Monday 25 March 2019

गोष्ट राधाबाईंची

शहादा बसस्थानक. इथंच एका पेपर स्टॉलवर एक पासष्ठीच्या बाई बसलेल्या दिसतात. थोड्या तापट आणि बोलणंही थोडं कटू. असं असलं तरी गेली जवळपास ४० वर्ष त्या न चुकता शहाद्याच्या पेपर स्टॉलवर पेपर विक्री करत बसलेल्या दिसतात. रोज त्यांना बघत होतोच. आज मात्र त्यांच्याशी गप्पा झाल्या.
ऊन, वारा, पाऊस व थंडीला न जुमानता आजही घरातील सर्व कामे करून सकाळी ७ वाजता त्या बसस्थानकातील स्टॉलवर हजर असतात. कुठलंही शिक्षण नसतांना, आकडेमोड येत नसतांना स्वतःच्या हिंमतीवर परिस्थितीवर मात करून या अवघड व्यवसायात स्वतःची वेगळी प्रतिमा निर्माण करणाऱ्या या राधाबाई.
१८ व्या वर्षीच राधाबाईंचं शिवदास बेलदार यांच्याशी लग्न झालं. शिवदास बेलदार यांचा वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय. तेव्हा नवऱ्यासोबत बाईने व्यवसायात सहभागी होणं मोठं धारिष्ट्याचं काम. तरीही, आपल्या पतीला व्यवसायात मदत करण्याच्या निर्णय राधाबाईंनी घेतला. जळगाव, नाशिक व धुळे येथून एसटीने वृत्तपत्रांची बंडले शहादा बसस्थानकात येत. शिवदास पहाटे चारलाच घराबाहेर निघत. वृत्तपत्रांची बंडले ताब्यात घेतल्यानंतर ती प्रत्येक वाचकाच्या घरापर्यंत पोचविण्यासाठी सायकलचा वापर करीत. त्यातून बऱ्यापैकी कमाई होत असली तरी ती भविष्याच्या दृष्टीने ती अपुरी असल्याची जाणीव राधाबाईंना झाली. शिवाय वृत्तपत्र वाटपाचं काम सकाळी नऊलाच संपतं. त्यानंतर करायचं तरी काय? असा स्वतःशीच सवाल करीत राधाबाईंनी शिवदास यांना बस स्थानक परिसरात वृत्तपत्राचा कायमस्वरूपी स्टॉल लावण्याची सूचना केली. सुरुवातीला बेलदार यांनी दुर्लक्ष केलं. स्टॉल सुरू केला तर तिथं कायमस्वरूपी बसणार कोण हा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्यानंतर स्टॉल सांभाळण्याची जबाबदारी मी स्वीकारते असं राधाबाईंनी ठामपणे सांगितलं. आणि १९७७ साली शहादा बस स्थानकात वृत्तपत्राच्या स्टॉल सुरू झाला.

पतीला व्यवसायात मदत करण्यासोबत घरातील दैनंदिन कार्य सुरूच होते. यातच राधाबाईंना हरिश्चंद्र, पुरूषोत्तम व दिवाकर अशी तीन मुलं आणि चंद्रकला, कल्पना अशा दोन मुली अशी पाच अपत्यं झाली. आता कुटुंब वाढलं होतं. अर्थात जबाबदारीही वाढली होती. मुलांना सांभाळण्यासह त्यांचं शिक्षण ही जबाबदारी पार पाडत राधाबाई नियमितपणे बसस्थानकातील स्टॉलवर हजेरी लावत. येणाऱ्या प्रवाशांना वृत्तपत्र देणे, वृत्तपत्राच्या प्रतिनिधींना मासिक बिल देणे करणे ही जबाबदारी राधाबाई नियमित पार पाडतात. राधाबाईंची मुलं आणि मुलींनी व्यवसायात साथ द्यायला सुरुवात केली आहे. दिवसभरात विविध वृत्तपत्रांचे पाच ते सहा हजार अंक वाटप व विक्री करण्यासह विविध नियतकालिके, साप्ताहिके, धार्मिक व स्पर्धा परीक्षांची पुस्तके या स्टॉलवर विक्री केली जात आहे. घरात नातवंडे आली तरीही राधाबाईंचे काम काही थांबलेलं नाही. आजही त्या सकाळी सात वाजता स्टॉलवर येतात. दिवसभर आलेली वृत्तपत्रे व शिल्लक राहिलेली वृत्तपत्रे त्यांच्या हिशोब ठेवतात. दुपारी दोनपर्यंत त्या थांबतात. त्यानंतर जेवण. वयाच्या पासष्ठीतही इतक्या कार्यरत असणाऱ्या राधाबाईंचं कौतुक व्हायला हवं.
- रूपेश जाधव, नंदुरबार

No comments:

Post a Comment