Showing posts with label Osmanabad. Show all posts
Showing posts with label Osmanabad. Show all posts

Tuesday, 26 June 2018

रॉबिन हूड आर्मीची गोष्ट

झोपडपट्टी, पालांवरची मुले भौतिक सुखापासून, शहरातल्या सुखैनेव जीवनापासून कोसो दूर असतात. नशिबी आलेल्या दारिद्र्यात जगताना त्यांना शहरी जीवनाचे नेहमीच कुतूहल असते. मूलभूत गरजाही भागत नसलेल्या या वर्गाला आलिशान गाड्या, हॉटेलचा अनुभव मिळणे दुर्मिळच. पण, रॉबिन हूड आर्मीने ही अभिनव संकल्पना प्रत्यक्षात आणली. अंधाऱ्या झोपडीत वास्तव्य करणाऱ्या अशा मुला-मुलींना आलिशान गाड्यातून सफर घडवलीच. शिवाय चांगल्या प्रतीच्या हॉटेलमध्ये जेवणाचा आस्वाद चाखण्याची संधीही दिली. उस्मानाबाद शहरातली ही रॉबिन हूड आर्मी. समाजातील गरीब भुकेल्या व्यक्तींना अन्नदान करण्यासाठी पुढाकार घेणारी ही जागतिक स्तरावरील संघटना. होतकरू, सामाजिक जाणिवा असलेले तरुण आठवड्यातून एक वेळ गरीब व्यक्तींना जमेल तेवढं अन्नदान करतात. संघटनेला अध्यक्ष वा पदाधिकारी असत नाही. उस्मानाबाद शहरात या संघटनेने काम सुरू केलं आहे.
शहरातील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गालगतच्या सांजा चौकाजवळ कुडमुडे जोशी समाजाची वस्ती आहे. पालावर वास्तव्य करणाऱ्या या वस्तीतील २० मुला-मुलींची या आर्मीने निवड केली. त्यांना रविवारी बीएमडब्ल्यू, ऑडी, फॉर्च्युनर अशा अलिशान गाड्यांमधून फिरवून आणलं. त्यांना बार्शी रोडवरील निसर्गरम्य हातलादेवी डोंगरावर नेलं. निसर्गरम्य परिसर, मनमोहक फुलं, ससे-मोरांचा सहवास अनुभवल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाची हिरवळ पसरली. दोन-तीन तास परिसरात फिरुन झाल्यावर हातलादेवीच्या सभामंडपात या मुलांनी आपल्या अंगातील विविध सुप्त गुण दाखवून आम्हीही कमी नाही हे दाखवून दिलं. काहींनी डान्स केला तर काहींनी गाणी म्हटली. नंतर हातलादेवीवरून नामांकित अॅपल हॉटेलकडे मोटारी वळल्या. तिथल्या कर्मचाऱ्यांनी मुलांचं स्वागत केलं. त्यानंतर मुलांनी हॉटेलमधील पंचपक्वान्नाचा यथेच्छ आस्वाद घेतला. वेगवेगळे खाद्यपदार्थ मिळाल्याचा मनस्वी आनंद मुलांच्या चेहऱ्यावरुन ओसंडून वाहत होता. केवळ स्वप्नात आणि कल्पनेत पाहिलेल्या गोष्टी काही काळ का होईना रॉबिन हूड आर्मीने सत्यात उतरवल्या.
या उपक्रमासाठी अॅड विलास चौरे यांनी आर्थिक मदत केली तर राहुल गवळी, किरण गुरव यांनी स्वत:च्या गाड्या दिल्या. मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी रॉबिन हूड आर्मीच्या अक्षय माने, अॅड. मिलिंद कुलकर्णी, प्रा.मनोज डोलारे, सलमान शेख, सुरज मस्के, अक्षय सराफ, आकाश घंटे, आनंद जाधव, रणजीत माळाळे, आमीन काझी, नवज्योत शिंगाडे, नितीन देशमुख, अॅड.अविनाश गरड, अभिजीत लष्करे,रोहन लष्करे, रोहित लष्करे या रॉबिन्सनी परिश्रम घेतले.


- चंद्रसेन देशमुख.

Monday, 11 June 2018

पक्ष्यांसाठी त्यांनी बांधली १२०० घरटी









उस्मानाबादमधलं श्रीपतराव भोसले कनिष्ठ महाविद्यालय. मनोज डोलारे इथं प्राध्यापक पदावर काम करतात. पेशा शिक्षकाचा असला तरी फोटोग्राफीची आवडही त्यांनी जोपासली आहे. साधारण २००९ पासून त्यांनी पक्ष्यांचे फोटो टिपायला सुरुवात केली. नंतर १२ साली त्यांनी उत्तम दर्जाचा नवा कॅमेरा खरेदी केला. आणि आता आणखी हुरुपानं त्यांची फोटोग्राफी सुरु झाली. उस्मानाबादच्या डोंगराळ परिसरात पक्ष्यांसाठी त्यांचं फिरणं सुरु झालं. त्याच काळात बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने जिल्ह्यात पक्षीगणना केली. या गणनेत शहराच्या अवतीभवती पक्ष्यांचं प्रमाण घटत चालल्याचं निरीक्षण नोंदविण्यात आलं. पक्ष्यांचं अस्तित्व कमी होत असल्याची चिंताजनक बाब प्रा. डोलारे यांच्याही लक्षात आली. आणि त्यांनी कारणं शोधणं सुरु केलं.
वाढतं शहरीकरण, प्रदूषण आणि अतिक्रमणामुळे पक्षांचा पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊन अन्न साखळी बिघडत आहे. हे त्यांना जाणवलं आणि आता इथून पुढं ध्येय ठरलं की पक्ष्यांसाठी काम करायचं. पक्ष्यांचं स्थलांतर थांबण्यासाठी, त्यांना निवारा मिळवून देण्यासाठी, पक्ष्यांचं संवर्धन होऊन संख्या वाढण्यासाठी डोलारे यांनी प्रयत्न सुरु केले. प्रा.डोलारे यांनी स्वत:च्या महाविद्यालयापासून जनजागृती सुरू केली. संस्थेचे अध्यक्ष सुधीर पाटील यांनी मदत केली. आणि एकाचवेळी ५ हजार मातीची भांडी वाटप करण्यात आली. पक्ष्यांचे महत्त्व आणि त्यांची स्थिती सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांमध्येही पक्ष्यांप्रती जिज्ञासा तसेच आत्मीयता वाढली.
पक्ष्यांसाठी केवळ अन्न-पाणी देऊन चालणार नाही, हे लक्षात आल्यानंतर प्रा.डोलारे यांनी कृत्रिम घरटी बनविण्याचा निर्णय घेतला. कागदी रोल संपल्यानंतर उरलेल्या नळ्यांपासून कृत्रीम घरटी बनविण्यास सुरुवात झाली. ३ वर्षात अशाप्रकारची १२०० घरटी तयार करून घरोघरी देण्यात येत आहेत. ही घरटी घरांच्या अंगणात बांधण्यात आली. अर्धा फूट अंतराची नळी कापून ती एका बाजूने चिकटपट्टीने बंद केली जाते. दुसऱ्या बाजूने अर्धवट बंद करून झाडांना अडकवली जाते. त्यात पक्षी वास्तव्य करतात शिवाय पिलांना जन्म देतात. पक्ष्यांनी ही घरटी स्वीकारली आणि डोलारे यांचा हेतू सफल होऊ लागला. गेल्या पाच वर्षांपासूनच्या त्यांच्या धडपडीमुळे आता उस्मानाबादेत पक्षीमित्रांची चळवळ उभी राहत आहे.
प्रा. डोलारे म्हणतात, “फोटो काढताना पक्ष्यांचे विश्व डोळ्यात साठवित होतो. डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टी कॅमेऱ्यातून दिसल्या. पक्ष्यांचे अस्तित्व कमी होत असल्याचं निरीक्षण समोर आल्यानंतर अस्वस्थ झालो. उस्मानाबादमध्ये पक्ष्यांचे ज्ञान असणारे जाणकार कमी होते. मात्र पक्षीमित्र मारुती चितमपल्ली यांच्यासारख्या अभ्यासकांची पुस्तकं वाचत गेलो. त्यातून ज्ञान मिळालं आणि पक्ष्यांचं संगोपन करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टीवर काम करीत गेलो”. आता पक्षीमित्र म्हणून शहरातील प्रत्येक कुटुंब प्रा.डोलारे यांना ओळखू लागलं आहे. त्यांनी आवाहन केल्यानंतर समाजातून मदत मिळू लागली आहे.
- चंद्रसेन देशमुख.






Monday, 28 May 2018

असं एक गाव, गणिताशिवाय बातच नाही राव!

भूम तालुक्यातील सुकटा हे छोटंसं गाव. गावात शिरताच प्रत्येक घराची भींत आकड्यांनी रंगलेली, वर्तुळ, चौकोनांनी सजलेली दिसते. गावकऱ्यांनी अगदी मनापासून जपलेल्या या भींतीवरील मजकूर गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानात भर पाडणारा आहे. छोट्याशा खेड्यातील माध्यमिक शाळेचे शिक्षक प्रकाश यादगिरे यांच्या अभिनव कल्पनेतून ही जादू झाली आहे. यादगिरे यांनी विद्यार्थ्यांना गणित-भूमितीची सूत्र सोप्या पध्दतीने समजावून सांगण्यासाठी ही क्लृप्ती लढवली. त्यातून गावकऱ्यांनाही फायदा झाला.यादगिरे सुकटा येथील विद्यालयात १९९९ पासून कार्यरत आहेत. त्यांना विद्यार्थ्यांच्या गरजा आणि उणिवांची जाणीव होती. गणित विषयात कमी गुण मिळत असल्याने मुलं आणि पालकही निराश. त्यामुळे या विषयावर अधिक जोरकसपणे शिवाय वेगळ्या पध्दतीने काम करण्याची इच्छा यादगिरे यांच्या मनात घोळू लागली होती. या विचारातूनच गणिताची सूत्रं सोप्या पध्दतीने विद्यार्थ्यांना समजावण्यासाठी गावातील घरांच्या भिंतींनाच फळा बनविण्याची संकल्पना त्यांना सुचली. कामाला सुरुवात झाली. 
                                                                  गावातील सुमारे १५० घरांच्या भिंतींसह पाण्याच्या टाकीवरही गणिताची सूत्रं ऑइलपेंटने रेखाटली आहेत. पाचवी ते दहावीपर्यंतची गणितातील बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि समीकरणांसह बीजगणित व भूमितीमधील मूलभूत सूत्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे खेळताना-बागडताना, गावात फिरताना, शेतामध्ये जाताना सर्वत्र गणिताची सूत्रं विद्यार्थ्यांच्या दृष्टीस पडतात. या भिंती विद्यार्थ्यांच्या मनात कोरल्या गेल्या आहेत. त्यामुळे गावातील मुलांची गणिताची बौद्धीक क्षमता वाढून त्यांच्यात गोडी निर्माण झाली आहे. 
विद्यार्थ्यांच्या स्वप्नातील गणिताचं गाव त्यांनी प्रत्यक्षात आणलं आहे.
प्रकाश यादगिरे म्हणतात, ‘मी निरीक्षण करीत होतो. विद्यार्थ्यांशी चर्चा करीत होतो. तेव्हा सहज लक्षात आलं की शाळेत गणिताच्या तासाला विद्यार्थी घाबरतात. ही भीती दूर झाली पाहिजे, म्हणून मी हे काम हाती घेतलं. आता भिंतींवर रखाटलेली गणिताची सूत्रं विद्यार्थ्यांना शाळेत आल्यावर पुस्तकात दिसतात. त्यामुळे आपण कोणतेही गणित सोडवू शकतो, असा आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला आहे. हे काम हाती घेतले तेव्हा मला शासकीय फंड मिळाला असेल, असं ग्रामस्थांना वाटायचं. मात्र हे सगळं स्वखर्चातून सुरू होतं. भिंती रंगवण्यासाठी पेंटरचा शोध, त्यांच्याकडून अचूक काम करून घेणं खूप कठीण होतं. काही पेंटर स्क्वेअर-फूटाप्रमाणे दर सांगायचे. त्यामुळे तीन-चार पेंटर बदलत कितीतरी दिवस उन्हात थांबून गणिताची सूत्रं रेखाटून घेतली. हे काम पूर्ण करण्यासाठी दोन महिने लागले. मात्र, मी मागे वळून पाहिले नाही. मला विद्यार्थ्यांसाठी हे काम पूर्ण करायचंच होतं. आज विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असल्यामुळे माझ्या परिश्रमाचे चीज झालं आहे’. 

- चंद्रसेन देशमुख.

Monday, 14 May 2018

शेती विकली,दुसऱ्यांची कसली, मुलाला आयएएस बनवलं!

उस्मानाबाद जिल्ह्यातलं उमरगा तालुक्यातलं दोन हजार वस्तीचं कसगी गाव. २७ एप्रिल. संध्याकाळचे सव्वासात वाजलेले. शेतातली कामं आटपून दिलीपराव घराकडे येत होते. घरासमोर मोठी गर्दी जमली होती. दिलीपराव येताच गावकऱ्यांनी त्यांना उचलून घेत जल्लोष केला. त्यांचा मुलगा गिरीश आयएएस झाला होता. पंचक्रोशीतला तो पहिलाच आयएएस. यूपीएससीच्या परीक्षेत यंदाच्या निकालात डॉ गिरीश बदोले राज्यात पहिले तर देशात २० वे आले. दिलीपरावांच्या नजरेसमोर झर्रकन भूतकाळ तरळला. 
दिलीपराव बदोले यांची वडिलोपार्जित ६ एकर जमीन. त्यांचं शिक्षण दहावीपर्यत. मात्र मुलं गिरीश आणि आशिष यांनीे भरपूर शिकावं, मोठं व्हावं, असं त्यांचं स्वप्न. शेतीचा धंदा तर आतबट्ट्याचा. मग संसाराचा गाडा चालण्यासाठी १९ वर्षांपूर्वी त्यांनी ३० एकर जमीन वाटा पध्दतीनं (बटईनं) घेतली. 
गिरीशच्या शिक्षणाची गाडी सुरू झाली. पहिली- दुसरीपर्यंत कसगीमध्ये. तिसरी-चौथी आजोळी कासारशिरशी इथं. चौथीत तुळजापूरच्या सैनिक स्कुलमध्ये निवड. तिथे दहावीपर्यंत मोफत शिक्षण. नंतर लातूरच्या दयानंद महाविद्यालयात विज्ञान शाखेतून बारावी. पुढे मुंबईच्या जेजे वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश. इथे मात्र, फी भरण्यासाठी पैसे नव्हते. दिलीपरावांनी ४ एकर जमीन विकली. उमरगा इथल्या बँक ऑफ हैदराबादमधून अडीच लाख रुपये शैक्षणिक कर्ज घेतलं. अनंत अडचणी पार करून २०१४ मध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण झालं. तरीही गिरीश समाधानी नव्हते. त्यांना आयएएस व्हायचं होतं. कुटुंबावर कर्जाचा वाढता भार. स्पर्धा परिक्षेत यश मिळण्याची शक्यता कमी. तरीही गिरीशला आई-वडिलांनी निर्णयस्वातंत्र्य दिलं . गिरीशने तयारी सुरू केली. २०१४ च्या दरम्यान उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळ होता. शेती पिकत नसल्यानं घर चालणं मुश्किल होतं. त्यामुळे मुंबईतल्या एका कंपनीत २०१४ ते २०१७ अधूनमधून गिरीशने नोकरी केली. सोबतच दहा-बारा तास अभ्यासही.
पुण्यातल्या युनिक अकॅडमीचे तुकाराम जाधव यांचं मार्गदर्शन घेतलं. २०१४ पासून तीनदा अपयश आल्यानंतर चौथ्यांदा गिरीशने यशाला गवसणी घातली. 'या क्षेत्रात येणाऱ्या तरुणांनी कठोर परिश्रम करण्याची तयारी ठेवावी , सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा. प्रत्येक वेळी यश मिळतंच असं नाही, मात्र प्रयत्नात सातत्य ठेवलं पाहिजे ', गिरीश सांगतात. परिस्थितीचा बाऊ न करता कठोर परिश्रमांनी, जिद्दीनं परिस्थितीवर मात करणाऱ्या गिरीश यांचं यश संपूर्ण गाव साजरं करत आहे.

-चंद्रसेन देशमुख .

Thursday, 22 March 2018

मरण सोपं, विधी अवघड, ३३ वर्षात १,४४२ जणांवर अंत्यसंस्कार

वाढत्या शहरीकरणाच्या प्रभावाने असेल, संकटकाळात धावून जाणाऱ्यांची, अंत्यसंस्कारात सहभागी होणार्‍यांची संख्या घटत असल्याचं दिसून येतं. अंत्यविधीची रीतही अनेकांना ज्ञात नाही. ‘मरणं सोपं, विधी अवघड’ अशी म्हण त्यावरून रूढ होत असावी. उस्मानाबादमध्ये मात्र अशा वेळेसाठी बाळासाहेब गोरे लोकांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. एखाद्या दुर्घटनेत जखमी व्यक्तीचे मोबाईलमध्ये फोटो घेणारे शेकडो आढळतात. मात्र मदतीसाठी पुढं येणारे विरळाच. मृतदेहाला स्पर्श न करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. रिवाजानुसार अंत्यसंस्कारांचं ज्ञान असणाऱ्यांचा अभाव आहे. त्यामुळे विधीसाठी अडथळे येतात. हा अडथळा दूर करायचं काम बाळासाहेब वसंतराव गोरे यांनी सुरु केलं आहे. उस्मानाबाद नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात ते कर्मचारी म्हणून काम करतात. अंत्यसंस्काराच्या विधींना पुण्यकर्म मानत १९८४ पासून त्यांनी हे काम सुरु केलं. आज शहरात, कुठल्याही कुटुंबात एखाद्या व्यक्तीचं निधन झाल्यानंतर नातेवाईक त्यांना फोन करतात. वेळ कुठलीही असो, बाळासाहेब घराबाहेर पडतात आणि पुण्यकर्मासाठी त्यांची धडपड सुरू होते. अंत्यविधीसाठी, तिसऱ्याच्या विधीसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी त्यांना तोंडपाठ असते. त्या त्या कुटुंबातल्या नातेवाइकाला सोबत घेऊन ते बाजारपेठ गाठतात. जाळण्यासाठी इंधन, तिसऱ्यासाठी लागणारे साहित्य घेऊन ते ठिकाणी पोहाेचतात. त्यांची ही सेवा शहरातल्या प्रतिष्ठितांपासून सामान्य कुटुंबांपर्यंत आहे. केवळ हिंदू नव्हे, तर ख्रिश्चन धर्मातल्या व्यक्तींवरही त्यांनी अंत्यसंस्कार केले आहेत. आजवर ३३ वर्षात त्यांनी १,४४२ व्यक्तींचे अंत्यविधी केले आहेत.
तांबरी भागात त्यांचं घर आहे. जवळचं राहणाऱ्या उत्तमराव नलावडे यांना हे अंत्यसंस्काराचं काम करताना त्यांनी अनेकदा पाहिलं. आणि तेच त्यांच्या मनात घर करून राहिलं. त्यांचं हे काम बघूनच “मलाही अंत्यसंस्कारासाठी लोकांना मदत करण्याची प्रेरणा मिळाली,’’ असं बाळासाहेब सांगतात
पूर्वाश्रमीचे खो-खोचे राष्ट्रीय खेळाडू ही, त्यांची आणखी एक ओळख. १९७४ साली त्यांनी दहावीत असताना भोपाळला पहिली राष्ट्रीय खो-खो स्पर्धा जिंकली होती. त्याबद्दल त्यांना तीन वर्षे शिष्यवृत्ती मिळाली. खेळातून शिष्यवृत्ती मिळविणारे बाळासाहेब जिल्ह्यातले पहिले खेळाडू आहेत. अडचणीच्या काळात धावून जाणारे बाळासाहेब गोरे यांच्या या सेवेचा उस्मानाबादकरांना हेवा वाटतो.

- चंद्रसेन देशमुख .

Thursday, 8 February 2018

आहे तालासुराची श्रीमंती, तरीही..

प्रभाकर जगदाळे. उस्मानाबादेत राहणारा हा ज्येष्ठ संगीत कलाकार. त्यांचं नाव माहिती नाही, असा उस्मानाबादकर शोधूनही सापडणार नाही. महाराष्ट्र म्युझिक क्लब, कुमार ऑर्केस्ट्रा, मेमोरियल मेलडी, यादे पुरानीमध्ये कोंगोट्रिपल वादन आणि गायन करून 1972 ते 1995 हा काळ गाजविलेला हा कलावंत. सुमारे अर्ध शतक संगीत क्षेत्रात अव्याहतपणे काम करतोय. पण, पदरी यश नाही. ज्या गाण्यांसाठी त्यांनी संगीत दिलं, त्या गाण्यांवर कॅसेट कंपन्यांनीच हक्क सांगितला. आणि जगदाळे मोबदल्यापासून वंचित राहिले. ताल, सुरांची श्रीमंती. पण कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पैसे नाहीत. शेवटी त्यांनी राहतं घर विकलं. त्यातून आलेल्या पैशातून वाद्यं खरेदी केली. आणि संगीत अकॅडमी सुरु केली.
आराधीवर्गामध्ये लोकप्रिय असणार्‍या ‘तुळजापूरची जत्रा’,‘माता तुळजाभवानी’, ‘तुळजाभवानी अमृतवाणी’ या आल्बममधल्या गाण्यांना जगदाळे यांनी संगीत दिलं आहे. ‘प्रीतीचा बंगला’ या कोळीगीतांचं लेखन आणि संगीत जगदाळे यांनी केलं आहे. ‘सत्यसावित्री’ चित्रपटातील गाण्यांसाठी जगदाळे यांनी संगीत दिलं असून, शशीकांत मुंबरे, शंकुतला जाधव, अंजली नांदगावकर, संचिता मोरजकर, श्रीकांत नारायण (मुंबई) यांनी ही गाणी गायिली आहेत. ‘सत्य सावित्री’, ‘ओटी जगदंबेची’, या मराठी चित्रपटातील एकूण नऊ गाण्यांना जगदाळे यांचं संगीत आहे.
पदरी निराशा, अपयश आणि उपेक्षा आली तरीही ते खचले नाहीत. कलेचा हा वारसा पुढच्या पिढीकडे सुपूर्द करण्यासाठी त्यांनी इंडो वेस्टर्न म्युझिक कला अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला. संगीत अकॅडमीसाठी लागणाऱ्या गिटार, होम थिएटरसाठी लागणारे ५० हजार रुपयेही हाती नव्हते. त्यांनी घरविक्रीतून आलेली रक्कम यासाठी खर्च केली.
जगदाळे यांनी तयार केलेल्या किंवा संगीत दिलेल्या गीताला राज्यस्तरावर नेण्यासाठी त्यांची ताकद कमी पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘निर्मल भारत, सुंदर भारत’ या गाण्याची रचना त्यांनी केली असून, या गाण्याचं रेकॉडिंगही झालं आहे. नुकतीच त्यांनी दोन देशभक्तीपर गाणी तयार करून संगीतबध्द केली आहेत. गाणी दर्जेदार असूनही या गाण्यांचा आवाज समाजापर्यंत पोहोचला नाही. शिवाय पूर्वानुभव विचारात घेता ही गाणी कुणाच्या हाती द्यावीत, असा प्रश्न आता जगदाळे यांना पडला आहे.

- चंद्रसेन देशमुख.


Wednesday, 3 January 2018

एक गाव कोथिंबिरीचं, लखपती शेतकऱ्यांचं..!

भाज्यांची सजावट ज्या कोथिंबिरीशिवाय पूर्ण होऊ शकत नाही, तिने मुंबईकरांच्या भाज्यांमध्ये चव निर्माण केलीच; पण याच कोथिंबिरीचं उत्पादन घेणाऱ्या गावकऱ्यांचंही जीवन बदलून टाकलं. गावातल्या प्रत्येकाला लखपती बनवून कोथिंबीरीने अल्प खर्चात मुबलक उत्पन्नाचा मंत्रच गावकऱ्यांना दिला. उस्मानाबाद तालुक्यातील भंडारी या छोट्याशा खेड्यातली ही यशकथा. गेल्या १५ वर्षातला हा बदल. खास कोथिंबिरीच्या वाहतुकीसाठी गावकऱ्यांनी सुमारे ३५ आयशर टेम्पो घेतले आहेत, हे विशेष.
उस्मानाबाद शहरापासून ३० किलोमीटरवरच्या भंडारीमध्ये कुणी शेतकरी पेरणीच्या तर कुणी कोथिंबीर काढणीच्या कामात मग्न आहेत. दिवसभर काढणी, बांधणी करून सायंकाळी टेम्पो मुंबईच्या दिशेने रवाना होतो. आणि दरवळणाऱ्या कोथिंबिरीच्या सुवासात शेतकऱ्यांची सायंकाळ सुसह्य होते. हे नगदी पीक. त्यात गुंतवणूक कमी. त्यामुळे शेतकऱ्यांना हा व्यवसाय लाभाचा ठरत आहे. भंडारीत १२०० शेतकरी आहेत. जवळपास प्रत्येक कुटुंबात कोथिंबिरीचं उत्पन्न घेतलं जातं. अवघ्या ४० - ४५ दिवसांत कोथिंबीर काढणीला येते. आणि रान (जमीन) दुसऱ्या पिकासाठी सहज तयार करता येतं. त्यामुळे शेतकरी या पिकाकडे अधिकच वळू लागले आहेत. कितीही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न निघालं तरी त्याचा दरावर परिणाम होत नाही. अलीकडे तर गावातच व्यापारी तयार झाल्यामुळे बांधावर उभं राहून कोथिंबिरीचा सौदा केला जातो. काढणीचा खर्चही व्यापारीच करतात. शिवाय कोथिंबीरकाढणीपूर्वीच पैसेही मिळतात.
काळ्याभोर जमिनीचं शिवार, ही भंडारीची जमेची बाजू. पण, निसर्गाच्या बेभरवशामुळे इथले शेतकरी हवालदिल होते. कामेगाव, कास्ती आदी खेड्यातून दोन छोटे टेम्पो भरून मुंबईच्या बाजारात पालेभाज्या जात होत्या. हे १५ वर्षापूर्वीच चित्र. त्यानंतर भंडारीतील काही शेतकऱ्यांनी कोथिंबिरीची पेरणी केली. या टेम्पोतूनच कोथिंबीर मुंबईला पाठविण्यात येऊ लागली. कोथिंबिरीची गुणवत्ता आणि मुंबईच्या बाजारपेठेत मिळणारी मागणी लक्षात घेऊन मुंबईच्या काही व्यापाऱ्यांनी भंडारी गाव गाठलं. त्यांनी शेतकऱ्यांना कोथिंबिरीचं उत्पादन घेण्यास उद्‍युक्त केलं. हळहळू उत्पादन वाढलं. इथले टेम्पोचालकच आता व्यापारी झाले आहेत. गावातून कोथिंबीरीचे फड विकत घेऊन ते त्याच्या जुड्या मुंबईच्या बाजारात पोचवतात. जुलै महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत कोथिंबीरीचे उत्पन्न टप्प्या-टप्प्याने घेतलं जातं. काही शेतकरी बारमाही हे पीक घेतात.
बाजारात कोथिंबीरीच्या दराचा चढ-उतार लक्षात घेऊन व्यापारी शेतकऱ्यांच्या कोथिंबीरीचा दर ठरवितात. पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांच्या दरम्यान कोथिंबीर काढणीला येते. एकरवर हा दर ठरतो. यावर्षी बाजारपेठेत कोथिंबिरीला चांगला दर मिळाला. त्यामुळे ५० हजार ते दीड लाख रुपयाला एकरभर कोथिंबीर विकली गेल्याचं शेतकरी प्रदीप पाटील यांनी सांगितलं. पाटील यांच्याकडे सर्वाधिक म्हणजे १० एकर कोथिंबीर आहे. कोथिंबीरीशिवाय ते अन्य उत्पन्न घेत नाहीत. पूर्वी उडीद-मुगाची शेती करत असताना अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हतं. मात्र कोथिंबिरीमुळे चांगली प्रगती झाल्याचं ते सांगतात. यावर्षी १० एकरातून १२ लाख रुपयांची कोथिंबीर निघाल्याचं त्यांनी सांगितलं. 
 चंद्रसेन देशमुख.

Friday, 1 December 2017

दुसऱ्या वर्षीही मांजरा नदीचं पात्र तुडूंब, ३५० हेक्टरवरील शेती बहरली, भूजल पातळीमध्येही झाली वाढ

|दुष्काळग्रस्त जिल्ह्याला यावर्षी समाधानकारक पावसाने दिलासा दिला आहे. आजही नद्या-नाल्यांमध्ये, शेत-शिवारांमध्ये जलसंचय दिसत आहे. जलयुक्त शिवारच्या झालेल्या कामांमुळे हे सकारात्मक चित्र दिसत आहे. २०११ मध्ये समाधानकारक पाऊस होऊनही पाण्याचा संचय झाला नव्हता. मराठवाड्यात तुलनेने उस्मानाबाद जिल्ह्यात अधिक क्षमतेची, दर्जेदार आणि शेतीला उपयुक्त ठरतील, अशी कामे झाली. यासाठी 'अहिल्याबाई होळकर जलमीटर पुरस्कार' उस्मानाबाद जिल्ह्याने मिळवला आहे. लोकसहभाग आणि शासनाच्या पुढाकारातून कळंबच्या मांजरा नदीचे खोलीकरण करण्यात आले होते. दुसऱ्या वर्षीही हे नदीपात्र सुमारे २२०० मीटर तुडुंब भरले असून, त्यातून ३५० हेक्टर जमिनीला लाभ झाला आहे. शिवाय शहरासह परिसरात भूजल पातळीत वाढ झाली आहे.लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मांजरा प्रकल्पावरील मांजरा नदीचे खोलीकरण १० एप्रिल ते १५ जून २०१६ दरम्यान करण्यात आले. कळंब शहराच्या उत्तरेला असलेल्या या नदीच्या पुनरूज्जीवनासाठी रोटरी क्लब, व्यापारी संघटना, शहरातील नागरिक आणि शासनाने पुढाकार घेतला होता. हे काम ६६ दिवसांत पूर्ण झाले. या कामातून ३ लाख, ३० हजार क्युबिक मीटर गाळ निघाला होता. या गाळातून सुमारे १५० हेक्टर जमीन सुपिक झाली असल्याचे रोटरी क्लबचे तत्कालीन अध्यक्ष तथा मांजरा नदी पुनरुज्जीवन समितीचे अध्यक्ष विश्वजीत ठोंबरे यांनी सांगितले.
शहरी भाग असूनही शासनाने पहिल्यांदाच मांजरा नदीच्या खोलीकरणासाठी ८४ लाख, ७ हजार रुपये दिले होते. लोकसहभाग ४० लाख, ४८ हजार, २४ रुपयांचा होता. एकूण १ कोटी, २४ लाख, ५५ हजार, ९० रुपये इतका खर्च झाला. कामानंतर नदीचे पात्र ३ मिटरपर्यंत खोल तसेच ७ मिटरपर्यंत रुंद झाले. नदीमध्ये ३३ कोटी लिटर पाणीसाठा झाला आहे. नदीच्या पुनरूज्जीवनमुळे शहरातील भूजल पातळीत वाढ झाली आहे.
कळंब शहराच्या उत्तरेला असलेल्या या नदीच्या जवळपास सव्वादोन किलोमिटरचा भाग पाण्याने तुडूंब भरलेला आहे. नदीच्या एका बाजूला शहर आणि दुसऱ्या बाजूला शेती, असे चित्र आहे. याच नदीवरून अंबाजोगाई रस्ता जातो. छायाचित्रकार सुखदेव गायके (येरमाळा, ता.कळंब) यांनी ड्रोनद्वारे चित्र टिपल्यानंतर नदीचा विस्तीर्ण परिसर, शेती आणि कळंबचे मनमोहक सौंदर्य दिसत होते.


- चंद्रसेन देशमुख.

Monday, 2 October 2017

सेवानिवृत्त अधिकारी, तरीही झाडतोय रस्ता..

गांधी जयंती विशेष -
भल्या पहाटे उठून हातात फावडं, खुरपं आणि झाडू घेऊन रस्त्यावर स्वच्छता करत फिरणारा सेवानिवृत्त अधिकारी पहायचा असेल तर उस्मानाबादमधल्या लिंबोणी बागेला भेट द्या. 7 वर्षापूर्वी जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागात कक्ष अधिकारी या पदावरून ते निवृत्त झाले.
लक्ष्मण दगडू धाकतोडे. लिंबोणी बागेतील जिजाऊ चौकाचा परिसर चकाचक ठेवणारी ही व्यक्ती सामान्य नाही. परिस्थितीने गांजलेली तर मुळीच नाही. किंवा कुणाकडून शाबासकी, बक्षीसी मिळावी म्हणूनही त्याची धडपड नाही. आपापला परिसर प्रत्येकाने स्वच्छ ठेवावा, हा संदेश देण्यासाठी, आपल्या परिसरात रोगराई निर्माण होऊ नये, संतांनी सांगितलेला मूलमंत्र जपण्यासाठी त्याची ही सगळी उठाठेव सुरू आहे.
उस्मानाबादमधील कळंब तालुक्यातील शिरढोण गावातले लक्ष्मण धाकतोडे. निवृत्तीच्या दिवसापासून त्यांनी स्वच्छतेच्या कामात स्वत:ला झोकून दिलं आहे. त्यांना दोन विवाहित मुली, एक मुलगा आहे. मुलगा पुण्यातील कात्रज भागात व्यवसाय करतोय. स्वतःचं पेन्शन, मुलाची मिळकत यावर आराम करायचं सोडून धाकतोडे पहाटे उठून गल्लीभर स्वच्छता करायला निघतात. रस्त्यावर पडलेला कचरा गोळा करून एकत्र करतात. गेल्या सात वर्षापासूनचा त्यांचा हा नित्यक्रम. नाल्यातील घाण फावड्याने बाहेर काढणे, त्यानंतर हा कचरा घंटागाड्यांमध्ये टाकणे, परिसरात रस्त्यालगत आलेले गवत खुरप्याने काढणे आणि कुणाच्याही भावना न दुखवता स्वच्छता राखण्याचा संदेश देणे, असा त्यांचा ठरलेला दिनक्रम. या स्वच्छतेच्या दुतामुळे गल्ली स्वच्छ चकाचक दिसते.



  उस्मानाबादेत पालिकेच्या कर्मचाऱ्यांची स्वच्छता कागदावर अधिक, प्रत्यक्षात कमीच असा त्याचा अनुभव या भागातील नागरिकांचा अनुभव. धाकतोडे यांच्या कामाने खरंतर कर्मचाऱ्यांचीही सुटका झाली. कर्मचारी येण्यापूर्वीच धाकतोडे परिसर स्वच्छ करून ठेवतात. ते म्हणतात, “माझ्यावर बालपणीपासून स्वच्छतेचे संस्कार आहेत. आमच्या गुरूजींनी शाळेत दुसरीमध्ये दिलेली ही शिकवण मी अंगिकारली आहे. सेवानिवृत्तीनंतर गप्पा मारण्यात वेळ घालविण्यापेक्षा स्वच्छता करून परिसर चांगला ठेवावा, या भावनेतून काम हाती घेतलं. माझं काम बघून आता काही नागरिक आपआपल्या भागापुरती स्वच्छता करतात. प्रत्येकाने आपल्या स्वत:पुरती स्वच्छता ठेवावी, हीच अपेक्षा आहे. या कष्टाच्या कामामुळे माझे आरोग्यही उत्तम आहे. कधीही दवाखान्यात जाण्याची वेळ आली नाही.”
खरं तर संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज यांच्या शिकवणुकीचा, त्यांनी घालून दिलेल्या मार्गाचा वर्तमानात विसर पडत चाललाय. दूरचित्रवाहिन्यांवर आणि पेपरात छबी येण्यापुरतं हातात झाडू घेतलेले नेत्यांचे चेहरे पाहिल्यानंतर लोकांना किळस येते. अशा ढोंगी पुढाऱ्यांना सणसणीत चपराक देणारं धाकतोडे यांचं काम उस्मानाबादच्या लिंबोणी बागेत पहायला मिळते.


- चंद्रसेन देशमुख.

Sunday, 24 September 2017

दोघंही अनाथ, पण त्यांच्यासाठी सरसावले अनेक हात, दोन जीवांचा विवाहसोहळा..

ते दोघं अनाथ. ना नाव, ना गाव. ना आई, ना वडील. पण, त्यांच्यासाठी कुणी मुलीचे तर कुणी मुलाचे मामा बनून पाठीशी उभे राहिले. पुरोहिताने शुभमंगल सावधान, म्हणताच शेकडो हातांनी त्यांना शुभाशिर्वाद दिले आणि या अनाथ दांपत्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. 



उस्मानाबाद शहरालगतच्या खेडपाटीजवळील स्वआधार गतीमंद मुलींच्या बालगृहात 13 सप्टे रोजी सनईचे मंगलमय सूर घुमत होते. यावेळी उस्मानाबादचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, ज्येष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ.अभय शहापूरकर यांची उपस्थिती होती. सोहळ्याची महिनाभरापासून तयारी करण्यात येत होती. रांगोळ्या, तोरणांनी सजलेलं बालगृह, दारी मंडप, सनईच्या मंगलमय सुरांमध्ये वऱ्हाडीमंडळींची सुरू असलेली लगीनघाई.
‘स्वआधार गतीमंद बालगृहा’त अंजली आणि सुजितकुमार विवाहबध्द झाले. अंजली कळंबच्या ‘सहारा अनाथ बालगृहा’त वाढली तर सुजितकुमार पुण्यात. दोघांना कुणी नातेवाइकही नाहीत. अंजली सज्ञान झाली. आणि संस्थेचे सचिव शहाजी चव्हाण यांच्याकडे तिच्या विवाहासाठी प्रस्ताव आला. चव्हाण यांनी पुण्यातल्या सुजितकुमारची माहिती घेतली. त्यानंतर अंजलीच्या विवाहाची तयारी सुरू झाली. अंजली आणि सुजितकुमार यांच्या संसारासाठी लागणाऱ्या साहित्यापासून विवाहाच्या निमंत्रणपत्रिकेपर्यंत सगळी कामं करण्यासाठी अनेक हात पुढे आले. कुणी भांडी, फ्रीज, कुलर, कुणी रूखवत तर कुणी पैसे दिले. विशेष म्हणजे 6 महिने पुरेल इतकं किराणा साहित्यही त्यांना देण्यात आलं. उस्मानाबादेतील पत्रकारांनी तसेच समाजसेवी तरुणांनी पुढाकार घेतला आणि बुधवारी थाटामाटात विवाह पार पडला.
कळंब रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉ.सुनिल पवार यांनी मुलीचे मामा तर यशश्री क्लासेसचे संचालक प्रा.रवी निंबाळकर मुलाचे मामा म्हणून उभे राहिले. यावेळी गतीमंद बालगृहातील मुली, कळंबच्या बालगृहातील विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते. विवाहानंतर सजविलेल्या वाहनातून वाजतगाजत नवदांपत्य पुण्याच्या दिशेने रवाना झालं. नांदा सौख्यभरे!

Sunday, 17 September 2017

‘तिरकीटधा’नं घडवलं



उस्मानाबाद जिल्हा. उमरगा तालुका. इथलं कराळी गाव. इथले तबलावादक खंडेराव मुळे. अभंग, भावगीत, गवळण, भारूड, भक्तीगीत, आंबेडकरी गीते - कुठल्याही गाण्याचा कार्यक्रमाला खंडेराव मुळेंची तबलासाथ उल्लेखनीय असते. मुळे दोन्ही डोळ्यांनी अंध. त्यामुळे ते तबला वाजवायला कसं, कुठं शिकले असतील असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यांची तबला वादनाची सुरुवातच रंजक आणि रोचक वातावरणात झाली.
मुळे यांचं लहानपण कराळीत गेलं. तिथं शेजारी राहणाऱ्या एकनाथ पांचाळ यांच्या घरी नेहमी भजनाचा कार्यक्रम व्हायचा. मुळे यांनी पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संप्रदायाचा मार्ग धरला. पांचाळ यांच्या हाताखाली मुळे तयार होऊ लागले. आता तबल्यातल्या पुढच्या शिक्षणाचे त्यांना वेध लागले. त्यासाठी लातूरच्या पंडित शांताराम चिगरी यांच्याकडे जायचं ठरलं. इथून पुढं मात्र मुळे यांना अनंत अडचणीना तोंड द्यावं लागलं. कारण लातूरला जायचं तर बसचा प्रवास. दोन वर्षे त्यांनी रोज हा प्रवास केला तर दोन वर्ष लातूरलाच घर केलं. या धडपडीचं फळही त्यांना तबला अलंकार या पदवीतून मिळालं. निव्वळ तबल्यातच नाही तर गायन कलेतही त्यांनी संगीत विशारद पदवी मिळवली. 




तबल्याची साथ, हार्मोनियमचे स्वर आणि सुरेख आवाज हा मुळे यांच्या कार्यक्रमाचा युएसपी. मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘भीम निळाईच्या पार’, हा कार्यक्रम महाराष्ट्रात १०० ठिकाणी सादर केला. तसंच ‘आपलं घर’ या नळदुर्ग संस्थेतील मुलांसाठी राज्यभर ‘तारे समानतेचे’, हा गाण्याचा कार्यक्रम सादर केला. त्यातून मिळालेला निधी संस्थेतील मुलांसाठी देण्यात आला. मुळे यांनी सध्या उस्मानाबाद येथे संगीत अॅकॅडमी सुरू केली असून, ते नव्या मुला-मुलींना संगीताचे धडे देत आहेत. मुळे सांगतात, “सामान्य कुटुंबातील व्यक्ती असूनही संगीतामध्ये मानसन्मान मिळाला. नवीन पिढीने या क्षेत्राकडे वळायला हवं. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये संगीतात प्रावीण्य मिळविलेल्या व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. मला संगीतामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळाली”. 


- चंद्रसेन देशमुख.

Monday, 31 July 2017

अपमानातून सन्मानाकडे



१४ जुलै. उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातलं दांडेगाव. विद्यार्थ्यांची अदालत भरलेली. उघड्यावर शौचाला बसणार्‍या २३ जणांना पकडून विद्यार्थ्यांसमोर हजर करण्यात आलं. या सर्वांना प्रत्येकी २०० रुपये दंडासह परिसर स्वच्छ करण्याची शिक्षा ठोठावण्यात आली. या कारवाईचा धसका घेऊन गावकऱ्यांनी शौचालय उभारणीचं नियोजन सुरू केलं. ३६ कुटुंबांनी ३० शौचालयांसाठी, त्याच रात्री उशिरापर्यंत खड्डे खोदून बांधकामास सुरुवात केली. त्यानंतर अशीच कारवाई १५ ते १८ जुलैदरम्यान सुकटा, भवानवाडी, पाडोळी या गावांत करण्यात आली. आता तिकडेही शौचालय बांधण्याच्या कामाला जोरदार सुरूवात झाली आहे.
उघड्यावर शौचाला जाण्याची मानसिकता बदलावी म्हणून आपल्याकडे अनेक युक्त्या-प्रयुक्त्याशोधून काढल्या जातात. उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे सीईओ आनंद रायते यांनी संपूर्ण जिल्ह्यात हागणदारीमुक्त अभियान कार्यक्रम सुरू केला असून, यात उघड्यावर शौचाला जाणाऱ्या गावकऱ्यांसाठी अदालत भरवली जाते. अदालतीत गावातले विद्यार्थी अशा गावकर्‍यांना शिक्षा बजावतात. पालकांत बदल घडवून आणण्यासाठी मुलांना सक्रीय करण्याचा पर्याय लागू पडतो आहे.
जिल्ह्यांत अधिकारी-नागरिक यांची गुडमॉर्निंग पथकं तयार केली आहेत. प्रत्येक गावात भल्या पहाटे पथक पोचतं. सोबत एक-दोन पोलीस असतात. उघड्यावर शौचासाठी गेलेल्या नागरिकांचे फोटो काढून त्यांना फुलं भेट देत ‘गांधीगिरी’ करण्यात येते. त्यानंतर या गावकऱ्यांची ‘लोटापरेड’ गावच्या पारावर आणली जाते. तिथे विद्यार्थ्यांची अदालत सुरू होते. विद्यार्थ्यांपैकीच कोणी वकील, न्यायाधीशाची भूमिका वठवतात आणि खटल्याची सुरूवात होते. कधी रोख रकमेच्या दंडाची तर कधी गावातील सार्वजनिक ठिकाणी झाडू मारण्याची शिक्षा सुनावली जाते. दंडाची रक्कम ग्रामपंचायतीच्या खात्यावर जमा केली जाते. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांनी गावस्तरावर असा उपक्रम राबवावा, अशा सूचना सीईओ रायते यांनी दिल्या आहेत.
आतापर्यंत ४०६ लोटाबहाद्दरांवर कारवाई करून त्यांच्याकडून प्रत्येकी २०० रुपये प्रमाणे ८१, २०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. शिक्षेचा सुपरिणाम म्हणून गावाची, मंदिराची आणि शाळेच्या परिसराची स्वच्छता झाली आहे. कारवाई करण्यात आलेल्या ४०६ लोटाबहाद्दरांपैकी ३५० जणांनी शौचालय बांधकाम तातडीने सुरुवात केली आहे.
विद्यार्थी अदालत या उपक्रमाचं जिल्ह्यात कौतुक होत आहे. विद्यार्थी अदालत उपक्रमाला पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व्ही. जे. वाघमारे मार्गदर्शन करतात. सीइओ रायते म्हणतात, "देशाने विविध क्षेत्रात प्रगती साधली. मात्र, स्वच्छतेच्या बाबतीत अजूनही आपण मागे आहोत. गावकऱ्यांना आपल्या मुलांकडूनच स्वच्छतेचं महत्व सांगितलं जावं, त्यांच्याकडून गावकऱ्यांसमक्ष अपमान झाल्यानंतर ईर्षेने पालकांनी घरी तात्काळ स्वच्छतागृह बांधावं, असा या उपक्रमामागचा हेतू आहे."
दांडेगावतील अन्नपूर्णा भोगील म्हणाल्या, “गावकऱ्यांच्यासमोर विद्यार्थी न्यायालयाने शाळेतील परिसर झाडण्याची शिक्षा दिल्यामुळे मला अपमान झाल्यासारखं वाटलं. म्हणून मी शौचालय बांधायला सुरुवात केली आहे. शौचालयाच्या गरजेकडे मला आहे. मी दुर्लक्ष केलं होतं. आता मला शौचालय बांधण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच माझा सन्मान आहे.”

- चंद्रसेन देशमुख.

Thursday, 13 July 2017

लोहाऱ्याने झुगारली अंधश्रध्दा; उभारल्या बहुमजली इमारती


उस्मानाबाद जिल्ह्यातला लोहारा तालुका. लोकसंख्या १५ हजार. घरांची संख्या १९००. इथल्या नागरिकांना घरावर मजला चढविण्याची अलिखित बंदी होती. खरं तर, त्यामागे होती अंधश्रध्दा. लोहारा शहरापासून चार किमीवर मार्डी गावात जिंदावलीचा दर्गा आहे. परिसरातील गावांमध्ये या दर्गाहच्या घुमटापेक्षा उंच घर बांधल्यास कुटुंबाची वाताहत होते, वंश बुडतो अशी अंधश्रध्दा आहे. २०१० मध्ये सर्वप्रथम लोहाऱ्यात बहुमजली इमारत बांधण्याचा निर्णय पौर्णिमा लांडगे यांनी घेतला. तेव्हा अनेकांनी त्यांना भीती घातली. मात्र, कुठलीही अंधश्रध्दा न बाळगता त्यांनी एक मजल्याचं घर बांधलं. आणि दोन वर्षात घर बांधून त्या स्वत:च्या घरात राहण्यासाठी गेल्या. 
अंधश्रध्देचे भूत उतरण्यासाठी पौर्णिमा लांडगे यांच्यासह त्यांचे पती जगदीश लांडगे, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष नेताजी गोरे आदींनी पुढाकार घेतला. लांडगे या शिक्षिका असून लोहारा नगरपालिकेच्या नगराध्यक्षा आहेत. त्यांचे पती जगदीश लांडगे तलाठी आहेत. 
आता शहराने बदल स्वीकारला आहे. आता इथं २५ पेक्षा अधिक बहुमजली घरं आहेत. आणि नागरिकांच्या मनातली बहुमजली घरांची भीतीही संपली आहे. प्रशासकीय इमारतही आता बहुमजली झाली आहे.
लांडगे म्हणतात, “घर बांधताना आम्हालाही काही लोकांनी श्रध्दा सोडू नका, असा सल्ला दिला होता. वास्तविक, आम्ही श्रध्देच्या बाजूने आहोत. आणि अंधश्रध्देच्या विरोधात आहोत, हे दाखवून दिलं. आम्ही देवाची भक्ती करतो. मात्र, त्याचा आणि बहुमजली इमारतींचा संंबंध येत नाही. आम्ही निर्णय घेतल्यानंतर संपूर्ण शहराने आता बहुमजली इमारती बांधण्यास सुरुवात केली आहे. ही समाधानाची बाब असून, प्रत्येकाला श्रध्दा ओळखता यायला हवी, असं वाटतं”.
- चंद्रसेन देशमुख.

Wednesday, 21 June 2017

किशोरींसाठी अक्षय्य 'उर्जा'

सुजाण शिक्षक, जाणत्या शाळा :
वय वर्षे 11 ते 19 – तारुण्याची सुरुवात. सळसळता उत्साह, कष्ट करण्याची तयारी हे सगळं याच वयात असतं. पण मुलींसाठी हेच वय ‘सोळावं वरीस धोक्याचं’ म्हणत बंधनं घालणारं आणि ‘सातच्या आत घरात’ यायला लावणारंही असतं. अनेक ठिकाणी “आता लहान आहेस का गं तू? काय पोरांसारखी फिदीफिदी हसते ? अंगभर कपडे घाल, आता मैदानात खेळायला जाऊ नको” असं बोलणंही मुलींच्याच वाट्याला येतं.
समाजातला मोठ्ठा हिस्सा आजही मुलींना त्यांच्या खेळण्या- बागडण्याच्या आणि आत्मनिर्भरतेच्या हक्कापासून वंचित ठेवतोय, हे वारंवार दिसून येतं. उस्मानाबादच्या तत्कालीन सीईओ सुमन रावत यांनीही हे हेरलं, आणि या उमलत्या कळ्यांसाठी ‘ऊर्जा’ उपक्रम सुरू केला. 2012 साली प्रारंभ झाला. 11 ते 19 वयोगटातल्या मुलींसाठी हा उपक्रम आहे. यातूनच ‘किशोरी उत्कर्ष मंच’ या व्यासपीठाची निर्मिती करण्यात आली.


या मंचातंर्गत वयात येणाऱ्या मुलींना डॉक्टरांकडून मार्गदर्शन दिलं जातं. मासिक पाळीची शास्त्रीय माहिती, स्वच्छतेची आवश्यकता आणि लैंगिक शिक्षण दिलं जातं. व्यायाम आणि पोषक आहाराचं महत्त्व पटवून दिलं जातं. मुलींच्या घटत्या जन्मदराविषयीचं प्रबोधन करुन मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी जनजागृतीचे प्रयत्न केले जातात. स्त्रियांना कायद्याने दिलेले हक्क, माणूस म्हणून त्यांचे असणारे हक्क, आरोग्यविषयक हक्क अश्या बाबींवर वेळोवेळी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं जातं. प्रबोधनासाठी रुढी परंपरा आणि विविध विषयांवर गटचर्चा आयोजित केल्या जातात. निबंध, वक्तृत्त्व आणि वादविवाद स्पर्धाही घेतल्या जातात. माहितीपट, पथनाट्य, गाणी यांच्याद्वारे हा 'किशोरी उत्कर्ष मंच' सामाजिक जागृतीचे कामही करतो आहे.

शारीरिक विकासासाठी खेळ आवश्यक. त्यासाठी व्यायाम महत्त्वाचा. हे जाणून त्यांना ज्युडो- कराटेचं मोफत प्रशिक्षण देण्यात येतं. स्वसंरक्षणासाठी मुलींचा आत्मविश्वास वाढवला जातो. हिमोग्लोबिनची वेळोवेळी चाचणी केली जाते. शिवाय किशोरींसाठी एक हेल्पलाईनही सुरु केली आहे, ज्याद्वारे छेडछाड, लैंगिक छळ अथवा कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार मुली करु शकतात. 180023322688 हा हेल्पलाईन नंबर प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे. प्रत्येक शाळेत मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असावं, असा आग्रह हा ‘ऊर्जा’ उपक्रम धरतो.
याशिवाय मुलींच्या कलागुणांना वाव मिळेल, अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. मुलींना आवर्जून आडनावाऐवजी प्रथम नावानं हाक मारली जाते. आपल्या आयुष्याचे सर्व निर्णय घेण्याचा अधिकार आपल्याला आहे, याचं भान प्रत्येक मुलीला दिलं जातं. मुलींचा सामूहिक वाढदिवस साजरा होतो, त्यांना वेगवेगळ्या शासकीय संस्थांमध्ये आणि कारखान्यात नेऊन कामकाजाचे प्रत्यक्ष धडे दिले जातात. प्रत्येक शाळेत या ‘ऊर्जा ’ उपक्रमाची समन्वयक म्हणून एका शिक्षिकेची नेमणूक करण्यात आलेली आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे 180 शाळांमधील विद्यार्थिनी या उपक्रमात सहभागी आहेत. गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम अतिशय उत्तमरीत्या चालू आहे. उस्मानाबादच्या सीईओ सुमन रावत यांची ठाण्याला बदली झाली तरी नंतर आलेले प्रशासकीय अधिकारी आणि उत्साही मुलींनी हा ‘ऊर्जा’ उपक्रम सुरु ठेवलेला आहे. 
संकलन सहाय्य- रमेश कांबळे, विषयसाधनव्यक्ती आणि शहनाझबानो औसेकर, उस्मानाबाद 
लेखन- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, 

Sunday, 4 June 2017

ll गुरूजींना लागला लळा l ३६५ दिवस भरते शाळा ll


उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब तालुक्यातलं एकुरगा गाव. इथल्या जिल्हा परिषद शाळा शिक्षकाला शाळेचा इतका लळा लागला की त्याने पत्नीच्या मदतीने शाळेचं नंदनवन करून टाकलं आहे. इतकंच नाही, तर वर्षातले ३६५ दिवस शाळा सुरू ठेवण्याचा आगळावेगळा उपक्रमही त्याने घडवून आणला. चार वर्षापूर्वी, शिवदास भागवत यांना सहशिक्षक पदावर
नियुक्ती मिळाली, तेव्हा शाळेची अवस्था बिकट होती. पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग. विद्यार्थी गळती, अस्वच्छ परिसर, सुविधांचा अभाव असं सगळं. हे पाहूनच त्यांनी शाळेचा कायापालट करण्याचा निश्चय केला. गावकऱ्यांची बैठक घेतली. त्यावेळी विद्यार्थ्यांना उपयोगी ठरतील, असे उपक्रमही घेण्याची त्यांनी तयारी दाखविली. अभ्यासासोबत कौशल्यविकास प्रशिक्षण, नवीन खेळ, प्राणायाम, योगासनं असे उपक्रम आखले. गावकऱ्यांनीही साथ देण्याची ग्वाही दिली आणि बदल घडू लागला.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हनुमंत भोरे, गावकरी, विद्यार्थी, पालक, शिक्षक यांच्या सहकार्याने भागवत यांनी विकास आराखडा तयार केला. तो गावकऱ्यांसमोर मांडून देणगीचं आवाहन करण्यात आलं. यातून दोन लाख रूपये जमा झाले. त्यातून शाळेत परसबाग, भाजीपाला शेती, शाळेची रंगरंगोटी, ई-लर्निंग, योगाभ्यास, मल्लखांब असे उपक्रम सुरू करण्यात आले. ‘भाजीपाला शेती’ या उपक्रमातून येणाऱ्या पालेभाज्यांचा उपयोग शालेय पोषण आहारात दररोज केला जाऊ लागला. मुलांचं आरोग्य उत्तम राहावं, खेळांची आवड रुजावी यासाठी त्यांना खेळाचे प्रशिक्षण दिलं जातं. गावाकरी राजेंद्र खोत विद्यार्थ्यांना दररोज दोन तास शाळेतच मल्लखांबाचे प्रशिक्षण देतात. भागवत स्वतः योग प्रशिक्षक आहेत. ते विद्यार्थ्यांना पहाटे पाच ते सात या वेळेत योगप्रशिक्षण देतात.
वर्षभरातले सर्वच्या सर्व दिवस - अगदी साप्ताहिक सुट्यांच्या दिवशीही भागवत गुरूजी शाळेतच असतात. ते या काळात झाडांची लागवड, मशागत, साफसफाई करतात विद्यार्थ्यांना कौशल्यविकासाचं प्रशिक्षण देतात. त्यांच्या पत्नी गीता या गृहिणी. पतीच्या धडपडीला साथ देण्यासाठी सुटी्च्या दिवशी मदतीला जातात. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांसाठी त्या शालेय अभ्याक्रमावर आधारित तासिकाही घेतात. त्याचा मोबदलाही त्या घेत नाहीत, हे विशेष. आता शाळेचा चेहरामोहरा बदलून गेला आहे.
भागवत सर म्हणतात, ‘'एकूरका गावकऱ्यांनी मला आपुलकीने सगळ्या उपक्रमांसाठी मदत केल्यामुळेच मला लळा लागला. ग्रामस्थांना शाळेविषयी प्रचंड प्रेम आहे. पुढच्या काळात असेच उपक्रम घेण्याचा प्रयत्न करू’'.
 शहरात वास्तव्य करून नोकरीच्या गावी ये-जा करणारे शिक्षक ग्रामीण भागात बरेचदा पाहायला मिळतात. पण भागवत सरांनी हा पायंडा मोडून काढला आहे.
शिवदास भागवत संपर्क क्र. - 7773984416


- चंद्रसेन देशमुख.

Thursday, 20 April 2017

आधी झेंडा दर्ग्यावर, मग गुढी घरोघरी



सामाजिक सलोख्याचं उत्तम उदाहरण म्हणजे उस्मानाबाद जिल्ह्यातलं मेंढा गावं. लोकसंख्या ३५००. निजामोद्दीन अवलिया यांचा दर्गा आणि विठ्ठल मंदिर हे गावाचं दैवत. दोन्ही धर्मातील भाविक दर्ग्यापुढे नतमस्तक होतात. ऊरुसानंतर येणारा पाडव्याचा सण म्हणजे दोन्ही धर्मासाठी आनंदाची पर्वणी. गुढी उभारण्यापूर्वी गावातील विठ्ठल मंदिरातून झेंड्याची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. त्यापूर्वी दर्ग्याला पहाटेपासून पाणी घातले जाते. ऊद चढविला जातो. गावातील प्रत्येक कुटुंबातील नागरिक यात सहभागी होतो. पहाटे सुरु झालेली ही मिरवणूक सकाळी दर्ग्यापर्यंत येते. दर्ग्याच्या बाजूच्या चिंचेच्या झाडावर पांढरा, चंद्रकोर असलेला झेंडा बांधला जातो. हा झेंडा बांधण्याचा मान गावातील मुलाणी यांच्याकडे आहे. यानंतरच गावात घरोघरी गुढी उभारली जाते. गावाने अनेक पिढ्यांपासून ही परंपरा जपली आहे. कच्चीर बेग म्हणतात, ‘दोन्ही धर्मातील नागरिक आनंदाने एकमेकांच्या सणामध्ये भाग घेतात. अनेक वर्षापासूनची ही परंपरा आहे. गावात कधीही जातीय वाद निर्माण झालेला नाही. आम्ही दोन्ही समाजातील देवतांचा आदर करतो. सगळ्यांनी सामाजिक भान जपले आहे.’ 

गुढी पाडव्याचा सामाजिक गोडवा कायम टिकवण्यासाठी बाहेरगावी राहणारे अनेक चाकरमाने उत्सवाला गावी येतात. गावाने जपलेला हा सामाजिक एकोपा आदर्श आहे. निजामोद्दीन दर्गा आणि विठ्ठल मंदिर या दोन्ही देवतांचा गावकरी आदर करतात. अखंड हरिनाम सप्ताहासाठी प्रत्येक कुटुंब वर्गणी देतं. त्यासाठी कुणाला जबरदस्ती करण्याची गरज पडत नाही. सप्ताहातील सर्व कार्यक्रमाला मुस्लिम मंडळी मदत करतात. ऊरुसासाठी गावातील प्रत्येक कुटुंबाकडून माणशी ५० रुपये वर्गणी दिली जाते. ऊरुसातील प्रत्येक कार्यक्रमही एकमेकांना मान देऊनच केले जातात. ‘ऊरुसामध्ये कंदुरीचा मोठा कार्यक्रम केला जातो. शाकाहारी नागरिकांसाठी मुस्लिम समाजातर्फे वरण भाकरीचा कार्यक्रम केला जातो. ऊरुसादरम्यान कुणीही भुकेला राहणार नाही,याची खबरदारी घेतली जाते, असं ग्रामस्थ गौतम कोचेटा यांनी सांगितलं. 
 चंद्रसेन देशमुख.

Friday, 7 April 2017

उसाचा रस भारी...येतो तुमच्या दारी

नवं काही करणार्‍याला गुगलची साथ असतेच...
उस्मानाबाद जिल्ह्यातलं मुरूम गावं. गावातली ७० कुटुंब गेल्या सहा वर्षांपासून सकाळी चहाऐवजी उसाचा रस घेतात. रस्त्याच्या बाजूला, बसस्थानकावर मिळणारा उसाचा थंडगार रस आपण कधी-कधी घेतो. विशेषत: उन्हाळ्यात रसाचा आस्वाद घेणारे अनेक शौकीन आहेत. पण, मुरूम शहरात पावसाळा वगळता दररोज उसाचा रस मिळतो - तोही घरपोच, ताजा, सकाळी सात वाजता. रस पुरवणारा शेतकरी आहे रामलिंग रेवणाप्पा मुळे. विशेष म्हणजे दुधाप्रमाणे या शेतकऱ्याकडे उसाचा रतीब लावण्यात आला आहे. त्यातून त्यांना चांगला रोजगारही मिळाला आहे, शिवाय उसाच्या रसाचे सेवन करणाऱ्यांचे आरोग्यही ठणठणीत आहे. उसाचा रस आरोग्यदायी मानला जातो. शेतामध्ये गुऱ्हाळात किटलीने रस पित होतो, असं सांगणारी जुनी पिढी आता काळाआड जात आहे. पण, नव्या पिढीलाही रसाचे महत्त्व उमगले आहे. 
उमरगा तालुक्यातील तुगाव इथं मुळे यांची शेती. शेतात एक एकरावर उस आहे. दिवसभर शेतात काम करून रामलिंग पहाटेच्या कामाचे नियोजन करतात. पहाटे चार वाजताच गुऱ्हाळ सुरु होते. रस गाळला जातो. आणि पाण्याच्या बाटल्यांमध्ये हा रस भरला जातो. आणि मुरूम गावात रतीब ठरलेल्या घरी पोहोचवला जातो. २०१० पासूनचा हा त्यांचा नित्यनेम. रामलिंग यांचे वडील रेवणाप्पा यांचा रसविक्रीचा व्यवसाय होता. तेही रसविक्रीसाठी मुरुमला जायचे. तेव्हा घागरीत रस आणून ग्लासमधून त्याची विक्री व्हायची. आता ही जुनी पद्धत अनेकांना पटत नाही. रेवणाप्पांनंतर हाच व्यवसाय नव्या पद्धतीने चालवायचा रामलिंग यांनी निर्णय घेतला. शहरी लोकांना रसाचे महत्त्व पटवून द्यायचे तर आधुनिक साधनं वापरायला हवीतच. त्यांनी आधार घेतला तो ‘गुगल’चा. उसाच्या रसाचे शरीराला होणारे फायदे कोणते, याची माहिती गुगलवरून घेतली. आणि माहितीपत्रके छापली. ही पत्रके पुढे घरोघरी वाटली. मुरुमवासियांना रसाचे महत्त्व पटले. आणि रसाला मागणी येऊ लागली. मग पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या गोळा करून त्याद्वारे लिटरप्रमाणे रस विक्री त्यांनी सुरू केली. आधुनिकता, स्वच्छता आणि वेळेवर मिळणाऱ्या सेवेमुळे ग्राहकांमध्ये वाढ झाली. आता ७० कुटुंबात दररोज आणि ३० हून अधिक कुटुंबात अधूनमधून रसाची मागणी आहे.
मुळे म्हणतात, "वडिलांमुळे मी या व्यवसायात झोकून दिलं. रसविक्रीतून एकरी चार लाख रुपये मिळतात. शिवाय लोकांसाठी आरोग्यदायी काम केल्याचा आनंद मिळतो. या गुऱ्हाळावर माझं घर चालतं. रसाचं महत्त्व समजल्याने आता परिसरातील ग्रामीण भागातही विक्री वाढली आहे". आता दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र कमी झाले आहे. त्यामुळे मागणीइतका पुरवठा होत नसल्याचेही ते सांगतात. पुणे-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर त्यांनी रसवंतीगृह सुरू केले असून, इथंही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे.
- चंद्रसेन देशमुख.

Wednesday, 5 April 2017

माझा प्रवास - आर्थिक स्थैर्याकडे

 मी गणेश नवनाथ चौधरी. उस्मानाबाद जिल्हयातील कळंब तालुक्यातील निपाणी गावचा. घरची जिरायती शेती. तीन भावंडांत थोरला. म्हणूनच बारावीनंतर गावकर्‍याच्या ओळखीने पुणे गाठलं. दोन वर्षे सेंटरिंग, वायरिंग इत्यादी कामं करून महिन्याला चार हजारपर्यंत कमवू लागलो. 
एक दिवस शाळासोबती सूरज निपाणीकरचा फोन आला. किल्लारी, लातूर येथे पेस (PACE) संस्थेचं बार-बेंडिंग (सळई फिटर) हे तीन महिन्यांचं प्रशिक्षण शिबीर होतं. तिथं मी प्रवेश घ्यावा अशी त्यानं गळ घातली. प्रशिक्षण पूर्ण केलं. रायगड जिल्ह्यात साईगावला कामाला सुरुवात केली. माझ्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली होती. नंतर मुंबईत गोरेगावला एका प्रकल्पामध्ये सुपरवायझर म्हणून काम मिळालं. आता तीस हजार रुपयांपर्यंत कमाई पोहोचली होती. मग गावाकडे बोअर वेल घेतली. जमिनीत काळी माती टाकली. वांगी, गहू, हरभरा अशी पिके घेऊ लागलो. म्हशी घेतल्या. भावांच्या शिक्षणाला मदत करू लागलो. यापुढे शेतीला पूरक कुक्कुट आणि शेळी पालन सुरु करण्याचा विचार आहे.
२०१२ मध्ये परत एकदा सूरजचा फोन आला. केडगाव, अहमदनगर येथील ‘पेस’ केंद्रात बार-बेंडिंग डेमॉन्स्ट्रेटरचं काम होतं. पेसमुळेच मला आर्थिक स्थैर्य लाभलं होतं. ही संधी दवडणं शक्यच नव्हतं. संस्थेत काम करू लागलो. माझ्यासारख्या अनेक तरुणांना थिअरी आणि प्रात्याक्षिकं शिकवू लागलो. एक चक्र पूर्ण झालं. आता इथं येणाऱ्या मुलांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रत्यक्ष हातभार लावतो आहे. ‘पेस’ सेंटरमध्ये चालवले जाणारे मेसनरी वर्क आणि बार-बेंडिंग हे दोन निवासी कोर्स ‘प्रथम’ आणि ‘L & T Charitable Trust’ कडून पूर्णपणे मोफत आहेत. ते जीवनकौशल्य मार्गदर्शन व व्यक्तिमत्व विकासावर भर देतात.
इथं शिकलेल्या विद्यार्थांचे आता फोन येतात. त्यांचं भरभरून बोलण ऐकतो तेव्हा माझा इथे काम करण्याचा निर्णय योग्य होता याची जाणीव होते. एका अनस्कील्ड वर्करपासून डेमॉन्स्ट्रेटरपर्यंत असा आर्थिक स्थैर्याच्या दिशेने प्रवास ‘पेस’मुळे शक्य झाला.
PACE (पेस) च्या या कोर्सविषयी अधिक माहितीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा - ८८८८२२७०८८
- हर्षल खाडे, पुणे

Sunday, 19 March 2017

७० हजार जणांची ‘अन्नपूर्णा’

दुपारची बाराची वेळ. दोन तरुण उस्मानाबादच्या जिल्हा रुग्णालयात येतात. रुग्णांच्या नातेवाइकांना जेवणाचा डबा आला आहे का, असं विचारतात. नकारार्थी मान हलताच त्यांचे नाव लिहून घेतले जाते. जेवणासाठी रुग्णालयाबाहेरच्या अन्नपूर्णा हॉलमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं जातं. गेल्या वर्षभरात असे सुमारे ७० हजार रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांना अन्नपूर्णा ग्रुपने जेवणाची मोफत सोय करून आधार दिला आहे.
२६ डिसेंबर २०१५ रोजी उस्मानाबाद शहरातील जिल्हा रुग्णालयासमोर एका पत्र्याच्या शेडमध्ये अन्नपूर्णा हा उपक्रम सुरू झाला. विविध क्षेत्रातील तरुण यासाठी एकत्र आले आहेत. या तरुणांनी सुरुवातीला स्वत:च खर्च करून रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी सोय केली. त्यानंतर कुणी वाढदिवस, स्मृतीदिन तर कुणी दातृत्वाच्या भावनेनं अन्नदान करू लागलं. पाहता-पाहता वर्ष झालं.
मात्र अन्नदानाचा या यज्ञ अखंडितपणे सुरू आहे. जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना शासकीय भोजन मिळत असलं तरी त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाइकांची प्रचंड गैरसोय होते. मुळातच सरकारी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची परिस्थिती जेमतेम असते. त्यात बाहेरचे जेवण घेणं परवडत नाही. परिणामी, नातेवाइकांना उपाशी रहावं लागत असल्याचं धक्कादायक वास्तव अतुल अजमेरा, जितेंद्र खंडेरिया या तरुणांना दिसलं. मग जवळच्या मित्रांशी बोलून त्यांनी अशा नातेवाइकांसाठी अन्नपूर्णा योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला.
आता योजनेला सामाजिक बळ मिळालं आहे. त्यामुळे हा उपक्रम आता कायम सुरू राहील, अशी आशा आहे. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्यासह विविध मान्यवरांनी या ग्रुपचं कौतुक केलं. सरकारी अनास्थेमुळं दुर्लक्षित असलेल्या मधुबन कुष्ठधाममधील रुग्णांनाही दररोज गरम जेवणाची सोय अन्नपुर्णा ग्रुपचे सदस्य करीत आहेत. आज अभिजीत निंबाळकर यांच्यासह संपूर्ण टीम त्यासाठी सज्ज असते
- चंद्रसेन देशमुख.

Thursday, 23 February 2017

जिद्दीतून आली समृद्धी


अत्यंत हलाखीची परिस्थिती. पतीला काम होत नसल्याने खैरूण यांच्यावर संसाराची जबाबदारी आली. पन्नाशी गाठलेली. पदरी चार मुली, दोन मुले. पत्र्याच्या शेडचा मोडकातोडका आडोसा असलेलं घर. पावसाळ्यात अर्धा संसार पाण्याखाली. त्या म्हणतात, घर कसं चालवायचं अशी चिंता माझ्यापुढे होती. धुणी-भांडी करत होतेच. मग `राहत' बचत गटाच्या बिनव्याजी कर्जातून शेळ्या घेतल्या. बचत गटाची साथ मिळाली. आता चार मुलींची लग्न करून दिली. मुलांना शिक्षण देतेय. मिरची कांडप मशिन, पिठाची गिरणी चालवून आनंदाने संसार करत आहे, खैरूण अभिमानाने सांगतात.


शमा मन्सूर खान यांचं कपड्याचं दुकान. या व्यवसायापुरती जागाही त्यांच्याकडे नाही. तरीही पत्र्याच्या शेडमध्ये अुपऱ्या जागेत, आणि पैशांत योग्य नियोजन करून त्यांनी आपला व्यवसाय वाढवला आहे. साबेदा बेगम शेख यांच्या पतीचे ५ वर्षापूर्वी निधन झाले. जगण्यासाठी काही उद्योग हवा होता. ‘राहत’ बचत गटाकडून कर्ज घेऊन त्यांनी लाकूड विक्री सुरू केली. आता रोज ५०० रुपयांची लाकूड विक्री करणाऱ्या साबेदा आनंदाने संसार करीत आहेत. ताहेराबी शेख यांना दोन मुले. गटाकडून कर्ज घेतले. आणि बांगड्याचा व्यवसाय सुरु केला. त्यावर संसार उभा राहिला आणि मुलंही शिकली. 

लैला यांचे पती अमिर शेख सेंट्रींगच्या कामावर रोजंदारी करीत होते. लैला यांनी ‘राहत’ बचत गटाकडून कर्ज घेतले आणि पतीला बांधकाम क्षेत्रात गुत्तेदारी करण्यास प्रोत्साहित केले. अमिर सध्या गुत्तेदारी करतात. त्यांच्याकडे स्वत:चे भांडवल तयार झाले आहे. 
खैरूण, ताहेराबी, शमा या सगळ्या संसार उभा करण्यासाठी, व्यवसायासाठी धडपडणार्‍या गरिबीशी झुंजणार्‍या जिद्दी स्त्रिया. त्यांना २०१२मध्ये ‘राहत’ पतसंस्थेच्या बचत गटाने बिनव्याजी कर्ज दिले आणि गालिबनगरातील १६ जणी स्वत:च्या व्यवसायातून समृध्द झाल्या.


 ‘राहत’चे सचिव आशरफ शेख म्हणतात, "पतीच्या व्यसनाधीनतेमुळे जेव्हा संसार उघड्यावर पडायची वेळ येते, तेव्हा अशा कुटुंबात महिला संसाराचं छत्र बनतात. शहरातील काही भागात यासाठी सर्व्हे केला. आणि २०१२ पासून महिलांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यास सुरुवात केली. सध्या दोन बचत गट आहेत. २०१७ मध्ये आणखी दहा सुरू करणार आहोत". बचत गटाकडून कागदपत्रांच्या अडथळ्यांशिवाय महिलांना छोट्या व्यवसायासाठी तातडीने बिनव्याजी कर्ज दिले जाते. त्यामुळे अनेक महिला स्वत:च्या पायावर उभ्या राहिल्या. शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू असलेल्या उस्मानाबादसारख्या जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीवर जिद्दीने मात करून कुटुंबाचा आधार होणार्‍या, समृद्धी खेचून आणणार्‍या या महिला कौतुकास पात्र आहेत.
- चंद्रसेन देशमुख.