Friday 7 September 2018

बाबाचं मनोगत :माझ्या पोरांमुळेच मी व्यसनमुक्त झालो..

बालकाचे घरात आगमन झाले की, त्याचे साऱ्या घरादाराला कौतुक. बाळाची आई, आई होण्याचा आनंद लपवू शकत नाही; पण तेवढाच आनंद बापाला होत असतो. मी हा आनंद अनुभवला आहे. बालकांची बालवयात आईएवढी काळजी बापही घेत असतो, ती मी घेतली आहे. मी आदर्श बाप म्हणून बाळांची काळजी घेतली, त्याचे समाधान महत्त्वाचे ठरले. विशेष म्हणजे पहिल्यांदा मुलीचा बाप झाल्याच्या आनंदाने मी सुखावलो, तो मी कसाच लपवू शकलो नाही.
आमच्या खेड्यात प्लॉनिंग वगैरे काही नसतं. लग्नानंतर लगेच वर्ष- दोन वर्षात बाळाच्या आगमनाची वाट पाहिली जाते. पहिली दोन-तीन वर्षे लोटली की उपचाराची घाई होते. माझं लग्न झाल्यानंतर बराच काळ म्हणजे अगदी आठ वर्ष बाळाची वाट पहावी लागली. आठ वर्षानंतर मुलगी झाली, पुन्हा चार वर्षाने मुलगा झाला.
घरात लहान मूल असलं की बापाला काळजी असते. दिवसभर कामासाठी बाप अन्यत्र
असला तरी लक्ष घराकडे असते. तीन-चार वर्ष वयापर्यत मुलांच्या आरोग्याची जपणूक करण्यासाठी, या वयात बौध्दिक वाढ होण्यासाठी बाप काळजी करतो. घरात लहान लेकरं असली की ते गोकुळ असतं. घरातल्या गोकुळाचं सुख मी अनुभवलं आहे. लहान लेकरांच्या हट्टाने व्यसनमुक्त होण्याचं सुख मिळवणाराही मी कदाचित अपवादात्मक बाप असेल.
पोरांच्या सांगण्यामुळे मी व्यसनमुक्त झालो. त्यालाही आता चार वर्षापेक्षा अधिकचा काळ लोटला. मला आता त्याचा अभिमान वाटत आहे.
बीड जिल्ह्यातील शिरुर कासार या मागास तालुक्या्तील कोळवाडी हे माझं मूळ गाव. गावं नव्हे, खेडं. इथली चार-दोन पुढारलेली माणसं सोडली तर सारी कष्टकरी, शेतकरी, शेतमजुर, बांधकामावर जाणारे मजुर. अर्ध्याहून अधिक लोक ऊसतोड कामगार. माझं कुटुंबही त्यातलं. माझ्या आईवडीलांनी तब्बल पंचवीस वर्ष ऊस तोडायचं काम केलं. मी थकलेल्या आजी-आजोबांसोबत गावी रहायचो. सुटीच्या दिवशी शिरुर कासारच्या बाजारपेठेत असलेल्या अशोक गणपत भांडेकर यांच्या हॉटेलात काम करायचो. त्यातूनच शाळेसाठी लागणारा खर्च भागायचा. ग्रामीण भागातील कष्टकरी माणसं व्यसनाच्या आहारी जातात. सर्वाधिक तंबाखू खाल्ली जाते. ग्रामीण बाजारात अगदी किलोने त्याची खरेदी होते. अलिकडच्या काळात तंबाखुसह मावा, गुटखा खाण्याचं प्रमाण वाढलं आहे.
माझंही तसंच झालं. शाळा शिकताना हॉटेलचं काम सोडून बांधकामावर मजुर, वाळूचे टॅक्टचर भरायला जायला लागलो. याच काळात, वयाच्या पंधराव्या वर्षी नकळत मला तंबाखुचं व्यसन लागलं. बघता- बघता तंबाखु, माव्याच्या आहारी गेलो. पुढे पत्रकारितेत आलो. समाजिक कामात झोकून दिलं. मात्र हे व्यसन सुटत नव्हतं.
माझ्या घरात फक्त मीच तंबाखुच्या पूर्णपणे आहारी गेलेलो. वडीलांनीही अनेक वेळा मला व्यसनापासून दूर राहण्याचा सल्ला दिलेला. मी तंबाखु, माव्याला सोडण्याचा प्रयत्न केला होता, पण ती मला सोडत नव्हती.
मुलगी शिवानी, मुलगा मेघराज आणि पत्नी शारदा यांनी मला व्यसनमुक्त करण्याचा चंगच बांधला. चार-पाच वर्षांची लेकरं मला तंबाखू खाण्याबाबत डिवचत, माझा रागराग करत. पोरांच्या बोलण्याचा राग येई. त्यांच्या सततच्या आग्रहाने एकदा इतका राग आला की खिशातील तंबाखुची, माव्याची पुडी फेकून दिली. १९९४ साली वयाच्या चौदाव्या-पंधराव्या वर्षी लागलेलं व्यसन पोरांमुळे २०१४मध्ये म्हणजे वीस वर्षांनी सुटलं. माझे सहकारी अचंबित झालेच.
कितीही प्रयत्न केले तरी सहजपणे कधीच न सुटणारी तंबाखु सोडून एक वर्षांचा काळ लोटल्यावर मात्र सगळ्यां सहकाऱ्यांनी मिळून माझं कौतुक केलं.
मी व्यसनमुक्त होऊन आता चार वर्षाचा काळ लोटतोय. आता आमच्या बापलेकरांत वेगळंच मैत्रीचं नातं निर्माण झालय. पोरगी मुद्दामहून विचारते, “पप्पा तंबाखू खाल्ली काय?” मी उत्तर देतो, “नाही खाल्ली अन्‌ खाणारही नाही.” आमच्यात झालेल्या मैत्रीच्या नात्याचाही मला अभिमान वाटतो. खरं म्हणजे केवळ पोरांमुळेच मी व्यसनमुक्त झालो.
बाबाचं मनोगत : सूर्यकांत नेटके.

No comments:

Post a Comment