Showing posts with label Satara. Show all posts
Showing posts with label Satara. Show all posts

Thursday, 24 May 2018

चार घास सुखाचे...

जिल्हा सातारा. माण तालुक्यातील म्हसवड. साधारण ३५ हजार लोकसंख्येचं गाव. इथल्या ‘निर्भीड फौंडेशन’ आणि ‘कला फ्रेंड्स’ या संस्थांचा उपक्रम म्हणजे ‘चार घास सुखाचे’. निर्भीड फौंडेशनचे डॉ. चेतन गलांडे म्हणतात, “भारतातील एकूण धान्य उत्पन्नाच्या एक तृतीयांश अन्न वाया जातं आणि तरीही लाखो लोक रोज उपाशी झोपतात. बऱ्याच लोकांना वाटतं की हे फक्त शहरापुरते मर्यादित आहे. काही सेवाभावी संस्था बेंगळूरू, दिल्ली, मुंबई, जयपूरसारख्या मोठ्या शहरांमध्ये अन्नदान तसेच समारंभामध्ये जादाचे राहिलेले अन्न गरीब भुकेल्या लोकांना पुरवण्यासाठी काम करतात. पण छोटी शहरे आणि गावं यामध्ये अन्न वाया जात नाही का? लोक उपाशी झोपत नाहीत का? असं अनेक प्रश्न मला पडत होते. नव्हे, वास्तव समोर दिसत होतं. कारण गावामध्ये भीक पण मागता येत नाही लाज आडवी येते! कित्येक वृद्ध, म्हातारे लोक ज्यांची मुले मोठ्या हुद्द्यावर शहरात काम करतात त्यांच्या जेवणाची पंचाईत झालेली असते. ‘आई जेवण घालत नाही आणि बाप भीक मागू देत नाही’ अशी त्यांची अवस्था झालेली असते. विविध कारणांमुळे आता इथंही वृद्ध, म्हाताऱ्या लोकांची संख्या वाढते आहे.



 अर्थातच त्यांच्या रोजच्या जेवणाचा प्रश्नही आ वासून उभा आहे”. डॉ गलांडे यांना या सगळ्या परिस्थितीने विचार करायला भाग पाडलं. कला फ्रेंड्स संस्थेच्या दत्ता गोंजारी यांच्याशी चर्चा झाली. आणि ‘चार घास सुखाचे’ या उपक्रमाने आकार घेतला. 
म्हसवडच्या एसटी बस स्थानकापासून चार-पाच मिनिटांच्या अंतरावर चार घास सुखाचे हे केंद्र आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत येणाऱ्या प्रत्येक गरजू, भुकेल्या व्यक्तीला केवळ पाच रुपये आकारून जेवण दिलं जातं. एखादी व्यक्ती तेवढेही पैसे देऊ शकत नसेल तर अर्थातच तिला मोफत. गेले अडीच-तीन महिने एकही दिवस सुट्टी न घेता हा उपक्रम सुरु आहे. रोज साधारण ५० लोकांचं जेवण इथं बनवलं जातं. या केंद्राचं काम बघणारा सारंग लोंढे सांगतो की, “एक पथ्य आम्ही पाळलं आहे, दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तींना आम्ही कटाक्षाने इथं जेवण देत नाही”. 



या योजनेत रोज एका अन्नदात्याच्या मदतीने अन्नदान केले जाते. केंद्रावर लावलेल्या बोर्डवर ‘आजचा अन्नदाता’ नावाने त्याचा गौरव केला जातो. काही लोक फूल ना फुलाची पाकळी म्हणून कुवतीप्रमाणे धान्य, भाज्या, थंड पाणी दान स्वरुपात देतात. 



डॉ. चेतन म्हणतात, “चार घास सुखाचे या नावाप्रमाणेच, पंचपक्वान जेवण न देता पोटभर होईल असं दोन चपात्या व भाजी दिली जाते. ज्यामुळे गरजू लोक त्या वेळेमध्ये येऊन जेवण घेतात. सध्या दोन महिला स्वयंपाक करतात. त्यासाठी त्यांना मानधनही दिलं जातं. त्यांना भाजीपाला व धान्य पुरवण्याचे काम संस्थेचे सभासद करतात. शिजवलेले अन्न केंद्रापर्यंत पोहोचवण्याचं कामही हे सभासद करतात. त्याचे आम्ही वेळापत्रक बनवले आहे.”



डॉ. चेतन सांगतात, “आमच्या नंतर आता सातारा शहर, कोल्हापूर शहर येथे असे उपक्रम चालू झाले आहेत”.
निर्भीडची स्थापना २००९ झाली असली तरी गेल्या वर्षभरापासून त्यांनी सामाजिक कामाला जोरदार सुरुवात केली आहे. या वर्षभरात त्यांनी जिल्हा परिषद शाळा पुळकोटी येथे ११ कॉम्प्यूटरची डिजिटल क्लासरूम चालू केली आहे. तसेच विविध गावांमध्ये रोग निदान शिबीर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये दंतचिकित्सा शिबीर, जंत निर्मुलन व पोलिओ लसीकरण, महिला सक्षमीकरण यासारखे विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत.
सारंग सांगतो की, “रोजच्या जेवणाचा खर्च साधारण १३०० ते १४०० रुपये खर्च येतो. महिन्याचे अंदाजे निम्मे दिवस आम्हाला अन्नदाते उपलब्ध होतात. वाढदिवस, जयंती, वर्षश्राध्द त्या दिवसाचा अन्नदानाचा खर्च करतात. उरलेल्या दिवसाचा खर्च डॉ. चेतन गलांडे स्वत: करतात.

Sunday, 25 February 2018

फलटणकरांची मॅक्सीनमावशी

''काय रे, कुठं चाललायस? शाळेत गेला नाहीस का?'' एखाद्या हूड लहानग्याला असं खास फलटणी ठसक्यात दरडावणाऱ्या, मुलामुलींची ने -आण त्यांच्या स्वतःच्या रिक्षातून करणार्‍या मॅक्सीनमावशी फलटणकरांसाठी त्यांच्या कुटुंबातल्याच एक सदस्य. मराठी भाषा समृद्ध करण्यामध्ये मॅक्सीनमावशीचं असलेलं योगदान फलटणकरांसाठी विशेष अभिमानाचं आहे. जवळपास 85 वर्षांच्या मॅक्सीनमावशींचं अजूनही मराठी भाषा, मराठी संस्कृती याबाबत संशोधन सुरूच आहे. फलटणमधून पांढर्‍या रिक्षातून गोल हॅट घालून फिरणाऱ्या मूळच्या नॉर्वियन वंशाच्या या विदूषी फलटणकरांना कधीच लांबच्या वाटल्या नाहीत.
७ ऑक्टोबर १९३५ मध्ये अमेरिकेतल्या मिशिगन प्रांतात मॅक्सीन बर्नसन यांचा जन्म झाला. वडील नॉर्वियन निर्वासित , तर आई फिनलँडमधील निर्वासित. मॅक्सीनना किशोरवयापासूनच भाषांची आवड होती. कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी इंग्रजी भाषेतून एमए केल. अमेरिकेत असतानाच भाषाअभ्यासातून त्यांना मराठी भाषेविषयी माहिती मिळाली. त्या ओढीनेच फलटण इथली आपली मैत्रिण जाई निंबकर यांच्या साथीने १९६१ मध्ये त्या भारतात आल्या. हैदराबादमधल्या विवेकवर्धिनी महाविद्यालयात सुमारे दोन वर्षे त्यांनी अध्यापन केलं . विवेकवर्धिनी महाविद्यालयाचे प्राचार्य सावळेकर आणि त्यांच्या पत्नीने त्यांना आई-वडिलांप्रमाणे आधार दिला.
१९६६ मध्ये 'पश्चिम महाराष्ट्रातल्या फलटण तालुक्यातल्या मराठी बोलींमधली सामाजिक विविधता' या विषयावर काम करण्यासाठी त्यांना फुलब्राइट -हेज फेलोशिप मिळाली. त्यानंतर मॅक्सीनमावशींनी फलटणमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.
फलटणमध्ये प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवनाची स्थापना त्यांनी केली. शिक्षणापासून वंचित असणार्‍या गोरगरीब मुलांना आपल्या कडेवर बसवून त्यांनी शाळेमध्ये आणलं. शिक्षण दिलं. त्यांना शिकवताना योग्य पद्धतीने मराठी भाषा बोलली-लिहिली जाईल, हे पाहिलं. फलटणमध्ये, आज अशी एक शिक्षित पिढी केवळ मॅक्सीनमावशींच्या देखभालीमुळेच निर्माण झाली आहे. मराठी भाषेचे धडे त्यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच दिले. ''मराठीसारखी अवघड भाषा जगा्त नाही. पोट फोडणं, अक्षरांचे पाय मोडणं, यामुळे मराठी ही अतिभयानक भाषा वाटते, असं मॅक्सीनमावशी मराठीवरच्या प्रेमातूनच गंमतीने म्हणतात. मराठी व्याकरणाबाबत त्या आग्रही आहेत. बोलण्याची ढब सातारी, कोल्हापुरी असली तरी बोलणं मात्र शुद्धच असलं पाहिजे, असं त्या मुलांना नेहमी सांगायच्या. संतसाहित्यावर मॅक्सीनमावशीचं अपरंपार प्रेम. संतपरंपरेतील अभंग आणि ओव्या गाऊन मॅक्सीनमावशी मंत्रमुग्ध करतात. मराठी भाषेसंदर्भात सुमारे अर्धा डझन पुस्तकं त्यांनी लिहिली आहेत.
मॅक्सीनमावशी गेल्या तीन-चार वर्षांपासून हैद्राबादला स्थायिक आहेत. राष्ट्रीय शिक्षण आणि संशोधन परिषदेच्या (एनसीईआरटी) माध्यमातून प्रौढ शिक्षणामध्ये त्या संशोधन करत आहेत. अधूनमधून त्या फलटणमध्ये येत असतात. त्यांनी स्थापन केलेल्या प्रगत शिक्षण संस्थेच्या कमला निंबकर बालभवनाचं कामकाज पाहत असतात. आपली मायभूमी सोडून हजारो किलोमीटर दूर येऊन एखाद्या परक्या भाषेसाठीझटणार्‍या मॅक्सीन बर्नसन उर्फ फलटणकरांच्या मॅक्सीन मावशींना मराठी भाषा दिनानिमित्त मानाचा मुजरा !

- संग्राम निकाळजे 

Thursday, 1 February 2018

मॅरेथॉनचं गाव- साताऱ्याची नवी ओळख



सात डोंगरांच्या कुशीत दडलेलं, नैसर्गिक वरदान लाभलेलं - सातारा. छत्रपतींची राजधानी म्हणून लौकिक, एकेकाळचा सहकार चळवळीचा बालेकिल्ला असलेली ही भूमी आता मॅरेथॉनचे गाव म्हणून जगभरात ओळखली जाऊ लागली आहे.
दक्षिण आफ्रिकेतली 'कॉम्रेड्स मॅरेथॉन' जगातील सर्वाधिक जुन्या स्पर्धांपैकी एक. तिच्या वेगळेपणामुळे जगात प्रसिद्ध. ही स्पर्धा नेहमीसारखी रस्त्यावरुन किंवा सपाट भूभागावरुन धावण्याची नाही. ही आहे हिल मॅरेथॉन. म्हणजेच उंच पसरलेल्या डोंगररांगावर असलेल्या उंचसखल रस्त्यावरुन धावणे. यामुळेच जगभरातल्या स्पर्धकांसाठी ती आव्हानात्मक ठरते.

सातार्‍यातले डॉक्टर संदीप काटे यांना २०११ मध्ये या स्पर्धेविषयी कळलं. पहिल्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या सैनिकांच्या स्मरणार्थ १९२१ पासून डर्बनमध्ये ही ८९ किलोमीटरची अल्ट्रा मॅरेथॉन भरवली जाते. आजपर्यंत सुमारे ३० लाखांहून अधिक लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला आहे. स्पर्धकांचा कस पाहणाऱ्या 'कॉम्रेड्स मॅरेथॉन'बाबत कळल्यावर डॉक्टर संदीप काटे भारून गेले. यातूनच प्रेरणा घेऊन साताऱ्यात आपण अशी मॅरेथॉन घेऊ शकतो का याची चाचपणी ते करू लागले. २०१२ मध्ये यवतेश्‍वरच्या घाटात त्यांचा शोध संपला. सातारा शहरही काही प्रमाणात, काही अंशी डर्बनप्रमाणेच आहे. यवतेश्‍वर डोंगरावरच्या रस्त्यावर असणारा उंचसखलपणा, 'कॉम्रेड्स मॅरेथॉन'सारखं असणारं भौगोलिक वातावरण सगळं काही मॅरेथॉनच्या आयोजनासाठी अनुकूल असल्याचं काटे यांना त्यांच्या अभ्यासात आढळलं . मॅरेथॉनच्या आयोजनाची त्यांची कल्पना सहकाऱ्यांनीही उचलून धरली.
काही समविचारी व्यक्तींच्या साथीनं काटे यांनी सातारा हिल हाफ मॅरेथॉन कमिटी स्थापन करुन स्पर्धेची जय्यत तयारी केली. ७ ऑक्टोबर २०१२ ला पोलीस कवायत मैदान ते यवतेश्‍वर घाटातून प्रकृती रिझॉर्टपर्यंत हाफ मॅरेथॉनचा ट्रॅक करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पहिल्या वर्षी विदेशी-देशी व स्थानिक अशा ३ ते ४ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला. देशातली ही पहिली हिल मॅरेथॉन ठरली. हळूहळू स्पर्धेची महती पसरू लागली . दरवर्षी हजारो लोक या स्पर्धेमध्ये सहभागी होऊ लागले. डोंगरावर धावण्याच्या स्पर्धेत ( सिंगल माउंटन ) सर्वाधिक लोक सहभागी होण्याचा विक्रम या स्पर्धेच्या नावावर आहे. त्याची गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. अशा प्रकारची जगातील ही दुसरी मॅरेथॉन असून आज जगभरात तिचा लौकिक पसरला आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉन कमिटी दरवर्षी विविध समाजोपयोगी उपक्रम राबवत असते. त्यापैकी एक म्हणजे मातीतील खेळ. हल्ली मोबाईल-टीव्हीच्या जमान्यात लहान मुलं मातीतील खेळ विसरली आहेत. हे ओळखून सातारा हिल हाफ मॅरेथॉन असोसिएशन मातीतील खेळांचा उपक्रम दरवर्षी शाहू स्टेडियममध्ये आयोजते.
याखेरीज इतरही काही स्पर्धां भरतात. त्यांच्या आयोजनात महिलांचा पुढाकार आहे. राजवी हेळगेकर यांची एल.ओ. एस.ओ. एम., तसंच चंद्रलेखा घाडगे यांची आयकॉनिक ऑरा वूमेन्स रन या मॅरेथॉन स्पर्धाही काही वर्षांपासून सातार्‍यात चांगलंच बाळसं धरू लागल्या आहेत. महिलावर्गातून यांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
सातार्‍यावर निसर्गानं मुक्तहस्ते उधळण केली आहे. दरवर्षी लाखो पर्यटक कास- यवतेश्‍वर, बामणोली या ठिकाणी भेट देतात. सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या निमित्तानं पर्यटनही होतं . त्यामुळे स्थानिकांनाही मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण झाला आहे. यामुळे आता मॅरेथॉनचं गाव अशी नवी ओळख साताऱ्याला मिळाली आहे.

- संग्राम निकाळजे.

Saturday, 11 November 2017

तंत्रज्ञान घडविते किमया



सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :मी बालाजी जाधव, २००६ साली साताऱ्यात माण तालुक्यातील शिंदेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेत माझी नेमणूक झाली. इथल्या बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक मेंढपाळ, वीटभट्टी मजूर आहेत. मुलं शाळा बुडवून आई वडिलांसोबत कामाच्या ठिकाणी फिरायची. शिक्षणाविना मुलांचे भटकणे पाहून मी अस्वस्थ होत होतो. मग त्यांना शाळेकडे आकर्षित करण्यासाठी मी कॉम्प्युटरची युक्ती योजली. आमच्या जि.प. शाळेत कॉम्प्युटर नव्हता, मग मी स्वखर्चाने लॅपटॉप आणला आणि मुलांना मुक्तपणे हाताळायला देऊ लागलो.


आणि माझी युक्ती लागू पडली, लॅपटॉपच्या आकर्षणाने मुलं नियमित शाळेला येऊ लागली. मुलं शाळेत नियमित येत आहेत याचं मला समाधान होतं, पण मी ‘लातूर पॅटर्न’ मधून आलेला विद्यार्थी असल्याने मुलांनी अभ्यासात उत्तम प्रगती करावी असं मला वाटत होतं. म्हणूनच मी चौथीच्या मुलांना शिष्यवृत्तीची परीक्षा देण्यासाठी उद्युक्त केलं. पहिल्या वर्षी मी मुलांवर फार मेहनत घेतली, मुलांनीही अगदी झटून अभ्यास केला, सगळे उत्तीर्णही झाले पण एकाही विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती मिळाली नाही.
हे मनाला लागलं आणि मी मुलांवर आणखी मेहनत घेऊ लागलो. इंटरनेटवरून अभ्यासाशी संबंधित डाऊनलोड केलेले व्हिडिओ मी शाळेत ऑफलाईन दाखवू लागलो. मुलांचा सराव वाढावा यासाठी भरपूर प्रश्नांची बँकच तयार केली आणि अर्थातच आमच्या प्रयत्नांना यश आले. 2008 साली आमच्या छोट्या शाळेचे विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक झाले. त्यानंतर सलग सात वर्षे गुणवत्तायादीत येण्याचा विक्रम आमच्या शिंदेवस्तीच्या जिल्हा परिषद शाळेने केला.

यामुळे विस्ताराधिकाऱ्यांची शाबासकी मिळाली आणि मग मी तयार केलेली 'क्वेश्चन बँक' आमच्या संपूर्ण बीटमधल्या 60 शाळांसाठी वापरली जाऊ लागली. दरम्यान मला 'ब्लॉग'विषयी समजलं. 2010 साली माझा पहिला ब्लॉग सुरू झाला- http://www.shikshanbhakti.in/ अभ्यास रंजक बनविण्यासाठी काय करावं, कोणते पूरक उपक्रम घ्यावे तसेच शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या प्रश्नपत्रिका मी या ब्लॉगवर उपलब्ध करून दिल्या. या ब्लॉगला महाराष्ट्रातील शिक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
कौतुकासोबत शिक्षक मित्रांची तक्रार होती, की ब्लॉगवरच्या प्रश्नपत्रिकांची प्रिंटआऊट काढून मग विद्यार्थ्यांना वाटावी लागते. हे जिल्हा परिषदेच्या शाळेला परवडणारं नाही, याची मला जाणीव झाली. मग मी HTML ही संगणकीय भाषा प्रणाली शिकलो. यानंतर मी थेट ऑनलाईन चाचण्या माझ्या ब्लॉगवर उपलब्ध करून देऊ लागलो. या बहुपर्यायी चाचणीत योग्य पर्यायांवर क्लिक करून प्रश्नपत्रिकेच्या शेवटी ‘सबमिट’वर क्लिक केले की दुसऱ्या मिनिटाला निकाल समोर येतो. यामुळे रोज सुमारे 12 हजार शाळा ब्लॉगला भेट देऊ लागल्या.
पण यासाठी इंटरनेटही गरजेचं असतं. ग्रामीण भागात जिथे 12 तास वीज नसते तिथं इंटरनेट कुठून आणणार, यावर उपाय मिळाला ऑफलाईन चाचण्यांचा. मी जाणीवपूर्वक हे अॅप अॅन्ड्रॉईड प्रणालीसाठी बनवलं. जेणेकरून इंटरनेट असताना शिक्षक त्यांच्या मोबाईलवर हे अॅप डाऊनलोड करू शकतात. आणि मग शाळेत इंटरनेट नसतानाही मुले चाचणी ऑफलाईन सोडवू शकतात आणि त्यांना लगेच त्यांचा निकालही मिळतो. या ऑफलाईन अॅपमुळे 'गुगल इंडिया'ने 2014 साली माझा विशेष सन्मानही केलेला आहे.

- बालाजी जाधव.

Friday, 27 October 2017

माझं शरीर- माझा अधिकार



सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :

साताऱ्यातील माण तालुका. इथल्या भालवडीतील जिल्हा परिषद शाळा. इतर शाळांप्रमाणे त्यांच्याही शाळेत ‘मीना- राजू’ मंचाचा उपक्रम सुरू आहे. त्यात शिवीबंद अभियान, बालकांचे अधिकार, माझं शरीर- माझा अधिकार अशी वेगवेगळी सत्रं देशपांडे मॅडम घेतात. मीना- राजू मंच मुलांच्या मनावर कसा ठसला आहे, याविषयी शाळेतील सुगमकर्त्या ओनस्वी देशपांडे सांगतात.
                                                                            
‘माझं शरीर -माझा अधिकार’ हे लैंगिक शोषणाला विरोध करण्याचं बळ देणारं सत्र आहे. यामध्ये मानवी आकृतीच्या चित्रावर मुलं-मुली लाल आणि हिरव्या रंगाच्या खडूने खुणा करतात. शरीराच्या ज्या भागाला इतरांनी हात लावल्यास संकोच वाटत नाही, तिथं हिरव्या रंगाच्या खडूने खुणा करायच्या आणि शरीराच्या ज्या भागास हात लावलेला तुम्हांला आवडणार नाही, संकोच वाटेल तिथं लाल रंगाने खुणा करायच्या. हा उपक्रम मुलांकडून करवून घेता-घेता त्यांना त्यांच्या शरीराची ओळख करून दिली जाते. शरीराचे काही अवयव हे इतके खाजगी असतात की तिथं आई आणि स्वत:शिवाय इतर कुणीही स्पर्श केल्यास नकोसं वाटतं. तुम्हांला कोणी असा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तर त्या व्यक्तीला ठाम नकार द्या, ती व्यक्ती इजा करेल अशी भीती वाटली तर आरडाओरडा करा. अशाप्रकारचा त्रास होत असेल तर विश्वासातील व्यक्तींना अथवा शिक्षकांना याची माहिती द्या, अशी शिकवण उपक्रमातून दिली जाते.
देशपांडे मॅडम यांनी हा उपक्रम तसेच इतर अनेक सत्रं उत्तमप्रकारे घेतली होती. वेळोवेळी मुलांचे फोटो, मुलांनी केलेले लिखाण, गटचर्चांचे फायलिंग त्यांनी करून ठेवले होते. पण अचानक 2016 च्या मे महिन्यात भालवडी गावात अवकाळी पाऊस कोसळला आणि शाळेची अवस्था दयनीय झाली. शाळेचा पत्रा उडून गेला, फोटो आणि फाईल्स भिजल्या, त्यावर दगड माती कोसळली. हे पाहून विद्यार्थ्यांना आणि मॅडमनाही खूप वाईट वाटलं.
काही दिवसांनी या मीना- राजू मंचाचे काम पाहण्यास काही कार्यकर्ते आले, तेव्हा त्यांना दाखविण्याजोगे आपल्याकडे काहीच नाही, असं मॅडमना जाणवलं. त्याचवेळी मुलांनी मात्र, ‘आम्हांला मॅडमनी शिकविलेलं सगळं लक्षात आहे, काहीही विचारा’ असं आवाहन पाहुण्यांना केलं. आनंदाची गोष्ट म्हणजे ‘माझं शरीर- माझा अधिकार’ या सत्राचं सार अक्काताई नावाच्या मुलीने अगदी एका ओळीत सांगितलं, “माझ्या शरीरावर फक्त माझाच अधिकार आहे, माझ्या परवानगीशिवाय मी कोणालाही स्पर्श करू देणार नाही. कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर त्यांना मी विरोध करेन” अक्काचे उत्तर ऐकून कार्यकर्तेही थक्क झाले. इतर मुलांनीही फार चांगली उत्तरं दिली.
त्यामुळे “कसलंही फायलिंग उपलब्ध नसलं, तरी तुमची हुशार मुलं हाच तुमच्या शिकवण्याचा सर्वात चांगला पुरावा आहे” असा शेरा देऊन ते निघून गेले. ‘मीना- राजू मंचाच्या’ उपक्रमामुळे असे छोटे- मोठे बदल घडून येत आहेत. मुला-मुलींमधे आत्मविश्वास आणि आत्मभान जागृत करण्यासाठी अशा उपक्रमांचा फायदा होतो आहे.
(लेखातील काही मुलींची नावे बदललेली आहेत.)

- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

Friday, 13 October 2017

ज्ञानरचनावादाचे प्रणेते- कुमठे बीट

तुम्हांला आठवतं आपण मुळाक्षरं आणि संख्या कशा शिकलो ते? एकच अक्षर सतत गिरवून आणि घोकंपट्टी करून आपण अभ्यास शिकलो. पण आता मात्र महाराष्ट्रातील जिल्हा परिषद शाळांची मुलं फार वेगळ्या पद्धतीने शिकतात. त्या पद्धतीचे नाव आहे- ज्ञानरचनावाद आणि ही पद्धत महाराष्ट्रात यशस्वीपणे राबवून दाखविणाऱ्या शाळा आहेत सातारा जिल्ह्यातील कुमठे बीटच्या.



"ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीचा दृष्टिकोन असा आहे की मुलांना आधीपासून ज्ञान असते. मुले जेव्हा शाळेत प्रवेश घेतात तेव्हा त्यांचं मन म्हणजे एक कोरी पाटी असते, ही कल्पना चुकीची आहे. मुलं आपल्या सभोवतालच्या परिसरातून सारखं काहीतरी शिकत असतात. त्यांची निरीक्षण क्षमता आणि ग्रहण क्षमता जबरदस्त असते. त्यांना प्रत्येक गोष्टीबद्दल कुतूहल असते.” कुमठे बीटच्या विस्ताराधिकारी प्रतिभा भराडे सांगत होत्या. 
"कुमठे बीटमध्ये २०१२ साली पहिलीचा वर्ग दरवर्षीप्रमाणे १४ जूनला सुरु करण्याऐवजी १ मार्चलाच घ्यायचा ठरला. शाळेचं अंतर्बाह्य स्वरूप बदलून टाकण्यात आलं. या सुट्टीच्या काळात खेळांवर भर दिला गेला. अगदी लहान मुलांना एका जागी बसून रहायला आवडत नाही. त्यांना सतत काहीतरी नवं हवं असतं. म्हणून आम्ही ठरवलं, की मुलांना खेळू द्यायचं आणि खेळातूनच शिकवायचं. मग शाळेत सागरगोटे, काचाकवड्या, गोट्या, सूरपारंब्या, आबाधुबी, ठिकरी यासारखे खेळ मुलं दररोज खेळू लागली. याचा खर्च काहीच नव्हता आणि मुलांना खूप मजा येत होती." 




"खरंतर, मुलं एकीकडे खेळत होती तर दुसरीकडे त्यांचा शारीरिक आणि बौद्धिक विकासही होत होता. या खेळांमधून लवचिकता, शरीराचा तोल सांधणं, खिलाडूवृत्ती, सांघिक बळ, हस्तनेत्रसमन्वय, तर्कबुद्धीचा वापर अशा अनेक गोष्टी घडून येत होत्या. मुलांची शाळेशी खरी ओळख होऊ लागली. आता शिक्षकांची भीती तर वाटत नव्हतीच, उलट मैत्री झाली होती." भराडे मॅडम सांगत होत्या.
वेगवेगळ्या विषयांसाठी शिक्षकानीं अनेक प्रयोग केले. उदा. गणित म्हणजे मुलांचा नावडता विषय. यात मणी, खडे, चिंचोके आणि स्वतःचे अवयव मोजण्याने सुरुवात होते. कधी शिक्षक सांगतील त्या नंबराची आगगाडी बनवणे, तर कधी दोन विद्यार्थ्यांनी मिळून दोन अंकी संख्या तयार करणे असे खेळ घेतले जातात. उदा: २८ हा आकडा बनवायचा असेल तर, एक मूल दशक बनतं तर दुसरं एकक. दशक झालेल्या मुलाने दोन बोटं दाखवायची, त्याचवेळी एकक झालेल्या मुलाने ८ बोटे दाखवायची. 





कोणताही विद्यार्थी ‘ढ‘ नाही, कोणाविषयीही नकारात्मक बोलायचं नाही ही तत्त्वं येथील शिक्षक कटाक्षाने पाळतात. अगदी पहिलीतल्या मुलालासुद्धा जाण असते. मुलांना आपल्या बोली भाषेत बोलू द्यावं, ही सूत्रं इथं पाळली जातात. यामुळे अनेकदा असं होतं की इथली मुलं पुस्तकी बोलत नाहीत. ठोकळेबाज निबंध लिहीत नाहीत. शिक्षकांनाही माहीत नसलेले अनेक शब्द ही मुले वापरतात. स्वतःच्या शैलीत भावना व्यक्त करतात.
कुमठे बीटमध्ये हा प्रयोग यशस्वी ठरला आणि मग महाराष्ट्रातल्या अनेक शाळांनी हे मॉडेल स्वीकारलं. 





आजवर इथल्या शाळांना हजारो शिक्षकांनी भेट दिली आहे. कुमठे बीटप्रमाणे आपणही आपल्या शाळेत हे प्रयोग यशस्वी करून दाखवू हा विश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. - स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

Sunday, 29 January 2017

विद्यार्थिनींसाठी विशेष बससेवा: मलकापूर पॅटर्न



दिल्लीमध्ये २०१२ साली ‘निर्भया दुर्घटना’ घडल्यावर सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार्‍या मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला. देशभर दाटलेली अस्वस्थता सातारा जिल्ह्यातलं छोटं शहर मलकापूरही अनुभवत होतं. खरं तर अशा घटना घडतात आणि विस्मरणातही जातात. आणि मुलींचा सुरक्षित प्रवास हा मुद्दा उरतोच. पण मलकापूर नगरपरिषदेने समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला आणि मुलींसाठी सुरक्षित बससेवा सुरू करून आदर्शच घालून दिला.
‘निर्भया दुर्घटने’नंतर मुलींच्या सुरक्षित प्रवासाचा विषय आमसभेत चर्चेला आला तेव्हा अनिता यादव या नगरसेविकेने मुलींसाठी बससेवेची कल्पना मांडली. मुलींना एकएकटं शाळा-कॉलेजला जावं लागणार नाही आणि मुलींची शाळेतली उपस्थितीही वाढेल असा यामागचा विचार. मलकापूर नगरपरिषदेचे अभ्यासू, कल्पक उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून योजनेला आकार दिला. 
एसटी बसप्रवासासाठी मुलींना पन्नास टक्के सवलत होतीच. उर्वरित पन्नास टक्के नगरपरिषदेने स्वतःच्या महिला-बालकल्याण निधीतून द्यायचं ठरवलं. एसटी महामंडळाचे तेव्हाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनीही साथ दिली. दोन बसेस राखून ठेवल्या गेल्या. मेळावे घेऊन लोकांना, विशेषत: महिलांना विश्वासात घेतलं आणि ८ जुलै २०१३ ला ‘प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियाना’अंतर्गत बससेवेचा शुभारंभ झाला. तेव्हापासून ही सेवा अविरतपणे सुरू आहे.
सकाळी ६.३० ते संध्याकाळी ७.३० या काळात दर अर्ध्या तासाने ही बस मुलींच्या दिमतीला असते. बसमध्ये कंडक्टरही महिलाच नेमल्या आहेत. त्यामुळे शिक्षणासाठीचा प्रवास आनंददायी आणि तणावरहित होतो, असं मुली सांगतात. मुख्य म्हणजे मुलींची गळती जवळपास शून्यावर आली आहे.
शाळा-कॉलेजं सुरु व्हायच्या एक महिना आधी नगरपरिषद पुढील शैक्षणिक सत्राच्या प्रवासखर्चाची पूर्ण रक्कम एसटी महामंडळाकडे जमा करते. कुटुंबांची, मुलींची, त्यांच्या शाळा-कॉलेजची माहिती जमा केली जाते. त्यानंतर एसटी पासेस दिले जातात. यासाठी वर्षाला जवळपास सात लाख खर्च येत असल्याचं मलकापूर नगरपरिषदेचे जनसंपर्क अधिकारी ज्ञानदेव साळुंखे यांनी सांगितलं. प्राथमिक शाळांपासून कॉलेजात जाणार्‍या मलकापूरमधल्या सुमारे १ हजार विद्यार्थिनी या सेवेचा लाभ घेत आहेत. दिवसेंदिवस लाभार्थी मुलींची संख्या वाढत आहे.
मलकापूर शहर आणि परिसरातील काही महाविद्यालयांना जाण्यासाठी थेट सोय नव्हती. त्यामुळे बाहेरगावावरून येणाऱ्या बसने मुलींना जावं लागायचं. विशेष बससेवा सुरू झाल्याने आणि थोड्या-थोड्या अंतरावर बसथांब्याची सोय केल्यामुळे मुलींना घरापासून केवळ पाचच मिनिटांच्या अंतरावर बस मिळू शकते. बससेवेचा मुख्य फायदा झाला गरीब कुटुंबांना. एरवी कॉलेजपर्यंत जाण्या-येण्यासाठी रोज होणारा ८० रु. खर्च या सेवेमुळे वाचला. पूर्वी कित्येक पालक मुलींना सोडा-आणायला येत. पालकांचा तो वेळ आणि खर्चही वाचला. त्यामुळे आता पालकही निश्चिंत झाले आहेत.
मलकापूर हे माजी मुख्यमंत्री पृथ्विराज चव्हाण यांच्या मतदारसंघातलं शहर. गेल्या महिन्यात आम्ही त्यांना भेटलो होतो तेव्हा त्यांनी हा बससेवेचा उपक्रम कोणत्याही छोट्या शहराला करता येण्याजोगा असल्याचं आग्रहपूर्वक म्हटलं होतं. आंध्रप्रदेशातली एक नगरपरिषद लवकरच अशी बससेवा सुरु करणार असल्याचं समजतं. महाराष्ट्रातल्या नगरपरिषदाही मलकापूरपासून प्रेरणा घेतील का?
- वर्षा जोशी-आठवले