Tuesday 11 December 2018

बेवारस गुरांना जपणारा अवलिया!

रत्नागिरीतल्या लांजा इथं बांधकाम सुरू होतं. एक जखमी बेवारस गाय विव्हळत पडली होती. आजूबाजूने लोक चालले होते. पण कोणीच त्या गाईकडे पाहत नव्हतं. बांधकाम व्यावसायिक मुकेश गुंदेचा यांचं या गाईकडे लक्ष झालं. तिथपासून सुरू झाली अविरत गोसेवा. गेल्या पाच सहा वर्षात गुंदेचा यांनी काळवेळ न बघता शेकडो गाईंवर उपचार केले आहेत. 

गुंदेचा रत्नागिरीतली संवेदनशील व्यक्तिमत्त्व. संपत्तीचा सुयोग्य उपयोग जाणणारे. "माणसाला लागलंखुपलं तर आपण त्याला लगेच दवाखान्यात नेतो, मग एखादं जनावर विव्हळत असेल तर त्याला नकोत का उपचार मिळायला?असा प्रश्न पडला. या कामातून मिळणारं समाधान मोठं आहे," गुंदेचा सांगतात.
सुरुवातीला गुरांना मोकळ्या जागेवर नेऊन डॉक्टरांकडून ते उपचार करून घ्यायचे. बघूनबघून ते स्वतःच उपचार करायला शिकले. आता गंभीर परिस्थितीतच ते डॉक्टरांची मदत घेतात. गुरांना औषध-इंजेक्शन ते स्वतः देतात. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीनं तीन गुरांवर त्यांनी मोठ्या शस्त्रक्रियाही केल्या आहेत. त्यामुळे या गुरांना जीवदान मिळालं.
बेवारस जखमी गुरांसाठी गुंदेचा यांनी नरबे इथं स्वखर्चाने गोशाळा बांधली आहे. गुरं बरी झाली की त्यांना सोडलं जातं. साधारण 10 ते 15 गुरं तरी या गोशाळेत असतातच. त्यांच्यासाठी स्वखर्चानेच चारापाणी, आवश्यक सोयीसुविधा, उपचार. गुंदेचा गोशाळेत शिरताच त्यांच्याभोवती गुरं जमतात. त्यांच्या गोसेवेची, त्यांच्यातल्या आणि जनावरांमधल्या आपुलकीची, कीर्ती संपूर्ण जिल्ह्यात पसरली आहे. फोन करून जखमी गुरांची माहिती त्यांना दिली जाते. हे सर्व ते स्वतःचा व्यवसाय सांभाळून करतात.
रत्नागिरी शहरातही रस्त्यावर फिरणाऱ्या बेवारस गुरांची संख्या मोठी आहे. त्यांच्यासाठी शहरात गोशाळा बांधण्यासाठी गुंदेचा प्रशासकीय पातळीवर प्रयत्न करत आहेत. 

-जान्हवी पाटील.

No comments:

Post a Comment