Showing posts with label Anuja Sankhe. Show all posts
Showing posts with label Anuja Sankhe. Show all posts

Tuesday, 27 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं


आमचं लग्न फक्त दोन प्रेमीजिवांचं मिलन नव्हतं तर एकमेकांना एकमेकांच्या साथीने परिपूर्ण करणं होतं. अपंगत्व अंगावर कशामुळे येतं असं तुम्हांला वाटतं? अनेक कारणांमुळे आपण घरात सतत काही न काही निर्णय घेत असतो. ते पूर्ण करून संसार नीट चालवतो वा आपली हौस भागवतो. मात्र या निर्णयप्रक्रियेत जेव्हा कुटुंबातील अपंग व्यक्तीला जाणिवपूर्वक वा अजाणतेपणे सामील करून घेतलं जात नाही. तेव्हा, आपल्यातील कमतरतेच्या टोकदार जाणिवेने मन जखमी होतं. लग्नाआधी आणि नंतरही मला अशा प्रकारच्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं आहे. पण, संधी असली की, मी माझं मत प्रदर्शित करते.
पण, काहीवेळा सगळ्यात जवळच्या व्यक्तींकडून आपल्याला डावललं जातंय, आपल्यालाही एखादं मत असू शकतं हेच विचारात घेतलं जात नाही तेव्हा आपलं अपंगत्व ठळकपणे जाणवतं.पण, दहा महिन्याच्या ओजसला घेऊन स्वतंत्र संसार मांडला तेव्हा स्वतंत्रपणे निर्णय घेण्यातली मजा, जबाबदारीची जाणीव आणि घेतलेले निर्णय पार पाडताना होणारी धांदल सर्वच गोड आणि भुरळ पाडणारं होतं. एकट्याने संसार करण्याचा निर्णय हा आम्हा उभयतांच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय होता.
खरंतर, ओजसचं आयुष्यात येणं हेच आम्हाला स्वतःचं घर असावं या विचाराशी घेऊन आलं. त्याचा पहिला वाढदिवस स्वतःच्या घरातच साजरा करायचा असं ठामपणे ठरवून घर शोधलं आणि जे आवडलं ते घेतलंही. अर्थात हे ठरवणं जितकं सोपं तितकंच अंमलात आणणं कठिण होतं आमच्यासाठी. आमच्यावर कधीही कोणतीही महत्त्वाची जबाबदारी वा धावपळ करण्याची पाळी आली नव्हती. पण, एकदा ठरवलं म्हणजे मागे हटायचं नाही असा माझा हट्टी स्वभाव. म्हणूनच आम्ही ते स्वप्न कसं प्रत्यक्षात साकारलं ते थोडक्यात सांगते. १५ एप्रिल २०१६. ओजसचा पहिला वाढदिवस. मार्च संपत आला आणि आम्ही ओजसच्या वाढदिवसाचं प्लॅनिंग सुरू केलं. घरातल्यांशी बोलून काय ते ठरवू असं भरतचं म्हणणं. पण, मी त्यावर आक्षेप घेतला. ‘आपल्या घरात आपल्या बाळाचा वाढदिवस कसा करायचा हे आपणच ठरवूयात’. मी इतक्या ठामपणे म्हटलं की, भरत लगेच कामाला लागला. आम्ही सुट्ट्यांचं गणित केलं. वाढदिवशी रामनवमी असल्याने बॅंक हॉलीडे तर १४ ला आंबेडकर जयंतीची सुट्टी होती. घर नवीन. आणि ओजसचा वाढदिवसही पहिला. त्यामुळे सर्व पाहुणे पहिल्यांदाच आमच्या घरी येणार होते. म्हणून सत्यनारायण पूजा घालावी असंही आम्ही ठरवलं. त्या अनुषंगाने मी लॅपटॉप उघडला आणि नावं लिहायला सुरुवात केली. नातेवाइक आणि मित्रमैत्रिणींची संख्या सव्वाशेच्या घरात पोहोचली. पुढचा प्रश्न म्हणजे जेवण. बऱ्याच केटरिंगवाल्यांशी आम्ही बोललो. त्यातून एकाला निवडलं आणि मेनू ठरवला.
विरारमधल्या केक बनवणाऱ्या प्रत्येक बेकरीशी फोनवर बोलून घेतलं. त्यातल्या एकीला डिजाइन्स वॉट्सॅप करायला सांगितलं. टेस्टिंगला पेस्ट्रीसुद्धा मागवली. मिकीमाऊस हातात चार फुगे घेऊन पळतोय आणि त्या फुग्यावर Ojas लिहिलंय असा केक फायनल झाला. मग आम्ही माणसं दोन गटात विभागली. फोनाफोनीला सुरुवात केली. एकीकडे जशी जमेल तशी स्वच्छतेची मोहिमही आम्ही राबवत होतोच. पण, नुकतेच पाय फुटलेल्या ओजसने “तुम्हाला ते शक्य नाही”असं दाखवून दिलं. तो नुकताच पावलं टाकायला शिकला होता. त्यामुळे एका जागेवर बसणं त्याच्याने शक्य नव्हतंच. सतत काही तरी धरून उभंच रहा, टेबलावरचं ओढ किंवा कशावर तरी चढण्याचा प्रयत्न करा. चळवळ्यावर लक्ष ठेवणं जिकिरीचं व्हायचं. त्याच्या वाळ्यांना असलेल्या घुंगरांनी तो कुठे जातोय आणि काय करत असावा हे आम्ही समजून घेत असू. मी आईंना आणि मम्मीला दोन दिवस आधी यायला सांगितलं आणि स्वच्छता त्यांच्यावर सोपवली.
पूजा म्हटली की, पुजेचं सामान, प्रसाद बनवणं, नैवेद्याचं तयार करणं सारंच आलं. आधी आम्ही भटजींशी सामानासहित यावं असं ठरवून घेतलं. मग, प्रसादाच्या सामानाची खरेदी केली. पुजेच्या दिवशी सकाळी माझ्या मावशीने प्रसाद आणि नैवेद्याचा स्वयंपाक केला. एकूण आमच्या आगाऊपणे घेतलेल्या निर्णयाला सगळ्यांचाच हातभार लागला. वाढदिवसाला नातेवाइक आणि मित्रमैत्रिणी आपल्या कुटुंबासहित आले. केटरर्सला दृष्टिहीन लोक अधिक असल्याची कल्पना दिलेली असल्याने त्यांनी जेवण वाढण्याचं कामही स्वतःहून घेतलं. ओजससुद्धा फारसा रडला नाही. बासुंदी पुरीच्या बेताचं मित्रमैत्रिणींनी खूपच कौतुक केलं हेही महत्त्वाचं. एकूण काय तर पूजा आणि वाढदिवसाचा अनोखा मिलाफ सर्वांच्या साक्षीने आनंदाने पार पडला.
आपल्या घरात पूजा घालणं किंवा मुलाचा पहिला वाढदिवस साजरा करणं हे खरंच खूप विशेष नसतंच. विशेष असतो त्या अरेंजमेन्टमधला आपला उत्साह, सहभाग आणि निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य. नाही तर विचार करा की, तुम्ही आपल्या मुलीच्या वाढदिवसाला बाहुलीचा केक आणायचा म्हणता आणि तुमच्याच जवळचं कोणीतरी पटकन् तुम्हाला तोडून म्हणतं की, त्यातलं तुम्हाला काय कळतं? असं कोणीतरी दुर्लक्ष करणं दुखावतंच ना! एक व्यक्ती म्हणून विकास होण्यासाठी या सर्वातून जावं लागतं. कदाचित पावलोपावली स्वतःची काम करण्याची इच्छा, योग्यता आणि क्षमता समोरच्याला पटवून द्यावी लागत असल्याने आणि बऱ्याचदा त्या दुर्लक्षित होत असल्याने माझ्यासारख्या अनेक अपंग लोकांचं मन अधिक संवेदनशील, अधिक ठाम आणि आत्मविश्वासाने फुलत असावं. माझ्या या लेखन प्रपंचातून खरंच मी काय साधलं? मोकळेपणी बोलता येणं प्रत्येकालाच जमत नसतं. मला माझ्या समस्या, माझी धडपड आणि त्यातून वाट काढून व्यवस्थितपणे जगण्याची माझी प्रक्रिया शब्दबद्द करता आली ती निव्वळ नवी उमेदमुळे. फक्त तेवढंच नाही. सर्व वाचकांच्या प्रतिक्रियांनी आपलं कोणीतरी ऐकतंय ही सुखद भावना संपूर्ण मालिकेत सोबत करत राहिलीय. तुम्हा सर्वांचे व्यक्तीशः मी आभार मानते. शिवाय कोणत्याही दृष्टीहीन वा अपंग व्यक्तीशी काहीही प्रश्न, शंका किंवा सहज संवाद साधावासा वाटला तर तो नक्की साधावा. मीही फेसबूकवर उपलब्ध आहेच. धन्यवाद.


 - अनुजा संखे

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -14

टेक्नोलॉजी हे आम्हासारख्या दृष्टीहीन व्यक्तींसाठी एक वरदान आहे. पूर्णपणे मला मान्य झाल्यावरच मी हे विधान करतेय. स्मार्टफोनने आयुष्य खाजगी ठेवण्यासाठी मोठं सहाय्य केलं आहे. ऍन्डरॉइड फोनच्या सेटिंग्समध्ये जाऊन ऍक्सेसिबिलिटी हे फिचर उघडल्यावर तुम्हाला त्यात टॉकबॅक हा ऑप्शन दिसतो. तो ऑन केला की, फोन बोलायला लागतो आणि त्याच्या टचिंग स्टाइलमध्ये बदल होतो. डोळस व्यक्ती, जे ऍप उघडायचं असेल त्यावर एकदा टच करते आणि ते ऍप ओपन होतं. पण, हे दृष्टीहीन व्यक्तीच्या बाबतीत शक्य नसतं. आधी बोट फिरवून त्यांना आपल्याला कोणतं ऍप ओपन करायची आहे, ते शोधून कन्फर्म करावं लागतं आणि मग त्यावर दोनदा टॅप करावं लागतं. अशाने चुकून टच झालं म्हणून कोणतीही ऍप नको असताना ओपन होण्याची शक्यताच राहत नाही. एवढी मदत करणारा फोन असल्याने, फेसबुक, वॉट्सॅप, ट्विटरसारख्या अनेक सोशल नेटवर्किंग साइट्सवरचा दृष्टीहीनांचा वावर वाढला आहे. त्यांचे विचार ते एकाच वेळी समाजातल्या कितीतरी लोकांपुढे मांडू शकत आहेत. अनेक सपोर्टिव ऍप्सच्या मदतीने आपलं रोजचं आयुष्य सुकर करू शकताहेत. ऍप्सच्या या खजिन्यापैकीच एका अत्यंत मौलिक ऍपचा मी इथे उल्लेख करू इच्छिते.
बी माय आईज (Be My Eyes) हे ते ऍप. कितीही टेक्नोलॉजी असली, तरी कधीतरी डोळस व्यक्तीच्या मदतीची गरज भासतेच. उदाहरणार्थ, ओजसला औषध पाजायचंय आणि माझ्या बिल्डिंगमधल्या मैत्रिणी योगायोगाने घरी नाहीत. औषधाचं नाव माहिती असून फक्त ते नाव वाचता येत नसल्याने मला ते पाजता येणार नाही. अशावेळी मला ‘बी माय आईज’ या
ऍप्लिकेशनचा उपयोग होतो. ऍप ओपन केली की, जवळच्या स्वयंसेवकाला विडियोकॉल करा असा ऑप्शन येतो. तसं मी केलं की, समोरची व्यक्ती फोन उचलते आणि मग मी बाटल्या त्याला दाखवून त्यातलं मला बाळाला कोणतं औषध पाजायचं ते निवडून घेते. अर्थात यासाठी स्वयंसेवक व्यक्तींनी हे ऍप आपल्या फोनमध्ये घेऊन आपलं नाव त्यात नोंदवून ठेवावं लागतं.
खरंच, किती सुसह्य होतंय आयुष्य! नाही तर, कॉलेजमध्ये भरतच्या प्रेमात असताना कुठे होते हे स्मार्ट फोन? ‘आय लव यू’ सारखा अत्यंत खाजगी मेसेजही कोण्यातरी मैत्रिणीच्या मदतीने पाठवावा लागला असता आणि त्याला वाचून घ्यायलाही कोण्यातरी मित्राला दाखवावा लागला असता. गंमत आणि अगतिकता यांच्या मिलाफाचा अनुभव स्मार्टफोनने दिला असंच म्हणता येईल.
फक्त एवढंच नाही. आणखी बऱ्याच गोष्टींमध्ये आजकाल अपंग व्यक्तींचा विचार केलेला आढळतो. ट्रेनने रोजचा प्रवास करणाऱ्यांना हे ठाऊक आहेच की, पुढल्या स्टेशनची अनाउंन्समेन्ट तिन्ही भाषांमध्ये केली जाते. त्यामुळे “आता कोणतं स्टेशन येईल? शेजारच्याने सांगितलं नाही किंवा आपला अंदाज चुकलाच तर आपण दुसऱ्याच स्टेशनला तर उतरणार नाही ना?” ही भिती कमी झाली आहे. पण, पूर्ण गेली असं मात्र म्हणता येणार नाही. कधी एखाद्या जुन्या गाडीने प्रवास करावा लगतो, जिच्यात ही सिस्टमच नाही, कधी स्पिकरचा आवाज एवढा लहान असतो की, ट्रेनच्या आवाजातून ती बाई काय बोलतेय हेच कळत नाही. तर कधी अनाउन्समेन्टच मागेपुढे होत असते. पण, काहीच नसल्यापेक्षा काहीतरी होतंय हे महत्त्वाचं.
प्लॅटफॉर्मसुद्धा दृष्टीहीन व्यक्तींची सोय लक्षात घेऊन बनवले जात आहेत. मधला भाग अत्यंत गुळगुळीत, कडेपासून अडीच तीन फूट आत पायाला स्पर्शने कळतील असे पट्टे आणि अगदी कडेचा भाग खरखरीत पद्धतीने बांधलेला असतो. यामुळे काय होतं? तर, चालण्याच्या भरात चुकून रुळांकडे जाणारी दृष्टीहीन व्यक्ती लगेच सावध होऊन उजवी वा डावीकडे सरकून सुरक्षितपणे चालू शकते. नाही, तर... किती दाखले देऊ अंधत्वामुळे रुळात पडलेल्या माझ्यासारख्यांचे? काहींना तर अंधत्वाबरोबरच हातापायांचं अपंगत्व आलंय कायमचं. अपंगांसाठी असलेल्या डब्ब्यातली गर्दी हा एका स्वतंत्र लेखाचा विषय आहे. पण, तो डब्बा आम्हाला कळावा म्हणून प्रत्येक प्लॅटफॉर्मवर बीपरची सोय केलेली आहे. शिवाय तिथे चौकोन तुकड्यांनी बनवलेली जमीन असते. म्हणजे जे दृष्टीहीन आहेत त्यांना ऐकून तर जे अंध आणि कर्णबधीर आहेत त्यांना स्पर्शाने कळावं हा हेतू. पण, बऱ्याचदा बीपर वाजत नाहीत आणि प्रत्येक प्लॅटफॉर्मवर थांबणाऱ्या ट्रेनचा डब्बा त्या बीपरकडेच थांबतो असंही नाही. पण, काही प्रवासी मदत करून तेवढी गैरसोय टाळतात. जिथे आवश्यक तिथे मदत केली पाहिजे, हे जितकं खरं तितकंच आपल्याला ती मागताही आली पाहिजे, हेही खरंच.
- अनुजा संखे

Saturday, 24 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -13

ऑफिसमधल्या कामाबद्दल मी पुढे विस्ताराने लिहीन. आधी आम्ही घर कसं आवरतो-सावरतो हे सांगते. संध्याकाळ म्हणजे कसरत. हे करू की, ते? असं होतं. बेबी सिटिंगमधून ओजस आणि ऑफिसातून भरत घरी येण्याच्या आधी मी घरी येते. पहिली धांदल उडते ती स्वयंपाकाची. मी घरात येते आणि हात पाय धुवून सरळ किचन गाठते. बऱ्याचदा काय बनवायचं ते ठरवूनच येते. सहसा वरणभात, एखादी भाजी बनवायची असते. मी गॅस कसा पेटवते? त्याहीपेक्षा मी स्वयंपाक कसा करते हे जाणून घ्यायला सगळ्याच स्त्रिया आतूर असतात.
आवाज, गंध, स्पर्श आणि वेळेचा अंदाज यांवर माझं स्वयंपाक करताना बारीक लक्ष असतं. तुम्ही लक्ष देऊन ऐकलंत तर लक्षात येईल की, गॅस लावतानाही ‘फट्’ असा आवाज येतो. त्यावरूनच मला कळतं की, गॅस लागला आहे. काहीही बनवताना मी आधी भांडं धुवून घेते. मग ते गॅसवर ठेवून गॅस लावते. एक दोन मिनिटं ते भांड तसंच राहिलं की, त्यातलं पाणी सुकतं आणि मग मी पुढची फोडणी वगैरे सोपस्कार करते.
चिकन रस्स्याची माझी रेसिपीच तुम्हांला माझा स्वयंपाक कसा होतो ते सांगेल. ही रेसिपी निवडण्यामागचं कारण चिकन बनवताना भाजणं, वाटण, तळणं, चिरणं, साफ करणं असं सगळंच करावं लागतं. तुमची बरीचशी उत्तरं यातून मिळतील असं वाटलं म्हणून हे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅसवर भांडं चढवल्यावर तो लावण्याआधी लागणारी प्रत्येक सामुग्री मी किचनच्या कट्ट्यावर काढून ठेवते. तेल घातलं आणि मग मसाले शोधत बसले असं करत नाही.
संसारात अगदी नवीन असताना एकदा, कुकरमधल्या तेलाने जाळ पकडला होते. मी आणि भरत आम्ही दोघंच घरी होतो. कशीबशी आग विझवली होती. पण, त्या प्रसंगाने कायमचा धडा शिकवला हे मात्र खरं.
मी आधी खोबऱ्याचा मोठा तुकडा चिमट्यात पकडून तो गॅसवर भाजते. त्या भाजत्या खोबऱ्याचा खमंग गंध सुटला की, गॅस बंद करून मी तोच चिमटा बेसिनमध्ये धरते आणि अंधूक झालेल्या ज्वाळेवर जोरजोरात फुंकर घालून ती विझवते. आग विझली की, नळाखाली तो तुकडा धरून हाताने हळूहळू चोळून काळेपण घालवते. मग तो तुकडा मिक्सरच्या भांड्यात ठेवते. सोललेल्या लसणाच्या ८-१० पाकळ्या, दोन तिखट हिरव्या मिरच्या, कोथिंबिर, आल्याचा मोठा तुकडा, दोन काळीमिरी, दोन लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा आणि वरून नावालाच पाणी घालते. मिक्सरवर वाटण करून घेतलं की, गॅसच्या शेजारी ठेवते. हे झाल्यावर मी सुरीने कांदे चिरते. गरम मसाल्याचे डबे, लसणाच्या आणखी काही पाकळ्या आणि चिरलेला कांदा मी हाताशी ठेवते. कूकर गॅसवर ठेवून गॅस पेटवते. थोड्या वेळाने मी तीन पळ्या तेल घालते. तेल गरम झालं की, त्याचा एक गंधही येतो आणि तडतड असा आवाजही येतो. मग, मी त्यात दालचिनीचा मोठा तुकडा, काळीमिरी, लवंग एकएकच घालते. गरममसाला त्यात तळला गेला की, एक गोडसर तिखट असा खूपच खमंग वास येतो. त्यावर लसूण ठेचून घालते. चर्रर्र... आवाज यायचा जरा कमी होतोयसं वाटलं की, त्यावर कांदा घालते. कांदाही छान नाद निर्माण करतो. लाल होताना त्याचाही मस्त गंध सुटतो. मग, त्यावर मी वाटण घालते. ते चमच्याने एकजीव करताना थोडंसं सुकतंयसं वाटलं की, त्यावर एक चमचा हळद, दीड चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा मीठ घालते. या प्रमाणात आता फरक पडत नाही. सवय झालेय मला. चमचे इकडचे तिकडे होऊ न देण्याची तेवढी काळजी घ्यायची बस्स! सगळं एकजीव झालं की, त्यावर चिकन घालून ते मी मंद आचेवर मिक्स करत राहते. रटरटचा आवाज हलकासा यायला लागला की, त्यात मी ग्लासाच्या मापाने पाणी घालते आणि मग, कूकर पुन्हा गॅसवरून उतरवून त्यावर झाकण घट्ट दाबून बसवते. तो पुन्हा गॅसवर ठेवून गॅस चालू करते आणि स्लो गॅसवर दोन शिट्ट्या घेते. खरंतर टोपातच शिजवलेलं चिकन मला आवडतं. पण, ते पर्फेक्ट शिजल्याचं मला नेमकं कळत नाही म्हणून मी कुकरचा पर्याय निवडला आहे.
हे सर्व मी करत असताना भरत पूर्णपणे ओजसला सांभाळत असतो. त्याच्यासोबत गार्डनमध्ये जाणं, घरात कधी क्रिकेट तर कधी चेस खेळणं तर कधी त्याच्यासोबत त्याचे प्रश्न सोडवणं असं सगळंच तो करतो. आम्ही हे एन्जॉय करतो, हेही तेवढंच खरं.
- अनुजा संखे 

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 12

एका गरजेतून निर्माण झालेलं नातं हेच पूर्ण सोसायटीमध्ये आम्हा दोघांची स्वतंत्र ओळख निर्माण करणारं एक प्रभावी माध्यम ठरलं. आमच्याशी थेट बोलायला कचरणारे, आमच्यासारख्या दृष्टीहीन व्यक्तींशी दुरान्वयानेसुद्धा काहीच संपर्क न आलेले इतर लोक आमची अश्विनीताईंकडे चौकशी करू लागले. मी कसं काम करते हा त्या सर्वांचा महत्त्वाचा प्रश्न असायचा. हेच काही प्रश्न तपशीलांसहित तुमच्यासोबत शेअर करायला मला आवडेल. मी सकाळी उठले की, स्वतःचं आवरायला लागते. अंघोळ, दात घासणं, ऑफिससाठी ड्रेस्ड अप होणं आणि नाष्टा करणं हा सकाळचा माझा भरगच्च कार्यक्रम असतो. आणि याच कार्यक्रमात पहिला प्रश्न निर्माण होतो. मी ड्रेस कसा निवडते? टॉप तर त्यांच्या निरनिळ्या डिजाईनमुळे, वेगळ्या प्रकारच्या कट्समुळे, त्यांवर असलेल्या शोच्या बटनांमुळे, कट्समुळे, गळ्यांच्या आकारामुळे कोणीही सहज ओळखू शकतं. पण, लेगइन्स बरोबर शोधून जोड तयार करणं हे कठिण जातं. सर्वसाधारणपणे लेगइन्स सारख्याच कापडाच्या असतात. जरी कापडात फरक असलाच तरी त्याच कापडाच्या एकापेक्षा जास्त लेगइन्स असतातच. अशात नुसतं स्पर्शावरून रंग ओळखणं अशक्य आहे. मी यावर मात्र तोडगा शोधून काढला आहे. इस्त्रीवाल्या भैयाला मी जोड तयार करून द्यायला सांगते. जर त्याला जमलं नाहीच तर सकाळच्या स्वयंपाकासाठी येणाऱ्या बाईला सांगून मी माझे कपडे रेडी करते. माझ्या चांगल्या व्यक्तीमत्त्वाचं मोठं श्रेय माझ्या चांगल्या पोषाखाला जातं. ते नीट असलेच पाहिजेत अशी सवय विकसित करणाऱ्या माझ्या मम्मी, पप्पा आणि दोन्ही भावांना. मला जी अडचण येते ती तेवढीशी भरतला येत नाही. पॅंट्स, जिन्स आणि शर्ट्स असा आटोपशीर पेहराव असल्याने आणि या प्रत्येक प्रकारात बटन, कापड, खिशांचे प्रकार, बक्कल यात असलेल्या वैविध्यामुळे तो आपले कपडे सहज निवडू शकतो.
दुसरं आव्हान असतं ओजसला सुखरूपपणे पाळणाघरात सोडणं. भरतच्या खांद्यावर अजूनही गाढ झोपेत असलेला ओजस आणि पांढरी काठी हातात घेऊन पुढे मी. भरत एका हातावर ओजसला घेऊन दुसऱ्या हाताने माझा हात पकडतो आणि आम्ही असंच चालत राहतो. एकट्याने चालणं काय किंवा बाळाला घेऊन दोघांनी चालणं काय टेक्निक एकच असलं तरी बाळ म्हटलं की, जरा अधिक काळजी, अधिक भिती आणि अधिक हळू चालावं लागतं. रस्त्यातले खड्डे, अधेमधे बसलेले किंवा झोपलेले कुत्रे, रस्त्याच्या कडेला लायनीत उभ्या केलेल्या मोटरसायकली, विजेचे किंवा आणखी कशाकशाचे खांब, एक ना दोन. किती अडथळे असतात मनात दाटलेले, साधं एक पाऊल टाकताना! यांपैकी कितीतरी गोष्टी इतर डोळस लोक नोटिससुद्धा करत नसतील. खरं सांगायचं तर हे अडथळे माहिती असले तरी प्रत्येक वेळी पाऊल पुढे टाकताना दृष्टीहीन असूनही मीही कधी यांचा फारसा विचार केला नव्हता. एकट्याने चालताना मुळात आपल्या काही लागलं तर? किंवा आपण पडलो तर?, वा कुत्र्यावर पाय पडून तो चावला तर? अशा प्रश्नांवर विचार करायला वेळ नसतो आणि त्याही महत्त्वाचं म्हणजे तसा विचार करायचा झालाच तर मीच काय कोणीही पूर्णतः दृष्टीहीन असलेली व्यक्ती कधीच एकटी चालू शकत नाही. पण, जेव्हा आपल्या खांद्यावर गाढ झोपलेलं आपलं छोटं बाळ असतं तेव्हा हे सगळे प्रश्न मनात मोठं चिन्ह लेऊन उभे राहतात आणि पावलागणिक विचार करायला भाग पाडतात.
खड्ड्यात पाय जाऊन झटका बसला तर तो उठणार, आपल्याला लागलं तर त्याला आपसूकच
मागे धक्का बसणार, कुत्र्यावर पाय पडण्याच्या भितीने आपणच आधी किंचळणार. मग कसं बिनधास्त चालवणार मला? या सगळ्या रिस्क तरीही असतातच. त्यात काळजी एवढीच की, जर तो उठला तर पाळणाघरात नको म्हणून रडेल. त्याची घालमेल आणि आपल्या जिवाचे हाल एवढं करूनही कधीतरीच टाळले जातात.
- अनुजा संखे 

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 11

आई झालं की, कसं वाटतं? असा प्रश्न माझ्या एका मैत्रिणीने विचारल्यावर, ओजस आल्यापासून माझ्या विचार करण्याच्या पद्धतीत काही बदल झालाय का, यावर मला जाणवलं आहे, या न त्या निमित्ताने मी सतत कोणावर तरी अवलंबून होते. अशी कितीतरी कामं होती, जी इतरांच्या मदती वा सल्ल्याशिवाय एकटीने करणं शक्य नव्हती. किंवा करणं शक्य असलं तरी करण्याची मोकळीक नव्हती. म्हणजे कोणाची तरी गरज असणं, हे माझ्यासाठी बंधनकारक होतं. अशा वेळी, आपलं दुसऱ्यावर अवलंबून असणं खूपच मानसिक क्लेश देणारं ठरतं.
अशात जेव्हा ओजस माझ्या मांडीवर आला आणि स्वतःहून दूध पिऊ लागला, तेव्हा मनात अगदी आत एका सुखाच्या भावनेचा जन्म झाला. जे मानसिक त्रास आजवर झाले होते, त्यांचं विसर्जन त्याच्या जवळ असण्याने, त्याला खरी माझी गरज असल्याच्या जाणिवेने झालं. त्याच्या लेखी आज मला जेवढं महत्त्व आहे, तेवढं अन्य कोणी कधीच दिलेलं नाही, या भावनेने मला पान्हा फुटला. आई मुलांच्या बाबतीत का एवढी पजेसिव असते, याचं मूळ सापडल्यासारखं झालं. त्याचं दिसामासाने वाढणं हे माझ्यासाठी अगदी नवीन होतं. भरतला त्याच्या भावांची तीन मुलं वाढताना जवळून बघता आल्याने तो थोडा तरी ट्रेन्ड होता असं म्हणता येईल. पण, मला त्याचा बिलकुलच अनुभव नव्हता. शेजाऱ्यांची मुलं असल्यावर कुठे आपल्याला त्यांचं काही करावं लागतं? खेळवण्यापुरतं आणलं की, झालं.
एक गंमत इथं सांगायलाच हवी. ओजस झाला. आणि आम्ही अजून हॉस्पिटलमध्येच होतो. भरत माझ्याजवळ असल्याचं पाहून मम्मी आणि आई दोघी चहा प्यायला आणि पाय मोकळे करायला म्हणून खाली गेल्या. ओजस माझ्या मांडीवर पहुडला होता. भरतने आपल्या हातात त्याचा हात धरून ठेवला होता. आम्ही गप्पा मारत होतो. अचानक ओजसने तार सप्तकातला सूर लावला. मी तोपर्यंत एकट्याने, त्याला उचलायलाही शिकले नव्हते. भरतला सांगून बघितलं, तर त्यालाही एवढ्या लहान बाळाला कसं उचलायचं, ते माहित नव्हतं. एकूण काय तर कोणीही असं नव्हतं, ज्याला आम्ही विनंती करून बाळाला उचलून घेऊ शकलो असतो. त्याचं रडणं तर मिनिटामिनिटाला वाढतच होतं. आम्ही खूपच घाबरलो. दोघांच्याही डोळ्यात पाणी आलं. पण, त्याला शांत करणं काही जमलं नाही. मम्मीच्या फोनवर भरतने फोन केला आणि बाळ खूप रडतंय, तर तुम्ही लगेचंच वर या, असंही सांगून टाकलं. मम्मी आणि आई फूल टेन्शनमध्ये वर आल्या आणि पाहतात तर काय की, ओजस, मी आणि भरत तिघंही घळघळा रडतोय. मम्मीने त्याला उचललं. त्याच्या मानेखाली माझा हात सरकवला आणि दुधाशी नेलं. त्याने एकही क्षण न दवडता चुटुक चुटुक दूध प्यायला सुरुवात केली. मम्मी नंतर खूप ओरडली. आणि त्या दोघी आम्ही रडतोय म्हणून हसतसुद्धा होत्या. हे आणखी वेगळंच! आज ही गोष्ट आठवली की, खूप हसू येतं पण, रडत्या बाळाला घेता न येणं हे कुठेतरी मनात टोचलंच!
तो दहा महिन्यांचा झाला आणि आम्ही एकट्याने संसाराची जबाबदारी घेतली. ऑफिसचा पहिला दिवस अजून स्पष्ट आठवतो. आदल्या दिवशी पाळणाघर शोधून, त्या ताईशी सगळं ठरवून आम्ही घरी आलो. दुसऱ्या दिवशी तयारी करून, झोपेतल्या ओजसला भरतने खांद्यावर घेतलं आणि मी आमची पांढरी काठी हातात घेऊन पुढे चालत पाळणाघरात गेलो. ताईच्या हातात, तान्ह्या ओजसला देताना गळा दाटून आला होता. त्याला तिची कणभरही ओळख नव्हती. पण, ती आपल्या आश्वस्त स्वरात मला समजावत राहिली. मी मन घट्ट केलं आणि तिच्याकडे पाठ फिरवली. सकाळी ८ वाजता सोडलेल्या ओजसला मी थेट संध्याकाळी सव्वा पाचला मांडीवर घेतलं. मी आले, तेव्हाही झोपेतच होता पण, कसं कोण जाणे त्याने मला ओळखलं. तो सताड डोळे उघडून माझ्याकडे दोन क्षण बघत राहिला आणि रडायला लागला. त्याला शांत करताना मीही रडतच होते. त्याला लगेच छातीशी घेतलं आणि पुन्हा पुन्हा भरून येणारे डोळे पुसत राहिले. लबाड! तोंडावरची ओढणी बाजूला करून ताईकडे पाहून हसायलाही लागला होता. दुसऱ्या दिवशीही याच प्रकाराची पुनरावृत्ती झाली आणि संध्याकाळी बेफाम तापाने ओजस अक्षरशः फणफणला.
नव्या घरात येऊन नुकतेच दोन चार दिवस झालेले. कोणाशीच ओळख नाही. मम्मीला बोलवावं तर तिला एवढ्या रात्री ताबडतोब निघून ये सांगणं म्हणजे तिला प्रचंड मानसिक ताण दिल्यासारखं होणार होतं. बाळाला एवढा ताप असला की, त्याला ओल्या कपड्याने पुसून घ्यावं एवढंही आम्हाला माहित नव्हतं. काय करावं ते कळेना. शेवटी शेजारच्यांचा दरवाजा ठोठावण्याशिवाय पर्याय नाही हे कळून चुकलं. बाळाचे तर डोळेही उघडत नव्हते. अत्यंत घाबऱ्याघुबऱ्या मी समोरच्या काकडे कुटुंबियांचा दरवाजा वाजवला. इथपासूनच माणुसकीच्या नात्याने मदतीला म्हणून आलेल्या अश्विनीताईंसोबत कायमचे, मनाच्या कुपीत हळूवारपणे जपून ठेवावेत असे ऋणानुबंध निर्माण झाले.
 - अनुजा संखे

Tuesday, 20 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -10

लग्न झालं आणि मी संपूर्णतः वेगळ्या प्रकारच्या वातावरणात आले. सासरकडच्या वागण्याबोलण्याच्या पद्धतींपासून ते जेवणाखाण्याच्या सवयीपर्यंत सर्वच तऱ्हा निराळ्या होत्या. जुळवून घेणं सुरू झालं ते पहिल्या दिवसापासूनच. घरातली सगळी कामं सुरुवातीला मी करायचे पण, त्यांची सवय नसल्याने ती कसलेल्या गृहिणीप्रमाणे तंतोतंत होत नसत. सासूबाईंना हे आवडत नसे. एकदोनदा मला त्या यावर रागावल्या. मग मी माझ्या स्वभावाप्रमाणे स्पष्ट सांगून टाकलं की, आई, मी लग्नाआधी ही कामं कधीच केली नव्हती. पण, मी केलेलं काम जर तुम्हाला आवडत नसेल तर पुन्हा कधीच करणार नाही. आणि खरोखरच तेव्हापासून मी झाडू मारणं आणि लादी पुसणं ही दोन्ही काम करणं बंद केलं. आईंनीही मला ती पुन्हा कधीच करू दिली नाहीत आणि हे सारं प्रेमाने आणि समजुतीने झालं हे विशेष. त्या माझं खूप करायच्या. अगदी पाण्याचा ग्लास हातात आणून द्यायच्या. सुरुवातीला मला हे छान वाटायचं. पण, मी नोकरी करत नसल्याने सतत काहीच न करता घरात बसून राहणं अंगावर यायला लागलं. मी किचनमध्ये काम करता यावं म्हणून प्रयत्न करू लागले. पण, आईंना ते आवडलं नाही. त्यांनी मला किचनमध्ये काम करायला प्रोत्साहन दिलंच नाही. त्यांना खूप भिती वाटायची की, मी गॅस कसा चालू करणार? चटका लागला तर? आणि मी स्वयंपाक बनवला तरी तो कसा असेल चवीला? हे प्रश्न बहुधा त्यांना पडत असावेत. काही का असेना पण, माझी किचनमध्ये लुडबूड करण्याची हौस मात्र विरत चालली होती. त्यांचं मन नेटकेपणाने वळवण्याचा मी आणि भरतने खूप प्रयत्न केला. पण, ते काही सहजासहजी शक्य झालं नाही.
माझ्या गर्भारपणात गावाला अचानक काहीतरी तातडीचं काम निघालं आणि आईपप्पांना तिथे जावंच लागलं. तेव्हा मी आनंदाने सर्व जबाबदारी घेतली. त्यांना जायला सांगितलं. कितीतरी दिवसांनी मी किचनमध्ये येत होते. मला बाकी कामांची आवड नसली तरी स्वयंपाकाची आवड होती. त्यामुळेच थोडंफार बनवायलाही शिकले होते.
पण, आई गेल्यावर जेव्हा लायटर हाती धरला आणि गॅस चालू करण्याची वेळ आली तेव्हा माझा हात भितीने थरथरत होता. मी कसाबसा गॅस चालू केला आणि पोहेच बनवले. या घटनेने मला विचार करायला भाग पाडलं की, मी माझ्या आत्मविश्वासाची किंमत चुकवून एकत्र कुटुंब टिकवून धरलं पाहिजे का? प्रश्न एवढा कठिण होता की, एकटीने तो सॉल्व होणार नाही हे मला कळून चुकलं. भरतशी एक मित्र म्हणून जे काही वाटतंय ते स्पष्टपणे बोलायचं असं ठरवलं. संध्याकाळी भरत ऑफिसमधून आल्यावर ही बाजू पटवून सांगितली आणि त्याला बिनदिक्कतपणे ती पटली. आम्हा दोघांचा स्वतंत्र संसार हाच यावर उपाय असू शकतो असं आम्हा दोघांचं एकमत झालं आणि योग्य वेळ येताच यासंदर्भातला आपला निर्णय मोठ्यांना सांगायचा असंही आम्ही ठरवलं. हा निर्णय घेणं तितकंसं सोपं नव्हतं. दोन्ही घरच्या प्रत्येक नातेवाइकाच्या ‘आम्ही सर्व करू शकतो’ हे गळी उतरवावं लागलं. आनंदाने मुळीच नाही पण, आमच्या हट्टाने सर्वांनी ते मान्य केलं. यातच ओजसचा जन्म झाला आणि तो थोडा मोठा झाल्यावर वेगळा संसार मांडायचं आम्ही ठरवलं.
बाळ आपलं भविष्य सुरक्षित करून आल्यासारखंच आमच्या जीवनात आलं. मला एका बॅंकेत क्लर्कची नोकरी मिळाली तर भरत ऑफिसर म्हणून दुसऱ्या बॅंकेत रुजू झाला. दोघांच्या बॅंकेतल्या नोकऱ्यांनी स्वतःचं घर असावं या स्वप्नाला धुमारे पुटले. ओजसचा पहिला वाढदिवस स्वतःच्या घरातच व्हावा असं ठरवून आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. स्वतःचं घर होईपर्यंत आम्ही एकत्रच राहिलो. घराचा ताबा मिळाला आणि दहा महिन्यांच्या ओजसला घेऊन मी आणि भरत दोघंच फ्लॅटवर दाखल झालो.
नोकरी सांभाळून संसार करण्याला मम्मी तारेवरची कसरत का म्हणत होती ते पहिल्या दिवशीच कळलं. ओजसची आजारपणं, स्वयंपाक करणं, कपडे, भांडी आवरणं, एक ना दोन. जी काम दोन वर्षाच्या संसारात केलीच नाहीत ती एकदमच अंगावर आली. मी आणि भरतने सगळी कामं वाटून घेतली आणि ती करू लागलो. आजही कपडे मशिनला लावणं, वाळलेले कपडे काढून त्यांच्या घड्या घालणं आणि धुतलेले वाळत घलणं हे काम भरत करतो. मी, स्वयंपाक आणि भांडी कधीतरी. मला बरं नसलंच तर किंवा कधी एकट्यानेच रहायची वेळ आलीच तर भरतला स्वतः पुरतं अन्न शिजवता यावं या हेतूने मी त्याला खिचडी, मॅगी, चहा आणि कॉफी हे पदार्थही
बनवायला शिकवले आहेत. आता खूप आव्हानं, जबाबदारी आणि त्यासोबतच येणारी टेन्शन्स आहेत. पण, एकमेकांशी वागण्यातला मोकळेपणा, ओजसला वाढवण्यातलं स्वातंत्र्य आणि मनानेच काहीबाही कॉंबिनेशन करण्याची मोकळीक या बदल्यात आम्हांला मिळालंय हे काही कमी नाही.
 - अनुजा संखे

Saturday, 17 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -9

मी शिक्षण व्यावसायिक पद्धतीने घेतलं असलं, तरी नोकरी मिळणं तितकंसं सोपं नव्हतं. अनेक वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांनी माझ्या नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी करण्याच्या निर्णयाचं खूप कौतुक केलं. पण, पूर्ण वेळ पत्रकार म्हणून नोकरी द्यायची हिंमत कोणीही दाखवली नाही. तिथं माझं अंधत्वच आड आलं. पण, तरीही कधी या वाहिनीवर तर कधी त्या वृत्तपत्रातून इन्टर्नशिप करत मी अनुभव मिळवत राहिले.
हा खटाटोप चालू असतानाच पीजी डिप्लोमा इन मिडिया ऍंड डिसेबिलिटी कम्युनिकेशन या कोर्ससाठी माझी निवड झाली मी पुन्हा पूर्णवेळ विद्यार्थिनीच्या भूमिकेत शिरले. याच डिप्लोमाच्या आधारे मला बंगलुरूमधल्या एका फंडिंग एजन्सीमध्ये नोकरीची सुवर्णसंधी मिळाली असं म्हणता येईल.
भारतातल्या निरनिराळ्या राज्यातल्या ग्रामीण भागातल्या एनजीओंना फंड देऊन त्यांकडून त्यांच्या कार्यक्षेत्रातल्या अंधअपंगांसाठी काम करवून घेणं असा फंडिंग एजन्सीचा उद्देश. मी प्रोग्रॅम ऑफिसर म्हणून २०१३ च्या जानेवारीत रुजू झाले. आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने आणि माझ्यामागे ठामपणे उभं असण्याच्या जाणिवेने, बंगळूरूसारख्या सर्वस्वी भिन्न असलेल्या शहरात आत्मविश्वासाने एकटी वावरू शकत होते, त्या माझ्या पप्पांना मे महिन्यात, काळाने कायमचं हिरावून नेलं. पप्पांचं नसणं हे मी समजूच शकत नव्हते. म्हणजे पप्पांच्या नंबरवर फोन करायचा आणि पुन्हा पप्पा कधीच ‘हॅलो बेटा’ म्हणणारंच नाहीत हे समजण्यापलीकडचं होतं माझ्यासाठी. त्यांना कधीच भेटता येणार नाही हे तर स्पष्टच होतं. पण, इतरांप्रमाणे, मी त्यांना फोटोंमधूनही पाहू शकणार नसल्याची जाणीव अक्षरशः जीवघेणीच होती.
आम्हा पाच जणांच्या कुटुंबात माझं अंधत्व आणि त्यामुळे भावनाप्रधान असलेलं मन समजू शकणारे माझे पप्पाच गेले होते. परत कधीच न येण्यासाठी. “हिच्या जागी आपली डोळस मुलगी असती आणि जर तिला उच्च शिक्षणानंतर बाहेरगावी नोकरीनिमित्त जावं लागलं असतं, तर? तर, आपण तिला थांबवलं असतं का?” त्यांनी मम्मीला विचारलेल्या एका प्रश्नानेच माझं भविष्य साकारू शकणाऱ्या नोकरीत रुजू होण्यावर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यामुळेच की काय, कोण जाणे! त्यांच्या जाण्यानंतर मी त्या नोकरीत रमूच शकले नाही.
बंगलोरला आले आणि पप्पा कायमचे दुरावले ही जाणीव सतत मन कुरतडत राहायची. मी कसंबसं एक वर्ष पूर्ण केलं आणि नोकरी सोडून पुन्हा बोइसरला आले. याच काळात भरतला बॅंकेत नोकरी लागली आणि आमच्या लग्नाचं घरच्यांनी मनावर घेतलं. घरात कोणाचा मृत्यू झाला की, वर्षभरात लग्न करावं यावर दोन्ही घरच्यांचं एकमत झालं. २०१४ च्या फेब्रुवारीत आमचं लग्न झालं आणि कॉलेजपासूनच्या आमच्या प्रेमाला एका सुंदर नात्याचं कोंदण मिळालं. त्यावेळच्या अवस्थेचं वर्णन सुखदुःखाचा मिलाफ असं करता येईल.

 - अनुजा संखे

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 8


बारावीतच पुन्हा एकदा, पुढे काय या प्रश्नाने मला वेढलं. साधं सरळ बीए न करता काहीतरी विशेष करावं, असं मला वाटत होतं. पत्रकारितेच्या क्षेत्रात आपल्याला नक्कीच काहीतरी करता येईल असं वाटलं. बारावीच्या परिक्षेनंतर बीएमएम कोणकोणत्या कॉलेजेसमध्ये आहे ते शोधून काढलं आणि त्याच्या प्रवेशपरिक्षेचा अभ्यास सुरू केला. खरं तर, मला प्रवेशपरीक्षा ही संकल्पनाच स्पष्ट झाली नव्हती. मी करंट इशूजचा खूप सखोल अभ्यास केला. पण, जनरल नॉलेजचा काहीच अभ्यास केला नाही. तो करावा लागतो, हे मा्हीतही नव्हतं आणि त्याबद्दल मार्गदर्शन करू शकेल असंही कोणी नव्हतं. ठरवल्याप्रमाणे लेखनिकाच्या मदतीने परीक्षा दिली पण, आवश्यक असलेल्या मेरिटमध्ये आले नाही. माझा नंबर एसआयईएस कॉलेजच्या बीएमएमसाठी लागला होता. पण, रुइया सोडण्याची इच्छा झाली नाही. कदाचित, मी होऊ घातलेल्या बदलाला तयार नव्हते हेच खरं.
बीएमएमच्या नादात मी बीएला ऍडमिशन घेऊन ठेवावं ही साधी गोष्टही विसरून गेले होते. इथे बीएमएमची लिस्ट लागली आणि त्यात माझं नावच नाही म्हटल्यावर मी अक्षरशः घाबरले. कारण, बीएची ऍडमिशन बंद झाली होती. मी आमच्या उपप्राचार्या वत्सला पै यांच्याकडे गेले आणि माझी सर्व हकिकत सांगितली. त्यांनी विशेष तरतूद करून मला बीएला प्रवेश दिला. पण, तरीही पत्रकारितेत करिअर करण्याचा किडा मात्र वळवळतच राहिला.
मी मुंबई मराठी पत्रकार संघाची माहिती काढली आणि तिथे जाऊन आले. तिथल्या सरांना भेटल्यावर आणखीच हुरूप आला आणि तो सहा महिन्यांचा कोर्स मी पूर्ण केला.
बीए उत्तीर्ण झाल्यावर मधल्या सुट्टीत मी एमएसीजे या मुंबई विद्यापीठातून चालणाऱ्या प्रोफेशनल कोर्सची माहिती मिळवली. विद्यापीठात फोन करून पत्रकारिता आणि संज्ञापन विभागाचे प्रमुख संजय रानडे यांच्याशी संपर्क साधला. यांचा उल्लेख इथं अनिवार्यच आहे. कारण, मी संपूर्णतः दृष्टीहीन असून माझी पत्रकार होण्याची इच्छा सांगितल्यावर कोणतीही नकारात्मक प्रतिक्रिया न देता त्यांनी मला “तुम्ही नक्कीच पत्रकारितेचा अभ्यास करू शकता, फक्त जिथे विडियो प्रोडक्शन करावं लागतं त्याऐवजी तुम्ही असाइनमेन्ट्समध्ये काय करू शकता याचा मला जरा विचार करू द्या. तुम्ही उद्या भेटायला येऊ शकता का?” असं विचारलं. मी ठरल्याप्रमाणे गेले, तर सरांकडे माझ्यासाठीचा पूर्ण प्लॅन डिजाइन केलेला होता. त्यांनी सर्व विषयांची माहिती दिली आणि व्हिडीओ प्रोडक्शनच्या बाबतीत सर काय म्हणताहेत याकडे माझं लक्ष लागलं. ते म्हणाले, "असाइनमेन्टमध्ये दृक्-श्राव्य माध्यमांचा वापर होईल अशा जाहिराती आणि शॉर्ट फिल्म तयार कराव्या लागतात. तू शुटिंग तर करू शकणार नाहीस. पण, त्यामागचं तंत्र समजून घेता येईल. शिवाय, रेडिओसारख्या श्राव्य माध्यमासाठीचे कार्यक्रमही तुला बनवता येतील". मी त्यांच्या या तोडग्याने खूपच प्रभावित झाले. त्यांच्या हातात मला प्रवेश नाकारण्याचा पूर्ण अधिकार होता. तरीही, माझं अंधत्व हे पत्रकारितेमध्ये अडसर ठरू शकत नाही, हे त्यांनी फक्त सहकारी शिक्षक किंवा विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर खुद्द मलाही पटवून दिलं. त्यांच्या एका ठाम निर्णयाने मी पत्रकारिता आणि संज्ञापन या विषयात एमए करू शकलेे. असं करणारी मी पहिली अंध विद्यार्थिनीही ठरले. 

- अनुजा संखे

Friday, 16 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -7

दहावीत असतानाच, पुढे काय करायचं, असा प्रश्न मनात येई. पण, तेव्हा काहीच सुचायचं नाही. मोठे विचारायचे, त्याला उत्तर एकच. कॉलेज करायचं. मी चांगल्या गुणांनी दहावी उत्तीर्ण झाले. आणि माझ्या शाळेपासून जवळ असलेल्या रुइया महाविद्यालयात दाखल झाले. शाळेच्या छोट्या, मर्यादित आणि बंदिस्त जगातून बाहेर पडण्याची संधी म्हणजे हे कॉलेजजीवन होतं. आठवी ते दहावी जरी आम्ही सरस्वती हायस्कूल, नायगाव या डोळस मुलांच्या शाळेत जात असू. तरीही डोळस मुलांमध्ये वावरणं तेवढंसं शक्य व्हायचं नाही.
‘या मुलींना कसं दिसत नाही’! असं आश्चर्य मुलांना सतत असायचं. शाळेत मुलं आणि मुली वेगळे बसत. खूपच कमी मुली दृष्टीहीन विद्यार्थीनींशी मैत्री करण्याची इच्छा असणार्‍या. खरं तर, दृष्टीहीन विद्यार्थिनींना जवळ घेऊन बसा म्हणून प्रत्येक वेळी त्यांना सांगावं लागे. माझी दोघीतिघींशी छान मैत्री झाली होती. त्या मला माझ्या कविता देवनागरीत लिहून द्यायच्या अशी आठवण मी जपून ठेवली आहे. शाळेच्या अशा वातावरणातून कॉलेजमधल्या मोकळ्या वातावरणाला सरावण्यातच वर्ष गेलं.
माझ्या शाळेत जरी एकट्याने चालायला शिकवलं असलं तरी पहिल्याच दिवशी एकटीने घरी येताना उडालेली धांदल शब्दात सांगण्यासारखी खचितच नाही. हा एकटेपणा वर्गात लेक्चर्स अटेंड करताना खूपच अंगावर यायचा. प्राध्यापक वर्गात आले की, त्यांच्या विषयावर काहीतरी बोलत आणि प्रत्येकाला आपल्या परिचय देण्यास सांगितलं जाई. आम्ही जेवढे म्हणून दृष्टीहीन विद्यार्थी वर्गात असू तितक्यांना सर्वात पुढल्या बाकावर बसवलं जात असे. गंमत अशी की, कमी मुलं वर्गात असली की, ती एकदम मागचे बेंच पकडून बसत असत पण, आम्ही मात्र पहिल्याच बेंचवर बसायचं हा नियम होता. हा ना कोणत्या प्राध्यापकांनी घातलेला पायंडा होता ना एखादा नियम पण, चोख बजावला जायचा. त्यामुळे इतर डोळस विद्यार्थ्यांशी मैत्री करण्यात अडचण यायची. क्वचितच कोणी स्वतःहून बोलायला आलं तर...!
राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास यांसारख्या विषयांसाठी नेमलेली पुस्तकं ब्रेलमध्ये उपलब्ध करून घेणं, हे खूपच जिकिरीचं असायचं. मग, सगळा अभ्यास प्राध्यापकांनी दिलेल्या नोट्सवर अवलंबून. वर्गातली अशी कोण व्यक्ती असेल, जी आपल्याला नोट्स देऊ शकेल? याचा शोध
घ्यावा लागे. मग, विनंती करून जर नोट्स मिळाल्याच तर त्या रेकॉर्ड करायला किंवा ब्रेलमध्ये लिहून घेता याव्यात, म्हणून एखादी वाचून दाखवणारी व्यक्ती शोधावी लागे. त्यांच्या वेळा आणि आपल्या वेळा सांभाळत हे काम करताना एवढा वेळेचा अपव्यय व्हायचा की, अभ्यास करणं नकोसं व्हायचं. नोट्स मिळवा, मग त्या कोणाला तरी वाचून दाखवायला सांगा. मग त्या ब्रेलमध्ये लिहा. एका वेळेत जे डोळस विद्यार्थ्यांना उपलब्ध होत होतं तेच आम्हाला तिप्पट वेळ मोजून करावं लागत होतं.
आता मात्र बरेच पर्याय आहेत. पुस्तकंच्या पुस्तकं स्कॅन करून ती सरळ ब्रेलमध्ये प्रिंट करून घेता येतात. जे मोबाईल किंवा कम्प्युटर वापरतात, त्यांना पीडीएफ कॉपी मिळाली की, ते स्क्रिन रिडर सॉफ्टवेअरच्या मदतीने वाचू शकतात. तरीही इतर विद्यार्थ्यांची आणि वाचकांची गरज अधूनमधून भासतेच.
आमच्या ‘सेल्फ विजन सेंटर’तर्फे ब्रेल लिपीचे जनक लुई ब्रेल यांच्या जयंतीनिमित्त मोठा, भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रम केला जातो. याचं आयोजन सेंटरमध्ये येणारे दृष्टीहीन विद्यार्थी करतात. सूत्रसंचलनापासून ते नृत्य, गायन, नाटक, कविता सादरीकरण, कथाकथनापर्यंत सर्व प्रकार आयोजित करण्याबरोबरच सादरही हीच मुलं करतात. माझ्या कॉलेजजीवनाची पाचही वर्षं मी ब्रेल डेच्या कार्यक्रमात सहभागी झाले आणि स्टेज फिअरवर मात करण्याचा पुन्हा पुन्हा सराव होत राहिला.
- अनुजा संखे

Tuesday, 13 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं -6

अजाणत्या वयात अंधत्व आल्याने, माझ्याप्रमाणेच बहुसंख्य मुलांना आईवडिलांची ऊब, भावंडांसोबतचं प्रेम आणि तक्रारींनी भरलेलं आयुष्य, आपल्या नातेवाईकांच्या आपले-तुपलेपणाच्या भावना आणि यातून निर्माण होणारी एक सुरक्षिततेची जाणीव यांपासून जाणीवपूर्वक वेगळं राहून, भविष्य साकारावं लागतं. आपल्या पायावर उभं राहण्यासाठी, कौटुंबिक संरक्षक कवच गमवायला लागतं. ही पहिली किंमत लहान वयातच द्यावी लागते. नकळत्या वयातच आपल्या बरोबरीची आपल्यासारखीच मुलं आणि सर्वाशी सारख्याच ओलाव्याने आणि दुराव्याने वागणाऱ्या आयांभोवती, आम्हा जेमतेम सहा सात वर्षांच्या मुलींचं जग गुंफलं गेलं होतं. चूक केल्यावर ओरडा चुकला नाही. आणि चांगलं केल्यावर कौतुक मिळालंच, असंही प्रत्येक वेळी झालं नाही.
नकळत आपण घरापासून दूर राहतो आहे ही जाणीव तीव्र होत गेली. आणि आपण घरी आल्यावर प्रत्येकाचं आपल्याकडे लक्ष असावं अशी इच्छा मूळ धरू लागली. घरी आल्यावर पूर्वीप्रमाणे बाहेर हुंदडणं शक्य होत नसे. मग करमणुकीचं साधन म्हणजे टीव्ही. या माध्यमाचं आकर्षण माझ्याप्रमाणेच इतर मुलांनाही होतंच. त्यांचंही आमच्यासारखं वेळी अवेळी बाहेर फिरणं बरंच कमी झालं होतं. याचा परिणाम म्हणजे आम्हा भावंडांची भांडणं. आतासारखे तेव्हा कार्टून दाखवणाऱ्या चॅनल्सची रेलचेल नसायची. पण, एकदोन चॅनल्स होतेच. माझ्या भावांना नेहमीच कार्टून पहायचं असे तर मला शब्दप्रधान कार्यक्रम पहायचे असतं. कार्टून हे ऐकण्यापेक्षा पाहण्याच्या प्रकारात मोडत असल्याने त्यातून माझं मनोरंजन होत नसे. यावरून त्यांचं आणि माझं सतत भांडण आणि बेबनाव व्हायचा. ही शाळेत असते तेच बरं, असंही ते एकदोनदा बोलले आहेत. त्यावेळी खरं तर मम्मीपप्पांनी मला ओरडा दिला. पण, मनात निर्माण झालेली ही भावना धोक्याची एक सूचनाच होती. माझं माझ्या, कुटुंबापासून हळूहळू विलग होणंच सूचित करणारी.
मला घरी आल्यावर इतरांकडे जायला आवडत नसे. व्हायचं काय की, भाऊ लहान असल्याने मम्मीचं अधिक लक्ष त्यांच्यामध्ये असायचं. पप्पा त्यांच्या वेळीअवेळी ड्युटीला जावं लागण्याने वाट्याला खूपच थोडे यायचे. त्यात जर काका-मामांकडे जावं लागलं तर मम्मी सगळ्यांना भेटण्यात गर्क होऊन जायची. आणि मला एकटेपणाची भावना घेरून राहायची. त्या एकटेपणाविषयी, तेव्हा स्पष्ट करून सांगणं मला शक्य होत नव्हतं. किंवा ते न सांगता समजून घेण्यासारखंही नव्हतं. मी सतत मम्मीच्या मागे फिरायचे आणि आपल्या घरी चल म्हणून रडत राहायचे. करमायचंच नाही मुळी. काका-मामाच्या मुलींनाही सांगितल्याशिवाय माझ्यासोबत खेळण्याची इच्छा नसे. अशात तिथं वाट्याला येणारे दोन दिवस घालवावेत ही कल्पनाच असह्य होत असे.
माझं रडणं, घरी चल म्हणून भुणभुण लावणं मम्मीलाही वीट आणत असेल ना? तिनेही ही शाळेतच बरी असा विचार केला असेल का कधी? याचं उत्तर जाणून घेण्याची हिंमत माझ्यात नाही, हे प्रांजळपणे कबूल करते. कारण असा विचार येणं स्वाभाविक आहे असं मलाच वाटतं. 

 - अनुजा संखे

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 5

माझ्या शाळेबद्दल जितकं लिहावं, तितकं कमीच. मोठी दूरदृष्टी ठेवून तिने आम्हा मुलींना घडवण्याचा प्रयत्न केला. मी इतर उपक्रमांबद्दल सांगितलंच आहे. पण, सर्वात स्तुत्य उपक्रम म्हणजे आपल्या दृष्टीहीन मुलींना बाहेरच्या जगाची, त्याच्या अंधत्वाकडे पाहण्याच्या दृष्टीकोनाची जाणिव करून देणं. मुलींना शक्य तितकं सक्षम करणं, हेच शाळेचं मुख्य धोरण. याचसाठी आमची शाळा सातवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण झालं की, मुलींना डोळस मुलांच्या शाळेत पाठवत असे.
“Inclusive Education” म्हणजे सर्वसमावेशक शिक्षण पद्धती. ही संकल्पना समाजात मूळ धरण्यापूर्वीपासूनच दृष्टीहीन विद्यार्थीनींना जवळच्या सरस्वती हायस्कूल, नायगाव या शाळेत पाठवलं जायचं. या शाळेत पाठवण्यामागचा उद्देश असा की, मुलींच्या मर्यादित, बंदिस्त आणि अतिशय सुरक्षित वातावरणातून त्यांना खऱ्या जगाची ओळख व्हावी, जेणे करून महाविद्यालयात गेल्यावर सगळंच अगदी नवीन नसावं. मुलींना डोळस व्यक्तींमध्ये व्यवस्थित वावरता यावं. खरंच, किती दूरदृष्टी होती शाळेकडे!
याच शाळेत विद्यार्थीच नव्हे, तर कितीतरी असे शिक्षक होते, ज्यांना अंध व्यक्तींशी कसं बोलावं वा वागावं याची कल्पना नव्हती. जसजशा, दरवर्षी दृष्टीहीन विद्यार्थिनी वाढत गेल्या, तसतशी त्यांची सर्वांना सवय झाली. शिवाय, नृत्य आणि गायन प्रकारात या मुलींना असलेली गती हेसुद्धा कुतुहलाचं कारण बनलं होतं.
पुढे पुढे तर वार्षिक स्नेहसंमेलनासारख्या भव्य सोहळ्यात या दृष्टीहीन विद्यार्थिनींचा सहभाग अनिवार्य झाला. या माझ्या शाळेची अगदी ठसठशीत असलेली आठवण म्हणा किंवा मला लाभलेली देणगी म्हणा. “अभ्यास जत्रा.” खूपच मनोरंजक आणि आव्हानात्मक असा हा उपक्रम. त्यावेळचे मुख्याध्यापक शशिभूषण गव्हाणकर यांच्या बाबांनी सुरू केला होता. सरांचे बाबा म्हणून आम्हा सर्वांचेही बाबाच. या जत्रेत प्रत्येक वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना दोन तीन जणांच्या गटात विभागलं जाई. प्रत्येक गटाकडे विषय ठरवून दिले जात. इतिहासाचा गट एखादी घटना अभिनयातून समजावून देई. तर विज्ञानाचा गट छोटे मोठे प्रयोग करून दाखवत असे. मराठी, हिंदी आणि इंग्रजी या भाषांचे गट अभ्यासेतर कविता बोलून दाखवत. त्यांचे अर्थ स्पष्ट करणारे पोस्टर्स बनवत. यात उत्साह वाढत होताच शिवाय इतर
शाळांच्या शिक्षकांनी केलेलं कौतुक आणखीच आत्मविश्वास वाढवून जायचे. बरेचदा, बाबा स्वतः येऊन काही प्रश्न विचारत. त्यांचा आवाज ओळखलाच, तर हसून उत्तरं देत असू आम्ही. पण, जर का ते पाहुण्यांसोबत असले, तर मात्र नीट समजावून आपलं पोस्टर दाखवत असू. खरंच, काय मिळालं बरं मला या प्रकारच्या उपक्रमातून? ही शाळासुद्धा तितकीच माझी आहे, जितकी माझी कमला मेहता ही जाणीव या जत्रेने करून दिली पहिल्यांदा.
अनोळखी लोकांसमोर एखाद्या विषयावर धीटपणे कसं बोलावं, हेही प्रात्यक्षिक इथेच झालं. आणि, इतर विद्यार्थ्यांचा दृष्कोिन बदलला. या मुलींनाही आपल्यासारखाच अभ्यास असतो आणि त्याही मेहनत करून चांगलं प्रेजेंटेशन करू शकतात. हे इतर डोळस मुलांना कळलं आणि काही मुलींनी स्वतःहून मैत्री करायला सुरुवात केली. मी मला सिद्ध करू शकले, या उपक्रमामार्फत, हेच खरं. आता तिथे म्हणे ‘अभ्यास जत्रा’ भरत नाही. मुलांना स्वतःतल्या उणिवांवर मात करून त्यांना जमेच्या बाजूमध्ये बदलू शकणारी जत्रा बंद? या पेक्षा खेदाची बाब नव्हे.
- अनुजा संखे

Saturday, 10 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 4

माझ्या भविष्यकाळाबद्दल रंगवलेली स्वप्न पूर्ण होऊ शकतात, हा विश्वास मम्मीपप्पांमध्ये डॉक्टर जयेश यांनी निर्माण केला. दादरच्या कमला मेहता अंध मुलींच्या शाळेत मला घातलं. आणि माझ्या सर्वांगीण विकासाबद्दल असलेल्या त्यांच्या आशा आणखीनच पल्लवित झाल्या. पहिलीच्या वर्गात माझा प्रवेश झाला. माझ्यासारख्याच आणखी दहा जणी त्या वर्गात होत्या.
तो दिवस मला अजून आठवतो. २५ जुलै १९९४ रोजी माझी ऍडमिशन झाली. शाळेचा तिसरा तास चालू होता. आणि अनिताताई वर्गाला ब्रेलवाचन शिकवत होत्या. त्या वर्गात काय शिकवत आहेत, ते त्यांनी मला लक्ष देऊन ऐकायला सांगितलं. ते ऐकून नंतर क्रमाने त्यांना बोलूनही दाखवलं. माझ्या अचूक सांगण्याने त्या खूपच प्रभावित झाल्या. लगेच त्यांनी मला ब्रेल वाचायचं शिकवायला सुरुवात केली. देवनागरी लिहिताना मुलांना बाराखडी प्रथम शिकवली जाते. तसंच ब्रेललेखन वा वाचन शिकवताना प्रथम विशिष्ट टिंबांच्या समुहावरून बनलेल्या अक्षरांचे गट तयार केलेले असतात, तेच शिकवलेही जातात.
मला पहिल्याच दिवशी अ, ब, ल, क हा गट शिकवला. एका मोठ्या गॅपनंतर तीच अक्षरं मला ओळखायला लावली. मी ती बरोबर ओळखली आणि अनिताताईंनी माझ्याकडे व्यवस्थित लक्ष पुरवायला सुरुवात केली. त्यांच्या आणि मंजिरीताईंच्या विशेष शिकवण्यामुळे मी आठवडाभरातच ब्रेल लिहाय-वाचायला शिकले. शाळा खूपच व्यावहारिक होती असं म्हणता येईल. क्रमिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास तर घेतला जायचाच. शिवाय रोजच्या व्यवहारात उपयोग होऊ शकतील, अशा गोष्टीही मुलींना शिकवण्याकडे शाळेचा कल असायचा. क्रमिक अभ्यासाबरोबरच संगीत, नृत्य, हस्तकला हे विषय अनिवार्य होते. गाणं किंवा विणकाम, शिवणकाम किंवा क्ले वर्कमधल्या प्रकारात किमान उत्तीर्ण होण्याइतके गुण मिळाले नाहीत, तर ती विद्यार्थिनी चक्क सगळ्याच परिक्षेत नापास होई. मग, क्रमिक अभ्यासक्रमात तिला कितीही भरगच्च मार्क मिळालेले असोत. यामुळे आमच्या शाळेतल्या कोणत्याही मुलीला या सर्व कलाप्रकारांमध्ये किमान पास होण्याइतकं तरी प्राविण्य असतंच. याचा मला अभिमान आहे.
मुलींचा खरोखरंच सर्वांगीण विकास व्हावा यावर शाळेचा भर असे. दृष्टीहीन मुलांना सर्वच पालक व्यवस्थित हाताळू शकतात, असं नाही. त्यामुळे डोळस मुलांना जे ज्ञान पाहून आणि निरिक्षणातून सहज मिळतं, ते या मुलांना मिळत नाही. म्हणजे दुकानातून वस्तू कशा विकत घ्याव्यात, पैसे कसे द्यायचे, आपली वस्तू बरोबर आहे-नाही, हे कसं तपासायचं, हे तोंडी सांगून कळणं शक्य नसतं. प्रात्यक्षिकाशिवाय हे शिकणं शक्य नाही, हे ओळखूनच शाळेने दुकानप्रकल्प चालवला होता. यात आम्हा मुलींना प्रत्येकी एक रुपया मिळे. तो घेऊन वर्गानुसार ठरलेल्या दिवशी आम्ही दुकानात जाऊन जे आवडेल ते घेऊन येत असू. आणलेला खाऊ वर्गात घेऊन यावा लागे. सर्व वर्गमैत्रिणींमध्ये तो थोडा थोडा वाटावाही लागे. त्यामुळे शेअरिंग ही संकल्पनाही मनावर कोरली गेली. व्यवहाराला आपलेपणाचा स्पर्श झाला, तो या शेअरिंगच्या कल्पनेतून.
आज मी अशी कितीतरी मुलं पाहते जी आपली वस्तू, खाऊ कोणालाच द्यायला मनापासून तयार होत नाहीत. ओजसही त्यांपैकीच. आपलं खेळणं पटकन कुणाला मनापासून देणार नाही. पण, ते तुझंच आहे, तुझा मित्र वा मैत्रिण थोड्या वेळापुरतं त्या खेळण्याशी खेळेल हे सतत त्याला सांगणं, समजावणं, ही माझी जबाबदारी आहे, नाही का? वाटून खायचं कसं, हे त्याला कळावं म्हणून आम्ही एक प्रयोग नेहमी करतो. कोणताही खाऊ द्यायचा झाला तर तो एकाच डिशमध्ये काढून त्याच्या पुढ्यात ठेवतो. आणि थोड्या वेळाने आळीपाळीने त्याच्याकडे तो मागतो.सुरुवातीला तो देत नव्हता. पण, आता कोणीही मागितलं तर तो काहीतरी देतोच देतो. स्वतःहून ऑफर करणंही हळूहळू तो शिकेल अशी आशा आहे.
आणखी एका बाबतीत शाळेचा उल्लेख करायलाच हवा. दृष्टीहीन व्यक्ती एकटीने चालू शकते, बाहेरच्या जगात वावरू शकते, प्रवास करू शकते, हा आत्मविश्वास दृष्टीहीन विद्यार्थिनीच नव्हे तर तिच्या पालकांमध्ये निर्माण करणं सोपं नसतं. हे करताना मुली पूर्णार्थाने स्वतंत्र व्हाव्यात, असा उद्देश मनाशी बाळगून त्यांना एकट्यानं चालण्याचं, जगात वावरण्याचं प्रशिक्षण शाळा देते. आठवीतल्या मुलींना आधी पांढरी काठी कशी हाताळावी, हे शिकवलं जातं. शाळेच्या प्रांगणात चालण्याचा सराव झाल्यावर, रस्त्यावर त्यांना कसं चालावं, याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातं. एकट्यानं चालताना लोकांची मदत कशी घ्यावी, आपल्याला काय मदत हवी आहे, ते कसं सांगावं, त्यांनी आपला हात कसा पकडावा आणि आपण त्यांना कसं पकडावं, हे प्रत्यक्षपणे शिकवलं जातं. मग, मुलगी नीट तयार झालीये, असं वाटल्यावर तिची परीक्षा म्हणून तिला एकटीला बाहेर पाठवलं जातं. मोबिलिटी शिकवणाऱ्या शिक्षिका तिच्याशी एकही शब्द न बोलता तिचं सबंध रस्ताभर निरीक्षण मात्र करत राहतात.
एकूण काय, कॉलेजला जाताना बाहेरच्या जगात आत्मविश्वासाने पहिलं पाऊल टाकायला मला माझ्या शाळेने शिकवलं. आईवडिलांनी मी या जगात आल्यावर चालायला शिकवलं होतं, तेवढंच महत्त्वाचं, किंबहुना त्याहून अधिक महत्त्वाचं ,पुढे टाकलेलं हे पाऊल होतं!
- अनुजा संखे

Thursday, 8 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं- 4

"मम्मी, अगं, मला वाडीत एकटीला सोडून सगळ्या पळून गेल्या. साप, साप, असं ओरडत होत्या. मी हळूहळू आले चालत. पण, इथे लागलं.” मी कपाळावर हात दाबून, पण, न रडता मम्मीला सांगत होते. या प्रसंगातली मी फार तर सहा वर्षांची. मम्मीने माझ्या पाठीवर हात फिरवला आणि समजावणीच्या सुरात म्हणाली, “अगं, हात थोडे पुढे ठेवून चालायचं म्हणजे तुला लागणार नाही. मी विचारते हं, सरलाला तिथे खरंच साप होता का, ते. पण, त्या असं करतात ना तुला! तू आपली घरात भांडी खेळत जा. त्यांच्यात जात जाऊ नकोस.”
हे माझ्या लहानपणचं. पुढे एकदा या प्रसंगाविषयी मम्मी मला म्हणाली, “हे समजावून सांगताना, तुला समजेल की नाही, यापेक्षा मला हे कधी समजेल हा विचार माझ्या डोक्यात थैमान घालत होता. कालपर्यंत या मुलींमध्ये सर्वात चुणचुणीत तू म्हणून मला तुझा अभिमान वाटत असे. तीच तू त्यांच्यापासून एका अपंगत्वामुळे तोडली जावीस?” मम्मीचा स्वर थरथरला. वाटलं, डोळ्यात जमा होणारे अश्रू ती थोपवून धरतेय. ‘अगं, तू रड मोकळेपणाने’असं तिला सांगावंसं वाटलं. पण बोलता नाही आलं.
मलाही ती सांगत असलेला प्रसंग स्पष्ट आठवत होता. मला भीती वाटावी या हेतूने नाही. पण, खेळात एका वेलीचा हातभर लांबीचा तुकडा घेऊन साप साप म्हणत सगळी टोळीच मला आमच्या बिल्डिंगमागच्या वाडीत एकटं सोडून गेली होती. रोजची नजरेखालची ती वाट मी पायाखाली आणत, धडपडत आवाजाचा वेध घेत पार केली. कुणी तरी मला घरी सोडलं. खरं तर, काय झालं, हे मी सांगितल्यावर खूप घाबरली होती. साप जर खरंच तिथे असता, तर माझी लेक कसं वाचवेल स्वतःला. तिची भीती अवाजवी नव्हती. बिल्डिंगच्या मागे, बाजूला आंबा, नारळ, पेरू अशी बरीच झाडं होती. त्यांच्या आश्रयाने गवत, छोटी झुडपं यांचीही बरीच दाटी असायची. बऱ्याचदा त्या गचपणात साप दिसायचे. अशात हा प्रसंग घडलेला. बिल्डिंगच्या मागल्या वाडीतलं माझं स्वैर बागडणं बंद झालं.
असंच एकदा, लपाछपीसाठी नेहमीच्या टोळक्यात मी सामील झाले होते. लपायची जागा म्हणजे पेरूचं मोठं मोठं वाढलेलं झाड. आम्ही त्यावर सराइतपणे चढलो. मी त्यावेळी पूर्णतः दृष्टीहीन झाले होते. पण नेहमीच्या माणसांप्रमाणे मी नेहमीची झाडंही ओळखू शकत होते. झाडावर बसलेली असताना एक मुलगी जवळ आली आणि ‘चल खाली’ असं म्हणाली. काही न समजून मी पटकन खाली उतरले. चिंगीने उतरल्या क्षणी माझा हात पकडला आणि धावत सुटली. आम्ही मम्मीकडे पोहोचलो आणि तिने सांगितलं की, माझ्यापासून काही अंतरावर असलेल्या एका फांदीवर हरणटोळ होती.
मम्मीने मला पोटाशी घट्ट धरलं. “तुला किती वेळा सांगायचं की, जाऊ नकोस झाडाझुडपात म्हणून? कधी समजेल तुला की...” तिला आपल्या मुलीला पुन्हा दिसूच शकणार नाही, हे सत्य पचवणं जड जात होतं. त्यामुळे मुलीला समजावून देणंही क्ठीण होऊन बसलं होतं. मुलीचं भावविश्व बदलत असल्याने तिला होत असलेला त्रास आणि त्याचं येणारं दडपण. तर दुसरीकडे, शस्त्रक्रिया होऊनही कधीच दिसू शकत नाही या डॉक्टरांच्या निदानामुळे पंचविशीतल्या माझ्या मम्मीची खूप चिडचिड व्हायची. कधी तिचा राग देवावर निघायचा, कधी पप्पांवर, कधी माझ्या लहान भावांवर, तर कधी खुद्द माझ्यावर.
मम्मीपप्पांना माझं अंधत्व सहन करण्याचा मार्ग दाखवला तोही एका डॉक्टरनेच. दृष्टीहीन व्यक्ती शिकू शकतात. आणि त्या तुमच्या आमच्यापेक्षा मोठ्या हुद्द्यावरही जाऊ शकतात, हे त्यांनी अनेक उदाहरणं देऊन माझ्या मम्मीपप्पांना पटवून दिलं. दादरच्या कमला मेहता अंध शाळेत जाऊन माझ्या शिक्षणाची सोय करायला सांगितली.
- अनुजा संखे

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं - 3

ओजस पाच दिवसांचा झाला. तो झाल्यावर आवश्यक त्या सर्व टेस्ट डॉक्टरांनी करून घेतल्या होत्याच. पण, मी आणि भरत त्याच्या डोळ्यांची स्थिती जाणून घेण्याबाबतीत जरा अधिकच उत्सुक होतो. आधी प्रत्येक सोनोग्राफीच्या वेळी डॉक्टरांना त्याचे डोळे व्यवस्थित दिसताहेत ना, त्यात काही लक्षात येईल,असा दोष तर नाही ना? असे प्रश्न मी विचारत होतेच. तेही माझ्या शंकांचं निरसन करायचे. पण, तरीही बाळ पाच दिवसांचं झाल्यावर आम्ही त्याला ‘बच्चूअली’ या डोळ्यांच्या दवाखान्यात घेऊन गेलो. माझी आणि भरतची संपूर्ण हिस्ट्री मी डॉक्टरांना सांगितली. सारं ऐकून त्यांनी बाळाला तपासलं. तो अर्धा तास मी कसा घालवला असेल, ते शब्दातीत आहे. ती घालमेल, ते वाट बघणं, ती भीती हे उलगडून नाही सांगता येणार. बाहेर बसून फक्त वाट पाहणं हातात होतं. डोळ्यात साचू पाहणारं पाणी सतत अडवून धरलं होतं त्या अर्ध्या तासात.
तेवढ्यात मम्मी बाहेर आली आणि मला आत घेऊन गेली. त्यांनी बाळाला माझ्या हातात देताना म्हटलं, “आपका बच्चू एकदम फिट ऍंड फाइन है. उसकी आंखो में ना अब कुछ प्रॉब्लम है ना कभी होगा, ऐसा हमें लगता है.” त्यावेळची सुटकेची जाणीव, आनंद झाल्याची भावना आसवांनी मोकळी होत गेली.
या सर्वाचा विचार करताना पटकन वाटलं की, मम्मीपप्पांना माझ्या येऊ घातलेल्या अंधत्वाची थोडी जरी कुणकुण असती तरी त्यांनी सुरुवातीपासूनच उपचार केले असते ना? त्यांनी केलेला मानसिक संघर्ष साक्षात मनात उभा राहिला.
आपल्या मुलीच्या बाबतीत डॉक्टरी उपाय हळूहळू थकत चाललेत, हे ते जागेपणी
पाहत होते. आपलं पहिलंच अपत्य आयुष्यभर कधीच बघू शकत नाही, याचा समजून उमजून स्वीकार..हे साधं सरळ नाही. माझ्या खोड्यांवर रागावणारी, मला चटकन एखादा फटका मारणारी माझी मम्मी “आधीच पोरीला दिसत नाहीये, त्रास होतोय. त्यात, तिला का मारा?” असा विचार करून स्वतःला थोपवून धरायला लागली. रोजचं वागणं या एका भयानक जाणिवेनं संपूर्ण बदलून टाकणं, वाटतं तितकं सोपं नसतं.
“डॉक्टरांचे उपाय चालत नाहीत. म्हणजे देवाचं करायचं राहून गेलं असेल, ते करा. नक्की दिसेल तुमच्या मुलीला.” मनाने खचलेल्या माझ्या मम्मी पप्पांना नातेवाइकांनी, शेजाऱ्यांनी आपले अनाहूत सल्ले द्यायला सुरुवात केली. एवढं केलंच आहे; मग हेसुद्धा करून पाहूया. काहीही करून आपल्या मुलीला दिसलंच पाहिजे असा त्यांचा ध्यास. तेव्हापासून देवादिकांचे नाना तऱ्हेचे उपाय आणि झाडपाल्याच्या औषधांचा माझ्यावर भडीमार सुरू झाला. मला काही उपाय स्पष्टपणे आठवतात.
एक बाबा मला डोळे बंद करून बसायला सांगे. मग तो काही मंत्रपाठ करून एक पावडर माझ्या कपाळापासून पूर्ण डोक्याभोवती लावत असे. ती पावडर सुकू लागायची. आणि माझं डोकं जड व्हायचं. मी तसं सांगताच तो आपल्या साधनेने फरक पडतोय, असं म्हणायचा. नंतर ती पावडर पुसून माझ्या बंद डोळ्यांवर पांढऱ्या कांद्याचे पातळ काप ठेवायचा. साधा कांदा चिरताना आपल्या डोळ्यांना धारा लागतात. माझ्यासारख्या सहा-सात वर्षांच्या मुलीच्या डोळ्यांचं काय होत असेल? दोन-तीन दिवस हे सुरु होतं. पुढं त्याची यायची वेळ झाली की, मी रडू लागे. मला होणारा त्रास सहन न झाल्याने, पप्पांनी त्याचं घरी येणं बंद केलं. हा उपचार बंद झाला. मग शेजारच्या मावशींच्या हट्टापायी आम्ही एका गावी गेलो. तिथल्या एका बाईच्या अंगात देवी येत असे. तिने माझ्या मम्मीपप्पांना बघताच कुलदैवतेला बळी द्यायचा राहिल्याने हे त्रास होत असल्याचं सांगितलं. मला बदाम आणि काळीमिरी खायला दिली आणि डोळ्यात कसले तरी दोन थेंब घातले. डोळ्यात जाळ झाल्यासारखं झोंबू लागलं. ते सहन न होऊन मी किंचाळलेच. मम्मीने पुढे झेपावून मला जवळ ओढून घेतलं आणि डोळे पुसले. त्या क्षणी हे अघोरी उपाय पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आज अलिप्तपणे विचार करतानाही त्या वेदना ठसठसल्यासारख्या वाटतात. देवधर्म, कर्मकांड याबाबतीत एक प्रकारची चीड मनात निर्माण झाली. पप्पांनी उपासतापास पूजाअर्चा, दिवा लावलाच पाहिजे या सर्व गोष्टींबद्दल झेपेल तेवढंच करण्याची शिकवण दिली. पण, माझ्या पालकांच्या अथक प्रयत्नांमुळेच माझ्या खडतर आणि अंधत्वामुळे असह्य होऊ पाहणाऱ्या आयुष्याला मी सामान्य वळण लावू शकले. या जाणीवेने मी त्यांच्यासमोर नतमस्तक होते.
 - अनुजा संखे

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं-2


अक्षरशः फिल्मी स्टाइलमध्ये डॉक्टर म्हणाल्या, “अनुजा, कॉंग्रेजुलेशन्स! तुला मुलगा झालाय.”
माझी प्रतिक्रिया होती, “काय? मला मुलगा झालाय. अरे! मला मुलगी हवी होती.”
त्यावर डॉक्टरांनी मुलगी झाली, म्हणून तोंड फुगवणाऱ्या बायका, त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणारे कुटुंबीय अशी उदाहरणं दिली आणि बाळाला पुसून नर्सच्या हातात ठेवलं. काही मिनिटातच तिनं भरतला बाळ दाखवलं. भरतने भावाच्या तिन्ही मुलांना वाढवण्यात सहभाग जरूर घेतला होता. पण, त्यानेही अगदी तान्हं बाळ कधीच बघितलं वा हाताळलं नव्हतं. ओजसला पहिल्याच वेळी दूध पाजताना काय वाटलं ते शब्दात लिहिण्यासारखं नाहीच मुळी. त्या एका स्पर्शाने मी पूर्ण स्त्री झाले असं काहीसं मला जाणवलं. दोन सिस्टर मला त्याला दूध पाजायला मदत करायच्या. त्यांनी मम्मीलाही ती पद्धत शिकवली. त्यानंतर जवळजवळ पंधरा दिवसांनी त्याला व्यवस्थित, स्वतंत्रपणे मला दूध पाजायला जमू लागलं.
खरं तर, हे सगळं एवढं विस्ताराने लिहावं का? असंही बऱ्याच मैत्रिणींना वाटू शकेल. पण, एक दृष्टीहीन व्यक्ती नेमकं काय करू शकते आणि काय नाही याबाबत खूप शंका-कुशंका असतात.
बाळंतपण मुलीच्या माहेरी ही आपल्याकडची पद्धत. त्यामुळे घरातली सगळीच माणसं सतत तिच्या अवतीभोवती असतात. यातून आपोआपच धाकट्या बहीण भावंडांचंही प्रात्यक्षिकांसह संपूर्ण ट्रेनिंगच होतं. तान्ह्या बाळाला कसं पकडायचं, अंघोळ कशी घालायची, त्याला दुपट्यात कसं बांधायचं इथंपासून ते त्या शी-शू साफ करून त्याला झोपवायचं कसं इथंपर्यंत घरातली मुलगीच नव्हे, तर पुरुष मंडळीही शिकतात. पण, दृष्टीहीन लोकांना हे सहज शक्य नसतं.
मुळात हे शिक्षण निरीक्षणातून मिळतं. तेच अंध व्यक्तीला शक्य नसतं. त्यांना हे सर्व हाताने दाखवून शिकवण्याची गरज असते. मलाही यातली कोणतीच गोष्ट शिकायला मिळाली नाही. मम्मी आणि आजी दोघीच बाळाचं सर्व काही करत होत्या. इच्छा असूनही, दूध पाजण्यापलीकडे मी काहीही करू शकले नाही. माझे धाकटे भाऊ या सगळ्यात छान तरबेज झाले. इतकं, की सहा महिन्याच्या बाळाला त्यांच्यावर सोपवून आम्ही जॉबला जाऊ शकत असायचो. कधी हा तर कधी तो असं करून त्यांनी काही दिवस माझ्या बाळाला आंघोळ, खाणंपिणं सारं केलं आहे.
मला लहान मुलांची खूप आवड. मी सातवी आठवीला असतानाची ही गोष्ट. आमच्या बिल्डिंगमध्ये एक कुटुंब नुकतंच राहायला आलेलं. त्यांचं सात महिन्याचं बाळ होतं. अगदी आवडीने मी त्याला घ्यायला जात असे. पण, त्यांनी स्वतःहून कधीही मला बाळ हातात दिल्याचं आठवत नाही. शेजारच्या मुलींनी ते बाळ घेतलं की, मी त्यांच्याकडून ते घेत असे. पण, त्यांचं वागणं मला बोचायचं. एकदा माझ्या मैत्रिणीकडून मला कळलं की, माझ्यामुळे काही अपाय होईल किंवा अपघाताने बाळाचीही दृष्टी जाईल अशी भिती त्या कुटुंबाला वाटते. त्यांना नेमकं काय म्हणायचंय ते न कळण्याएवढी मी अजाण नव्हते. माझं अंधत्व त्यांना भितीदायक वाटत होतं. अजाणता मी त्यांच्या बाळाला घेऊन पडलेच तर?... त्यांची भीती अवाजवी मुळीच नव्हती. अपघात कोणालाही आणि कधीही होऊ शकतो.
पण, मला दिसत नाही म्हणून माझ्यासोबत राहिल्याने त्या बाळाला अंधत्वाची
बाधा होईल, ही भीती मात्र चूक आणि अमानुष होती. त्यांची भीती काढायची म्हणून असेल किंवा मला नकळत दुखावल्याच्या रागातून असेल पण, त्यांना सतत हुरहूर लावून ठेवायचं काम मी करत असे. त्या बाळाला सतत घेऊन फिरवायचे.
आणखी एक असाच प्रसंग. आमच्या निवासी शाळेतल्या एका आयाकडे गूड न्यूज असल्याचं कळलं. बाळ होणार म्हटल्यावर आम्हा मुलींना त्यांच्याबद्दल अपार ओढ आणि उत्सुकता वाटायची. त्यांचा सातवा-आठवा महिना चालू असावा. एकदा जिन्यातून उतरताना माझा हात त्यांच्या पोटाला लागला आणि मी आनंदून जाऊन विचारलंही, “आता कधी बाळ होणार?” त्यांनी एकदम माझा हात पकडला आणि म्हणाल्या की, “अगं असा पोटाला हात लावायचा नसतो. माझं बाळही तुझ्यासारखं ब्लाइंड होऊ शकतं.” या शब्दांनी आधी मी घाबरून गेले. पण थोडासा विचार केल्यावर मला हे काही केल्या पटेना.
सतत अंध मुलींमध्ये वावरणाऱ्या या स्त्रीचं मन कोणी आणि कसं तयार करावं?
कसं त्यांना समजवावं? अंधश्रद्धा आहे सांगून जर समजलं असतं, तर आपला समाज
श्रद्धा आणि अंधश्रद्धा या संघर्षात पिचला गेला असता का?
 - अनुजा संखे

Tuesday, 6 February 2018

पाहिलेलं, न पाहिलेलं, मनातलं

प्रेग्नन्सी किटवरच्या दोन लाइन्स डार्क होत गेल्या आणि मी खूष झाले. त्यांनी कळवलं, की आम्ही लवकरच आईबाबा होणार! "आता जास्त धावपळ आणि टेन्शन घ्यायचं नाही हं", भरतच्या सांगण्याने मला गंमतच वाटली. रोज संध्याकाळी त्याने फळं आणणं, काय खावंसं वाटतंय हे विचारून आईंनी तसं बनवून देणं, हॉस्पिटलमधलं रुटिन चेकअप, सर्वच मला हवेत न्यायला पुरेसं होतं. बाळ कसं असेल आपलं? बाळाबद्दल बोलताना, स्वप्नरंजन करतानाचा नेहमीच नेहमीच थोडेफार शब्द बदलून आम्ही एकमेकांना हा प्रश्न विचारायचो. याचं उत्तर देताना मुलगा झाला तर ओजस आणि मुलगी झाली तर अवनी असंही दोघांनी ठामपणे ठरवून टाकलेलं. जेव्हा गर्भारपणाची जाणीव चिमुकले पाय लाथा मारून तर चिमुकल्या मुठी हात फिरवून देऊ लागल्या, तेव्हा मात्र मी अधूनमधून गंभीर व्हायला लागले. बाळाला नीट उचलता येईल का? त्याला छातीशी घेऊन व्यवस्थित दूध पाजता येईल का? मान सावरून खांद्यावर घेता येईल का? खूप प्रश्न. मी कधी बाळ हाताळलं नव्हतंच, असं नाही. दोन अडीच महिन्यांपासूनची चुलत, आत्ये बहिणींची बरीच बाळं मी खेळवली होती. पण, आपल्यातूनच निर्माण झालेलं, अवघ्या काही तासांचं बाळ हे माझ्यासाठी खूपच मोठं आव्हान होतं. शेवटी खेळवण्यापुरतं बाळ हातात घेणं आणि घडवण्यासाठी त्याला छातीशी घेणं यात कितीतरी फरक असतो. नाही का? मी जाणीवपूर्वक मनाची या सर्व गोष्टींसाठी तयारी करून घेत होते. पण एका प्रश्नाशी मन चरकायचं. डोळे भरून यायचे आणि अगतिकता म्हणजे काय ते त्या क्षणात समजायचं. “आमच्यासारखं बाळाला तर अंधत्व...?” आजही या प्रश्नाने पिच्छा सोडलेला नाही.
ओटीभरणाचा सोहळा आटोपून माहेरी आले आणि डॉक्टरने सक्तीची बेडरेस्ट सांगितली. मग दोन्ही भावांची आळीपाळीने माझ्यावर देखरेख असायची. मन गुंतावं, म्हणून मी सतत यूट्यूबवर काही ना काही बघत तरी रहायचे. नाहीतर मन उदास व्हायचं. आणि अंधत्वामुळे मला जे संघर्ष करावे लागले ते माझ्या बाळाला तर नाही ना करावे लागणार या विचारासरशी हुंदके देऊन रडायचे. माझ्या रडण्यामुळे घरातले सगळेच टेन्शन घेतात. हे माहीत असल्याने मी कधी बाथरूममध्ये तर कधी चादर डोक्यावर पूर्णपणे ओढून घेऊन खूप रडायचे. पण, एकदा मम्मीच्या मांडीवर डोकं ठेवून हॉलमध्ये लोळत असताना अचानक ह्या विचाराने गाठलं आणि कढ आवरणं अशक्य झालं. माझ्या डोळ्यातून अश्रूंच्या धाराच लागल्या. तिने म्हटलं, “बाळाचा विचार करून रडतेस का? तुला माझ्यापेक्षा कितीतरी अधिक लोक माहिती आहेत ज्यांना स्वतःला दिसत नाही. पण त्यांची मुलं व्यवस्थितपणे बघू शकतात. मग, तू असा नकारात्मक विचार मनात का आणतेस? बाळ व्यवस्थितच असेल असा विचार करत जा. आणि एक वेळ, तुझ्या बाळाला अपंगत्व आलंच, तर त्याला कसं सामोरं जायचं, यासाठीचे सारे पर्याय तुझ्याकडे असणार आहेतच ना? आमच्या तर ध्यानीमनी नसताना तुला हे अपंगत्व आलं. तू शिकू शकतेस हे तर दूरच राहिलं. मी स्वतः शिक्षिका असून तुझ्यासारख्या मुलांसाठी विशेष शाळा असतात हेही मला माहीत नव्हतं. आम्ही जर तुला एवढं सक्षम बनवण्यात हातभार लावू शकतो, तर तू सगळंच करू शकतेस. मग एवढं नकारात्मक राहण्यात काय अर्थ आहे?” मम्मीचं बोलणं ऐकून मी शांत झाले. "तुझ्या बाबतीत मला काहीच कल्पना नव्हती" हे तिचं सांगणंच किती दुखरं बोचरं होतं! मी तरीही विचारलंच, “तेव्हा तुम्ही दोघांनी कसं सांभाळलंत मला? आणि स्वतःला?” ती मनात, साचून ठेवलेलं सांगत राहिली आणि मी वाढलेल्या पोटावर हात फिरवत ते त्रास मनाच्या गाभ्यातून समजून घेत राहिले.
- अनुजा संखे