Friday 20 January 2017

जगण्याची गुणवत्ता गमावली तरी स्थलांतरितांची मुंबईत तिप्पट कमाई

जगण्याची गुणवत्ता गमावली तरी स्थलांतरितांची मुंबईत तिप्पट कमाई : एका पाहाणीचा निष्कर्ष


IndiaSpend च्या ताज्या सर्वेत आढळून आले की मराठवाड्यातील अनेक कुटुंबे मुंबईला येऊन आपले आर्थिक उत्पन्न तिप्पट करीत आहेत, गरीबीतून वर येत आहेत आणि आपल्या डोक्यावर असलेले कर्ज देखील फेडीत आहेत. मात्र त्यासाठी त्यांना आपल्या परिवारासकट 40 sq feet च्या जागेत राहावे लागत आहे. IndiaSpend ने 60 स्थलांतरित कुटुंबांचा सर्वे घेतला.
या सर्वेतील महत्त्वाची निरिक्षणेः
1) बहुतांश लोक हे त्यांच्या गावात शेतमजुरी करतात आणि शहरात बांधकाम क्षेत्रात मजुरी करतात.
2) मुंबईत येऊन केवळ चार महिन्यांत ह्या कुटुंबातील लोकांनी प्रतिव्यक्ती प्रतिमहिना 1823 रु उत्पन्न मिळवले. शहरातील 1000 रू या दारिद्र्य-रेषेच्या निकषाहून हे 80% जास्त आहे.
3) मराठवाड्यातील नांदेड़मध्ये हेच उत्पन्न प्रति-व्यक्ति प्रति-महिना 569 रु एवढे आहे. ग्रामीण दारिद्र्यरेषेच्या 818 रु या निकषापेक्षा ते 30% कमी आहे!


4) ह्या लोकांना त्यांच्या गावात प्रतिदिन प्रतिव्यक्ति 115 लिटर पाणी मिळते. शहरात मात्र 43 लिटर एवढेच. परंतु असे जरी असले तरीही पाणी मिळविण्यासाठी गावात जी वणवण करावी लागते तशी शहरात करावी लागत नाही.
5) 15 एप्रिल पर्यंत अशी परिस्थिती होती की ह्या कुटुंबांकडची 266 रु जादा कमाई जेवण मिळविण्यासाठी खर्च होयची. कारण मुंबईत जेवणाची किंमत गावापेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. परंतु त्यानंतर हा खर्च सुमारे अर्ध्याने कमी झाला. कारण घाटकोपरच्या काही नागरिकांच्या मदतीमुळे ह्या कुटुंबांना तांदूळ आणि तूरडाळ मोफत मिळू लागले.
6) गावात जवळजवळ ७२% लोकांना 'सार्वजनिक वितरण व्यवस्थे'द्वारे अन्नधान्य सबसिडीच्या दरात मिळते. अर्ध्याहून अधिक कुटुंबांनी असे देखील सांगितले की त्यांच्या मुलांना शाळेत दुपारचे जेवण मिळते.
7) मार्चमध्ये शाळा संपते आणि मग उन्हाळ्यातल्या उपलब्ध पाण्याचा अंदाज घेतला जातो आणि मुंबईला जायचे का ह्याचा निर्णय घेतला जातो. ह्या वेळेस मात्र तीव्र पाणीटंचाईमुळे हा निर्णय घेणे सोपे झाले.


8) महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी जवळ जवळ 22 जिल्हे हे सलग दुसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करीत आहेत. बरीच कुटुंबे मुंबई, पुणे आणि औरंगाबाद इथे स्थलांतर करीत आहेत.
9) दहापैकी नऊ स्थलांतरित कुटुंबे मुंबईत नोकरीच्या शोधात आली आहेत.
10) बहुतेक लोकांनी 25 हजारापासून अडीच लाखापर्यंत कर्ज काढले आहे. हे कर्ज मुंबईत पैसे कमावून फेडू शकू असा बहुतांश लोकांना विश्वास आहे.
11) ज्या 60 कुटुंबांचा सर्वे झाला त्यांनी आपले आर्थिक उत्पन्न जवळजवळ 214% एवढे वाढवले!
12) शहरांमधील बांधकामं - मग ते रस्ते असो वा मोठाले फ्लाय-ओव्हर किंवा इमारती - हे लोक त्या भागातल्या संबंधित अधिकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवून असतात आणि काम सुरु झाले की त्या ठिकाणी हजेरी लावतात. मुंबईत पावसाळा सुरु झाला की ही कामं मंदावतात आणि ही कुटुंबे आपल्या गावी परततात.
13) मात्र ही आर्थिक भरभराट तात्पुरती आहे आणि ती मिळवण्यासाठी ह्या कुटुंबांना जगण्याची गुणवत्ता गमवावी लागते.
14) मुंबई महानगरपालिकेने ह्या कुटुंबांसाठी रोज पाण्याच्या दोन टँकर्सची आणि Mobile Toilets चीही व्यवस्था केली आहे.
महानगरपालिकेचे अधिकारी श्री. दीपक हांडे ह्यांनी IndiaSpend ला ह्या सगळ्याची माहिती दिली.

या छोट्याशा सर्वेतून अनेक अनेक अर्थ निघू शकतात. धोरणकर्ते आणि शहरी आणि ग्रामीण भागातील जागरूक नागरिक यांना या निरिक्षणांची दखल घ्यायलाच लागेल.
- आशय गुणे

No comments:

Post a Comment