Tuesday, 23 July 2019

‘डीजे’त रमले, लग्न तुटले! वधूने लग्न न करता नवरदेवास शिकवला धडा

लग्न म्हणजे दोन जीवांचे मिलन. वधू-वर दोघेही लग्न ठरल्यापासून डोक्यावर अक्षता पडेपर्यंत प्रचंड आतूर असतात. या आनंदाच्या प्रसंगी नाच, गाणे, संगीत सर्व काही धडाक्यात होतं. पण कधीकधी आततायीपण अंगलट येतो आणि क्षुल्लक चुकीची मोठी किंमत मोजावी लागते. आपल्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदयाचा ठोका चुकविणारा ‘डिजे’ लग्नप्रसंगांची दैना करून टाकतो. ‘आवाज वाढव डिजे तुला…’ म्हणत हिडीस नाचणाऱ्यांना आवारा म्हणायाची वेळ अनेकदा येते. यवतमाळ येथे घडलेली एक घटना डिजे वाजविणाऱ्यांसाठी धडा ठरावी.
यवतमाळपासून ६० किलोमीटरवरच्या पिंपळनेर (ता. आर्णी) येथील स्वाती शिवदास आडे या तरूणीचा तालुक्यातीलच शारी गावातील तरूणासोबत विवाह ठरला होता. शुक्रवार १७ मे रोजी सकाळी १० वाजता लग्नाचा मुहूर्त होता. त्यासाठी वऱ्हाडी मंडळी पिंपळनेर येथे पोहचली. मात्र मंडपात न येता वऱ्हाड्यांनी गावातच नवरदेवासह डीजेच्या तालावर ठेका धरला. लहानशा गावातील प्रत्येक रस्त्यावरून ही वरात डिजेच्या तालावर ठेका धरत फिरली. डिजेच्या आवाजाने गावकरीही त्रस्त् झाले. अनेकांनी आवाज जरा कमी ठेवा म्हणून सुचविलं. पण काहीही फरक पडला नाही. इकडे मंडपात वधुपक्षाकडील पाहुण्यांसह सर्वचजण नवरदेव व वऱ्हाडींची प्रतीक्षा करीत होते. विवाह मुहूर्त टळून गेला. सर्वांचेच चेहरे त्रासिक झाले. शेवटी वधुचे काका वऱ्हाड्यांना आणण्यासाठी गेले. नाचण्याच्या नादात वऱ्हाड्यांनी मुलीच्या काकास धक्काबुक्की केली. आमच्या सोईने येऊ, असे म्हणत अपमानित करून पाठवलं. काकांनी ही गोष्ट मंडपातील काही ज्येष्ठ लोकांना सांगितली. आपला होणारा नवरा लग्नापेक्षा नाचण्यास महत्व देत असल्याची बाब नववधू स्वातीसही कळली. स्वातीस वडील नाहीत. त्यामुळे या काकांनीच तिचा सांभाळ केला. पित्यासमान काकांचा अपमान करणाऱ्या अशा मुजोर वरपक्षातील मुलासोबत लग्न न करण्याचा निर्णय तिने घेतला. तिच्या या निर्णयाला काका, तिचा भाऊ, कुटुंबिय व गावकऱ्यांनीही संमती दिली. त्यानंतर गावकऱ्यांनी वऱ्हाडी नाचत असलेल्या ठिकाणी पोहचून स्वातीचा लग्न न करण्याचा निर्णय त्यांना सांगितला व वरात गावाबाहेर घेऊन जाण्यास सुचवलं. मात्र वऱ्हाड्यांनी हुज्जत घालून धमकावल्याने चिडलेल्या ग्रामस्थांनी हाताला मिळेल ती वस्तू घेऊन वरासह वऱ्हाडींना गावाबाहेर पिटाळून लावलं. गावकऱ्यांचा हा रूद्रावतार बघून नवरदेवासह अनेकजण मिळेल त्या जागी लपून बसले. काही वेळाने वर आणि वधू पक्षाकडील काही मंडळींनी एकत्र बसून लग्नासाठी झालेल्या व्यवहाराची देवाण-घेवाण करून हे लग्न मोडलं. ही वार्ता कळताच आर्णी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. मात्र कोणीच कोणाविरूद्ध तक्रार न दिल्याने प्रकरण सामोपचाराने मिटलं. केवळ नववी उत्तीर्ण स्वातीने घेतलेला हा धाडसी निर्णय बेधुंद नाचणाऱ्या वऱ्हाड्यांसाठी मोठा धडा मानला जात आहे.
स्वातीने घेतलेल्या निर्णयाबद्दल कोणाचीही नाराजी नव्हती. मात्र हळद लागलेल्या स्वातीचे पुढे काय होणार, हा प्रश्न सर्वांना पडला. मंडप, वधू, पाहुणेमंडळी, जेवणावळी सर्व तयारी असताना लग्न मोडल्याने वधुपक्ष काळजीत पडला. हे तिथंच उपस्थित एका तरूणाने हेरलं. त्याने कृतीतून दिलेल्या उत्तराने एकाच लग्नात दोन आदर्श पायंडे पडलेले बघायला मिळाले. आर्णी तालुक्यातीलच म्हाळुंगी येथील निरंजन उत्तम राठोड या तरूणाने स्वातीसोबत लग्न करण्याची इच्छा तिच्या काकांसह कुटुंबियांकडे बोलून दाखविली. गावात शेती करणारा निरंजन हा स्वातीचा आतेभाऊच असल्याने त्याच्या प्रस्तावाला सर्वांनी लगेच होकार भरला. स्वातीनेही त्याचा प्रस्ताव स्वीकारला. सकाळी वाजंत्री बहुगलबला करणाऱ्या त्याच मंडपात सायंकाळी उशिरा ‘वाजंत्री बहुगलबला न करणे, शुभ मंगल सावधान!’ या मंगलाष्टकाचे स्वर निनादले आणि स्वातीच्या आयुष्याची निरांजनी उजळून निघाली. 

- नितीन पखाले, यवतमाळ

अन् तिच्या जिद्दीपुढे अखेर परिस्थितीही झुकली...

दीड वर्षांपूर्वीची गोष्ट. घरात लागणारं काही सामान आणण्यासाठी कीर्ती कुळये आणि तिचा धाकटे भाऊ घरातून बाहेर पडले. रस्त्याने जाताना एका कंटेनरने त्यांना धडक दिली. दोघं लांब फेकले गेले. कीर्ती बेशुध्द झाली तर तिच्या छोटा भाऊ रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. शुध्दीवर आल्यावर आपल्या भावाला वाचविण्यासाठी कीर्तीने खूप प्रयत्न केले. मात्र, उपचाराला नेत असताना त्याची प्राणज्योत मावळली.
लाडक्या नातवाच्या मृत्यूने कीर्तीचे आजी-आजोबा आजारी पडले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आरवली महामार्गावर तिच्या वडिलांची चहाची टपरी. महामार्गावरील त्यांची चहाची टपरी उठवावी लागणार हे वृत्त कीर्तीच्या वडिलांना कळलं. यात नुकसान भरपाईही मिळाली नाही. एकीकडे मुलगा, आई-वडील गेल्याचे दु:ख आणि त्यातच उदरनिर्वाहाचं साधन गेलं. या सगळ्याचा वडिलांनी धसका घेतला आणि वर्षभरापूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचंही निधन झालं. काही दिवसांतच कीर्तीचे मावशी आणि काकाही वारल्याची धक्कादायक बातमीही तिला मिळाली. आपल्या आयुष्यात हे काय घडतंय हे किर्तीला कळत नव्हतं. पण आता आईसाठी ती पुन्हा जिद्दीने उभी राहिली. चहाची टपरी पुन्हा सुरू झाली.
एकापाठोपाठ घरातील सहा व्यक्ती गमावल्यामुळे कीर्तीच्या आईला मोठा धक्का बसला होता. त्याचा परिणाम तब्येतीवर होऊन तिची आईही गेल्या वर्षभरापासून सातत्याने आजारी पडत होती. अखेर चार महिन्यांपूर्वी कीर्तीचा शेवटचा आधार असलेल्या तिची आईचंही निधन झालं.
घरातील सात माणसे गेल्यानंतर मात्र किर्तीने या नियतीसमोर लढायचे ठरवले. या सगळ्या परिस्थितीला सामोरं जाताना तिचं शिक्षण सुरू आहे. सध्या ती एमएच्या दुसऱ्या वर्षाला असून तिला युपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परिक्षेतून अधिकारी बनायचं आहे. त्यासाठी ती आजही चहा विकून उदरनिर्वाह करत आहे.
एकीकडे मुलं रस्त्यावर उभं राहून व्यवसाय करण्यासाठी मागेपुढे पाहत असतानाचे चित्र दिसतं आहे. कीर्ती मात्र सकाळी 7 ते रात्री 7 पर्यंत चहा विकण्याचे काम अगदी जिद्दीने करत आहे. काŸलेज असताना ती दुपारी चहाची टपरी सुरू करते. हे काम आपण बिनधास्तपणे करतो काही भीती वाटत नाही कारण इतक्या सगळ्या संकटातून पुढे आले आहे की, छोटे संकटे आली की, मी लगेच मात करते त्यामुळे मी फक्त माझ्या ध्येयाकडे लक्ष ठेऊन आहे. स्वत:च्या हिंमतीवर मी एक दिवस अधिकारी बनणार असा विश्वास किर्तीने व्यक्त केला.
- जान्हवी पाटील, रत्नागिरी


पाण्यापायी माणसं आणि नातंही काही काळ दुरावतेय...

दुष्काळ, अलिकडच्या काळात सहजपणे उच्चारला जाणारा शब्द. यंदा मात्र गावची, गावच्या माणसाची, शेतीची आणि शेतीत राबणाऱ्या जिवांची कोलहाल केलीय दुष्काळाने. देवगाव, दुष्काळाने होरपळ होत असलेलं एक गाव. कायम बागायती असणाऱ्या गावांतील शेती, हळहळू उजाड होत गेली. हिरव्यागार झाडांनी नटलेला परिसरात चोरून, लपून कुऱ्हाड पडायला लागली आणि मागच्या आठ-दहा वर्षात बरीच झाडं बुंध्यापासून थोटी झाली. शिवार उजाड होत गेला, पण कोणालाही त्याबाबत बोलावं वाटलं नाही. नवी झांड तर लावणंच बंद. त्याचा परिणाम गावशिवार बोडखा झाला.
यंदा दुष्काळ आला. तसंही देवगावाने गेल्या दहा वर्षात चार-पाच वेळा दुष्काळ सोसलाय. यंदा मात्र परिस्थिती अत्यंत गंभीर. खायला धान्याचा तुटवडा नाही. फक्त पाणी नाही, जनावरांना चारा नाही. अख्ख्या चार महिन्याच्या पावसाळ्यात पाऊस झाला नाही. विहीरी, तलाव, नाले, कोरडेठाक. लोक 1972 च्या दुष्काळाची तुलना करत होते. पण जाणकार त्यापेक्षाही भयंकर दुष्काळ असल्याचं सांगतात. शेताची तर वाटच लागली, पण प्यायलाही पाणी नाही. जनावरांची उपासमार, कर्ती पोरं गाव सोडून दूरदेशी जात आहेत. देवगावचे रंगराव पाटील गावकीतील पुढारी. त्यांनी मागणी केली आणि कधी नव्हे यंदा टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागला. गावाच्या जवळ टॅंकर भरायला पाणी नाही, म्हणून पंधरा मैलावर असलेल्या सिंदफणा धरणात खोदलेल्या सरकारी विहिरीतून टॅंकर भरू लागली. गावांत टॅंकर आलं की साऱ्या गावाची पाणी भरायला धडपड. पाण्याच्या टाक्या, बॅलर, भांडी बादल्या, पातेले, आसंल त्यात पाणी भरायचं. टॅकरवाला मोजून-मापून पाणी देतू. नंबरशीर. दहा दिवसाला नंतर येतू. ठरलेला कालावधी लोटला की गावांतली माणसं रस्त्याकडं नजर लावून बसतात टॅंकरची वाट पाहत. गावांत पाण्याचा टॅंकर आला की त्यावर झुंबड उडते. आज एका भागात, उद्या दुसऱ्या भागात. नंबर लागलेले. एका भागात टॅंकर आला आणि दुसऱ्या भागातील लोक पाणी न्यायला आले की वादावादी.
अगदी नात्यातील लोक असले तरी. ...आज आमच्या भागात टॅंकर आलाय, उद्या येणार नाही. पाणी वाट्याला आलं नाही तर...उद्या देईल का आम्हाला. अजून महिनाभर पाऊस पडल्यावर कशाला कोण बोलतंय असं. दुष्काळाने पिचलेल्या
गावांतील हा संवाद यंदा सहजासहजी एेकायला मिळतोय. पाणी किती मोलांचं हे स्पष्ट होतेय. अगदी नात्यातील माणसांच नातंही काही काळ पाण्यामुळे दुरावलं जात असल्याचं पहायला मिळतंय. पै- पाहुणेही एकमेकांच्या घरी जाताना दिसत नाहीत की दूरदेशी गेलेली माणसं सुट्टीत गावांत यायला धजावत नसल्याचं चित्र एकट्या देवगावात नाहीत. राज्याच्या, डोंगर भागातील अनेक गावांत आज पहायला मिळत आहे. 
- सूर्यकांत नेटके, अहमदनगर

मोफत पाणी तेही घरपोच

नाशिक जिल्ह्यातल्या त्र्यंबकेश्वरपासून १५ किलोमीटरवर वसलेलं विनायकनगर. गणेशगाव ग्रुप ग्रामपंचायतीतलं गाव. लोकसंख्या ५०० च्या आसपास. इथल्या सर्व विहिरींनी कधीच तळ गाठला आहे. कधीतरी पाण्याचा टँकर आणून विहिरीत ओतला जातो. त्यावर तीन-चार दिवसांचं भागतं. पुन्हा विहीर कोरडी. कपडे धुण्यासाठी महिलांना किमान दीड किलोमीटरवर लांब जावं लागतं. काहींना त्यापेक्षाही दूर.
मात्र इथल्याच शरद महाले यांच्यामुळे २५ ते ३० कुटुंबातल्या महिलांच्या डोक्यावरचा भार तरी हलका झाला आहे. महाले यांची विंधण विहीर. सकाळी आणि संध्याकाळी प्रत्येकी अर्धा तास पाणी. यातून साधारण १०० जणांना ते दररोज दीड ते दोन हजार लिटर पाणी मोफत पुरवत आहेत.
महाले यांची ही विहीर शेतात. गाव आणि शेत यात दीड किलोमीटरचं अंतर. महिलांची पायपीट थांबावी यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून महाले ट्रॅक्टर वापरत आहेत. कसा? गावकरी दररोज त्यांच्या ट्रॅक्टरला आपापल्या नावांच्या रिकाम्या टाक्या बांधतात. महाले ट्रॅक्टर घेऊन शेतात जातात. आपल्या घरासाठी पाणी भरण्यासोबतच ते या टाक्याही भरतात. ट्रॅक्टर गावात आला की महिला आपापली टाकी घेऊन जातात.
शेताच्या आसपास असणारी काही कुटुंबही महाले यांची वाट पाहत असतात. ट्रॅक्टर आला की पाणी भरण्यासाठी एकच धावपळ उडते.
परिसरात ज्या काही निवडक मंडळींकडे पाणी आहे, त्यांच्याकडून ते विकत घ्यावं लागतं. मात्र या हे विनायकनगर, आदिवासीबहुल गाव. इथल्या कुटुंबियांची आर्थिक स्थिती बेताचीच. दुष्काळामुळे बहुतांश पुरूष नाशिक शहर, औद्योगिक वसाहतीत कामाच्या शोधात. काम मिळाले तर दोन पैसे मिळणार, अन्यथा तिथे जाता- येतानाचे भाड्याचेही पैसे वाया जातात. अशा स्थितीत महाले यांची विंधण विहीर ग्रामस्थांना एकमेव आधार आहे.

-प्राची उन्मेष, नाशिक

ऐंशी रूपयांची गोष्ट, (आखुडबुद्धी बहुशिंगी - ज्युनिअर ब्रह्मे)

(स्थळ-सिनेमाथिएटर, कॅशियरची खिडकी)
"बोला काका, काय हवंय?"
(पिशवीतून वर्तमानपत्राची सुरळी काढून दाखवत) "ही जाहीरात तुमचीच आहे ना?"
"कोणती? स्त्री किंवा पुरुष मदतनीस पाहिजे ही?"
"नाही हो. त्याखालची."
"हरवली आहे-"
"नाही हो, त्याखालची सिनेमाची जाहीरात तुमचीच आहे ना?"
"अं, हो. पण पुढचा शो साडेतीनला आहे. तिकीटविक्री अजून चालू व्हायची आहे."
"मला तिकीट नकोय."
"हे सांगायला इथंवर आलात का?"
"नाही. मला माझ्या तिकीटाचे पैसे परत पाहिजेत."
"कुठल्या तिकीटाचे?"
"बाराच्या शोचे. माझा सीट क्रमांक के बत्तीस."
"शो संपल्यावर कसे पैसे परत देता येतील? शिवाय फक्त शो रद्द झाला तरच पैसे परत द्यायची पद्धत आहे आमची."
"शो मी पाहिलाय. म्हणूनच विचारलं ही जाहीरात तुमची आहे का म्हणून."
(चष्मा लावून जाहीरात वाचत) "जाहीरातीत असं कुठं लिहिलेलं दिसलं की आम्ही पैसे परत देऊ म्हणून?"
"तुम्ही फसवणूक केलीत म्हणून मी पैसे परत मागतोय."
"कसली फसवणूक? प्यासी चुडैलऐवजी शैतानी हवेली सिनेमा दाखवला की काय आमच्या लोकांनी?"
"नाही. स्क्रीनवर प्यासी चुडैलच होती. पण तुम्ही इथं जाहीरातीत स्पष्ट काय लिहिलंय ते वाचा."
"अं काय?"
"हे पहा- एका तिकिटात सोळा चुंबनदृष्यं पाहायची सुवर्णसंधी सोडू नका."
"बरं मग?"
"मी बाराच्या शोमधली एकूण चुंबनदृष्यं मोजली, ती पंधराच भरली."
"बरं, मग?"
"मग काय? माझी फसवणूक झालीय. मला पैसे परत पाहिजेत."
"पंधरातरी बघितलीत ना मिटक्या मारत?"
"सोळावं दृष्य जे बघायला नाही मिळालं तेच सर्वात चांगलं असेल तर?"
"बरं, कोणतं बघायला मिळालं नाही ते सांगा, मी पुढच्या शोच्या वेळी ते आलं की तुम्हांला बोलावून तेवढंच दाखवायची व्यवस्था करतो."
"वा रे वा. मला काही कामधाम नाहीय वाटतं तुमची चुंबनदृष्यं बघायचं सोडून."
"पाहिजे काय हो तुम्हांला?"
"पैसे. परत पाहिजेत."
"कशाबद्दल?"
"विश्वासघात केल्याबद्दल."
"पैशांऐवजी दुसरं काही-"
"-चुंबन चालेल."
"मी देऊ?"
"ओ मिस्टर, तुमचं चुंबन घ्यायला मी म्हणजे काही भलताच वाटलो काय?"
"मग काय हवंय?"
"एकदा सांगितलं ना? चुंबन चालेल. म्हणजे जे चुंबनदृष्य बघायला मिळालं नाही ते दाखवलं तरी चालेल. पण त्यासाठी मी थांबणार नाही."
"दोन शोच्या मधल्या वेळेत कसं दाखवता येईल हो?"
"ती हिरॉईन थिएटरमध्येच बसून असेल ना पुढचा शो सुरु होईपर्यंत? तिला दे म्हणावं. हवंतर हिरोची भूमिका मी..."
"अहो आजोबा, सिनेमा फिल्मवर शूट केलेला असतो. ती हिरॉईन आत्ता या क्षणी स्वित्झर्लंडमध्ये किंवा राजस्थानातही असू शकेल."
"मग मला माझे तिकीटाचे ऐंशी रुपये परत करा."
"ते शक्य नाही."
"का बुवा?"
"म्हणजे असं बघा, ऐंशी रुपयात सोळा चुंबनं होती. म्हणजे एका चुंबनाचे किती झाले?"
"पाच रुपये. तेव्हढं गणित मलापण येतंय रॅंग्लरसाहेब. पण जे दृष्य बघायला मिळालं नाही त्याची किंमत बाकी दृष्यांइतकीच असेल कशावरून?"
"म्हणजे?"
"म्हणजे ते चुंबन चाळीस रुपयांचं नसेल कशावरून?"
"बरं, चाळीस रूपये चालतील तुम्हांला?"
"का? समजा, जे चुकलंय ते चुंबनदृष्य ऐंशी रूपयांचं असून बाकी पंधरा चुंबनं त्यावर फ्री असतील तर?"
"एकावर पंधरा फ्री? काहीतरी लॉजिक लावा आजोबा…"
"लॉजिक लावूनच सांगतोय. एकावर पंधरा फ्री हे बरोबर आहे."
"कसं काय?"
"घटत्या उपयोगितेचा सिद्धांत. नायिकेचं एक चुंबन घेतल्यानंतर पुढच्या चुंबनांची किंमत शून्य झाली असणार नाही कशावरून?"
"आजोबा, माझंही एफवायला लॉजिक होतं. किंमत शून्य झाली असेल कशावरून?"
"हे पटवायचा एकच मार्ग आहे- सगळी चुंबनं दाखवायची. तीही आत्ताच. ताबडतोब."
"शक्य नाही."
"मग पैसे परत."
"नाही दिले तर?"
"तर पुढच्या शोच्या वेळी इथं उभं राहून तुमच्या खोटेपणाची जाहीरात करून सगळ्या प्रेक्षकांना पळवून लावेन."
"असं करता येईल तुम्हांला?"
"मला काय ऐरागैरा समजता का? गेल्या आठवड्यात एक सिंह कमी दिसला म्हणून रॅंबो सर्कसला पळवून लावलंय मी. तुम्ही काय चीज आहात?"
"अरे बापरे, तुम्हीच का ते? काका, तुमचे पैसे देऊन टाकतो. हे घ्या ऐंशी रुपये."
"अहो रॅंग्लर, ऐंशी गुणिले त्रेसष्ट किती?"
"ते का?"
"कारण, अशी त्रेसष्ट तिकीटं आहेत माझ्याकडं!"
#नवीउमेद
Hrishikesh Rangnekar

वडिलांच्या वयाइतकी झाडे देऊन लेकी साजरा करतात वडिलांचा वाढदिवस


नाशिकच्या अमी व मिली छेडा या दोन बहि‍णींची ही आगळीवेगळी गोष्ट. त्यांच्या वडिलांचा मुकेश यांचा वाढदिवस पर्यावरण दिनाला (5 जून) येतो. अमी सांगते, “आम्ही बाबांचा वाढदिवस गेल्या १२ वर्षापासून वेगळ्या पध्दतीने साजरा करतो. वडिलांच्या वयाइतकी झाडे दरवर्षी नातेवाईक व मित्र परिवाराला भेट म्हणून देतो. यामध्ये औषधी, सुवासिक तर कधी मोठी झाडे, शोभिवंत अशी कुठल्याही प्रकारची झाडे ही भेट स्वरुपात दिली जातात. गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या वयाच्या १० पट झाडे दान करत आहोत.” यंदा अशी ६२० झाडं दिल्याचं अमी उत्साहाने सांगते. ती म्हणते, “पूर्वी आम्ही स्वत:च नातेवाईकांकडे जाऊन झाडं लावायचो. तेही त्या झाडांची मनापासून काळजी घेत असत. पण आता आता आकडा वाढल्यामुळे स्वत: झाडं लावणं शक्य होत नाही. म्हणून आम्ही रोपं त्यांना भेट देतो आणि बाकीचं काम मित्र परिवार करतो. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद हीच आमच्या उपक्रमाची सार्थकता. भेट दिलेल्या झाडांना फुलं लागली, फळं आली की लोकं आम्हांला त्याचे फोटो पाठवतात हे बघून खूप आनंद वाटतो. झाड निवडतांना आम्ही औषधी झाडं, फुलझाडं, बारमाही, सावली देणारी अशी वेगवेगळी झाडं निवडतो.”
नाशिक शहरात मुकेश यांचा हॉर्टीकल्चरचा व्यवसाय आहे. आपण ज्या समाजात वावरतो त्याला आपण काही देणं लागतो ही शिकवण आई जयना व वडील मुकेश यांनी मुलींना दिली. ही शिकवण प्रत्यक्षात आणण्यासाठी झाडे देण्याचा संकल्प केल्याचं मुली सांगतात. आता झाडांची संख्या वाढत असल्यामुळे या कामात काही ओळखीची मंडळी मदत करत आहे. झाडं नेऊन देणं, ती वेळेवर पोचली का नाहीत याची काळजी घेणं यासाठी प्रसाद उपासनी, कुंतक गायधनी, निखिल जोशी, गार्गी एलकुंचवार, माँटी सिंग मदत करतात. असा उपक्रम अन्य ठिकाणी राबविला जावा अशी अपेक्षा अमी व्यक्त करते.
- प्राची उन्मेष, नाशिक

पुण्याचे 'हिल-मॅन'

अनिल गायकवाड. त्यांना सगळे प्रेमाने मामा म्हणतात. मूळ गाव सातारा. सध्या वास्तव्य पुण्यात बाणेर इथं. 1978 साली एनसीएलमध्ये पर्यावरण या विषयावर कार्यक्रम झाला. यावेळी अनिल यांनी एक शोधनिबंध वाचला. मुंबई, कॅलिफोर्निया अशी समुद्राजवळ वसलेली शहरे तापमान वाढीमुळे पाण्याखाली जातील, प्रदूषण वाढेल, माणसाचं जगणं अवघड होईल, असा निबंधाचा गोषवारा. त्यावेळीच पर्यावरण विषयाच्या अभ्यासाला त्यांनी सुरूवात केली. 1978 ते 2006 या काळात पुण्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी पर्यावरणाचं जमेल तितकं काम सुरू केलं. सगळ्यांनीच हे काम करायला हवं या हेतूने 2006 साली 'वसुंधरा स्वच्छता अभियान' या लोक चळवळीची त्यांनी सुरूवात केली. फक्त पुणं किंवा महाराष्ट्र सुंदर होऊन चालणार नाही तर संपूर्ण वसुंधरा स्वच्छ व्हायला हवी हा नावामागचा हेतू.
आठवड्यातून दर रविवारी एक तास काम करायचं ठरलं. कुठं खराटा हातात घेऊन स्वछता करा, कुठं पर्यावरणाविषयी जागरूकता, तर कुठं झाड लावणं. जेवढी झाडं लावता येतील तेवढी जगवायची, जेवढी जगवता येतील तेवढीच झाडं लावायची ही खूणगाठ मनाशी होती. पुण्यातील पाषाण टेकडीवर झाड लावायला सुरूवात झाली. पाण्यासाठी टेकड्यांवर टाक्या बांधण्यात आल्या. सध्या टेकडीवर 30 टाक्या आहेत. अनेक रहिवासी मित्रांनी आपल्या घरातून पाण्यासाठी कनेक्शन दिली. मात्र काही दृष्ट वृत्तीनी झाडे उपटली, तोडली काही वेळेस तर वणवे लावण्यात आले. नंतर मात्र झाडांची संख्या वाढल्यावर टेकड्यांवरची अवैध बांधकामं थांबली. ह्या कामाचा पसारा एवढा वाढला की, आयटी, अभियांत्रिकी, वकील, मोठे अधिकारी अशा सगळ्या लोकांनी येऊन श्रमदान करण्यास सुरूवात केली. गेली अनेक वर्षे रोज सकाळी 7 वाजता न सांगता सगळी मंडळी येतात टाकीतलं पाणी झाडांना घालून निघून जातात. मामांच्या कामाचा वारसा असा अनेक वसुंधरावासियांनी खांद्यावर उचलला आहे. आज जवळजवळ 25,000 झाडे लावली, जगवली अन् वाढवली आहेत.
मामा आणि ग्रुपचं काम इथंच थांबलं नाही. पुणे शहरात नदी प्रदूषण अफाट. 2008 साली त्यांनी राम नदी स्वच्छता अभियान हाती घेतलं. भुकूम-पाषाण-बाणेर अशा 18 किलोमीटर लांब नदीची स्वच्छता. राम नदी स्वच्छतेसाठी 20 विविध संस्था, 35 महाविद्यालये, इंडस्ट्री तसंच किर्लोस्कर वसुंधरा ट्रस्टने मदत केली. नदीचे 9 भाग करून प्रत्येक संस्थेला काम वाटून देण्यात आलं आहे. मग त्यात नदीच्या आजूबाजूला राहणाऱ्या लोकांचं प्रबोधन, घनकचरा, सांडपाणी व्यवस्थापन अशा अनेक गोष्टी आल्या. रासायनिक शेतीमुळे होणारे दुष्परिणाम हे सगळ्यात जास्त निसर्गाला हानिकारक आहेत. 2014 साली त्यांनी पदमश्री सुभाष पाळेकर ह्यांच्या नैसर्गिक शेतीवरील शिबीरात सहभाग घेतला. नैसर्गिक शेती हाच उपाय हे लक्षात आल्यावर अनेक गावागावात प्रबोधन, जागरूकता अन् प्रात्यक्षिकाला सुरूवात केली. मामांनी आतापर्यंत 10 शिबीरात भाग घेतला आहे. मुळशी परिसर व इतर ठिकाणी देशी बियाणांचा प्रचार चालू आहे. महाराष्ट्रात नैसर्गिक पद्धतीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा शेतमाल विकण्यासाठी दर वर्षी बाणेर, तर ह्यावर्षी सिद्धी गार्डनमध्ये 'वसुंधरा धान्य महोत्सव' भरवण्यात आला. पुणेकरांना वर्षभराचे धान्य घेता आलं. जवळच्या ठिकाणी नैसर्गिक शेतमाल मिळावा म्हणून बाणेर येथे एक दुकान उघडण्यात आलं. सागरमित्र संस्थेसोबत अनेक शाळेत प्लास्टिक कचरा व्यवस्थापनावर काम सुरू आहे. मासिक पाळीसाठी वापरलेल्या कृत्रिम पॅडमुळे होणाऱ्या परिणामाचा विचार करून सुती कापडाचे पॅड व जनजागृती चालू आहे. आज मामांनी सुरू केलेलं काम लाखो लोक पुढं नेत आहेत. त्याचंच ज्वलंत उदाहरण म्हणजे पुण्यातील पाषाण टेकडी. या टेकडीवर अवैध काँक्रीटकरण चालू होतं. ते थांबवण्यासाठी वसुंधरा अभियानाच्या गटाने एकत्र येऊन आंदोलन केलं. 4600 लोकांनी यावर सह्या केल्या. काम थांबलं. निसर्ग जिंकला. आता असंख्य कामांना उधाण आलं आहे ते लोकसहभागातूनच. 
मामा सगळ्यांना एकच सांगतात, “टूथपेस्टऐवजी दंतमंजन वापरा, साबणाऐवजी शिकेकाई-रिठा वापरा, कपडे सुती असावेत. आपण एवढा जरी बदल केला तरी पर्यावरण जगेल. नको असलेल्या गोष्टी टाळा, पर्यावरणपूरक आयुष्य जगा. कारण झाड आहे तरच माणूस आहे.”
अनिल गायकवाड- 99220 01442
- संतोष बोबडे, पुणे
#नवीउमेद #जागतिकपर्यावरणदिन
Santosh Bobade Anil Gaikwad