Showing posts with label Thane. Show all posts
Showing posts with label Thane. Show all posts

Wednesday, 9 May 2018

देहदानाच्या जागृतीसाठी वाहून घेतलेले जोशीकाका

“मृतदेह नाशवंत होण्याआधी जर तो कोणाच्या कामी येत असेल, तर कित्येक लोकांना त्याचा फायदा होतो. अवयवदानामुळे मरणासन्न लोकांना जीवनप्राप्ती होते तर देहदानामुळे पुढील पिढीतल्या डॉक्टर्सना अभ्यासाकरता मदत होते. म्हणजे दोन्ही दानांमधून समाजाला आपण मदत करतो”, जोशीकाका सांगतात. पूर्वी डोंबिवलीला आणि सध्या ठाण्यात राहणारे ७७ वर्षांचे विनायक जोशी. स्टेट बँकेतून निवृत्त झालेल्या जोशीकाकांनी अवयवदान आणि देहदानाच्या जागृतीसाठी स्वतःला वाहून घेतलं आहे. जोशींसह समविचारी व्यक्ती डोंबिवलीत एकत्र आल्या. त्यांनी 1987 मध्ये दधिची देहदान मंडळाची स्थापना केली. 15 ज्येष्ठ नागरिकांची कार्यकारिणी संस्थेचं काम पाहते. संस्थेचे सभासद आहेत चार हजार. आतापर्यंत संस्थेच्या ८०० सभासदांनी देहदान केलं आहे.
कर्णोपकर्णी माहिती कळलेले लोक संस्थेशी किंवा जोशीकाकांशी संपर्क साधतात. मग याविषयीच्या कायदेशीर आणि इतर प्रक्रियेची माहिती ते देतात. कार्यशाळांतून या माहितीचा प्रसार करण्यात येतो. सर्व सभासदांना त्यांच्या वाढदिवसापूर्वी शुभेच्छापत्र पाठवून संस्था त्यांच्या संपर्कात राहते. संस्थेचं त्रैमासिक आहे. यात कायदेशीर माहितीसोबत, डॉक्टरांचे लेख, एखाद्या सभासदाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या नातेवाईकांनी त्यांच्या इच्छेचा मान राखत देहदान केलं असल्यास याची माहिती या त्रैमासिकात असते.
जोशीकाकांना एकच खंत वाटते ती म्हणजे, बऱ्याचदा मृत व्यक्तीने देहदानाविषयी अर्ज भरल्याची माहिती नातेवाईकांना नसते. किंवा माहिती असल्यासही ते गैरसमजुतीमुळे देहदान न करता पारंपरिक अंत्यसंस्कार करतात. काही नातेवाईक सभासदाच्या मृत्यूविषयी संस्थेला कळवत नाहीत.
देहदानअर्जाची प्रक्रिया सोपी आहे. अर्जावर दोन साक्षीदारांच्या सह्या लागतात. यातील किमान एकजण रक्ताचा नातेवाईक असावा लागतो. अर्जदाराचे 2 फोटो, नाव, पत्ता आणि फोन नंबर याची माहिती दिल्यावर आपल्याला एक नोंदणी क्रमांक दिला जातो. ठाणे विभागातील अर्जांची नोंद कळवा हॉस्पिटलमध्ये तर मुंबईतल्या अर्जांची नोंद जे.जे. हॉस्पिटलमध्ये करण्यात येते.
दधिची संस्थेसोबतच विनायक जोशी द फेडरेशन ऑफ ऑरगन अँड बॉडी डोनेशन, बँक कर्मचारी मित्र मंडळ, ज्येष्ठ नागरिक संघ, विवाहपूर्व समुपदेशन, मसाप डोंबिवली, कोमसाप अत्रे सांस्कृतिक कट्टा अशा विविध संस्थांशी जोडलेले आहेत.

-साधना तिप्पनाकजे.

Monday, 26 March 2018

१३ गृहिणींचा ‘टुगेदरनेस’

ठाण्यातल्या गृहिणी उज्ज्वला बागवाडे यांनी बीडमध्ये नागरगोजे दाम्पत्यानं ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या शांतिवन संस्थेला भेट दिली. तिथल्या दोन दिवसांच्या मुक्कामात उज्ज्वलाताईंना जाणवलं की संस्थेला अन्नधान्याची मोठीच चणचण आहे. ठाण्यातल्या मैत्रिणींशी या संदर्भात गप्पा मारतामारता धान्यबँकेची कल्पना सुचली आणि २ डिसेंबर २०१५ ला १३ मैत्रिणींनी मिळून We Together ग्रुप ची स्थापना झाली. ठाणे आणि कर्जतमधल्या या सख्यांनी प्रत्येकी चार सदस्य जोडत जोडत साखळी पद्धतीनं बँक विस्तारली. आज या बँकेचे सदस्य आहेत ४५०. शांतीवनासोबत श्रद्धा फाउंडेशन आणि सेवाश्रम या संस्थांनाही धान्यबँक मदत करते. आतापर्यंत धान्य बँकेने १६ हजार किलोपेक्षा जास्त धान्य संस्थांना पोहचवलं आहे. किमान ५ महिन्यांच्या अन्नधान्याची गरज यातून पूर्ण होत आहे. अन्नधान्याच्या गरजेची कायम काळजी घेतली जाईल हा विश्वास हा ग्रुप संस्थांना देतो. 
          
 धान्यबॅंके सदस्य प्रत्येकी एक किलो धान्य आणि जमल्यास स्वयंपाकाकरिता लागणारं इतर जिन्नस देतात. ज्यांना धान्य देता येणं जमत नाही, त्यांच्याकरता रोख रकमेचा पर्याय ठेवला आहे. जमा झालेल्या रकमेचंही धान्यच विकत घेऊन दिलं जातं. किमान ५० रुपये किंवा १ किलो धान्य अशी आखणी आहे. त्यामुळे सर्व थरातील लोकांना यात सहभागी होता येतं. उज्ज्वलाताईंच्या सोसायटीत घरकाम करणाऱ्या २ मैत्रिणीही या साखळीत आहेत. सभासदांना संस्थांकडून देणगीची पावती दिली जाते. दर तिमाहीतून एकदा या बँकेत धान्य आणि रोख रक्कम जमा करायची असते. साधारण आठवडाभराचा अवधी दिला जातो. मुख्य सभासद आपल्या साखळीतील लोकांना डिपॉझीट करण्याचा कालावधी कळवते. 
जमा झालेलं सर्व धान्य कर्जतच्या श्रद्धा फाऊंडेशनला दिलं जातं. जमा झालेल्या रक्कमेतून घाऊक बाजारातून संस्थांच्या गरजेनुसार धान्य, साबण आणि इतर जिन्नस खरेदी केले जातात. जमा रक्कमेतील 40 टक्के रक्कमेचं सामान श्रद्धा फाऊंडेशनला दिलं जातं. श्रद्धा फाऊंडेशनची गाडी येऊन त्यांचं सामान घेऊन जाते. शांतीवनाकरता अहमदनगरच्या एका होलसेल व्यापाऱ्याकडून सामानाची खरेदी करण्यात येते. शांतीवनाच्या वाट्याची 60 टक्के रक्कम किती आहे, हे त्यांना कळवण्यात येतं. त्या रकमेचं सामान संस्था आणते आणि मग धान्यबँक सामानाचे पैसे भरते .
दर महिन्याच्या तिसऱ्या शुक्रवारी ‘We Together’ च्या तेरा जणी जमतात आणि बँक आणखी सक्षम कशी होईल यावर चर्चा करतात. उज्ज्वलाताई सांगतात, आपण फक्त गृहिणी आहोत. आपल्याला काही करता येणार नाही असा विचार कोणीही करू नये. गृहिणींच्याच पुढाकारामुळे या साखळीशी माणसं जोडली जात आहेत आणि कित्येकांच्या भुकेची सोय होत आहे. गेल्या दोन वर्षात कितीतरी गृहिणींना आपणही समाजासाठी काहीतरी करू शकतो, हा आत्मविश्वास या साखळीमुळे आला आहे.

-साधना तिप्पनाकजे.

Wednesday, 10 January 2018

घरकुल: बर्वे पतीपत्नींच्या जगण्याचा विस्तार

घरात मूल जन्माला येणं किती आनंदाचं असतं. ते मूल सुदृढ, निरोगी असेल, हे गृहीत धरून आपण स्वप्न बघत असतो, बाळाच्या जन्माची तयारी करत असतो. आपलं मूल मतिमंद आहे, असं जेव्हा नंदिनी आणि अविनाश बर्वे यांना कळलं, तेव्हा काय झालं असेल त्यांना? नंदिनी यांनी लिहिलंय, की जीवन संपवूनच टाकावंसं वाटलं त्यांना. पण जीवन संपवून टाकणं सोपं नसतं. मतिमंद कौस्तुभसह जगणंही सोपं नव्हतंच. बर्वे दांपत्याने या व्यक्तिगत प्रश्नाचा व्यापक विचार केला. आणि दिवंगत मेजर ग. कृ. काळे यांच्या प्रेरणेने, अनेक पालकांच्या मदतीने त्यांनी, त्यांच्या कौस्तुभसारख्या मुलांसाठी वसतिगृह उभारायचं ठरवलं. मतिमंद पाल्यांच्या पालकांनी एकत्र येऊन १९९१ साली अमेय पालक संघटना हा ट्रस्ट स्थापन केला. डोंबिवलीपासून ७-८ किलोमीटर अंतरावरच्या खोणी गावात सव्वा एकर जागा घेतली. इथेच १९९६ साली, घरकुल सुरू झालं. बर्वे पतीपत्नींचं जगणं थांबलं नाही, विस्तारलं.
मतिमंदत्व हे अपंगत्वाच्या अन्य प्रकारांपेक्षा वेगळ्या प्रकारचं आहे. अन्य अपंग मुलं शिक्षण, प्रशिक्षण, सहाय्य याद्वारे पुष्कळशी स्वावलंबी होऊ शकतात. ‘समजणं' ही प्रक्रियाच मतिमंदांच्या बाबतीत होत नसल्याने पालकांना कायमच यांची काळजी घ्यावी लागते. मतिमंदत्व तीव्र असलेल्यांचा तहहयात सांभाळ करणं भाग असतं. हे जाणून घरकुल वसतिगृह सुरू केलं गेलं. या घरकुलात जिव्हाळ्याचं घरपण किती आहे, ते तिथे भेट दिल्यावरच कळतं.
सध्या संस्थेत तीस मतिमंद आहेत. अगदी वीस ते साठ वयोगटातली. मुलांचा सांभाळ, अंघोळ घालणं, जेवूखाऊ घालणं, त्यांचं हगणंमुतणं असं सगळंच घरकुलातले कर्मचारी अगत्याने करतात. सामान्य माणसासारख आयुष्य या मतिमंदांना देण्याचा प्रयत्न करतात. खेळ, अभ्यास, चित्र काढणं, गाणं, नाटक हा इथल्या दिनक्रमाचा भाग आहे.. इथे सांभाळणार्‍यांबद्दल मुलांच्या मनात आदर आणि प्रेमाची भावना असते. संस्थेत काम करणाऱ्यांचं कौतुक करावं तेवढ कमीच.
इथल्या पाल्यांचा काही खर्च पालक उचलतात, तर बाकीचा खर्च संस्था करते. संस्था आर्थिक मदतीसाठी कोणत्याही बड्या व्यक्तीकडे जात नाही. आपले नातेवाईक, मित्रपरिवार अशा अनेक मार्गातून आर्थिक मदत मिळते. संस्थेत कुणी लहानमोठं नाही. इथे सगळे समान आहेत. ज्या व्यक्तीच्या मनात अशा कामाबद्दल सद्भावना असेल त्या सगळ्या व्यक्तींचं या संस्थेत स्वागत आहेच. शासनाच्या अनुदानाशिवाय हा उपक्रम उभा आहे कारण सुजाण, संवेदनशील हितचिंतक संस्थेस लाभले आहेत. घरकुलाच्या दोन दशकांच्या वाटचालीत ज्यांची ही समस्या नाही, असे अनेकजणही जोडले गेले.
घरकुल आतून बाहेरून प्रसन्न करणारं आहे. गवताची काडीसुद्धा नव्हती, त्या जागेवर आज शंभर वृक्ष आहेत. दोन मजली इमारत, बाग, पटांगण, मुलांसाठी प्रशस्त खोल्या, कार्यक्रमासाठी स्टेज असं सुविधासज्ज घरकुल. विविध भागातले लोक घरकुलला भेट दयायला येतात. कुणी वाढदिवसाला, कुणी मैत्री व्हावी म्हणून, तर कुणी आपल जीवन सार्थक करण्यासाठी जेष्ठ नागरिकांपासून कॉलेज विद्यार्थ्यांपर्यंत. जैन हॉस्पिटलचे डीन डॉ अविनाश, सुप्रसिद्ध अभिनेते दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे यांनीदेखील भेट दिली आहे. अलिकडेच लुब्रीझॉल कंपनीने संस्थेला 15 लाखांचा सौर ऊर्जा प्रकल्प व मुलांसाठी एक गाडी दिली.
लोकसंख्येमध्ये मतिमंदत्वाच्या प्रमाणाच्या मानाने निवासी वसतिगृहांची संख्या अत्यल्प आहे. तेव्हा अशा पालकांनी एकत्र येऊन परिसरातील अशा मुलांसाठी आपआपल्या विभागात काम करण्याची गरज आहे, असं बर्वे सांगतात.
- विजय भोईर.

Friday, 5 January 2018

इंग्लीश शिकणे गोडीचे

शहापूरच्या आदिवासी मुलींची यशकथा -
मुंबईजवळचं, तरीही दुर्गम डोंगराळ गाव. तिथली आदिवासी मुलंमुली. एवढं वाचल्यावर, काय चित्र येतं मनात? सोयीसुविधांचा अभाव, शिक्षक नाहीत, मुलांच्या शिक्षणात बरेच अडथळे...वगैरे. पण इथेच, एका शिक्षकाला दिसली संधी. हे शिक्षक इंग्रजी शिकवणारे. आदिवासी भागात इंग्लिश! मुळात आदिवासींची बोलीभाषा मराठी प्रमाणभाषेपेक्षा वेगळी. तिथे इंग्लिश कुठलं यायला? असं मनात येऊ शकतं. पण 2009 पासून शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रमशाळा शेणवे, ता. शहापूर, जि. ठाणे इथे शिकवणारे शरद पांढरे यांनी, बरंच काही घडवलंय. 8 वर्षांपूर्वी, या आश्रमशाळेत 300 मुली होत्या. आता, 568 मुली निवासी राहून शिक्षण घेत आहेत. इंग्लीश भाषा शिकणं त्यांच्यासाठी आनंदाचं झालं आहे, पांढरे सरांमुळेच. विद्यार्थिनींना इंग्रजी भाषा अवगत करणं सोपं व्हावं, यासाठी त्यांना भाषा जास्तीत जास्त ऎकवणं गरजेचं आहे, हे त्यांनी जाणलं. स्वतः शिकवलेले, वाचलेले पाठ स्मार्टफोनवर रेकॉर्ड करून त्यांनी मुलींना पुन्हा पुन्हा ऐकवले. मुलींच्या वारली, कातकरी, ठाकर व महादेव कोळी या बोलीभाषांचा वापर इंग्लीश शिकवताना केला. यामुळे मुलींना गोडी लागली. त्यांची श्रवण, वाचन, भाषण कौशल्यदेखील वृद्धिंगत झाली. ऑडिओ शब्दकोश, चित्ररूप कोश यांचा वापर मुली सहज करू लागल्या. शाळेत विद्यार्थिनींचे इंग्रजी आणि मराठी भाषा क्लब, स्पोकन इंग्लिश यासारखे अभ्यासक्रमही सुरु आहेत. ‘अ प्रोव्हर्ब अ डे’ या उपक्रमानेदेखील विद्यार्थिनींची शब्दसंपत्ती वाढवली.
आश्रमशाळेत, 2010 पासून, डिजिटल क्लासरूम साकारण्यात आली आहे. तिथे इ-लर्निंग सॉफ्टवेअर्स, पीपीटीज, व्हिडीओ, प्रेझेंटर वगैरेंचा नियोजनबद्ध वापर होतो. 2014-15 पासून 8 कॉम्प्युटर्स, इंटरनेट, वायफाय, 2 मोठे एलसीडी टीव्ही, स्मार्टबोर्ड, प्रोजेक्टर्स या सुविधांच्या मदतीने अध्यापन सुरू आहे. विद्यार्थिनीही आता या वस्तू स्वतः हाताळतात.
शिकण्याची गोडी निर्माण झाल्याने गळतीचं प्रमाण कमी होऊन मुलींच्या उपस्थितीचं प्रमाण वाढलं आहे. 8 वर्षांपूर्वी, शाळेचा 10 वी चा पट 23-24 असायचा. आत्ता, 10वीत 61 विद्यार्थिनी आहेत. 8 वर्षांपूर्वी, 12 वीत, 20 विद्यार्थिनी असायच्या. आता, 50ते 60 असतात. आदिवासी समाजामध्ये मुलींच्या शिक्षणाप्रती आस्था निर्माण करून संस्कारक्षम विदयार्थी घडविल्याबद्दल अपर आयुक्त, ठाणे यांच्या वतीने, 2016 सालचा पुरस्कार पांढरे सरांना मिळाला. उत्कृष्ट आश्रमशाळेचा पुरस्कारदेखील शाळेला मिळाला आहे.
पांढरे सर सांगतात, “आमच्या विद्यार्थिनींची स्वयंशिस्त, प्रामाणिकपणा, जिद्द, समायोजन वाखाणण्याजोगं आहे. कला, क्रीडा, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणार्‍या या मुली आहेत. समर्पित शिक्षक सहकार्‍यांमुळेच या मुलींची एवढी प्रगती होऊ शकली.”
शरद पांढरे २०१५ पासून 6वी,7वी , 9वी च्या इंग्रजी, मराठी व इतर माध्यमांच्या पुस्तकांच्या लेखनात सहभागी आहेत. राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान अणि ब्रिटीश कौन्सिल आयोजित व्हर्चुअल प्रशिक्षण उपक्रमात, ते मास्टर ट्रेनर आणि मेंटॉर म्हणून महाराष्ट्रातल्या इंग्रजी शिक्षकांना प्रशिक्षण देण्याचं कामही अनेक वर्षांपासून करत आहेत.


अजिता विश्वास.

Sunday, 19 November 2017

ही धडपड शिक्षण थांबू नये म्हणून!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
ठाण्यातील शहापूरच्या देसलेपाडा जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एकही विद्यार्थी शाळाबाह्य नाही आणि आदिवासी, कामगार वर्गातील मुले असूनही विद्यार्थी शाळेला नियमित येतात, हे या शाळेचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. पण शाळेच्या या परंपरेत 2016-2017 च्या शैक्षणिक वर्षात मात्र खंड पडला. शाळेत पाचवीत शिकणारा विद्यार्थी गणेश धानके दिवाळीनंतर शाळेत आलाच नाही. खरंतर या शाळेत कोणताच विद्यार्थी न सांगता शाळेला दांडी मारत नाही. मात्र गणेशच्या कुटुंबाकडून कसलाच निरोपही न आल्याने त्याच्या वर्गशिक्षिका मंगल डोईफोडे अस्वस्थ झाल्या. डोईफोडे मॅडमनी गणेशच्या वर्गमित्रांकडूनही माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र गणेश लांबच्या कादबाव पाड्यावरुन येत असल्याने नेमकी माहिती मिळेना. गणेशचे आई- वडील वीटभट्टी कामगार आहेत, ते त्याला दुसऱ्या गावी तर घेऊन गेले नसतील ना? अशी चिंता शिक्षिकांना वाटू लागली. त्यानुसार गावात चौकशी केली असता समजलं, की धानके कुटुंब खारबाव पाड्यावर वीटभट्टीच्या कामासाठी स्थलांतरित झालं आहे.
गणेश दुसऱ्या गावी गेलाय खरा, पण त्याचं शिक्षण चालू असेल का? हे पाहण्यासाठी त्याला खारबावला जाऊन भेटायचं असं त्यांनी ठरवलं. शिक्षिकांनी धानके कुटुंबाला खारबावला सोडणाऱ्या जीपचालकाला शोधून काढलं आणि गणेशकडे घेऊन जाण्याची विनंती केली. मात्र 75 किमी अंतरावरील खारबावला जाण्यासाठी जीपचालक अडीच हजार रुपये मागू लागला. भाड्याची ही रक्कम दोन्ही मॅडमच्या आवाक्याबाहेरची होती. शेवटी कशीबशी त्याची समजूत घालत तो दीडहजार रुपयांवर तयार झाला.
शेवटी एका दिवशी शाळा सुटल्यावर दोघी शिक्षिका प्रचंड खड्डे आणि धुळीने भरलेल्या रस्त्यावरून खारबावला पोहोचल्या. त्यांनी गाडी थेट वीटभट्टीकडे घ्यायला लावली. जीपचा आवाज ऐकताच वीटभट्टीजवळच्या झोपडीतून एक बाई कोण आलंय, ते पाहायला आली. ती होती गणेशची आई. तिनं शिक्षिकांना ओळखलं आणि हाका मारून झोपडीत बोलावलं.
मॅडमना पाणी देऊन गणेशच्या आई वडिलांनी इकडे कशा काय आलात, असं विचारलं. “आम्ही गणेशचीच चौकशी करण्यासाठी आलो आहोत. आहे कुठे गणेश? आणि तुम्ही काहीच न कळवता कसं काय खारबावला आलात?” अशी चौकशी डोईफोडे मॅडमनी केली. मॅडमना उत्तर देण्याआधी, गणा…अशी जोरदार हाक वडिलांनी मारली आणि मातीत खेळणारा गणेश हजर झाला. ” बाई, तुम्ही इकडं आलात?” दोन्ही मॅडमकडे पाहून गणेश खूपच खुष झाला.
गणेशच्या वडिलांनी उत्तर दिलं, “बाई, आमचं जिणं हे असं हातावरचं. कादबावमधलं काम संपलं बगा. मग कान्ट्रॅक्टर म्हन्तू तिकडं जावं लागतं, नवं वीटभट्टीचं काम इकडं खारबावला लागलं. पोटासाठी पोराबाळांना घेऊन इकडं यावं लागलं बगा. पन इतंबी गणाला साळंत घातलंया, काळजी करू नगा. तुमाला कळवायचं तेवढं राहूनच गेलं बगा, निगताना.” गणेशनेही पुस्ती जोडली. “बाई मी आता खारबावच्या जिल्हा परिषद शाळेत जातोय, पर आपल्या शाळेची खूप आठवण येते बघा.”
आपल्या विद्यार्थ्याने गाव सोडले असले तरी शिक्षण सोडले नाही, याचा शिक्षिकांना आनंद झाला. “गणेशला खूप- खूप शिकवा, त्याचे शिक्षण मधेच थांबवू नका. दुसऱ्या गावात जायची वेळ आली तर प्रसंगी ‘शिक्षण हमी कार्ड’ घ्या” असा सल्लाही त्यांनी गणेशच्या पालकांना दिला. 

 - स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Saturday, 12 August 2017

द पष्टेपाडा पॅटर्न!!

एक छोटीशी रंगीबेरंगी शाळा, मुलांच्या पाठीवरुन दप्तराचं ओझं गायब, प्रत्येकाच्या हाती स्वत:चा टॅब!! सराईतपणे टॅबवर बोटं चालवत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचा गृहपाठसुद्धा ऑनलाईनच तपासला जातो आणि त्यांना मेलवर उत्तर पाठवलं जातं. एकदम परदेशातली वाटते ना ही शाळा? पण नाही, ही आहे ठाणे जिल्ह्यातील पष्टेपाडा डिजिटल जिल्हा परिषद शाळा!




शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरची ही शाळा घडवली संदीप गुंड या शिक्षकाने. संदीप सर या शाळेत रुजू झाले तेव्हा शाळा गळक्या छपराची होती. बहुतांश विद्यार्थी शाळेकडे फिरकायचेच नाहीत. अगदी गुंड सरांनाही इथं नोकरी करायला नकोच असं वाटत होतं. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तशी विनंती केली आणि चांगलं काम करण्यासाठी एखाद्या चांगल्या शाळेत नेमणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. पण तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी 'चांगलं काम करायचं असेल तर हीच शाळा सुधारुन दाखव' असं आव्हान दिलं आणि मग घडला पष्टेपाड्याचा कायापालट!
संदीप सर मनापासून शिकविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मुलं शाळेत यायचीच नाहीत. मुलं नेमकी जातात तरी कुठं याचा शोध घेतला आणि सरांना कळालं की गावातला एकुलता एक टीव्ही पाहण्यासाठी पाटलांच्या घरात मुलं गर्दी करतात. टीव्हीवर कोणत्याही भाषेत काहीही चालू असलं तरी मुलांना फरक पडत नाही, त्यांना फक्त टीव्ही हवा असतो. शिवाय त्यांना मोबाईलवरचे गेम्स, फोटो काढणं हे सुद्धा आवडतं हे सरांच्या लक्षात आले. मुलांचे स्क्रिनप्रतीचं वेड लक्षात आलं आणि सरांनी मग शाळेत कॉम्प्युटर आणायचा ठरवला.


''कॉम्प्युटरची युक्ती चांगलीच यशस्वी ठरली. मुलं कॉम्प्युटरच्या ओढीनं दररोज शाळेत येऊ लागली. मी मुलांना मुक्तपणे कॉम्प्युटर हाताळू द्यायचो. पेंटसारखं साधं सॉफ्टवेअर, वेगवेगळे शैक्षणिक गेम्स, मराठी आणि इंग्रजी बडबडगीतं आम्ही डाऊनलोड करुन घेतली. शिवाय त्यांच्या अभ्यासाला पूरक ठरतील असे व्हिडिओज, गेम्स, इंटरअक्टिव्ह सॉफ्टवेअर यांचाही वापर सुरु केला आणि मुलांना अभ्यासाची गोडी लागली.


हे सगळं त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवावं, म्हणून संदीप सरांनी गावात एक सभा घेतली. त्यात मुलांचा अभ्यासात वाढत चाललेला रस, भविष्यकाळातील कॉम्प्युरचे महत्त्व, शाळासुधारणेसाठी राबविण्याचे प्रकल्प याविषयी ते बोलत होते. आणि तेवढ्यात एका मोलमजुरी करणाऱ्या आजीबाईंनी चुरगाळलेल्या 50-100 च्या नोटा टेबलवर ठेवत शाळेला एक हजार रुपयांची मदत जाहीर केली. संदीप सर सांगतात, "त्या आजीबाईंच्या मदतीने मी भारावूनच गेलो. कारण हातावर पोट असणाऱ्या या आजीबाईंचे कोणतंच नातवंड शाळेत शिकत नव्हतं, तरीही गावाच्या भल्यासाठी म्हणून त्यांनी मदत दिली."
आणि मग मदतीचा ओघच सुरु झाला. गावातल्या पेंटर्सने रात्र- रात्र जागून शाळा सुंदर रंगवून दिली, पुण्याच्या श्रद्धा शहा यांनी आपल्या लग्नाचे रिसेप्शन रद्द करुन शाळेला चार लाखांची मदत दिली. ज्यातून संपूर्ण शाळेसाठी सरांनी टॅब खरेदी केले. संदीप सर एवढ्यावरच थांबले नाहीत. आपल्या शाळेप्रमाणे इतरही शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी राज्यभरात 'प्रेरणा सहविचार सभां'च्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन सुरु केले आहे. त्यातून महाराष्ट्रातल्या 11,200 शाळा लोकसहभागातून 110 कोटी रुपये मिळवत डिजिटल झालेल्या आहेत. 


- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे

दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या या अवलिया शिक्षकाच्या प्रवासाविषयी विस्ताराने जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/mr/the-pashtepada-pattern/

Sunday, 29 January 2017

पोलीस आहेत सदैव साथीला


बहुतेकदा मुलांनी ऐकाव म्हणून त्यांना पोलिसांची भीती घातली जाते. पण त्याचबरोबर मूल जेव्हा थोडं मोठं होतं, त्याच्यावर एकट्याने बाहेर वावरायची वेळ येते तेव्हा त्याला पोलिसांचाच आधार दिला जातो. एकट्याने बाहेर पडणाऱ्या मुलामुलींना आईबाबा बाहेर पडते वेळी आवर्जून सांगतात, काहीही अडचण आली, पत्ता विचारायचा असेल, कुठलीही मदत लागली तर पोलिसांना विचारायचं. कोणी पाठलाग करत असेल, वेडंवाकडं वागत असेल तर पोलिसांना सांगायचं. त्यांची मदत घ्यायची. मुलांच्या संरक्षणासाठी पोलीस नेहमीच दक्ष असतात. आपल्यावरचा हा विश्वास पोलीस कायम टिकवून आहेत. मुलांच्या संरक्षणासाठी पोलीस करत असलेल्या उपाययोजनांबाबत ठाण्याच्या पोलीस उपायुक्त (मुख्यालय १) रश्मी करंदीकर यांनी माहिती दिली.
मुलांवरचं प्रमुख संकट म्हणजे हरवल्यामुळे, अपहरण झाल्यामुळे घरच्यांपासून त्यांची ताटातूट होते. आपल्याकडे वर्षाकाठी हजारो मुलं बेपत्ता होतात. सर्वोच्च न्यायालयानेही याची दखल घेतली होती. हरवलेल्या तसेच अपहरण झालेल्या मुलांच्या सुटकेसाठी गेल्यावर्षी जानेवारी आणि नंतर जुलै महिन्यात ‘ऑपेरेशन स्माइल’ आणि ‘ऑपेरेशन मुस्कान’ राबवण्यात आलं होतं. या अभियानांना चांगले यश मिळाले. केंद्र सरकारच्या डिसेंबर २०१५ च्या नोंदीनुसार वर्षभरात विविध राज्यांमधून ‘ऑपेरेशन स्माइल’ अंतर्गत ९,१४६ तर ‘ऑपेरेशन मुस्कान’ अंतर्गत १९,७४२ मुलांची सुटका करण्यात आली. या अभियानाअंतर्गत राज्यातही मोहिमा राबवून मुलांची सुटका करून त्यांची त्यांच्या पालकांबरोबर गाठ घालून दिली जाते. मुलं आणि पालकांची गाठभेट हा पोलिसांसाठी आनंदाचा समाधानाचा क्षण असतो असं रश्मी करंदीकर सांगतात.
ठाणे पोलीस आयुक्तालयाने राज्यातल्या पोलिसांच्या साथीने यावर्षी एप्रिल महिन्यात ऑपेरेशन मुस्कान, महाराष्ट्र हे विशेष अभियान राबवलं होतं. त्यामधून ० ते १८ वर्ष वयोगटातल्या मुलांचा शोध यात घेण्यात आला. या मोहिमेत ठाणे आणि ठाणे ग्रामीण जिल्ह्यातून ८८ मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. यात अपहरण झालेली ४२, हरवलेली ७ आणि बेवारस फिरणारी तीन मुले होती. विविध बालगृहातल्या २५ मुलामुलींना त्यांच्या पालकांकडे सोपवण्यात आलं. भीक मागणाऱ्या मुलांसह त्यांच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं.
हरवलेल्या मुलांचा शोध घेण्यात ठाणे चाइल्ड प्रोटेक्टशन युनिटही उत्तम काम करत असल्याचं रश्मी यांनी सांगितलं. हरवलेल्या मुलांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर जुलै २०१४ मध्ये या युनिटची स्थापना करण्यात आली. अशी स्थापना करणारे ठाणे हे देशातले पहिले आयुक्तालय आहे. जूनमधल्या नोंदीनुसार युनिटने २२२ मुलांना त्यांच्या घरी पोहोचायला मदत केली आहे. याखेरीज बालमजुरी आणि बालविवाह यांना आळा घालण्याचं काम हे युनिट करते. गुन्हे शाखेअंतर्गत असणारे जुवेनाईल एड पोलीस युनिट मुलांना भीक मागायला लावणाऱ्या ठिकाणांवर छापे घालतात तसेच मुलांना मजूर म्हणून ठेवणाऱ्या दुकानांवर, स्टॉलवर, हॉटेलवर छापे घालतात आणि कायदेशीर कारवाई करतात. बालगुन्हेगार कायद्यासंदर्भात पोलिसांच्या वेळोवेळी परिषदा घेऊन पोलिसांना याविषयी सजग केले जाते, अशी माहिती करंदीकर यांनी दिली.
मुलांचं लैगिक शोषण, छळ हा एक घृणास्पद प्रकार. रश्मी यांनी अशा काही प्रकरणांमध्ये तपास केला असून या प्रकरणांमधल्या गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली आहे. पनवेल इथल्या अपंग, मतिमंद, मूकबधिर मुलींच्या लैंगिक अत्याचारासंबधीच्या खटल्याचा तपास त्यांनी केला होता. या गुन्ह्यातल्या एका आरोपीला फाशीची शिक्षा व इतरांना जन्मठेपेची शिक्षा झाली होती. पण एकूणच अशी प्रकरणं उघड होण्याचं आणि त्यात आरोप सिद्ध होऊन गुन्हेगाराला शिक्षा होण्याचं प्रमाण अद्याप कमी आहे का आणि त्यावर उपाय काय या प्रश्नावर रश्मी म्हणाल्या, ‘अशी प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढणे आवश्यक असते कारण मूल जसजसं मोठं होत जातं तसतशा त्याला कटू आठवणी नकोशा वाटू लागतात आणि त्याचा परिणाम केसवर होतो. अपराधसिद्धी व्हावी यासाठी महाराष्ट्र पोलीस कायम प्रयत्नशील असतात आणि महाराष्ट्रात हा दर चांगला असल्याचेही त्यांनी सांगितले’.
- सोनाली कुलकर्णी.

Monday, 23 January 2017

त्यांच्यामुळे सॅनिटरी नॅपकिन्स आले आवाक्यात


अंतराळवीर कल्पना चावला आणि सुनीता व्हिल्यम्स, बॅडमिंटन चॅम्प सायना नेहवाल हे आजच्या तरूण मुलींचे आदर्श. म्हणजे त्यांच्यासारख व्हायची इच्छा असूनही काही गोष्टींमुळे मुली मागे पडतात. कारण काय तर, ग्रामीण भागांतील आणि शहरातील गरीब वस्त्यांत राहणाऱ्या मुलींना आणि स्त्रियांना मासिक पाळीच्या काळात योग्य त्या सुविधा मिळत नाहीत. महागडे सॅनिटरी नॅपकिन वापरण शक्य नसतं आणि वाजवी दरात ते न मिळाल्याने त्यांना घरी बसावे लागते, शाळा बुडवाव्या लागतात. त्या अभ्यासात मागे पडतात. वरच्या यत्तांत जाताजाता त्यांची गळती होते. अस्वच्छ कपडा पुन्हापुन्हा वापरावा लागल्याने त्यांना दुर्धर आजारांशी सामना करावा लागतो.

आजवर भारतात सॅनिटरी नॅपकिनच्या क्षेत्रात बहुराष्ट्रीय कंपन्यांचाच बोलबाला राहिला आहे. त्यात जोपर्यंत स्थानिक उद्योजक उतरत नाहीत तोपर्यंत हीच स्थिती राहणार. आता 'सूथ हेल्थकेअर' आणि 'आकार इनोव्हेशन्स' 
(फेसबुक: https://www.facebook.com/AakarInnovations आणि ट्विटर: @aakarinnovation) हे यात उतरले आहेत.
जयदीप मंडल हे 'आकार'चे एक संस्थापक. ते म्हणाले की, आमचे ब्रॅण्ड 'आनंदी', 'आनंदी अल्ट्रा एक्सएल' मुंबईतील 'सरल डिझाइन्स' ही कंपनी उत्पादित करते. 'सरल' कंपनी आयआयटी शिक्षित सुहानी मोहन आणि कार्तिक मेहता या दोघांनी काढली. कंपनी आणि ग्राहकांमध्ये कोणी मध्यस्थ नाही हे त्यांचे वैशिष्टय. हा माल सरळ धारावी सारख्या मुंबईतील झोपडपट्टींत जातो. तेथे महिला दारोदारी त्याची विक्री करतात. म्हणजे किंमतही कमी आणि या महिलांनाही रोजगार. शाळा, कॉलेजमध्येही ही कंपनी सॅनिटरी नॅपकिनचे व्हेंडिंग मशीन बसवते. जयदीप मंडल सांगतात की, १४ राज्यांतून त्यांची २५ उत्पादन केंद्रे आहेत. तेथे त्यांनी स्वतःची वितरण व्यवस्था आहे. त्यासाठी त्यांनी आजवर ४०० महिलांना प्रशिक्षित केलं असून कच्चा माल, मशीनरी पुरवली आहे. एनजीओ, अल्प बचत गट, कॉर्पोरेट्सचे सीएसआर, हॉस्पिटल्स यांच्या माध्यमांतून हे वितरण चालते.
मध्यम वर्गाला सामोरं ठेवून 'सूथ हेल्थकेअर'ने ( https://www.facebook.com/soothehealthcare 
आणि ट्विटर:@SootheH) 'पारी' हा ब्रॅण्ड तयार केला आहे. त्याचे संस्थापक आहेत साहिल धारिया. त्याचे उत्पादन नोएडा येथे होते. सायना नेहवालनेही नुकतीच यात मोठी गुंतवणूक करून प्रोत्साहन दिले.
दोन्ही कंपन्यांनी सॅनिटरी नॅपकिन विषयी सामाजिक जागृती केली आहे. 'आकार'ने 'आकार सोशल व्हेंचर' ही सामाजिक संस्था स्थापन करून मासिक पाळी आणि स्वच्छता या विषयांवर युनिसेफ आणि वल्ड बँक यांच्या सह जागृती चालवली आहे. तर 'सूथ हेल्थकेअर'ने ते सध्या कार्यरत असलेल्या शहरात २० हजार महिलांमध्ये विविध कार्यक्रमांद्वारा जागृती केली आहे.
नुकतीच 'नवी उमेद' ने सॅनिटरी नॅपकिन या विषयावर महाराष्ट्रात लोकनियुक्त प्रतिनिधींमार्फत मोहीम चालवली आहे आणि त्याला चांगला प्रतिसादही मिळाला आहे. या चळवळीला कॉर्पोरेट क्षेत्राकडून सामाजिक बांधिलकीच्या नात्याने पाठींबा आणि जोड मिळाल्याशिवाय सर्वांगिण यश मिळणार नाही
अनिल शाळीग्राम

Friday, 30 December 2016

बिनभिंतीची शाळा

चार भिंतीचे वर्ग, त्यात कोंबलेली पाच-पन्नास पोर. कुणीतरी ठरवून दिलेला अभ्यासक्रम आणि त्याच्या घोकंपट्टीला शाळा म्हणत त्यातून मुलांच्या व्यक्तिमत्व विकासाची अपेक्षा करणाऱ्या आजच्या व्यवस्थेत साताठ तरुणांनी आपल्या पातळीवर शिकण्याची व्याख्या बदलण्याच ठरवल आणि उभी राहिली एक बिनभिंतीची शाळा. या शाळेला भिंती नाहीत, अभ्यास नाही, गृहपाठ नाही, परीक्षा नाही आणि पास नापासाचे मापदंडही नाहीत. खेळा आणि फक्त खेळा अस म्हणणारी ही शाळा दर शनिवारी भरते. ठाण्याच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील येऊर जंगलात. तिच नावच आहे 'स्कूल विदाउट वॉल्स' बिनभिंतीची शाळा.
परिस्थितीशी जुळवून हवे ते साध्य करणारा तरुण म्हणजे पंकज गुरव. बारावीमध्ये जवळपास सर्वच विषयांत नापास होणारा हा तरूण आज येऊर मध्ये लहान मुलांमध्ये बिनभिंतीची शाळा चालवत आहे. विविध सामाजिक संस्थांमध्ये काम करून आलेले सामाजिक भानच त्याच्यासाठी दिशादर्शक ठरले.


चिरागनगर इथल्या वस्तीत राहणारा पंकज गुरव 'समता विचारक संस्थे'च्या विविध उपक्रमांमध्ये २००२ पासून काम करत होता. गावाभेटीच्या उपक्रमातून विविध गावांच्या समस्यांची जाणीव पंकजला झाली. 'केवळ येउन भेटी देता, आमच्यासाठी तुम्ही काय केलत…' हा गावकऱ्याचा सवाल पंकजच्या मनाला टोचणी लाऊन गेला. तेव्हाच ग्रामीण भागातील मुलांसाठी वेगळे काम करण्याचा निश्चय त्याने केला.
येऊर गावात पंकजने बिनभिंतीची शाळा सुरू केली. खेळ, नाटक, नृत्य आणि अभ्यासाशिवाय अनेक उपक्रम या शाळेत घेतले जातात. मात्र यातून मिळणारे शिक्षण हे माणूस घडणीचे आणि आयुष्याला आकार देणारेच असते. दोन वर्षांपूर्वी केवळ शनिवारीच हे वर्ग चालत असत. आता जास्त सघनपणे चालवण्याचा विचार आहे. ठाण्यातील दुसऱ्या एक नामवंत सामाजिक संस्थेने, 'वी नीड यू' या संस्थेने, त्यासाठी मदतीचा हात नुकताच पुढे केला आहे.
मुलांकडून चर्चात्मक उपक्रम घेतले जातात. खेळाचा तास झाला तरी जिंकलेल्या आणि हरलेल्या अशा दोन्ही गटांमध्ये त्यांच्या कामगिरीचा उहापोह केला जातो. त्यातून मुलांच्या चुका समजतात आणि त्या सुधारण्याची संधी मिळते.
सुरवातीला मुल-मुली एकत्र खेळायला तयार नसायचे. आता ते कोणताही संकोच न बाळगता एकत्र खेळतात. कोणते खेळ खेळायचे हे त्यांनाच ठरवू दिल जात. कोणत्याही साहित्याशिवाय स्थानिक खेळांवर भर असतो. मात्र खेळांतून शिक्षण कस देता येइल, भूगोल, गणित वगैरे विषयांशी जोडण्यावर भर असतो.


ठाण्यापासून इतक्या जवळ असूनही या मुलांचा शहरी संस्कृतीशी कोणताही परिचय नाही. शाळेत येण्यापेक्षा आई-वडिलांबरोबर जंगलात जाण, त्यांना कामात मदत कारण, धाकट्या भावंडांना सांभाळण, जंगलात रहात असल्यामुळे जनावरांच्या भीतीने लवकर घरी जाण या त्यांच्या सहाजिक गरजेच्या गोष्टी.
शहनाज शेख, महेश बागल, रश्मी पाटील, गौरव गुरव, पूजा प्रभाकर, अपूर्वा शाळीग्राम वगैरे कार्यकर्ते पंकजचे सहकारी आहेत. बिनभिंतीची शाळा सुरू झाल्यापासून हळूहळू उपस्थिती वाढू लागली. पाचवीत शिकणाऱ्या मुलाला स्वत:चे नावही लिहिता येत नाही अशी परिस्थिती होती. अशा मुलांना अक्षर ओळखण्याचे शिक्षण देण्यात आले.
'वंचितांचा रंगमंच' या ठाण्यातील अभिनव उपक्रमात या शाळेच्या मुलांचा सहभाग असतो आणि त्यात त्यांनी पारितोषिके मिळवली ज्याचे महाराष्ट्रातील नामवंत दिग्गज कलाकारांनी खूप कौतूक केले आणि मुलांना प्रोत्साहन दिले. अतिशय बिकट आर्थिक परिस्थितीतून आलेल्या पंकजने अशाच वर्गातील मुलांसाठी उचललेले हे पाउल निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

Saturday, 24 December 2016

तृतीयपंथीय बनले ‘पोलीस मित्र’


तृतीयपंथीयांच्या सक्षमीकरणाचा एक प्रयत्न ठाणे ग्रामीण पोलिसांनी मीरा-भाईंदरमध्ये केला आहे. याठिकाणी महाराष्ट्र पोलिसांच्या 'पोलीस मित्र' या उपक्रमांतर्गत तृतीयपंथीयांना समाविष्ट करण्यात आलं आहे.
काशीमिरा इथे काही तृतीयपंथीयांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पळून जाणार्‍या चोरांना पकडून देण्यात पोलिसांना मदत केली. ही घटना कलाटणी देणारी ठरली. मग त्यांना ‘पोलीस मित्र’ होण्यासाठी तयार करण्यात आलं. सध्या मीरा-भाईंदर उपविभागात 2 2 तृतीयपंथीय पोलीस मित्र म्हणून काम करत आहेत. नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांविषयी जागरूकता निर्माण करणं, वाहतुकीचं, गर्दीचं नियमन, सुरक्षा, भुरटय़ा चोरांचा माग काढणं, पोलिसांना खबर देणं अशी विविध कामं ते करतात. त्यांच्यातले काही जण तर पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतलेलेही आहेत अशी माहिती मीरा रोडचे पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांनी दिली. वाहतुकीचं नियमन करणाऱ्या, नियम समजावून सांगणाऱ्या या ‘पोलीस मित्रां’चं म्हणणं नागरिक ऐकून घेतात, त्यांच्याशी अदबीने वागतात असं बावचे यांनी सांगितलं.
तृतीयपंथीयांकडे बघण्याच्या समाजाच्या दृष्टिकोनात हळूहळू बदल व्हायला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे. तृतीयपंथीयांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी असे अनेक उपक्रम राबवण्याची गरज आहे. त्यातूनच त्यांच्या पूर्वापार जीवनमानात बदल घडू शकेल आणि समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. शिक्षण आणि कौशल्यविकास प्रशिक्षणाची त्यांना गरज आहे.
2011 च्या जनगणनेनुसार देशात तृतीयपंथीयांची संख्या एकूण 4 लाख 87हजार 803 आहे त्यापैकी फक्त 46%साक्षर आहेत. भीक मागणारे, नाचगाणी करणारे, मनोरंजन करणारे यापलीकडे जाऊन त्यांना ओळख मिळाली पाहिजे. माणूस म्हणून त्यांच्याकडे बघितले गेलं पाहिजे.


- सोनाली काकडे-कुळकर्णी