Tuesday 7 May 2019

दोन दाणे पाखरांसाठी


वाढत्या उन्हासोबत चारा-पाण्याची वानवा भासत आहे. माणसाला स्थलांतरास भाग पाडणारी दुष्काळ स्थिती. पशुपक्ष्यांचे हाल तर विचारायलाच नकोत.
या मुक्या जीवांना जपायला काही समाजघटक पुढे येत आहेत. बीड जिल्ह्यातल्या पाटोद्यातील युवक रामेश्वर गोरे त्यापैकीच. रामेश्वर यांनी त्यांच्या शेतातलं अर्धा एकर ज्वारी पीक केवळ पक्ष्यांसाठी राखून ठेवलं आहे. मांजरा नदीच्या काठी त्यांची अर्धा एकर शेती आहे. सध्या ज्वारीचीे कणसं दाण्यांनी भरलेलीे आहेत. पीक काढणीला आलं होतं. दाणे टिपायला दररोज सकाळ- संध्याकाळ पक्षांचे थवे येत. परिसरात इतरत्र पाखरांसाठी काहीच नाही. ते पाहून रामेश्वर यांना मुक्या जीवांप्रती सहानुभूती निर्माण झाली. त्यांनी पीक न काढता पाखरांसाठी ठेवण्याचं ठरवलं.
या पाखरांना आता दोन दाणे का होईना मिळत आहेत. शिवाय त्यांना कोणी हुसकावूनही लावत नाही. एवढेच नाही तर रामेश्वर यांनी शेजारच्या गोठयाजवळ पाण्याचाही मोठा डबा भरुन ठेवला आहे. त्यांचा हा उपक्रम भूतदयेचे आदर्श उदाहरण ठरत असून मानव आणि पशुपक्षी सहबंध जोपासणारा ठरत आहे.
 

-अनंत वैद्य, बीड

No comments:

Post a Comment