Saturday 1 December 2018

विनदेवपाड्यातील बिनभिंतीची शाळा

नंदुरबारमध्ये सातपुड्याच्या रांगांत वसलेले तोरणमाळ हिल स्टेशन. इथं डोंगरांच्या कडेकपारीत आदिवासी पाडे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आजही पक्का रस्ता नाही, इथं वीज- नळाचं पाणी किंवा मोबाईलची रेंजही नाही. अशा डोंगरकपारीत बालरक्षक असलेल्या संदीप म्हमाणे आणि मी सुरू केली आहे एक अनोखी ‘झाडाखालची शाळा’!!
26 जानेवारी 2016 ला झेंडावंदन झाले आणि आम्ही ठरविले की, थेट घरी जाण्यापेक्षा या दऱ्याखोऱ्यात कोणी शाळाबाह्य मुले मिळतात का ते पाहू. गाडी नेण्यासाठी रस्ता तर नव्हताच, तेव्हा चालतच इथल्या पाड्यांना भेटी देऊ, असं ठरवलं. चालण्याचा रस्ताही धड नाही, खाचखळगे, कुठे प्रचंड चढ तर कुठं तीव्र उतार, अर्थात या सगळ्यांची आम्हांला सवय आहेच.
असेच चालत जात असताना हिमतादादा नावाच्या माणसाकडून आम्हांला समजलं की आजूबाजूच्या दऱ्यांमध्ये कधीच शाळेत न गेलेली भरपूर मुलं आहेत. मी आणि संदीप तसंच पुढं चालत राहिलो, हिमतादादांचं बोलणं खरं ठरलं. आम्हांला दरीत खेळणारी 15-20 पोरं दिसली. कवता नावाची मुलगी तिथंच नाल्यात खेळत होती, तिच्याशी बोलून या दऱ्या- खोऱ्या पालथ्या घालून जादू, ज्योतिष, गिलदार, गुलसिंग, चुट्ट्या, कुवा अशी अनेक मित्रमंडळी आम्ही शोधून काढली.या मुलांना मराठीचा कसलाच गंध नव्हता, त्यांना फक्त पावरी आणि नहाली भाषाच येत होती. त्यांच्या पालकांकडे चौकशी केली की, मुलांना शाळेत का पाठवत नाही? तर ते म्हणाले, “इथं जवळपास कोणतीच शाळा नाही, तोरणमाळची केंद्रशाळा फार दूर आहे, तिथपर्यंत जंगलातून चालत जायचं म्हणजे जंगली प्राण्यांची भीती!! या पोरांनी कधी शाळेचं तोंडही पाहिलेलं नाही.” दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या पालकांची अडचण आमच्या लक्षात येत होती, त्यांच्याकडे ना वाहन होते, ना रस्ता. म्हणूनच मग आम्ही ठरवलं, हे शाळेपर्यंत जाऊ शकत नाहीत तर शाळाच यांच्यापर्यंत आणूया. या रानच्या पाखरांसाठी इथंच जंगलातच शाळा सुरू करूया.
पण शाळा म्हणजे काय हेच माहिती नसलेल्या त्यांच्या मायबापांना आम्हांला खूप समजवावं लागलं. “शिक्षण हाच मुलांच्या चांगल्या भविष्याचा एकमेव मार्ग आहे, तुम्ही दऱ्या- खोऱ्यात कष्टाचं जगणं जगताय, पण तुमच्या मुलांच्या भविष्यात हे असू नये, असं वाटत असेल तर त्यांना शाळेत पाठवा. त्यांची पूर्ण काळजी आम्ही घेऊ आणि शाळा दूर नसेल, तर तुमच्या पाड्याजवळच असेल.” आणि मग सुरू झाली ही बिनभिंतीची शाळा.
मुलांकडे ना गणवेष होते ना चांगली दप्तरं, ना पाटी- पुस्तक, ना आमच्यासाठी टेबल- खुर्ची. औपचारिक शिक्षणाचे सगळे उपचार बाजूला ठेवून आम्ही ही शाळा चालवू लागलो. मी आणि संदीप मुलांसोबतच खाली जमिनीवर बसून त्यांच्याशी गप्पा मारत, गाणी म्हणत, मुलांना शिक्षणाचे प्राथमिक धडे देऊ लागलो. पहिल्यांदा केवळ गाणी, खेळ, व्यायाम, गोष्टी, झाडांची पाने, फळे, काड्या मोजून अंकओळख, बेरीज- वजाबाकी, त्यांच्या भाषेतील शब्दांवरून अ, आ, इ, ई ची ओळख असा अभ्यास सुरू झाला.
या झाडाखालच्या शाळेतील पटसंख्येने शंभरी ओलांडली. ज्यांना शाळा म्हणजे काय हे माहितीही नव्हते, अशी जवळपास 122 शाळाबाह्य मुले या बिनभिंतींच्या शाळेत रोज येऊ लागली.
- दादाभाई पिंपळे.

No comments:

Post a Comment