Sunday 18 August 2019

मुलं शाळेत चवीचं खाणार; कारण परसबाग देणार. (बारापात्रे सरांची खर्डुका इथली परसबाग)


नितीन बारापात्रे. कोच्छी केंद्रातल्या खर्डुका गावातल्या प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक होते. तेव्हा 2014 मध्ये त्यांनी परसबाग उपक्रम राबवला होता. तिथले विद्यार्थी सधन शेतकरी कुटुंबातले. शाळेला पोषण आहारसुद्धा नियमित मिळत असे. तरीही, नितीन बारापात्रे सरांनी परसबाग उभी करण्याचं ठरवलं. त्यासाठी मुख्याध्यापिका शारदा सहारे यांच्याकडून परवानगी मिळवली. त्याआधी नुकतीच आरोग्यविभागाकडून विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी झाली होती. त्या आधारेच बारापात्रे सरांनी 20 बाय 30 च्या पडीक जागेत हा उपक्रम सुरु केला.
शाळेलगत असलेल्या पाण्याच्या टाकीतून वाहणाऱ्या पाण्याचा योग्य वापर करत जवळच वाफे तयार केले. त्यात भाजीपाला लावला. टोमॅटो, वांगे, पालक, कांदा, बटाटे, कोथींबीर, हिरव्या पालेभाज्या लावून याचा रोजच्या जेवणात वापर सुरू केला. यातील टोमॅटो, वांगे, पालक हे शाळेत जेवण तयार करताना निघालेलं बियायुक्त पाणी, फेकून दिलेल्या पालकाची देठं यातूनच उगवून आलेत. तर कांदे व बटाटे मात्र अगदी दहा-वीस रुपये खर्चून बाजारातून आणून लावले. बारापात्रे सरांनी विद्यार्थ्यांनासुद्धा बागकामात सहभागी करून घेतलं. पहिली ते चौथीचा गट दुपारी 2 पर्यंतच्या मोकळ्या वेळेत आणि पाचवी ते आठवीचा गट दुपारी 2 नंतरच्या वेळेत परसबागेत काम करायचा. चुलीतली राख, शेळयांची विष्ठा खत म्हणून वापरली जायची. हळूहळू विद्यार्थ्यांमध्ये या परसबागेविषयी गोडी निर्माण झाली. त्यांनी सरांच्या सल्ल्यावरून आपआपल्या घरीही परसबाग लावून त्यातून उगवलेला भाजीपाला जेवणात वापरायला सुरूवात केली. या उपक्रमामुळे शाळेतली उपस्थिती 54 वरून 84 झाली, हे सरांच्या परसबाग उपक्रमाचं यश. शिवाय, जिल्हा परिषदेने शाळेला मुलांसाठी एक लाख रूपयांचं खेळाचं साहित्य दिलं.
परसबागेतील भाजीपाला वापरल्याने शासनाकडून मिळत असलेल्या मध्यान्ह जेवणाच्या खर्चात बचत होत होती. म्हणून बारापात्रे सर हा पैसा मुलांच्या आवडीच्या खाद्यपदार्थांवर खर्च करत होते. कधी बुंदीचे लाडू, पनीर, अंडे इत्यादी.
सरांच्या या प्रभावी नियोजनामुळेच परसबाग फुलली होती. ही खबर सीओपर्यंत सुद्धा पोहोचली होती. त्यांनी लागलीच या उपक्रमाची दखल घेत प्रत्येक जिल्हा परिषद शाळेने हा उपक्रम राबवावा अशा आदेशाचे पत्रक जारी केले होते. आता बारापात्रे सर नागपूर जिल्हयातील सावनेर तालुक्यात गडमीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपमुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची बदली झाली तशी त्यांनी फुलवलेली खर्डुका इथली परसबाग सूकून गेली आहे.

- निता सोनवणे, नागपूर

No comments:

Post a Comment