Sunday, 25 November 2018

माझ्या शाळेनं मला काय दिलं ?- मच्छिंद्र बोऱ्हाडे, शिक्षक.

पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शिरोली बुद्रुक येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माझं माध्यमिक शिक्षण जून 1979 ते मार्च 1985 या कालावधीत झालं. आमच्या गावातील या शाळेत जवळपासच्या पाच-सहा गावांतली शेतकरी कुटुंबातील मुलं शिकण्यासाठी येत. शाळेतील मुलांचा त्यावेळचा गणवेश म्हणजे पांढरा हाफ शर्ट, गांधी टोपी आणि खाकी हाफ पँन्ट तर मुली पांढरा हाफ शर्ट आणि निळ्या रंगाचा स्कर्ट घालत. आमच्या शाळेत दीक्षित सर मुख्याध्यापक असताना त्यांनी वाचनाचे संस्कार मुलांवर व्हावेत म्हणून खूप चांगले आणि अनोखे उपक्रम शाळेत राबवल्याचं माझ्या स्मरणात आहे. ज्येष्ठ साहित्यिक गो. नी. दांडेकर, रणजीत देसाई यांच्याशी गप्पा त्यांच्याच मुख्याध्यापक पदाच्या काळात झाल्या. शाळेत त्यावेळी ग्रंथालय छोटं असताना सुद्धा खूप चांगली पुस्तकं मिळायची. आमच्यावेळी वाचनासाठी घेतलेलं पुस्तक आठवड्यात एकदाच बदलून मिळायचं, त्यामुळे ते पूर्ण वाचून मगच मी परत जमा करीत असे. साने गुरूजींचं 'श्यामची आई' हे शाळेत असतानाच वाचलं होतं. चांगल्या वाचनाची सवय 
शाळेतील या उपक्रमांमुळेच लागली. आमच्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेच्या पुणे जिल्ह्यात तेव्हा जवळजवळ पन्नास माध्यमिक शाळा होत्या. त्या काळात बहुतांश आंतरशालेय नाट्य स्पर्धांचं आयोजन आणि साहित्यिक उपक्रम आमच्याच शाळेत झाले. मुलांना शाळेत चालत अथवा सायकलवरून येण्याशिवाय अन्य साधन त्या काळी उपलब्ध नव्हतं. तरी सुध्दा पी. टी. शिकवणाऱ्या नांगरे सरांच्या करड्या शिस्तीमुळे वेळेवर जाण्याचा तेव्हा झालेला संस्कार आजही कायम आहे. दहावीच्या वर्षी तर दीपावलीच्या सुट्टीनंतर रात्रीचे जादा वर्ग शाळेत सायंकाळी सात ते नऊ या वेळेत चालत. रात्री घरी जाण्याची सोय नसायची. मग आम्ही मुलं त्या काळात पैसे देऊन कोणाच्या तरी घरी राहत असू. मग दुसऱ्या दिवशी पहाटे उठून घरी जात असू. त्यानंतर शेतकरी असलेल्या वडिलांना थोडी फार मदत करून पुन्हा शाळेत जावं लागायचं. शाळेची वेळ सकाळी अकरा ते संध्याकाळी पाच अशी असायची. मात्र दहावीचे जादा वर्ग सकाळीही दहा ते अकरा या वेळेत चालंत. आम्हाला लाभलेल्या चांगल्या शिक्षकांमुळे ट्युशन किंवा क्लासला जाण्याची वेळ आमच्यावर आली नाही. मन लावून शिकवणारे शिक्षक असल्यामुळेच पालकंही शालेय शिस्त आणि प्रशासनात फारसा हस्तक्षेप करीत नसंत.
शाळेला प्रचंड मोठं मैदान आहे. साहजिकच शनिवारची सामुदायिक कवायत आणि ती सुद्धा वाद्यांच्या साथीत, हा आनंदाचा सोहळाच असायचा. रोजची शाळेची प्रार्थना सुद्धा शाळेच्या मोठ्या प्रांगणात होत असायची. गावातील शाळा असूनही या शाळेचे अनेक विद्यार्थी अमेरिका ते पूर्वेकडील तैवान सारख्या देशांत आणि प्रशासनात अगदी जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
माझ्या शाळेनं मला केवळ पुस्तकी शिक्षणच दिलं नाही, तर आयुष्याकडे बघण्याची दृष्टी दिली. या अफाट जगात कुठेही गेलं तरी आपला निभाव लागेल, हा आत्मविश्वास दिला. आज मी जेव्हा मुलांसमोर शिक्षक म्हणून उभा असतो तेव्हा माझ्या शाळेनं दिलेला हा आत्मविश्वास मला माझ्या क्षेत्रात नव्या वाटा शोधण्याचं बळ देतो. म्हणूनच माझी शाळा कायम माझ्या बरोबर असते. कारण तिचं देणं आता माझ्या जगण्यात उतरलेलं आहे.
मच्छिंद्र बोऱ्हाडे, शिक्षक, बोरिवली

शाळेनं मला काय दिलं?-प्रवीण घुगे.



प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये शाळेचं महत्त्व अनन्यसाधारण असतं. प्रत्येकाच्या आयुष्याची जडणघडण आणि विकास शाळेतच होत असतो. मी ग्रामीण भागातल्या शाळेत शिकलो. सुरूवातीला जिल्हा परिषद शाळेत, त्यानंतर अणदूर इथल्या माध्यमिक शाळेत माझं शिक्षण झालं. पण शाळेत नेहमीच्या पाठ्यपुस्तकी शिक्षणाशिवाय इतर उपक्रम असायचे. त्यातूनच खऱ्या अर्थाने आम्हांला एक विश्व पाहायला मिळालं. तेव्हा मी शाळेचा मुख्यमंत्री म्हणून निवडून आलो होतो. मुलांच्या मनामध्ये लोकशाही मूल्यं रूजवण्याचं काम अशा उपक्रमांनी केलं.
शाळेचा मुख्यमंत्री आणि आज बालशिक्षण आयोगाचा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडतो आहे, यात अर्थातच शाळेचे संस्कार आणि उपक्रम याचाच भाग आहे. त्यामुळे शाळेतल्या अभ्यासेतर उपक्रमांतून विद्यार्थ्यांचं व्यक्तिमत्त्व घडत असतं, असं मला वाटतं. 

शाळेनं मला काय दिलं? - अमोल उदगीरकर


आजुबाजुचे अनेक लोक शाळेबद्दल नॉस्टालजीक वगैरे होतात तेव्हा मला ती भावना समजून घेता येत नाही. मला माझ्या शाळेबद्दल भरभरून अशा किंवा काहीच भावना मनात येत नाहीत. मी दहावीपर्यंतचं शिक्षण परभणीमधल्या बालविद्यामंदिर या शहरातल्या सर्वोत्कृष्ट समजल्या जाणाऱ्या शाळेत घेतलं. माझ्या शाळेसंबंधित बहुतेक आठवणी कोंदट, घुसमटलेल्या आहेत. माझा आणि गणिताचा छत्तीसचा आकडा होता. माझे आवडते विषय म्हणजे भाषा विषय आणि सामाजिक शास्त्रे. पण हे विषय वर्णनात्मक असल्याने त्या विषयांमध्ये कधीही भरभरून मार्क्स मिळत नव्हते. त्या काळातल्या पद्धती प्रमाणे आमच्या शाळेत पण गणित आणि विज्ञान या विषयात हुशार असणारे विद्यार्थी म्हणजेच हुशार आणि उज्ज्वल भवितव्य असणारे विद्यार्थी अशी थोडी भाबडी आणि थोडी भंपक धारणा होती. ज्याचे भाषा विषय आणि इतिहास वैगेरे विषय चांगले आहेत त्याच्याकडे फक्त एक बऱ्यापैकी विद्यार्थी म्हणून बघण्यात येई. मी कधीही शाळेत 'ब्राईट' मुलांच्या यादीत नव्हतो. हुशार विद्यार्थ्यांचे जे 'कंपू' होते त्यात पण मी कधी नव्हतो. आजूबाजूच्या हुशार मुलांशी (गणितात भरभरून गुण मिळवणाऱ्या) अनेकदा तुलना झाल्याने माझ्या मनात नकळत बराच न्यूनगंड तयार झाला. जो अजूनही पूर्णपणे गेलेला नाही. अजूनही मी स्वतःला अनेकांपेक्षा कुठेतरी कमी लेखतो याची मूळं माझ्या शालेय जीवनात आहेत. शाळेने मला आयुष्यात फक्त हीच एक गोष्ट दिली.
सगळेच हुशार विद्यार्थी नंतर सायन्स शाखेत जाऊन आयुष्यात यशस्वी वगैरे होणार आहेत असं एक गृहीतक पण होत. त्याचा मला फार त्रास झाला. मला आठवतं, दहावीला विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार तुकड्या पाडण्यात आल्या होत्या. गणित आणि विज्ञानात हुशार असणाऱ्या विद्यार्थ्यांना 'अ' तुकडीत टाकण्यात आलं होतं. मी बऱ्यापैकी हुशार असूनही मला मध्यम हुशार मुलांच्या तुकडीत टाकण्यात आल होतं. माझ्यासोबत नेहमी राहणारे, एकाच बेंचवर बसणारे, सोबत डब्बा खाणारे मित्र एकदमच त्या दिवसांपासून माझ्याकडे तुच्छतेने बघायला लागले. नवीन प्रकारची वर्णव्यवस्था होतीच ती. त्या अडनिड्या दिवसात मनावर बरेच चरे उमटले. मानसशास्त्रात एक 'औरंगझेब कॉम्प्लेक्स' नावाची संकल्पना आहे. 'वरून मी खूप आनंदी आहे, कणखर आहे’ असं दाखवणारा (pretend करणारा)माणूस जेव्हा आतून खूप असुरक्षित असतो तेव्हा तो माणूस औरंगझेब कॉम्प्लेक्सचा शिकार आहे असं मानलं जातं. मी माझ्या शाळेतल्या दहा वर्षात याच कॉम्प्लेक्सचा शिकार होतो. जरा कठोर वाटेल पण शाळा हा फक्त माझ्यासाठी एक सुधारित कोंडवाडा होता. ज्या दिवशी माझा शाळेशी संबंध संपला त्या दिवशी मी खूप आनंदी होतो. शाळेतून बाहेर पडल्यावर मी नंतर कधीही शाळेमध्ये पाउल टाकलं नाही. आता मागे वळून बघितल्यावर लक्षात येतं की फक्त शाळेला दोष देण्यात अर्थ नाही. तो काळच काही अजाण समजुतींना घट्ट कवटाळून बसला होता. आताही त्यात काही फारसे बदल झाले असतील असं वाटत नाही.
मी दहावीला चांगले गुण मिळवून पण 'आर्टस' शाखेत गेलो आणि आयुष्यात पहिल्यांदाच मला 'झाले मोकळे आकाश' ही भावना मनात आली. काही चांगले मित्र आणि थोडे चांगले शिक्षक हेच शाळेत घालवलेल्या लांबलचक दहा वर्षांचं संचित. माझे अनेक शालेय मित्र आज आयुष्यात लौकिकार्थाने यशस्वी आहेत, मोठ्या पदांवर आहेत आणि त्यांच्या मनात शाळेबद्दल कृतज्ञतेची भावना आहे. म्हणजे ज्या शाळेशी आपली नाळ कधीच जुळली नाही त्याचं शाळेने अनेक विद्यार्थ्यांचं जीवन पण घडवलं आहे, याची आता जाणीव होत आहे. बहुतेक शाळा आणि मी हेच एकमेकांसाठी 'मिसफिट' असू. हल्लीच्या शिक्षणव्यवस्थेत आणि पर्यायाने शाळांमध्ये पण जरा वेगळी आवड निवड, अभिरुची, कल असणाऱ्या विद्यार्थ्यांना तुम्ही कुणाहीपेक्षा कमी नाही, असलाच तर थोडे वेगळे आहात असा दिलासा देणारी यंत्रणा व्हावी. आणि जमलं तर अती हुशार, हुशार, निम्न हुशार, ढ असं (झू मध्ये प्राण्यांचं होतं तसं) कंपार्टमेंट करण बंद व्हावं एवढीच अपेक्षा.

अमोल उदगीरकर -
चित्रपट लेखक, समीक्षक, पुणे

माझ्या शाळेनं मला काय दिलं? -सुकांत चक्रदेव, ज्येष्ठ पत्रकार

माझी शाळा रत्नागिरी जिल्ह्यातल्या कुर्धे इथली जिल्हा परिषदेची. दररोज 3-4 किलोमीटरची पायपीट. सोडायला आईवडील नाहीत की रिक्षावाले काका , स्कुल बस नाही. सवंगड्यांसोबत गप्पा मारत शाळेतून जाणंयेणं. 
चिंचा, पेरू, आंबा पाडणं आणि बागायदार किंवा कोणी वडीलधारी बघण्याच्या आधी जीव मुठीत धरून सुसाट पळून जाणं. यातही एक वेगळाच आनंद असायचा. दप्तर म्हणजे खांद्यावर पिशवी. एक-दोन पुस्तकं आणि पाटी यांचंच काय ते ओझं. गुरुजींचा आदर करा, हे सांगण्याची वेळ आमच्या पालकांवर कधीच आली नाही. शाळा सुटल्यावर पोहणं. आल्यावर दिवाबत्ती करणं, काहीतरी खाणं आणि मग अभ्यास. तेव्हा वीज नव्हती. टीव्ही, मोबाइलचा प्रश्नच नव्हता.
पूर्वी म्हणजे 35-40 काहीही साधनं नव्हती तरी मुलं उत्तम शिकली. दप्तरांचं ओझं न ताण न घेता शिकली. आज सगळं काही आहे तरी मुलं तणावाखाली आहेत. का बरं? मुलांना नेमकं हवंय तरी काय? या प्रश्नाचा भुंगा कायम मोठ्यांच्या डोक्यात आहे. मुलांना हवंय मोकळं वातावरण, मात्र तेच नेमकं आज मिळत नाहीये, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.
शब्दांकन - जान्हवी पाटील, रत्नागिरी

माझ्या शाळेनं मला काय दिलं?-- डॉ. शीतल आमटे

शाळा म्हटली की माझ्या डोळ्यासमोर कितीतरी गोष्टी उभ्या राहतात. माझ्या शाळेचे नाव लोकमान्य कन्या विद्यालय, वरोरा. मी १९८७ ते १९९६ पर्यंत शाळेत जात असे. आनंदवनपासून पाच किलोमीटर दूरवर ही शाळा होती. आम्ही पहिले सायकल रिक्षा आणि मग जुन्या जोंगाने शाळेत जात असू. आईवडिलांना आम्हाला जगातील कुठल्याही चांगल्या शाळेत घालता आले असते पण त्यांनी हीच शाळा निवडली त्याचे कारण शाळेत मराठी मिडीयम होते आणि आमच्या सारख्याच आर्थिक परिस्थितीतील इतरही मुली होत्या आणि मुख्यतः: बऱ्याच मुली गरीबही होत्या. आमच्यात empathy सारख्या महत्वाच्या भविष्यातील उपयोगाच्या skills develop करण्यासाठी त्यांनी आम्हाला या शाळेत घातले. 
लाल कौलांची आमची छोटीशी बसकी शाळा, आमचे मोडके डेस्क बेंच, अतिप्रचंड ग्राउंड उत्तम शिक्षक, सतत आमच्या शाळेत डोकावून पाहणारी बाजूच्या मुलांच्या शाळेतील मुले, आमचा रणगाडा ( जुनी जीप ज्यातून आम्ही शाळेत जात असू) आणि लाल -पांढऱ्या स्कर्ट ब्लाउज मध्ये दप्तर हातात धरून जाणाऱ्या माझ्या मैत्रिणी. आमची शाळा गरीब असली तरी आम्हाला सुजाण नागरिक बनविण्यासाठी लागणारे सामाजिक शिक्षण देण्यास समर्थ होती. शिक्षणाचा शाळेने कधी बाऊ केला नाही किंवा शाळेचे कधी पेपरात जाहिरातींद्वारे कोडकौतुक झालेले मला आठवत नाही. किंबहुना उत्तम शिक्षण, सुजाण शिक्षक, मनापासून शिकणारे विद्यार्थी आणि आवश्यक तेवढेच शिक्षणेतर कार्यक्रम असे optimum पॅकेज होते. त्यात कधी आम्ही झाडे लावताना झाडांपेक्षा कॅमेऱ्याकडे जास्त लक्ष देऊन पर्यावरण दिन साजरा केला नाही की सोशल वर्क नावाखाली गरीब मुलांना आपलेच फाटलेले कपडे अगदी संकोचाने वाटले नाहीत. पण खेड्यातील मुलींसोबतच शिकलो आणि त्यांच्यात मिसळलो. मी तर सातवीपासून मागच्याच बेंचवर प्रतिभा नावाच्या मुलीसोबत बसत असे. ती आठ किलोमीटर वरून चालत येई पण रोज डब्यात माझ्यासाठी एक भाकर जास्त आणी. आपल्या डब्यापेक्षा तिच्याच डब्यातील भाकर जास्त खाल्ल्याचे मला आठवते. त्याबदल्यात मी तिला शिक्षणातील कठीण संकल्पना शिकवीत असे. त्यामुळे गरीब, मध्यमवर्गीय असा भेदभाव राहिला नाही. 'ते' आणि 'आम्ही' असाही भेद राहिला नाही.
आज माझा मुलगा जेव्हा शाळेत जातो तेव्हा चित्र पूर्ण बदलले आहे. शिक्षणक्षेत्र हा बाजार झालेला आहे. आमची जुनी शाळा सेमी इंग्लिश झाली आहे. मराठी माध्यमाची चांगली शाळा शोधणे हा महत्प्रयासाचा कार्यक्रम होता. एकतर आम्ही आनंदवनात राहतो तिथे शाळा कमी आणि त्यातच सर्व शाळा अर्धवट इंग्लिश, म्हणजे संपूर्ण माध्यम एका भाषेत नाही. त्यामुळे फार अडचण व्हायला लागली. मुलाच्या बाबतीत दोन तीन वर्ष चांगली शाळा शोधली. पण सर्व शाळांमध्ये काही ना काही प्रश्न असल्याने त्याला सध्यातरी जवळच्या शाळेतच घालण्याचा निर्णय घेतला. ही शाळा फार मोठी नाही, पण मोठाल्या कॉर्पोरेट शाळांसारखे इथे प्रश्न तरी येऊ नयेत. परवाच एक मैत्रीण तिच्या मुलांबद्दल सांगत होती की हल्ली अगदी मुलांमधल्या चर्चा म्हणजे फोन. 'माझ्या आईकडे apple फोन आहे आणि तुझ्या आईकडे vivo ' यावरून दोघांचे उच्च-नीचता ठरविण्याबद्दल भांडण झाले. त्यांच्याकडे सोशल वर्कच्या तासात आजूबाजूची गरिबी दाखवून आणतात आणि पर्यावरणावर भाष्य करतात. एक झाड लावून त्यापुढे काहीच होत नाही. त्या झाडाचे कुणाला पडलेले नसते, फक्त शाळेच्या रिपोर्टमध्ये एक ऍक्टिव्हिटी म्हणून ते केले जाते. मुलांना दप्तराचे ओझे आणि त्यावर आईवडिलांच्या अपेक्षांचे टेन्शन. अश्या बऱ्याच चर्चा ऐकल्या की सुन्न व्हायला होते.
- डॉ. शीतल आमटे- करजगी मुख्य कार्यकारी अधिकारी, 
महारोगी सेवा समिती, वरोरा (आनंदवन)

माझ्या शाळेनं मला काय दिलं? - श्रीरंजन आवटे.

का कोण जाणे; पण सुरूवातीपासून शाळेची प्रचंड भीती माझ्या मनात होती आणि काहीही झालं, तरी अशा ठिकाणी जायचं नाही, असा चंगच मी बांधला होता. मी काही शाळेत जात नाही, हे पाहून माझ्या काकाने मला भीती घातली की शाळेत गेला नाहीस तर गुरामागं पाठवतो तुला. खरं म्हणजे आमचं काही शेत नव्हतं; पण गावात असल्याने दररोज गुरांमागे जाणा-या पोरांकडे पाहून भीतीने का असेना मी शाळेत पाऊल टाकलं. सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील पारेवाडी कोर्टी आणि वीट या गावांमध्ये माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झालं. त्यात शाळेविषयी सर्वाधिक प्रेम वाटलं ते श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, वीट या माझ्या माध्यमिक शाळेत. ओहोळ सर आणि आवटे सर या दोघांच्या आग्रहाखातर कोर्टी या माझ्या राहत्या गावापासून ८ किमी दूर असणा-या गावी मी शिकायला लागलो. नंतर तालुक्याच्या गावाहून उलट प्रवास करत मी वीटला येत असे. ‘वीटची गोडी अवीट’, अशी कोटीही आम्ही अनेकदा करायचो. 
इयत्ता सहावी ते दहावी या पाच वर्षांच्या काळात शाळेनं जे काही दिलं त्याबद्दल आम्ही शाळेचे मनापासून ऋणी आहोत. स्कॉलरशिप असो वा एमटीएस, इलिमेन्टरी-इंटरमिजिएट चित्रकलेच्या परीक्षा असोत किंवा खोखोचा सराव सगळ्या बाबतीत आमचे शिक्षक आम्हाला मार्गदर्शन करत राहीले. आमच्या स्कॉलरशिपच्या परीक्षांसाठी शाळा भरण्याआधी आणि शाळा सुटल्यानंतर दोन्ही वेळेस आमचे शिक्षक आमच्यासाठी अधिक वेळ तास घेत असत. आम्ही स्कॉलरशिप, एमटीएसमध्ये नंबर पटकावले; अगदी टी एन शेषन (तेव्हा त्यांच्याविषयी फार काही माहीत नव्हतं) यांच्या हस्ते माझा सत्कारही झाला पण त्याहून अधिक त्या अभ्यासातला वेळ प्रचंड एंजॉय केला. शाळेला सुट्टी असेल तर मला बोअर व्हायचं इतकी शाळेविषयी आत्मीयता निर्माण झालेली होती. शाळेचं ग्रंथालय किंवा प्रयोगशाळा फार काही सुसज्ज नव्हती; पण आजकाल अभावानेच दिसणारी आस्था आमच्या शिक्षकांमध्ये होती. 
आमच्या शाळेला प्रशस्त पटांगण होतं. आज शहरातील अनेक शाळांमध्ये मैदानच नसतं हे पाहून वाटतं, खेळाशिवाय शाळेला काय अर्थ! शाळेतील अनेक मुलं खोखोमध्ये राज्यस्तरावर राष्ट्रीय स्तरावर चमकत होती; मात्र बहुतेकांप्रमाणे मला सर्वाधिक क्रिकेट आवडायचं. ‘अ’ तुकडीच्या विरूध्द ‘ब’ तुकडी अशी आमची ११ रूपयांची मॅच असे. या मॅचेस धमाल आणायच्या. मी त्यात इतका बुडून जायचो की एका मॅचमध्ये कॅच घेऊन मी पडलो आणि मला फ्रॅक्चर झालं. अर्थातच या सा-याच गोष्टीत आम्ही मिळून मिसळून सर्वत्र होतो त्यामुळे खूप चांगले मित्र मिळाले. वर्गातल्या मुली शाळेत असताना मैत्रिणी झाल्या नाहीत कारण मुलींशी बोलायची परवानगीच नव्हती. अगदी मुला-मुलींसाठी शाळेत जाण्याचे रस्तेही वेगळे होते. शाळेतून बाहेर पडल्यावर वर्गातल्या काही मुलींशी छान मैत्री झाली. शाळेची सहल गेली तेव्हाही आम्ही सर्वांनी त्या पर्यटनाच्या ठिकाणांपेक्षाही एकमेकांसोबतचं असणं अधिक एंजॉय केलं. 
आज शाळेचे मुख्याध्यापक असणारे मारकड सर आम्ही मुलांनी वाईट मार्गाला लागू नये, म्हणून आवर्जून गणिताच्या तासातच इतर गोष्टी सांगत असत. त्यांची स्वतःची अध्यात्माची एक समज आहे आणि त्यातून स्वतःच्या शोधासाठी ते आम्हा सर्वांना प्रवृत्त करत असत. विविध सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता आम्हाला सतत प्रोत्साहन मिळत असे. स्लो सायकलिंग, लिंबू चमचा, प्रश्नमंजुषा, वक्तृत्व स्पर्धा... असे अनेक उपक्रम सुरू असत. शाळेत असतानाच आम्ही काही मित्रांनी मिळून ‘नूतन भारत’ नावाची संघटना स्थापन केलेली होती. अगदी काही महिने ही संघटना टिकली; पण नवं काही करण्याची इच्छा सतत निर्माण होईल, असं वातावरण शाळेनं आम्हाला दिलं. इयत्ता दहावीला असताना आजबे सर आमचे वर्गशिक्षक होते. आमच्या वर्गातून कोणीतरी बोर्डात यावं, अशी सर्वांची इच्छा होती. ती मात्र अपुरी राहिली. अवघ्या काही मार्कांनी माझा बोर्डातला नंबर गेला. मी मात्र प्रचंड आनंदी होतो. स्कॉलरशिप, एमटीएस या परीक्षांमधील यशाहूनही लोकांच्या नजरेत दहावी ही ग्रेट परीक्षा असल्याने मला कमालीचा आत्मविश्वास मिळाला होता. त्याहूनही अधिक म्हणजे अत्यंत खुल्या, निरोगी आणि निखळ अशा वातावरणात आपल्याला शिकता आलं, याचा मला आनंद होता. शाळेच्या अभ्यासाच्या धबडग्यात आपलं मनसोक्त वावरणं, असणं हरवलं नाही, याचं बरचंसं श्रेय माझ्या पालकांना आणि शाळेला आहे आणि लाभलेली मैत्री ही सर्वांत मोठी उपलब्धी. याहून आणखी काय हवं असतं

श्रीरंजन आवटे.

मला माझ्या शाळेनं काय दिलं? - -आमदार उदय सामंत.


माझे बालपणातील ते दिवस आजही माझ्या डोळ्यांसमोर दिसतात. मित्रांसोबत गप्पा मारणे, कधी खूप मस्ती करणे तर कधी शिक्षकांना घाबरून गुपचुप बसणे, अभ्यासाचे टेन्शन नव्हते तरीदेखील गुरूजींच्या भीतीने वेळेत परिपाठ करणे, कधी दांडी मारणे, मधल्या सुट्टीत सर्वांसोबत जेवणे, शाळेचा स्नेहसंमेलनाचा दिवस या सगळ्या गोष्टींतून माझे बालपण कधी निघून गेले कळलेच नाही. ते दिवस आठवले की आजही मला आनंद होतो. त्या आठवणी आजही माझ्या मनाच्या कप्प्यात साठवून ठेवल्या आहेत.
माझ्यावेळी सर, मॅडम असा प्रकार नव्हता. गुरूजी आणि बाई असे शिक्षकांना संबोधत होतो. त्यांचा मुलांवर आदरयुक्त धाक होता. त्या भीतीने का होईने आम्ही सर्व मुले घाबरून वेळेवर अभ्यास करणे, शिस्तबध्द वागणे हे संस्कार आपोआपच आमच्यावर झाले. तसेच घरी आईवडिलांचा प्रेमळ धाक त्यामुळे वर्तणुकीबद्दल कोणाची तक्रार नाही. शाळेत जाताना मज्जा वाटायची, कोणताही ताणतणाव अगदी पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत नव्हता. आज प्राथमिक शिक्षण घेतानाही मुले तणावाखाली दिसतात.
माझ्यावेळी शाळेत आम्ही सर्व मुलांनी अंगण सारवले आहे. हे काम करताना कमीपणा वाटायचा नाही, उत्साहाने आम्ही काम करत होतो. शाळेत कधीच असुरक्षित वाटलं नाही. त्यावेळी माध्यमे नसल्याने जीवनाचा पुरेपूर आनंद मुलं घेत होती. आता माध्यमांचा प्रभाव तसंच शाळेतील अभ्यासाचा ओझं कमी होणं गरजेचं आहे, मुलांपासून त्यांचे बालपण हिरावून घेऊ नये. त्यांच्यावर कोणत्याही गोष्टीसाठी जबरदस्ती करू नये.
माझे शिक्षण पाली येथे जिल्हा परिषद शाळेत झाले. पण लहानपणापासून समूहामध्ये राहण्याची सवय असल्याने आज राजकारणात यशस्वी झालो. शिक्षणामुळे राजकारणात नाही आलो तर जपलेल्या माणुसकी, आपुलकीमुळे नेतृत्वाची क्षमता निर्माण झाली. आज शेकडो नागरिकांच्या मला शुभेच्छा आहेत. त्यामुळे शिक्षण घेणे महत्वाचे आहेच. पण, आपल्यातील चांगल्या कौशल्यांना वाव देणेही महत्त्वाचे आहे.
- आमदार उदय सामंत, रत्नागिरी मतदारसंघ आणि अध्यक्ष, म्हाडा
शब्दांकन - जान्हवी पाटील.