Tuesday 5 March 2019

गोष्ट नगराध्यक्ष सुनीताआत्याच्या भाचीच्या लग्नाची


यवतमाळ जिल्ह्यातली कळंब नगरपंचायत. तिथे चौकीदार असलेल्या हनुमंत चुडुक्के यांनी २०१७ मध्ये आत्महत्या केली. प्रतीक्षा, शैला आणि सागर तिन्ही भावंडं पोरकी झाली. मुलांची आईही काहीच दिवसांपूर्वी आजारपणात दगावली होती. राहायला घर नाही,नातेवाईकांचा आधार नाही. तेव्हा १७ वर्षांच्या प्रतीक्षासह तिन्ही भावंडांचा कळंबच्या विद्यमान नगराध्यक्ष सुनीता डेगमवार यांनी या आत्या म्हणून स्वीकार केला.
डेगमवार यांचीही परिस्थितीत जेमतेमच. मुलांच्या भविष्याचा प्रश्न कसा सोडवायचा यासाठी त्या महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांच्याकडे आल्या. बाबा आमटे यांच्या वरोरा इथल्या आनंदवनात ही भावंडं सावरतील असं राठोड यांना वाटलं. त्यांनी डॉ. विकास आमटे यांना पत्र पाठवलं. या भावंडांचं पालकत्व आपण स्वीकारतो पण त्यांचं शिक्षण, भोजन, निवासाची व्यवस्था आनंदवनात करण्याची विनंती त्यांनी केली. ती आमटे यांनी मान्य केली. 

तिघेही शिक्षणात आणि आनंदवनात रमले. याच ठिकाणी आपल्या एका नातेवाईकाला भेटायला सुरज भोसले नेहमी यायचा. आपल्या नातेवाईकासोबतच प्रतीक्षा, शैला आणि सागरचीही तो आस्थेनं विचारपूस करायचा. सूरजची ही आस्था प्रतीक्षासाठी प्रेमात कधी बदलली ते तिलाही कळलं नाही. लग्न करायचं ते अनाथ मुलीशीच असा आग्रह असलेल्या सूरजनं प्रतीक्षाकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. सोबतच तिच्या दोन्ही भावंडांना कधी अंतर देणार नाही, असा विश्वास दिला.
प्रतीक्षानं सुरजचा निरोप आत्या सुनीता डेगमवार यांना सांगितला. सुनीता खातरजमा करण्यासाठी आणि सुरजच्या कुटुंबाला भेटण्यासाठी वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील ढिवरी पिंपरी या गावी पोचल्या. भोसले कुटुंबानं प्रतीक्षाचा सून म्हणून स्वीकार करण्यास होकार दिला. कुटुंब पुरोगामी विचारांचं. आपली तिसरी मुलगी म्हणूनच तिला वागवू, असा विश्वास सुरजच्या आईनं दिला. सुरज स्वतः व्यावसायिक. घरी ओलीताची शेती. वडील राजकारण आणि समाजकारणात सक्रिय.
मग सुनीता यांनी डॉ. विकास आमटे, आनंदवनचे व्यवस्थापक सुधाकर कडू यांच्यासह संजय राठोड यांना याबाबत माहिती देऊन प्रतीक्षाच्या विवाहास मान्यता घेतली.
नुकतंच ७ फेब्रुवारीला प्रतीक्षा आणि सुरज यांचं नोंदणी पद्धतीनं लग्न झालं. लग्न धुमधडाक्यात व्हावं अशी सुरजच्या कुटुंबाची इच्छा होती. त्यामुळे ढिवरी पिंपरी इथं ९ फेब्रुवारीला दोघे नातेवाईक, गावकरी यांच्या साक्षीनं पुन्हा एकदा वाजत-गाजत बोहल्यावर चढले.

- नितीन पखाले , यवतमाळ

No comments:

Post a Comment