Thursday, 27 December 2018

पुदिना ताकाची चवच न्यारी

संगमनेरला (जि.अहमदनगर) येणारी प्रत्येक व्यक्ती हमखास नगर रस्त्यावरील स्पेशल पुदिनायुक्त ताकाचा (मठ्ठा) आस्वाद घेतेच. जाता-जाता सोबत पार्सलही घेऊन जाते. सहा वर्षांपूर्वी येथील विजय एकनाथ गुंजाळ यांनी ताकविक्री सुरू केली. आज त्यांच्या पुदिनायुक्त ताकाची ओळख लांबवर पसरली आहे. 
शहरालगत वडिलोपार्जित एक एकर जमीन. राजेश, अजित आणि विजय या तीन भावात जमिनीची सामायिक मालकी. या जमिनीत त्यांनी शेवग्याची लागवड केली आहे. त्यातच, आंतरपीक म्हणून पुदिनाही लावला आहे. त्याचाच वापर ते ताकासाठी करतात.
या छोट्या जमिनीच्या तुकड्यात काय भागणार? मग, वडील मजुरी करायचे. आणि तिघा भावांनी वेगवेगळ्या मार्गाने रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला. मोठा भाऊ राजेश नगरपालिकेत कार्यालयीन निरीक्षक. मधला विजय. धाकटा अजित भाजीपाला खरेदीविक्रीच्या व्यवसायात. विजय बारावी शिकलेले. त्यांनी 2007 ते 2009 या काळात सेंद्रीय, कंपोस्ट खत तयार करुन त्याची विक्री केली. मात्र, त्यात फारसा जम बसला नाही. त्यांनी 

2012 मध्ये संगमनेरच्याच राजहंस दूध संघाकडून दूध, ताक विक्री आणि अन्य उत्पादनांच्या वितरणाचं काम घेतलं. तेव्हापासून त्यांनी संगमनेर रस्त्यावर ताकविक्रीचं दुकान सुरु केलं. तिथेच प्रयोग म्हणून त्यांनी पुदिनायुक्त ताक विकायचा निर्णय घेतला. विक्री सुरु केली आणि लोकही प्रतिसाद देऊ लागले. 
गुंजाळ यांची, आता संगमनेर भागात पुदिनायुक्त ताकविक्रीतून वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या भागात पुदिनायुक्त ताक फक्त गुंजाळ यांच्या दुकानातच मिळतं. सुरूवातीला, दररोज साधारण पाच ते दहा लिटर ताकाची विक्री व्हायची, त्यात हळूहळू वाढ झाली. आता, दर दिवसाला साधारण शंभर ते दीडशे लिटर ताकाची विक्री होते. उन्हाळ्यात या ताकाला अधिक मागणी असते. उन्हाळ्यात दिवसाला तीनशे लिटरपर्यत विक्री जाते. आता विजय यांना कुटुंबातले सदस्यही मदत करू लागले आहेत.
ताकात वापरण्यासाठी पुदिन्याचा रस सुरुवातीला मिक्सरमधून काढला जायचा. पाच वर्षापूर्वी रस काढण्यासाठी 27 हजार रुपये खर्च करुन मशीन घेतलं आहे. दररोज साधारण
तीन ते चार किलो पुदिन्याचा रस ताकासाठी लागतो.
पुदिनायुक्त ताकामुळे पचनाला फायदा होतो. डोकं दुखणं थांबतं, उचकी थांबते. त्वचाविकारावर, वजन कमी होण्यासाठी, पोट साफ राहण्यासाठी, चरबी कमी करण्यासाठी हे पेय फायदेशीर आहे, असं गुंजाळ सांगतात.
"शेतीचं क्षेत्र कमी असल्याची अनेकांना खंत असते. त्यात पाणी नाही. दुष्काळामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. मी मात्र एकरभर क्षेत्रातून प्रगती साधण्याचा प्रयत्न केला. मला त्यात यशही आलं. पुदिनायुक्त ताकविक्रीची या भागात सर्वप्रथम मी सुरुवात केली. आजे हे ताक लोकप्रिय झालं आहे. या सगळ्यात धडपड महत्वाची असते”, असं विजय गुंजाळ सांगतात.''

- सूर्यकांत नेटके.

होममेकर्स ते बसमेकर्स

रत्नागिरीतील एसटीची विभागीय कार्यशाळा. एसटीचा मेकॅनिक विभाग म्हणजे पुरूषांची मक्तेदारी. एसटी महामंडळाची गाडी एक महिला दुरूस्त करू शकते, यावर पटकन विश्वास बसणार नाही. पण इथं, कार्यशाळेत हातात पाना, स्क्रू-ड्रायव्हर, हातोडा, ऑईल घेऊन काही महिला बसेसची दुरूस्तीे करतात. तब्बल 17 महिला मेकॅनिक गेल्या नऊ दहा वर्षापासून हे काम करत आहेत. 
मुळात एसटीच्या मेकॅनिक विभागात दाखल होण्याची महिलांची मानसिकता नसते. कारण इथं करावी लागणारी अंगमेहनत. यामुळे या क्षेत्रात महिलांचा ओघ कमी असतो. मात्र, अलिकडे बदल घडतोय. रत्नागिरीत, या एसटी दुरूस्ती 
कार्यशाळेत अतिशय महत्त्वाचा मानला जाणारा ब्रेक सेक्शनही महिला मेकॅनिक हाताळतात.
या 17 महिलांना यंत्रअभियंत्यांनी त्यांच्या कौशल्यानुसार कामाची विभागणी करून दिली आहे. सकाळी 8 ते 4.30 पर्यंत या महिला वर्कशॉपमध्ये काम करतात. एसटीवर शेकडो प्रवाशांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असते. त्यामुळे एसटीच्या देखभालीचं काम काळजीपूर्वक आणि जबाबदारीनेच करावी लागतं.
नवीन टायर बसवणं, जिनेदुरूस्ती, बेअरींग बदलणं, बॉडीची दुरूस्ती करणे अशी कामं या महिला सहजतेने करताना दिसतात. गेली 37 वर्षे काम करणाऱ्या एसटी
कर्मचाऱ्यांसोबत, त्यांचं मार्गदर्शन घेत गंधाली सावंत हे काम आनंदाने करते आहे. घरची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पदवी घेतल्यावर ती एसटीच्या मेकॅनिक विभागात रूजू झाली. आज गंधाली या कार्यशाळेत फास्ट मेकॅनिक म्हणून ओळखली जाते.
वर्कशॉपमध्ये ब्रेकलाईन तपासण्याचं काम सर्वात महत्त्वाचं आणि मानसिक तणावाचं मानलं जातं. मात्र त्या ठिकाणी सुध्दा गेली 11 वर्षे स्मिता शिंदे प्रामाणिकपणे काम करत आहेत. ब्रेक सेक्शन हा खूप किचकट विभाग. इथं मन एकाग्र ठेवूनच काम करावं लागतं. त्यामुळे, स्मिता शिंदेच्या कामाला दाद दिलीच पाहिजे, असं अधिकारी म्हणतात. या मेकॅनिक महिला कुटुंब, संसार, मुलं या जबाबदार्‍या सांभाळून काम करत आहेत.
सुरूवातीला, जेव्हा या महिला मेकॅनिक म्हणून एसटी वर्कशॉपमध्ये हजर झाल्या तेव्हा या महिला एसटी दुरूस्तीचे काम कसे करणार, अवजड पार्टस् कसे उचलणार हे प्रश्न आमच्यासमोर होते. मात्र पहिल्याच दिवशी या महिलांनी आपली जिद्द आणि कष्ट दाखवताच आम्ही सारे अवाक झालो. त्यामुळेच, आम्हाला त्यांना सहकार्य करायला आनंद वाटतो, असं वर्कशॉपमधील ज्येष्ठ मेकॅनिक राजेश मयेकर यांनी सांगितलं.
या वर्कशॉपमध्ये स्मिता शिंदे, रसिका गावडे, दिप्ती झेपले, अन्वी चव्हाण, श्रध्दा नीमगरे, मंजिरी पुजारे, शीतल शिंदे, ऋत्विका शिगवण, शलाका सुर्वे, सुजाता कोकरे, सानवी खानविलकर या महिला मेकॅनिक कार्यरत आहेत. ब्रेक सेक्शन, इंजिन सेक्शन, मशिन, बॉडी, डीडब्लू, सबस्टोअर, फ्रंट, गियर बॉक्स या विभागांत त्या काम करतात. कोणालाही अभिमान वाटावा, असंच त्यांचं काम. 

- जान्हवी पाटील.

भारत - पाकिस्तानातल्या विद्यार्थ्यांनी एकमेकांशी केलेली कमिटमेंट

'‘भारत माझा देश आहे, ही प्रतिज्ञा आपण दररोज शाळेत म्हणतो. परतु, खरंच देशासाठी आपण काय करतो? हा प्रश्न मला सतत अस्वस्थ करायचा. या अस्वस्थतेतून शालेय मुलांना भारत-पाक शांततेसाठी एकत्र आणायचं, ही कल्पना सुचली''. डिसले सर सांगतात. ''दोन्ही देशातील बंधुभाव वाढावा, यासाठी काम सुरू केलं. मायक्रोसॉफ्ट कंपनीकडे तसा प्रस्ताव पाठवला. त्यांच्याकडून टेक्निकल मदत मिळाल्यानंतर, व्हॉट्सअपच्या माध्यमातून लिंक तयार केली आणि या प्रकल्पात देशभरातील शाळांचा सहभाग नोंदवला.''

हे रणजितसिंह डिसले, ध्येयवेडे प्राथमिक शिक्षक, परितेवाडी इथल्या जिल्हा परिषद शाळेतले. तालुका माढा. जिल्हा सोलापूर. त्यांच्या्च कल्पनेतला ‘लेट्स क्रॉस द बॉर्डर’ हा प्रकल्प मूर्त स्वरूपात आला. या प्रकल्पाला भक्कम साथ लाभली ती मायक्रोसॉफ्ट कंपनीसह व्हॉट्सअप, स्काईप या समाजमाध्यमांची. 
'भारत आणि पाकिस्तान, दोन्ही देश धर्माच्या नावावर वेगळे झाले असले, तरी या दोन्ही देशांमध्ये कला, संस्कृतीत बरंच साम्य आहे. त्यामुळे भारत-पाकिस्तानात सांस्कृतिक देवाणघेवाण वाढली पाहिजे'. हे मत व्यक्त केलं, दोन्ही देशातल्या काही भावी नागरिकांनी.
भारत आणि पाकिस्तानमध्ये, शांततामय संबंध प्रस्थापित करण्यासाठी तयार झाली आहे 'शांतीसेना'. सुरूवातीला, 5 हजार शांततासैनिक तयारही झाले आहेत. हे सारं घडलं, कोणत्याही सरकारी हस्तक्षेपाशिवाय. मायक्रोसॉफ्टतर्फे या प्रकल्पाला देशातील सर्वोत्कृष्ट शैक्षणिक प्रकल्प म्हणून नुकतंच दिल्लीत गौरवण्यात आलं.
या उपक्रमात भाग घ्यायची तयारी 580 शाळांनी दर्शवली. महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, पंजाब, आंध्रप्रदेश अशा वेगवेगळ्या राज्यातील 148 शाळांची प्रकल्पासाठी निवड केली. प्रकल्पात महाराष्ट्रातल्या चार शाळा. सोलापूर जिल्ह्यातील परितेवाडी आणि आकूंब या दोन जिल्हा परिषद शाळा, पुणे जिल्ह्यातील जांभूळदरा येथील जिल्हा परिषद शाळा आणि कोल्हापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय.
पाकिस्तानातूनही इस्लामाबादमधील रूट इंटरनॅशनल स्कूल, लाहोरचे मरिहा जेएआयन स्कूल या दोन मोठ्या शैक्षणिक संस्थाच्या 148 शाळांचा सहभाग. तिकडे प्रकल्पासाठी रजा वकास, हयात जहान बेग, पुरशरा लक्वी, मुस्तफा रजव्हा, अशफाक वकास या शिक्षकांनी पुढाकार घेतला.
1 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर 2018 या सहा आठवड्यांच्या कालावधीत या प्रकल्पाचा पहिला टप्पा पार पडला. पहिल्या आठवड्यात, स्काईपद्वारे दोन्ही देशातल्या मुलांचा प्रत्यक्ष संवाद. दुसऱ्या आठवड्यात, मुलांनी एकमेकांच्या देशातील साम्य आणि फरक यावर चर्चा केली. तिसऱ्या आठवड्यात जगातील दहा शांत देशातील शिक्षकांना ‘ग्लोबल स्पीकर’ म्हणून ऑनलाईन लाईव्ह निमंत्रित करण्यात आले. त्यात ऑस्ट्रियातील सुसान गिलका, फिनलंडमधील पेक्का ओली, कॅनडातील वर्बितो नेगी, आयर्लंडमधील मेकील पेस्तो, जपानमधील नियो होरियो यांच्यासह डेन्मार्क, न्युझीलंड, पोर्तुगालमधील शिक्षकांनी मार्गदर्शन केलं. चौथ्या आठवड्यात भारत आणि पाकिस्तानमधील सैन्यांत संघर्ष का होतो, यावर मुलांनी चर्चा केली. पाचव्या आठवड्यात दोन देशातील संघर्ष आपण कसा थांबवू शकतो, याबाबत विद्यार्थ्यांनी आपली मतं मांडली. शेवटच्या सहाव्या आठवड्यात, भारत-पाकिस्तानचे संबंध शांततापूर्ण राहण्यासाठी मी काय करणार आहे, याबाबत एकमेकांशी ‘कमिटमेंट’ केली आहे. मुलांनी काही उपायही सुचवले. दोन्ही देशातील बातम्या आवर्जून बघायच्या असंही मुलांनी ठरवलं.
या प्रकल्पात सहभागी झालेल्या पाच हजार विद्यार्थ्यांना ‘पीस आर्मी’चं प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. हा प्रकल्प 2030 पर्यंत चार टप्प्यात होणार आहे. त्यात 50 हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतलं जाणार आहे. दुसरा टप्पा फेब्रुवारी ते एप्रिल 2019 मध्ये असेल. या टप्प्यात दोन्ही देशातील प्रत्येकी 200 शाळा सहभागी होणार आहेत. गेल्या 70 वर्षांत युद्ध, तणाव या शिवाय दोन्ही देशांनी काहीच बघितलं नाही. युद्धाने किंवा चर्चेने प्रश्न सुटत नसतात, तर दोन्ही देशातील नगारिकांमधील संवादानेच ही दरी मिटेल, असा विश्वास या प्रकल्पात सहभागी शिक्षकांसह विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आहे.
- नितीन पखाले

माझी शाळा दप्तरमुक्त झाली, तुमच्या शाळेचं काय ?

जेवणाचा डबा, वॉटरबॅग आणि एक वही. मुलांच्या दप्तरात एवढंच सामान असलेली ही शाळा आहे, जुन्या जालन्यातील मराठी कन्यापाठ शाळा. पहिली ते चौथीपर्यंतची ही शाळा. दफ्तरमुक्त शाळेची संकल्पना शाळेचे माजी विद्यार्थी डॉ. परिक्षित देशपांडे यांची. शालेय व्यवस्थापन समितीचे अडव्होकेट रावसाहेब देशपांडे,अविनाश देशपांडे, अडव्होकेट प्रदीप कोठीकर,सिध्दीविनायक मुळे, शुभदा देशमुख यांनीही संकल्पना उचलून धरली. शाळा दप्तरमुक्त करण्याचं ठरलं. पालकांचा मेळावा घेऊन त्यांना माहिती देण्यात आली. वरच्या वर्गात गेलेल्या विद्यार्थ्यांची पुस्तकं मागून घेण्यात आली आणि ती मुलांना घरी देण्यात आली. मुलांची नव्या इयत्तेची पुस्तकं शाळेत जमा करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या नावाच्या बॉक्समध्ये ती ठेवण्यात आली. वर्गपाठाच्या वह्या वर्गातच ठेवल्या. 
उद्योजक सुनील रायथट्टा यांनी 127 बॉक्स दिले. तर बॉक्स ठेवण्यासाठी लोखंडी मजबूत रॅक डॉ. परिक्षित देशपांडे यांनी दिले. त्या त्या वर्गात हे रॅक ठेवण्यात आले. प्रत्येक बॉक्सवर विद्यार्थ्यांच्या नावाचे स्टिकर लावण्यात आले. आता मुलं शाळेत ही वह्यापुस्तकं वापरतात आणि घरी जाताना बॉक्समध्ये ठेवतात. त्यामुळे दुसरीचा एक वर्ग ,तिसरीचा एक वर्ग,आणि चौथीचे दोन वर्ग दफ्तरमुक्त झाले.
उपक्रमाला चार महिने झाले असून पालकांनाही हा उपक्रम आवडला आहे. मुलांचं पाठीवरचं ओझं कमी झालं. शाळेत ठेवण्यात आलेली पुस्तकं चांगल्या स्थितीत राहत असल्याचं लक्षात आलं आहे. वह्या पुस्तक हरवणं ,खराब होणं याबाबतची चिंता कमी झाली.तीच पुस्तके पुढील वर्षी विद्यार्थ्यांकडून मागून घेतली जातील. त्यामुळे पुस्तकं पुढील वर्षी मुलांना कामी येतील हे एक समाधान. दप्तर आवरणं ,बॅगा सांभाळणं हे काम कमी झालं.
राहिला प्रश्न मुलं गृहपाठ कसा करतील? यावरदेखील रामबाण उपाय काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी एकच वही वापरायची. त्या वहीत एक रेघी, दुरेघी,चार रेघी आणि बॉक्स अशा चारही प्रकारची पाने असतात.वर्गात शिकवलेलं याच वहीत लिहायचं तर गृहपाठासाठी दिलेला अभ्यास याच वहीत करून आणायचा. शिक्षकांनाही एकाच वहीत वर्गापाठ - गृहपाठ असल्यानं मुलांच्या अभ्यासावर लक्ष ठेवणं सोपं झालं.
मीही या शाळेचा विद्यार्थी. शाळेच्या उपक्रमाचा मला अभिमान असून मीही यात खारीचा वाटा उचलणार आहे.
इतरही शाळातील माजी विद्यार्थी,उद्योजक,समाजसेवी,व्यवस्थापन समितीने हा उपक्रम राबवण्यासाठी भरघोस मदत केली तर कदाचित विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं दप्तराचं ओझं लवकरच कालबाह्य होईल. माझी शाळा दप्तरमुक्त झाली, तुमच्या शाळेचं काय ?
-अनंत साळी .

जेव्हा मुलं वसतिगृहाविना थांबतात

राज्यात सध्या बालरक्षकाची चळवळ वेगाने काम करीत आहे. बालरक्षक ही शासन व्यवस्थेतील अशी संवेदनशील व्यक्ती आहे, जी प्रत्येक मूल शाळेत यावे म्हणून कार्यरत आहे. शाळाबाह्य मुलं शोधून काढणे, ती शाळेत यावीत म्हणून पालकांचे प्रबोधन करणे आणि त्यांना शाळेत दाखल करून दर्जेदार शिक्षण मिळेल, यासाठी 'बालरक्षक' सातत्याने प्रयत्न करतात. 
जालना जिल्ह्यातील काही गावांमधून मोठ्या प्रमाणात उदरनिर्वाहाकरिता दरवर्षी लोकांचे स्थलांतर होते. पोटापाण्यासाठी होणाऱ्या या स्थलांतरात कमावत्या व्यक्तींसोबत संपूर्ण कुटुंबाचीच फरफट होते. त्यामुळे या स्थलांतरात मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून
हंगामी वसतिगृहाची योजना सुरू करण्यात आली होती, मात्र या हंगामी वसतिगृहांमुळे मुलांचं स्थलांतर पूर्णपणे थांबलं नाही. मुलांचं स्थलांतर थांबवायचं असेल तर त्यांच्या पालकांना शिक्षणाचं महत्त्व पटवून, जबाबदारीचं भान देणं हाच विद्यार्थी स्थलांतर थांबविण्याचा मूलभूत उपाय आहे, याची जाणीव झाली.

म्हणूनच समता कक्ष, पुणे यांनी शालेय शिक्षण विभागाचे प्रधानसचिव नंदकुमार ऑगस्ट 2017 मध्ये जालना जिल्ह्यातील बालरक्षक आणि अधिकाऱ्यांची पुण्यात एक कार्यशाळा घेतली. याच कार्यशाळेत जालना जिल्ह्यातील मुलांचं स्थलांतर विना वसतिगृह थांबविण्याचा निर्णय बालरक्षकांनी घेतला. 
या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्त्वात जिल्हा बालरक्षक टास्क फोर्स तयार करण्यात आला. ज्यात बालरक्षक, पोलीस अधिकारी, महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी, जिल्हा कामगार, समाजकल्याण तसेच विधी अधिकारी, प्राथमिक आणि माध्यमिकचे शिक्षणाधिकारी, डीआयइसीपीडीचे सर्व संपर्क अधिकारी इ.चा समावेश आहे.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी 2 ऑक्टोबरच्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त होणाऱ्या ग्रामसभेमध्ये स्थलांतराच्या अनुषंगाने चर्चा घडवून आणण्यास सांगितलं. पालकांनी मुलांना कामावर सोबत न नेता शिक्षणासाठी गावातच ठेवावं, असं आवाहन करण्याच्या सूचना दिल्या. स्थलांतर होणाऱ्या गावांची यादी काढून ज्या गावात पाचपेक्षा अधिक मुलांचं स्थलांतर होत आहे, अशी 240 गावं निवडली. ज्या गावात सर्वाधिक स्थलांतर होते, तेथील ग्रामसभेला डीआयईसीपीडीचे अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे अधिकारी यांनी उपस्थित राहून पालकांनी मुलांना कामावर सोबत न नेता, चांगल्या शिक्षणासाठी गावातच ठेवण्याचं आवाहन केलं.
स्थलांतरित होणाऱ्या पालकांच्या प्रबोधनासाठी 23 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2017 या कालावधीत जालना डीआयइसीपीडी, शिक्षण विभाग आणि विद्या प्राधिकरण पुणेच्या समता विभागाच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी नूतन मघाडे यांनी ज्या गावात सर्वाधिक स्थलांतर होते, त्या ठिकाणी सुसंवाद सभा घेतल्या. पालकांच्या अडचणींवर चर्चा केली. पालक जिथे कामाला जाणार आहेत तिथली असुरक्षितता, कामामुळे मुलांकडे होणारे दुर्लक्ष, त्यांना न देता येणारा वेळ आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे यामुळे मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान याबाबत पालकांशी संवाद साधला आणि त्यांना मुलं शिक्षणासाठी गावातच नातेवाईकांकडे ठेवण्याचा आग्रह केला.
परिणामी जालना जिल्ह्यात 2017-2018 या शैक्षणिक वर्षात 5310 मुले ही वसतिगृहाशिवाय थांबविण्यात यश मिळालं आहे. त्यामुळे या वर्षी हंगामी वसतिगृहासाठी तरतूद केलेल्या प्रस्तावित तीन कोटींच्या निधीची बचत झाली आहे. एकही हंगामी वसतिगृह न चालविता आजी- आजोबा, काका- काकू, मामा- मामी आणि इतर नातेवाईकांकडे किंवा प्रसंगी शेजाऱ्यांकडे विद्यार्थी शिक्षणासाठी थांबले. 
- डॉ. प्रकाश मांटे.

मुलांच्यासोबत वाढताना आपण फक्त माणूस आहोत, ही भावना अधिक चांगली वाढीस लागते

बाबाचं मनोगत : 
सुनील आणि संगीताने त्यांच्या मुलाच्या - अर्हाच्या जन्माआधीपासूनच नियोजन केलं होतं. संगीता पहिल्यापासून सामाजिक कामांशी जोडलेली आहे. आयडेंटी फाऊंडेशनची ती विश्वस्त म्हणून काम पाहते. सुनीलसारखाच तिच्या ही कामाचा पिंड थोडा फिरस्तीचा. कामाचे हे स्वरुप आणि आर्थिक गरज लक्षात घेऊन त्यांनी लग्नानंतर पाच वर्ष स्वत:ला दिली आणि त्या काळात थोडी आर्थिक घडी बसवून मगच बाळाचा निर्णय घेतला. बाळ आपल्याला होणार आहे तर आपणच सांभाळ करायचा इतका साधा निर्णय; पण तो दोघांनी मिळून घेतला. 
संगीताचा आठवा महिना संपला. आणि ती ऑफिसमध्ये असतानाच अचानक पोट दुखू लागले आणि रात्रीच्या वेळेस बाळंतीण झाली. प्रिमॅच्युअर डिलीव्हरी. अचानक झालेल्या या बाळंतपणाने सुनीलही घाबरला. बाळाला काचेच्या पेटीत ठेवावं लागलं. दहा दिवसानंतर बाळ - बाळंतीण सुखरूप घरी आले. त्याच सुमारास सुनील प्रभातमध्ये रूजू झाला होता. संगीताला बाळंतपणाची सहा महिन्यांची सुट्टी होतीच. त्यामुळे एक रूटीन तयार करायला दोघांनी या वेळेचा वापर करून घेतला. 
सुनील सांगतो, "पहिले सहा महिने ती सुट्टीवर होती. त्यामुळे बाळाला पूर्ण वेळ ती सोबत होतीच. मीही संपादकांशी बोलून माझी कामाची वेळ बदलण्याची विनंती केली. दैनिकाला आवश्यक असणाऱ्या बातम्या आणि इतर जबाबदाऱ्या वेळेवर पूर्ण करेन, या हमीवर ऑफिसही तयार झालं. ऑफिसकडून जर नकार आलाच असता, तर मी नोकरी सोडायची तयारी ठेवली होती. कारण त्या क्षणी बाळाचं संगोपन महत्त्वाचं होतं. पण तसं घडलं नाही. याच काळात त्याची स्वच्छता कशी राखायची, त्याच्याशी कसं बोलायचं, खेळायचं हे समजून घेत होतो. संगीताने मानसशास्त्राशी संबधित कोर्सेस केले होते. शिवाय तिचं काम मुलांसोबतच होतं त्यामुळे तिच्या सूचना मी नीट मनापासून ऐकत होतो. साधारण तो तीनेक महिन्यांचा झाल्यावर मी तीन चार तास सलग त्याला सांभाळू लागलो. संगीताशिवाय त्याला सांभाळता येतं का? आपलं बाळ राहतं का? हे आम्ही पाहत होतो. मग हळूहळू संपूर्ण दिवस ती दिसणार नाही, असं पहायचो. आईचंच दूध त्याला वाटी चमच्याने पाजू लागलो. अर्हा सहा महिन्यांचा झाला आणि माझी व अर्हाची स्वतंत्रपणे गट्टी जमण्याचा काळ सुरू झाला. 
संगीता सकाळी 8 ते दुपारी अडीच बाहेर. ती परतल्यानंतर सुनील ऑफिसला जातो. अर्हा आता दोन वर्षांचा झाला आहे. मात्र, हे रूटीन कायम आहे. संगीता सकाळी फक्त स्वयंपाक करून जाते. त्यानंतर भांडी-कपडे, घरची स्वच्छता आणि पूर्णवेळ अर्हाचं संगोपन हे काम सुनीलच्या खात्यात असतं. 
सुनील सांगतो, "फीडींग सोडलं तर जे काही संगीता अर्हासाठी करू शकते. ते सारं मी करतो. सुरुवातीला, मला ते सारं शिकावं लागलं. संगीताकडून ट्रेनिंग मिळत होतं आणि मी तसं तसं करत होतो. पहिल्यापासूनच अर्हाबरोबर भरपूर गप्पा मारायचो. त्याला एकटं वाटू नये म्हणून त्याच्या नजरेसमोर राहत होतो. तंत्रज्ञान हे खूप मोठं वरदान वाटतं. मी त्याच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात गुगलवर माहिती घेत होतो. बाहेरच्या देशांत ‘पालकत्वा'वर बरंच संशोधन, अनुभवपर लेखन झालंय. ते सारंच आपल्या मुलांना लागू होईल, असं नव्हे. पण त्यातील जेजे आपल्यासाठी शक्य आहे त्याचा अवलंब मी अर्हासाठी करत होतो. रात्री झोपताना बडबडगीते, गाणी म्हणतच झोपायचं. तोतरं न बोलता स्पष्ट बोलायचं. गोष्टी वाचून दाखवायच्या, चित्रं पहायला लावायची, असा सारा दिनक्रम आम्ही सेट केला. त्याच्या कुतूहलाला कायम जागं ठेवलं. बाबा हे काय? बाबा ते काय? या त्याच्या प्रश्नांना मी कधीच कंटाळत नाही. तंत्रज्ञानाचा आणखी एक फायदा झाला ते म्हणजे मोबाईलवर बातम्या टाईप करणे. किमान माहिती मिळवण्यासाठी फोनवर बोलता येणे. अर्हाला दुपारी 1 वाजता झोपायची सवय लावली त्यामुळे पुढच्या तासभरात मी माझ्या कामाचा काही भाग करून घेऊ शकतो. संगीता आल्यानंतर तो जागा होतो आणि मग दोघं पुढचा वेळ सोबत असतात.''
सुनील व संगीता परस्परसंवाद करताना अर्हाही त्यांच्या बरोबरीचा आहे, अशा रितीनेच बोलतात. घरकामातील एकमेकांना मदत करण्याची वृत्ती, पुस्तक घेऊन वाचणं असं तो या दोघांना पाहून शिकत आहे. बाळाच्या वाढीत बाबाचा सहभाग सुनीलला शंभर टक्के महत्त्वाचा वाटतो. सुनीलने पालकत्त्वाच्या बाबतीत एक उत्तम विचार मांडला. तो म्हणतो, "अर्भकावस्थेत बाळाला समोरची व्यक्ती आई की बाबा असं कळत नसतं. आपण म्हणजे त्यांच्यासाठी त्याची काळजी, प्रेम करणारी आणि भीतीच्या वेळेत सोबत असणारी व्यक्ती इतकंच त्यांना कळत असतं. त्यामुळे आपण त्याच्यासोबत वावरताना आपल्या डोक्यातील जेंडरच्या कल्पना पुसून टाकाव्यात. खरंतर मुलंच त्या पुसून टाकतात. मुलांच्यासोबत वाढताना आपण फक्त माणूस आहोत, ही भावना अधिक चांगली वाढीस लागते. अर्हाने त्या अर्थाने माझं माणूसपण जागं केलं असं मला सतत जाणवत राहतं.”
सुनील राऊत.
- हीनाकौसर खान-पिंजार

बाबाचं मनोगत : बाप असल्याचा आनंद बाळाच्या सोबतीतच मिळू शकतो


विशाल पोखरकर सध्या शिक्षणविषयक विशेषांक प्रसिद्ध करत आहे. विशालचा पिंडच मुळी अभ्यासू. त्यामुळे, घरात बाळ येणार म्हटल्यावर याने बालसंगोपनाशी संबंधित तीसेक पुस्तक वाचून काढली. आयुर्वेदीक ते अॅलोपॅथीक, मानसिक आरोग्य ते बाळ कसं सांभाळावं अशी सगळ्या तऱ्हेची. पालकत्वासाठीची इतकी सजग तयारी करणारा विशाल विरळाच. विशालची पत्नी आरजू. तिला जेव्हा गुड न्यूज कळाली, तेव्हाच दोघांनी बाळसंगोपनासाठी आपल्यालाच सज्ज व्हायचंय, हे ठरवून टाकलं. विशाल सुरुवातीलाच सांगतो, "बालसंगोपन ही अति काळजीची गोष्ट आहे असं एक वातावरण तयार केलं जातं आणि ते आपल्याला जमेल का अशी भीती-धास्ती निर्माण केली जाते. सोबतच अंधश्रद्धाही येतात. बाळाची पाचवी, बारावी किंवा मग तीट लावा, दृष्ट काढा. पण हे सारं टाळायचं, हे आम्ही आधीच ठरवलं होतं. शिवाय आरजूचं माहेर आटपाडी, माझं गाव मंचर. त्यामुळे पुण्यात अधिक सोयी मिळतील, हा विचार करून इथंच बाळंतपण करायचं, हे आम्ही सुरुवातीलाच ठरवलं. तेव्हाच आम्हाला हेही माहीत होतं 


की बाळाची देखभाल करायला, तिसरा माणूस सोबत नसणार." 
"माझी आई शेतकरी आणि आरजूची आईदेखील नोकरी करणारी. त्यापैकी कुणीही पूर्णवेळ आमच्यासोबत राहू शकत नव्हते आणि आम्हालाही, त्यांनी त्यांचं रुटीन हलवून वेळ द्यावा अशी अपेक्षा नव्हती.'' 
आरजूच्या पोटात दुखू लागलं, त्यावेळेस विशाल, त्याचे दोन मित्र व दोन मैत्रिणी यांनी तिला प्रसूतीगृहात नेले. विशाल पूर्ण वेळ आरजूसोबत लेबर रूममध्ये होता. आरजूच्या कळा तर घेता येणार नाहीत, पण किमान त्या अवस्थेत आपण तिच्यासोबत आहोत, ही भावना तिच्यापर्यंत पोहचावी, यासाठी विशालचा हा आटापिटा होता. बाळ आणि बाळंतीण तिसऱ्या दिवशी सुखरूप घरी आले. आणि चक्क तीन दिवसाच्या बाळाला विशालने आंघोळ घातली. विशाल म्हणतो, "तोपर्यंत इतकं लहान बाळ हातात घ्यायचीसुद्धा मला भीती वाटायची. पण बाळाची जबाबदारी घ्यायची, हे ठरवलं तेव्हा, आंघोळीपासून सारं करायचं मनात होतं. माझी आणि आरजूची आई घरात होत्या. पण त्यांना कटाक्षाने सांगितलं की, तुम्ही घरातलं काहीही काम करा. पण बाळाचं काम मीच करणार. तुम्ही काही दिवस कराल पण पुढं आम्हालाच करायचं आहे. तेव्हा मला तुमच्या देखरेखीखाली ते सारं शिकू द्या.'' 
आई आणि सासूला अशी तंबी दिल्यावर विशालने आपल्या शिक्षणाला सुरूवात केली. ती अशी, बाळाच्या- अर्शलच्या तिसऱ्या दिवसापासूनच. बाळसंगोपनाच्या पुस्तकांतली माहिती, त्यातील विसंगती, प्रत्येक अनुभवकर्त्याचे भिन्न अनुभव असं सारं गाठीशी ठेवून विशाल तारतम्याने बाळ-बाळंतिणीची काळजी घेऊ लागला. अर्शलला मालीश करणे, आंघोळ घालणे, शी-शू काढणे, त्याचे कपडे धुणे ही सारी कामं तो शिस्तीने करू लागला. महिन्याभरानंतर, आरजूच्या मदतीने दोघांसाठी स्वयंपाक करून, अर्शलची आवराआवर करून तो ‘सुगावा’ मासिकात कामावर जाई. संध्याकाळीही पुन्हा तो बाळाच्या देखभालीत वेळ घालवू लागला. अर्शल सहा महिन्यांचा झाल्यानंतर आरजूने नोकरीवर रूजू होणं भाग होतं. आता मुख्य अडचण येणार होती. विशाल सांगतो, "आमच्यासाठी ती अडचण नव्हतीच कारण आम्हाला पहिल्यापासून हे माहीत होतं की, आमच्या कामाच्या वेळा सांभांळाव्या लागणार. आम्ही काही तासांसाठी अर्शलला पाळणाघरात ठेवायचा निर्णय घेतला. अर्शलला दुपारी 1 च्या सुमारास तिथं सोडायचं आणि संध्याकाळी सहा वाजता आणायचं असं ठरलं. आरजू सकाळी स्वयंपाक करून साडेनऊला बाहेर पडायची. त्यानंतर अर्शलसाठी गरमगरम वरणभात करणं किंवा इतर काही पदार्थ शिजवणं, त्याची स्वच्छता, आंघोळ, औषधपाणी असं सारं मी करू लागलो. त्यासोबत खेळणं, उड्या मारणं, मस्ती घालणं यात आम्ही दोघं पक्के मित्र आहोत. अशाप्रकारे पाळणाघरात सोडेपर्यंतचा पूर्णवेळ त्याच्यासोबत घालवतो.
आज अर्शल पंधरा महिन्यांचा आहे. आता, तो आमच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष देऊ लागला आहे. संस्कार हा ‘बिंबवण्याचा' प्रकार नसतो, हे त्याच्यामुळे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. साधं उदाहरण म्हणजे, आम्ही एका रॅकवर चार भाग केले आहेत. ज्यात पुस्तकं ठेवली आहेत आणि खालच्या एका भागात त्याची खेळणी. सकाळी मी जर पेपर किंवा पुस्तक वाचतो, तेव्हा, तोही खेळणी बाजूला ठेवून त्याच्या हाताला येणारी त्याची छोटी पुस्तकं घेतो. मी जर काही अधोरेखित करत असे्न, तर तोही त्याच्या पुस्तकावर काहीतरी रेघोट्या मारू लागतो. घरातलं आणि आमच्या दोघांचंही वागणं किती निर्मळ आणि संतुलित असायला हवं, याचा धडाच जणू आम्हाला अर्शलकडून मिळाला.”
बाळाशी ‘अलेले, काय रे बाळा’ असं केवळ गप्पा मारून त्याच्या मनापर्यंत पोहचता येत नाही त्यासाठी वडिलांचा संगोपनातच सहभाग हवा, असं विशालला मनापासून वाटतं. हे स्पष्ट करत त्याने एक उत्तम विचार सांगितला, "पती-पत्नी दोघांनाही वाटतं की, आता तिसरं कुणीतरी यावं तेव्हाच बाळाचा निर्णय होतो. म्हणजे दोघं मिळून जर तिसऱ्या व्यक्तीचं स्वागत करणार आहेत, तर त्याची जबाबदारी केवळ एकाकडे ढकलून कशी चालेल? आई नैसर्गिकरित्या तर मुळातच 9 महिने सांभाळते. मग बाळ झाल्यानंतर पहिली जबाबदारी तर बाबानेच घेतली पाहिजे. सहजीवनात समान वाटा नसेल, तर कसं चालेल? आणि हे वाटणी म्हणून नव्हे, तर आनंद म्हणून करायला हवं. दोघांनी मिळून कुठलीही गोष्ट केली की. निरस होत नाही आणि काम हातासरशी होऊन जातं. बाळसंगोपनही तसंच. उलट, बाळासोबत प्रत्येक क्षणी निर्भेळ आनंद मिळतो. याबाबत पूर्वनियोजन नसतं, म्हणून घोळ होतात. नोकरी सोडून देण्याची गरजही नसते. फक्त वेळेचं नियोजन आणि प्राधान्यक्रम थोडा बदलला, तरी सारं नीट होतं. बाप असल्याचा आनंद बाळाच्या सोबतीतच मिळू शकतो.'' विशाल तो आनंद मिळवत जगत आहे.
विशाल पोखरकर, मुक्त पत्रकार.
- हीनाकौसर खान