Sunday, 25 November 2018

माझ्या शाळेनं मला काय दिलं? -- ईर्शाद बागवान


शाळेचे दिवस एकत्रितपणे छान होते. आठवतात अधूनमधून. चौथीपर्यंतच्या इनामदारबाई आठवतात, चेहऱ्यावरून हात फिरवत मायेने बोटे मोडणाऱ्या. चंदा नावाची वर्गमैत्रीण, त्यावेळच्या मानाने बरीच उंच. भलीथोरली. सारखं मांडीवर बसवून घेत कौतुक करणारी. शांतीलाल, प्रवीण, संतोष यांसारखे बेरकी दोस्त. शाळेच्या वाटेवर भेटणारा येडा पांग्या आठवतो. किडक्या दातांनी हातपाय खुरडत हसतखिदळत सदा मागेमागे पळणारा. पाटीतली चिंचाबोरंपेरू विकणारी यमाईही आठवते. तसंच पाचवीनंतरच्या वर्गातले इंग्रजीचे कडक्क घाऱ्या डोळ्यांचे सावंत सर. त्यांची एक छडी इंग्रजीचा आयुष्यभराचा बेस पक्का करून गेली. दोन दिवस हात पोळत होता. असेच साबळे सर बीजगणिताचे. पण त्यांची शैली विनोदी. कधीमधी चिडायचे तेव्हा मग थेट लाथाच घालायचे. पण इतकं भारी शिकवायचे की, गणित पहिलं कुणाचं होतंय, अशी स्पर्धा लागायची आमच्यात. पीटीचे माने सर आठवतात. काळेकभिन्न. बुटके. जाड मिशा. कायम हातात छडी. शांतीत खेळायलासुद्धा न देणारे. आणि धनवे सर संस्कृतचे. कायम पान तोंडात. गोरे. धष्टपुष्ट. मिशांचा आकडा. पाठांतर छडीच्या तालावर करून घेणारे.
ही लिस्ट फारच मोठी होईल. एकूण आमच्या वेळी शिक्षणात छडीशिवाय पर्याय नव्हता. पण एक मात्र झालं. आमचा पाया बाकी भक्कम केला या छडीने. आयुष्यभर न विसरण्याजोगा. तसं तर एखादेवेळीच प्रत्यक्ष छडी खाल्ली असेल. पण छडीची खरीखुरी भीती मनात होती. मायेने जवळ घेणारे शिक्षक फक्त प्राथमिकला.
आता वाटतं, छडी नसती तरी भागलं असतं कदाचित. प्रेमाने जग जिंकता येतं. आम्ही तर, निरागस मुले होतो न कळत्या वयातली.
कधीकधी, खूप हमसून रडण्याचेही प्रसंग आले. पीटीच्या सरांनी खेळात घ्यायला कायमच नकार दिला आणि आपण कायम प्रेक्षकाचाच रोल निभावला तेव्हा. उताऱ्याची पूर्ण केलेली वही मित्राकडे राहून तो ती घरी विसरल्यावर आपल्याला मार खावा लागला तेव्हा. फुटबॉलचे खिळेवाले बूट घालून येणारे चौहान सर मित्राला लाथा घालत होते तेव्हा. कारण काय तर उत्तर येत नाही. आणि गॅदरिंगमध्ये भाग घ्यायची खूप इच्छा असूनही, गाण्याची प्रॅक्टीस करूनसुद्धा ऐनवेळी नाव घेतलं नाही म्हणून.
अशावेळी संस्कारक्षम आपण आणि अत्याचारक्षम आजुबाजूचे, असं वाटायचं. खूप रडू यायचं. मस्तीखोर नसताना, भोगाव्या लागणाऱ्या शिक्षा तर अजूनच ताप द्यायच्या.
धर्मातली ऐकीव बंधनं तर प्रार्थनेला हात जोडून नीट लक्ष केंद्रीत होऊ द्यायची नाहीत. शिक्षकांची नजर चुकवून हात हळूच पसरवले जायचे आणि तौबा तौबाचा गजर तोंडून चालू असायचा. आताशा वाटतं, आजच्या काळातल्या शाळांनीही धर्म जसा काय वाटून घेतला आहे. मराठी शाळांमध्ये सगळे मराठी सणवार, व्रतवैकल्ये, प्रार्थना, भजनं, गीता वगैरे. इंग्रजी शाळांत ख्रिश्चन धर्मपारायणं, उर्दू शाळांत मुस्लिम उपासनापद्धती. हे सगळंच, खरं तर अति होतंय.
आपण मुलांना त्यांच्या कलाने नीट वाढू देत नाही. त्यांच्यावर कायमच काही ना काही लादत राहतो. आपल्याकडे निकोप शाळा कधी निर्माण होणार? जिथे धर्म नसेल, पण संस्कार असतील. जे शिक्षकवृंदांच्या हालचाली, बोलण्या- वागण्यातून मुलांवर होतील. वातावरण मुलांच्या बौद्धिक, सामाजिक आणि शारीरिक वाढीसाठी उपयुक्त असेल. जिथून विकार वाऱ्यावर उडून जातील. आणि राहीले तरीही सामाजिक नुकसान न होण्याच्या पातळीपर्यंत राहतील. उद्याचं भविष्य म्हणून आपण मुलांकडे पाहतो. आणि त्यांच्या बाबतीत अति काळजी असल्याचं दाखवत वाढीच्या अंगाने निष्काळजी राहतो.
आजच्या माझ्या मुलीच्या मराठी शाळेचे चित्र तरी फारसे सुखावणारे खचितच नाही. आजच्या शाळा म्हणजे भरमसाठ लिखाण आणि बेसिक कमकुवत, अशी गत. पळा पळा स्पर्धा करा एवढंच का आपल्या जगण्याचं सूत्र? चांगला नागरिक बनण्याची शाळा ही पहिली पायरी आहे. हेच आपले ध्येय असावं. म्हणजे जराशाने भावना दुखण्या - दुखवण्याची वेळ कुणावरही येणार नाही. सब्र का माद्दा बढेगा. समोरच्याला ऐकून घेण्याइतकी, समजण्याइतकी कुवत आपल्यांत निर्माण होईल. जरी ते नावडते असले तरीही.
शाळेनं मला काय दिलं, हा प्रश्न जेव्हा मी स्वतःला विचारतो तेव्हा बराच काळ उत्तराच्या शोधात मेंदू ब्लँक होतो. मग वाटतं, शाळेने भलेबुरे संस्कार तर केलेच. ज्ञानही दिलं. मित्र दिले. पण सगळंच मागं पडलं. जगण्यातल्या कोलाहलात हरवलं कुठेतरी. आत्ता या धावपळीच्या जगण्यात पदोपदी कामाला येतो संयम. आणि तो बहुतांशी माझ्या स्वभावाचा भाग असला, तरीही नीट विचार करता, त्याला आकार दिला शाळेनेच हेही आकळतं. ह्या बाबतीत शाळेचे अनंत आभार मानायलाच हवेत
- ईर्शाद बागवान.

शिकणे आनंदाचे -आणि तानाजीने अभ्यासाचा गड सर केला

शून्यात लावलेली नजर, डोळ्यातून वाहणारे पाणी, दप्तर उचलण्याचीदेखील ताकद नसलेला तो आज पहिल्यांदाच शाळेत आला होता. त्याचं नाव तानाजी. पण गुणवत्तेचा गड सर करण्याचं फार मोठं आव्हान आमच्यासमोर होतं... तानाजी पहिल्यांदा माझ्या वर्गात नव्हता. पण गतिमंद असलेल्या तानाजीच्या तक्रारी दुसऱ्या शिक्षिका ऐकवायच्या, एवढंच नाही तर त्याच्या आईशीही या शिक्षिका चिडून, वैतागून बोलत. मला हे सगळं कुठंतरी खटकत होतं.
दोन वर्षानंतर तानाजीचा वर्ग माझ्याकडे आला. या विशेष मुलांच्या बाबतीत गुणवत्तेचे माझे स्वतःचे असे निकष आहेत. त्या मुलांनी सद्यस्थितीच्या पुढे जाण्याची नुसती धडपड जरी केली आणि अर्धं पाऊल जरी पुढं टाकलं तरी त्याचा आभाळाएवढा आनंद मला होतो. तानाजीबाबतही त्या दृष्टीने माझे प्रयत्न सुरू झाले.
तानाजीशी गप्पा मारणे, त्याला वर्गात समोर बसविणे असे उपचार त्याला माणसांत आणण्यासाठी सुरु केले. पण हा ध्यानस्थ योग्याप्रमाणे ठराविक ठिकाणी बसून खिडकीतून आईची वाट बघत बसायचा. माझ्या प्रयत्नाला कुठलाच प्रतिसाद देत नव्हता.
एक दिवस तानाजीची आई वर्गात आली. तिला वाटले की आता नवीन बाई ‘तिचा मुलगा शाळा शिकायला कसा अयोग्य आहे’ याचाच पाढा वाचतील, म्हणून बिचारी पूर्वतयारीनेच आली होती. येता क्षणी तिने पडती बाजू घेत स्वत:च्या नाशिबाला दोष दिला आणि तो वेडा आहे, त्याला फक्त वर्गात बसू द्या वगैरे विनवण्या सुरू केल्या तेव्हा माझेही डोळे किंचित पाणावले! तिला जवळ बसवून घेतलं आणि सांगितलं की “बाई, आधी तुम्ही तुमच्या मुलाला ‘वेडा’ म्हणणे बंद करा. त्याला काही येत नाही असं तुम्हीच नका ठरवू. कारण प्रत्येक मूल शिकू शकतं, फक्त प्रत्येकाला लागणारा वेळ मात्र वेगवेगळा असतो, एवढंच! मी बघेन त्याच्या अभ्यासाचं, तुम्ही नका काळजी करू.” माझ्या समजावण्याने त्या थोड्या शांत झाल्या.
आता तानाजीच्या आईला दिलेल्या शब्दाप्रमाणे त्याच्या अभ्यासामागे लागणं भाग होतं. आणि इथून सुरू झाला एक प्रवास!! म्हणतात ना की प्रत्येक रोप प्रकाशाच्या दिशेने वाढतं. त्याचप्रमाणे वर्गात नित्यनेमाने घेतले जाणारे उपक्रम, कविता, नाच, गाणी वर्गातील उपलब्ध शैक्षणिक साहित्य या सर्व कृतीच्या ‘प्रकाशा’कडे तानाजी नजर वळवून बघू लागला. आणि माझ्या तानाजीच्या नजरेत मला त्यांची हसरी छटा दिसू लागली!
आता तो वर्गात सामूहिक कवितेच्या सादरीकरणात उभे राहून थोडेफार हातवारे करू लागला. वहीवर रेघोटया मारून माझ्याकडून ‘बरोबर आहे’ असं म्हणवून घेण्यात आणि हक्काने घरचा अभ्यास मागण्यात रमू लागला. खेळता खेळता जागा बदलून कुठंही बसणं आणि दप्तर सापडत नाही म्हणून डोळ्यातून घळघळ पाणी काढत मला दप्तर शोधायच्या कामगिरीवर लावणं असं सुरू झालं.
मूलभूत वाचन प्रशिक्षणातील कृती त्याला खूप आवडतात. या कृतींमुळे तानाजीचा वाचनाचा वेग आश्चर्यकारकपणे वाढला आहे. त्याला अजून अक्षरांचे लेखन व्यवस्थित जमत नसले तरी तो अक्षरं ओळखतो. एक दिवस ‘पाणी’ हा शब्द मी वाचला तर या पठ्ठयाने ‘मी नळावर पाणी भरतो’ हे वाक्य सांगितलं, त्याची प्रगती पाहून मी खूप खूष झाले.

- रोहिणी विद्यासागर.

Tuesday, 13 November 2018

पालावर साजरी झाली दिवाळी

जालना जिल्ह्यातलं अंबड शहर. दिवाळीचे दिवस. शहराबाहेरच्या पालांवर लगबग सुरू होती. ‘समाजभान’ची टीम आली होती. पणत्या, सुगंधी तेल, उटणी, साबण, कपडे, फटाके, फराळ आणि उत्साह आपुलकी घेऊन. ''आपण खूप आनंदात सण साजरे करतो. पण शहराबाहेरच्या राहुट्यांमध्ये उत्सवांमुळे काहीच फरक पडत नाही. फिरस्तीवर असणाऱ्यांच्या पालांवर दिवाळीतही अंधारच असतो.'' ‘समाजभान’चे दादासाहेब थेटे सांगत होते. थेटे इंदिरानगर मधल्या छत्रपती शिवाजी प्राथमिक विद्यालयात 

शिक्षक. अंबड, घनसावंगी तालुक्यातल्या गोरगरीब, तांड्यांवर राहणाऱ्या मुलांचं, पालकांचं प्रबोधन करून त्यांना शाळेत आणलं आहे. ‘समाजभान’ची सुरुवात 2011 च्या दिवाळीत 20 समविचारी मित्रांच्या चर्चेतून झाली. सुरवातीचं नाव मैत्रेय प्रतिष्ठान. बाबा आमटे त्यांचं प्रेरणास्थान. आनंदवनातून परतल्यानंतर 2016 मध्ये ‘समाजभान’ असं नामकरण. समाजभान टीममध्ये अखंड कार्यरत असणारे 20 जण. याखेरीज मोहिमेसोबत कार्य करणारे जिल्हाभरात 1 हजार मित्र.
2016 पासून ' एक दिवा पेटवूया , चला दिवाळी साजरी करूया' उपक्रम. गेल्या वर्षी सौर उर्जेवर चालणारे दिवे तांड्यावर वाटण्यात आले होते. यावेळीही वंचित घटकांसोबत आणि पालावरही दिवाळी साजरी होईल, अशी आखणी करण्यात आली. 15 दिवस आधी तयारीला सुरुवात. शहरातल्या दानशूर व्यक्तींचाही सहभाग. कुणी चिवडा,लाडू,शंकरपाळी,फराळाची जबाबदारी पार पाडली तर कुणी इतर सामग्रीची.
पालावर 130 ऊसतोड कामगार. या कुटुंबांबरोबरच भंगारवेचक, एचआयव्हीग्रस्त अशा 320 हून अधिक महिलांना साड्या वाटण्यात आल्या. 450 हून अधिक मुलांना फटाके आणि खाऊ. समाजभानमुळे खऱ्या अर्थानं वंचितांची दिवाळी साजरी झाली.
-अनंत साळी.

पोलिसांचं बॅंडपथक आणि भाऊबीज

परवाची भाऊबीज. रत्नागिरीतल्या माहेर या सामाजिक संस्थेचा परिसर. पोलीस मुख्यालयाचं बँडपथक आलं होतं. मोठीमोठी वाद्यं. मुलांच्या चेहऱ्यावर प्रचंड उत्सुकता. बँडपथकाचा इथला असा पहिलाच कार्यक्रम. त्यामुळे हरखून गेलेली. 'जयोस्तुते... सत्यम् शिवम् सुंदरम्.... सारे जहाँ से अच्छा... जहाँ डाल डाल पर सोने की चिडियां.....' अशा विविध गाण्यांच्या धून. मुलांबरोबर हळूहळू संस्थेतल्या आजीआजोबांचे पायही थिरकायला लागले. आम्हा सर्वांनाच खूप आनंद झाला. दिवाळी आपापल्या परीनं प्रत्येकानं साजरी केली. निराधारांनाही सणाचा आनंद लुटता आला पाहिजे, असं आमच्या 'आपुलकी' संस्थेला वाटत होतं.

विशेष घटकांसाठी काम करण्याकरिता दोन वर्षांपूर्वी आम्ही संस्था सुरू केली. महिनाभरापूर्वी आम्ही माहेरमधल्या मुलांची सहल काढली होती. शासकीय अधिकाऱ्यांबरोबर त्यांची भेट घडवून आणली. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मुलांशी मनसोक्त गप्पा मारल्या. या मुलांसाठी पोलीस दलाकडून काहीतरी करण्याची इच्छा मुंढे यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार आम्ही मुलांसाठी पोलीस बॅंडचा कार्यक्रम ठेवण्याची विनंती केली. त्यांनी लगेचच ती मान्यही केली. रात्रीची ड्युटी आटपून पोलिसांनी मुलांसाठी कार्यक्रम केला.
मुलांनी पोलिसांना शुभेच्छापत्रं आणि स्वतः तयार केलेली कागदी फुलं दिली. बँडपथकानं भाऊबीज ओवाळणी म्हणून माहेरला आर्थिक मदत दिली.
''संस्थेतून शाळेत आणि शाळेतून संस्थेत असा या मुलांचा दिनकम असतो. मात्र आपुलकीने मुलांची दिवाळी खरोखरच आनंदाची केली.'' माहेर संस्थेचे अधीक्षक सुनील कांबळे यांनी सौरभ मलुष्टे, विनोद पाटील, प्रथमेश पड्याल अशा आम्हा सर्वांचं कौतुक करून हुरूप वाढवला. मूळची पुण्याची संस्था असलेली माहेर देशात विविध ठिकाणी काम करत असून रत्नागिरीतला आश्रम १० वर्षांपूर्वी सुरू झाला. सध्या ३०च्या वर मुलं संस्थेत आहेत. 

-जान्हवी पाटील.

Monday, 5 November 2018

ll पहिल्यांदाच जिल्हाधिकार्‍यांना पाहिलं l दिवाळीआधीच गाव सजलं ll

दिवाळी काही दिवसांवर होती. तरीही, गाव सडा, रांगोळ्यांनी सजलेलं. रस्त्यावर फुलांच्या पाकळ्या अंथरलेल्या. गावातील भजनी मंडळ हातात टाळ-मृदंग घेऊन सज्ज झालेलं. औक्षणासाठी महिलांनी आरतीचं ताट तयार केलेलं. गावच्या वेशीवर जिल्हाधिकार्‍यांची गाडी येताच भजन सुरू होतं. महिला, गावातील नागरिक पुढे सरसावतात. आबालवृध्दांचीही पाहुण्यांना पाहण्यासाठी धडपड सुरू होते. ही नवलाई स्वातंत्र्यापासून प्रथमच गावात कलेक्टर येत आहेत म्हणून होती. तुळजापूर तालुक्यातल्या वागदरी गावात कलेक्टरांचं अनोखं, दिमाखदार स्वागत झालं आणि कलेक्टरही भारावून गेले. दणक्यात स्वागत करूनही गावकऱ्यांनी कलेक्टरसाहेबांकडे काहीही मागितलं नाही, हे विशेष.
स्वातंत्र्यानंतरच्या ७० वर्षात एकाही जिल्हाधिकाऱ्यांनी भेट दिली नाही, असं गाव सहसा नसेल. नळदुर्ग-अक्कलकोट रोडवरच्या दीड हजार लोकसंख्येच्या वागदरी गावाने मात्र स्वातंत्र्यानंतर प्रथमच जिल्हाधिकारी पाहीले. आजवर कधीही जिल्हाधिकारी गावात आलेलेच नव्हते. म्हणूनच, गावकऱ्यांनी उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना गावात निमंत्रित केलं होतं. त्यांचा अनोखा स्वागतसोहळा शनिवारी, २७ ऑक्टोबरला साजरा झाला.
त्याचं झालं असं, वागदरी गावातले सामाजिक कार्यकर्ते उमाकांत मिटकर दोन वर्षांपासून राज्य पोलिस तक्रार निवारण प्राधिकरण समितीवर सदस्य म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा अधिकारी वर्गात मोठा संपर्क आहे. त्यामुळे, जिल्हाधिकाऱ्यांना एकदा गाव पाहण्यासाठी आणा, अशी विनंती गावकर्‍यांनी मिटकर यांना केली. गावकऱ्यांची ही मागणी मिटकर यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांच्यापर्यंत पोहोचवली. स्वातंत्र्यानंतर एकदाही कुठलेही जिल्हाधिकारी वागदरीमध्ये गेलेले नाहीत, हे ऐकल्यानंतर गमे यांनाही आश्चर्य वाटले. त्यांनी यासाठी लगेच होकार दिला. कुठल्याही शासकीय औपचारिकतेशिवाय गावभेटीचा कार्यक्रम ठरला. जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, त्यांच्या पत्नी भारतीताई आणि मुलगी ऋतुजा, असे तिघे गावात दाखल झाले. गावकऱ्यांनी मुख्य रस्त्यापासून सुमारे १ किलोमिटर अंतरापर्यंत, म्हणजे गावातील भवानसिंह महाराज मंदिरापर्यंत रस्त्यावर रांगोळी, फुलांच्या पाकळ्या अंथरण्यात आल्या होत्या. टाळ-मृदंगाच्या गजरात, ‘रामकृष्ण हरी’च्या जयघोषात, टाळकऱ्यांनी पाऊल खेळत, महिलांनी जागोजागी औक्षण करत उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हाधिकाऱ्यांचं स्वागत केलं. गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. घरांसमोर रांगोळ्या काढलेल्या, महिलांकडून औक्षण करून अंगावर फुलांचा वर्षाव केला जात होता. मिठाई वाटली जात होती. गावात प्रथमच जिल्हाधिकारी आले होते ना!
स्वागतानंतर भवानसिंह महाराज मंदिरासमोर रात्री भजनसंध्या कार्यक्रम आयोजला होता. यावेळी जिल्हाधिकारीही भजनात दंग झाले.
तीर्थक्षेत्र अक्कलकोटला जाताना नळदुर्गपासून अवघ्या पाच किलोमिटर अंतरावर म्हणजे मुख्य रस्त्यालगत असलेल्या वागदरी गावाला संतविचारांची परंपरा लाभली आहे. गावकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती. फारशी बरी परिस्थिती नसली, तरी वारकरी सांप्रदायाच्या संस्कारांप्रमाणे गावकऱ्यांमध्ये कायम समाधान जाणवते.
गावात रस्ते, नाल्या, पाणी, अारोग्य, अशा मूलभूत बाबींचा विकास झालेला असला तरी इतर गावांप्रमाणे त्यात काही उणीवाही जाणवतात. मात्र, यासाठी गावकऱ्यांना आंदोलने, मोर्चे काढावे लागले नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांची भेट ही अनौपचारिक ठरावी, अशी गावकऱ्यांची अपेक्षा होती. तरीही जिल्हाधिकारी गमे यांनी गावकऱ्यांशी संवाद साधताना अडचणी जाणून घेतल्या.
- चंद्रसेन देशमुख.

Friday, 2 November 2018

आईवेगळ्या कोमलला जगवणारे आरोग्य अधिकारी - कर्मचारी



निफाड तालुक्यातील विंचूर परिसरात राहणाऱ्या गायकवाड कुटुंबियांच्या घरी गोड बातमी समजली. सुजाताने प्रसूतीवेदना सहन करत 22 ऑक्टोबर, 2017 रोजी कोमलला जन्म दिला. 
पण, बाळाचं वजन अवघं 900 ग्रॅम. इथून पुढं, जिवंत राहाण्यासाठी दोघींचा संघर्ष सुरू झाला. सुजाता हरली, मरण पावली. कुटुंबियांनी कोमलकडे पाठ फिरवली. तरीही कोमल जगली, तिची तब्येत सुधारली. कसं घडलं हे? कोणी घडवलं?
अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी यांनी कोमलच्या जिवाला असलेला धोका लक्षात घेऊन तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. ११ दिवस ती जिल्हा रुग्णालयात असताना, आजी लीलाबाई गायकवाडसोबत अंगणवाडी सेविका प्रमिला साळी, मदतनीस वृषाली शिरसाठ यांनी तिची काळजी घेतली. आईविना पोरक्या कोमलच्या तब्येतीची विचारपूस अंगणवाडी सेविका दररोज तिच्या घरी जाऊन करत होत्या. तिची शक्य तेवढी काळजी घेत होत्या.



अंगणवाडी पर्यवेक्षिका वंदना खांदवे यांनीही घरी भेट देऊन कोमलच्या कुटुंबियांना समजावलं. कमी वजनाच्या कोमलला जिल्हा रुग्णालयातील नवजात शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल करायला सांगितलं. यासाठी तिचे पालक तयार होत नव्हते. राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाचे डॉ. विशाल जाधव, डॉ शुभांगी भारती यांनी पुढाकार घेतला. अखेर सर्वांच्या प्रयत्नाने कुटुंबाचं मतपरिवर्तन झालं आणि 5 महिन्यांची कोमल जिल्हा रूग्णालयातल्या शिशु पोषण पुनर्वसन केंद्रात दाखल झाली. तेव्हा तिचं वजन होतं 3 किलो 300 ग्रॅम.
आता ती चोवीस तास डॉक्टरांच्या निगराणीत होती. त्यामुळे, योग्य आहार मिळून 15 दिवसांतच तिचं वजन 4 किलो 700 ग्रॅमपर्यंत वाढलं. केंद्रात डॉ. जाधव, डॉ. भारती यांनी तिची देखभाल केली. घरी सोडल्यानंतरही तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी अभिमान माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. गावले यांनी तिच्या घरी भेटी, नियमित तपासणी सुरूच ठेवलं. अंगणवाडी सेविका आणि त्यांची मदतनीस यांनी दररोज पाठपुरावा करून, तिला पोषण आहार देऊन तिची काळजी घेतली. आता तिचं वजन तब्बल 9 किलो 700 ग्रॅम इतकं झालं आहे. नुकताच 22 तारखेला या सगळ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांनी विंचूर येथील अंगणवाडीत कोमलचा पहिला वाढदिवस धूमधडाक्यात साजरा केला. 

- प्राची उन्मेष

Thursday, 1 November 2018

नातीचा वाढदिवस आणि आयसीयूची सुरुवात

बीडमधलं जिल्हा सामान्य रुग्णालय. 16 ऑक्टोबरची दुपार. खासदार प्रीतम मुंडे यांचीे उपस्थिती. विराचा पहिला वाढदिवस. विरा, सामाजिक कार्यकर्ते गौतम खटोड यांची नात. सामाजिक भान ठेवूनच आजोबांनी नातीचा वाढदिवस साजरा केला. खटोड यांना काहीच दिवसांपूर्वी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांचा फोन आला.रूग्णालयात नव्या आयसीयू विभागासाठी दहा महिन्यापूर्वी मागची इमारत आणि यंत्र उपलब्ध झाली होती पण खाटा नसल्यामुळे आयसीयू विभाग सुरू करणं शक्य नव्हतं. खटोड यांनी क्षणाचाही विलंब लावला नाही. स्वखर्चानं 20 खाटा देण्याचं आश्वासन त्यांनी थोरात यांना दिलं.
पुण्यातून 20 खाटा त्यांनी खरेदी केल्या. त्यासाठी 1 लाख 10 हजार रूपये खर्च केले. तर बीडमधून गाद्या खरेदीसाठी 50 हजार रूपये खर्च केले. विराच्या वाढदिवसानिमित्त ते रुग्णालयाला देण्यात आले.
खटोड गेल्या 14 वर्षांपासून वडील झुंबरलाल खटोड यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 31 डिसेंबरला राज्यस्तरीय कीर्तनमहोत्सव आयोजित करतात. सामुदायिक विवाह सोहळा, महिला अत्याचार विरोधी प्रबोधन महारॅली, कॉपीमुक्त परिक्षा रॅली असे विविध उपक्रम ते राबवतात. खटोड यांच्या मुलामुलींचे विवाहही सामुदायिक विवाह सोहळ्यातच झाले आहेत.
बेटी बचाव बेटी पढाव अभियानांतर्गत मुलींच्या नामकरण सोहळ्याची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. नातीकडूनही समाजकार्य सुरू राहावं अशी इच्छा गौतम खटोड व्यक्त करतात.
-दिनेश लिंबेकर .