Tuesday, 15 August 2017

प्रत्येकालाच आदर्श पालक व्हायचं असतं



समाजाभिमुख वकिलीची कल्पना प्रत्यक्षात आणणारे अॅड असीम आणि त्यांच्या पत्नी अॅड रमा सरोदे यांची स्वतःच्या बाळासोबत एक दत्तक मुलं असावं अशी इच्छा होती. पण, घरच्यांच एकमत झालं नाही. आज त्यांचा मुलगा रिशान १२ वर्षाचा आहे. रिशान शब्दाचा अर्थ आहे - गुड हयुमन बिईंग. पालकत्वाच्या प्रवासाविषयी असीम भरभरून बोलले.
“परिपूर्ण पालकत्व असं काही नसतं. प्रत्येकालाच आदर्श पालक व्हायचं असतं. पण प्रत्यक्ष जीवनाची लढाई, पैसे कमावण्याचे ताण हा विचार क्षणभंगुर ठरवितात. आपण खरोखर जसे आहोत, तसं राहाणं अणि आपल्या मुलासोबत स्वतःला विकसित करत जाणं ही एक प्रक्रीया आहे.
रिशान माझ्यासोबत माझ्या विविध जाहीर सभांना, वेश्या, अपंग, एचआयव्हीबाधी, कारागृहातले कैदी अशा समाजघटकांच्या कार्यक्रमांना, भारतात आणि ऑस्ट्रेलिया- दुबईतल्या न्यायालयांमध्ये येत असतो. अशा ठिकाणी येण्याचा एक वेगळा प्रभाव त्याच्यावर पडतोच. त्याची विचार करण्याची प्रक्रिया, एखादया विषयावर भूमिका घेण्याची ताकद मला आत्ताही जाणवते. मला कामामुळे ब-याचदा समाजकंटकांकडून धमक्या येतात, जिवालासुध्दा भीती असते. यामुळे रिशानला नक्कीच असुरक्षित वाटतं. अशा वेळी मी त्याला केसेसबद्दल माहिती देतो. चांगलं काम केलं, तरी लोक त्रास देतात हे समजावून सांगतो.
रिशानच्या मनात माझ्या आणि त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या खूप आठवणी असाव्यात असं मला वाटतं. यात खरं तर रमाने आई म्हणून बाजी मारली आहे. रिशानच्या काही आठवणी मला आजही महत्वाच्या वाटतात.
एकदा त्याने मला विचारलं, की टु झीरो व्टेन्टी, थ्री झीरो-थर्टी, फोर झीरो फोर्टी, फाईव्ह झीरो फिफ्टी - तर मग वन-झीरो वन्टी असं आपण का नाही म्हणत? अत्यंत लॉजिकल विचार करणारा हा मुलगा असल्याची त्याने दाखविलेली चुणुक मला सुखावून गेली होती. माझ्यातल्या काही वाईट गोष्टीही त्याच्यात आहेत. उदा - गणिताचा त्याला असलेला कंटाळा. मी त्याला गणिताचं महत्व सांगायला जातो तेव्हा तो सांगतो, “बाबा, अरे जवळपास 85 % मुलांना गणित आवडत नाही. मी काही एकटाच नाही.” यावर काय बोलणार? मी त्याच्या वयात इतका स्मार्ट नव्हतो. कदाचित प्रत्येकच आई-बापाला आपल्या मुला/मुलीबद्दल असंच काहीतरी वाटत असेल
.
रमाचे आणि माझे अनेकदा वादविवाद होतात. एकदा रिशानने मला बाजूला नेउन समजावणीच्या सुरात म्हटलं “बाबा, तू जे आईला सांगतोस ते बरोबर असतं. पण ते तू न ओरडता सांगत जा ना!” नंतर मला कळलं की तो असंच रमाशीही बोलला. हा मुलगा तर माझाच बाप आहे, असं मला वाटलं.
रिशानसाठी पुरेसा वेळ देणं योजलं तरी शक्य होत नाही. तरी वेळ काढून मी त्याला बातम्या आवर्जून वाचून दाखवतो. कधी टीव्हीवरील बातम्या बघताना चर्चा करतो. रिशान मुळात चौकस आहे. त्याची स्वतःची अशी मतं असतात. एखादी समस्या असते, तेव्हा तो नक्कीच आम्हा दोघांशी बोलतो.
आपल्या मुलाने खूप पुस्तकं वाचावी असं बहुतेक पालकांना वाटतं. रिशानच्या वाचण्याचा फॉर्म वेगळा आहे. तो व्हिज्युअल वाचनाने म्हणजे गुगल सर्च, यु- टयुबवरील माहीतीपट याने स्वतःला अपडेट ठेवतो. त्याची या वयात सगळयांशी मिळून-मिसळून राहण्याची वृत्ती, जनसंपर्क याचं आम्हाला कौतुक आहे. आमच्याकडे येणा-या परदेशातील मुला-मुलींशीसुध्दा रिशान सहज संवाद साधतो.
७ वर्षांच्या रिशानने नागपूर आकाशवाणीने घेतलेल्या मुलाखतीत, अगदी आत्मविश्वासाने वाघांना वाचवा, प्राण्यांना-झाडांना जगू द्या हे पोटतिडकीने सांगितलं होतं. त्याला लिखाणाची, कवितांची,फुटबाँल, स्विमिंग, कुकींग याची आवड आहे. त्याने मोठेपणी वकील बनावं की शेफ की आणखी काही, याचं त्याला पूर्ण स्वातंत्र्य आहे. त्याने एक संवेदनशील आणि काळजी घेणारी व्यक्ती असणं महत्वाचं आहे.
काहीही कारण नसतांना आनंदी राहाण्याचं बालवय रिशानने पार केलं आहे. कारण हल्ली तो अनेकदा ‘बोअर’ होतो. आधी तो खेळणी खेळण्यात मग्न असायचा, वहया-पुस्तकांच्या इमारती करायचा. पण आता तो नेहमी टिव्ही बघतो किंवा मोबाईलवर यु-टयुब बघतो. मला हे आवडत नाही असं त्याला सांगायचं आहे. त्याच्यातील सर्व ताकदीने त्याला जे पाहिजे ते मागतो. अनेकदा इमोशनल करून मागतो. पण मग आम्हालाही त्याला काहीतरी चांगलें सांगायचं आहे. ते तो ऐकेल कां? त्याच्या सर्व क्षमता त्याने वापराव्यात, वाचन वाढवावं, सगळं जग पुस्तकातूसुध्दा बघावं असं त्याला पटवुन दयायचं आहे.
आम्हा बाप-लेकाचे खटके उडतात आणि तो रागात मला काही बोलतो. तर मीही अजाणतेपणे माझ्या वडिलांना असंच बोलून गेलो होतो आणि माझ्या बाबांना त्याचं वाईट वाटले असेल, हे मला आता उमजतंय.
एकदा मी आणि रमा आपापल्या कामांसाठी घराबाहेर होतो. रिशानची आजी (डॉ.मंगल)आजारी होती. आम्ही घरी आलो आणि आश्चर्यचकीत झालो. आजीला त्रास होउ नये म्हणून रिशानने अक्षरशः पोळया आणि बाकी स्वयंपाक स्वतः केला होता. बेडवर झोपलेल्या आजीला वस्तू कुठे आहेत, कशानंतर काय करायचं, असं विचारत त्याने स्वयंपाक केला होता. त्याची ही संवेदनशीलता आणि समजदारी नक्कीच महत्वाची आहे. आजीवर त्याचा जीव आहे. आजी आजारी असली की, तिला गरम पाण्यात पाय शेकायला सांगणार, हातपाय चेपून देणार असा त्याचा सेवाभाव. वाटतं की रिशान असाच चांगला माणूस रहावा. समाजातल्या ताकदवान प्रवाहात तो भलतीकडेच वहावत जाउ नये.
आम्ही येरवडा आणि इतर कारागृहांमध्ये मोफत कायदासहाय्यता, कैदयांची सुटका झाल्यावर त्यांना काम मिळवून देण्यासाठी मदत करायचो. नव-याचा खून केल्याबद्दल अटक झालेल्या एका बाईला जामिनावर सोडवल्यावर तिनेही काम मागितलं. आपण कुणाला नेहमीसाठी गुन्हेगार समजू नये, प्रत्येकावर विश्वास ठेवावा इत्यादी सांगणं सोपं असतं. कारण तिला आमच्या घरी काम द्यायचं नाही यावर माझी आई, रमाची आई व इतर ठाम होते. लहानग्या रिशानला घरी तिच्यासोबत कसे ठेवायचं, हा मुद्दा होता. पण आम्ही तिला रिशानला सांभाळायचं काम दिलं. ती 2 वर्षे आमच्यासोबत होती. माझा मदतनीस संजय जाधव आमच्या घरातलाच सदस्य. हा रिशानचा संजयकाका. त्याला मी थोडं जरी ओरडून बोललो तरी रिशान माझ्याशी अबोला धरायचा. संजयकाकाला सॉरी म्हण, असं सांगायचा. मला वाटतं, रिशानचा स्वभाव संजयसारखा सेवाभावी व्हावा. रिशानवर परिणाम करणारी अशी अनेक माणसं आहेत. अशा अनेक छान लोकांसोबत तो मोठा झाला आहे.
पुस्तकं वाचून पालकत्व निभावता येत नाही. उलट पुस्तकी पालकत्वामुळे नैसर्गिक वागणं गायब होउ शकतं. जीवनानुभवातून आपलं मूल माणूस म्हणून घडवणं आणि त्याला पाठींबा देणं हे इतर गोष्टींपेक्षा महत्वाचं.

प्रवास पालकत्वाचा: मानवी हक्क विश्लेषक अॅड.असीम सरोदे
  मेघना धर्मेश

#Parenting #नवीउमेद

Sunday, 13 August 2017

व्हॉट्स ग्रुपची वाचन चळवळ

नाशिक मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून WhatsApp च्या मदतीने एक वाचन चळवळ सुरू आहे. मुलं आणि पालकांचा सहभाग हे या चळवळीचं वैशिष्टय. एका वर्तमानपत्राचं वाचन करायचं. त्यातून WhatsApp वर प्रश्नमंजुषा तयार करायची आणि तिथूनच वाचकांनी उत्तरं पाठवायची. जो स्पर्धक विशिष्ट स्कोअर पूर्ण करेल त्याला बक्षीस असं या स्पर्धेचं स्वरूप. नाशकातल्या डॉ. क्षमा अघोर यांची ही कल्पना. त्या सांगतात, “चारचौघांमध्ये गप्पा मारायला बसलो आणि समोरचा एकदम रेडीरेकनरचे दर, घरांच्या किंमती, नवे शैक्षणिक प्रयोग, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे सध्याचे विश्वस्त कोण असे काही प्रश्न-चर्चा सुरु झाल्या की माझ्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असायचं. हे लोक नेमकं काय, कशाविषयी बोलत आहेत हे मला न समजल्यामुळे त्या गप्पाच्या मैफलीतून ‘बॅक टू पेव्हिलयन’ अशी माझी स्थिती व्हायची. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काय करायचं हा विचार यातूनच सुरु झाला”. आणि समोरच्या टेबलावर पडलेल्या दैनिकामुळे क्षमा यांना रस्ता दिसला.
त्या म्हणतात, “लहानपणापासून मला अवांतर वाचनाची आवड नव्हती. त्यामुळे अभ्यासाच्या पुस्तकापलीकडे कधी काही वाचल्याचं मला आठवत नाही. त्यामुळे अर्थतच आपल्या सभोवताली काय सुरू आहे, काय बदल होताहेत हे मला फारसं माहीत नसायचं. डॉक्टरी पेशाकडे वळल्यानंतर रुग्णांशी, त्यांच्या नातेवाईकांशी संवाद साधतांना वाचनाची कमतरता प्रकर्षाने जाणवायला लागली”. मुलांचं आपल्यासारखं होईल, या विचारने त्या अस्वस्थ झाल्या. मुलगा अद्वय हाही मोबाईलशी खेळतांना दिसायचा. या सगळ्याला योग्य दिशा मिळावी यासाठी त्यांनी ‘वर्तमानपत्राचे वाचन’ हा पर्याय निवडला. आधी त्यांनी मुलांना पेपर वाचायला सांगितलं. पण असं नुसतं सांगितलेलं मुलं थोडंच ऐकतात? म्हणून मग त्यांनी मुलांच्या मित्रांनाही यात सहभागी करून घ्यायचं ठरवलं. आणि ‘व्हॉट्स ग्रुपवरची वाचन चळवळ’ सुरू झाली.
रोज पेपर वाचन करायचं, निवडक बातम्यांवर प्रश्न काढायचे आणि उत्तरं मुलांना शोधायला सांगायची. असं सुरु झालं. रोज १० गुणांची ही परीक्षा व्हॉट्स अपवर व्हायची. त्यात आठवड्यात ५०च्या पुढं जाईल त्याला बक्षीस द्यायला सुरूवात केली. सुरुवातीला केवळ ५ ते १० जण असलेला आमचा ग्रुप आज ६३ पालकांवर पोचला असल्याचं, क्षमा सांगतात. मुलांच्या शाळा, परीक्षा, क्लासेस यामुळे हा उपक्रम मासिक झाला आहे. मुलांनी लिहितं व्हावं म्हणून एखाद्या बातमीवर त्यांचं मत तीन-चार ओळीत मागवायला आता त्यांनी सुरुवात केली आहे. आणि त्यालाही मुलांचा प्रतिसाद मिळतो आहे. नव्या तंत्रज्ञानाचा असा उत्तम उपयोग होऊ शकतो, हेच या नाशिककर मंडळींनी दाखवून दिलं आहे. 

 
- प्राची उन्मेष.

Saturday, 12 August 2017

द पष्टेपाडा पॅटर्न!!

एक छोटीशी रंगीबेरंगी शाळा, मुलांच्या पाठीवरुन दप्तराचं ओझं गायब, प्रत्येकाच्या हाती स्वत:चा टॅब!! सराईतपणे टॅबवर बोटं चालवत विद्यार्थी अभ्यास करत आहेत. एवढंच नाही तर विद्यार्थ्यांचा गृहपाठसुद्धा ऑनलाईनच तपासला जातो आणि त्यांना मेलवर उत्तर पाठवलं जातं. एकदम परदेशातली वाटते ना ही शाळा? पण नाही, ही आहे ठाणे जिल्ह्यातील पष्टेपाडा डिजिटल जिल्हा परिषद शाळा!




शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी पाड्यावरची ही शाळा घडवली संदीप गुंड या शिक्षकाने. संदीप सर या शाळेत रुजू झाले तेव्हा शाळा गळक्या छपराची होती. बहुतांश विद्यार्थी शाळेकडे फिरकायचेच नाहीत. अगदी गुंड सरांनाही इथं नोकरी करायला नकोच असं वाटत होतं. त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे तशी विनंती केली आणि चांगलं काम करण्यासाठी एखाद्या चांगल्या शाळेत नेमणूक करण्याची इच्छा व्यक्त केली. पण तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी 'चांगलं काम करायचं असेल तर हीच शाळा सुधारुन दाखव' असं आव्हान दिलं आणि मग घडला पष्टेपाड्याचा कायापालट!
संदीप सर मनापासून शिकविण्याचा प्रयत्न करत होते. मात्र मुलं शाळेत यायचीच नाहीत. मुलं नेमकी जातात तरी कुठं याचा शोध घेतला आणि सरांना कळालं की गावातला एकुलता एक टीव्ही पाहण्यासाठी पाटलांच्या घरात मुलं गर्दी करतात. टीव्हीवर कोणत्याही भाषेत काहीही चालू असलं तरी मुलांना फरक पडत नाही, त्यांना फक्त टीव्ही हवा असतो. शिवाय त्यांना मोबाईलवरचे गेम्स, फोटो काढणं हे सुद्धा आवडतं हे सरांच्या लक्षात आले. मुलांचे स्क्रिनप्रतीचं वेड लक्षात आलं आणि सरांनी मग शाळेत कॉम्प्युटर आणायचा ठरवला.


''कॉम्प्युटरची युक्ती चांगलीच यशस्वी ठरली. मुलं कॉम्प्युटरच्या ओढीनं दररोज शाळेत येऊ लागली. मी मुलांना मुक्तपणे कॉम्प्युटर हाताळू द्यायचो. पेंटसारखं साधं सॉफ्टवेअर, वेगवेगळे शैक्षणिक गेम्स, मराठी आणि इंग्रजी बडबडगीतं आम्ही डाऊनलोड करुन घेतली. शिवाय त्यांच्या अभ्यासाला पूरक ठरतील असे व्हिडिओज, गेम्स, इंटरअक्टिव्ह सॉफ्टवेअर यांचाही वापर सुरु केला आणि मुलांना अभ्यासाची गोडी लागली.


हे सगळं त्यांच्या पालकांपर्यंत पोहोचवावं, म्हणून संदीप सरांनी गावात एक सभा घेतली. त्यात मुलांचा अभ्यासात वाढत चाललेला रस, भविष्यकाळातील कॉम्प्युरचे महत्त्व, शाळासुधारणेसाठी राबविण्याचे प्रकल्प याविषयी ते बोलत होते. आणि तेवढ्यात एका मोलमजुरी करणाऱ्या आजीबाईंनी चुरगाळलेल्या 50-100 च्या नोटा टेबलवर ठेवत शाळेला एक हजार रुपयांची मदत जाहीर केली. संदीप सर सांगतात, "त्या आजीबाईंच्या मदतीने मी भारावूनच गेलो. कारण हातावर पोट असणाऱ्या या आजीबाईंचे कोणतंच नातवंड शाळेत शिकत नव्हतं, तरीही गावाच्या भल्यासाठी म्हणून त्यांनी मदत दिली."
आणि मग मदतीचा ओघच सुरु झाला. गावातल्या पेंटर्सने रात्र- रात्र जागून शाळा सुंदर रंगवून दिली, पुण्याच्या श्रद्धा शहा यांनी आपल्या लग्नाचे रिसेप्शन रद्द करुन शाळेला चार लाखांची मदत दिली. ज्यातून संपूर्ण शाळेसाठी सरांनी टॅब खरेदी केले. संदीप सर एवढ्यावरच थांबले नाहीत. आपल्या शाळेप्रमाणे इतरही शाळा डिजिटल व्हाव्यात यासाठी राज्यभरात 'प्रेरणा सहविचार सभां'च्या माध्यमातून त्यांनी मार्गदर्शन सुरु केले आहे. त्यातून महाराष्ट्रातल्या 11,200 शाळा लोकसहभागातून 110 कोटी रुपये मिळवत डिजिटल झालेल्या आहेत. 


- स्नेहल बनसोडे- शेलुडकर, पुणे

दोनदा राष्ट्रपती पुरस्कार मिळविणाऱ्या या अवलिया शिक्षकाच्या प्रवासाविषयी विस्ताराने जाणून घेण्यासाठी क्लिक करा: http://samata.shiksha/mr/the-pashtepada-pattern/

Friday, 11 August 2017

मुक्काम पोस्ट स्मशानभूमी !



चंद्रकांत नारायण लाड. वय ७७. मुक्काम पोस्ट स्मशानभूमी! ही कथा कादंबरी नव्हे, वास्तव आहे. तो वेडा नाही आणि संतही नाही. तो आहे तुमच्या आमच्यासारखा सामान्य माणूस. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात घावनाळे खुटवळवाडीच्या स्मशानभूमीत गेली सतरा वर्षं त्याचं वास्तव्य आहे.



दहावी शिकलेला चंद्रकांत मुबंईत आपली चित्रकलेची कला जोपासत होता. त्यात जम बसेना म्हणून घावनाळे गावी आला. दरम्यान फातिमा नावाच्या ख्रिश्चन मुलीशी आंतरजातीय प्रेम विवाह केला. परंतु फातिमाची साथ त्याला फारकाळ लाभू शकली नाही. तिच्या मृत्यूनंतर एकाकी पडलेला चंद्रकांत आजारी पडला. त्याला कुणी आसरा देईना. माणसाचा शेवट ज्या स्मशानभूमीत होतो तिथंच त्याने नव्याने आयुष्य सुरु केलं. भुताखेतांचं वास्तव्याचं ठिकाण म्हणजेच स्मशानभूमी अशी सर्वसामान्यांची अंधश्रद्धा. पण स्मशानभूमीत राहूनच त्याने अंधश्रद्धा झुगारली. त्याचा स्वानुभव ऐकण्यासाठी मुक्काम पोस्ट घावनाळे खुटवळवाडी-तील स्मशानभूमीला अवश्य भेट द्या. 
 - विजय पालकर.

Thursday, 10 August 2017

प्रेम हवं बाई!

व्हीलचेअरवरून गुजगोष्टी :
गाण्याशिवाय इतर कशात अत्यंत काटेकोरपणे रस घेताना मी तिला पाहिलं असेल तर स्वयंपाकघरात. प्रचंड नेमकी नि प्रचंड शिस्तीची अशी ती.
ती रजनी करकरेची १९८५ मध्ये देशपांडे झाली. त्यावेळेपर्यंत संपूर्ण स्वयंपाकाची वगैरे जबाबदारी कधी तिच्यावर पडली नव्हती... पण हां, विशेष काही करायचं तर ती अतिशय खपून नि निगुतीनं सगळं करायची, अगदी परवा परवापर्यंत! तिचं नि प्रमोद देशपांडेंचं लग्न चर्चेत होतं ते फक्त प्रेमविवाहामुळंचं नव्हे तर तिचं पोलीओग्रस्त असणं नि त्या दोघांच्या वयात पठडीला चालून जातं त्यापेक्षा अधिक अंतर असल्यामुळं. रजनी-प्रमोदनी मात्र लोकांच्या उत्सुकतेच्या ‘या’ कोनाला कधीच खाद्य पुरवलं नाही... हो, रूचकर, चवदार दडपेपोहे, खुसखशीत सामोसे, घरी केलेला चक्का, गंध हुंगत राहावा अशी ‘टॉक्क’ करायला लावणारी कॉफी जरूर पुरवली.
तिच्याकडे गाणं शिकण्यासाठी येणारे सगळे तिला मॅडम म्हणतात, काहीजण रजनताई. मी आयडी म्हणते. तिला बघतेय तेव्हापासून तिचं स्वयंपाकघराशी असणारं ‘अफेअर’ मी न्याहाळते आहे. तिच्या स्वयंपाकघरात प्रचंड शिस्त. मिसळणाचा डबा बघितला की ही शिस्त कळावी. मी नव्यानं स्वयंपाक शिकायला लागले त्यावेळी एखादी भाजी कशी केली हे तिला सांगायचे तेव्हा ती म्हणायची, ‘‘कशा गं तुम्ही सोने? उपलब्ध आहे म्हणून हिंग घातला, जिरे घातले असं नसतं करायचं. उग्र वास असणार्‍या पदार्थासाठीच्या फोडणीत केवळ आहे म्हणून हिंग नि बाकी मसाले नसतात घालायचे. आपण एखादा जिन्नस बनवताना काय काय नि किती किती घालतो यावर त्याची चव व रंग अवलंबून नसतो गं, तो कुठल्या क्रमाने नि कुठल्या टप्प्यावर घालतो यावर अवलंबून असतो.’’ - तिची जिभ अत्यंत जालीम. दोन्ही अर्थांनी! आत्ता संदर्भ आहे तो पदार्थांच्या नेमक्या चवीबाबत नि पोताबाबत. त्यामुळं अनेकांना तिच्यापर्यंत पदार्थ पोहोचवताना जाम टेन्शन असतं. मात्र पदार्थ तिला आवडला तर कौतुकही ती हातचं राखून करत नाही.
तिचं लग्न झालं तेव्हा ती पोलीओसह वयानुसार खूपच कार्यक्षम होती. नव्यानं स्वयंपाकाची पूर्ण जबाबदारी तिनं मन:पूर्वक घेतलेली. सुरुवातीच्या काळात कट्ट्यावर स्टोव्ह किंवा हॉटप्लेट ठेवून कट्ट्यालाच रेलून उभं राहात तिनं आपलं पाककौशल्य आजमावायला सुरुवात केली होती, जे आधी फक्त त्यावेळी नव्या असणार्‍या ब्रेडरोल्स नि डोसे वगैरेपर्यंत मर्यादित होतं. त्या काळात एकदा ती रात्रीची अस्वस्थ झालीय असं दिसल्यावर नवर्‍यानं विचारलं, काय झालंय म्हणून तर म्हणाली, नीट विरजण लागेल का याची शंका त्रास देतेय. तिच्या संवेदना अतिशय तीव्र. एखादा पदार्थ चाखला की त्यात काय काय वापरलं गेलंय याची ९०% यादी ती अचूक सांगू शकते. याच तीव्र संवेदना तिला परिस्थिती बिकट झाली तरी जगण्याशी धरून ठेवतात!
आता ती जवळपास बेडवर असते. पोलीओची तीव्रता वाढत गेल्यामुळं तोल जाण्याचे प्रकार खूप वाढले नि वीस-तीस पावलं कुबड्यांच्या आधारे चालून संडासपर्यंत जाणंही कठीण झालंय. एकेकाळी आकाशवाणीची मान्यताप्राप्त कलाकार म्हणून भरपूर दौरे करणारी नि मजलेच्या मजले चढून जाणारी, सतत गर्दीत असणारी आयडी टी.व्ही.लावून बेडवर पालथी झोपलेली असते. झोपलेली हा शब्द सोयीसाठी वापरला, पण हीच तिची आयडियल पोजिशन आहे. ती तिच्या गाण्याच्या तासासाठी फक्त तक्याला थोडी रेलून बसती होते. त्यात्यावेळी तेही नाही जमलं तर तसाच पडून क्लास घेते. पूर्वी कितीही तोल गेला तरी साडी नेसायची ती, आता गाऊनशिवाय पर्याय नाही. मात्र योग्य रंगाचं कानातलं, डोक्यात एखादं फूल, नखांना चढलेला ताजा मेंदीचा रंग हे असतंच. सतत काही ना काही दुखणं, अतिरेकी डायबिटीसमुळं अंग काळं पडणं नि सतत खाज येणं, जिभेची चव जाणं, जिभेला जराही तिखट लागू न देणं वगैरे गोष्टी आहेत. खूप कर्तृत्त्व गाजवल्यानंतर आता एका खोलीला नव्हे, एका बेडलाच जग मानून महिनोन्महिने तिथं शक्य तितका सकारात्मक मूड ‘टिकणं’ खूप अवघडंय, ती तो टिकवते. मन आवडत्या गोष्टीत लावते. ती माणूस आहे, त्यामुळं मधून मधून भावनेचा तोल जातो, रागराग होतो. तरी तिची तीव्रताच तिला जगण्याकडं आणते. तिची सहकारी अनिता स्वयंपाकघरात काहीतरी गरम करत असते तेव्हा भांड्याच्या नुसत्या आवाजावरून नि आतल्या हालचालीवरून हिला काही कळतंच. ती ताबडतोब सुचवते, ‘‘अनू, अगं त्या पातळ कुंड्यात पदार्थ गरम केलास तर तो तापून नुसता काळा पडेल. ते मध्यम अंगाचं, अमुक नाव असलेलं पातेलं आहे, ते घे. कसं गं कळत नाही रोज रोज करूनही? काय करणार म्हणा! प्रेम करावं तरच आत्मसात होतं बाई सगळं!’’
- सोनाली नवांगुळ

Tuesday, 8 August 2017

मुलांवर आपल्या भाषेचं, धर्माचे बंधन नको

प्रवास पालकत्वाचा: मुमताज शेख
“मुलांवर आपल्या भाषेचं, धर्माचे बंधन नको हे आम्ही पहिल्यापासूनच ठरवलं होतं”, १८ वर्षाच्या मुस्कानची आणि १० वर्षांच्या कबीरची आई आणि गेली १७ वर्षे कोरो नावाच्या सामाजिक संस्थेत काम करणाऱ्या मुमताज शेख सांगत होत्या. मुमताजचं स्वतःचं आयुष्य संघर्षमय राहिलं आहे. या संघर्षाच्या काळात कोरो या संस्थेचे सुजाता खांडेकर, महेंद्र रोकडे आणि पती राहुल गवारे प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत राहिल्याचं मुमताज सांगतात. पारंपरिक वळणाच्या गरीब मुसलमान कुटुंबात जन्म, भावाच्या जन्मानंतर वडील सोडून गेल्याने एकट्या आईसोबत राहताना हालअपेष्टांमध्ये पडलेली भर, शाळा नववीतच सुटलेली, पहिलं लग्न लवकर होऊन साडेसोळाव्या वर्षीच मुस्कानचा जन्म. लग्न झाल्याझाल्या सुरू झालेला छळ, दरम्यान वस्तीत काम करणाऱ्या कोरो संस्थेशी झालेली ओळख, आत्मभान...असा प्रवास. मुसलमान स्त्रीला स्वतःहून तलाक मागता येत नाही. मुमताजने प्रयत्नांती मिळवलेल्या घटस्फोटानंतर आईनेही आसरा नाकारला. मुस्कान होती अवघी ६ वर्षांची. प्रत्येक क्षणी आईच्या पाठीशी उभं राहणार्‍या मुस्कानसाठी हा मोठाच धक्का होता. ''मला जे बालपण मिळालं नाही, ते माझ्या मुलीला मिळावं यासाठी माझी सगळी धडपड सुरू होती. तिचीच अशी अवस्था होण्याने मी खचून गेले.'' मुमताज सांगतात. मुमताजला पुन्हा माणसात आणलं, राहुल गवारे यांनी. मुस्कानचे आणि राहुलचे बंध मुस्कान अडीच वर्षांची असल्यापासूनचे.'' हे बंध इतके दृढ आहेत की आजही मुस्कान तिची प्रत्येक गोष्ट माझ्यापेक्षा राहुलकडे जास्त शेअर करते.'' मुमताज सांगतात. पहिल्या वाईट अनुभवामुळे पुन्हा लग्न करण्याबाबत मुमताज साशंक होत्या. त्यावेळी मुस्काननेच आईला बळ देत ''राहुल के साथ शादी कर ले, अपने साथ रहेगा'', असं सांगत पुढाकार घेतला. मुमताजप्रमाणे राहुलही कोरोमध्येच घडले असून कष्ट करतच मोठे झाले आहेत. त्यामुळे धर्म वेगळा असला तरी दोघांमध्ये अनेक सामायिक गोष्टी होत्या.
लग्नाबाबत राहुलच्या घरातून नाराजी होती. पण कबीरच्या जन्मानंतर परिस्थिती पालटली. कबीरचं नामकरण बौद्ध पद्धतीने झालं. कबीरला राहुल यांच्या घरातून मराठी बोलण्याचा आग्रह व्हायचा. तो मराठी येत असूनही मुद्दामच त्यांच्याशी हिंदीमध्ये बोलायचा. पण या गोष्टी आम्ही ज्याच्यात्याच्यावर सोपवल्या आहेत. त्यात मध्ये पडत नाही, मुमताज सांगतात.
''मुस्कानने स्वतःहून तिचं नाव बदलेपर्यंत आठवीपर्यंत शाळेत तिचं पूर्वीचेच नाव होतं. त्यामुळे शाळेत तिघांची वेगवेगळी नावं असल्याबद्दल गोंधळ उडायचा. धर्माबद्दल प्रश्न विचारले जायचे. त्यावेळी आम्ही सांगायचो की आम्हाला कोणत्याच धर्माचा उल्लेख करायचा नाही. तुम्हीही त्याचा आग्रह धरू नका. कबीरच्या वेळीही प्रश्न उपस्थित व्हायचे पण तेव्हा कबीरनेच एकदा उत्तर दिलं होतं की मेरी मम्मी कहती है की हम इन्सान है. मुमताज सांगतात. ''दोन्ही मुलांना सगळे सण आवडतात. कठीण काळात मी आणि मुस्कान भाड्याने एका घरात राहत होतो. घरमालक आणि आजूबाजूची वस्तीही मुस्लिम होती. तेव्हा सात-आठ वर्षांच्या मुस्कानने घरी गणपती बसवण्याचा आग्रह धरला. मला खूप धाकधूक वाटत होती. कारण माझ्या लहानपणी मी रांगोळी जरी काढायला घेतली तरी नजरा बदलायच्या. पण मुस्कानने गणपती बसवला. आमच्या गैरहजेरीत मुस्कानने सांगितल्याप्रमाणे शेजार्‍यांनीही देवापुढे दिवा अखंड तेवत ठेवला.''
मुस्कान आणि कबीर दोघेही खूप समजूतदार आहेत. कबीर स्पायडरमॅनचा चाहता आहे पण तो कधी त्यासाठी हट्ट करत नाही. टीव्हीच्या बाबतीत सोडलं तर मुलं बाकी सगळ्या गोष्टीत ऐकतात. कबीरला कार्टून्स बघायला आवडतात. तेव्हा प्रश्न विचारून त्याला योग्यायोग्यतेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुमताज सांगतात. अर्धवट माहिती मिळाल्यामुळे नुकसान होतं त्यामुळे पालकांनी मुलांच्या टीव्ही, इंटरनेट वापराबाबत सजग राहाणं, मुमताज यांना आवश्यक वाटते.
पालक म्हणून मुलांची बरीचशी जबाबदारी राहुलने पेलली आहे. मुस्कानही कबीरला सांभाळते, त्याचा अभ्यास घेते. याखेरीज आपल्या मामी आणि प्रणाली या मदतनीस मुलीचाही त्या आवर्जून उल्लेख करतात. मुमताज,राहुल करत असलेलं मुस्कान,कबीर यांचं पालकत्व असं अनोखं आहे.
वंचित घटकातल्या मुलामुलींना अगदी घरापासून बाहेरच्या जगापर्यंत अनेक अडचणींना, आव्हानांना सामोरे जावं लागतं. त्यांना विश्वास, आपुलकी देणार्‍या, कायम सोबत करणार्‍या सपोर्ट सिस्टिमची गरज असते, जी कोरोच्या रूपाने आपल्याला मिळाली. इतरांनाही ती मिळावी यासाठी प्रयत्न करत असल्याचं मुमताज सांगतात.
- शब्दांकन: सोनाली काकडे

Monday, 7 August 2017

जागतिक स्तनपान सप्ताह

१ ते ७ ऑगस्ट हा आठवडा जागतिक स्तनपान सप्ताह म्हणून ओळखला जातो. १९९० पासून हा सप्ताह सुरु झाला.



गरोदरपण, बाळंतपण आणि मुलांना वाढवणे यासगळ्या बाबतीत जगातल्या प्रत्येक संस्कृतीत वेगळे समज-गैरसमज आहेत. पण, प्रत्येक आई-बाबा, कुटुंबीय, समाज आणि आता प्रशासनानेही याबाबत सजग होणं गरजेचं आहे. आईचं दूध हा बाळाचा पहिला हक्क त्याला मिळवून देण्यासाठी सगळीकडूनच प्रयत्न व्हायला हवेत.
‘एकत्र येऊ, स्तनपानाला प्रोत्साहन देऊ’ ही यावर्षीची स्तनपान सप्ताहाची संकल्पना आहे.
#नवीउमेद