Monday 24 April 2017

लेकरांकडूनही बरंच काही शिकता येतं

पालक म्हणून जी जबाबदारी असते ती पार पाडताना कधी-कधी चुकलेल्या पालकांना लेकरांकडूनही बरंच काही शिकता येतं आणि त्यातून खऱ्या अर्थाने पालकत्वाचा प्रवास सुरु होतो. असंच माझ्या आयुष्यात घडलं. पोरांच्या सांगण्यामुळे मी व्यसनमुक्त झालो. त्यालाही आता तीन वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला. मला आता त्याचा अभिमान वाटत आहे.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या मागास तालुक्या्तील कोळवाडी हे माझं मूळ गाव. गावं नव्हे, खेडं. इथली चार-दोन पुढारलेली माणसं सोडली तर सारी कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर, बांधकामावर जाणारे मजुर. अर्ध्याहून अधिक लोक ऊसतोड कामगार. माझं कुटुंबही त्यातलं. माझ्या आईवडीलांनी तब्बल पंचवीस वर्ष ऊस तोडायचं काम केलं. मी थकलेल्या आजी-आजोबांसोबत गावी रहायचो. सुटीच्या दिवशी शिरुर कासारच्या बाजारपेठेत असलेल्या अशोक गणपत भांडेकर यांच्या हॉटेलात काम करायचो. त्यातूनच शाळेसाठी लागणारा खर्च भागायचा. ग्रामीण भागातील कष्टकरी माणसं व्यसनाच्या आहारी जातात. सर्वाधिक तंबाखू खाल्ली जाते. ग्रामीण बाजारात अगदी किलोने त्याची खरेदी होते. अलिकडच्या काळात तंबाखुसह मावा, गुटखा खाण्याचं प्रमाण वाढलं आहे.
माझंही तसंच झालं. शाळा शिकताना हॉटेलचं काम सोडून बांधकामावर मजुर, वाळूचे टॅक्टचर भरायला जायला लागलो. याच काळात, वयाच्या पंधराव्या वर्षी नकळत मला तंबाखुचं व्यसन लागलं. बघता- बघता तंबाखु, माव्याच्या आहारी गेलो. पुढे पत्रकारितेत आलो. समाजिक कामात झोकून दिलं. मात्र हे व्यसन सुटत नव्हतं. त्यात लग्नानंतर बऱ्याच वर्षांने मुलगी झाली, पाठोपाठ तीन वर्षाने मुलगा. सारं सुरळीत सुरु होतं. समाजिक कार्यकर्ता, प्रगल्भ पत्रकार म्हणून नावलौकीक होत असताना माझी व्यसनाधीनता मलाच किळसवाणी वाटत होती.
माझ्या घरात फक्त मीच तंबाखुच्या पूर्णपणे आहारी गेलेलो. वडीलांनीही अनेक वेळा मला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला. मी तंबाखु, माव्याला सोडण्याचा प्रयत्न केला होता, पण ती मला सोडत नव्हती.
मुलगी शिवानी, मुलगा मेघराज आणि पत्नी शारदा यांनी मला व्यसनमुक्त करण्याचा चंगच बांधला. चार-पाच वर्षांची लेकरं मला तंबाखू खाण्याबाबत डिवचत, माझा रागराग करत. पोरांच्या बोलण्याचा राग येई. त्यांच्या सततच्या आग्रहाने एकदा इतका राग आला की खिशातील तंबाखुची, माव्याची पुडी फेकून दिली. १९९४ साली वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी लागलेलं व्यसन पोरांमुळे २०१४मध्ये म्हणजे वीस वर्षांनी सुटलं. माझे सहकारी अचंबित झालेच.
कितीही प्रयत्न केले तरी सहजपणे कधीच न सुटणारी तंबाखु सोडून एक वर्षांचा काळ लोटल्यावर मात्र सगळ्यां सहकाऱ्यांनी मिळून माझं कौतुक केलं.
मी व्यसनमुक्त होऊन आता तीन वर्षाचा काळ लोटतोय. आता आमच्या बापलेकरांत वेगळंच मैत्रीचं नातं निर्माण झालय. पोरगी मुद्दामहून विचारते, “पप्पा तंबाखू खाल्ली काय?” मी उत्तर देतो, “नाही खाल्ली अन्‌ खाणारही नाही.” आमच्यात झालेल्या मैत्रीच्या नात्याचाही मला अभिमान वाटतो. खरं म्हणजे केवळ पोरांमुळेच मी व्यसनमुक्त झालो. माझ्या पालकत्वाचा हाच खरा प्रवास मी समजतो.
 सूर्यकांत नेटके

No comments:

Post a Comment