Monday 17 September 2018

माझी मुलगी, माझी ऊर्जा


माझी एकुलती एक मुलगी ऊर्जा उर्फ परी. तिचं हे नाव मीचं ठेवलं. कारण तिच्या जन्मानं आमच्या आयुष्याला खर्‍या अर्थानं ऊर्जा मिळाली. जन्म नोव्हेंबर 2008 चा. डोक्यावर काळंभोर जावळं, गाजरासारखा लाल गोरा रंग, ठसठशीत सरळ नाक, इवले इवले नाजूक हातपाय असं ते नाजूक बाळ जेव्हा पहिल्यांदा मी पाहिलं तेव्हा माझ्यातला बाप खूप सुखावला होता. 
आज उर्जा दहा वर्षाची आहे. चौथ्या वर्गात शिकत आहे. ऊर्जाचा जन्म होण्यापूर्वी अनेक संकटांनी आमच्या कुटुंबावर हल्ला चढवला होता. पण हे छोटसं पाखरू आमच्या घरात आलं आणि ती सारी दुःख क्षणार्धात तिच्या हसण्यात विरून गेली. तिचं खाणं-पिणं झालं की, तिला खांद्यावर घेऊन तिचा ढेकर काढताना आम्हा दोघांची, घरातल्या प्रत्येकाची उडणारी तारांबळ, रात्री तिच्या अंगावर पांघरूण आहे का ते बघणं, तिला डास तर चावत नाहीत ना, तिला थंडी वाजत किंवा उकडत तर नाही ना... या काळजीनं माझं दचकून जाग होणं..पुढं ती रांगू लागली की, पलंगावरून तर पडणार नाही ना, खालचं काही उचलून तोंडात तर घालणार नाही ना, याची चिंता आणि यातून बायकोला माझ्याकडून वैताग येईल इतक्या दिल्या जाणार्‍या सततच्या सूचना, हे सारं आठवलं की आज हसू येतं. आपण फारच काळजी करायचो, पोरीची असं वाटतं.
आजही शाळेची बस यायला उशीर झाला किंवा पोरगी खेळायला गेली की, उगाच काळजी वाटते. कुठेही कामात असलो की, घरी फोन केला किंवा घरून फोन आला तर पहिला प्रश्‍न ऊर्जा कुठे आहे? तसा माझा स्वभाव बिनधास्त, बेफीकीर. पण माझ्या पोरीचा विषय आला की, मी फार काळजी करणारा बाप होतो. पण आता मात्र मी माझ्या या काळजीच्या स्वभावाला थोडी मुरड घातली आहे. कारण आता जर मी माझ्या मुलीची सतत काळजी करत बसलो, तिला जर सतत नजरेसमोर ठेवलं, तर तिचा विकास होणार नाही. जगात कसं वागायचं, मित्र-मैत्रिणी कसे मिळवायचे, रोज येणारे बाहेरच्या जगातील प्रश्‍न कसे हाताळायचे, या सगळ्याची तिला सवय होणं खूप गरजेचं आहे. तिची बुद्धी खूप तल्लख आहे. ऊर्जाला कोणतंही गाणं, कविता, शब्द सगळं एका झटक्यात लक्षात राहतं. परवा तिला घेऊन औरंगाबादला गेलो, तर तिथले गल्लीबोळातील रस्ते तिला पक्के लक्षात होते. मोबाईल, कॉम्प्युटर यात तर ती मोठ्यांना देखील मार्गदर्शन करत असते.
तिला रोज रात्री एक गोष्ट सांगायची जबाबदारी माझी. गोष्टी ऐकताना अनेक वेळा ती गाढ झोपी जाते. पण, पप्पा गोष्ट, हे तिचं रोज ठरलेलं आणि आवडत वाक्य. अनेक वेळा कामामुळं गोष्ट सांगणं जमत नाही. त्यामुळे आता मी तिला गोष्टीची पुस्तकं आणून दिली आहेत.
ज्या गोष्टींना पर्याय नाही. त्या रडत रडत करण्याऐवजी हसत केल्या पाहिजेत. तर त्या बोअर होत नाहीत. हे तिला शिकवण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो, आता हे तिलाही कळू आणि वळूही लागलं आहे. हे सगळं करत असताना निसर्गाशी नात तुटणार नाही, याची मी जाणीवपूर्वक काळजी घेतो. मग घरासमोर बाग करणं असो किंवा कधी लव्हबर्ड, मासे पाळणं असो किंवा आठवडयातून एकदा नदीवर, शेतावर, डोंगरावर घेऊन जाणं असो, असे कार्यक्रम मी तिच्यासाठी आवर्जून आखतो.
आमच्या ऊर्जानं मोठं व्हावं हे सगळ्या वडिलांसारखं मलाही वाटतं. पण मोठं होत असताना तिच्यातला माणूस कधी हरवणार नाही. उलट तो अधिक खुलावा हाच माझा नेहमी प्रयत्न असतो.
बाबाचं मनोगत : उन्मेष गौरकर.

No comments:

Post a Comment