Friday 1 September 2017

‘माई’चा शिक्षणाचा मार्ग झाला खुला!


रायगड जिल्ह्यातील रोहा. इथल्या संतोषनगरमध्ये जिल्हा परिषद शाळा आहे. याच भागात 2016 च्या डिसेंबर महिन्यात वाघमारे कुटुंब राहायला आलं. आई- वडिल, तीन मुली आणि एक मुलगा असं कुटुंब. आदिवासी कातकरी समाजातील हे कुटुंब संतोषनगरच्या परिसरात छोटीशी झोपडी टाकून राहू लागलं. आणि लवकरच रूळलं. कारण इथं कातकरी समाजाची भरपूर वस्ती आहे.
किसन वाघमारे आणि त्यांच्या पत्नी शेतावर मजुरीला जाऊ लागल्या. नवं कुटुंब गावात आलं आहे. पण त्यातील मुलं शाळेत येत नाहीत, हे शाळेचे शिक्षक गजानन जाधव सरांनी हेरलं. त्यांनी मुख्याध्यापिका अपर्णा कुलकर्णी मॅडमसह झोपडीवर जाऊन वाघमारे पती-पत्नींची भेट घेतली.
वाघमारे कुटुंबाने शिक्षकांचे स्वागत केलं. आठ वर्षांचे माई आणि करण शाळेत का येत नाहीत, या प्रश्नाला गरिबीमुळे आमच्या घरातील कोणीच कधीच शाळेत गेलेले नाही, इतकंच उत्तर पालकांनी दिलं

मुलांनी शाळेत आलंच पाहिजे, हा त्यांचा हक्क आहे. मुला-मुलींना मोफत शिक्षण आहे. पाठ्यपुस्तकेही मोफत मिळतात आणि माध्यान्ह भोजन योजनाही आहे. शिवाय आदिवासी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही मिळते, हे शिक्षकांनी सांगितलं. शिक्षकांचं बोलणं ऐकून पालकांनी माई आणि करणला डिसेंबरमध्येच शाळेत दाखल केलं.
पण पहिल्या दहा दिवसातच माईने शाळेला दांडी मारली. जाधव सरांनी ‘आजारी असेल’ असा विचार करून दुर्लक्ष केलं. पण 2017 साल उगविलं तरी माई काही शाळेत येईना. तेव्हा अस्वस्थ झालेल्या जाधव सरांनी पुन्हा कुलकर्णी मॅडमसोबत वाघमारेंची झोपडी गाठली.
लहानगी माई मळलेला गणवेष घालून बहिणींना खेळवत बसली होती. “का गं, माई शाळेत का येत नाहीस?” असे सरांनी विचारताच, “येऊशी वाटते, पन आवशी न्हाय बोलते.” असं उत्तर त्या चिमुरडीने दिलं. “माईला शाळेत का पाठवत नाही?” विचारल्यावर तिची आई म्हणाली, “बाई, तुमच्या सांगन्यावरून साळंला पाठिवलं एक डाव. पर आता मलाबी कामासाठी भाईर जावं लागतंय. माईबी साळंला आली तर ल्हान्ग्या दोगींना कोन सांबाळणार? मला कामाला जावंच लागतंया बगा. न्हायतर खायाचं काय? पोरीच्या जातीला काय करायचंय सिकशान? पोराला पाठीवतीय की साळंला!!”
हे ऐकून कुलकर्णी मॅडमनी मुलग्यांसोबत मुलींचं शिक्षण गरजेचं आहे, हे समजावून सांगितलं. मुलगी ही मुलग्यापेक्षा कुठेच कमी नसते. शिक्षण घेतलं तर नोकरीही मिळेल. शिवाय पाचवीपर्यंतचा माईचा वह्या, पेन-पेन्सिलीचा, कपड्यांचा खर्च, हा सगळा वरखर्च मी स्वत: उचलेन, असं वचन कुलकर्णी मॅडमनी दिलं.
दुसरीकडे लहानग्या बहिणींचा प्रश्न सोडविण्याची जबाबदारी जाधव सरांनी घेतली. संतोषनगरच्या शाळेत अंगणवाडी नाही, मात्र तरीही माईच्या दोघा बहिणींना सांभाळण्याची ग्वाही सरांनी दिली.
आता माई आणि करण दररोज शाळेला येतात. त्यांच्या लहानग्या बहिणी तिच्या वर्गाजवळच एका सतरंजीवर दिवसभर खेळतात. तिथंच त्यांना माध्यान्ह भोजन योजनेतून दुपारचं जेवण आणि मधल्या वेळेला बिस्किटं मिळतात. आता माईच्या चेहऱ्यावरचं अकाली मोठेपण दूर होऊन ती हळूहळू तिच्या वयाच्या मुलांमधे मिसळून खेळू लागली आहे. 


लेखन: छाया वर्तक.

1 comment: