Saturday 22 September 2018

इथं, चक्क विहिरीत भरते शाळा

लातूरमधील औसा तालुका. इथली देवंग्रा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा. ही शाळा वर्षातले काही महिने चक्क विहिरीत भरते. होय, तुम्ही योग्य तेच वाचलंत. आठवीपर्यंत असणाऱ्या या शाळेचे काही वर्ग खरंच विहिरीत भरतात. देवंग्रा शाळा आठवीपर्यंत असली तरी वर्गखोल्या मात्र दोनच आहेत. पण त्या खोल्याही लहानशा आहेत आणि सहावी–सातवीच्या विद्यार्थ्यांना एकत्र शिकविणे शिक्षकांनाही अवघड जाते.
शाळेच्या संगीता कानडी मॅडम यांनी या जागाटंचाईवर भन्नाट उपाय शोधून काढला आहे. त्या सांगतात, "शाळेची जागा लहानच आहे, आणखी जमीन मिळविण्याचे प्रयत्न सुरूच आहेत. पण तोवर विद्यार्थ्यांचे हाल करणे मनाला पटत नाही. आमच्या शाळेजवळच एक उथळ अशी विहिर आहे, तिच्यात पावसाळ्याचे काही दिवसच फक्त थोडं पाणी असतं. गावकऱ्यांनी कचरा टाकून टाकून ती बुजविण्याचा प्रयत्न चालवला आहे. दिवाळीनंतर पाणी आटतं, मग आम्ही शिक्षक तो कचरा उपसून शेतातले दगड आणि काळी माती टाकून बसण्यायोग्य जमीन बनवतो आणि मग चटई टाकून माझा विहिरीतला वर्ग तयार होतो."
कानडी मॅडम सांगतात, “विहिरीतला कचरा काढण्यासाठी शाळेतले आम्ही चारही शिक्षक मेहनत करतो. एकेकदा तर दोन ते तीन ट्रक गाळ निघाला आहे. मग एखादा मजूर मदतीला घेऊन ती जागा दगड, मातीने भरून काढतो. वर भरपूर काळी माती टाकून लेव्हलिंग करून घेतो आणि तिथेच वर्ग भरवतो.” 2016 साली तर या विहिरीतच कानडी मॅडम यांनी देवंग्रा शाळेचे विज्ञानप्रदर्शन भरविलं होतं. त्यात पहिली ते आठवीचे विद्यार्थी सहभागी झाले होते.
या विज्ञान प्रदर्शनात मेणबत्तीवर ग्लास ठेवून मेणबत्ती जळण्यासाठी ऑक्सिजनची गरज असते हा प्रयोग केला होता.तसेच केसावर प्लास्टिकचा कंगवा अथवा मोजपट्टी घासली आणि मग ती कागदाच्या तुकड्यांवर फिरविली तर त्याला कागदाचे तुकडे चिकटतात, हा स्थितिक विद्युत उर्जेचा प्रयोगही केला होता. लहान मुलांनी जड वस्तू पाण्यात बुडते तर, लाकूड, प्लास्टिकचे बॉल पाण्यावर तरंगतात अशा प्रकारचे प्रयोग केले होते. हे प्रदर्शन पाहण्यासाठी पालकांना म्हणजेच देवंग्राच्या ग्रामस्थांना आवर्जून आमंत्रण दिलं होतं. जेणेकरून त्यांनीही शाळेत, शिक्षणात आणि पाल्यांच्या प्रगतीत रस घ्यावा, असं कानडी मॅडम यांनी सांगितलं.
ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजीची विशेष गोडी लागावी यासाठीही देवंग्रा शाळेत प्रयत्न होतात. इंग्रजीच्या तासाला शक्यतो इंग्रजीमधूनच संवाद साधावा असा आग्रह असतो. इंग्रजी स्पेलिंग्जची अंताक्षरी घेतली जाते. वर्गातील मित्र–मैत्रिणींची नावंही स्पेलिंगसह सांगण्याचा खेळ घेतला जातो. इंग्रजी शब्दांचे शब्दकोडं घेतलं जातं. हावभावातून इंग्रजी शब्द ओळखण्याचा ‘हॉटसीट‘चा गेमही घेतला जातो. इंग्रजीची छोटी छोटी कोडी आणि गाणी यातून विद्यार्थ्यांना रमविलं जातं. “मुलांच्या गुणवत्तेसाठी आम्ही शक्य तितके प्रयत्न करतच आहोत, फक्त गरज आहे ती शाळेसाठीच्या जागेची!” कानडी मॅडम सांगतात.

- स्नेहल बनसोडे– शेलुडकर

No comments:

Post a Comment