Sunday 29 January 2017

..त्यांसी धरी जो हृदयी



नगर शहरात अनेक झोपडपट्ट्या. तिथे हजारो कुटुंबांचा राबता. तिथे हमखास घेतले जाणारे नाव – हनीफ शेख. झोपडपट्टीतील मुला-मुलींसाठी झटणारा, नगरच्या झोपडपट्ट्यांमधल्या लोकांचा हक्काचा भाऊ. गोरगरीबांची मुले शिकावीत हाच त्याचा ध्यास. अजून चाळीशीही न ओलांडलेल्या हनीफच्या गेल्या दहा वर्षांच्या प्रयत्नातून सुमारे तीन हजार मुले शिक्षणप्रवाहात आली आहेत.
हनीफ हा नगर जिल्ह्यामधील अकोला तालुक्यातील रहिवासी. द्वीपदवीधर. वडील पोलिसात असल्याने शिस्तीत वाढलेला. शाळा-कॉलेजात नेतृत्व करणारा. ‘कमवा आणि शिका’मधील सहभागामुळे सामाजिक कामांची गोडी लागलेला. घरच्या सामान्य परिस्थितीमुळे रंगकाम, वडापाव गाडीवर काम, रिक्षा चालवणे करावे लागलेला. नगरला एका स्थानिक वृत्तवाहिनीत काम करताना हनीफला सामाजिक समस्यांची जवळून ओळख झाली. ‘स्नेहालय’चे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांच्या संर्पकात आलेला हनीफ ‘स्नेहालय’चा स्वयंसेवक बनून गेला. एका हरवलेल्या मुलीला शोधताना हनीफने नगरचे बहुचर्चित सेक्स स्कॅन्डल उजेडात आणले. पुढे ‘चाईल्डलाईन’मध्ये काम करताना हनीफवर ‘बालभवन’ची जबाबदारी आली आणि तो झो़पडपट्टीत काम करु लागला. खरं तर त्याला झोपडपट्टी हा शब्द आवडत नाही. हनीफ वापरत असलेला शब्द आहे ‘सेवावस्ती’. ज्या वस्तीला सेवेची गरज आहे, ती!

इथली मुले भंगार गोळा करण्यापासून भीक मागण्यापर्यत सगळे करतात. शाळा ही त्यांची शेवटची गरज! ती पहिली गरज व्हावी यासाठी हनीफने प्रबोधन सुरू केले. “लेकरांना शिकवाल तरच परिस्थिती बदलेल..” असा विश्वास त्याने गरिबांना दिला. मुले शाळेकडे वळू लागली. त्यापैकी अनेक मुले-मुली आज दहावी-बारावी आणि उच्च शिक्षणापर्यत पोचली आहेत. हनीफने शाळेत घातलेला पहिला मुलगा आज महिन्याला आठ-दहा हजार कमवत कुटुंबाला सावरत आहे. 
 झोपडपट्टीतील मुले गुन्हेगारी प्रवृत्तीची असतात असा ठपका ठेवून नामांकित शाळा या मुलांना प्रवेश देत नव्हत्या. हनीफने पाठपुरावा करून मुलामुलींची जबाबदारी घेत त्यांना प्रवेश मिळवून दिला. भटक्या कुटुंबांतील पाचशेच्यावर मुलांना उच्च शिक्षणासाठी पैसे मिळवून दिले. हनीफने बेवारस, अत्याचारीत, मुली-महिलांनाही आधार मिळवून देण्याचेही काम केले. 

जुने कपडे गोळा करुन मुंबईला विकण्याचा व्यवसाय करणार्याठ रामवाडी झोपडपट्टीतील महिलांपैकी एकजण दोन वर्षांपूर्वी मुंबईला जाताना दौंड स्थानकात रेल्वेखाली आली. अपघातात तुटलेल्या हातासह नगरला आल्यावर तिच्या मदतीला पहिला धावला हनीफ. काम करता-करता हनीफ तिथे रमूनच गेला. विशेष म्हणजे त्याला पत्नी यास्मिनची मोठी साथ आहे. यास्मिन कलाशिक्षिका आहे. हनिफ-यास्मिनला दोन बाळे आहेत.
हनीफ स्वतःच्या कामाविषयी विलक्षण नम्रपणे बोलतो. त्याच्या विचारांत स्पष्टता आहे. तो म्हणाला, “या कामातून मिळणारा आनंद मला जीवनातल्या अन्य कोणत्याही आनंदाहून मोठा वाटतो. झोपडपट्टीतलं दुखः खूप वाईट आहे. शिक्षण हाच दुःखमुक्तीचा उपाय आहे. मी फार काही केलेलं नाही. फक्त या मुलामुलींना विश्वास दिला, प्रेमस्पर्श दिला. सर्वोच्च प्राधान्याने हे काम करण्याची गरज आहे. इथल्या मुलांच्या हातात चाकू-पिस्तुल येण्याआधी पेन देण्याची गरज आहे. माध्यमांनी अशी कामं सर्वदूर पोचवली पाहिजेत. सोशल मिडिया तर हे काम खूपच प्रभावीपणे करू शकतो.”
- सूर्यकांत पाटील

No comments:

Post a Comment