Monday 18 December 2017

मुलांनी आणलं पुस्तकांना; पुस्तकांनी आणलं मुलांना


जिल्हा नाशिक. तालुका सिन्नर. इथलं पाडळी हे छोटंसं गाव. इथल्या पाताळेश्वर विद्यालय या जिल्हा परिषद शाळेतली ही गोष्ट. वाढदिवस सगळ्या मुलांची अगदी आवडता. हल्ली तर केक कापणं, भेटवस्तू देणं आणि मोठ्यांदा गाणी लावणं एवढाच वाढदिवसाचा कार्यक्रम झाला आहे. पण इथल्या मुलांनी मात्र अगदी वेगळा विचार केला. वाढदिवसावर होणारा खर्च वाचवत ‘विद्यालयास पुस्तक भेट’ हा उपक्रम त्यांनी सुरु केला. आज यामुळे विद्यालयाच्या ग्रंथालय विभागात २५० पुस्तकं जमा झाली आहेत. आणि गेल्या महिन्यात, बालदिनाचं औचित्य साधत या पुस्तकांचं प्रदर्शनही भरविण्यात आलं होतं. विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. बी. देशमुख यांची ही संकल्पना. वाढदिवसाच्या दिवशी मुलं केक, चॉकलेट, जंकफूड खातात. यामुळे आरोग्य बिघडण्याचा धोकाच जास्त आहे. हे टाळण्यासाठी ज्या विद्यार्थ्याचा वाढदिवस आहे, त्याने शाळेस एक पुस्तक भेट द्यावं असं देशमुख यांनी सुचविलं.
शाळा सुरु होतानाच याविषयी त्यांनी मुलांना सांगितलं. पुस्तक वाचायला आवडेल असं, माहितीपूर्ण हवं. उगाच स्तोत्र, घरातली अडगळीतील पुस्तकं आणायची नाही. हेतू हाच की मुलांना विविध साहित्यप्रकारांची ओळख व्हावी. या उपक्रमामुळे, आज शाळेच्या खजिन्यात अनेक नामवंत लेखकांची चरित्रं, आत्मकथा, ज्ञानकोष आदी साहित्य असल्याचं देशमुख अभिमानाने सांगतात. मुलांच्या देणगीतून शाळेच्या ग्रंथ विभागात अग्निपंख, गरूडझेप, व्यक्तिमत्व विकास, मी व माझा बाप, शतपत्रे, दैनंदिन दासबोध, महाश्व्वेता, निवडक अग्रलेख व पत्रे, धडपडणारी मुले, अॅडॉल्फ हिटलर, रमाबाई रानडे, विक्रम आणि वेताळ, ॠषीमुनींच्या महान कथा, नितीमुल्ये, काबुल कंदाहारकडील कथा, संताच्या कथा, महान स्त्रिया, असे गुरू असे शिष्य, तेनाली रामाच्या कथा, मनोरंजक कथा, गोष्टीतून संस्कार, बाल नाटुकली यासह अन्य पुस्तकं जमा झाली आहेत.
ही पुस्तकं वाचण्यासाठी मुलांची झुंबड उडते. वर्गवार आठवड्याचं नियोजन असलं, तरी मुलं शाळा भरण्याअगोदर दीड तास आधीच येतात. शाळेच्या मोकळ्या आवारात ठेवलेल्या टेबलवरून हवी ती पुस्तकं घेऊन तिथंच वाचत बसतात. पुस्तकं वाचून पुन्हा जागेवर ठेवा, एवढंच बंधन त्यांना असल्याने मुलं खुश आहेत. शाळेतली विद्यार्थिनी साक्षी रेवगडे सांगते की, “मुख्याध्यापकांनी आम्हाला पुस्तकं आणायला सांगितली. पालकांनीही याला प्रतिसाद दिला. आम्ही ठरवून एकमेकांकडून पुस्तकं मागवून घेत वाचतो. वाचनाची आवड वाढते म्हणण्यापेक्षा, आत्तापर्यंत हा आनंद गमावला याची सल जास्त आहे.” आम्ही अजून पुस्तकं जमा करणार असल्याचं तिनं आर्वजून सांगितलं.


- प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment