Tuesday, 12 February 2019

असंही वाण

नुकतीच संक्रांत झाली. त्यामुळे आता रथसप्तमीपर्यंत सर्वत्र हळदी कुंकू, लुटायचे वाण यांची नुसती रेलचेल बघायला मिळते. नाशिकच्या आत्मजा या महिला गटानेही असं वाण लुटायचं ठरवलं. पण, परिस्थितीनुसार त्याचं स्वरूप त्यांनी बदलायचं ठरवलं.
गटातील यशश्री रहाळकरने नाशिक येथील ‘पडसाद’ या कर्णबधीर विद्याालयात गरजेचे साहित्य देण्याची संकल्पना मांडली. या संकल्पनेला अर्चना काळे, आरती गरूड, कीर्ती मांगळे, गीता साळसकर, स्वाती कुलकर्णी, रुपल मेहता यांनी प्रत्यक्षात आणलं. शैक्षणिक साहित्याच्या पलीकडे विद्यार्थ्यांच्या काही गरजा असतात हे लक्षात घेत प्रत्येकीने आपल्या आर्थिक क्षमतेनुसार २०० रुपये प्रत्येकी अशी रक्कम गोळा केली. या जमा झालेल्या रकमेतून या गटाने मुख्याध्यापिका सौंदाणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सोबत घेतलं. विद्यार्थ्यांना स्वच्छतेविषयी मार्गदर्शन करण्यात आलं. मुलांना कपडे धुण्याचा साबण आणि ब्रश, तर मुलींना सॅनिटरी पॅड घेण्यासाठी मदत देण्यात आली.

याविषयी यशश्री रहाळकर म्हणाल्या, “वाण लुटणं म्हणजे केवळ वस्तुंची देवाण घेवाण नसते. त्यातून स्त्रीत्वाचा सन्मान केला जातो. प्लास्टिकच्या किंवा अन्य वस्तू ज्या आपल्याकडे आहेत. त्या वस्तू जमा करण्यापेक्षा गरजवंताला मदत करणे महत्त्वाचे आहे, ही आपल्या संस्कृतीची शिकवण आहे. ही शिकवण रुजवण्याचाच हा छोटासा प्रयत्न. पडसादमधील विद्यार्थी हे वंचित समाजातून आले आहेत. सर्वसामान्य विद्यार्थ्यांपेक्षा त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत आणि त्या खूप साध्या आहेत. याचा विचार करत हे पाऊल आम्ही उचललं. मुलांना साबण आणि मुलींना सॅनिटरी नॅपकिन घेण्यासाठी पैसे देत या सणाचा वेगळ्या पध्दतीने आनंद लुटला याचं समाधान वाटतं.”
एरवी संक्रातीचा सण आला की महिला आपल्या परिसरातील सुवासिनींना बोलावून वाण लुटण्यात दंग होतात. यात प्रामुख्याने प्लास्टिक बरण्या, वाट्या, चमचे, शोभेच्या वस्तु, वेगवेगळ्या प्रकारचे मसाले, पापड, लोणचे, सौंदर्य प्रसाधने अशा विविध वस्तुंचे वाण लुटले जाते. काही वर्षापासून पर्यावरणपूरक संक्रातचा संकल्प करत काही महिला कापडी पिशव्या, पुस्तकं, शोभेची फुलझाडं, चिमणीचं घरटं, तुळशीचं रोप अशा पर्यावरणपूरक पर्यायाचा अवलंब करत सुवासिनीला वाण देत आहेत. मात्र ‘आत्मजा’ महिलांच्या समुहाने संक्रातीचं वाण लुटण्यात सामाजिकदृष्ट्या अजून एक पाऊल पुढं टाकलं. सुमारे २० महिलांचा हा गट ‘स्व ते समाज’ या शीर्षकाखाली एकमेकींशी जोडला गेला आहे. स्वत:चे व्यक्तीमत्व खुलवत असतांना आपण समाजाचे काही देणे लागतो, त्यासाठी काय करू शकतो या विचाराने प्रेरित होत आत्मजाचे काम सुरू आहे. महिन्याकाठी शहर परिसरातील वेगवेगळ्या सामाजिक संस्थांना भेट द्यायची, तेथील समस्या समजून घ्यायच्या त्यावर काम करायचं हा यांचा दिनक्रम.

- प्राची उन्मेष, नाशिक

मोकाट कुत्र्यांपासून त्यांनी केली नांदेड शहराची सुटका

मोकाट, भटकी कुत्रे ही अनेक गावातील खूप मोठी गंभीर समस्या. दरवर्षी पिसाळलेल्या कुत्र्यांच्या चाव्यामुळं, अनेकांना प्राण गमवावे लागतात किंवा रेबिजपासून वाचण्यासाठी अनेक इंजेक्शन टोचून घ्यावे लागतात. नांदेड शहर मात्र या मोकाट कुत्र्याच्या त्रासापासून २०१३ पासून मुक्त झालं आहे. याचं श्रेय जातं, त्यावेळचे नांदेड मनपाचे मानद पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विजय वसंतराव लाड यांना.
२०१३ पूर्वी नांदेड शहरातील लोक व मनपा मोकाट कुत्र्यांच्या त्रासाने गांजलेलं होतं. रेबिज आजार झाला की कुत्रा पिसाळत असे आणि दिसेल त्या व्यक्तीवर हल्ला करून त्याला चावा घेई. या हल्ल्यात अनेक वेळा लोकांना आपले प्राण गमवावे लागत असतं. हा रेबिज झालेला कुत्रा दुसर्‍या कुत्र्याला चावला की, दुसरे कुत्रे देखील या रोगाने ग्रस्त होत असतं. परिणामी शहरात असं कुत्रं आढळलं की, पूर्वी मनपा अशा कुत्र्यांना विष घालून मारे. त्यावेळी शहरातील रस्त्या रस्त्यावर मेलेल्या कुत्र्यांचे ढीग पडत असतं. तसंच रेबिज झालेल्या कुत्र्‍याबरोबरच निरोगी कुत्री व इतर अनेक प्राणी विषबाधा होऊन मरत असत. हा साराच प्रकार अतिशय क्रूर आणि भयंकर असा होता.
२००२ साली, चेन्नई येथे भारत सरकारच्या जिवजंतू कल्याण बोर्डातर्फे अशिया खंडातील पशू चिकित्सकांची एक परिषद घेण्यात आली होती. त्यात डॉ. लाड सहभागी झाले होते. तेथे बाली या बेटावरील डॉक्टरांचा एक गट आला होता. त्यांनी कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याचं ट्रेनिंग दिलं. त्यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांचा बाली हा देश संपूर्णपणे रेबिजमुक्त देश आहे. या गोष्टीचं डॉ. विजय लाड खूप कौतुक वाटलं. नांदेड शहरातील मोकाट कुत्रे व रेबिज आजार यावर काही काम करता येईल का? असा विचार करतच ते चेन्नईचं ट्रेनिंग पूर्ण करून परतले. त्यावेळी त्यांचे मित्र डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार उपायुक्त म्हणून नांदेड मनपात कार्यरत होते. डॉ. लाड यांनी शहरातील मोकाट कुत्रे व रेबिज आजार या पासून नांदेडवासियांची मुक्तता करण्यासाठी ‘मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण’ करण्याचा प्रस्ताव त्यांच्या समोर मांडला. पुलकुंडवार हे स्वतः प्राण्यांचे डॉक्टर. त्यांना ही कल्पना आवडली. त्यांनी व डॉ. लाड यांनी याचा रितसर प्रस्ताव तयार करून तो त्यावेळचे नांदेड मनपा आयुक्त किरण कुरूंदकर यांच्या समोर मांडला. त्यांनी तो लगेच मंजूर केला. आणि डॉ. लाड यांची या कार्यासाठी मनपाचे मानद पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक केली. २००२-२००४ या तीन वर्षाच्या कालावधीत केंद्र सरकारच्या पशू वैद्यकीय सेवा संस्थाने देखील ‘मोकाट कुत्र्यांच्या निर्बिजीकरण’ योजनेस पाठिंबा देऊन ७५ हजार रूपयांचे अर्थसहाय्य नांदेड मनपा व डॉ. लाड यांना दिलं. या अर्थिक सहाय्याच्या मदतीने डॉ. लाड यांनी कुत्रे पकडण्यासाठी कर्मचारी, तीन चाकी गाडी, पिंजरे, जाळे, स्वतःच्या दवाखान्यात ऑपरेशन रूम तयार केली. डॉ. लाड यांच्या निर्बिजीकरण टिममधील कर्मचारी रोज शहरातील विविध भागात, वस्त्यात जाऊन तेथील मोकाट कुत्रे पकडून आणत असतं. डॉ. लाड त्यांच्यावर निर्बिजीकरणाची शस्त्रक्रीया करत असत. नंतर शस्त्रक्रीया झालेल्या त्या श्‍वानास दवाखान्यात ठेवून त्याची सेवासुश्रूषा करून त्यांना परत जेथून आणलं होतं तिथं सोडलं जायचं. याचं कारण सांगाताना, डॉ. लाड सांगतात, की प्रत्येक कुत्र्याचा परिसर ठरलेला असतो. एका कुत्र्याच्या परिसरात दुसर्‍या कुत्र्याला प्रवेश करता येत नाही, अशा वेळी जर एके जागी पकडलेला कुत्रा दुसर्‍या जागी सोडला तर त्याला इतर कुत्रे मारून टाकतात. त्यामुळं निर्बिजीकरण झालेल्या कुत्र्याला परत त्यांच्या एरियात सोडणं भागं होतं. डॉक्टर सांगतात, “कुत्रं परत त्याच्या पूर्वीच्या परिसरात सोडण्यास जात असू तेव्हा आमची खरी परीक्षा असायची. कारण तेथील लोक आम्हाला विरोध करत असत. तुम्ही पुन्हा कुत्रं येथे सोडू नका, म्हणून भांडत असत. मग आम्हाला त्यांना समजाऊन सांगताना नाकी नऊ येई. सुरूवातीच्या काळात आमच्या कुत्र्यांच्या निर्बिजीकरण कार्यक्रमाला वृत्तपत्रातून खूप विरोध झाला. आमच्यावर टीका झाली. परंतू मी करत असलेल्या कामचे फायदे लक्षात आल्यानंतर लोकांनी विरोध करणं सोडून, आमचं कौतुक करण्यास सुरूवात केली.”
तीन वर्ष केंद्राची मदत आली, नंतर ती बंद झाली. त्यानंतर हा कार्यक्रम कसा चालवायचा? खर्च कसा भागवायचा? हा प्रश्‍न होता. अशावेळी नांदेड मनपा आणि डॉ. लाड यांची ‘सोसायटी फॉर प्रिव्हेंन्शन ऑफ क्रुयालिटी टु अ‍ॅनिमल्स’ यांनी पुढाकार घेतला. आणि २००२ पासून सुरू झालेला हा कार्यक्रम २०१३ पर्यंत न थकता चालू राहिला. या कालावधीत त्यांनी शहरातील १०, ००० पेक्षा अधिक कुत्र्यांचे निर्बिजीकरण केलं.
या निर्बिजीकरण कार्यक्रमाचा फायदा आजतागायत नांदेडवासियांना मिळतो आहे. याचा परिणाम म्हणून शहरातील मोकाट कुत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण आलं. कुत्रे माजावर आल्यानंतर त्यांची आपसात होणारी भांडणं थांबली. परिणामी त्यांना होणार्‍या जखमा, त्यातून रेबिजसारखे आजार फैलावणं देखील थांबलं. आज नांदेड शहरात मोकाट कुत्री आहेत. पण त्यांची संख्या नियंत्रित आहे. या सगळ्याची सुरूवात झाली ती डॉ. विजय लाड यांच्या प्रयत्नातून.

एक चांगला पशूचिकित्सक डॉक्टर मनात आणल्यावर किती मोठं काम करू शकतो याचं हे आदर्श उदाहरण ठरावं. १९८६ साली परभणी येथील कृषी विद्यापीठातून पशूवैद्यकीची पद्वी त्यांनी घेतली आहे. डॉन्की सेंचुरी, ब्रिटन यांनी आयोजित केलेलं गांढवांच्या आरोग्यासाठीचं १५ दिवसाचं विशेष ट्रेनिंग त्यांनी २००२ साली घेतलं. ब्रिटनमधील त्या डॉक्टरांचं गाढवांविषयीचं प्रेम, त्याची काळजी घेण्याची पद्धत, या सर्वांचा डॉ. लाड यांच्यावर सखोल परिणाम झाला. हे लोक स्वतःचा देश सोडून इतक्या लांब येऊन गाढव प्राण्याच्या आरोग्यासाठी एवढे प्रयत्न करतात, हे पाहून त्यांनी पुढील आयुष्यात गाढव असो किंवा इतर कोणताही प्राणी त्याची सेवा करण्यास नेहमी तत्पर राहण्याचं व्रत घेतलं आणि ते कसोशीने पाळत आहेत. पाळीव प्राण्यांपासून, साप, विविध पक्षी, बिबटे यांच्यावर उपचार करण्यात, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी डॉ. विजय लाड नेहमीचं तत्पर असतात. त्यामुळे शहरातील सर्व प्राणी मित्रांच्या मनात डॉक्टरांविषयी विशेष आदर व प्रेम आहे.
२०१७-२०१८  मध्ये जम्मु-काश्मीरमध्ये भारतातील इतर डॉक्टरांबरोबर त्यांनी ४५ हजार कुत्र्यांच्या निर्बिजिकरणाच्या शस्त्रक्रियेत सहभाग घेतला. डॉग हॉस्टेलचा उपक्रमही अनेक वर्षापासून ते व त्यांचे बंधू चालवतात. पशुचिकित्सेचं कार्य समर्थपणे सांभाळतचं, ते ग्राहक पंचायत, महाराष्ट्रचे सचिव म्हणून कार्य करतात. डॉ. विजय लाड यांच्या कार्याची नोंद घेऊन नांदेडच्या प्राणी क्लेश निवारण समितीवर शासनाने नोव्हेंबर २०१८  साली त्यांची नेमणूक केली आहे.
विजय लाड यांचा संपर्क क्र. - ९४२२१७०५८२

- उन्मेष गौरकर, नांदेड

रेषेवरचं आयुष्य


मला माझ्या भावंडांना चांगलं शिक्षण द्यायचं यासाठी मी वाट्टेल तेवढे कष्ट घेण्यास तयार आहे, असं म्हणणार्‍या रुख्मिणीनं आपलं ध्येय खरंच पूर्ण करुन दाखवलं आहे. घरी केवळ दोन एकर पडीक शेती. त्यात बुलडाणा जिल्ह्यातला पाऊस बेभरवशाचा, घरात तीन बहिणी, एक भाऊ. आई-वडील दुसर्‍याच्या शेतात राबून पोटाची खळगी भरत. या परिस्थितीत आपलं शिक्षण कसं पूर्ण होणार या विवंचनेत असलेली रुख्मिणी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीतून पुढे आली. पाठीवरच्या बहीण, भावाला योग्य शिक्षण मिळावं, परिवाराला चांगलं खायला -प्यायला मिळावं या जिद्दीतून तिने मार्ग निवडला तो सैन्यात भरती होण्याचा. फिनिश लाईनच्या पलीकडे दिसणार्‍या स्वप्नाला गाठण्यासाठी तिने जीव कंठाशी येईल एवढ्या वेगात धावत रेषा पार केली. आज तिचं आयुष्य खरंच रेषेवरचं आयुष्य झालंय. आता तिच्या कर्तृत्वाची साक्ष दिल्लीतील लाल किल्लादेखील देणार आहे, लेकीच्या या कर्तृत्वाचा अख्ख्या गावाला अभिमान वाटत आहे. ही कथा आहे, रुख्मिणी राठोडची.
      बुलडाणा जिल्हयातील छोटसं चायगाव. वडील परमेश्वर राठोड, आई कस्तुरा राठोड. या परिवाराचं जगणं मोलमजूरीचं. घरात पुजा, वर्षा व लहानगा रोशन. परिस्थितीवर मात करीत तिने १२ वीपर्यंत शिक्षणात मजल मारली अन् नागपूरमध्ये सैनिक भरतीत यशस्वी प्रवेश केला. ३१ मार्च २०१५ ला तिची आसाम रायफल्सच्या महिला कमांडंट तुकडीमध्ये निवड झाली. आसाम रायफल्सच्या शुकोवी येथील ट्रेनिंग सेंटरमध्ये तिचं प्रशिक्षण पूर्ण झालं. नागालॅन्डमध्येही तिने प्रशिक्षण घेतलं आहे. आसाम रायफलच्या १८४ वर्षाच्या इतिहासात अवघ्या चार वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेल्या महिला कमांडंट तुकडीला ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडमध्ये राष्ट्रपतींना सलामी देण्याचा बहुमान मिळाला आहे. या ऐतिहासिक १४७ महिलांच्या तुकडीमध्ये रुख्मिणी राठोडची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल ती म्हणते की, “खरोखर मला याचा मनस्वी आनंद होत असून अभिमानही वाटतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी मेहकर येथील पोलिस ठाण्यात गेले होते, त्यावेळी बुलडाणा जिल्ह्यातून मी एकटीच महिलांच्या या रेजीमेंटमध्ये निवड गेल्याचं समजलं होतं. कुटुंबाकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच मी इथवर पोहोचू शकले.”
आसाम रायफलच्या इतिहासातील ही ऐतिहासिक परेड ठरणार असून त्यासाठी आसाम रायफल्सच्या महिला रेजिमेंटच्या मेजर खुशबू आणि कॅप्टन रुची यांच्या नेतृत्त्वात पाच महिन्यांपासून रुख्मिणी ही दिल्ली येथे सहकार्‍यांसोबत कसून सराव करतेय. एका अल्पभूधारक शेतकर्‍याची मुलगी राजपथावर आता थेट राष्ट्रपतींना सलामी देणार असल्याने गावकर्‍यांना अभिमान वाटतो आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या राजपथावरील परेडमध्ये राष्ट्रपतींना सलामी देणारी आसाम रायफल्सच्या महिलांची ही पहिलीच तुकडी आहे. राजपथावर प्रामुख्याने राष्ट्रपतींना सलामी (सॅल्युटींग डेस्क) देताना सुमारे ५०० मीटरचे अंतर या तुकडीसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या सॅल्युटींग डेस्कदरम्यान ‘दाहिने देख’ करीत या महिला तुकडीला मार्च करावा लागणार आहे. त्यादृष्टीने साडेतीन किलोची रायफल घेऊन हा सॅल्युटींग डेस्क लिलया सांभाळण्याचे कसब अंगीकृत करण्यासाठी सध्या ही तुकडी सराव करत आहे. दररोज पहाटे चार वाजल्यापासूनच त्यांचा दिवस सुरू होत असून १५ ते १८ किलोमीटर अंतर त्यांना शस्त्रासह पार करावं लागतं. दररोज सहा ते आठ तास त्यांचा कसून सराव सुरू आहे. शारिरिक तंदुरुस्तीसोबतच शस्त्र हाताळण्याचे कठीण ट्रेनिंग त्यांना मिळालेले असून पूर्वोत्तर भागात घडणार्‍या एनकाऊंटरसह कठीण परिस्थिती कशी हाताळायची? याचे प्रशिक्षण या तुकडीला देण्यात आले आहे. रुख्मिणीच्या या कर्तृत्वाची साक्ष २६ जानेवारी रोजी लालकिल्ला देखील देणार असल्यानी तिच्या आई-वडिलांसह गावकर्‍यांनाही आनंद झाला आहे.
- दिनेश मुडे, बुलडाणा

जालन्याहून मुंबईत भाजीपाला विक्री

तर मित्रांनो हे आहे जालना रेल्वे स्टेशनवरचे दृश्य. फोटोत दिसणाऱ्या या बायका आठवड्यातून कमीत कमी 2 वेळेस मुंबईला जातात. हरभरा भाजी, बेल आणि बोरं हे सगळं विकण्यासाठी घेऊन जातात.
फोटोत दिसणार्‍या एकेका गाठोड्यात बोरांच्या १७ पिशव्या असतात. आणि प्रत्येक पिशवी साधारण एक किलो वजनाची. हे सगळं सकाळी त्या मार्केटमध्ये व्यापाऱ्यांना विकतात. यातून ३५०० ते ४००० रुपयांपर्यंत त्यांना एका दिवसाचं उत्पन्न मिळतं. काहीवेळा स्वतःच भाजी विकून मिळेल तश्या रेल्वेने परत निघतात.


 अर्थात हा प्रवास सोपा नाहीच. रात्री १० ता सकाळी ७ असा नऊ तासांचा. प्रवास करून त्या मुंबईत पोहोचतात. भाजी विकून त्याच रात्री उलटमार्गाचा प्रवास सुरु होतो. गरजेनुसार कधी वडापाववर भूक भागवतात. तर कधी येतांना सोबत आणलेली चटणी-भाकरी असतेच...
एकीकडे, बेरोजगारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. काम नाही म्हणून हातावर हात ठेवून बसलेले तरूणही दिसतात. पण इथं, मात्र मुंबईसारख्या महानगरात काय विकलं जाईल याची चाचपणी करून या महिलांनी स्वतःचं घर सावरलं आहे.
- अनंत साळी, जालना

अवघड सोपे झाले हो!!

गणिताचं नाव काढलं की भल्याभल्यांच्या अंगावर काटा येतो. कॅलक्युलेटरशिवाय आकडेमोड करायची म्हटलं, तर मग घामच फुटतो. गणिताचा पाया हा शाळकरी वयातच पक्का होऊ शकतो, या विश्वासानं आम्ही सांगलीतील दहिवडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी Ajay Kale- Tech Guru या नावानं एक यूट्यूब चॅनल सुरु केलंय.दहिवडीच्या शाळेत मी २०१६ मध्ये तर पाटील सर २०१४ मध्ये रूजू झाले. पण आमची ओळख २००९ पासूनची. शिक्षण विभागातर्फे पहिलीच्या अभ्यासक्रमासाठीचे प्रशिक्षण घ्यायला मी आणि एन डी पाटील सर गेलो होतो. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षकांनी आम्हाला एक प्रश्न विचारला, “घरात पडलेली गाडगी- मडकी, चाक, मातीनं मळलेले कपडे पाहून कुंभाराचं घर सहज ओळखू येतं. शिक्षकाचं घर असं वेगळं ओळखता येतं का? त्यासाठी काय करावं लागेल?”
   या प्रश्नानं आम्हाला विचारप्रवृत्त केलं. शिक्षक म्हणून आपण आपलं ज्ञान अद्ययावत ठेवायला हवं, वेगवेगळ्या विषयांची किमान शंभरेक पुस्तके, उत्तमोत्तम मासिकं आणि काळाची गरज बनलेला कॉम्प्युटरही आपल्याकडे हवा, याची जाणीव आम्हाला झाली.आम्ही दोघांनी स्वकमाईतून दोन लॅपटॉप खरेदी केले. त्यासाठी आम्हाला सुमारे 70 हजारांचा खर्च त्या वेळी आला. आम्ही मुद्दाम डेस्कटॉप कॉम्प्युटरऐवजी लॅपटॉपची निवड केली, कारण लॅपटॉप सहज उचलून कुठेही नेता येतो आणि तो चार्जिंग असेल तर वीजपुरवठ्याशिवायही चालतो.

सुरुवातीला आम्ही दोघं आपापल्या शाळेत या लॅपटॉपचा वापर करून प्रचलित असणाऱ्या अभ्यासक्रमाच्या सीडी दाखवायचो. पण त्यापेक्षा वेगवेगळ्या विषयावरचं पॉवरपॉईंट प्रेझेंटेशन मुलांना जास्त आवडतं हे लक्षात आलं. उदा. इतिहासातील पन्हाळगडास वेढा आणि बाजीप्रभूंचा पराक्रम.
एन डी पाटील सर म्हणजे गणित सोपे करून शिकविणारा जादूगार, अशी त्यांच्या हाताखाली शिकलेल्या विद्यार्थ्यांची भावना असते. पाटील सरांचं सुमारे १७ वर्षांचं ज्ञान आणि गणित सोपं करण्याची हातोटी आपल्या शाळेपुरती मर्यादित ठेवणं, मला योग्य वाटेना. मला तंत्रज्ञानाची खूप आवड आहे, या माध्यमातून काही करता येईल का, याचा विचार मी करू लागलो.
मग स्मार्टफोनच्या साहाय्यानं मी पाटील सरांच्या गणिताच्या छोट्या- छोट्या कलृप्त्यांचं चित्रीकरण करायला लागलो. हे व्हिडिओ आमच्या लॅपटॉपमध्ये सेव्ह करून प्रोजेक्टरवर मुलांना दाखवू लागलो. हा प्रयोग मुलांना फारच आवडला. पारंपरिक पद्धतीनं वह्या- पुस्तकं वापरण्यापेक्षा विद्यार्थ्यांचा सहभाग असलेले हे व्हिडिओ पाहून गणिताचा तो घटक समजून घेण्यात मुलं रंगून जायची.
आमचा हा प्रयोग गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर यांना फार आवडला. हा प्रयोग दहिवडी शाळेपुरता मर्यादित ठेवण्यापेक्षा इतर शाळांपर्यंतही कसा पोहोचवता येईल याचा विचार करा, असा सल्ला त्यांनी दिला आणि त्यातूनच आकाराला आलं आमचं - Ajay Kale- Tech Guru चॅनल.
टेकगुरू या यूट्यूब चॅनलवर गणितासंदर्भात कोणत्या क्लृप्त्या पाहायला मिळतील हे जाणून घेण्यासाठी क्लीक करा: https://bit.ly/2CouzIR

- अजय काळे आणि एन. डी. पाटील, ता. तासगाव, सांगली.

लेकींच्या कल्याणा शिवणकामाची शिकवणी

"लेक वाचवा, लेक वाचवा असं नुसतं म्हणून काय फायदा ? लेकीच्या कल्याणासाठी काही तरी उपक्रम राबवला, तरच खरं लेक वाचवा अभियान यशस्वी होईल.'' बबन साबळे सांगत होते. यांचं गाव धानोरा. तालुका आष्टी. जिल्हा बीड.
मुलीच्या शिक्षणाच्या निमित्ताने बबन साबळे यांचा नगरच्या स्नेहालय संस्थेशी संपर्क आला. स्नेहालयच्या संगतीचा परिणाम असा की, समाजासाठी काही तरी केले पाहिजे असा विचार त्यांच्या मनात घोळू लागला. त्यांनी मुली- महिलांना शिलाईकामाचे प्रशिक्षण मोफत द्यायचे ठरवले. सुरुवातीला धानोरा आणि नंतर हळूहळू आसपासच्या गावातून मुली, महिला शिकण्यासाठी येऊ लागल्या. साबळे यांचे खास कौतुक म्हणजे, एखाद्या गावातून महिला, मुली जास्त संख्येने शिकण्यासाठी इच्छुक असतील तर ते स्वतः त्या गावात जाऊन त्यांना शिकवतात. बबन आणि त्यांच्या पत्नी संगीता यांनी गेल्या दोन वर्षात १०० ते १२५ मुलींना शिवणकामाचे मोफत प्रशिक्षण दिले आहे.

बबन हे तीस वर्षांपूर्वी ते त्यांच्या मूळ डोंगरगण गावाहून धानोऱ्यात आले. स्थायिक झाले. रेडिओ, टीव्ही दुरुस्तीचा व्यवसाय त्यांनी काही काळ केला. संगीताताई घरकामासोबत ब्लाऊज शिवण्याचे काम करून संसाराला हातभार लावत होत्या. कालांतराने तेही शिवणकामाच्या व्यवसायाकडे वळले. दोघांनी मिळून चांगली प्रगती केली.  याच व्यवसायाच्या बळावर साबळे दांपत्याने त्यांच्या दोन्ही मुलांना चांगले शिक्षण दिले. त्यांची मुलगी एम फार्मसीचे शिक्षण पूर्ण करून आता प्राध्यापक म्हणून नोकरी करत आहे. मुलगा इंजिनिअर होऊन खाजगी कंपनीत नोकरीस आहे. संगीता साबळे सांगतात, ''मर्यादित प्रमाणात रोजगार उपलब्ध असण्याच्या काळात ब्लाऊज , सलवार वगैरे कपडे शिवून देण्याचा व्यवसाय महिलांसाठी एकदम योग्य आहे. घरी बसून काम करता येते आणि संसाराला हातभार लावता येईल अशी अर्थप्राप्ती सुध्दा होते.'' साबळे जोडप्याची कळकळ इतकी की, संधी मिळाली तर दुष्काळाशी दोन हात करणाऱ्या शेतकरी किंवा मजूर महिलांनादेखील शिकवण्याची त्यांची तयारी आहे. आणि त्यांचं दातृत्व असं की, मुलाच्या लग्नात त्यांनी बस्त्याच्या खर्चाला फाटा देत अपंग व्यक्तींना नवीन कपडे, गावातील गरीब महिलांना साड्या घेऊन दिल्या होत्या. सामाजिक दातृत्व दाखवायला फक्त धनाची श्रीमंती हवी असं नाही. साबळे दंपतीसारखी मनाची श्रीमंती असायला हवी, नाही का?

-राजेश राऊत,बीड

दुर्मिळ खेळांची दुनिया साकारली टेबल कॅलेंडरवर

टायर, विटीदांडू, गोट्या, सुरपारंब्या, काच कांग्र्या, भातुकली, नवरा-नवरीचे लग्न, लपाछपी, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, नदीवर पोहणे, हुतूतू, खोखो, बुक्काबुक्की, चिंध्याचा बॉल, लगोरी अशाप्रकारच्या अनेक मात्र दुर्मिळ होत चाललेल्या खेळांची दुनिया टेबल कॅलेंडरच्या माध्यमातून उस्मानाबादच्या अॅड.राजेंद्र धाराशिवकर यांनी साकारली आहे. या कॅलेंडरवर त्यांनी स्वत: काढलेले फोटो, त्याला समर्पक ओळी दिल्या आहेत. अलीकडे मोबाईलवरचे गेम आणि टीव्हीवरील कार्टून्समुळे बालपणीचे जुने खेळ विसरून जात असताना अॅड.राजेंद्र धाराशिवकर यांनी कॅलेंडरच्या माध्यमातून खेळाचं विश्व उभं केलं आहे.

कॅलेंडरच्या पानोपानी बालपणीच्या वेगवेगळ्या खेळाचे फोटो, त्यावर बालमनाची भावना मांडत नव्या पिढीसमोर खेळाचे महत्व अधोरेखित करण्याचा त्यांचा प्रयत्न स्तुत्य आहे.
‘मैत्रीच्या दुनियेत आनंदाने तरंगलो होतो,
कांदाफोडीच्या गमतीमध्ये भान हरवून जगलो होतो,
ते भोळे बालपणच सुंदर होते’,
अशा अनेक बालपणीच्या विश्वात नेणाऱ्या ओळींसह विविध खेळातले भावविश्व एखाद्या टेबल कॅलेंडरच्या पानांवर अधोरेखित करण्याची अनोखी कल्पना नावीन्यपूर्ण आहे.
अॅड.राजेंद्र धाराशिवकरांना फोटोग्राफीचा छंद. भ्रमंती करताना निसर्ग, पर्यटनासह माणसांच्या, पक्ष्यांच्या वेगवेगळ्या छटा ते टिपत असतात. यातील काही बोलक्या फोटोंवर त्यांनी ५ वर्षापूर्वी टेबल कॅलेंडरचा प्रयोग केला. पक्ष्यांचे विश्व, त्यानंतर वयोमानानुसार बदलते चेहरे, निसर्गाच्या छटा, जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे, बालकांच्या चेहऱ्यावरचे भाव, अशा वेगवेगळ्या थीम घेऊन त्यांनी टेबल कॅलेंडर काढलं. २०१८ मध्ये त्यांनी प्रसिद्ध केलेल्या टेबल कॅलेंडरवरील छायाचित्रांची अनोखी दुनिया होती. लहान मुलांच्या चेहऱ्यावरचे लडीवाळवाणे हावभाव आणि निरागसपणा त्यांनी टिपला. त्यासोबतच हदयाला स्पर्श करणाऱ्या फोटो ओळीतून जगण्याचा संदेशही दिला. यावर्षीच्या (२०१९) त्यांच्या कॅलेंडरची निर्मिती सर्वोच्च ठरावी, अशी आहे.
बालपणातील क्रीडाविश्व त्यांनी कॅलेंडरच्या माध्यमातून उभं केलं आहे. टायर, विटीदांडू, गोट्या, सुरपारंब्या, काच कांग्र्या, भातुकली, नवरा-नवरीचे लग्न, लपाछपी, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, नदीवर पोहणे,हुतूतू, खोखो, बुक्काबुक्की, चिंध्याचा बॉल, लगोरी, अशाप्रकारच्या अनेक जुन्या खेळांपासून नवी पिढी अनभिज्ञ आहे. मोबाईलवरील गेम, कार्टून्सच्या विश्वात फसत चाललेल्या आणि शारीरिक व्यायाम घडविणाऱ्या खेळांची दुनिया काय होती, हे दाखविण्याचा पुरेपुर प्रयत्न त्यांनी केला आहे. या कॅलेंडरवर प्रत्येक खेळाचे फोटो, त्यासोबत समर्पक ओळी देण्यात आल्या आहेत. यावर्षी ३०० कॅलेंडर प्रसिद्ध केली आहेत. या कॅलेंडरच्या प्रति मित्र परिवार, अधिकाऱ्यांना मेाफत भेट म्हणून दिल्या आहेत. ते म्हणतात, “भाच्याच्या मुलांना आम्ही लहानपणी खेळत असलेल्या खेळाबद्दल माहिती सांगितली. त्यांच्यासाठी हे खेळ नाविन्यपूर्ण होते. आजच्या मुलांचं बालपण अक्षरश: कोमेजून गेलं आहे. त्याला पालक इतकं जपतात की तो मोबाईल, टिव्हीच्या बाहेरच येत नाही. आजच्या पिढीला जुने खेळ ज्ञात व्हावेत, या हेतूने ग्रामीण भागात फोटोग्राफी करून कॅलेंडरच्या रूपाने समोर आणले.”
- चंद्रसेन देशमुख, उस्मानाबाद