आल्याबरोबर रडून हॉस्पिटल जागं करणारी अनया बाबाच्या हातात आली आणि क्षणात शांत झाली. त्या क्षणाला मी निर्धास्त झाले. दोन मुलं आपण छान वाढवू शकू, हा कॉन्फिडन्स नव्याने आला. ही मुलगी किमयाच्या अगदी विरुद्ध स्वभावाची. अगदी लहान वयापासून तिची ठाम मतं आहेत. किमयाचा आज्ञाधारकपणा आणि अनयाचा बंडखोरपणा अशा दोन दगडांवर आमची पालक म्हणून कसरत सुरू असते.
मध्यतंरी मिरारोडच्या शाळेत एका लहान मुलीवर लैंगिक अत्याचार झाले. या घटनेने मी हादरून गेले. मुलींना फार न घाबरवता अशा प्रसंगांची कल्पना देणं फार गरजेचं होतं. मग, त्यांच्यासाठी नवनव्या गोष्टी रचल्या. काही दिवसांनी इमारतीतल्या एका ओळखीच्या इसमाने सांगितलं, “आपकी अनया बहोत स्मार्ट है। मैंने पूछा बाइक पे घुमा के लाता हूं तो उसने कहा नही, मम्माने कहा है किसी के साथ नहीं जाना और मुझे बहोत जोरसे चिल्लाना भी आता है।“
भविष्यात काही बरंवाईट होणं, न होणं आपल्या हातात नाही. पण, मुलींना काही शिकवण्याची जबाबदारी योग्य दिशेने चालली आहे, असं त्या क्षणाला नक्की वाटलं.
आम्हा दोघांमध्ये व्यवस्थापन हा गुण नाही. वेळ, पैसा, कामं अशा अनेक बाबतीत आम्ही काहीसे बेशिस्त आहोत. त्याचे फटकेही बसतात. पण, हे मुलींमध्ये येऊ न देणं, ही मला जबाबदारी वाटते. त्यामुळे, त्यांच्या बाबाला मी जाच करते, असं वाटत असलं तरी मी त्यांच्यासाठीचं वेळापत्रक आखते, त्यांनी आठवडाभरात काय खायला हवं वगैरे ठरवते. अजून तरी त्या दोघी हे वेळापत्रक फॉलो करतात, हे माझं नशिबच म्हणायचं. या वेळापत्रकात आमचा तिघींचा एकत्र नाचण्याचा, शिळोप्याच्या गप्पा मारण्याचा, गोष्टी सांगण्याचा वेळ माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे.
त्यांच्यासोबत वय विसरून नाचताना खरंच अनेक गोष्टींचा विसर पडतो. कदाचित त्यातून ही आपल्यासोबत नाचणारी आपली आई आपल्यासारखीच आहे, आपली मैत्रिण आहे, ही भावना मी त्यांच्यात रुजवू शकेन
प्रवास पालकत्वाचा: अमिता दरेकर

स्वतःचं एक मूल जन्माला घालून दुसरं दत्तक घ्यायचं


लग्नाआधीच आम्ही सहजीवन, एकमेकांच्या सवयी, स्वभाव, मुलं याविषयी चर्चा केली होती. तेव्हाच हर्षदानं एक मूल दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. मलासुद्धा ही कल्पना आवडली. स्वतःचं एक मूल जन्माला घालून दुसरं दत्तक घ्यायचं, असं लग्नाआधीच ठरवून टाकलं आम्ही. जे मूल होईल त्याच्या भिन्नलिंगी मूल दत्तक घ्यायचं, म्हणजे मुलगा आणि मुलगी दोघांना वाढवल्याचा समान आनंद घेता येईल, हेही नक्की केलं.
लग्नानंतर दोन वर्षांतच मनस्वीच्या संगोपनात आम्ही गुंतलो. पहिली मुलगी असल्यामुळे तिचं कौतुक, तिच्याबरोबर पालक म्हणून रोज नव्याने शिकणं! हर्षदानं तिच्यासाठी नोकरीतून काही काळ विश्रांती घेतली होती. `जे जे उत्तम उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते` तिला दाखवण्याचा आग्रह होता. त्यातलं चांगलं-वाईट तिनं ठरवावं, असं वाटत होतं.
दोन मुलांमध्ये तीन-चार वर्षांचं अंतर असावं म्हणून मनस्वी तीन वर्षांची झाल्यावर दत्तक मुलासाठी प्रयत्न सुरू केले. `श्रीवत्स` संस्थेत नाव नोंदवलं. दत्तक प्रक्रिया लगेच पूर्ण होणार नव्हती. मुलांची संख्या कमी आणि दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांची संख्या जास्त, असं व्यस्त प्रमाण सध्या असल्याची माहितीही मिळाली. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होऊन बाळ ताब्यात मिळायला दोन वर्षं गेली. हा काळ कसोटीचा होता. दोन मुलांमध्ये तीन-चार वर्षांचं अंतर असावं, हा विचारही कोलमडून पडला होता. मनस्वी पाच वर्षांची झाल्यानंतर निमिष घरी आला.
मनस्वीला नवीन बाळ आल्याची उत्सुकता आणि तोवर घरात तिचंच राज्य असल्यामुळे आपल्या आनंदातला वाटेकरी आल्याची भावनाही होती. घरी कुणी मोठं माणूस नव्हतं. हर्षदा पुन्हा नोकरी करू लागली होती. निमिषला सांभाळण्यासाठी आम्ही बाई ठेवली. काही प्रमाणात ती मुलगा-मुलगी भेद करणारी होती, हे उशिराने लक्षात आलं. तोपर्यंत तिच्याकडून निमिषचे लाड आणि मनस्वीकडे कळत-नकळत दुर्लक्ष झालं होतं. त्या काळात मनस्वी थोडी बिथरलीही होती. आम्ही आवर्जून तिच्यासाठी वेळ देऊन तिला समजावण्याचा, समजून घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही घरच्या आईवडिलांची आमच्या निर्णयाला आधी पसंती नव्हती, पण नंतर आमचं प्रेम बघून त्यांचा विरोध मावळला. आता त्यांनीही नातंवडांना आपलंसं केलं आहे.
दत्तक घेतलेल्या मुलांना मोठेपणी अचानक धक्का नको, म्हणून लहानपणापासूनच त्यांच्या जन्माबद्दलची जाणीव हळूहळू द्यावी, याची कल्पना होतीच. संस्थेनेही तसं मार्गदर्शन केलं होतं. त्यामुळे निमिषला लहानपणापासूनच देवकी, कृष्ण आणि यशोदाच्या गोष्टी सांगितल्या. `श्रीवत्स`मध्ये जाऊन दरवर्षी आम्ही त्याचा वाढदिवसही साजरा करतो. त्याला वेगळेपणाची जाणीव होणार नाही, याची काळजी घेण्याची कसरतही कधीकधी करावी लागते.
जगताना कायम आजूबाजूच्या समाजाचं, त्यांच्या आर्थिक परिस्थितीचं भान बाळगावं, हे आम्ही मुलांना पहिल्यापासून शिकवलं. अन्न टाकू नये, निष्कारण उधळपट्टी करू नये, हे वेगवेगळ्या माध्यमांतून शिकवलं. मुलांना स्वतंत्र व्यक्ती म्हणून स्थान देण्याचा पहिल्यापासूनच प्रयत्न केला.
आता मनस्वी बारा वर्षांची झाल्यानंतर तिचे विचार, स्वभाव, व्यक्तिमत्त्व पुन्हा वेगळ्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करावा लागत आहे. काही मुद्दयांवरून तिच्याशी खटके उडायला लागल्यानंतर तिला कुठलीही गोष्ट थेट करायला न सांगता आपोआप समजेल, अशा पद्धतीने पोचवण्यावर आमचा भर असतो. पुढच्या आयुष्यातही तिचं करिअर तिनं निवडावं, आम्ही फक्त मार्गदर्शकाच्या स्वरूपात असावं, अशीच आमची भूमिका आहे. पालक म्हणून शिकण्याची ही प्रक्रिया निरंतर सुरूच राहणार आहे.

प्रवास पालकत्वाचा : हर्षदा आणि अभिजित पेंढारकर

Thursday, 13 July 2017

''प्रेम आणि काळजी घेणारं माणूस भेटलं की माणसाच्या आयुष्यात बदल घडतो'


१९७८-७९ चा काळ. मुंबईतल्या वर्सोव्यात एका चाळीतल्या गुजराती कुटुंबात बाळ जन्माला आलं. शेजारचं मराठी कुटुंब गुजराती कुटुंबाचा भाग असल्यासारखं. मराठी कुटुंबातली एक कॉलेजकन्या त्या बाळाला खेळवत असे. एकदा, खेळवताना बाळ वेगळं वाटतंय, अशी शंका तिला आली. तिने ते स्वतःच्या डॉक्टर ताईच्या लक्षात आणून दिलं. तपासणीत बाळ मतिमंद असल्याचं निघालं. त्या कुटुंबासाठी तो मोठा धक्का होता. पुढे, ते कुटुंब बाळाकडे लक्ष देईनासं झालं. कॉलेजकन्येला ते जाणवलं. तिने बाळाच्या आईला विचारलंदेखील, ''भाभी, असं का वागताय एवढ्या गोड मुलाशी ?'' त्या कुटुंबानं त्यांना ते मूल नको असल्याचं सांगितलं. मुलीनं क्षणात उत्तर दिलं ''तुम्हाला तो नको आहे, तर मी त्याला सांभाळेन. त्याला दत्तक घेईन.'' ती बाळाला तडक घरी घेऊन आली. विशेष म्हणजे, तिच्या वडिलांनाही याचं कौतुकच वाटलं. काही दिवसांनी मुलीच्या कुटुंबियांच्या समजावण्यावरून त्या गुजराती कुटुंबात परिवर्तन घडलं आणि ते त्या मुलाला परत घरी घेऊन गेले. कॉलेजकन्येने मुलाकडे लक्ष देणं सुरूच ठेवलं. पुढे त्या मुलामध्ये सुधारणाही झाली.
ही कॉलेजकन्या म्हणजे उत्कर्षा लाड-मल्ल्या. अंधेरीतल्या भवन्स महाविद्यालयाच्या अलिकडेच निवृत्त झालेल्या उपप्राचार्या. शंभरहून अधिक मुलामुलींना सर्वतोपरी मदत करत त्यांचं पालकत्व निभावणार्याा आणि प्रसिद्धीपासून दूर राहणार्या . त्यांचे पती विजय मल्ल्या यांचीही त्यांना मोलाची साथ आहे.
उत्कर्षा सांगतात ''आई शशिकला आणि वडील मनोहर लाड दोघेही सुधारणावादी. राष्ट्र सेवा दलातले. त्यामुळे मानवतावाद आम्हा पाच बहिणींमध्ये आपोआपच रुजला. वडिलांना आमच्या लग्नांपेक्षा आम्ही आर्थिक दृष्ट्या सक्षम होणं, महत्वाचं वाटायचं.” आई-वडिलांचाच वारसा उत्कर्षा पुढे चालवत आहेत.
''मातृत्व, पालकपण यासाठी विवाह, नवरा, स्वतःचीच मुलं असणं आवश्यक आहे, असं नाही. आपल्यामध्ये आंतरिक प्रेम, दयाभाव असला की दुसर्यां ची दुःख समजतात. मदत करावीशी वाटते,” त्या सांगतात. अंध विद्यार्थ्यांना परिक्षांसाठी लेखनिक, वाचक मिळत नसल्याची खंत महाविद्यालयात पाहुण्या म्हणून आलेल्या, अंध विद्यार्थांसाठी स्नेहांकिता संस्था चालवणार्याय परिमला भट यांनी व्यक्त केली. तेव्हा उत्कर्षा यांनी भवन्समध्ये सेंटर सुरू करून मुलामुलींना या कामासाठी प्रेरित केलं. वर्षभरातच अंध विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या लेखनिकांची संख्या ३०-४० वरून ७०-७५ वर पोचली. या आपल्या लेखनिक-वाचक मुलांचं उत्कर्षामॅडमना अपार कौतुक वाटतं. स्नेहाकिंत आणि इतर अनेक संस्थाचा त्या आधार बनल्या आहेत.
परिक्षांच्या वेळी अपंग मुलांची सोय करणं हे शाळा- महाविद्यालयांना आव्हानात्मक वाटणारं काम उत्कर्षामॅडमच्या संवेदनशीलतेमुळे आणि पुढाकाराने साध्य झालं. सहकारी शिक्षकांच्या अपंग विद्यार्थ्यांविषयीच्या मनोभूमिकेत बदल घडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
परिस्थितीमुळे गांजलेल्या कितीतरी मुलामुलींना, त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय, आर्थिक मदत देत, नैराश्यातून बाहेर काढत त्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवण्याचं काम उत्कर्षामॅडमने केलं आहे.
''प्रेम आणि काळजी घेणारं माणूस भेटलं की माणसाच्या आयुष्यात बदल घडतो'', उत्कर्षा सांगतात. त्या स्वतः हे जगल्या आहेत. जगत आहेत.
प्रवास पालकत्वाचा : उत्कर्षा लाड - मल्ल्या
शब्दांकन: सोनाली काकडे

Wednesday, 12 July 2017

स्पेशल केअर फॉर सिनिअर सिटिझन्स





‘‘79 वर्षांच्या आजी फक्त एका आठवड्यातच ईमेल लिहायला शिकल्या. हे बघितलं आणि ज्यांना तंत्रज्ञानात रस आहे, त्यांना ते शिकवायला आम्ही सुरुवात केली’’, वृद्धाश्रमासाठी काम करणारी नेहा खरे सांगत होती. “स्पेशल केअर फॉर सिनिअर सिटिझन्स या मुंबईतल्या संस्थेत 2006 मध्ये मी नोकरी स्वीकारली. आता हे सेंटर मला घराइतकंच प्रिय आहे. इथे मला वृद्धांची मानसिकता समजू लागली. यांचा दिनक्रम म्हणजे सकाळचं आवरून टीव्ही बघायचा, दिवसभर नुसतं बसून राहायचं. कधी स्टाफविषयी तक्रारी तर कधी रूममेटविषयी. लहान मुलांसारखं वागणं. जाणवलं की त्यांची एनर्जी चांगल्या ठिकाणी कामी यायला हवी, त्यांचं मनही रमावं. त्यांच्या संगतीतच उपक्रम सुचत गेले,” नेहा सांगते.
मुलांप्रमाणेच वृद्धांनाही काळजीपूर्वक जपण्याची गरज असते. त्यामुळे हे पालकत्वच असतं. आम्ही ज्येष्ठ नागरिकांची फक्त व्यवस्था लावत नाही; तर त्यांना काही क्रिएटिव केल्याचा आनंद मिळत राहील, हे बघतो. या वयात खूप बोलण्याची, शेअरिंगची आवश्यकता असते. नेमकं, रिकामा वेळ हातात असलेली मंडळी आजूबाजूला नसतात. आम्ही उपाय शोधला. ज्यांना संस्थेत काही वेळ येऊन काम करायचं आहे, अशांना, विशेषत: विद्यार्थ्यांना आम्ही बोलावतो. दुपारची वेळ गप्पांमध्ये छान जाते आणि या ज्येष्ठांचा बाहेरच्या जगाशी, घडामोडींशी संपर्कही राहातो. घरात सगळ्या वयोगटाच्या व्यक्ती असल्या की परिपूर्णता वाटते, तशी इथेही राखण्याचा हा प्रयत्न. आठवड्यातून एकदा भेटायला येणाऱ्या छोट्या मित्र-मैत्रिणींची ते वाटच बघत असतात. गप्पांना चांगलं वळण लागतं नि त्यांची आयुष्याबद्दलची कुरकूर कुठल्याकुठे निघून जाते.
ते हसतेखेळते राहावेत यासाठी प्रयत्न करत असताना कळलं, की त्यांना पाळीव प्राणी आवडतात. प्राण्यांच्या संगतीत वेळ चांगला जातो. दुखणी विसरायला, लवकर बरं व्हायलाही मदत होते. मग पाळीव प्राणी बाळगणार्‍या आणि आमच्या सेंटरसाठी काही करू इच्छिणार्‍यांना आठवड्यातून एक संध्याकाळ त्यांच्या पेटसह यायला सांगितलं. ही पेट थेरपी चांगली लागू पडली आहे.
शरीर हेल्दी राहाणं सगळीकडे बघितलं जातं पण मन हेल्दी राहणं अधिक महत्त्वाचं. वृद्धांना अनुभवी असल्याचा मान देताना आपण विसरतो की ते मनानं नाजूक होत असतात. संस्थेत राहाण्यासाठी त्यांच्या मनाची तयारी नसतेच. एका मुलाने आपल्या आईला - घरी रंगकाम काढलंय, त्याचा त्रास नको - हे कारण सांगून इथे आणलं. खरं तर कायमसाठीच पाठवलं होतं. वृद्ध आईला वास्तव कळल्यावर नैराश्याचा मोठा झटका आला. म्हणूनच अपत्यांनी खरेपणानं व्यवहार केला पाहिजे, असं मी ठासून सांगते. त्यांची सहवासाची भूक भागण्यासाठी एका खोलीत दोघा-तिघांनी राहाणं, रूममेट्सची अदलाबदल, एकाचे नातेवाईक आले की इतरांनाही त्यांच्याशी गप्पा मारणं असं चालतं.
संस्थेत प्रत्येक सण-उत्सव, सगळेसगळे डेज् साजरे होतात. आपण मुख्य समाजापासून दूर राहात आहोत, अशी भावना यामुळे त्यांच्या मनात राहात नाही. उत्सवाची सजावट त्यांच्यासह सगळे मिळून करतो. रंगकाम आणि रांगोळी त्यांना आवडते. एरवी कॅरम, पत्ते, संगीत, टीव्ही, लायब्ररी. नाश्त्यातही पाणीपुरी, पावभाजी असे बदल. यामुळे कंटाळा हा शब्द इथे नाही.
आज घराघरात वृद्धांची वाढती संख्या, त्यांना सांभाळण्याचा बिकट प्रश्न, हे आहेच. तरी आनंद टिकवण्याचे काही छोटे उपाय करून आपण त्यांचं जगणं सुसह्य करू शकतो. त्यांची कोणती कौशल्यं शाबूत आहेत, हे लक्षात घेऊन त्यांना ती वापरण्यासाठी आपण मदत केली पाहिजे.
प्रवास पालकत्वाचा: नेहा खरे, इनचार्ज, काउन्सेलर,

शब्दांकन: सुलेखा नलिनी नागेश, वर्षा जोशी-आठवले
#नवीउमेद #Patenting #वृद्धांचंपालकत्व

Wednesday, 21 June 2017

एपिलेप्सीग्रस्तांचं पालकत्व अनोखं


स्वतःच्या मुलांचं पालकत्व सगळेच करतात. यशोदा वाकणकर करत असलेलं एपिलेप्सीग्रस्तांचं पालकत्व अनोखं आहे. वयाच्या सातव्या वर्षापासून 23 वर्ष एपिलेप्सीचा आजार घेऊन जगलेल्या यशोदाला तिचे आई-बाप अनिल आणि सुनंदा अवचट यांनी सर्वसामान्य मुलीसारखंच वागवलं. तेच सूत्र यशोदाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या कामाचं आहे. ब्रेन सर्जरीनंतर तिचा आजार बरा झाला. पण एकदा फिट येणार्‍या दोन जुळ्या मुलांच्या वडिलांना पैशाअभावी औषधं न घेता परत जाताना यशोदाने पाहिलं. संवेदना फौंडेशन, पुणे या Epilepsy अर्थात फेफरे, फिट्स, अपस्मार, मिरगी या नावाने प्रचलित असणाऱ्या आजाराच्या उपचारार्थ काम करणार्‍या संस्थेच्या जन्माचं हे कारण ठरलं. सुरवातीला वृत्तपत्रात एक निवेदन प्रसिद्ध करून सुरू केलेलं हे काम आता फेसबुकद्वारे सर्वदूर पसरत आहे.
Epilepsy म्हणजे काय? मेंदूद्वारे चालणार्‍या संदेशवहनात येणारा तात्कालिक किंवा दीर्घ अडथळा वा बिघाड. हा आजार औषधं, पथ्य, नियमित उपचाराने नियंत्रणात राहतो, बराही होतो. भारताच्या लोकसंख्येच्या प्रमाणात 1% एवढं प्रमाण असणाऱ्या या आजाराचं नेमकं कारण अजून स्पष्ट नाही. जगभरातले वैद्यकीय तज्ञ, मेंदूतज्ञ, सरकारं, आरोग्य विभाग त्याचा शोध घेत आहेत.
एपिलेप्सी झालेल्या व्यक्तीला औषधोपचारासोबत प्रेमळ संवाद, मायेचा स्पर्श, सोबत याचीही गरज असते. एपिलेप्सीबाबत बरेच अपसमज आहेत. ते दूर करण्यासाठी ‘संवेदना’ सपोर्ट ग्रुप तयार करत आहे. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद इथे हे काम सुरू आहे. एपिलेप्सीग्रस्तांना उपचारखर्च, शिक्षण, नोकरी मिळावी यासाठी ‘संवेदना’द्वारे जागृती केली जाते. अनेक मेंदूतज्ञही यासाठी गावोगावी प्रयत्नशील आहेत. त्यांच्यामार्फत आजारी व्यक्तींना ‘संवेदना’ची हेल्पलाइनही मिळते.
मोहन फाटक यांच्या मुलाला मिरगीचा बारीकसा आजार होता. मुलासाठी वधुसंशोधन करताना त्यांना हे लपवायचं नव्हतं. या अनुभवातूनच एपिलेप्सी आजार झालेल्यांचं वधू-वर मंडळ सुरू करण्याची कल्पना निघाली. यशोदाचं म्हणणं असं की, मतिमंद म्हणून फिट्स येत असतील अशांच्या लग्नाचा विचार करू नये. पण एरवी नॉर्मल आणि क्वचित फिट येणार्‍यांना, त्यांच्या पालकांना अशा समुपदेशनाने आधार मिळवून देता येतो. वैद्यकीय सल्ल्याने आजारग्रस्तांच्या सर्व अवस्था नीट पार पाडता येतात. 2008 साली ‘संवेदना’ने भरवलेला एपिलेप्सी वधू-वर मेळावा भारतातला पहिलाच ठरला. त्यानंतर आयोजलेल्या चारही वधू-वर मेळाव्यांना भारतभरातून प्रतिसाद मिळाला. संस्थेने आजवर असे २५ विवाह जमवले. ती जोडपी सुखाने संसार करत आहेत आणि त्यांना नॉर्मल बाळंसुद्धा आहेत. “एकमेकांना समजून घेत उभे राहिलेले यांचे संसार बघण्यात मोठं समाधान आहे,” यशोदा सांगते.
राधिका देशपांडे यांच्या मुलीला हा आजार तीव्र स्वरूपात होता. मुलगी बरी झाल्यावर त्यांनी ‘संवेदना’सोबत कामाला वाहून घेतलं. मोहन फाटकांसह रवींद्र बापट, सुवर्णा मोडक, रामकृष्ण बोकील हेही झोकून देऊन काम करतात. यशोदाचे बाबा अनिल अवचट, पती पराग वाकणकर हे दोघं कामामागे भक्कमपणे उभे आहेत.
‘संवेदना’च्या शेअरिंग मिटिंग्ज महत्वाच्या असतात. लोक स्वतःबद्दल, स्वतःच्या आजाराबद्दल बोलून खूप मोकळे होतात. त्यांचा ताण, न्यूनगंड कमी होतो.
दर बुधवारी संध्याकाळी 5 ते 7 दरम्यान निवारा वृद्धाश्रम, नवी पेठ, पुणे इथे एपिलेप्सी समुपदेशन, एपिलेप्सी वधू-वर नोंदणी, आणि एपिलेप्सीसाह जगणाऱ्या गरजू व्यक्तींसाठी ‘संवेदना’ची औषध मदत योजना सेवा उपलब्ध आहे.
अधिक माहिती व संपर्कासाठी - 9822008035, 9850887644
प्रवास पालकत्वाचा – यशोदा वाकणकर
www.snavedana.org
- गीतांजली रणशूर, पुणे

Sunday, 18 June 2017

आजची पिढी आशादायक वाटते

दुस-याचं मूल पाच मिनिटं घेऊन, कौतुक करून लग्गेच आईवडिलांकडे देता येतं. पण स्वतःच्या मुलाची जबाबदारी घ्यायची वेळ आल्यावर मनावर ताण आला होता. समीरनंतर पाच वर्षांनी परितोषचा जन्म झाला आणि मला माझ्या घरात स्वर्ग अवतरल्यासारखं वाटू लागलं. एका मुलाचं कसं जमेल अशी भीती वाटणारी मी चक्क दोन मुलांची आई बनले होते. ह्या दोघांना वाढवताना, नव्हे त्यांच्यासोबत वाढतानाच्या, पालकत्वाच्या प्रवासात मीही समृद्ध झाले.
‘अभ्यास करा’ म्हणून मुलांच्या मागे लागले नाही, तेही जाणीवपूर्वकच. कारण त्यांनी ‘रॅट रेस’मध्ये सामील व्हावं असं मला वाटत नव्हतं. पाचवी-सहावीत पहिल्या पाचात नंबर आला नाही तर काय मोठंसं आकाश कोसळतं? मी त्यांना यथेच्छ बागडू दिलं, खेळू दिलं. दुपारच्या वेळेस घरात क्रिकेटचा डाव मांडून त्यांनी भिंतीवर छान खड्डा करून ठेवला, मी हौसेनं आणलेल्या काचेच्या फुलदाणीचे पाच मिनिटांतच बॉल मारून तुकडे केले. मी सदैव त्यांच्या जागी लहानपणच्या ‘मला’ पाहिलं. 







माझी स्टेट बॅंकेत नोकरी असली तरी पतींनी नुकताच सुरू केलेला बिझिनेस होता. कधीकधी तर पैशांची बोंब असायची. तरीही बिनपैशांच्या किंवा कमी पैशांत होतील अशा पुष्कळ गोष्टी मुलांसाठी केल्या. पोहणं, सायकलिंग, क्रिकेट, त्यांना घेऊन जमेल तिथं फिरायला जाणं, लहान मुलांची नाटकं दाखवणं. आम्ही आईबाप म्हणजे दोन मोठी भावंडं आणि आमची दोन मुलं म्हणजे धाकटी भावंडं असंच आमच्या घरातलं वातावरण होतं.

२००७ साली माझ्या पतींचं कर्करोगामुळे निधन झालं. या मोठ्या दुःखाच्या प्रसंगातून आम्ही तिघं एकमेकांच्या साथीनं सावरलो. 
 आज समीर आणि परितोष दोघंही सीए आहेत. समीर सीएचा अभ्यास करतानाच जर्मन भाषा शिकला. जर्मन भाषा त्याची पॅशन असल्यामुळे त्यानं मोठ्या पगाराची नोकरी सोडून ठाणे येथे जर्मन आणि फ्रेंच शिकवणा-या संस्थेत भागीदारी स्वीकारली. हा निर्णय घेताना माझा त्याला पूर्ण पाठींबा होता. मुलांना त्यांच्या मनाप्रमाणे निर्णय घेऊ द्यावेत. त्यामुळे मुलं अधिक जबाबदार बनतात. मुख्य म्हणजे अमुक करायला मिळालं नाही म्हणून पालकांना दोष देत नाहीत.
मला आजची पिढी आशादायक वाटते. कालचं उगाळत बसू नये, उगाचच १९८२ साली असं होतं आणि तसं होतं असं म्हणत बसू नये. मुलं नवी नवी गाणी इंटरनेटवरून शोधून लावतात. मला ती खूप आवडतात. खरोखरच, तरूणांच्या संगतीत राहायला मिळणं ह्यापरतं स्वतःही मनानं तरूण राहाण्यासाठी दुसरं काय हवं असतं?
प्रवास पालकत्वाचा - सविता दामले, अनुवादक

Sunday, 4 June 2017

ही आमच्या दोघींसाठीची लढाई


काल अकरा वर्षांच्या सानियाने, मी डॉक्टरकडे गेल्यावर घरकामाची बाई सुट्टीवर आहे, म्हणून घर साफ केलं. भांडी घासली. कपडे घडी करून कपाटात ठेवले. मी परतल्यावर, मला लिंबू सरबतही दिलं. माझे डोळे पाणावले. मागची आठ वर्षं आठवली. 
माझा एकल पालकत्वाचा प्रवास - ही आमच्या दोघींसाठीची लढाई आहे. सानिया दोन वर्षांची झाल्यावर आम्ही तिच्या बाबाचं घर सोडून आई-पपांकडे आलो. त्यानंतर संकटांची मालिकाच सुरू झाली. माझा रूमाटाइड आर्थरायटिस, अंथरूण धरणं, कोर्टात केसेस. सानिया माझ्या जगण्याचा आधार बनली.
अडीच वर्षांची माझी मुलगी, मला झोपवायला माझ्या कपाळावर हात ठेवून बोबडी गाणी गायची. मला लाज वाटायची. मी इतकी हतबल की ऑफिसला आणि ट्रीटमेंटला जाण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हते. माझे आई-वडील मग तिला जयसिंगपूरला घेऊन गेले. मी दर आठवड्याला शनि-रवि तिला भेटायला जायचे. असं वर्षभर चाललं. त्याच दरम्यान माझी आई गेल्यावर माझे वडील आणि सानिया पुन्हा मुंबईत आले. ती शाळेत जायला लागली. लांबवर कुठे भांडणं ऎकली, तरी घाबरून दारामागे लपणं, ना कुणामध्ये मिसळणं, बोलणं – अशी तिची स्थिती. तिची नर्सरी टीचर म्हणायची- हिची ‘टच मी नॉट पॉलिसी’ आहे. 
ज्युनियर केजीला दुसऱ्या शाळेत गेल्यावर तिला इंग्लिशमध्ये एक मार्क मिळाला. मला शाळेतून बोलावणं आलं. “ही बोलत नाही, लांब लांब असते, मार्कपण कमी. तिचे वडील कुठे आहेत?” आमच्या डिव्होर्सची गोष्ट सांगितल्यावर त्या टीचरनी तिला आपल्या बाजूला बसवून घ्यायला सुरूवात केली. तरीही शाळेत रुळायला सानियाला खूप वेळ लागला. ती पहिलीत असताना तिचं सगळं जग असलेल्या माझ्या वडिलांना पॅरलिसीस झाला. त्यांना बघायचं की सानियाला - असा प्रश्न होता. त्यांना केअर सेंटरमध्ये ठेवलं. मी नोकरी सोडली. घरूनच ट्रान्सलेशनची कामं करायला लागले. आम्ही दर आठवड्याला त्यांना भेटायला जायचो. वर्षभरात तेही गेले. 

सानिया आणखीच घाबरायला लागली. अमूक झालं तर काय, तमूक झालं तर काय - असं तिला वाटू लागलं. शाळेतून आल्यावर लोळत टीव्ही बघायचा किंवा चित्र काढत बसायचं, हेच करू लागली. ती बारीक कधीच नव्हती. आता अजिबातच हालचाल नाही, सतत टीव्ही बघणं याची मला काळजी वाटत होती. माझे एक भावोजी मुंबईत जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून बदली होऊन आले होते. त्यांनी सुचवल्यानुसार तिसरीत गेल्यावर तिला रिदमिक जिम्नॅस्टिक्सला घातलं. आठवड्यातून तीन दिवस. शिवाजी पार्कला. साधं चक्रासन घालायलाही घाबरणारी सानिया हळूहळू जिम्नॅस्टिक्सच्या ट्रिक्स शिकत गेली. त्याच वेळी, डायना नावाच्या शिक्षिकेने सानियाला खूप जीव लावला. सानिया पूर्णपणे बदलली. 
आता ती सर्वांशी बोलते, सर्वांमध्ये मिसळते, खेळते, घर आवरते, सुंदर चित्रं काढते. वर्षभरापासून ती रिदमिक जिम्नॅस्टिक्सच्या ऍडव्हान्स बॅचला जातेय. वर्षा उपाध्ये, सदिच्छा कुलकर्णी आणि बाकीच्या कोचेसनी तिला खूप चांगलं वळण लावलं, शिकवलं. तिला हा खेळ आवडतो. शिवाजी पार्कचा क्लास सुटला की ती स्वतःहून वजन कमी करण्यासाठी धावते. स्वतःच्या खाण्यावर नीट लक्ष ठेवते. तिच्या जेवणाचे लाड कधीही केले गेले नाहीत. जे असेल ते खायचं हेच पाळलं गेलं. खाण्याची शौकीन असल्यामुळे तिलाही ते चांगलं जमलं. सध्या ती ड्रॉइंगच्या एलिमेंटरी परीक्षेची तयारी करतेय. जिम्नॅस्टिक्सच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत तिला सिल्व्हर मेडलही मिळालंय. हा खेळ महागडा आहे. त्याची आर्थिक टोकं जुळवताना माझी दमछाक होते. तिला रोज क्लासला नेऊन तिथे दोन तास बसावं लागतं.
तिच्याकडे एक अशी गोष्ट असावी, जी तिला कायम साथ करेल, ते म्हणजे चांगलं आरोग्य आणि सोबत तिची इच्छा असेल तर एक चांगलं करियर म्हणून सगळी धावपळ मी करतेय.
सानिया मोठी झाल्यावर पुढे काय करायचं, हाही एक मोठा प्रश्न माझ्यासमोर उभा राहणार आहे. त्यामुळे आई-वडील-आजी-आजोबा-भावंड या सगळ्या भूमिकांमध्ये तिच्यासाठी जगताना काही गोष्टी स्वतःसाठीही मी करतेय. त्याही प्रत्यक्षात उतरतील असं वाटतं
.
प्रवास पालकत्वाचा : कोमल कुंभार

Sunday, 14 May 2017

मी जिंकणारच..”

“आम्ही फक्त किडनी, ह्रदय किंवा कर्करोग - अर्थात ज्यामुळे मरण येईल, अशाच आजारांसाठी - आर्थिक मदत करतो. त्यामुळे तुम्हाला मदत करू शकत नाही. – मदतीच्या अपेक्षेत असताना हे वाक्य कानावर आलं आणि अपूर्वाचा जन्मापासूनचा प्रवास आठवला. जी व्यक्ती यंत्राशिवाय ऐकू - बोलू शकत नाही तिचं जगणं म्हणजे मरणच नाही का?” भाग्यश्री पाटील यांचा सवाल अस्वस्थ करणारा. 
अपूर्वा ही नाशिकच्या भाग्यश्री पाटील यांची गोड लेक. जन्मतःच कर्णबधीरत्व, ह्रदयाला छिद्र. चिमुकल्या देहाने अवघ्या ११ वर्षात अपेंडीक्स आणि ऐकू येण्यासाठी केलेल्या शस्त्रक्रिया सोसलेल्या. अपूर्वा पाच वर्षांची होती. आंतरराष्ट्रीय नेमबाज अंजली भागवत हिच्या हातातलं पिस्तुल पाहून तिच्या मनात कुतूहल जागं झालं. आज तिने राष्ट्रीय स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याचा टप्पा गाठला आहे. 

जन्माने आणि परिस्थितीने दिलेल्या प्रतिकूलतेवर जिद्द आणि चिकाटीने मात करत अपूर्वा नेमबाजीप्रशिक्षण पूर्ण करत आहे. भाग्यश्री सांगतात, “अपूर्वा विशेष मुलगी असल्याने सुरूवातीपासूनच सासरच्या मंडळीनी तिला चांगली वागणूक दिली नाही. दुसर्याल अपत्याचा विचार कर, असा सल्ला नातेवाईक देत राहिले. अपूर्वासाठी एवढा मोठा वैद्यकीय खर्च कशासाठी करायचा, हा नातलगांच्या नजरेतला टोकदार प्रश्न घायाळ करायचा. शाळेतही, ती विशेष मुलगी असल्याने होणारी हेळसांड पाहता तिला भोसला शिशु विहारमध्ये घातलं. याच काळात तिला सहज ऐकता यावं, यासाठी श्रवणयंत्र बसविण्याची शस्त्रक्रिया झाली. ऎकू येण्यातले अडथळे कमी झाले. शिक्षकांच्या प्रोत्साहनामुळे शिकण्याची, जिंकण्याची, काही करण्याची ऊर्मी निर्माण झाली. नकळत्या वयात अपूर्वाला लेखनाचा छंदही जडला. तिची नेमबाजी शिकण्याची ओढ पाहून सातपूर क्लब हाऊसच्या मोनाली गोर्हे यांना प्रशिक्षणासाठी विचारलं. त्यांनी अपूर्वाला विनामूल्य शिकवायचं ठरवलं. मोनाली यांचे प्रयत्न, डॉ. घाटगे यांचं मार्गदर्शन, यामुळे अपूर्वा विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करू लागली. तिला चार सुवर्ण पदकांसह अनेक सन्मान मिळाले आहेत.”
अपूर्वा म्हणते, “मला ऑलिंपिकमधल्या अपंगासाठी असलेल्या स्पर्धेत भारताचं प्रतिनिधीत्व करायचं आहे. माझं आजारपण निभावताना आई-बाबांची दमछाक होते, हे समजतं मला. पण त्यांचे कष्ट मला प्रेरणा देतात. आणि मला विश्वास आहे - मी जिंकणारच..”
भाग्यश्री सांगतात, “अपूर्वा खूपच समजुतदार आहे. तिचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी मी केवळ भार वाहणारी आहे. मात्र, त्यासाठी आमच्या आर्थिक विवंचना संपल्या पाहिजेत.”
अपूर्वाच्या उपचारांवरच्या खर्चासाठी सुरूवातीला काही सामाजिक संघटनांनी, नातेवाईकांनी मदत केली. पण नंतर अनेकांनी पाठ फिरवली. वर्षाकाठी ५० ते ६० हजार रु उपचारांनाच लागतात. त्याखेरीज नेमबाजीप्रशिक्षण, पोहणं आणि अन्य उपक्रम असतात. खर्च कुठून करायचा?
अशाही स्थितीत अपूर्वा जून महिन्यात होणार्‍या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्याचं प्रतिनिधित्व करणार आहे. त्यासाठी सर्व निकषांवर ती पात्र ठरली आहे. फक्त स्वतःचं पिस्तुल या एका गोष्टीसाठी अडलं आहे. सध्या भाग्यश्री पाटील या खर्चासाठी पैसे उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत.
प्रवास पालकत्वाचा – भाग्यश्री पाटील