Friday 3 August 2018

एका कॉपीचं महाभारत


१२ नोव्हेंबर २०१३ चा तो दिवस. बीएस्सीची दुसऱ्या वर्षाची सेमीस्टर, त्यातला फिजिक्स (Waves & Oscillations) चा पेपर सुरू होता. हर्षदीप दिवाणसिंग सोलंकी हा मुलगाही सर्व तयारीनिशी पेपरला आला होता. पेपर सुरू झाला आणि काही वेळातच हर्षदीप कॉपी करताना पकडला गेला. त्या क्षणभरात हर्षदीपला आपण केलेल्या चुकीची जाणीव झाली. पण, आता उपयोग नव्हता. त्याचे मित्र-मैत्रिणी, शिक्षक सर्वजण हादरुन गेले.
घरी पोचल्या पोचल्या आईने विचारलं, "पेपर कसा गेला?" चेहरा पाहून पेपर अवघड गेला असं वाटून ती गप्प बसली. परंतु वडील मोठ्या आवाजात म्हणाले, “अरे सांगशील का पेपर कसा गेला?” हर्षदीपला रडू फुटलं. आई म्हणाली, “जाऊदे पुढच्या पेपरचा अभ्यास कर. रडू नकोस.” रडता रडताच त्यानं कॉपी केस झाल्याचं सांगितलं. हे ऐकून आई सुन्न झाली, वडिलांचे डोळे मोठे झाले. प्रचंड संतापाने म्हणाले, "तू इंजिनिअरिंगला गेलास, तिथं सर्व विषयात नापास होऊन घरी आलास, आता इथंपण कॉपी करुन आलास. तू माझं नाव समाजात, नातेवाईकांमध्ये आणि परिवारात बदनाम करुन टाकशील.." वडील चिडूनच ऑफिसला निघून गेले, आई तशीच सुन्न बसलेली.
हर्षदीप आतल्या खोलीत गेला. दार बंद केलं. खूप रडला. थोड्याच वेळात त्यानं स्वतःला सावरलं. आणि त्याचा स्वतःशीच विचार सुरू झाला, "आपण व्यसनी नाही, उडाणटप्पु नाही. तरी वडील आपल्याला इतकं वाईट बोलून गेले." तेव्हाच त्यानं ठरवून टाकलं, "आता शरीरावर फक्त हाडं शिल्लक राहिली, तरी चालेल. पण खूप अभ्यास करायचा, सर्व विषयात पास होऊन दाखवायचं, तृतीय वर्षात फिजिक्स हाच विषय स्पेशल ठेवायचा आणि भविष्यात असं अभिमानास्पद काम करुन दाखवायचं की, सगळ्यांना आपला अभिमान वाटायला हवा. आणि वडिलांना २-४ लोकांनी तरी सांगायला हवं की, तुमचा मुलगा खूप छान काम करतोय.."
नोव्हेंबरमध्ये ही घटना घडली आणि डिसेंबरमध्ये एनएसएस कँम्पसाठी त्याची निवड झाली. तिथंल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला बेस्ट स्टुडंट ऑफ द इयर हे बक्षीस मिळालं आणि तीच नवसंजीवनी ठरली.
अखेर व्दितीय सत्रात त्यानं तब्बल १६ विषयांचे पेपर दिले आणि १६ पैकी १४ विषयात उत्तीर्ण होऊन तृतीय वर्षात दिमाखात प्रवेश केला. विशेष म्हणजे, त्या वर्षी, २०१५ साली कॉलेजमध्ये तृतीय वर्षाला स्पेशल फिजिक्स घेणारा हर्षदीप एकमेव विद्यार्थी होता. आणि कुणालाच विश्वास नसताना तो पास झाला. तो म्हणतो, “मी ठरवलं होतं की पास होऊन दाखवायचं आणि इतिहास घडवायचा. जे ठरवलं तेच झालं. पण मी स्वप्नातसुध्दा विचार केला नव्हता की, माझं नाव दादासाहेब रावल कॉलेज, दोंडाईचा इथल्या फिजिक्स विभागात कायमचं कोरलं जाईल.”
आज हर्षदीप बीएस्सी (फिजिक्स), बीएड करुन एमएस्सीच्या दुसऱ्या वर्षात शिकतो आहे आणि त्याच्या कामाचा आलेख दिवसेंदिवस उंचावतो आहे.
हर्षदीप सांगतो, “जर कदाचित, मी त्या दिवशी आत्महत्या वगैरे करायचा विचार केला असता तर विषय तिथेच संपला असता. पण मी स्वतःला खूप हिंमत दिली, हार मानली नाही, जोमाने अभ्यासाला लागलो आणि इतिहास घडवून दाखवला. एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, "जेवढं मोठं अपयश येईल, तेवढं मोठं यश मिळेल."
हर्षदीपचं यश कौतुकास्पदच आहे. पण आपल्या चुकांची कबुली देण्यातला त्याचा मोठेपणा, चुकांमधून घेतलेले धडे उघडपणे शेअर करण्यातला त्याचा उमदेपणा खूप लोभस वाटतो.

- प्रतिनिधी

No comments:

Post a Comment