Monday 20 November 2017

शाळा आली मदतीला धावून

इगतपुरी शहरातील फुलेनगर भाग. इथं राहणाऱ्या सोनाली आणि मोनाली जिल्हा परिषदेच्या तीन लकडी शाळेत शिकतात. वडील अनिल उन्हवणे मजुरीच्या करतात. त्यातूनच कुटुंबाला दोन वेळचं जेवण मिळतं. दिवाळी जवळ आलेली. एक दिवस दुपारच्या वेळी अचानक घरातल्या गॅस सिलेंडर्चा स्फोट झाला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं. पाच जणांचं हे कुटुंब रस्त्यावर आलं. सोनाली, मोनाली दोघींचीही शाळा दोन-तीन दिवस बुडली. मुली शाळेत दिसत नाहीत म्हणून शिक्षक उमेश बैरागी मुलींच्या घरी गेले. आणि मुलींच्या घराची परिस्थिती बघून त्यांना धक्काच बसला. घरातलं सामान, मुलींचं शाळासाहित्य असं सगळं सगळं जळून राख झालेलं. हे सरांच्या मनाला लागलं. त्यांनी लगेचच मुख्याध्यापक वासुदेव वराडे आणि बाकी शिक्षकांना हे सांगितलं. सगळ्यांनी मिळून उन्हवणे कुटुंबाला मदत करायचं ठरवलं. बैरागी सर म्हणाले, “संकटकाळी एकमेकांना मदत करा हे आम्ही विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो. मोनालीच्या घरावर आलेली आपत्ती मला माझ्या घरावर आलेल्या संकटाप्रमाणे वाटली." मुलांनाही सांगितलं, तर त्यांनीही लगेचच आपले खाऊचे साठवलेले पैसे, आईच्या वापरात नसलेल्या साड्या, भांडीकुंडी दिली. अन्य सहकारी शिक्षकांनीही तेच केलं. त्यांनी स्वतःहून धान्यासह अन्य सामान शाळेच्या आवारात आणून दिलं. गट विकास अधिकारी, केंद्रचालक यांनीही दायित्वाच्या जाणिवेतून त्या कुटुंबाला मदत केली याचा आनंद आहे, मुख्याध्यापक म्हणाले.
गटविकास अधिकारी किरण जाधव, गटशिक्षणाधिकारी शिवाजी अहिरे यांनी तात्काळ रोख रक्कम, किराणा, शैक्षणिक साहित्य उन्हवणे यांच्याकडे दिलं. तेवढ्यापुरती सोय झाली. पण पुढं काय? हा प्रश्न होताच. मग सोशल मिडियाच्या माध्यमातून बैरागी सर आणि बाकी शिक्षकांनी मदतीचं आवाहन केलं. या आवाहानाला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. एका दिवसातच संसारोपयोगी भांडी, धान्य, कपडे अशी मदत उभी राहिली.
मदतीचा हा ओघ पाहून उन्हवणे कुटुंबाला भावना अनावर झाल्या. रक्ताच्या नात्यांपेक्षा घट्ट नातं निभावत संकटसमयी मदत करणाऱ्या सर्वाचे त्यांनी आभार मानले. सोनाली, मोनालीची शाळा आता सुरळीत सुरू आहे.

- प्राची उन्मेष.

No comments:

Post a Comment