Sunday, 17 September 2017

‘तिरकीटधा’नं घडवलं



उस्मानाबाद जिल्हा. उमरगा तालुका. इथलं कराळी गाव. इथले तबलावादक खंडेराव मुळे. अभंग, भावगीत, गवळण, भारूड, भक्तीगीत, आंबेडकरी गीते - कुठल्याही गाण्याचा कार्यक्रमाला खंडेराव मुळेंची तबलासाथ उल्लेखनीय असते. मुळे दोन्ही डोळ्यांनी अंध. त्यामुळे ते तबला वाजवायला कसं, कुठं शिकले असतील असा प्रश्न सर्वांनाच पडतो. त्यांची तबला वादनाची सुरुवातच रंजक आणि रोचक वातावरणात झाली.
मुळे यांचं लहानपण कराळीत गेलं. तिथं शेजारी राहणाऱ्या एकनाथ पांचाळ यांच्या घरी नेहमी भजनाचा कार्यक्रम व्हायचा. मुळे यांनी पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली संप्रदायाचा मार्ग धरला. पांचाळ यांच्या हाताखाली मुळे तयार होऊ लागले. आता तबल्यातल्या पुढच्या शिक्षणाचे त्यांना वेध लागले. त्यासाठी लातूरच्या पंडित शांताराम चिगरी यांच्याकडे जायचं ठरलं. इथून पुढं मात्र मुळे यांना अनंत अडचणीना तोंड द्यावं लागलं. कारण लातूरला जायचं तर बसचा प्रवास. दोन वर्षे त्यांनी रोज हा प्रवास केला तर दोन वर्ष लातूरलाच घर केलं. या धडपडीचं फळही त्यांना तबला अलंकार या पदवीतून मिळालं. निव्वळ तबल्यातच नाही तर गायन कलेतही त्यांनी संगीत विशारद पदवी मिळवली. 




तबल्याची साथ, हार्मोनियमचे स्वर आणि सुरेख आवाज हा मुळे यांच्या कार्यक्रमाचा युएसपी. मुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘भीम निळाईच्या पार’, हा कार्यक्रम महाराष्ट्रात १०० ठिकाणी सादर केला. तसंच ‘आपलं घर’ या नळदुर्ग संस्थेतील मुलांसाठी राज्यभर ‘तारे समानतेचे’, हा गाण्याचा कार्यक्रम सादर केला. त्यातून मिळालेला निधी संस्थेतील मुलांसाठी देण्यात आला. मुळे यांनी सध्या उस्मानाबाद येथे संगीत अॅकॅडमी सुरू केली असून, ते नव्या मुला-मुलींना संगीताचे धडे देत आहेत. मुळे सांगतात, “सामान्य कुटुंबातील व्यक्ती असूनही संगीतामध्ये मानसन्मान मिळाला. नवीन पिढीने या क्षेत्राकडे वळायला हवं. आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये संगीतात प्रावीण्य मिळविलेल्या व्यक्तीला मान-सन्मान मिळतो. मला संगीतामुळे सामाजिक प्रतिष्ठा मिळाली”. 


- चंद्रसेन देशमुख.

Friday, 15 September 2017

पाव्हणं ऐकता का, मला आत्ताच लगीन न्हाय कराचं!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
ही गोष्ट आहे २०१५ सालातली, आठवीत शिकणाऱ्या कोमलची. जालना जिल्ह्यातलं रोहणेवाडी या छोट्या गावातली ही घटना. कोमलसाठी नातेवाईकांनी स्थळ आणलं. “पोरींचं बाशिंगबळ जड असतंया. दाखवून तरी देवूयात एकडाव पाव्हण्यांना!” असं म्हणत ‘मुलगी दाखविण्याचा’ कार्यक्रम ठरला. आठवीतल्या कोमलला जबरदस्तीने साडी नेसवली गेली आणि पाहुण्यांसमोर तिला नेऊन उभं केलं गेलं.
आठवीची पोर, पुरती बावचळून गेली. नमस्कार- चमत्कार झाल्यावर ‘तुझं नाव काय? कितवीत शिकते?’ असे प्रश्न विचारले गेले आणि कोमलला कंठ फुटला ” माझं नाव कोमल हाए आणि मला तुमच्याशी लगीन कराचंच नाय” आजूबाजूच्या मोठ्यांनी तिला गप्प बसवण्याचा प्रयत्न केला, पण कोमलनी कुणालाही जुमानलं नाही, “मी अजून लहान हाए, आणि आठवीत शिकते. मला इतक्यात सौंसार करायचा न्हाय, मला साळा शिकायची हाय. इतक्या ल्हान वयात लगीन करू नगा. पुढं पोरीचं आणि जल्माला येणाऱ्या बाळाचं लई लुकसान होतं असं आमच्या मीना- राजू मंचात शिकवत्यात. मी माय- बापाला लई येळा सांगितलं, तरीबी ऐकनांत. पाव्हणं ऐकता का, मला आत्ताच लगीन न्हाई कराचं!!”

आणि महत्त्वाचं म्हणजे पाहायला आलेल्या पाहुण्यांना आणि कोमलच्या आई- वडिलांना त्यांची चूक उमजली. मुलीला शिकण्याची इच्छा आहे आणि एवढ्या लहान वयात तिचं लग्न करणं चुकीचं आहे, हे तिच्या अशिक्षित आई- वडिलांनाही कळलं. आता कोमल नववीत शिकतेय आणि शिक्षिका होण्याचं तिचं स्वप्न आहे.
कोमल एकटीच निडर झालीये असं नाही, तर तिच्या वर्गमैत्रिणी आता पूर्वीसारख्या लाजऱ्या आणि अबोल राहिलेल्या नाहीत. उदाहरणार्थ- कोमलच्या शाळेत आजूबाजूच्या गावातूनही काही मुली येतात. त्यांना भरपूर चालून तसेच एसटीने शाळेला यावं लागतं. या प्रवासादरम्यान एका मुलीची त्यांच्याच शाळेतला एक मुलगा छेड काढत होता. ती मुलगी बिचारी घाबरून गेली होती, तिला शाळेतही यायची भीती वाटू लागली. त्यावेळी कोमलने आणि तिच्या वर्गमैत्रिणींनी त्या मुलीला आधार दिला. ‘आम्ही तुझ्यासोबत येतो आणि त्याला बरोबर धडा शिकवतो’ असा मैत्रिणींनी चंग बांधला. ज्या मुलीची छेड काढली जात होती तिच्यासोबत मुली बसस्टँडपर्यंत जायच्या आणि एकेदिवशी त्यांनी त्या मुलाला बसस्टँडवरच जाब विचारला. शिवाय त्याचं नाव, पत्ता याची माहिती काढून शिक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवली. मग शिक्षकांनी मुलाच्या पालकांना बोलावून समज दिली. अशाप्रकारे एका विद्यार्थिनीचं शिक्षण चालूच राहिलं.
रोहणेवाडी प्रथा-परंपरा पाळणारं, मुलालाच वंशाचा दिवा मानणारं आणि मुलीच्या जन्मापासून तिच्या लग्नाची काळजी करणारं गाव. हुंड्याची प्रथा कागदोपत्री दिसत नसली तरी इथं ती आवर्जून पाळली जाते आणि मग आई- बाप कमी हुंड्यात लग्न ठरलं तर मुलीच्या वयाचा विचार न करता तिचं लग्न लावून देतात. जालना जिल्ह्यातला मुलींचा जन्मदर 1000 मुलग्यांमागे 937 मुली इतका कमी. त्यामुळे लहानवयातच मुलीचं लग्न होणं, ही तशी सर्रास आढळणारी गोष्ट. स्वतःच धीट होतं आपल्या लग्नाचा चाललेला प्रयत्न एकहाती उधळून लावला, हे खरंतर कौतुकास्पदच. 


- स्नेहल बनसोडे- शेलुडकर.

Thursday, 14 September 2017

कुरुंजीतलं गमभन




तीन वर्षांपूर्वी कुरुंजी नावाचं गाव या जगात आहे हे ही माहीत नव्हतं. कुरुंजीला मी योगायोगानेच पोचले. आधीची संस्था सोडल्यावर वेगळ्या पद्धतीची शाळा एखाद्या खेड्यात सुरू करणे हे उद्दि्ष्ट डोळ्यासमोर ठेवून आम्ही लोकांपर्यंत पोचत होतो. प्रीती भंडारी या मैत्रिणीने तिच्या कुरुंजीच्या जागेबद्दल सांगितले. तिला ही वेगळ्या पद्धतीच्या शाळेत रस होता. ती जागा द्यायला तयार होती.
यासाठी गावात आम्ही एक मीटिंग घेतली. पण गावकऱ्यांचं म्हणणं वेगळं पडलं. गावाला लागून एक सरकारी आश्रमशाळा आहे. गावातली मुलं पण इथेच जातात. गावकरी म्हणाले, तुम्ही इथं शाळा सुरू केली तर आमच्या गावातल्या आश्रमशाळेवर परिणाम होईल. तुम्हाला जे काम करायचे ते तुम्ही आमच्या आश्रमशाळेत करा. आम्ही होकार दिला.
दरम्यान गावात एक लहान घर भाड्यानं घेतलं होतं. मी गुरुवारी / शुक्रवारी सकाळी पुण्याहून सरळ आश्रमशाळेत जात असे. तिथून मग कुरुंजीतल्या घरी राहून शनिवारी संध्याकाळी परतत असे. शाळेत वेगवेगळ्या वर्गांबरोबर काही उपक्रम करत असे. चित्रकला, मुक्त खेळ वगैरे.
शुक्रवारी संध्याकाळी आणि शनिवारी सकाळची शाळा सुटल्यानंतर मी मुलांबरोबर चालत घरी येत असे. अशा प्रकारे गावातल्या मुलांबरोबर ओळख झाली आणि माझं कुरुंजीचं घर हे गावातल्या मुलांचं हक्काचं ठिकाण झालंय. मी गावात असताना एखादं मूल बराच वेळ घरी आलं नाही तर आईवडील इथंच बघायला येतात.
कुरुंजी हे भोरपासून 40 किमीवर असलेले एक चिमुकले गाव. ऑफिशियली लोकसंख्या हजाराच्या वर असली तरी बरीच मंडळी पुण्या मुंबईत राहतात. आता राहणारी साठेक कुटुंबं आहेत. भरपूर पाऊस, भाटघर धरणाचं पाणी गावामागे असल्यामुळे निसर्गसंपन्न ठिकाण आहे. जवळपास काही उद्योग धंदे वगैरे नसल्यामुळे खूपच शांत भाग आहे. दिवसातून तीन चारदा बस येते. बाकी खाजगी जीप क्वचित. एकप्रकारचा संथपणा आहे. पावसात भात लावला जातो. दुसरे पीक नाही. सगळी कुटुंबं एकमेकांशी नात्यानं जोडलेली आहेत. त्यामुळं एक community चा फील येतो. हरिजन वस्ती वेगळी आहे. पण तसं येणं जाणं दिसतं एकमेकांकडे.
याआधी मी वीस वर्षे सामाजिक संस्थेत काम केलं होतं. पण यात गावाचा सततचा संपर्क नसे. एक तर ग्रामीण कार्यालय गावाबाहेर स्वतंत्र वेगळं होतं, दुसरं म्हणजे मीटिंग इ.साठी थोडा वेळ गावात जाऊन पुन्हा संस्थेच्या कार्यालयातच आम्ही बसत असू.
इतकी वर्षे काम करूनही गावातले लोक नक्की कसे राहतात, त्यांचं समाजजीवन, त्यांच्या चालीरीती, समजुती याबद्दल प्रत्यक्ष अनुभव नव्हता. त्यामुळे नवीन काम सुरू करण्याआधी आपण ज्या लोकांबरोबर, ज्या परिस्थितीत, वातावरणात काम करणार आहोत ते स्वतः राहून समजावून घेणे गरजेचे वाटले.
या राहण्याला दुसरेही जास्त महत्त्वाचे कारण आहे. Existential Knowledge Foundation या आमच्या संस्थेत आम्ही ‘शिकणे’ learning या विषयावर काम करतो. माणसाचं मूल किंवा कोणताही सजीव जन्मल्यापासून शिकतच असतो. कारण जगण्यासाठी ती अत्यावश्यक गोष्ट आहे. सभोवतालची परिस्थिती, माणसं मुलाच्या शिकण्यावर प्रभाव पाडत असतात. जगण्यासाठी आवश्यक skills मूल असं अनुभवातूनच शिकतं, आत्मसात करतं. मुलाला जेवढं मोकळं अवकाश मिळेल तेवढं ते बहरून येतं. पण शिक्षण फक्त शाळेशीच निगडित केल्यामुळे विशेषतः शहरात मुलांच्या सहज शिक्षणाचा संकोच होतोय.
ग्रामीण भागात मुलांना बरीच मोकळीक असते. त्यांच्या भोवती शेती, पशुपालन अशा बऱ्याच प्रक्रिया चालू असतात आणि मुलांचा त्यात अर्थपूर्ण सहभाग असतो.
त्यामुळे खेडयात राहून तिथे सहज शिकणे ( natural learning) कसे होत असते, निसर्गाला धरून कसे जगणे चालू असते, traditional wisdom वर कसा भर आहे या सगळ्या गोष्टींचे निरीक्षण करणे, प्रत्यक्ष तिथे राहून
समजून घेणे हा उद्देश्य इथे राहण्यामागे आहे.
हे समजून घेण्यासाठी लागेल तेवढा वेळ द्यायची मी तयारी ठेवली आहे. खरं तर हे माझ्यासाठी एक निरंतर शिकणे आहे. त्यामुळे निरीक्षण आणि अनुभव यातूनच मला गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्या आधीच्या सगळ्या समजुती, वाचनामुळे मिळालेली माहिती या सगळया गोष्टी मागे टाकून माझा मित्र जिनन म्हणतो तसं, I dont know , मला काहीच माहीत नाही अशी कोरी पाटी घेऊन मी इथं आले आहे. त्यामुळं सगळं आकलन नवीन असेल आणि first hand knowledge, मी स्वतः समजून घेतलेलं असेल.
यासाठीच प्रश्नावली, मुलाखती अश्या कृत्रिम पद्धती न स्वीकारता मी सहज पद्धतीने होणाऱ्या वेगवेगळ्या लोकांशी गप्पा, भेटी आणि निरीक्षणे यातूनच माझे शिकणे चालू राहील.
- रंजना बाजी

Monday, 11 September 2017

लतीफकाकांची पुस्तकलेणी

लतीफकाकांच्या मुला-नातवंडांनी भरलेल्या घरातच चक्क 30 हजार पुस्तकांनी भरलेली कपाटं आणि 3 खोल्या बघून अबब व्हायला होतं. प्रत्येक गोष्टीच्या मुळापर्यंत जायचं आणि त्यासाठी स्वतःच अभ्यास करायची काकांची सवय. त्या त्या विषयातली पुस्तकंच त्यांचे मार्गदर्शक! काकांच्या या स्वयंअध्ययन आणि अचूकतेच्या ध्यासातूनच ही वैयक्तिक लायब्ररी निर्माण झालीय. अगदी पाळीव प्राणी, पक्षी पाळावेसे वाटले तरी त्याची पूर्ण माहिती घेऊन मग ते कृती करतात. मराठी, हिंदी, इंग्रजी सोबतच फार्सी, अरबी, उर्दू, अशा अनेकविध भाषेतली शैक्षणिक आणि इतर विषयांची अशी प्राथमिक ते अगदी पदवीपर्यंतची सर्व पुस्तके त्यांच्याकडे आहेत. शिवाय माहिती, तंत्रज्ञान, विज्ञान, महिला, लहान मुलं, त्यांचे विविध प्रश्न, आरोग्य, कलाकुसर, अन्न पदार्थ तसेच विविध गोष्टी बनवायला शिकणे अशा अनेक शिकायच्या गोष्टींचा मोठा आणि तो ही सिरीजमध्ये असा संग्रह काकांनी मेहनतीतून निर्माण केलाय. 




लतीफकाका औरंगाबादमधल्या टाइम्स कॉलोनीत राहतात. पाटबंधारे विभागातून कार्यकारी अभियंता या पदावरून काका निवृत्त झाले आहेत. आज काकांच्या खाजगी ग्रंथालयात साधारणपणे 400 ते 500 वेगवेगळ्या विषयांची प्रत्येकी 50 ते 100 पुस्तके जमा केली आहेत. शिवाय 7,8 भाषांच्या डिक्शनरी, एनसायक्लोपेडियांनी काकांची कपाटे भरलेली आहेत. धार्मिक ग्रंथांचं एक खास दालनच आहे काकांचं.
काही खास दैनिकं, साप्ताहिकं पाक्षिकं, मासिकं ही वर्षानुसार बाईंडिंग करून काकांनी जतन केलेली आहेत. नॅशनल जिओग्राफी मासिकांचे 1967 पासूनचे सर्व अंक इथे सापडतील. आणखी म्हणजे अनेक पेन, पेन्सिली, खोडरबर, जुने कंदील, जुन्या काही वस्तू अशा अनेक गोष्टी काकांच्या संग्रही आहेत.
आता काकांनी पंचाहत्तरी ओलांडलेली आहे. तरीही ते स्वतःच या पुस्तकांची, ग्रंथालयाची देखभाल करतात. पुस्तक खरेदीसाठी भारतात ते अनेक ठिकाणी फिरले आहेत. आणि या सर्वासाठी ते दर महिन्याला 5 हजार रुपये खर्च करतात. 





आपल्या कामात सतत व्यग्र असणारे आणि मितभाषी लतीफकाका डायरीतून मात्र बोलके होतात. 1962 पासून लिहिलेल्या त्यांच्या सर्व डायऱ्या पुस्तकासारख्याच आहेत. काकांचे चिराग-ए-अब्दी हे एक पुस्तकही प्रकाशित झालंय. काका गरजू मुलांसाठी अरबी आणि उर्दूचे क्लासेसही घेतात. 





या संग्रहातली किमान 25 हजार पुस्तकं काकांनी वाचली आहेत. साधारण परिस्थितीतून ही पुस्तकांच्या सोबतीने माणसं कशी मोठी होतात हा आशावाद काका लायब्ररीत येणाऱ्या सर्वांना देतात. आपल्या या कामाचा फारसा गाजावाजा करायला काका तयार नव्हते पण त्यांच्या दिवंगत पत्नी आयेशा यांच्या स्मृतीत हे ग्रंथालय सर्वांना खुलं करण्याच्या विचारात काका आता आहेत. औरंगाबादच्या वाचकांना ते लवकरच उपलब्ध होईल. लेण्यांमधून विविध संस्कृतींचा वारसा आपल्यापर्यंत पोहोचतो तशीच ही लतीफकाकांची पुस्तकलेणी सर्वधर्म समभाव आणि सर्व शिक्षेचा वारसा देतील. जिज्ञासू वृत्तीतून एक सामान्य माणूस वैयक्तिक पातळीवर असा मोठा पुस्तक संग्रह बनवतो. आणि गरजूना ते ग्रंथालय विनामूल्य उपलब्ध करून देतो हे आगळं उदाहरण ठरावं. 


- गीतांजली रणशूर, पुणे.

Sunday, 10 September 2017

सोनाकाकीची जिद्द खरी, कमनशिबावर मात करी



सोनाकाकी. वय ७५. चेहरा थकलाय आणि हाताला थोडासा कंप सुटतो. पण तरीही काकीची जिद्द काही कमी नाही झालेली. मी समोर बसून प्रश्न विचारतो, "काय काय कामं केली काकी आयुष्यात?" किंचित हसून काकी मिश्किलपणे म्हणते, "चोरी न शिंदळकी सोडून बाकी सारं केलं बापा मी आयुष्यात."
काकीचा नवरा अपंग. नांगर हाणला; पाळी, कोळपन, पेरणी सगळं काकी एकटी करायची. पुढं काकीच्या हाती मोटारसायकल आली. मोटरसायकल चालवत ती डेअरीला दूध टाकायला जायची. काकीनं मळणीयंत्र, ट्रॅक्टर चालवला. ती अडाणी असूनही कशातच मागे नाही राहिली.




पण या जिद्दी सोनाकाकीच्या आयुष्याची कहाणी म्हणावी तितकी सोपी नाही. माहेर औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील पिपरगाव. ती थोडी वयात आली आणि गरिबीला वैतागलेल्या तिच्या बापाने तिचं लाखेगावतल्या गुलचंद चुंगडे यांच्याशी लग्न लावून दिलं. इथं मात्र काकीची घोर फसवणूक झाली होती. नवऱ्याची पहिली बायको जळून मेली तेव्हा तिला वाचवताना गुलचंद यांचा कमरेखालचा सगळाच भाग जळून गेला होता. नवरा अपंग झालेला.





नवरा अंथरणाला खिळून असायचा. अन काकी..! भर उन्हाळ्यात वरून सूर्य आग ओकत असताना, तापलेल्या मातीत वखर हणायची, भर पावसात एकटीनं पेरणी करायची, आणि भर थंडीत रात्री पिकाला पाणी द्यायची. भुताखेताची भीती तर तिनं केव्हाच फेकून दिली होती. मळणी झाल्यानंतर काकी स्वतः पोतं उचलून गाडीत भरायची, घेऊन यायची. काकीनं एकटीच्या जिद्दीवर शेतात 30 फूट खोल विहीरही खोदली.
संसाराचा गाडा ओढता ओढता काकीने आता या घराला सोन्याचे दिवस आणलेत. घरी किराणा दुकान आहे. दत्तक घेतलेल्या मुलासाठी मोटारसायकल आहे. शेतात भरभक्कम कडं टाकलेली विहीर आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानाशी सुसंगत शेतीची अवजारं काकीच्या कोठारात आहेत. कधीकाळी बैलगाडीत बसून कासरा ओढणारी ही बाई आता नव्या यंत्रांचे ब्रेकही तितक्याच सहजतेने दाबते.
सोनाकाकीची जिद्द आणि संघर्ष सर्वांनाच प्रेरक ठरो.

- दत्ता कानवटे.

तुझे- माझे वेगळे l कसे चक्र घड्याळाचे?


सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा :
नंदुरबार जिल्हा. नवापूर तालुक्यातलं वडसत्रा नावाचं छोटं खेडं. इथल्या जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांनी ‘मीना-राजू मंचा’चा एक उपक्रम घेतला. नाव होतं ‘घड्याळाचं चक्र’. यात शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींना कार्डबोर्डचं घड्याळ रंगवायला दिलं जातं. सकाळी उठल्यापासून तुम्ही काय काय करता? खेळ, जेवण, झोप, अभ्यास, टीव्ही पाहणे, घरातली कामं, भांडी घासणे, स्वयंपाकात मदत अशा कामांना किती वेळ देता ते वेगवेगळ्या रंगाने रंगवायचं असतं.
अर्थातच मुलग्यांच्या घडयाळात खेळ, झोप, टीव्ही पाहणे या गोष्टी जास्त रंगवल्या गेल्या. तुलनेने मुलींच्या घड्याळात घरातली कामं, भांडी घासणं, भावंडांना सांभाळणं या बाबी ठळकपणे दिसून आल्या. यातून मुलग्यांना आपोआपच समजलं की, आपण ज्या वेळात खेळ आणि मस्ती करत असतो, त्याच वेळात आपल्याच वयाच्या मुली मात्र घरची कामं करत असतात. म्हणजेच ‘घड्याळाचे चक्र’ उपक्रमाचा चांगला परिणाम दिसून आला. आपणही आपल्या घरातल्या आई- आजी आणि बहिणीला मदत केली पाहिजे, याची जाणीव त्यांना शिकविणाऱ्या सुगमकर्त्यांनी, म्हणजेच ‘मीना- राजू मंचा’चे सत्र घेणाऱ्या शिक्षकांनी या उपक्रमाद्वारे करून दिली.

मुला- मुलींशी चर्चा केली. आम्हांलाही खेळायला आवडतं, पण घरातल्या कामांमुळे बाहेर जाता येत नाही. अनेकदा कामाच्या ताणामुळे अभ्यासालाही पुरेसा वेळ मिळत नाही अशी तक्रार अनेक मुलींनी केली. याउलट मुलांचा वेळ टिव्ही आणि खेळ यात जात होता. सुगमकर्त्याने मुलांशी बोलता- बोलता ‘आई सगळ्यांच्या आधी उठते, सगळ्यांसाठी जेवण बनविते, पाणी भरते, डबे भरते आणि सर्वांची कामं करून रात्री सगळ्यात उशीरा झोपते’ या वास्तवाची जाणीवही मुलांना करून दिली. यामुळे मुलगे अंतर्मुख झाले. आई, आजी अथवा बहिणीला त्यांनी घरकामात मदत करायचं वचन दिलं.
आता नंदुरबार जिल्ह्यात वडसत्रा गावातले मुलगे महिलांना घरकामात मदत करू लागले आहेत. शिवाय बहिणींना सांगितलेली कामं ते स्वत: अंगावर घेऊन बहिणीला अभ्यास आणि खेळण्यासाठी प्रोत्साहन देतात. इतकंच नव्हे तर आळशीपणा करणाऱ्या वडील अथवा आजोबांनाही कामात मदत करण्याची विनंती करतात. गावातल्या महिला या बदलाबद्दल ‘मीना राजू मंचा’चे आभार मानतात.
घड्याळाचे चक्र’‘ या अनोख्या उपक्रमाबरोबरच इतर उपक्रमांबद्दलही जाणण्यासाठी वाचा
लेखन: स्नेहल बनसोडे- शेलुडकर

Thursday, 7 September 2017

ठळकपणाच्या पलीकडचा प्रदेश

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :
- तर मग असं आहे की निरोपाची वेळ आलीय. तात्पुरत्या का होईना! तसे निरोप असल्याशिवाय पुनर्भेटीची मजा नाही, नाही का?
गेले चौदा आठवडे आपण भेटतोय. इतक्या सलग मी आजवर फेसबुकवर कधीच लिहिलं नव्हतं नि इतक्या प्रतिसादाची अपेक्षा तर बिलकुलच केलेली नव्हती. ‘नवी उमेद’चं यात श्रेय मोठंय. खूप नव्या माणसांशी ‘नवी उमेद’नं मला जोडून दिलं नि खरंच नवा उत्साह दिला. जगण्यातल्या माझ्या छोट्याछोट्या अनुभवांना नि सापडलेल्या इटुकल्या युक्त्यांना समजून घेत माणसं बोलती झाली. शारीरिक अपंगत्त्वापलीकडे नि टिपिकल ‘प्रेरणादायक’ कॅटेगरीतून मुक्त अशी माणसं पाहायला लावावीत, त्यांचे प्रश्न कळावेत हा ही माझा इथं प्रयत्न राहिला. तो वाचकांनी बर्‍यापैकी समजून घेतला. नुसतंच भारावून जाण्यापेक्षा माणसं कृतीशील झाली तर बदल होणारच आहेत, फक्त भावुकतेच्या वेष्टणातून त्यांना बाहेर काढण्याचं काम चालूच राहायला हवं, सारखे एकमेकांना चिमटे काढत जाग ठेवायला हवी हे जाणवलं. माझ्या मैत्रिणीनं, रेणुकानं बोलता बोलता मला सांगितलेलं की बघ ना गं, आपल्याला वाटत होतं, फेसबुक हे व्हर्च्युअल माध्यम आहे... जगण्यापासून एका विशिष्ट अंतरावर राहणारं...तसं आता उरलेलं नाही. माणसांना खर्‍याखुर्‍या जगण्यासाठी मदत करणारी सिस्टीम इथं उभी राहते, व्यवस्थांना या भिंतींवर लिहिलेल्या मजकुराची दखल घ्यावी लागते नि बदल होतात. मळभ फिटतं. आता पूर्वीसारखं व्हर्च्युअल म्हणता येणार नाही या माध्यमाला! - या तिच्या म्हणण्याची प्रचिती मला आलीच! नवी उमेद टीम तर हा अनुभव रोज घेतेय...
तरीही मित्रांबरोबर याच्या उलटही चर्चा झाली.
- म्हणजे असं की फेसबुकवरच्या माणसांशी मैत्री होऊन काही तुरळक भेटी झाल्या तेव्हा ती माणसं सहजसाधी, कुठल्याही आविर्भावाविरहित भेटली होती. गप्पा झाल्या होत्या. आचरट विनोद शेअर झाले होते. समजुतींचे कसलेही घोटाळे उद्भवले नव्हते. पण फेसबुकवर जेव्हा यापैकी काहींच्यात बारकीसारकी हमरीतुमरी, चकमक किंवा स्फोटक युद्धं घडली तेव्हा धक्का बसलेला की हे असं कसं सगळं? आपल्याला कळलंच नव्हतं की काय? जी माणसं आत्ता आपल्यासमोर पेटलीहेत ती प्रत्यक्षात आपल्याला नि एकमेकांनाही किती छान भेटली होती नि वागली होती! रामायण-महाभारतात जसं दोन वीर लढताना सेकंदभर दिसायचे नि नंतर त्यांची ती चमत्कारिक अस्त्रंशस्त्रं ऊन-पाऊस, आग-वारा, साप-मुंगूस खेळायची तेव्हा ते वीर गायब होऊन त्या अस्त्रांच्या चमत्कारांनी भ्रमायला व्हायचं... फेसबुकवरच्या युद्धातही माणसं मागं सरली जाऊन त्यांचे इगो, बरेवाईट मुद्दे, मुद्दे बाजूला ठेवून झडलेली मतांतरं वगैरेंनी डोकं जडावून गेलं काही काळ. - या सगळ्यात आपल्याला नेमकं काय वाटतंय नि जे वाटतंय ते या माणसांच्या पलीकडे नेता येऊन ‘योग्य कृती’ घडतेय का आपल्याकडून याचं निरिक्षण करत राहाणं रोचक होत गेलं. कळलं की फेसबुकसारखं डिजिटल माध्यमही माणसाळलंय. तेही माणसांसारखाच अंदाज देत नाही. त्याला गृहित धरता येत नाही. अखेर फेसबुक जिवंत आहे ते माणसांमुळेच! या प्लॅटफॉर्मवर नवी नाती सापडतात, घडतात तशी ती जगण्याची अक्कलही दोन ठोके देऊन शिकवून जातात. दुधारी इथंही. तेव्हा त्या भिंतीपलीकडे जातानाही सावध व प्रत्यक्ष भेटल्यावर पुन्हा भिंतीतून आजमावतानाही सावध असावं हे बरं. दिसतं त्या पलीकडं खूपच उरतं! नकारात्मकही नि सकारात्मकही.
माझे डॉक्टर अजित कुलकर्णी. कुठल्याही अतिरेकी भावनावेगाला निरूत्तर करून टाकणारे. एका जवळच्या पेशंटविषयी विचारायला मी त्यांना फोन केलेला. विचारायला म्हणण्यापेक्षा, मनातलं पोहोचवण्यासाठी की तुम्हाला वाटतंय की प्रयत्न करावेत, पण अशा स्थितीत भाजीपाल्यासारखं जगणं किती कठीण आहे नि त्यापेक्षा मृत्यू स्वीकारार्ह! - तर डॉ.कुलकर्णी म्हणाले होते, ‘‘हे बघा, एखाद्या शरीरात ९९% सगळं निगेटिव्ह आहे नि १% कुठंतरी प्रयत्नाला दाद मिळेल असं वाटतं तर मी त्या एका टक्क्याकडेच जाणार नि तुम्हालाही सांगतो की तिकडं बघण्यातली एकाग्रता ९९ भाग वाईटाच्या पेक्षा स्थिती जास्त सुसह्य करते. आपले रेडिओलॉजिस्ट डॉ.संतोष सरूडकर यांचं ‘डायग्नॉसिस’ मला फार आवडतं. दिसणार नाही अशी गोष्ट त्यांना तत्काळ दिसते. ते खोलात शिरून अवगत झालेलं कौशल्य आहे. पण आता ‘आम्ही’ जे ठळक दिसतंय त्यापेक्षा जे दिसत नाही ते हुडकण्याच्या स्टेजला आलेलो आहोत. असंख्य अडचणी ठळक दिसणं-वेळेआधी कळणं हा म्हटलं तर प्लस पॉईंट आहे. पण ते कळतंय हे तुमच्या अनुभवावरून नि त्यामुळे आलेल्या वकुबामुळे! ते आलेलं आहे, तर आता जे आलेलं नाही त्या न दिसणार्‍या भागाकडे पाहायला शिकलं तर कदाचित नवा प्रदेश कळेल, चांगल्या शक्यतांचा. तुम्ही व्हीलचेअरवर आहात हे सत्य आहे, ते कळलं आहे. आम्ही तुम्हाला बघताना तुमची व्हीलचेअर आमच्या लक्षात येत नाही... पण तुम्हीही ती विसरला आहात ना?’’
कुठच्याही ठळक गोष्टींपलीकडं जो प्रदेश उरतो त्याची लांबी, रूंदी, खोली नि घनता ठाऊक नाही... ठाऊक नाही म्हणून उत्सुकता नि भीती आहे ... तरीही, तिकडं जायला लागण्यानं बरं नि खरं वाटणारे.
- सोनाली नवांगुळ