Monday, 7 August 2017

अनोखी राखीपौर्णिमा

राखीपौर्णिमेचा आजचा दिवस बहीण भावंडांसाठी महत्वाचा. बुलढाण्यातील खामगाव येथील 'किडझी संस्कार ज्ञानपीठ' या शाळेने मात्र तो अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. गावातील महिला पालकांनी महिला शिक्षिकांना आज राखी बांधली आहे. शिक्षक आणि पालक यांच्यातील नातं मजबूत व्हावं, यासाठी हा उपक्रम शाळेने घडवून आणला.
- अमोल सराफ, बुलढाणा


Sunday, 6 August 2017

अंध मुलांच्या डोळस ‘राख्या’



वाशीम जिल्ह्यातील केकतउमरा गाव. यावर्षी गावातील अंध मुलांनी राख्या तयार करायचा उपक्रम हाती घेतला आहे. चेतन सेवांकुर दिव्यांग फाउंडेशनची ही मुलं सदस्य आहेत. फावल्या वेळात राख्या बनवून त्यांची विक्री करून निराश न होता जीवन जगू शकतो, असा संदेशच त्यांनी यातून देण्याचा प्रयत्न केला आहे
या अंध कलाकारांनी तयार केलेल्या राख्या औरंगाबाद, हिंगोली, अमरावती, अकोला जिल्ह्यात विक्रीसाठी पोचल्या आहेत. जिल्ह्यातील विविध शाळांमध्येही राखी विक्री त्यांनी सुरु केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी पाच हजार राख्या तयार केल्या आहेत. अजूनही राख्यांचे काम सुरु असून त्या वाशीमच्या शाळेत आणि बाजारात विकणार असल्याचं मुलांनी सांगितलं. यातून मिळणाऱ्या पैशातून आमच्या उदरनिर्वाहाला मदत मिळणार असल्याचंही मुलं सांगतात. 




एकीकडे नियतीकडून अंधकारमय जीवन मिळालेलं, तरीही निराश न होता जगण्याची जिद्द आणि काही करत राहण्याची धडपड खरीच कौतुकास्पद. 

 - मनोज जयस्वाल.

सरितानं तर ऑलिम्पिकमध्ये खेळावं!!

सुजाण शिक्षक; जाणत्या शाळा : सरितानं तर ऑलिम्पिकमध्ये खेळावं!!
लेखन: स्नेहल बनसोडे-शेलुडकर, पुणे.

15 जानेवारी, 2017. ‘स्टॅडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरॉथॉन’ स्पर्धा. देशोदेशीचे कसलेले स्पर्धक या स्पर्धेत भाग घेतात. या मॅरॉथॉनमधील 6 किलोमीटरच्या‘ड्रीम रन’ स्पर्धेत एक काटक चिमुरडी जोशात धावते आहे आणि थोड्याच वेळात निकाल जाहीर होतो – “…and the First Prize for the Dream Run goes to Miss Sarita Gawade!”टाळ्यांच्या कडकडाटात 14 वर्षांची सरिता पुरस्कार घेते. तिच्याहून मोठ्या असलेल्या, शहरात राहून उत्तम प्रशिक्षण घेतलेल्या देशी- परदेशी महिलांना मागं टाकत सरिताने ही स्पर्धा जिंकली आहे.

सरिता कोल्हापूरची. चंदगड तालुक्यातील सोनारवाडीत राहणारी. कालानंदीगड विद्यालयात ती सध्या आठवीत शिकते आहे. गावापासून शाळा सुमारे आठ किलोमीटरवर. स्कूल बस किंवा रिक्षा असे लाड त्यांच्या छोट्याशा गावात नाहीत. तिच्या गावाच्या आसपासचा सगळा परिसर डोंगराळ, तीव्र चढ उताराचा आहे. सरिता या डोंगर-दऱ्यांमधून वाट काढत धावत-पळतच शाळेत येते.



“सरिताची जिद्द वाखाणण्याजोगीच आहे, सरिताच्या गावाला साधा रस्ता सुद्धा नाही. बऱ्याचदा घरातली, शेतीची कामं करून सरिताला शाळेत यावं लागतं. वडिलांची थोडीफार शेती आहे, पण एकूण परिस्थिती गरिबीचीच आहे.” सरिताचे शिक्षक तानाजी पाटील सर सांगत होते, “मात्र तिच्यामधले उत्कृष्ट खेळाडूचे गुण आम्ही हेरले होते. तिला वेगवेगळ्या खेळाच्या स्पर्धांमधे भाग घेण्यासाठी आम्ही प्रोत्साहन देतो. आणि तीही ज्या स्पर्धेत जाईल त्या-त्या ठिकाणी प्रथम क्रमांक मिळवूनच येते!”

सरिता या प्रतिष्ठित मॅरॉथॉन स्पर्धेत पोहोचली कशी? याचं उत्तर सोनारवाडीतच मिळालं. गावातली एक मुलगी धावण्याच्या स्पर्धेत पारितोषिकं मिळविते, हे गावातल्या जयेंद्र नाईक यांच्या नजरेत भरलं. ते ‘राजर्षी शाहू महाराज कला अकादमी’शी देखील जोडले गेले आहेत. ही अकादमी श्रीकांत नाईक यांनी स्थापन केलेली आहे. शिवाय दोघेही मुंबईच्या ‘कोरो’ संस्थेचे कार्यकर्ते. या अकादमीतर्फे गावातल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी शिक्षण आणि खेळासंबंधित उपक्रम घेतले जातात.



याच अकादमीमार्फत जयेंद्र नाईक यांनी सरिताचा शास्त्रशुद्ध सराव घेण्यास सुरूवात केली. गावाच्या आजूबाजूच्या रस्त्यांवर धावण्याचा सराव घेतला. दमसाँस टिकावा यासाठी काही विशिष्ट व्यायामप्रकार शिकविले. सरितानेही उत्तम सराव केला. तिची कामगिरी पाहून श्रीकांत नाईक आणि जयेंद्र नाईक यांनी तिला मुंबईच्या स्टॅडर्ड चार्टर्ड मॅरॉथॉन स्पर्धेत पळविण्याचे नक्की केले. 

“सरितानं तर ऑलिम्पिकमध्ये खेळावं, असं आमचं स्वप्न आहे” असं तिचे वडील रामू गावडेंनी सांगितलं. तिनं खेळातच करिअर करावं, या मताला आई सविता गावडे यांनीही दुजोरा दिला. तिने शिक्षणही घ्यायलाच हवं, याबद्दल ते आग्रही आहेत.
ऑलिम्पिकमध्ये धावण्याचं स्वप्न पाहणाऱ्या सरिताची कथा विस्ताराने वाचण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/mr/sarita-should-be-in-the-olympics/

Friday, 4 August 2017

हिंगोलीकरांचा चिमणघास



दुष्काळी हिंगोली जिल्ह्यात मुलामुलींच्या शिक्षणाची गाडी चालूच राहावी यासाठीचा एक उपक्रम मागच्या तीन वर्षांपासून सुरू आहे. हिंगोलीतले औषधविक्रेता आणि नाट्यकलावंत सुनील पाटील-खिल्‍लारी यांनी सुरू केलेल्या ‘चिमणघास’ उपक्रमात तीन वर्षात सुमारे 12 लाखापर्यंत रक्‍कम गोळा करून शैक्षणिक साहित्य, वस्तू व रोख स्वरूपात 219 गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोचवली.
कसं सुचलं हे? सुनील सांगतात, “हिंगोली जिल्ह्यात डिसेंबर 2014 मध्ये वाढत्या शेतकरी आत्महत्या पाहून मी अस्वस्थ झालो. शेतकर्‍यांसाठी काही करावं म्हणून मित्रांसोबत 100 गावांमध्ये आठवडी बाजार, मंदीरं, गर्दीच्या ठिकाणी जाऊन शेतकर्‍यांनो आत्महत्या करू नका, असं आवाहन केलं. त्याला चांगला प्रतिसादही मिळाला. मात्र त्याचवेळी अनेक मुलगे-मुली शहरातलं शिक्षण परवडत नसल्याने गावाकडे परतत असल्याचं दिसलं. हिंगोली शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयांतून ग्रामीण विद्यार्थ्यांची गळती होण्याचं कारण दुष्काळ हे स्पष्ट झालं. बहुतांश विद्यार्थ्यांचे पालक शेतकरी असल्याचंही लक्षात आल्यानंतर जमेल ती मदत करण्याचं ठरवलं. 
‘चिमणघास’ सुरू कसा झाला? सर्वप्रथम हिंगोलीतील शासकीय तंत्रनिकेतनमधून 25 गरजू विद्यार्थी निवडले. डिसेंबर ते एप्रिल असा पाच महिन्यांचा त्यांचा जेवणाचा खर्च उचलला. यासाठी लोकांकडून 500 ते 1000 रूपयांची मदत मिळाली. ऑक्टोबर 2015 ते एप्रिल 2016 या कालावधीत निरनिराळ्या महाविद्यालयांतील 210 विद्यार्थ्यांना दर महिन्याला प्रत्येकी 1 हजार रूपयांची मदत सलग 7 महिने केली. ऑक्टोबर 2016 ते एप्रिल 2017 या दरम्यान 48 गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी 4 हजार 500 रूपये मदत केली. या काळात नोटाबंदीमुळे काही अडचणी आल्या. मात्र गरजूंना मदत देता आली.
एका विद्यार्थ्याला धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यायचा होता. त्याच्याकडे स्पोर्टस शूज नव्हते. ‘चिमणघास’चे 1 हजार रूपये मिळाल्यावर त्याने बुटांची खरेदी केली आणि तो विद्यापीठस्तरावरील स्पर्धेत सहभागी होऊन विजयी झाला. हा चिमणघास गरजू शेतकर्‍यांसाठीही आहे. गेल्या साली सातेफळ, ता वसमत इथल्यात बालाजी अंभोरे या शेतकर्‍याच्या घराला आग लागून लेक मुक्‍ताई हिच्या लग्‍नाच्या खरेदीसह घरातलं सगळंच जळून खाक झालं. अंभोरे कुटुंबीय उघड्यावर आले. सुनील पाटील यांनी 50 हजार रूपयांची मदत केली. त्यामुळे मुक्‍ताईचं लग्‍नही पार पडू शकलं.
‘चिमणघास’ला हरीश खिल्‍लारी, प्रा.गिरीष डाफणे, संतोष बाहेती, विजय मुधोळ, राजेश बालदी, कुमार भालेराव, गजानन राटनालू, प्रा.गोविंद सुडे, निनाजी कांडेलकर यांच्यासह अनेकांची मदत मिळत आहे. जिल्ह्याजिल्ह्यात, तालुक्यात, गावागावांत गरजूंच्या मदतीसाठी दात्यांनी पुढे यावं, असं सुनील पाटील सांगतात. ते म्हणाले, “काही महिन्यांपूर्वी लातूरला बसच्या पाससाठी पैसे नसल्याने एका मुलीने आत्महत्या केली होती. असे प्रकार घडू नयेत यासाठी गरजूंना आपआपल्या परीने मदत केली पाहिजे. ज्या गरजूंना आम्ही मदत करत आहोत, तेच विद्यार्थी हा वसा जपून भविष्यात इतर गरजवंतांना मदत करतील आणि समाजसेवेची ही ज्योत अशीच सुरू राहील.”  

 - -बाळासाहेब काळे

Thursday, 3 August 2017

- जे वापरणार त्यांचं मत घ्या नं!

 व्हीलचेअरवरून गुजगोष्टी
अनेक ठिकाणी शक्य तिथं पाय-यांच्या शेजारी किंवा पाय-यांऐवजी रॅम्प्स असतात. पाहिलेत नं तुम्ही? त्यावरुन चढून उतरून पाहिलंत की नुसतं डोळ्यांनी?
काही ठिकाणी रॅम्प फार भारी असतात. मला आठवतंय, जेव्हा मी ‘हेल्पर्स ऑफ दि हॅण्डिकॅप्ड’च्या हॉस्टेलमध्ये राहून काम करायचे तेव्हा तिथली मला सगळ्यात आवडणारी जी गोष्ट होती ती म्हणजे रॅम्प. हॉस्टेलच्या रिसेप्शनपासून थेट खाली डायनिंगपर्यंत जाणारा, मध्येमध्ये थोडासा थांबा असणारा हा रॅम्प म्हणजे शिणवटा घालवण्याचा राजमार्गच. सकाळी गडबडीनं आवरुन ऑफिसकडे जातानाच्या घाईत तो कधी चढून व्हायचा कळायचं नाही... आणि रात्री श्रमून आल्यावर, अंगात जीव नसायचा तेव्हा त्या रॅम्पवरून व्हीलचेअरच्या रिमवरची पकड ढिली केली की अशी झुईंकन ती खाली जायची की त्या वेगानं दमणूक गायब व्हायची. त्यातून निर्माण झालेला वारा सुख द्यायचा. व्हीलचेअरच्या रिमवर कंट्रोल जबरदस्त होता त्यामुळं कुणाला किंवा कशालातरी जाऊन थडकले नि नवा व्हीलचेअरबाऊण्ड तयार केला असं काही घडलं नाही. - विनाअडथळा लांब अंतर पार करण्याचं सुखच और! (या वाक्याचा याच संदर्भानं अर्थ घ्यावा.)
ही इमारत आर्किटेक्ट प्रमोद बेरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेली. एक मीटर उंची असेल तर किमान आठ मीटर लांबी हवी हे गणित तिथं रॅम्पबाबतीत फॉलो केलेलं. शिवाय व्हीलचेअरवरच्या चाकांची जमिनीवरची पकड जाणार नाही, कुबडी व वॉकर घेऊन चालणारे घसरणार नाहीत, चालणार्‍यांचा जमिनीवर पाय ठरू शकेल असा फरशीचा पोत. ना गुळगुळित, ना अतिरेकी खडबडीत.
कोल्हापुरात असंही शल्यचिकित्सेचं हॉस्पिटल पाहिलेलं जिथल्या प्रवेशद्वाराच्या रॅम्पचा तीव्र उतार पाहून तिथले पेशंट वाढणार याची खात्री पटलेली.काही ठिकाणी जागेमुळं शक्यच नसतं रॅम्पच्या लांबीचं नेमकं गणित जुळवणं, तरीही ते प्रयत्न खूप मन:पूर्वक केलेले असतात व अगदीच त्रासदायक नसतात.काही ठिकाणी जागेमुळं शक्यच नसतं रॅम्पच्या लांबीचं नेमकं गणित जुळवणं, तरीही ते प्रयत्न खूप मन:पूर्वक केलेले असतात व अगदीच त्रासदायक नसतात. मात्र अनेक ठिकाणी लॉजिकच कमी पडतं तेव्हा चिडावं का रडावं कळत नाही. दिल्लीच्या सहलीला गेलो होतो तेव्हा मेट्रोतून प्रवास करायची खूप इच्छा होती. ज्या ठिकाणहून सोपं पडेल तिथं पोहोचलो. लिफ्ट होती अंडरग्राउंड जायला मात्र लिफ्टपर्यंत जायला पाच पायर्‍या आणि पाय-या चढून वर पोहोचल्यावर व्हीलचेअर नीट प्लेस करता यावी अशी जागा पुरेशी नाहीच. कसंबसं पोहोचलो तर लिफ्ट योजनेत बांधून दिलेल्या संडाससारखी! जेमतेम! व्हीलचेअरचे फूटरेस्ट काढून कोंबावं लागलं स्वत:ला आत. - बरेचदा होतं असं की अनेकजण सांगतात, ‘तुम्हाला आमच्या घरी नक्की येता येईल, लिफ्ट आहे.’ .. पण लिफ्टपर्यंत जाण्यासाठी असणार्‍या पाय-या किंवा तिथं कधी कधी असलेला उंबर्‍यासारखा उंचवटा-खोली याचे तपशील देणं आवश्यक आहे असं त्यांच्या लक्षात येत नाही नि गोंधळ उडतात.
 जळगावचं ‘गांधी तीर्थ’ मला खूप आवडलेलं. व्हीलचेअरशी अतिशय मैत्रीपूर्ण रचना असलेलं आहे ते. तिथं विक्रीसाठी असलेल्या दालनाचे दोन भाग होते... खालच्या भागात जायला रॅम्प होता. रॅम्प मापात अगदी परर्फेक्ट होता, पण त्यावरून खाली जाताना बारीकबारीक हिसके बसायला लागले नि रॅम्पवर केलेल्या खांचांमध्ये चेअरची छोटी चाके अडकून चेअर उलटण्याची भीती वाटायला लागली. उतरताना कशीबशी उतरले पण चढताना ताकद रेटेना. मी तिथल्या व्यवस्थेवर लक्ष ठेवणार्‍या कार्यकर्त्याला म्हटलं, ‘‘इतकी अप्रतिम आहे ही वास्तू. दृष्ट लागू नये म्हणून ही रॅम्पची चूक ठेवली असेल का?’’ - तर ते दादा म्हणाले, ‘‘कसंय ना, व्हीलचेअर एकदम वेगात येऊ नये व त्या माणसाला त्रास होऊ नये म्हणून कंट्रोल होण्यासाठी मुद्दाम ही व्यवस्था केलीय.’’ - मी म्हटलं, ‘‘होय हो, पण तुम्हाला जी सोय वाटते ती अशा माणसांसाठी, खास करून पाठीची दुखणी आहेत अशांसाठी खूप त्रास ठरू शकते. मी स्वत: कैक वर्ष व्हीलचेअर वापरते. मला थोडंतरी ठाऊकच असेल ना अशा माणसांना कशाची सोय वाटत असेल हे!’’ - कार्यकर्ता मात्र ही सोयच आहे यावर ठाम होता. - असंच झालंय आमच्या शिवाजी विद्यापीठाच्या नवीन झालेल्या खर्डेकर वाचनालयाच्या प्रवेशद्वाराशी. बाकी नवी बांधलेली इमारत अपंगत्त्वाशी मैत्रीपूर्ण व सुंदर, पण रॅम्प मात्र हा असा तबडकतबडक खाचाखोचांच्या अडथळ्यांचा! - इथं मात्र लायब्ररी व्यवस्थापकांना हा दोष सांगितल्यावर पटलायसं दिसतं. ते बदलेलं असेल तेव्हा नक्की पटलंयचा पुरावा मिळेल.
कुठच्या अपंगत्त्वाला काय सोयीचं याबद्दल रचना ठरवत असताना सोयींचा वापर ज्यांच्याकडून अपेक्षित आहे अशा माणसांनाच सामील करून का बरं ठरवत नसतील?
 - सोनाली नवांगुळ








Wednesday, 2 August 2017

मालपुरातली सलोख्याची माळ



सामाजिक सलोखा बिघडत चालला असल्याचं आपल्याला दिसतं. तरी एकता, बंधुभाव टिकून असणारी गावंही दिसतात. यापैकीच एक महाराष्ट्रातलं धुळे जिल्ह्यातलं, शिंदखेडा तालुक्यातलं मालपूर गाव. या गावात ३६ विविध जाती-धर्माचे लोक राहातात. हिंदू, मुस्लिम, बौद्ध, धनगर, मराठा, कुणबी, राजपूत, कोळी, माळी अशी इथली जात-धर्मविविधता. हे सारे लोक मालपुरात पिढ्यानपिढ्या एकत्र राहत आहेत.



जिल्ह्याच्या ठिकाणापासून ७० किलोमीटर अंतरावरचं हे १५ ह्जार लोकसंख्येचं मोठं गाव. ग्रामपंचायत सदस्य १७. इथली ग्रामपंचायत निवडणूकदेखील बिनविरोध झालेली. इथे कधी जाती-धर्मावरून मोठा तंटा झालेला नाही. किरकोळ भांडणतंटे आपसातच सामंजस्याने सोडवले जातात. पोलीस गावात आलेच तर फेरफटका मारायला येतात. कुठला गुन्हा दाखल करण्याचा आहे म्हणून पोलीस गावात आलेलेच नाहीत.
गावात राजेशाही काळातल्या खुणा आहेत. गावात काही सोयी आहेत. काही गैरसोयीदेखील आहेत. गावात स्त्रिया एकोप्याने आणि पुरुषही मिळून-मिसळून राहतात. एकमेकांच्या सुख दुःखात नातेवाइकांआधी गावकरीच साथ देतात. कोणावर संकट आलं तर सगळेजण एकत्र येऊन दूर सारतात. गावाने टिकवलेलं बहुविधता, एकोपा, सलोखा हे सगळं पुढच्या पिढीकडेही संक्रमित केलं आहे. गावाने राजेशाही पाहिली, ब्रिटिशांचा काळ पहिला. आता लोकशाही व्यवस्थेने गावाचा कारभार चालतो. मोठा कालप्रवाह लोटला तरी गावातला सद्भाव आटला नाही. उलट वाढलाच आहे. 

 - प्रशांत परदेशी.

Tuesday, 1 August 2017

पालकत्व जास्तीत जास्त आनंददायी कसं होईल


मी आणि माझा नवरा तुषार, दोघंही गडचिरोलीत आदिवासी क्षेत्रात, डॉ. अभय आणि डॉ राणी बंग यांच्या सर्च संस्थेत १९९३ पासून कार्यरत आहोत. आपल्या मुलांना कसं वाढवायचं याबाबतीत आम्हाला काहीच स्पष्टता नव्हती. आमच्या मुली तन्वी आणि गुंजन यांच्यासोबत जगतानाच पालकत्वाचा उलगडा होत गेला. संस्थेची मूल्य, गांधी विचारसरणीची दिशा यामुळे रोज प्रार्थना, नियमित श्रमदान, खेळण्यासाठी सुविधा, मुलांसाठी समृद्ध वाचनालय असं मुलांसाठी संस्कारात्मक खाद्य आजूबाजूला उपलब्ध होतं. तुषारची अतिशय सकारात्मक दृष्टी आणि साथ होतीच.
मुलींनी डॉक्टर किंवा आमच्यासारखंच सामाजिक कार्यकर्ता व्हावं का, यावर चर्चा व्हायची. मोठ्या मुलीने इंजिनिअरिंग निवडलं. मुंबईला VIT ला Biomedical Engineering ला प्रवेश घेतला. कुवतीच्या पलीकडे जाऊन आम्ही तिच्या इच्छेचा मान राखला. पण तिच्यासाठी ते शिक्षण कठीण गेलं. गडचिरोलीसारख्या गावातून मुंबईत जाऊन शिकताना, जुळवून घेताना ती स्वत:ला हरवून बसली. सहा महिन्यानंतर घरी परतली तेव्हा विचलित मनस्थिती आणि तब्येत ढासळलेली. मला हे सोडायचं आहे, म्हणून ढसा ढसा रडली. आम्ही हादरलो. लोक काय म्हणतील, झालेला खर्च आणि आता पुढे काय करायचं? मग आम्ही दोघांनीही ठरवलं, की तिने शिक्षण enjoy करायला हवं. पर्यायांचा विचार करताना BSC Nutrition करायचं तिने ठरवलं. नातेवाईक, मित्र यांच्याकडून बोलणी खाऊनही आम्ही तिच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो.
लक्षात आलं की आपलं मूल हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व असतं. विरोध न करता समतोल सांभाळून शांतपणे त्यांचं ऐकणं, संवाद साधणं, अजिबात रिॲक्ट न होता समजावणं, पुढील दिशा दाखविणं मी शिकले. यात तुषारच माझा गुरु होता. ज्या मुंबईत ती काही वर्षांपूर्वी adjust झाली नव्हती, तिथेच ती आता BSc अंतिम वर्षात शिकत आहे.
एकदा मुलींसोबत सायकल रिक्षा केली. मी रिक्षावाल्यासोबत भाव करू लागले. माझी 9 वर्षाची मुलगी म्हणाली, आई, त्या काकांचं, त्यांच्या मुलांचं त्या रिक्क्षामुळे पोट भरतेय. तू कशाला घासाघीस करतेस? त्या क्षणी माझीच मला लाज वाटली. आपली पोर किती संवेदनशील आहे याचा प्रत्ययही आला.
माझी 80 वर्षाची आई माझ्याकडे असायची. (अलिकडेच ती गेली.) म्हातारं माणूस - सतत सूचना, चौकशा. मी वैतागून जायचे. कधी कधी त्याचा स्फोट व्हायचा. एकदा माझी धाकटी मुलगी गुंजी शांतपणे म्हणाली, “आई, तू नानीवर का ओरडतेस? पुढे तू म्हातारी झाल्यावर मी अशीच ओरडले, तर तुला आवडेल का?” मी विचारात पडले. पालक म्हणून कोणी कोणाला शिकवलं? कळत नकळत असं मुलं आपल्याला शिकवत असतात. नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग मी मुलींकडूनच शिकले.
मी कामानिमीत्त दौ-यावर असण्याच्या काळात मुलींना भावनिक असुरक्षितता जाणवायची. वहीत “आई, लवकल ये” लिहिणं. माझ्या ओढण्या, साड्या घेऊन झोपणं. का? तर आई तुझा सुगंध आम्हांला येतो, तू आमच्याजवळच आहेस, असं वाटतं. त्या काळात तुषार रोज मुलींना कुशीत घेऊन झोपायचा. छान सांभाळायचा.
सुटीच्या दिवशी मात्र मुलींसाठी पूर्ण वेळ द्यायचा, हे ठरलेलं. जंगलात ट्रेकला जाणं, तिथे काड्या गोळा करून चुलीवर स्वयंपाक करणं, प्रवासात गाणी म्हणणं, कविता रचणं वगैरे. साधी घरची गाडी दुरुस्त करायलाही तुषार मुलींना घेऊन बसायचा, गाडीच्या पार्टची ओळख करून द्यायचा. मुलींसोबत बसून तासंतास गप्पा मारायचा. आज कदाचित त्यामुळे मुलींनाही माझ्यापेक्षा आपल्या बाबाच्या कुशीत जास्त सुरक्षित वाटतं. रोज झोपण्याच्या आधी त्यांना काहीतरी वाचून झोपायची सवय लागली ती अजूनही आहेच.
त्यांच्या दहावी-बारावीचा ताण आम्हालाही होताच. मी या काळात दोन वर्ष बिनपगारी रजा घेऊन मुलींसोबत नागपूरला शिफ्ट झाले. पूर्ण वेळ त्यांच्यासोबत राहता आल्याचा मला, मुलींना बराच फायदा झाला. आम्हा दोन पिढ्यांतलं अंतर कमी करणं साधता आलं. पालकत्व जास्तीत जास्त आनंददायी कसं होईल तेच आम्ही बघत आलो आणि बघू. हा प्रवास अविरत सुरूच आहे.
 प्रवास पालकत्वाचा – सुनंदा खोरगडे