Thursday 9 March 2017

"पालकाचा जन्म मुलाच्या जन्माबरोबरच होतो"

"पालकाचा जन्म मुलाच्या जन्माबरोबरच होतो. एखादी व्यक्ती माणूस म्हणून जशी आहे, तिचा स्वभाव जसा आहे, तशीच ती पालक म्हणून असते, असं मला वाटतं." निस्सीम व शरयू यांची आई पत्रकार भक्ती चपळगावकर म्हणाल्या. आज तक, स्टार न्यूज, ई टिव्ही अशा वृत्तवाहिन्यांवरून त्यांनी काम केलं आहे. ‘सामना’च्या रविवार पुरवणीतल्या सदरातून त्या भेटत असतात. 
"मी आणि माझा नवरा अजय दोघेही लिबरल असल्यामुळे आमच्या घरात खूपच कमी नियम आहेत. पण काही गोष्टी आम्ही कटाक्षाने पाळतो. जसं की मोठ्यांचा आदर केला पाहिजे. स्क्रीन पाहण्यावरचं नियंत्रण", भक्ती सांगतात. त्यांच्या मते पूर्वी मुलं भावंडांसोबत मोठी व्हायची. जबाबदारी ती आपोआप शिकायची. पण आता मुलं एकेकटीच मोठी होतात. साहजिकच पूर्वी ज्या गोष्टी मुलं एकमेकांच्या बघून शिकायची, त्या त्यांना शिकव्याव्या लागतात.
सहावीत शिकणाऱ्या निस्सीमला लहानपणापासूनच आई-वडिलांप्रमाणेच वाचनाची आवड आहे. इतकी, की तो गणितसुद्धा वाचायचा. भक्ती सांगतात, "परीक्षा, मार्क याची आम्हाला चिंता नव्हती. आणि पुढे निस्सीमला गणित ऑलिम्पियाडमध्ये अनेक पदकंही मिळाली. पण सोडवण्याऐवजी कुणी गणित वाचतंय हे आम्हाला तेव्हा नवीनच होतं. शाळेतही शिक्षकांना ही गोष्ट पचणं अवघड होतं. आज हे सगळं मागे पडलंय."
“निस्सीम अंतर्मुख, समजूतदार आहे. त्याने कधीच विशेष हट्ट, मागण्या केल्या नाहीत. तो कसा मोठा झाला हे कळलंसुध्दा नाही. पालक होणं आव्हानात्मक आहे, हे शरयू जन्मल्यावर समजलं. शरयू तीन वर्षांची आहे. दुसरं मूल निस्सीमसारखंच असेल, असं वाटलं होतं. ती मोठी चूक होती, तिच्यावर अन्याय करणारी होती”, भक्ती मोकळेपणाने सांगतात. "शरयू आणि निस्सीम यांच्यात खूप फरक आहे. शरयू डिमांडिग, आऊटगोइंग आहे, स्वतंत्र आहे. निस्सीम लहानपणी काल्पनिक असतात म्हणून गोष्टीही वाचायचा नाही. तर शरयू कल्पनाविश्वात रमणारी." पालकत्व तिच्याकडून शिकत असल्याचं भक्ती सांगतात. 
भक्तीचा रूढार्थाने मुलांच्या संगोपनात सहभाग कमी असला, तरी माणूस म्हणून त्यांच्या जडणघडणीकडे तिचं काटेकोर लक्ष असतं. मुलं ही स्वतंत्र व्यक्ती आहेतच. पण स्वातंत्र्य म्हणजे मुलांना वाऱ्यावर सोडणं नव्हे, असं भक्तीला वाटतं. स्वातंत्र्याबरोबर जबाबदारीही येते. मोकळेपणा आणि नियम यात योग्य संतुलन राखता आलं पाहिजे. "आम्ही पालक नाही, तर फॅमिली आहोत. एक युनिट आहोत. पालक म्हणून मुलांसमोर पालकत्वाची ताकद दाखवणं मला मुळीच मान्य नाही", भक्ती चपळगावकर यांनी सांगितलं.
प्रवास पालकत्वाचा – भक्ती चपळगावकर
शब्दांकन: सोनाली काकडे 

No comments:

Post a Comment